गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, November 1, 2026

आसवांनीं मी मला भिजवू कशाला...Live 1981.


 मराठी गझल गायकीच्या अगदी सुरवातीच्या काळातील आमची (सुरेश भट आणि मी) वडवड...सोबतीला हार्मोनियम,तबला आणि निवेदक...जेव्हा फक्त मराठी गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम कोणीच करत नव्हते तेव्हाचा कार्यक्रम...

आसवांनी मी मला  भिजवू कशाला ?

एवढेसे दु:ख मी सजवू कशाला...?


लागले वणवे इथे दाही दिशांना

एक माझी आग मी विझवू कशाला ?


रात्र वैर्‍याची पहारा सक्त माझा

जागणारे शब्द मी निजवू कशाला ?


मी असा कलदार कोठेही कधीही

पावल्या चवल्यास मी खिजवू कशाला ?


साय मी खातो मराठीच्या दुधाची

मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ?


सुधाकर कदम

गझल - सुरेश भट

तबला - शेखर सरोदे 

सूत्रसंचालन-डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी

तालयोगी सुरेश तळवळकर, डॉ. श्रीपाल सबनीस.'काव्यसंग्रह' प्रकाशन प्रसंगी...


 'काळोखाच्या तपोवनातून' या काव्यसंग्रह प्रकाशन प्रसंगीची मनोगते...

प्रमुख अतिथी:- डॉ. श्रीपाल सबनीस, पद्मश्री सुरेश तळवळकर, रसिकराज उल्हासदादा पवार. पं. विकास कशाळकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, युवा /कवी गझलकार वैभव जोशी आणि शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

जगत मी आलो असा


    दोनोड्याला प्राथमिक शिक्षण घेतानाचा एक भन्नाट किस्सा आठवला.  दोनोडा (ता.कळंब,जि. यवतमाळ) हे गाव तसे कदमांचेच!.आमच्या मूळ पुरुषाने तेथे येऊन केव्हा हे गाव वसवले त्याचा इतिहास काही मला अनेक प्रयत्न करूनही सापडला नाही.याचे कारण अशा नोंदी करून ठेवण्याची त्यांना आवश्यकता वाटली नसेल. किंवा नोंदी केल्या असतील तर ती कागदपत्रे पुढच्या पिढीने जतन केली नसावी.  गाव वसवणाऱ्या मूळ कदमाचा वाडा मोठ्या गढीवर असून त्याच्या आजूबाजूला इतर नातेवाईकांचे वाडे.कदमांच्या वस्तीभोवती बारा बलुतेदारांची घरं. गावाची पाटीलकी पिढ्या न  पिढ्या कदमांकडेच असायची.असं माझं गाव होतं. गावात एक मारूतीचे व त्याच्या समोरच विठ्ठल रुखमाईचे लहानसे मंदिर व एका खोलीची शाळा होती .त्या काळी गावात शिक्षकांचा खूप दरारा असायचा.शाळेव्यतिरिक्त शिक्षक कुठे दिसले तर त्यांच्या समोर जाण्याची हिंमत व्हायची नाही.खूप कडक असायचे. बरे एखादे वेळी गृहपाठ करून गेलं नाही किंवा शाळेत जायला उशीर झाला किंवा वर्गात धिंगा-मस्ती केली तर कडक शिक्षा व्हायची. ती शिक्षा म्हणजे ज्या कोणी वरीलपैकी एखाद्या कारणात सापडला असेल त्याला शाळेच्या कंपाउंडला असलेल्या मेंदीच्या झाडाची फांदी तोडून आणायला लावायचे.व त्याच्या कडूनच साफ करून त्याचा फोक तयार करून त्याच्याच हातावर, ढुंगणावर सपासप ओपायचे.फोकाने कुठे वळ उमटवावे या बद्दलची कुठलीही आचारसंहिता त्या काळी नसल्यामुळे गुरुजींच्या 'मूड' नुसार फोक आपले काम करायचा. हे वळ जर घरी दाखवून 'गुरुजींनी मारले' असे सांगितले तर घरी घरी वेगळी 'धुलाई व्हायची.शाळेचे कंपाउंड मेंदीचे एवढ्यासाठीच असावे की काय अशी शंका आता येते आहे.


