गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, June 17, 2023

राग झिंझोटी...



     झिंझोटी रागाच्या बाबतीत माझी एक अतिशय हृद्य आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते.त्या वेळी मी ऑर्केस्ट्रामध्ये अकॉर्डिअन वाजवायचो. ऑर्केस्ट्राच्या खोलीत कुणी कधी वाजवत नसलेले मेंडोलीन होते. मी तबला,हार्मोनियम,अकॉर्डिअन वाजवीत असल्यामुळे.हे तंतुवाद्य आपल्याला कधीच जमणार नाही म्हणून त्याला कधीच हातात घेतले नाही.दुर्दैव म्हणा की सुदैव, ऑर्केस्ट्राचे निवेदक (विदर्भातील प्रसिध्द वऱ्हाडी कवी) शंकर बडेने त्याचे गावातील शाळेच्या नवीन खोल्या बांधण्यासाठी मदत करायची म्हणून 'दिवा जळू दे सारी रात' हे नाटक बसवायला घेतले.संगीतकार मी होतो. तालमी सुरू झाल्या नि मी आजारी पडलो. आजारपणातील वेळ घालविण्यासाठी ऑर्केस्ट्रातील मेंडोलीन घरी बोलविले.व त्यावर अलंकार घोटणे सुरू केले.आठ दिवसात हात छान रुळला व वाजविण्यात मजा यायला लागली.त्यामुळे पुढे मला जे जे राग माहीत होते त्याचा रियाज सुरूच ठेवला.तशातच नाट्यप्रयोगाच्या दोन दिवस अगोदर माझ्यासोबतचा व्हायोलिनिस्ट आजारी पडला.मग काय? नाटकातील गंभीर प्रसंगी मेंडोलीनचे सूर कामी आले.प्रयोग चांगल्या प्रकारे यशस्वी झाला.
     त्याकाळी यवतमाळच्या नेहरू युवक केंद्रातर्फे होणाऱ्या कार्यक्रमात माझा फार मोठा वाटा असायचा. असाच एक कार्यक्रम यवतमाळच्या नगर भवनात आयोजित करण्यात आला होता.गायन,वादनाच्या या कार्यक्रमात मी मेंडोलीनवर एक धून वाजविली.कार्यक्रमाला यवतमाळातील संगीत प्रेमींसह संगीत दर्दी पण होते.त्यात बडे गुलामली खान साहेबांचे शिष्य अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख पंडित मनोहरराव कासलीकरही होते.कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मला जवळ बोलवले व 'तू आज जी धून वाजविली ती कोणत्या रागात होती?' असा प्रश्न केला.त्यावेळी मी जरी तबला,हार्मोनियम,अकॉर्डिअन वाजवीत होती तरी संगीत शिकत होतो.म्हणजे विद्यार्थी दशाच होती.मी केव्हा तरी रेडिओवर ऐकलेल्या गतीची पहिली ओळ डोक्यात होती,ती वाजवून पुढे त्या सुरावटीला अनुसरून स्वरांचे गुच्छ तयार करून पाच मिनिटात वादन संपविले असल्यामुळे राग वगैरे माहीत नव्हता. त्यामुळे 'मला माहित नाही' असे उत्तर देऊन खाली मान घालून गप्प बसलो.तेव्हा त्यांनी मला रागाचे नाव सांगितले 'झिंझोटी'! आणि डोक्यावर हात ठेवून ,'छान वाजवतोस.थोडा जास्ती आणि डोळस रियाज कर' असे सांगून निघून गेले.त्यांच्या या वाक्यावरून मी पुढे दोन वर्षे 'डोळस' रियाज करून नागपूर आकाशवणीचा मान्यताप्राप्त मेंडोलीन वादक झालो.तेव्हापासून झिंझोटी राग कायमचा डोक्यात बसला तो आजतागायत.
