दरबारी कानडा हा राग नायकी,शहाणा,सुघराई, सुहा, कौशी,अभोगी,हुसेनी या कानडा प्रकारातीलच एक राग आहे.प्राचीन राजदरबारात हा प्रकार जास्ती गायिल्या गेल्यामुळे ह्याला दरबारी कानडा म्हणत असावे.प्राचीन ग्रंथात दरबारी कानडा या रागाचा उल्लेख सापडत नाही.याचा उल्लेख मध्यकालीन म्हणजे मोगल काळातील साहित्यामध्ये सापडतो.आजची प्रचलित संगीत पद्धती व प्राचीन संगीत पद्धतीमध्ये बराच फरक आहे.या फरकाचे थोडे -फार आकलन भरत मुनींचे 'नाट्यशास्त्र', मतंग मुनींचे 'बृहद्देशी', पंडित शारंगदेवांचे 'संगीत रत्नाकर' या प्राचीन ग्रंथांमधून होते.
उत्तर भारतावर जस-जशी परकीय आक्रमणे होत गेली.तस-तसा मूळ भारतीय संगीतावरही ज्या ज्या विभागातून आक्रमणकारी येत गेले त्या त्या विभातील संगीताचा थोडा-फार परिणाम होत गेला.मात्र सगळ्यात जास्ती परिणाम 'खिलजी'च्या कालखंडात भारतात आलेल्या कवी/संगीततज्ज्ञ अमीर खुसरो (जन्म १२५३,मृत्यू १३२५) यांच्यामुळे झाला.उत्तर भारतीय संगीतामधील त्यांचे योगदान खूप महत्वाचे मानले जाते.खुसरो हे पहिले मुस्लिम कवी होते,ज्यांनी त्यांच्या काव्यात हिंदी शब्दांचा मोकळेपणे वापर केला.भारतीय भाषेसाठी 'हिंदवी' हा शब्द सर्वप्रथम त्यांनी वापरला.हिंदवी व फारसी भाषा एकत्र घेऊन केलेल्या कवितांमुळे त्यांना 'खडी बोली'च्या अविष्काराचे श्रेय दिल्या जाते.संपूर्ण आयुष्य राजाश्रयात घालविणाऱ्या खुसरोंनी साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातही भरीव योगदान दिले.भारतीय आणि इराणी रागांचे सुंदर मिश्रण करून 'ज़िल्फ़' (झिलफ),'साजगिरी' वगैरे रागांना जन्म दिला.तसेच 'कव्वाली' (सुफी भक्ती गायन शैली), 'सतार', 'तबला' ही त्यांचीच देण मानतात.आजही गायिल्या जात असलेली खुसरोची लोकप्रिय गीते खाली देत आहे.
१) ऐ री सखी मोरे पिया घर आए
२) परदेसी बालम धन अकेली मेरा बिदेसी घर आवना
३) मेरे महबूब के घर रंग है री
४) छाप तिलक सब छीन्हीं रे
५) बहुत कठिन है डगर पनघट की
६) आ घिर आई दई मारी घटा कारी
७) ज़िहाल-ए मिस्कीं मकुन तगाफ़ुल
८) दैया री मोहे भिजोया री शाह निजम के रंग में
९) सकल बन फूल रही सरसों
१०)तोरी सूरत के बलिहारी, निजाम
११)अम्मा मेरे बाबा को भेजो री
१२)बहोत रही बाबुल घर दुल्हन
१३)दुसुख़ने
१४)जब यार देखा नैन भर
१५)मोरा जोबना नवेलरा भयो है गुलाल
१६)ढकोसले या अनमेलियाँ
१७)जो पिया आवन कह गए अजहुँ न आए
१८)बहुत दिन बीते पिया को देखे
१९)काहे को ब्याहे बिदेस
२०)हजरत ख्वाजा संग खेलिए धमाल
२१)जो मैं जानती बिसरत हैं सैय्या
या कालखंडानंतर मुख्यपणे विचार करावा लागतो तो ग्वाल्हेरचे राजा मानसिंह तोमर यांच्या काळाचा.१४८६ ते १५१५ हा तो काळ. राजा मानसिंह स्वतः एक साहित्यिक व संगीततज्ञ होते.त्यांनी अनेक दोहे,चौपाया, कवितांसोबत अनेक छंदांची रचना केली.'मान कौतूहल' नामक ग्रंथामध्ये तत्कालीन धृपदांचा संग्रह केला.या 'मान कौतुहल'चे फारसी भाषांतर फकीरुल्ला सैफ खाँ यांनी केले. मानसिंगांची पत्नी मृगनयनी ही सुद्धा संगीत प्रेमी व संगीताची जाणकार होती.(मी स्वतः गुजरी महालाला भेट दिली तेव्हा त्यांचा संगीत कक्ष पाहिला.)मानसिंहांच्या दरबारात त्या काळातील प्रसिद्ध साहित्यिक व संगीतकार बक्शू, महमूद लोहंग, नायक पांडे, देवचंद्र, रतनरंग, माणिक कवी, गोविंदास, नाभादास, हरिदास,कर्ण,गोपाल नायक,भगवंत,रामदास वगैरे वगैरे.'भक्तमाल' नावाचा ग्रंथही याच काळात लिहिल्या गेला. त्यांनी सावंती,लीलावती,षाडव,
