गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, October 25, 2026

'देशी-विदेशी... (खुसखुशीत)


     आपल्याला विदेशी (इम्पोटेंड) वस्तूंचं इतकं वेड आहे की, त्याकरीता आपण काहीही करायला तयार होतो. कितीही किंमत मोजायला मागेपुढे पाहत नाही. मग ती वस्तू किती का वाईट असेना ! आपल्याजवळ एखादी तरी विदेशी वस्तू असावी अशी प्रत्येकाची मनीषा असते. एका काळात 'मेड इन जर्मनीच्या' वस्तू मोठ्या भक्तिभावाने घरी आणून त्याची 'जाहिरात' संबंधितांमध्ये केली जात असे. मधल्या काळात 'स्वीस' घडयाळे इतकी लोकप्रिय होती की प्रत्येकाच्या मनगटावर (मानगुटीवर नव्हे) ही घडयाळे स्वार झालेली दिसत. काही वर्षे यु.एस.ए च्या वस्तूंवर लोकांच्या उड्या पडत होत्या. नंतरची काही वर्षे 'मेड इन इंग्लडंचेही' राज्य भारतीयांच्या मनावर होते. काही वर्षे ही 'मानाची' जागा जपानने घेतली होती. टेपरेकॉर्डरपासून तर टीव्ही. पर्यंत, मोटर सायकलपासून तर मोटारीपर्यंत व टायपासून तर बुटापर्यंत सर्वत्र 'मेड इन जपान' हा एकच मंत्र जपल्या जात होता. राजकपूरने त्याच्या उमेदीच्या काळात 'जपानी जुता' जाहीरपणे वापरुन गाणेही म्हटले होते 'मेरा जुता है जपानी' यावरुन त्याला भारतात 'मेड इन जपान' चे राज्य येणार हे तेव्हाच कळले होते असे म्हणायला हरकत नाही.सध्या मात्र चीनने आपले साम्राज्य पसरविलेले दिसत आहे.

     विदेशी आकर्षणाच्या नादात आमच्या एका ख्रिश्चन मित्राने चक्क 'इंपोर्टेड' बाय‌को आणली (पांढऱ्या पालीसारखी इति भारतीय स्त्रिया) इंडियात आल्यावर त्यांना घरी बोलावले. जेवण वगैरे आटपून हे जोडपे परत निघाले तेव्हा समस्त वेटाळवासी स्त्रिया या 'ब्लॅक अँड व्हाईट' जोडप्याकडे पाहून आपआपले मनोगत शेजारणीजवळ व्यक्त करीत होत्या. घरी मात्र आमच्याकडे आजीने 'बाबू' तुह्या दोस्तानं अशी कोडीली (कोड निघालेली) बायको काहून केली गा ? असा प्रश्न विचारून आमच्या पेटीतील हवाच काढून घेतली. काही वर्षानी या 'व्हाईट ब्युटी' ला मुलंबाळ झाली व भारतीय हवापाणी इतके मानवले की, लोक तिला 'व्हाईट 'हाऊस' म्हणायला लागले !

     विदेशीच्या सोसामुळे आपण आपले ओरिजिनल ते सगळे तकलादू समजायला लागले आहोत आपल्याकडील देशी सुताचे कपडे विदेशात अतिशय लोकप्रिय होत आहेत.

पण आपण मात्र उष्ण प्रदेशात राहत असूनही त्यांनी टाकलेल्या कृत्रिम धाग्यांची वस्त्रे वापरत आहोत. एवढेच नव्हे तर नवरदेवाची कितीही दमकोंडी होवो, पण लग्नाचा 'सूट' सूट होत नसला तरी शिवतोच. त्याशिवाय नवरदेवाला नवरदेव झाल्यासारखे वाटत नाही. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी, एखादी व्यक्ती जर अस्सल भारतीय पोषाखात समोर आली तर तिची गावढंळ म्हणून आपणच संभावना करतो.

