सुरेश भटांचे हे गीत आतापर्यंत सी.रामचंद्र,सुरेश वाडकर या दिग्गजांनी गायिले आहे.मी सुद्धा १९८० मध्ये स्वरबद्ध करून गायचा प्रयत्न केला.आवडण्याचे स्वातंत्र्य आपणास आहे...
Saturday, June 16, 2012
Sunday, June 3, 2012
रेशमाची रात...
रेशमाची रात
हळूच सरते
नभांगण रिते
करोनिया...
शुभ्र धुक्यातून
उकले पहाट
उत्साहाचे लोट
घेवोनिया...
कासव गतीने
दिवस निघतो
उसासे टाकतो
मध्यान्हीला...
तरूवर वेली
पेंगती उन्हात
घेवोनि कुशीत
गोधनाला...
उतरता ऊन्ह
पोळलेले श्वास
सोडती निश्वास
हळूवार...
सांजवेळ येता
क्षितिजावरती
रंगांची नवती
नव्हाळते...
रात्रीची चाहूल
लागता,पेटती
समईच्या ज्योती
घरोघरी...
रेशमाची रात
हळूच चढते
गात्र गात्र रिते
करावया...
सुधाकर कदम
Tuesday, May 29, 2012
तांबट रेषा...
भोवतालचा घोर अंध अंधार पाहुनी ना घाबरतो
लटकुन मुटकुन छ्तास तिथल्या दिवाभितासम जागत बसतो
दुर्दैवाने विरून जाता आकाशाची सीमारेषा
झोक सावरुन,वाट धरोनी स्वप्नदेशीचा प्रवास करतो
रानामधल्या हिरव्या वाटा घेरुन येता कवटाळाया
धावत धावत,अवखळ खळखळ,निर्झरासवे हळू सटकतो
सुख दुःखाच्या अनुभूतीचे मार्ग अचानक गरगर फिरता
पुण्याईच्या काल प्रवाही भय-अभयाचा हिशेब करतो
जरी अचानक सरून गेला आयुष्याचा घाट उतरता
मावळतीच्या पुर्वांगाला तांबट रेषा हळुच ओढतो
Sudhakar Kadam
Saturday, May 19, 2012
’गाऊ नये कुणीही रात्री अशी विराणी...
सुरेश भटांच्या स्वप्नातील आणि माझ्या मनातील गझल गायकी...
गायक-सुरेश वाडकर
गझलकार-दिलीप पांढरपट्टे
संगीत-सुधाकर कदम
अल्बम-काट्यांची मखमल.
(युनिवर्सल म्युझिक कंपनी)
Wednesday, May 16, 2012
एक कविता..माझी.
आयुष्याच्या चक्रव्युहातुन कधीच सुटका नसते
नियती त्याला दळण्यासाठी खूंटा मारून बसते
कुणास नसतो ठाव-ठिकाणा,कुणास नसती गावे
स्वतंत्र त्यांना जगण्यासाठी गाव-शीवही पुरते
ध्येय न कुठले,बंध न कुठले,सोस नसे कुठलाही
जगण्या मधली गंमत सारी विमुक्त होऊन सरते
वजा-बाकिचा हिशेब सारा मांडायासी जाता
हातामध्ये त्याच्या केवल शुन्य नि शुन्यच उरते
जगरहाटिला साक्ष ठेवुनी वास्तव स्वप्ने बघता
स्वप्नांच्या त्या इंद्रधनूचे सारे रंग धुसरते
कौतुक नाही क्षितिजाच्याही पल्याड बघणार्याचे
जन्म मृत्युच्या फेर्यामध्ये पल्याड काही नसते
लक्ष चौ’र्यांशी योनी भोगुन पुन्हा जन्म का घ्यावा
मोक्ष जयाला म्हणती ते का असे दूरवर पळते ?
हवा दिलासा आणि भरवसा जगण्याच्या सिद्धीचा
दुर्दैवाने ललाट रेषा कणा-कणाने झिजते
मरण मागण्या हात पसरतो अनाम शक्ती पुढती
परंतू सृष्टी पुन्हा प्रवाही होउन झर-झर झरते
सुधाकर कदम
Sunday, May 13, 2012
"मिलकर जुदा हुए तो..."
.पं.जसराज यांची प्रत्येक राग गाण्याची आपली एक वेगळी शैली आहे.तेथे कदाचित शास्त्र थोडे बाजूला पडत असेल.पण ज्याला ’मेलोडी’ म्हणतात ती त्यांच्या गायनात,ऐकतांना सतत जाणवते.याचा अर्थ इतर गायकांनी गायिलेला तोडी ऐकण्या सारखा नाही किंवा नसतो असे नाही.उदाहरण देतांना लोकप्रिय कलाकारांचेव नाव घ्यावे लागते,त्याला इलाज नाही.
अशा या तोडी रागाचे मला सर्वप्रथम आठवते ते ’आशिर्वाद’ या चित्रपटातील ’एक था बचपन...’ हे गाणे.त्यानंतर ’भावभोळ्या भक्तिची ही एकतारी...’हे श्रीनिवास खळे यांनी तोडीच्या स्वरांसोबत इतर स्वरांचा ताना-बाना करून विणलेल अतिशय तलम गाणं,संगीतकाराच्या प्रतिभेची उत्तुंग झेप दाखविते.खळ्यांनीच स्वरबद्ध केलेला तुकारामाचा अभंग ’अगा करूणाकरा...’ हा अभंग ऐकतांना डोळे आपोआप झरायला लागतात.तसेच ’पिंजरा’ या चित्रपटाती. राम कदमांनी स्वरबद्ध केलेलं व सुधीर फडक्यांनी गायिलेलं
’कशी नशीबानं थट्टा आज मांडली...
’हे ही गाणे तोडी रागा मध्येच आहे.’अमर प्रेम’ या चित्रपटातील
’रैना बीती जाए...’ याचा मुखडाही याच रागात आहे.
साबरी बंधुंनी गायिलेली ’अल्ला हे अल्ला...’ ही सुंदर कव्वाली त्यांच्या गायकीने रात्रीच्या वेळी सुद्धा वेगळ्या विश्वात नेवून तल्लीन करते.तर त्यांनी दुसर्या ओळीत कोमल मध्यमाचा वापर वापर करून केलेली स्वरांची बांधणी भल्या-भल्यांनबुचकळ्यात टाकते.त्यांच्या गाण्यातील आर्तता सरळ हृदयात घुसून अमिर खुस्रोच्या ’सूफी’ संगीताची ’खरी’ ओळख पटवते.मध्यमाचा असाच काहीसा प्रयोग अनूप जलोटा यांनी ’तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे’ या गझलच्या बंदिशीत केला आहे,तो पण श्रवणीय आहे.Thursday, May 10, 2012
"घाव ओला जरासा होता..."
(अल्बम=काट्यांची मखमल.)
गायिका-वैशाली माडे
गझलकार-दिलीप पांढरपट्टे
संगीत-सुधाकर कदम
Subscribe to:
Posts (Atom)
