गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, July 15, 2023

राग-रंग...लेखांक १६.बिहाग.



लट उरझी सुरझा जा बालम
हाथो में मेहंदी लगी मोरे बालम
     एकाच रागातील एकच चीज विविध गायकांनी गायिल्यावर वेगळी वाटणे ही शास्त्रीय संगीतामधील एक वेगळीच मजा आहे.तसेच एकाच घराण्यातील विविध गायक सुद्धा जेव्हा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने गातात तेव्हाही प्रत्येकाच्या गाण्यात वेगळेपणा दिसतो.किराणा घराण्याचेच उदाहरण घेतले तर (किराना घराण्याचे नामकरण उत्तर प्रदेशातील मुज़फ्फरनगर जिल्ह्यातील एक तहसीलीचे गाव 'कैराना' (जो सध्या जिल्हा शामलीमध्ये आहे) पासून झाल्याचे मानतात.हे उस्ताद अब्दुल करीम खाँ चे (१८७२-१९३७) जन्मस्थान पण आहे, जे विसाव्या शतकातील  किराना शैलीचे सर्वाधिक महत्वपूर्ण भारतीय संगीतज्ञ होते. यांनाच किराना घराण्याचे वास्तविक संस्थापक मानल्या जाते.) त्यांच्या पासून ते आजच्या गायकांच्या गायकीचा विचार केला तर काही साम्यासह बरीच तफावत पण दिसते.अर्थात दर पिढीगणिक हा बदल होणे हे नैसर्गिक आहे.उस्ताद अमीर खान साहेबांच्या गायकीचा मोठा प्रभाव मेवाती घराण्याचे पंडित जसराज यांच्या गायकीवर असल्याचे दिसून येते.सद्य काळात प्रत्येक घराण्यातील चांगल्या बाबी आत्मसात करून आपली गायकी प्रगल्भ करण्याचा प्रयत्न सध्याच्या पिढीतील गायक करीत आहे.ही बाब अभिनंदनीय व अनुकरणीय आहे असे मला वाटते.अनेक घराण्याच्या उस्ताद व पंडितांनी सुद्धा याला मान्यता दिली आहे. तसे तर भारतीय शास्त्रीय संगीतातील संगीत सिद्धांतांच्या बाबतीत लिहिणे फार कठीण काम आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे लिखित संकेतांची कोणती एक निर्धारित व औपचारिक पद्धती नाही.मुळात भारतीय संगीत एक श्रवण परंपरा आहे, त्यामुळेच लिखित स्वरूपातून खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणा अथवा ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही.म्हणूनच शास्त्रीय संगीताला गुरूमुखी विद्या म्हणतात. असो! प्रस्तावना बरीच लांबली आहे.
     आज आपण बिहाग रागविषयी जाणून घेणार आहोत.
     (सर्वप्रथम जेव्हा बिहाग नाव ऐकले तेव्हा जोरात हसू आले.छोट्याशा खेड्यातून आलेलो मी...खेड्यातला कुचिनपणा अंगात भिनलेला.त्यामुळे मनातल्या मनात  बिहाग शब्दाची फोड (संधी विग्रह) वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे हसू आवरले नव्हते.या हसण्यामुळे मार बसला नाही.पण भरपूर शिव्या खाव्या लागल्या,त्या गुपचूप खाऊन घेतल्या.चिजांच्या बाबतीतही त्यातील न कळणारे शब्द ऐकून वेगवेगळे अर्थ काढल्यामुळे अनेकदा इतर विद्यार्थ्यांसमोर (विशेषतः विद्यार्थिनींसमोर) अनेकदा अपमानित व्हावे लागायचे.शब्दच तसे असायचे...देस मधील 'रब गुना गाय रे तू मना' यातील 'रब'चा अर्थ न लागल्यामुळे व पुढील 'गाय' चा अर्थ 'दूध देणारी गाय असा अर्थ काढून,पुढील 'काहे भटकत फिरे निसदिन' यातील फक्त गाय व भटकणे हे कळल्यामुळे जो अर्थ काढायचा तो काढून मोकळा व्हायचो.शिकविणारे गुरुजी अर्थ सांगण्याच्या भानगडीत न पडता फक्त शिकविण्याचे काम करायचे.