गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, November 19, 2026

राग-पुरीया धनाश्री


 .                               राग रंग 

                             ( लेखांक ३२)

     सौंदर्याची अनंत रूपे आहेत.त्याच्या अभिव्यक्तीची साधने पण अनेक आहेत.या सौंदर्यापासून मिळणारा आनंदही अपरंपार आहे. त्यामुळे सौंदर्य आणि त्याच्या अनुभूतीने होणाऱ्या आनंदाच्या रुपांवर विचार करणारे शास्त्र पण त्यातील रुपांकडे बघता चिंतन करायला प्रवृत्त करून करत.ज्या प्रमाणे आपली वडीलधारी मंडळी आपल्याला बोट पकडून चालायला शिकवतात व आपण चालायला शिकतो.आणि आपल्या पायावर चालता येऊ लागल्यावर निश्चित होऊन आपले बोट सोडून देते. त्याच प्रकारे ज्याला 'शास्त्र' म्हणतात ते आपल्याला आपल्या पूर्वजांनी जे दिलेलं आहे ते आपल्या चिंतनशक्तीला परिपक्व बनवते आणि स्वतंत्र विचार करण्याला प्रेरित करते.ज्यात हे गुण नाहीत ते अपरिपक्व विचाराचे कितीही घनदाट अरण्य असले तरी ते शास्त्र होऊ शकत नाही. 'शास्ता'चा अर्थ 'गुरू', शिष्या'चा अर्थ 'शिक्षापात्र', आणि 'शास्त्रा'चा अर्थ 'शिक्षण देण्याचे साधन'! जर वास्तविक रुपात एखादा ग्रंथ 'शास्त्र' असेल,तर तो शिक्षण देण्याचे साधन पण असू शकतो.जर काल तो शिष्य असेल तर तोच आज गुरूही असतो.म्हणून खरे शास्त्र गुरुचे पण गुरू असते.फक्त ते 'सच्चे' असायला हवे.


     मनुष्याच्या आयुष्यातीळ संसारिक चिंतांमधून मुक्त करण्यासाठी वा थकलेल्या देहाला अलौकिक सुख प्राप्त करुन देण्यासाठी संगीताची निर्मिती झाली आहे.ज्या संगीतामध्ये तसे अलौकिक सुख देऊन काही काळापुरते का होईना चिंतामुक्त करण्याची शक्ती असेल त्यालाच संगीत म्हणता येईल.अन्यथा तो फक्त गोंगाट आहे.मग ती कोणतीही शैली वा प्रकार असो.


     कोणत्याही सप्तकातील आरोह-अवरोह म्हणजे राग नव्हे.अलंकार किंवा पलटे पण राग नव्हे.विशिष्ठ क्रमवारीने केल्या जाणारा प्रयोग,ज्यात विशिष्ठ स्वरांवर करण्यात येत असलेला ठहराव,हळू हळू होत जाणारी रागाची स्थापना, ज्याच्या आधारावर रागाची 'बढत केल्या जाते ते या स्थापनेचे चार 'स्थान' किंवा 'मुकाम' म्हणजे राग होय. ही बढतच श्रोत्यांना 'तो' आनंद देऊ शकते,ज्यातून त्याचे दुःख-चिंता दूर होते.असे करण्याची शक्ती म्हणजेच संगीत होय.अशी शक्ती प्रत्येक रागात आहे.फक्त त्या त्या रागांचा योग्य प्रकारे उपयोग करता यायला हवा.आता पुरीया धनाश्री रागाचेच बघा! कोमल रिषभ,धैवत असूनही किती विविध प्रकारची गाणी संगीतकारांनी तयार केली आहे.विरह,दुःख,शृंगार,प्रेम सगळं काही त्याच स्वरातून...