    इयत्ता दुसरीत की तिसरीत असताना एक किस्सा घडला तो असा...त्या काळी ग्रामीण भागात खेळण्याची साधने म्हणजे,गिल्ली-दांडू, झाडावरील डाबडुबल्या,खुप्पस व गोट्या.पण या खेळात सोबती लागायचे.ते नसले की,एक तर पेरकंडाची गाडी करून खेळणे किंवा घरा समोरील जू काढून ठेवलेला छकडा इकडे तिकडे ओढून करमणूक करून घेणे,असे चालायचे. असेच एक दिवस छकडा ओढता ओढता त्याच्या वेळूची बारीक शिळक पोटात घुसली ती तुटल्यामुळे बाहेर निघण्याचा प्रश्नच नव्हता.तिला तसाच पोटात घालून एक दिवस कसा बसा काढला.दुसऱ्या दिवशी मात्र खूप त्रास व्हायला लागला पण त्रास सहन करत चुप राहणे, हाच त्यावरचा सुरक्षित उपाय होता.रात्री मात्र झोपेत कड फेरताना (कूस बदलताना) धक्का लागून मोठी कळ निघाल्याने मी जोरात कळवळून ओरडलो.

काका बाजूलाच झोपले होते.त्यांनी जागे होऊन काय झाले असे विचारले. मी मात्र पोट धरून विव्हळत विव्हळत सांगावे की न सांगावे हा विचात करत होतो.कारण खरे सांगितले तर तेवढ्या रात्री 'कांडणालय' सुरू होऊन पिट्टा पडणार, याची 'गॅरंटी' व न सांगितले तर सी.बी.आय चौकशी चालूच राहणार! हे विचार मनात सुरू असताना मला एकदम राणे गुरुजींची आठवण झाली व मेंदीच्या फोकाचा बदला घेण्याची हीच योग्य वेळ आहे हे लक्षात आले.(बाल वयात मी अतिशय तल्लख बुद्धीचा होतो हे तुमच्या लक्षात आलेच असेल.) मी रडत रडत 'राणे गुरुजींनी पोटावर स्केलपट्टी मारली व त्याची शिळक पोटात गेल्याचे' सांगितले.काकांनी तेवढ्या रात्री ती शिळक कशी बशी काढली व शांत होऊन झोपी गेले.दुसरे दिवशी मात्र सकाळीच रुद्रावतार धारण केला व मला घेऊन तडक शाळेकडे निघाले.काही बोलायच्या आतच आपला तोफखाना सुरू करून न केलेल्या गुन्ह्याबद्दल गुरुजींना इतके झापले की,त्यांनी हाता पाया पडून कशीबशी सुटका करून घेतली.(कारण पाटीलकी व शाळा कदमाच्याच एका रिकाम्या वाड्यात.) त्या दिवसा पासून मला वर्गनायक करण्यात आले.गणिताच्या तासाला गुरुजी माझे गणित करून द्यायचे व वर्गाचे गणित तपासायला सांगायचे.याचा परिणाम माझ्या गणितावर होऊन ते जे कच्चे राहिले ते अजूनही कच्चेच आहे.त्यामुळे आजही आकडेमोडीशी, काडीमोड घेतल्यासारखा वागत असतो.


     यवतमाळला आल्यावर ऑर्केस्ट्रा सुरू असताना जिथे मिळेल तिथे 'पार्ट टाईम' संगीत शिक्षकांचा 'जॉब' करणे,कवितांना चाली बसवून शिकवणे, नेहरू युवक केंद्राच्या संगीत विभागाचे काम बघणे,नाटकाला संगीत देणे,असे बरेच उपदव्यात करायचो.तेव्हा यावतमाळच्या एका नावाजलेल्या नाट्य संस्थेने 'चांदणे शिंपीत जा' की असेच काही नाव असलेले नाटक बसवायला घेतले.

