"
मिलकर जुदा हुए तो न सोया करेंगे हम..." ही क़तील शिफ़ाई यांची,जगजीत-चित्रासिंग यांनी गायिलेली सुंदर गझल ’तोडी’ नामक रागात अतिशय वेगळ्या प्रकारे,रागस्वरूपाला धक्का न लावता बांधलेली आहे.तोडी रागाची अनेक रुपं आहेत.त्यात आपल्या सारख्या रसिक मंडळींनी खोलात जाण्यात काही अर्थ नाही.कारण तो सुद्धा लेखाचा एक वेगळा विषय आहे.या रागात सा रे ग म ध नि असे स्वर लागतात.(अवरोहात पंचम स्वराचा वापर काही गायक करतात.)यातील रिषभ,गांधार,धैवत स्वर कोमल असून मध्यम तीव्र आहे.गानसमय सकाळचा आहे...अर्थात ही वेळ फक्त शास्त्रीय गायन,वादन करणार्यांसाठीच आहे.कारण या रागातील जेवढी काही चित्रपट व चित्रपटाबाहेरची गीते,भावगीते,भक्तिगीते आहेत ती सर्वकाळ गोड वाटतात,हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे.
तोडी राग जवळ- जवळ प्रत्येक गायक-वादकाने गायिला-वाजविला असावा.पं.भीमसेन जोशींच्या तोडीतील ताना, मेघांच्या गडगडटाला आव्हान देणार्या होत्या.तर प्रत्येक स्वराचे महत्व जाणून त्याचा अतिसुंदर विस्तार किशोरीबाईंच्या गाण्यात दिसून येतो
.पं.जसराज यांची प्रत्येक राग गाण्याची आपली एक वेगळी शैली आहे.तेथे कदाचित शास्त्र थोडे बाजूला पडत असेल.पण ज्याला ’मेलोडी’ म्हणतात ती त्यांच्या गायनात,ऐकतांना सतत जाणवते.याचा अर्थ इतर गायकांनी गायिलेला तोडी ऐकण्या सारखा नाही किंवा नसतो असे नाही.उदाहरण देतांना लोकप्रिय कलाकारांचेव नाव घ्यावे लागते,त्याला इलाज नाही.
अशा या तोडी रागाचे मला सर्वप्रथम आठवते ते ’आशिर्वाद’ या चित्रपटातील ’एक था बचपन...’ हे गाणे.त्यानंतर ’भावभोळ्या भक्तिची ही एकतारी...’हे श्रीनिवास खळे यांनी तोडीच्या स्वरांसोबत इतर स्वरांचा ताना-बाना करून विणलेल अतिशय तलम गाणं,संगीतकाराच्या प्रतिभेची उत्तुंग झेप दाखविते.खळ्यांनीच स्वरबद्ध केलेला तुकारामाचा अभंग ’अगा करूणाकरा...’ हा अभंग ऐकतांना डोळे आपोआप झरायला लागतात.तसेच ’पिंजरा’ या चित्रपटाती. राम कदमांनी स्वरबद्ध केलेलं व सुधीर फडक्यांनी गायिलेलं
’कशी नशीबानं थट्टा आज मांडली...
’हे ही गाणे तोडी रागा मध्येच आहे.’अमर प्रेम’ या चित्रपटातील
’रैना बीती जाए...’ याचा मुखडाही याच रागात आहे.
साबरी बंधुंनी गायिलेली ’अल्ला हे अल्ला...’ ही सुंदर कव्वाली त्यांच्या गायकीने रात्रीच्या वेळी सुद्धा वेगळ्या विश्वात नेवून तल्लीन करते.तर त्यांनी दुसर्या ओळीत कोमल मध्यमाचा वापर वापर करून केलेली स्वरांची बांधणी भल्या-भल्यांनबुचकळ्यात टाकते.त्यांच्या गाण्यातील आर्तता सरळ हृदयात घुसून अमिर खुस्रोच्या ’सूफी’ संगीताची ’खरी’ ओळख पटवते.मध्यमाचा असाच काहीसा प्रयोग अनूप जलोटा यांनी ’तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे’ या गझलच्या बंदिशीत केला आहे,तो पण श्रवणीय आहे.