     राग पुरिया धनाश्री पूर्वी थाटातून निर्माण झालेला एक सायंकालीन संधीप्रकाश राग आहे. (पुर्वी थाटातून निर्माण झालेले काही प्रमुख राग :-‘जैतश्री’, ‘परज’, ‘श्री’, ‘गौरी’, ‘वसंत’ वगैरे.) हा राग करुण रस प्रधान व गंभीर मानल्या जातो.याला जवळचा राग पूर्वी आहे. यात दोन्ही मध्यमांचा प्रयोग केल्या जातो. पुरीया धनाश्रीमध्ये पंचम स्वर अतिशय महत्वपूर्ण आहे. संपूर्ण राग पंचमाभोवती विणल्यासारखा वाटतो.उत्तरांगातील आरोहात याचा प्रयोग थोडा कमी होतो.हा या रागाचा वादी स्वर आहे.


     पंडित भातखंडे कृत क्रमिक पुस्तक मालिकेच्या चौथ्या भागातील (हिंदी प्रथमावृत्ती) पृष्ठ क्रमांक ३४३ वर पुरिया धनाश्री रागाचा वादी स्वर पंचम  व संवादी स्वर रिषभ मानला आहे.नियमाप्रमाणे वादी संवादी स्वरांमध्ये षड्ज पंचम वा षड्ज मध्यम भाव असणे आवश्यक असते.पण पंचम रिषभात असा भाव दिसत नाही.त्यामुळे रिषभाला संवादी स्वर मानणे योग्य वाटत नाही.तसेच पुरीया धनाश्रीतील कोमल रिषभावर कधीच न्यास केल्या जात नाही.त्यामुळे पुरिया धनाश्रीत कोमल रिषभाऐवजी षड्जाला संवादी स्वर मानणे योग्य वाटते.


      पुरिया धनाश्री या नावामुळे हा राग पुरिया व धनाश्री या दोन रागांच्या मिश्रणातून तयार झाला हे स्पष्ट होते. पण प्रचलित धनाश्री काफी थाटातून उत्पन्न झाला आहे.यात गांधार निषाद स्वर कोमल आहेत.त्यामुळे अनेक गायक/वादक पुरिया धनाश्रीला स्वतंत्र राग मानतात.पण तसे नाही,यात पूर्वी थाटजन्य धनाश्री व पुरिया रागांचे मिश्रण आहे.


    (अकबराच्या समकालीन काही ऐतिहासिक तथ्य व दंतकथांवर आधारित चित्रपट बैजू बावरा १९५२ मध्ये प्रदर्शित झाला.ऐतिहासिक कथानक आणि शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी,यामुळे चित्रपटाला अमाप यश मिळाले.भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांमुळे आजही रसिकप्रिय मंडळी ही गाणी ऐकताना दिसतात.चित्रपटाच्या सुरवातीलाच पुरीया धनश्रीच्या स्वरांनी सजलेले,उस्ताद अमीर खान यांनी गायिलेले गीत सुरू होते.याचे चित्रीकरण अकबराच्या दरबारातील संगीततज्ञ तानसेन याला आपल्या महालात रियाज करताना दाखविले आहे.या रचनेत तानसेनाचे नाव आलेले आहे.)


● पुरीया धनाश्रीवर आधारित चित्रपट गीते...

'तोरी जय जय करतारा' उस्ताद अमीर खान.चित्रपट-बैजू बावरा.संगीत निर्देशक-नौशाद (१९५२). 

ल'रुक जा बनवासी राम' चित्रपट-संपूर्ण रामायण (१९६१). 

'प्रेम लगाना' आशा भोसले. चित्रपट-सूरत और सीरत. संगीत-रोशन (१९६२). 

'हम कश्मकशे गम से गुजर क्यूँ नहीं जाते' लता.चित्रपट-फ्री लव्ह.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७४). 

'मेरी सांसों को जो महका रही है' लता,महेंद्र कपूर.चित्रपट-बदलते रिश्ते.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७८). 

'तुमने क्या किया है हमारे लिए' आशा भोसले. चित्रपट-प्रेम गीत. संगीत-जगजीत सिंग (१९८१). 

'सांझ ढले गगन तले' सुरेश वाडकर. चित्रपट-उत्सव, 

संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९८४). 

'कितने दिनों के बाद है आई सजना रात मिलन की' संगीत-आनंद मिलिंद (१९९१). 

'आ के तेरी बाहों में हर शाम लगे सिंदूरी' लता,

बालसुब्रह्मण्यम.चित्रपट -वंश.संगीत-आनंद मिलिंद (१९९२). 