      यवतमाळ येथीलच झिंझोटी रागाचा एक किस्सा ऐविल्याशिवाय राहावत नाही...आमच्या टोळक्यात एक पात्र सोडून बहुतेक सर्वजण संगीतप्रेमी होते.त्यामुळे गावात कुठेही संगीत मैफल असली की आम्ही तेथे जायचो. 'त्या' एकालाही संगीताची गोडी लागावी म्हणून त्याला सुद्धा सोबत घेऊन जायचो.पण तो थोड्याच वेळात झोपायचा व घोरायला लागायचा. त्याच्या घोरण्याच्या आवाजामुळे तेथून आमची हकालपट्टी व्हायची.तरी पण आम्ही त्या 'घोरी'ला 'अघोरी' बनविण्याचा चंगच बांधला होता. एकदा यवतमाळातील प्रसिद्ध वकीलाकडे एका खांसाहेबांची मैफल असल्याचे कळले.आम्ही त्या 'घोरी'सह आमचा मोर्चा तिकडे वळविला.कुप्रसिद्धीमुळे आम्हाला सगळ्यात शेवटी बसण्याची कशीबशी अनुमती मिळाली.खान साहेबांनी मैफलीत कुणीही झिंझोटी राग गात नाही,पण आज मी गाणार आहे.असे म्हणून मोठ्या ख्यालाला हात घातला. थोड्याच वेळात आमचा मित्र झोपण्याच्या बेतात आला.तो झोपू नये म्हणून आम्ही त्याला मधून मधून टोचण्या द्यायला लागलो.कारण खान साहेब झिंझोटी राग मस्त रंगवून अतिशय उत्कृष्टपणे सादर करीत होते.छोटा ख्याल संपेपर्यंत आमचा मित्र स्वतःच्या झिंज्या उपटण्याच्या बेतात आला होता. छोटा ख्याल संपल्यानंतर खान साहेबांनी 'मै तोड लायी राजा' हा दादरा सुरू केला.वेगवेगळ्या सुरवटींनी ही ओळ ते सजवीत होते.मैफल मस्त रंगली होती.रसिकांकडून वाह व्वा ची बरसात सुरू होती.आम्ही पण गुंगलो होतो.अशा प्रकारे जवळ जवळ दहा मिनिटे 'मै तोड लायी राजा' गायिल्या नंतर जेव्हा पुढे 'जमुनवा की डाली' असे त्यांच्या तोंडून आले तसा आमचा घोरी मित्र करवादला 'इत्ती देर मे तो मै अक्खा पेड उखाडकर लाता था...'! यानंतर काय घडले असेल याची कल्पना तुम्ही करू शकता.असो!
      झिंझोटी हा खमाज थाटोत्पन्न क्षुद्र प्रवृत्तीचा राग मानल्या जातो.(क्षुद्र प्रवृत्तीचे वा हलक्या प्रकारचे मानल्या गेलेले पिलू,मांड वैगेरे राग मांडायला व गायकाला डोक्यात घ्यायला बरेच परिश्रम करावे लागतात.तरी पण त्यांना क्षुद्र म्हणून का हिणवल्या गेले कळत नाही.खरे तर ज्यावरून शास्त्रीय संगीत निर्माण झाले त्या लोकगीतांच्या सुरावटी आहेत.) बहुतेक क्षुद्र प्रवृत्तीचा मानला गेलेल्या या रागात मानवी वृत्तीच्या सर्व भावना व्यक्त करण्याची क्षमता आहे हे खालील चित्रपट गीतांच्या यादीवरून आपल्या लक्षात येईल.बहुतेक गायक हा राग मैफिलीत गात नाही असे म्हणतात.पण वादक आणि संगीतकार मात्र या रागावर फिदा असल्याचे दिसून येते..
      