बिहाग मधीलच 'जब ते बिछुरे लालन' ह्या चिजेचा अर्थ १० ते १५ वयोमान असलेले विद्यार्थी सांगू शकतील काय? तिलक कामोद मधील 'चंचल चित चोर चतुर अटक मोसे गुईया' या द्रुपदाचा अर्थ काढताना हसू येणार नाही तर काय?भैरव मधील 'धन धन मुरत कृष्ण मुरारी' मधील धन म्हणजे संपत्ती हा अर्थ काढून 'कृष्ण खूप श्रीमंत असल्यामुळे धन मुरवत होता'असे काही बाही डोक्यात यायचे.खरे म्हणजे शिकविणाऱ्यांनी चिजेच्या अर्थासह शिकवायला हवे.पण तसे फारसे घडत नसावे.निव्वळ पोपटपंची असायची. अर्थात त्यातून राग स्वरूप कळायचे हे मात्र तितकेच खरे.चिजा मात्रा डोक्यावरून जायच्या. 'बालमुवा माईरी' बहार,'मोर मोर मुसकात जात' मालकौंस, 'छों छननन छों छननन बिछुवा बाजे' (माझ्या डोक्यातील प्रश्न 'बिच्छू वाजणार कसा?') जौनपुरी. 'लाल मोरीचू s s नरभी s जे s गी' कामोद मधील धमार.एक चीज तर महाराष्ट्रातील आणि त्यातही माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थासाठी अजूनच अनाकलनीय... 'तेंडेरे कारन मेंडेरे यार' मला फक्त 'मेंढरं' माहीत.त्या वयात न कळणाऱ्या चिजांची अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणून गुरुजनांनी शिष्यांना अर्थ कळतील अशाच चीजा शिकवाव्या. किंवा शिकवत असलेल्या चिजांचा अर्थ तरी सांगावा. असे जरी मी म्हणत असलो तरी शास्त्रीय संगीत हाच इतर सर्व शैलींचा पाया आहे,हे ही तितकेच खरे आहे. मी आर्णी (जि. यवतमाळ) येथे ३१ वर्षे संगीत विद्यालय चालविले,अणि विद्यार्थ्यांना कळतील अशा चिजा शिकविणे किंवा न कळणाऱ्या चिजांचा अर्थ सांगणे हे बंधन पाळले.शास्त्रीय संगीतातील प्राचीन अस्पष्ट आणि निरर्थक साहित्यात बदल सध्या अपेक्षित आहे.आज आपल्या देशात चित्रपट संगीत अत्यंत लोकप्रिय आहे.कारण ते रस आणि भाव या दृष्टीने अधिक परिणामकारक आहे.त्यावर कितीही ताशेरे ओढले तरी संगीताच्या प्रसाराचे श्रेय मधल्या काळातील चित्रपट सांगिताला द्यावेच लागते.असो!
     बिहाग राग बिलावल थाटातून उत्पन्न होतो. या रागाची गम्मत अशी आहे की,हा दोन पद्धतीने गायिल्या जातो.एकात फक्त कोमल मध्यम व दुसऱ्यात दोन्ही मध्यमाचा प्रयोग केल्या जातो.  आरोहात रिषभ,धैवत लागत नाही.म्हणजे वर्ज आहे.अवरोहात सातही स्वर लागतात, म्हणून याची जाती औडव-सम्पूर्ण आहे. यात सर्व स्वर शुद्ध आहेत.
अवरोहातील तीव्र मध्यम या रागाची रंजकता वाढवते. वादी स्वर गांधार आणि संवादी स्वर निषाद आहे.शास्त्रीय माहितीनुसार रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी गायिल्या जाणार हा एक अतिशय मधुर राग आहे. या रागाचा व्यापक स्वरूपातील प्रचलित काळ सोळावी शताब्दी आणि चौदा ते अठराव्या शताब्दीतील वैष्णव काळातील लोकगीतांवरून आपल्या लक्षात येतो. या रागाचा उपयोग रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक गीतांमध्ये आणि विविध बंगाली व उत्तर भारतीय रचनांमध्ये केल्या गेला आहे.भारतीय चित्रपटात तर याचा अतिशय सुंदर रितीने वापर केला आहे. असे म्हणतात की,बिहाग आपल्या असंख्य रुपात प्रेमाचा राग आहे.आनंद,उदासी,आशा,निराशा, शृंगार वगैरे सर्व अनुभूती यातून प्रकट होते.बिहागचे काही प्रकार :-नट बिहाग,बिहागडा,मारू बिहाग.