'हाय रामा ये क्या हुवा' हरिहरन,स्वर्णलता.

चित्रपट-रंगीला.संगीत-ए.आर.रहमान (१९९५). 

'लबों से चूम लो,आंखों से थाम लो मुझ को' गायिका-श्रीराधा बनर्जी. चित्रपट-आस्था: इन द प्रिज़न ऑफ स्प्रिंग.संगीत-सारंग देव (१९९७). 

'रुत आ गई रे रुत छा गई रे' सुखविंदर सिंग.चित्रपट-१९४७ अर्थ, संगीत-ए.आर.रहमान (१९९९). '

● गैर फिल्मी...

'कोयलिया उड जा यहां नहीं कोया' मुकेश. (कोयलिया तेरे बोल)गैर फिल्म. (१९६९). 

होट सागर है आँख पैमाना' गुलाम अली.

'पहली बरसात लौट आऊंगा' गुलाम अली.

● मराठी

'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' आशा. संगीत-हृदयनाथ मंगेशकर. 

माझे मन तुझे झाले,तुझे मन माझे झाले' प्रियांका बर्वे.   गीत/संगीत-सुधीर मोघे,टीव्ही मालिका 'स्वामी'.

'या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या' लता.संगीत-श्रीनिवास खळे.अल्बम 'जिव्हाळा'.

'सांग प्रिये सांग प्रिये' गायक-रामदास कामत

'श्रीरामाचे चरण धरावे' सुमन कल्याणपूर

'ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा' सुधीर फडके.गीत रामायण.

-----------------------------------------------------------------------

दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी. 

🌈#गझल_नक्षत्र🌈


"गझल क्रमांक ०१"

 #पापाचा_हाट


घर आहे पण दारच नाही

आठवडा पण वारच नाही


बाह्य सुखांनी जरी वेढले

आतिल दुःखा पारच नाही


ठोक ठोकुनी माठ आणला

त्यातही पाणी गारच नाही


खुर्चीवरती बैसविले ज्या

त्यालाही अधिकारच नाही


घाम गाळुनी विहिर खोदली

पाण्याची पण धारच नाही


जिथे तिथे हाटच पापाचा

पुण्याचा बाजारच नाही


किती बोल वा लाख शिव्या दे

तुझ्यासारखा यारच नाही


दुरून आकर्षक दिसणाऱ्या

ब्रह्मांडा आकारच नाही


_✍️गझलकार सुधाकर कदम_


●

आज गझलनक्षत्र उपक्रमात गझल गंधर्व आदरणीय श्री. सुधाकर कदम सर यांचा विस्तृत परिचय गझलसाधकांसाठी प्रेरणादायी आहे.

  आजच्या उपक्रमातील तिनही गझला आशयघन आणि अप्रतिम

आहेत.

गझल क्रमांक-१

मधिल मला आवडलेला शेर...


 बाह्य सुखांनी जरी वेढले

 आतील दु:खा पारच नाही


   शेर वाचून मला.... आइना मुझे देख के हैरान सा क्यूँ है...?

इस शहर का हर शख्स परेशान सा क्यूँ है....?

     आरशातल्या माझ्या प्रतिबिंबालाच माहित आहे, वरून सुखी भासणारा मी आतून किती दु:खी आहे!

    शहरातल्या प्रत्येक माणसाची हिच गत आहे!

     सर्व सुखे हात जोडून उभी आहेत.आर्थिक संपन्नता आहे.

कशाकशाची ददात नाही.माझ्या अवती भवतीच्या माणसांना मी सुखी वाटतो.

      पण आतून मी खुप दु:खी 

आहे. मनातली वेदना,दु:ख मनातच

साचलं आहे.माझ्या दु:खांना अंत

नाही.

     भौतिक सुख सुविधा अधिकाधिक मिळवण्यात मनातील

सुख, शांती, समाधान हरवत चालले आहे.

आज गझलनक्षत्र उपक्रमात आम्हांला अशा अप्रतिम गझलांची मेजवानी दिल्याबद्दल समन्वयकांना धन्यवाद!🙏

      मंचावरील सन्माननीय समूह प्रशासकांना धन्यवाद!