      कोमल मनि झिंझूटी है , चढ़त न लगे निषाद ।
      कहूँ कोमल गन्धार है , ध – ग संवादि – वादि ।।
     – राग चन्द्रिकासार
     
    झिंझोटीचे दोन प्रकार आहेत.एकात दोन्ही गांधाराचा प्रयोग होतो.दुसऱ्यात फक्त शुद्ध गांधाराचा प्रयोग होतो.यातील शुद्ध गांधाराचा झिंझोटी लोकप्रिय आहे.हा हलका आणि चंचल प्रकृतीचा राग असल्याचे म्हटल्या जाते.का? ते माहीत नाही.माझ्या मते कुठलाच राग हलका नसतो.तुमच्यात रंगविण्याची कुवत असेल तर कोणताही राग रंगविता येतो.हे उस्ताद फ़ैय्याज खान, उस्ताद निसार हुसेन खान,पंडित नारायणराव व्यास,कुमार गंधर्व,पंडित जितेंद्र अभिषेकी,पंडित राजन साजन मिश्र,पंडित अजय पोहनकर,किशोरी आमोणकर,मालिनी राजुरकर,उस्ताद राशीद खान,उस्ताद डागर बंधू,गुंधेचा बंधू,पंडित दिनकर कैकिणी,पंडित हनुमान सहाय,अश्विनी भिडे देशपांडे ('पतिदेवन महादेव' माझ्या अतिशय आवडीचे आहे.),पंडित जानोरीकर,पंडित राजशेखर मन्सूर,अरुण कशाळकर,शुभा मुद्गल,रघुनंदन पणशीकर,पंडित तुषार दत्त,शाश्वती मंडल,प्रचला आमोणकर,पूजा बाक्रे,शुभंकर डे,पंडित कौशिक भट्टाचार्य,ब्रजेश्वर मुखर्जी,श्रीमती देवी,मौमिता मित्रा,षड्ज अय्यर,सबिना मुमताज इस्लाम,मुकुल कुलकर्णी,शराफत हुसेन खान वगैरे गायक, गायिकांनी रंगविलेल्या झिंझोटीवरून लक्षात येते.
    आता आपण हिंदी चित्रपटसृष्टीचा आढावा घेऊ या...
झिंझोटी रागावर आधारित इतक्या विविध मूडची इतकी गाणी,गझला दुसऱ्या कुठल्या रागावर आधारित मी तरी पाहिल्या नाहीत.
'सो जा राजकुमारी सो जा', के.एल.सहगल.चित्रपट-जिंदगी.
'पिया बिन नहीं आवत चैन', के.एल.सहगल.तिमिर बरन, चित्रपट-(जुना)देवदास
'चली बन के दुल्हन उनसे लागी लगन',
लता. चित्रपट-सुबह का तारा.
'जा जा रे जा बालमवा', लता.चित्रपट-बसंत बहार
'छुप गया कोई रे दूर से पुकार के,दर्द अनोखे हाय दे गया प्यार के', लता.चित्रपट-चंपाकली.
'तेरी आंखों के सिवा दुनिया में रक्खा क्या है', रफी. चित्रपट-चिराग.
'रहते थे कभी उन के दिल मे', लता. चित्रपट-ममता.
'दिल के टुकडे हुए और जिगर लूट गया' लता.चित्रपट-सन ऑफ इंडिया.
'बदली बदली दुनिया है मेरी' महेंद्र कपूर.चित्रपट-संगीत सम्राट तानसेन.
एक रात मे दो दो चांद खिले', मुकेश-लता. चित्रपट-बरखा.
'ता थै तत थै', आशा भोसले.चित्रपट-तेरे मेरे सपने.
'फिरतेरी कहानी याद आई,फिर तेरा फसाना याद आया', लता.चित्रपट-दिल दिया दर्द लिया.
'संसार से भागे फिरते हो', लता.चित्रपट-चित्रलेखा.
'जाऊं कहां बता ये दिल दुनिया बडी है संगदिल', मुकेश. चित्रपट-छोटी बहन.
'जो गुजर रही है मुझपर उसे कैसे मैं बताऊं', रफी. चित्रपट-मेरे हुजूर.
'इक हसीं शाम को दिल मेरा खो गया', रफी. चित्रपट-दुल्हन एक रात की.
'कैसे कटेगी जिंदगी...' (अनरिलीज्ड मदन मोहन)
'कोई हमदम न रहा कोई सहारा न रहा', किशोर कुमार. चित्रपट-झुमरू.
'जिंदगी का सफर है ये कैसा सफर', किशोर कुमार. चित्रपट-सफर.
'ये लाल रंग कब मुझे छोडेगा', किशोर कुमार. चित्रपट-प्रेम नगर.
'सखी रे पी का नाम,नाम न पुछो',लता.चित्रपट-सती सावित्री.
'आज है प्यार का फ़ैसला', लता. चित्रपट-लीडर.
'हम आज कहीं दिल खो बैठे', मुकेश. चित्रपट-अंदाज.
घुंगरू की तऱ्हा बजता ही राहा हूँ मैं',किशोर कुमार. चित्रपट-चोर मचाये शोर.
'जो गुजर रही है मुझपर', रफी.चित्रपट-मेरे हुजूर.
'दो दिल टूटे दो दिल हारे', लता.चित्रपट-हीर रांझा
'क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार मे' रफी आणि 'मोसे छल किये जा',रफी-लता,चित्रपट-गाईड.(धून एक,गाणी दोन)
'रात निखरी हुई,जुल्फ बिखरी हुई', मुकेश. चित्रपट-हम हिंदुस्थानी.
'तेरा मेरा साथ रहे' लता.चित्रपट-सौदागर.
'क्या खबर क्या पता क्या खुशी है गम है क्या', किशोर कुमार. चित्रपट-साहेब
'मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया',किशोर कुमार. चित्रपट-कोरा कागज
'सजी नहीं बारात तो क्या,आयी ना मिलन की रात तो क्या', किशोर कुमार. चित्रपट-बिन फेरे हम तेरे
'मेरे मेहबूब तुझे मेरी मुहब्बत की कसम', रफी. चित्रपट-मेरे मेहबूब.
'तुमने किसीं की जान को जाते हुए देखा है,वो देखो मुझ से रुठकर मेरी जान जा रही है', रफी. चित्रपट-राजकुमार.
'मुझे दर्दे दिल का पता न था मुझे आप किस लिए मिल गये', रफी. चित्रपट-आकाशदीप.
'तुम मुझे यूं भुला न पाओगे', रफी. चित्रपट-पगला कहीं का.
'जिंदगी जिंदगी मेरे घर आ ना', अनुराधा पौडवाल. चित्रपट-दुरीयां
'सुनी रे नगरिया' लता. चित्रपट-उपहार.
'रिमझिम बरसता सावन होगा रफी',लता.चित्रपट-जीवन मृत्यू.

