दोनोड्याला प्राथमिक शिक्षण घेतानाचा एक भन्नाट किस्सा आठवला. दोनोडा (ता.कळंब,जि. यवतमाळ) हे गाव तसे कदमांचेच!.आमच्या मूळ पुरुषाने तेथे येऊन केव्हा हे गाव वसवले त्याचा इतिहास काही मला अनेक प्रयत्न करूनही सापडला नाही.याचे कारण अशा नोंदी करून ठेवण्याची त्यांना आवश्यकता वाटली नसेल. किंवा नोंदी केल्या असतील तर ती कागदपत्रे पुढच्या पिढीने जतन केली नसावी. गाव वसवणाऱ्या मूळ कदमाचा वाडा मोठ्या गढीवर असून त्याच्या आजूबाजूला इतर नातेवाईकांचे वाडे.कदमांच्या वस्तीभोवती बारा बलुतेदारांची घरं. गावाची पाटीलकी पिढ्या न पिढ्या कदमांकडेच असायची.असं माझं गाव होतं. गावात एक मारूतीचे व त्याच्या समोरच विठ्ठल रुखमाईचे लहानसे मंदिर व एका खोलीची शाळा होती .त्या काळी गावात शिक्षकांचा खूप दरारा असायचा.शाळेव्यतिरिक्त शिक्षक कुठे दिसले तर त्यांच्या समोर जाण्याची हिंमत व्हायची नाही.खूप कडक असायचे. बरे एखादे वेळी गृहपाठ करून गेलं नाही किंवा शाळेत जायला उशीर झाला किंवा वर्गात धिंगा-मस्ती केली तर कडक शिक्षा व्हायची. ती शिक्षा म्हणजे ज्या कोणी वरीलपैकी एखाद्या कारणात सापडला असेल त्याला शाळेच्या कंपाउंडला असलेल्या मेंदीच्या झाडाची फांदी तोडून आणायला लावायचे.व त्याच्या कडूनच साफ करून त्याचा फोक तयार करून त्याच्याच हातावर, ढुंगणावर सपासप ओपायचे.फोकाने कुठे वळ उमटवावे या बद्दलची कुठलीही आचारसंहिता त्या काळी नसल्यामुळे गुरुजींच्या 'मूड' नुसार फोक आपले काम करायचा. हे वळ जर घरी दाखवून 'गुरुजींनी मारले' असे सांगितले तर घरी घरी वेगळी 'धुलाई व्हायची.शाळेचे कंपाउंड मेंदीचे एवढ्यासाठीच असावे की काय अशी शंका आता येते आहे.
इयत्ता दुसरीत की तिसरीत असताना एक किस्सा घडला तो असा...त्या काळी ग्रामीण भागात खेळण्याची साधने म्हणजे,गिल्ली-दांडू, झाडावरील डाबडुबल्या,खुप्पस व गोट्या.पण या खेळात सोबती लागायचे.ते नसले की,एक तर पेरकंडाची गाडी करून खेळणे किंवा घरा समोरील जू काढून ठेवलेला छकडा इकडे तिकडे ओढून करमणूक करून घेणे,असे चालायचे. असेच एक दिवस छकडा ओढता ओढता त्याच्या वेळूची बारीक शिळक पोटात घुसली ती तुटल्यामुळे बाहेर निघण्याचा प्रश्नच नव्हता.तिला तसाच पोटात घालून एक दिवस कसा बसा काढला.दुसऱ्या दिवशी मात्र खूप त्रास व्हायला लागला पण त्रास सहन करत चुप राहणे, हाच त्यावरचा सुरक्षित उपाय होता.रात्री मात्र झोपेत कड फेरताना (कूस बदलताना) धक्का लागून मोठी कळ निघाल्याने मी जोरात कळवळून ओरडलो.