©#सविता_सामंत, गोवा.

●

आजचे सन्मानीय  गझल नक्षत्र गझल गंधर्व आदरणीय सुधाकर कदम सर यांच्या परिचय वाचतानाच दमछाक झाली .किती उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ! याची  परिचय वाचतानाच जाणीव होते.  अश्या  परिचयानंतर त्यांच्या गझला वाचताना त्या तर थेट काळजातच घुसल्या.

गझल १.

#पापाचा_हाट


बाह्य सुखाने जरी वेढले

आतील  दुःखा पारच नाही...


भौतिक समृद्धी तर आली त्यामुळे बाह्य सुख भरपूर निर्माण झाली .आज पहायला गेलं तर जवळजवळ सगळ्या जणांना बाह्य सुख उपलब्ध आहे पण त्यामुळे आपल्या आंतरिक  वेदना दूर होतात का?  हा कळीचा प्रश्न आहे.  आजच्या युगामध्ये माणसं जगाशी जोडली गेली पण मना मनांमध्ये अंतर निर्माण झाले आहे आणि  प्रत्येक माणूस एकटा झाला आहे .म्हणजे माणसाची बेटं तयार होत आहेत आणि म्हणूनच या सर्व गोष्टींनी आपण सुखी आहोत का याचा आढावा घेणे खूप जरुरी झाला आहे.

 

दुरून आकर्षक दिसणाऱ्या

 ब्रह्मांड आकारच नाही...


सुंदर वेष्टनातील एखादी गोष्ट आपण बाह्यावरण पाहून छान असेल अशी अपेक्षा करतो ती प्रत्यक्षात तशी असतेच असं नाही. त्याप्रमाणे दुरून आकर्षक वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी  पाहायला गेला की त्या फोल निघतात, असा अपेक्षाभंग होतो.ं


-#जयश्री_अनिल भिसे

मुंबई.

●

°पापाचा हाट°  ही रचना वाचल्यावर ज्ञानेश्वर माऊलींचे


टाक्याच्या आणीवर वसले तीन गाव

दोन होते एक दिसेचिना


ही भारुडसदृश रचना आठवली!प्रस्तुत रचनेतला प्रत्येक शेर वरवर चांगल्या दिसणाऱ्या पण "बडा घर पोकळ वासा" अशी स्थिती असणाऱ्या गोष्टींवर भाष्य करणारा आहे.


बाह्य सुखाने जरी वेढले

आतिल दुःखा पारच नाही


हा शेर तर खूपच अर्थवाही आहे.भौतिक सुखाच्या राशी दारात लोळण घेत आहेत पण अंतर्यामी दुःखाचंच सावट मनात पसरलेलं आहे.त्या दुःखाला अंत नाही आणि पारही नाही.अशा अवस्थेत कितीही मुलामा दिला तरी केव्हातरी पितळ उघडं पडण्याचा संभव असतो हेच गझलकारांना सांगायचं असावं असं वाटतं!धन्यवाद!👏


-#अर्चना_देवधर,रत्नागिरी

●

नमस्कार 

आजच्या गझलनक्षत्रमध्ये गझलगंधर्व सुधाकरजींचा परिचय आम्हाला करुन दिलात. सर्वांगी कलाकार व्यक्तीमत्त्वाची ओळख झाली. लेखनाबरोबरच पुरस्कारही अफाट! गझलकार भट सरांनी निवेदक व्हावं असे कार्यक्रम करणारे शब्दांचे श्रेष्ठ पुजारी आज आम्हास वाचायला मिळाले.... अहोभाग्य आमचे!

     सरांच्या तिन्ही गझला 'बहुत बढीया' ! सुंदर शेरांचा आलेखच प्रकट झालेला ! 


   बाह्य सुखांनी जरी वेढले

   आतिल दुःखा पारच नाही


 प्रत्येकाला अनुभवावयास मिळणारे विचार असणारा अप्रतिम शेर! सुख समोर हजर असतानाही मनातल्या असंख्य यातनांमुळे त्याला उपभोगू शकत नाही. मनात एवढं काही साचलेलं असतं की असंख्य सुखाच्या लहरीही ते घालवू शकत नाहीत. 