'पिया बिन नहीं आवत चैन' ही अब्दुल करीम खां साहेबांनी गायिलेली अप्रतिम ठुमरी प्रसिद्धआहे.हीच ठुमरी (जुन्या) देवदास या चित्रपटात के.एल.सैगल यांनी गायिली आहे.आणि पुढे रोशनआरा बेगम, लक्ष्मीशंकर, पंडित भीमसेन जोशी, फरीद हसनसह अनेक गायक/गायिकांनी गायिली आहे.

'देख तो दिल की जाँ से उठता है', 'आंखे सज्जादा', 'नावक अंदाज', 'हुवा जो तीरे नजर', 'गुलों में रंग भरे बादे नौ बहार चले','देखे भाले दोस्त हमारे' गायक-मेहदी हसन
'मैं नजर से पी रहा हूँ', गझल-गुलाम अली
'दिल परेशान है क्या किया जाये' गझल.गायक-कनिष्क सेठ.
'साहिब तेरी बंदिया बंदिया के चंगिया' - नूरजहां आणि  नुसरत फतेह अली.
      मराठी सुगम संगीतमध्ये मात्र झिंझोटीचा फारसा वापर झालेला दिसत नाही.
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,दि. १८ जून २०२३


 

No comments:





संगीत आणि साहित्य :