त्याच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर टाकली.त्यात एक गाणे होते,'हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली,धरती प्रकाशवेडी ओल्या दवात न्हाली'.यवतमाळात गीतांना चाली देणारा एकमेव मीच असल्यामुळे हे काम माझ्याकडे आले.हे पूर्ण गाणे पियानोवर बसून नायिका गात आहे असा प्रवेश नाटकात होता.यवतमाळात पियानो फक्त चर्चमध्येच.मी कॉर्ड्स शिकण्यासाठी म्हणून एक वर्ष चर्चमध्ये जात होतो.

त्यामुळे सगळ्यांशी चांगली ओळख झाली होती.त्यावेळी कासलीकर गुरुजीकडे प्रमोदिनी मॅथ्यू म्हणून एक महिला गाणे शिकायला यायच्या. त्यांचा आवाज छान होता.त्यांच्यासोबत मी (माझ्या कंपोझीशनचे) गाण्याचे अनेक कार्यक्रम केले होते,करीत होतो.म्हणून या नाटकातील गाण्यासाठी त्यांची निवड केली.त्यात स्वार्थही होता.तो म्हणजे चर्चमधील पियानो.गाणे स्वरबद्ध झाले.पियानो सोबत तालमी झाल्या.आणि एकदाचे नाट्यसंस्थेच्या स्पूलच्या टेप रेकॉर्डरवर रेकॉर्डिंग आटोपले.त्यानंतर ती धून तशीच पडून होती.२०२१ ला मी लिहिलेल्या व स्वरबद्ध केलेल्या गीतांचा '#रे_मना' या शिर्षकाचा अलबम केला तेव्हा ही धून माझ्या कामी आली. शब्द होते...

'हा भाव-भावनांचा चालूय खेळ सारा,

शब्दात मांडलेला नुसताच हा पसारा' 

ऐका तर....

https://youtu.be/GIhkt1NaTls?si=HYJCGSpKo_RWtoBj


(हा अलबम स्पॉटिफाय सोबतच विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.) 


●

यवतमाळची शकुंतला...




     शीर्षक वाचून तुम्हाला दुष्यंताची शकुंतला आठवली असेल.ती ही शकुंतला नाही.ही आमची यवतमाळची 'आगीनगाडी' होय.रंभेच्या मुलीचे रक्षण शकुन पक्षाने केले म्हणून दुष्यंताच्या शकुंतलेचे नाव शकुंतला पडले.काही काळ दुष्यंताला  शकुंतलेचा विसर पडला होता ही कथा सुद्धा आपणास माहीत असेलच.अशी ही शकुंतला  पुराणात वर्णन केल्याप्रमाणे सुस्वरूप,देखणी कण्व ऋषींच्या आश्रमात वाढलेली वगैरे वगैरे... पण जिला रंग ना रूप अशा यवतमाळच्या 'यवतमाळ ते मूर्तिजापूर' चालणाऱ्या छोट्या (नॅरो गेज) आगीनगाडीला (आगीनगाडी कसली ढक्कलगाडी म्हटले तरी चालेल.) शकुंतला हे सुंदर नाव देणाऱ्या यवतमाळकर रसिकास दाद द्यावी लागेल.ही गाडी इंग्रजांच्या काळात क्लिक निक्सन अँड कंपनीच्या माध्यमातून २५ डिसेंबर १९०३ मध्ये जिल्ह्यातील कापूस इंग्लंडमधील मँचेस्टरला पोहोचवण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली होती. यवतमाळ रेल्वे स्टेशनचा कोड आहे ytl. येथे दोन प्लॅटफॉर्म आहेत.पण विना शेड! (सध्या नवीन रेल्वे स्टेशनचे काम सुरू असल्याचे  कळते.खरे खोटे सरकारला माहीत.)