अशा अनेक अप्रतिम शेरांनी नटलेल्या गझला आदरणीय सुधाकरजींच्या लेखणीतून साकार झाल्या आहेत. 

   गझलगंधर्वांना सलाम!

गझल समन्वयकांचे आभार

🙏

●

गझल क्रमांक १ जिथे तिथे हाटच पापाचा | पुण्याचा बाजारच नाही...‌ गझलकार सुधाकर कदम सरांचा हा शेर मनाला स्पर्शून गेला. आज जगात जिकडे पहावं तिकडे लोकं पापाला डोक्यावर घेऊन नाचतायत. काही लोक या व्यवस्थेचा भाग बनले आहेत, काही लोकांना आपण पुण्य करतोय कि पाप डोक्यावर घेतलंय हेच समजत नाहीये. काही जण  हीच व्यवस्था चांगली आहे असं म्हणून या बाजारात पापाची खरेदी करताना दिसतायत, पण विवेक बुध्दीने विचार करणा-या लोकांची मात्र या बाजारात कुचंबणा होते आहे कारण त्यांना पुण्याच्या गोष्टी दाखवणारं कोणीच दिसत नाहीये...... आजच्या परिस्थितीचं आपल्या डोळ्यासमोर यथार्थपणे चित्र उभं करणारा हा शेर म्हणूनच मला जास्त आवडला.... 

धन्यवाद 

●

"बाह्य सुखांनी जरी वेढले

आतिल दुःखा पारच नाही"


असंख्य वेळा जीवनात अनुभूती देणारे वचन मा. गझलकार अत्यंत कमी शब्दात परणामकारक रित्या अधोरेखित करतात

Superb.....👏👏👍

बाहेरचा डामडौल, थाटमाट, पंचतारांकित सजावट.....या सगळ्या दिखाऊ फुग्याला एखादी सल, एखादं वैषम्य अशी काही टाचणी लावते ....की तीर आरपार लगतोकी क्षणात ते सारं वैभव सपक बेचव पचपचीत  भासतं

परागंदा झालेला स्वतःचा मुलगा, निदान झालेला कॅन्सर अथवा प्रेमविवाह करुन फसलेली  आपली मुलगी,.... यासारखी दुःख त्यांची झळ बाह्य कशी शमवणार ? ते केवळ अशक्य असतं

हृदयस्पर्शी 👏👏👏👏🌷

🙏

सरगम तुझ्याचसाठी...


 .                             साठवणीतील आठवण

'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे 

असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे '


'गाऊन सोसले मी, सोसून गायिले मी 

आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी... '


ही गझल आहे गझल गंधर्व सुधाकर कदम यांची, तर


'लोपला चंद्रमा लाजली पौर्णिमा, चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला 

सांगतो मी खरे, फार झाले बरे, फक्त त्यांनी तुझा चेहरा पाहिला... '


ही गझल आहे गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची. अशा एकाहून एक सरस गझलांनी रंगलेल्या मैफलीत रसिक वृंद न्हाऊन निघाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड आयोजित 'सरगम तुझ्याचसाठी' हा संगीतमय कार्यक्रम निगडी येथील साहित्य परिषदेच्या शांता शेळके सभागृहात संपन्न झाला. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, संगीतकार सुधाकर कदम उपस्थित होते. सुनीता बोडस यांनी सर्व कलाकारांची ओळख करून दिली.

आयुष्याच्या वाटचालीत येणारे अनुभव, सुख दुःखाच्या विविध भावना असलेल्या आशयपूर्ण रचना गायक मयुर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यावेळी सहकलाकार मुकुंद पेटकर (हार्मोनियम), प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला), आशिष कदम (की बोर्ड) यांनी साथ दिली. सदर कार्यक्रमात ईला पवार यांचा त्यांच्या सांगीतिक वाटचालीबद्दल सत्कार करण्यात आला.

राजन लाखे यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी सूत्रसंचालन केले आणि चोखंदळ रसिकांचे आभार मानले.

..आणि इंदूर जिंकले ! -सुनील शिनखेडे

जाल सभागृह,इंदूर. अस्मादिक व सारंगी वादक-उस्ताद मोईनुद्दीन खान.मराठी गझल गायन मैफिल.