मानशाही,कल्याण आदी रागांमध्ये गीत रचना केल्या.अगदी सुरवातीच्या काळात तानसेन व बैजू बावरा यांचे दरबारी गायक असल्याची नोंद आहे.यानंतर काही काळ मियाँ तानसेन रेवा संस्थानचे दरबारी गायक होते.त्यानंतर ते अकबराचे दरबारी गायक बनले.मियाँ तानसेन संगीत सम्राट होते.त्यांनी अनेक धृपदांची निर्मिती करून त्यात रागांची विशेषता सांगितली आहे.संगीताचे पारिभाषिक शब्द जसे:-ग्राम,श्रुती,मूर्च्छना,सप्तक,स्वरअसे सांगीतिक शब्द घेऊन "सप्त सूर तीन ग्राम" अशा रचना केल्या.सतत राजदरबारात गायिल्या गेलेल्या या कानडा प्रकाराला दरबारी कानडा हे नाव पडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा राग जितका राजे-रजवाड्यांना आवडायचा तितकाच सर्वसामान्यांनासुद्धा आवडायचा,अजूनही आवडतो.
थोडे विषयांतर झाले,पण हा इतिहास सांगणेही गरजेचे होते...कारण दरबारी राग मियाँ तानसेनाने लोकप्रिय केला असे म्हटल्या जाते म्हणून. असो! तर आपण पुन्हा येऊ या दरबारी कानडा या रागावर...
प्राचीन काळी 'कर्णाट' नामक राग प्रचलित होता.त्याचाच अपभ्रंश कानडा, कान्हडा झाला असे पंडित भावभट्ट म्हणतात.१५५० च्या राजस्थानी चित्रकलेतही याचा उल्लेख असल्याचेही कळते. तोच धागा पकडून पंडित भातखंडे यांनीही एका श्लोकात तसा उल्लेख केला आहे...
"अपभ्रंशस्तु कर्णाटशब्दस्य कानडा जने /
दरबारीति यवनैर्गीतावाद्राजसंसदि...//"
(याची उत्पत्ती कर्नाटक संगीतामधून झाल्याचाही एक प्रवाद आहे.कर्नाटकातील 'यक्षगान' राजनृत्यात राग 'कणाद' म्हटल्या जातो.त्यावरून कानडा शब्द आल्याचे सांगितल्या जाते.)
तर असा हा दरबारी राग आसावरी थाटातून उत्पन्न झाला असून यात गांधार,धैवत,निषाद हे स्वर कोमल व बाकी स्वर शुद्ध आहेत.हा राग मध्यरात्री गायिल्या जातो.
"ऋषभ: सम्मतो वादी, संवादी पंचम मत: /
गानं सुनिश्चितं चास्य तृतीय प्रहरे निशि...//"
-पंडित भातखंडे
अवरोह वक्र असून कोमल गांधार व कोमल धैवतावरील आंदोलने हे दरबारीचे खास वैशिष्ठय आहे.हा तसा 'अडाणा' व 'जौनपुरी' या रागांना जवळचा आहे.बहुतेक शास्त्रीय गायक/वादकांनी गायिलेल्या,वाजविलेल्या दरबारी कानडा या रागाची लोकप्रियता पाहून , हा कानडा प्रकाराचा राजा आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.उस्ताद अमीर खान,पंडित जसराज,पंडित भीमसेन जोशी यांनी गायिलेला दरबारी मला विशेषकरून आवडलेला आहे.गंभीर प्रकृती असलेला हा राग आपणास ऐकताना वेगळ्याच विश्वात घेऊन जातो.हा राग जितका शास्त्रीय गायक/वादकांमध्ये प्रिय आहे तितकाच चित्रपटातील संगीतकारांचा व गझल गायकांचाही प्रिय आहे.हे खालील उदाहरणांवरून लक्षात येईल.