     युट्युबवर पं. रविशंकर,उस्ताद अली अकबर खान,उस्ताद बडे गुलाम अली खान,गिरीजा देवी,उस्ताद अमीर खान,पं. भीमसेन जोशी,पं. जसराज,पं. कुमार गंधर्व,पं. वसंतराव देशपांडे,किशोरी आमोणकर,पं. हरिप्रसाद चौरसिया,वीणा सहस्रबुद्धे,पं. निखिल बॅनर्जी,पं. नयन घोष,डागर बंधू,डॉ. अश्विनी भिडे देशपांडे,उस्ताद राशीद खान,पं.अजय चक्रवर्ती, पं. व्यंकटेश कुमार,पं. कैवल्य कुमार गुरव,पं. उल्हास कशाळकर,कौशिकी चक्रवर्ती,केदार बोडस,देवप्रिया आणि सुस्मिता चटर्जी,देवशीष भट्टाचार्य,गंधार भालेराव,इंद्राणी चौधरी वगैरेंनी गायिलेला वा आपापल्या वाद्यांवर सादर केलेला बिहाग उपलब्ध आहे.!
     ●हिंदी गाणी...
'ऐ दिले बेकरार क्यूँ?' सैगल.चित्रपट-शहाजहान.
'सुहानी घडिया बीती जाय' पारूल घोष.मिलन १९४६.(बिहाग आणि हमीर रागाचे मिश्रण) 'मेरी लाडली रे मेरी लाडली' लता.चित्रपट-अंदाज. 'हमारे दिल से ना जाना' लता. चित्रपट-उड़न खटोला 'तुम तो प्यार हो सजना' लता,रफी. चित्रपट-सेहरा. 'तेरे सुर और मेरे गीत' लता.चित्रपट-गूंज उठी शहनाई.(यात बिस्मिल्ला खान साहेबांनी सर्वप्रथम चित्रपटासाठी शहनाई वादन केले.) 'बन के चकोरी गोरी झूम झूम नाचो री' मुकेश.चित्रपट-हम मतवाले नौजवान. 'झूम झूम कर चली अकेली' हेमंत कुमार.चित्रपट-ताज. 'दिल जो न कह सका वो ही राजे दिल' रफी.चित्रपट-भीगी रात. 'चलेंगे तीर जब दिल पे' लता,रफी.चित्रपट-कोहिनूर. 'बोलीये सुरीली बोलियां' मिताली, सुलक्षणा पंडित.चित्रपट-गृह प्रवेश 'पिया बावरी' आशा.चित्रपट-खूबसुरत. 'बीती ना बितायी रैना' लता,भपेंद्र.चित्रपट-परिचय. 'कोई गाता मैं सो जाता' येसूदास.चित्रपट-आलाप.'जिंदगी के सफर में' किशोर कुमार.चित्रपट-आप की कसम.'तेरे प्यार में दिलदार' लता.चित्रपट-मेरे मेहबूब.'सुनो सजना पपीहे ने' लता.चित्रपट-आये दिन बहार के.'माना तुम बेहद हसीन हो' येसुदास.चित्रपट-टूटे खिलौने. 'ओह कदल कनमनी से' चित्रा, एआर रहमान.चित्रपट-मलारगल कातें.  सत्यजीत रे यांच्या १९५८ मधील 'जलसागर' या चित्रपटातील एका दृश्यात सुरबहार वादक वाहिद खान यांनी २९.५० ते ३१.५८ इतका वेळ बिहाग राग वाजविला आहे.'दिल चीज क्या है आप मेरी' आशा भोसले.चित्रपट-उमराव जान.यात बिहाग दिसतो. 'तुझे जीवन की डोर से बांध लिया है' लता,रफी.चित्रपट-असली नकली
कैसे सुख सोएं' रोंकिनी गुप्ता.चित्रपट-आंखों देखी.
'पत्ता पत्ता बुटा बूटा हाल हमारा जाने है' -अली रजा.
'कहूँ का से शरम की है बात' दादरा.बेगम अख्तर.
'काहे सताओं मोहें शाम' ठुमरी.पंडित जगदीश प्रसाद.
    ● मराठी...
(सुगम संगीतातील गीते एखाद्या रागावर आधारित असू शकतात.पण संपूर्ण गाणे त्याच रागावर असेल असे नाही.अनेक रागांच्या छटा त्यात दिसू शकतात.)
'अंगणी पारिजात फुलला' -मधुवंती दांडेकर.'मम आत्मा गमला' बालगंधर्व.नाटक-स्वयंवर.'मोडू नका वाचनास नाथा' सुधीर फडके.गीत रामायण.'लग्नाला जातो मी' अनंत दामले.नाटक-संगीत सौभद्र.'ही माला विमला कां जोडी' पं. भार्गवराम आचरेकर.नाटक-सत्तेचे गुलाम.'सकल चराचरि या तुझा असे' पं. जितेंद्र अभिषेकी.नाटक-भावबंधन
-------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,मंथन पुरवणी.रविवार दि.१६ जुलै २०२३.


 

No comments:





संगीत आणि साहित्य :