गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, October 3, 2022

मज कळले तू माझी...उ.रा.गिरी

.     स्व.उ.रा.गिरींचे खालील गीत मी अनेक कार्यक्रमातून गायिलो आहे.१९७५ ला ऑर्केस्ट्रा सोडल्यानंतर काही काळ गीत-गझला,सरोद वादन असे सोलो कार्यक्रम करायचो. त्यावेळी साउंड सिस्टीमवाल्याने कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग केले तर ते मिळायचे.पण बहुतेक एम्प्लिफायर व माईक अशीच साउंड सिस्टीम असायची.समोर मॉनिटर पण नसायचे.रसिकांची दाद मिळाली की,कार्यक्रम व्यवस्थित चालला आहे असं समजायचं.
     सुरेश भट व मी महाराष्ट्रभर फिरलो तेव्हाही अशीच परिस्थिती होती.त्यावेळी जी जी गीते व गझला कार्यक्रमात ध्वनिमुद्रित झाल्या नाही त्या त्या गाऊन पुनश्च आपल्यासमोर ठेवण्यासाठी व्होकल कॉर्ड्सचा त्रास असूनही प्रयत्न करतो आहे.कृपया गोड करून घ्या!
        ह्या गीताची सुरावट त्यातील शब्दांप्रमाणे अनेक वळणे घेणारी आहे.कुठे भैरवी, कुठे तोडी तर कुठे बिलासखानी तोडी.हे गीत माझ्या कार्यक्रमात हमखास दाद घेत असे.आता नरडं चालत नसल्यामुळे 'त्या' प्रकारचे सादरीकरण जमत नाही.पण एका संगीतकाराची बंदिश म्हणून तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकता.धन्यवाद!

●Mobile REC.... headphone please

मज कळले तू माझी पण सगळे घडल्यावर
तू माझ्या गगनातुन उल्केपरी  ढळल्यावर

कळत न ही आज कुठे वनवासी वाट वळे ?
स्वप्नाच्या सरितेवर ही कुठली लाट जळे ?
हरवुन संदर्भ उभे जळ कुठल्या वळणावर

डोळ्याचे डोह दोन भरून आज आलेले
अश्रूंच्या पावसात चांद्रबिंब न्हालेले
क्रुसावर सनईच्या चंद्रकौंस खिळल्यावर

अजून कापऱ्या जळात प्रतिबिंबित आठवणी
अजून विराणी तळात गात कुणी जलराणी
एक कहाणी विझली मूक नदी काठावर
-----------------------------------------------------------------------
मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचा सुरेल कार्यक्रम गायक मयूर महाजन करतो..  
                      ● #सरगम_तुझ्याचसाठी ●



 

 

No comments:





संगीत आणि साहित्य :