काका बाजूलाच झोपले होते.त्यांनी जागे होऊन काय झाले असे विचारले. मी मात्र पोट धरून विव्हळत विव्हळत सांगावे की न सांगावे हा विचात करत होतो.कारण खरे सांगितले तर तेवढ्या रात्री 'कांडणालय' सुरू होऊन पिट्टा पडणार, याची 'गॅरंटी' व न सांगितले तर सी.बी.आय चौकशी चालूच राहणार! हे विचार मनात सुरू असताना मला एकदम राणे गुरुजींची आठवण झाली व मेंदीच्या फोकाचा बदला घेण्याची हीच योग्य वेळ आहे हे लक्षात आले.(बाल वयात मी अतिशय तल्लख बुद्धीचा होतो हे तुमच्या लक्षात आलेच असेल.) मी रडत रडत 'राणे गुरुजींनी पोटावर स्केलपट्टी मारली व त्याची शिळक पोटात गेल्याचे' सांगितले.काकांनी तेवढ्या रात्री ती शिळक कशी बशी काढली व शांत होऊन झोपी गेले.दुसरे दिवशी मात्र सकाळीच रुद्रावतार धारण केला व मला घेऊन तडक शाळेकडे निघाले.काही बोलायच्या आतच आपला तोफखाना सुरू करून न केलेल्या गुन्ह्याबद्दल गुरुजींना इतके झापले की,त्यांनी हाता पाया पडून कशीबशी सुटका करून घेतली.(कारण पाटीलकी व शाळा कदमाच्याच एका रिकाम्या वाड्यात.) त्या दिवसा पासून मला वर्गनायक करण्यात आले.गणिताच्या तासाला गुरुजी माझे गणित करून द्यायचे व वर्गाचे गणित तपासायला सांगायचे.याचा परिणाम माझ्या गणितावर होऊन ते जे कच्चे राहिले ते अजूनही कच्चेच आहे.त्यामुळे आजही आकडेमोडीशी, काडीमोड घेतल्यासारखा वागत असतो.
यवतमाळला आल्यावर ऑर्केस्ट्रा सुरू असताना जिथे मिळेल तिथे 'पार्ट टाईम' संगीत शिक्षकांचा 'जॉब' करणे,कवितांना चाली बसवून शिकवणे, नेहरू युवक केंद्राच्या संगीत विभागाचे काम बघणे,नाटकाला संगीत देणे,असे बरेच उपदव्यात करायचो.तेव्हा यावतमाळच्या एका नावाजलेल्या नाट्य संस्थेने 'चांदणे शिंपीत जा' की असेच काही नाव असलेले नाटक बसवायला घेतले.
त्याच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर टाकली.त्यात एक गाणे होते,'हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली,धरती प्रकाशवेडी ओल्या दवात न्हाली'.यवतमाळात गीतांना चाली देणारा एकमेव मीच असल्यामुळे हे काम माझ्याकडे आले.हे पूर्ण गाणे पियानोवर बसून नायिका गात आहे असा प्रवेश नाटकात होता.यवतमाळात पियानो फक्त चर्चमध्येच.मी कॉर्ड्स शिकण्यासाठी म्हणून एक वर्ष चर्चमध्ये जात होतो.
त्यामुळे सगळ्यांशी चांगली ओळख झाली होती.त्यावेळी कासलीकर गुरुजीकडे प्रमोदिनी मॅथ्यू म्हणून एक महिला गाणे शिकायला यायच्या. त्यांचा आवाज छान होता.त्यांच्यासोबत मी (माझ्या कंपोझीशनचे) गाण्याचे अनेक कार्यक्रम केले होते,करीत होतो.म्हणून या नाटकातील गाण्यासाठी त्यांची निवड केली.त्यात स्वार्थही होता.तो म्हणजे चर्चमधील पियानो.गाणे स्वरबद्ध झाले.पियानो सोबत तालमी झाल्या.आणि एकदाचे नाट्यसंस्थेच्या स्पूलच्या टेप रेकॉर्डरवर रेकॉर्डिंग आटोपले.त्यानंतर ती धून तशीच पडून होती.२०२१ ला मी लिहिलेल्या व स्वरबद्ध केलेल्या गीतांचा '#रे_मना' या शिर्षकाचा अलबम केला तेव्हा ही धून माझ्या कामी आली. शब्द होते...
'हा भाव-भावनांचा चालूय खेळ सारा,
शब्दात मांडलेला नुसताच हा पसारा'
ऐका तर....
https://youtu.be/GIhkt1NaTls?si=HYJCGSpKo_RWtoBj
(हा अलबम स्पॉटिफाय सोबतच विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.)
●


No comments:
Post a Comment