रेशमाची रात...
रेशमाची रात
हळूच सरते
नभांगण रिते
करोनिया...
शुभ्र धुक्यातून
उकले पहाट
उत्साहाचे लोट
घेवोनिया...
कासव गतीने
दिवस निघतो
उसासे टाकतो
मध्यान्हीला...
तरूवर वेली
पेंगती उन्हात
घेवोनि कुशीत
गोधनाला...
उतरता ऊन्ह
पोळलेले श्वास
सोडती निश्वास
हळूवार...
सांजवेळ येता
क्षितिजावरती
रंगांची नवती
नव्हाळते...
रात्रीची चाहूल
लागता,पेटती
समईच्या ज्योती
घरोघरी...
रेशमाची रात
हळूच चढते
गात्र गात्र रिते
करावया...
सुधाकर कदम
No comments:
Post a Comment