सत्कार-महाराष्ट्र साहित्य सभा,इंदूर.

डावीकडून-सुधाकर कदम,तबला वादक रमेश उईके आणि प्रसिद्ध नट स्व.चंदू पारखी.


 .                           साठवणीतील आठवण                        

           १६ डिसेंबर १९८९, इंदोऱ. सायंकाळची वेळ. अगदी कडाक्याची थंडी. वातावरणात कमालीचा गारठा असूनही जाल सभागृहात रसिकांची गर्दी हळूहळू जमू लागली. साडेसातच्या सुमारास हॉल अगदी गच्च भरलेला. वास्तविक अशी अपेक्षा कुणाला नव्हतीच मुळी. कारण इंदोरच्या रसिकांसाठी कार्यक्रम काहीसा वेगळाच होता. मराठी गीत-गझल गायनाचा. कलावंतही इंदोरसाठी नवीनच #सुधाकर_कदम... इंदोरमध्ये आपला कार्यक्रम व्हावा अशी कदमांची बरेच दिवसांची इच्छा होती. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कार्यक्रम झाले होते़. मूळचे ते यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी ह्या गावचे. त्यामुळे विदर्भात ते विशेष परिचित. परंतु इंदोर सारख्या हिंदी भाषी परिसरात मराठी रसिकांसाठी मैफल व्हावी ही त्यांची इच्छा. तसे योग जुळून आलेत. मूळचे आर्णीचेच परंतु इंदोरला स्थायिक झालेले वानखडे बंधुद्वयांची स्मॅक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुढे आली. ह्या कंपनीचे अभियंते श्री अविनाश वानखडे ह्यांनी आयोजनाचा संपूर्ण भार सांभाळला. प्रमोद कोठारी, अनिल वानखडे, दीपक शिंदे, अभिलाष खांडेकर व अन्य चाहते मंडळी मदतीला धावली.

      संपूर्ण सभागृहच मोगर्‍याच्या सुवासाने धुंद झालं होतं.इंदोरचे प्रसिध्द रंगकर्मी #बाबा_डिकेंच्या प्रमुख उपस्थितीत मैफल सुरु झाली. आणि कवी #कलीम_खान ह्यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली.वेळ सायंकाळची. सायंकाळच्या प्राथनेची. कलीम खानांनी सुरेश भटांचे शब्द दिलेत -

 ‘माझीया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे’ 

सुधाकर कदमांचे सूर साथीला आलेत़. संपूर्ण हॉल स्तब्ध, शांत. कदमांचा स्पष्ट व मोकळा आवाज साथीला तबल्यावर नागपूरचेच #रमेश_उइके आणि सारंगीवर इंदोरचे आकाशवाणीचे प्रसिध्द सांरगीवादक #मोइनुद्दीन_खां साहेब शब्दसुरांची गाठ पडली. कदमांची मध्यप्रदेशातील पहिलीच मराठी गीत-गझलांची मैफल रंगू लागली.

      तसा गझलांचा चाहता वर्ग मोठा परंतु मराठी गझलांचा मोजकाच. इंदोरसाठी तर मराठी गझल गायन हा प्रकारच नवीन होता़. त्यामुळे येथील मराठी रसिक कदमांना कितपत स्वीकारतील ह्याबद्दल आयोजक साशंक होते. परंतु मैफलीच्या पूर्वार्धातच रसिकांनी अगदी मनापासून दाद दिली़. ह्या कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या ह्या शहरात मराठी रसिकांचा भरणा काहीसा कमीच. परंतु ह्या नव्या कलाकारांच्या इथल्या पहिल्याच मैफलीत काही वेगळेच दृश्य दिसले़. सुरुवातीपासूनच उपस्थितांची जबर दाद मिळवून कदमांनी रसिकांचे हृदय काबीज केले़.