माझ्या मते गानसमयापेक्षाही त्या त्या रागातील स्वरांचा उपयोग संगीतकार कशा प्रकारे करतो,गायक-गायिका कशा प्रकारे प्रस्तुती करते आणि वाद्यमेळ कसा जमतो यावर श्रोत्यांची आवड-निवड ठरत असावी.तसे नसते तर तोडी रागातील गाणी सकाळ सोडून इतर वेळी कानाला गोड लागलीच नसती.काही-काही गोष्टी परंपरेने ठरवून-ठरवून डोक्यात भरविल्या जातात त्यातलाच गानसमय हा प्रकार असावा असे मला प्रामाणिकपणे वाटते.असो...हा वादाचा मुद्दा आहे.
आपण आज जगजित-चित्रासिंग यांनी तोडी रागात बांधलेली ’मिलकर जुदा हुए तो ना सोया करेंगे हम...’ ही गझल ऐकणार आहोत.या गझलच्या मतल्याची पहिली ओळ मध्य सप्तकातील कोमल धैवतावरून सुरू होऊन मंड्र सप्तकातील निषादावर सुटते.आणि येथूनच पुढे गंमत सुरू होते,ती अशी की निषादावर मुर्छना करून दुसर्या पूर्ण ओळीत ’भूप’ रागाची छाया दाखवित पुन्हा कोमल धैवतापासून पहिली ओळ सुरू होते.अशी गंमत प्रबुद्ध संगीतकारच करू शकतो.ऐर्या-गैर्याचे ते काम नोहे.येथे जगजितसिंग यांच्यातला संगीतकार येथे प्रकर्षाने दिसतो,त्यामुळेच आमचा जीव त्याचेवर जडतो.आणि तो गेल्यावर डोळे भरून येतात.
या गझलमधील प्रत्येक शेरात (कडव्यात) मतल्यामध्ये (ध्रृवपदामध्ये) न घेतलेला ’पंचम’ स्वर घेऊन एक वेगळी अनुभूती देण्याची योजनासुद्धा अतिशय तरल अशी आहे.तसेच यात पारंपारिक पद्धती प्रमाणे गायकी न दाखविता एकदम ’लाइट मूड’मध्ये जास्ती वाद्यांचा वापर न करता हळुवारपणे दोघांनी ही गझल सादर केली.तालवाद्य घटम,गिटार आणि सेक्सॉफोनचा अतिशय सुंदर उपयोग यात करण्यात आला आहे.विविध प्रकारच्या वाद्यांचा,कोरसचा वापर करण्याचा पायंडा जगजितसिंग यांनी पाडला.पण हे करतांना शब्दांकडे दुर्लक्ष केले नाही.अशा या गुणी संगीतकार,गायकाची ही गझल आपणास निश्चितच आवडेल याची मला खात्री आहे...(कदाचित ही गझल आपण ऐकलीही असेल.)
मिलकर जुदा हुए तो ना सोया करेंगे हम
इक दूसरे की याद में रोया करेंगे हम
आँसू छलक छलक के सतायेंगे रातभर
मोती पलक पलक में पिरोया करेंगे हम
जब दूरियों की आग दिलों को जलाएगी
जिस्मों को चांदनी में भिगोया करेंगे हम
गर दे गया दग़ा हमे तुफ़ान भी क़तील
साहिल की कश्तियों को डुबोया करेंगे हम
क़तील शिफ़ाई
(खाली दोन VDO दिले आहेत.पहिल्या मध्ये क़ैसर-उल-जाफ़री यांची ’तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे...’ ही अनूप जलोटा यांनी गायिलेली,तोडी रागातीलच गझल आहे.ही गझल जलोटांनी गायकी अंगाने विविध विवादी स्वरांचा उपयोग करत-करत अतिशय चांगल्या प्रकारे नटविली आहे.ही सुद्धा आपणास आवडेलच...)
दुसर्यामध्ये ’मिलकर...’ आहे.
2 comments:
sir, ya sarvamage kiti vichar asto ?
aiknaryala he kalat suddha nahi .
namskar !
pradip raut
धन्यवाद!💐💐💐💐💐
Post a Comment