     तर मित्रहो, ही गोष्ट आहे १९६५ ते १९७० च्या दरम्यानची.बोरी अरब जवळील लाडखेड येथे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. लाडखेड हे यवतमाळ मूर्तिजापूर रेल्वे मार्गावर असल्यामुळे सर्व लवाजमा घेऊन 'शकुंतले'ने लाडखेडला गेलो.त्यावेळी शकुंतलेला वाफेचे इंजिन होते.कार्यक्रम करून दुसऱ्या दिवशी शकुंतलेनेच यवतमाळला निघालो. यवतमाळ जवळच्या लोहारा या गावापर्यंत आल्यावर गाडी आचके देत थांबली.ती सुरूच होईना.चौकशीअंती (ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार) बॉयलर थंड झाल्याचे कळले.बऱ्याच प्रयत्नानंतर अर्ध्या तासाने गाडी धकली, पण थोडे दूर जात नाही तो पुन्हा थांबली.पुनः चौकशी केली असता 'गाडीत बिघाड झाल्यामुळे केव्हा सुरू होईल होईल हे सांगता येत नाही' असे उत्तर आले.गाडी ना धड लोहारा गावत ना धड यवतमाळात.(या परिस्थितीमुळे 'ना घर के ना घाट के' म्हणजे काय ते कळून आले.) लोहारा ते यवतमाळ अंतर तसे तीन साडेतीन किलोमीटर.गाडी चालती असती तर दहा/पंधरा मिनिटात यवतमाळला पोहोचलो असतो.पण एवढ्या अंतरासाठी शकुंतलेने अख्खा एक तास घेऊनही मधेच मुक्काम ठोकला.सायंकाळ होत आली होती.रात्री पुनः यवतामाळातच कार्यक्रम होता.गाडी अशा ठिकाणी थांबली होती की, दुसरे कुठलेही वाहन मिळणे शक्य नव्हते.काय करावे कोणालाच सुचेना.बराच खल झाल्यावर सगळ्यांनी आपापली वाद्ये घेऊन रुळा रुळाने चालत रेल्वे स्टेशन गाठायचे व तेथून टांग्याने गावात आमच्या (ऑर्केस्ट्राच्या) रूमवर जायचे ठरले.गायक मंडळी आपापले गळे घेऊन निघाली.बाकी वादक मंडळी पण आपापले वाद्य घेऊन चालू लागली.या प्रकरणात बासरीवाला मजेत होता.सगळ्यात गोची माझी होती.कारण अकॉर्डियन...! तेही अवजड असे पियानो अकॉर्डियन.तबलेवाल्याने तबल्याची झोळी खांद्यावर घेतली.बॉंगोवाल्याने बॉंगो एका हातात घेतला.कोंगोवल्याची पंचाईत झाली.त्याने सरळ ते धूड डोक्यावर घेतले.ते पाहून मीही अकॉर्डियनचे धूड डोक्यावर घेतले.व सगळेजण 'हर हर महादेव' म्हणत रस्त्याने (रुळाने) लागलो. यवतमाळच्या चौकीजवळ (सध्याचे दर्डा नगर) आल्यावर आमची 'वरात' पाहून आंबटशौकीन रसिक जमा होऊन गंमत बघायला लागले.आम्हाला मेल्याहून मेल्यासारखे झाले.पण इलाज नव्हता. कसे बसे स्टेशवर पोहोचलो व तेथून टांग्याने ऑर्केस्ट्राच्या खोलीवर! आयुष्यात पाहिल्यांदा या गाडीत बसलो.त्यानंतर बॉयलरचा धसका घेऊन पुनः प्रवास करण्याची हिंमत केली नाही.

माणसातिल खेकडे...


 

कविता


 





संगीत आणि साहित्य :