गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, May 16, 2012

एक कविता..माझी.


चक्रव्युह

आयुष्याच्या चक्रव्युहातुन कधीच सुटका नसते
नियती त्याला दळण्यासाठी खूंटा मारून बसते

कुणास नसतो ठाव-ठिकाणा,कुणास  नसती गावे
स्वतंत्र त्यांना जगण्यासाठी गाव-शीवही पुरते

ध्येय न कुठले,बंध न कुठले,सोस नसे कुठलाही
जगण्या मधली गंमत सारी विमुक्त होऊन सरते

वजा-बाकिचा हिशेब सारा मांडायासी जाता
हातामध्ये त्याच्या केवल शुन्य नि शुन्यच उरते

जगरहाटिला साक्ष ठेवुनी वास्तव स्वप्ने बघता
स्वप्नांच्या त्या  इंद्रधनूचे  सारे  रंग  धुसरते

कौतुक नाही क्षितिजाच्याही पल्याड बघणार्‍याचे 
जन्म मृत्युच्या फेर्‍यामध्ये पल्याड काही नसते

लक्ष चौ’र्‍यांशी योनी भोगुन पुन्हा जन्म का घ्यावा
मोक्ष जयाला म्हणती ते का असे दूरवर पळते ?

हवा दिलासा आणि भरवसा जगण्याच्या सिद्धीचा
दुर्दैवाने  ललाट   रेषा कणा-कणाने   झिजते

मरण मागण्या हात पसरतो अनाम शक्ती पुढती
परंतू सृष्टी पुन्हा प्रवाही होउन झर-झर झरते



सुधाकर कदम



No comments:





संगीत आणि साहित्य :