. आज दि.२८ जानेवारी २०२३...
आर्णीचा (जि. यवतमाळ,जिथे मी ३१ वर्षे संगीत शिक्षक म्हणून काम केले.) विद्यार्थी (आणि तेव्हाचा सख्खा शेजारी) किशोर सनसेटवार याने ज्या घरी सुरेश भट येऊन माझ्याकडे राहायचे त्या घराचा व्हिडीओ मला पाठवला.(त्याच्याच शब्दात "तुमच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तू.) या चंद्रमौळी घरात मी भाड्याने राहायचो.या घराच्या समोरच्या गल्लीत खुर्ची टाकून भट बसायचे."हा असा चंद्र अशी रात फिरयासाठी" ही गझल १९८१ मध्ये या गल्लीत बसून त्यांनी लिहिली होती.आणि माझी स्वररचनाही याच घरात झाली होती.ही गझल १९८२ मध्ये अमरावतीला अरविंद ढवळे या सुरेश भटांच्या मित्राकडे पं. हृदयनाथ मंगेशकरांसमोर झालेल्या माझ्या मैफिलीत भटांनी आवर्जून गायला लावली होती.
या घरात प्रत्येक भेटीत त्यांनी अनेक गझला लिहिल्या."उजाड वैराण वाळवंटी खळाळणार झरा मुहम्मद" ही मराठीतील पहिली 'नात' सुद्धा याच घरात भटांनी लिहिली.(१२/९/१९८१) तसेच कवी शंकर बडे, कलीम खान,मी आणि आर्णीतील गझल रसिक यांच्यातील अनेक चर्चा याच घरात रंगल्या.
(१९८६ मध्ये माझे स्वतःचे घर झाले.२००३ पर्यंत, म्हणजे आर्णी सोडून पुण्यात स्थायिक होईपर्यंत माझे वास्तव्य या नवीन घरात होते.)
आज किशोरने पाठविलेल्या 'त्या' घराच्या व्हिडिओमुळे अनेक सुखद-दुःखद आठवणी ताज्या झाल्यात.धन्यवाद किशोर!
-------------------------------------------------------------------------
●किशोरच्या शब्दात...
या गल्लीतून जातांना प्रत्येकवेळेस तुमची आठवण येतेच येते... आणि आज मी हा video काढून आपणास पाठविला... लहानपणी या गल्लीतून जातांना संगीताचे सप्तसुर येथे मी अनुभवले आहे...
No comments:
Post a Comment