      कवी कलीम खान ह्यांनी कधी कवठेकरांच्या, कधी बोरकरांच्या, तर कधी स्वतःच्या मार्मिक ओळी व कविता पेश करुन मैफलीला अनुकूल असे वातावरण जिवंत ठेवले़ त्यांच्या ‘कुंकू’ ह्या कवितेतला तर अशी काही दाद मिळाली की रसिकांच्या आग्रहाखातर त्यांना ती कविता पुन्हा म्हणावी लागली़

 ‘दीनरात ज्याचे गान मी गातो

 तो भारतभाग्यविधाता

 रस्त्यावर चिवडा खातो.’

 ह्या त्यांच्याच ओळी सद्यःपरिस्थितीचे भान जागवणार्‍या़ आणि श्रोत्यांना विचारात टाकणार्‍या. अशा वैचारिक तर कधी श्रृंगारिक शब्दांची, कवितांची पेरणी करत कलीमखानांनी मैफलींचे सारथ्य केले. आणि श्रोत्यांना बांधून ठेवले. सोबत कदमांनीही कधी श्रृंगार, कधी याचना, तर कधी यातना असे विविध भाव ओतले. भटांच्या

‘झिंगतो मी कळेना कशाला,

जीवनाचा रिकामाच प्याला’

 ह्या गझलेतील झिंगतो हा शब्द म्हणण्याचा कदमांचा आगळा ढब रसिकांची दाद घेऊन गेला.

 ‘ऐन वेळी अशी काय करतेस तू़’

 ह्या गोड, लाडिक व काहीशा धीट गझला सादर करुन कदमांनी रसिकांची तब्येत खूष केली.

      मध्यंतरामध्ये आयोजकांतर्फे सर्व रसिक श्रोत्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम होता. तसा हा सुद्धा आयोजनातील आगळावेगळा गोड अनुभव. इंदोरच्या श्रोत्यांसाठी नवाच होता! मैफलीला खास रंग चढला तो मध्यंतरानंतरच़ रात्रीला कमालीची थंडी असूनही सर्वच रसिक पुन्हा स्थानापन्न झाले. उत्तरार्धाच्या सुरुवातीस कदमांनी श्रीकृष्ण राऊतांचे

 ‘दुःख माझे देव झाले, शब्द झाली प्रार्थना

आरती जी गात आहे, तिच माझी वेदना’.

 नंतरही एकसे एक गझला सादर करून कदमांनी भरपूर टाळ्या घेतल्या़-

 कलीम खान यांच्या

 ‘मोगरा वेणीत पोरी माळण्याचे दिवस आले

 आपुले अपुल्यावरी भाळण्याचे दिवस आले!’

    ह्या गीताने एवढ्या गारव्यातही रसिकांना गोड गुलाबी दिलासा दिला़. संपूर्ण मैफलीत कधी तबल्याचे साथी रमेश उईकेंनी, तर कधा मोइनुद्दीन खॉं साहेबांच्या सारंगीच्या मधुर सुरांनी रसिकांना दाद देण्यास भाग पाडले. कवठेकरांच्या

‘मस्तीत गीत गारे देतील साथ सारे’

ह्या गीताला तर रसिकांनी उत्स्फुर्तपणे टाळ्यांचा ठेका दिला.सतत चार तासपर्यंत सर्वच रसिक ह्या शब्दसुरांच्या आगळ्या वेगळ्या मैफलीचा आनंद मनसोक्त लुटत होते़ भारदस्त गझला, त्यांना स्वरसुरांचा साज, कलीम खान यांचे खुसखुशीत संचालन, उत्कृष्ट आयोजन व इतर प्रत्येकच बाबतीत वेगळेपणा सिद्ध करणार्‍या ह्या मैफलीची सांगता भैरवीने झाली.

      अत्युत्कृष्ट आयोजन व बहारदार मैफलीच्या इंदोरच्या पहिल्याच उपक्रमासाठी अभिनंदनपर संदेश अद्यापही येत आहेत़ दुसरी मैफल कधी? ही विचारणा करणार्‍या पत्रांचा ढीग लागतो आहे़. मध्यप्रदेशातील महू, उज्जैन, देवास, रतलाम येथूनही कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मंडळांची निमंत्रणे आली आहेत़. केवळ एकाच मैफलीने कदमांनी इंदोरच्या रसिकांची हृदयं काबीज केलीत़.


तरुण भारत,नागपूर

१४ जानेवारी १९९०






संगीत आणि साहित्य :