'हम तुम से मोहब्बत कर के सनम रोते ही रहे'...मुकेश. चित्रपट-आवारा, 'दिल जलता है तो जलने दे'...मुकेश. चित्रपट-पहली नजर, 'तोरा मन दरपन कहलाए'...आशा भोसले, चित्रपट-आशा.'ओ दुनिया के रखवाले'...रफी,चित्रपट-बैजू बावरा.'मैं निगाहे तेरे चेहरे से हटाऊ कैसे'...रफी,चित्रपट-आप की परछाईयां.'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है'...चित्रपट-शहीद.'तू प्यार का सागर है'...रफी,चित्रपट-सीमा.'कोई मतवाला आया मेरे द्वारे'...लता,चित्रपट-लव्ह इन टोकियो.'मुझे तुम से कुछ भी न चाहिए'...मुकेश,चित्रपट-कन्हैय्या.'याद में 'तेरी जाग जाग के हम'...रफी-लता,चित्रपट-मेरे मेहबूब.'टूटे हुए ख्वाबों ने'...रफी,चित्रपट-मधुमती.'उड जा भंवर माया कमल'...मन्ना डे, चित्रपट-रानी रुपमती.'झनक झनक तोरी बाजे पायलिया'...मन्ना डे, चित्रपट-मेरे हुजूर.'मोहब्बत की झुटी कहानी पे रोए'...लता,चित्रपट-मुगले आजम.'गुजरे है आज इश्क मे हम उस मकाम से'...रफी,चित्रपट-दिल दिया दर्द लिया.'तेरी दुनिया मे दिल लगता नहीं'...मुकेश,चित्रपट-बावरे नैन.'अब कहां जाए हम'...मन्ना डे, चित्रपट-उजाला.'रहा गर्दीशों मे हरदम'...रफी,चित्रपट-दो बदन.'अगर मुझसे मोहब्बत है'...लता, चित्रपट-आपकी परछाईयां.'है इसी मे प्यार की आबरु'...लता,चित्रपट-अनपढ.'बहुत प्यार करते है तुमसे सनम'...अनुराधा पौडवाल, चित्रपट-साजन.
काही हास्यरसाची गाणी पण दरबारीमध्ये आहेत...
'प्यार की आग मे तन बदन जल गया'...'लपक झपक तू आ रे बदरवा'...मन्ना डे, चित्रपट-जिद्दी.
काही उर्दू गझला...
'मेरे हमनफस मेरे हमनवा'...बेगम अख्तर.
'कू-ब-कू फैल गयी बात शनासाई सी'...मेहदी हसन.'चोरी कहीं खुले ना नसीमे बहार की'...मुख्तर बेगम.'दिले मुझतरीब को समझाया बहोत'...फरीदा खानम.'हंगामा है क्यो बरपा'...'मैं नजर से पी रहा हूँ'...गुलाम अली.'चाहत मे किया दुनियादारी'...गुलबहार बानो.'कुछ होश भी है दस्ते जुनू देख क्या हुवा'...जगजीत सिंह.
मराठीत त्या मानाने गाणी नसल्यातच जमा आहे.'दिनरात तुला मी किती स्मरू'...(भावगीत) सुमन कल्याणपूर.'तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा'...हे लताने गायिलेले व दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेले भावगीत.
आणि 'रजनीनाथ हा नभी उगवला'...छोटा गंधर्व,(छोटा गंधर्वांचा विदर्भात कार्यक्रम असला की मला हार्मोनियमच्या साथीला घ्यायचे.त्यामुळे त्यांनी चित्रपटासाठी गायिलेले 'रजनीनाथ' मला प्रत्यक्ष त्यांचे तोंडून ऐकण्याचे सौभाग्य लाभले.) 'मृगनयना रसिक मोहिनी'...वसंतराव देशपांडे.
वरीलपैकी काही गाणी/गझला दरबारी रागात तर काही दरबारी रागावर आधारित आहेत.वरील गीत/गझलांचा सर्व ठेवा युट्युबवर उपलब्ध आहे.आवडेल ते ऐकावे.
तरी पण उर्दू गझलमधील शकील बदायुनी यांची संगीतकार खैय्याम यांनी स्वरबद्ध केलेली 'मेरे हमनफस मेरे हमनवा' ही बेगम अख्तर यांनी गायिलेली गझल इतकी लोकप्रिय झाली की सुरावट तीच ठेवून अनेक गायक/गायकांनी आपापल्या परीने मूळ पद्धतीने व आधुनिक पद्धतीने गायिली आहे.यात फरीदा खानम,प्रतिभा सिंह बघेल,अली सेठी,किरण शुक्ला, कुमार शर्मा,आसिफ अली,सखावत खान, महिरी बोस, मुहम्मद अली खान,सारा रजा खान,संगीता बॅनर्जी,माधव अग्रवाल, विधी शर्मा,श्रुती पाठक, अली रजा हे कलाकार आहेत.बेगम अख्तर नंतर यातील मला भावलेली गायिका म्हणजे 'फरीदा खानम'!
(तीच ती...'आज जाने जी जिद ना करो' गाणारी.) फरीदा खानमचा बाजच आगळा वेगळा आहे.ऐकून बघा,नक्की आवडेल.
https://youtu.be/wFpK90fPA3A
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,रविवार दि.१४ मे २०१२३
No comments:
Post a Comment