     सणांच्या बाबतीतही तेच ! आपल्या संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे सण आहेत. मोठयांचा आदर करणे शिकविण्यापासून तर मनातली कोळीष्टीकं झाडून टाकण्याकरिता 'शिमग्या' सारख्या सणांपर्यतच्या सगळ्या व्यवस्था असूनही विदेशी चालीरीती आणून आपल्यास संस्कृतीची ऐशीतैशी केल्याशिवाय आपणास करमत नाही. आता नववर्षाचे घ्या नां! गुढीपाडव्याला आपले नववर्षे सुरु होते. पण आपण ३१ डिसेंबरलाच नववर्षाच्या नावाने 'रात्रभर' 'शिमगा' साजरा करतो. सध्या तर कृष्णजन्म, गणेशोत्सव वगैरे धार्मिक उत्सव ३१ डिसेंबर व शिमग्यापेक्षाही वाईट प्रकारे साजरे होताना दिसत आहे. पुढे अजून काय होणार ते कृष्ण व गणपतीच जाणे!

     देशीमध्ये विदेशीचे मिश्रण करुन तयार होणाऱ्या चित्रपटांची गंमत तर सर्वजण बघत असतात. विदेशी कथा, देशी माल मसाला व सोबत कोंबडीच्या रस्सेदार अख्या टांगेसारख्या नट्यांच्या उघड्या टांगा, खरं म्हणजे देशी व विदेशी मिळून 'मादक कॉकटेल' तयार व्हायला पाहिजे, पण या चित्रपटात मादकता तर सोडा साध्या लिंबू सोडयाची तिव्रताही नसते.

     विदेशी मद्य हा देशी (पियक्कडांचा) विक पॉईंट आहे. हे मद्य कधी कधीच मिळत असल्यामुळे 'भेटीलागी जीवा लागतसे प्यास' या आर्त आळ‌वणीसह वाट पाहणे सुरु असतें. एकदा का तडाख्यात सापडली की परब्रह्म भेटल्याचा आनंद होऊन 'ब्रहमानंदी' टाळी लागेपर्यंत ढोसणे हा एक कलमी कार्यक्रम सुरु होतो. या मद्याची किंमत जास्ती असल्यामुळे सर्वसाधारण देशी माणूस त्याचा आनंद घेवू शकत नाही. हे कनवाळू सरकारला न पाहवल्यामुळे त्याचीही 'टाळी' लागाची म्हणून देशीची निर्मिती करून मद्य गंगा गावोगावच्या अंगणात पोहचविली (तशीही, देशीची मजा विदेशीत येत नाही असे देशीवाले म्हणतात) देशी माणूस व देशी 'कॉम्बिनेशनची' मजा घ्यायची असली तर अस्सल ग्रामीण भागात जायला हवे. बाजाराचे दिवशी हे अस्सल देशी बेवडे टोळक्या टोळक्याने देशी कपड्यात देशी चढवून, देशी रस्त्याने, देशी मुक्ताफळे, उधळीत देशी स्टाईलने 'मुक्तछंदात' (कवीची क्षमा मागतो) वावरतांना दिसतात. (कधी कधी देशी पोलीस त्यांना देशी हवालातही दाखवितात) त्यांच्याकडे पाहिले की स्वातंत्र्य म्हणजे काय याची प्रचिती आल्याशिवाय रहात नाही.

     आठवडयातून एखादे वेळी पिणाऱ्या बिचाऱ्या देशीवाल्यांना बेवडा, दारुड्या वगैरे विशेषण आपण लावतो. पण रोज विदेशी. पिणाऱ्याला मात्र, त्याने कितीही धिंगाणा घातला, तमाशे केले, शिव्या दिल्या तरी त्याला असली विशषणे न लावता 'साहेबांना आज जरा जास्तीच झाली नाही? असे म्हणून कौतुक केल्या जाते. हे बरोबर नाही. त्यामुळे समस्त 'देशीप्रेमींना' दारुडा व बेवडा म्हणणाऱ्या जनतेचा (देशी दारु घेवून) निषेध करायला काहीच हरकत नाही.

     इंग्रजांच्या आमदतीत मोठ मोठया टोप्यांची फॅशन होती. त्यावेळी त्यांनी मोठ मोठया देशी माणसांना टोप्या घातल्या ! परंतू गांधीजींच्या टिचभर टोपीने या मोठ्या टोप्यांना शह देवून इंग्रजांनाच हद्दपार केले. नंतरच्या काळात गांधीजींच्या विचाराशी फारकत घेणारे तिचा वापर करायला लागल्यामुळे आज गांधी टोपी एक प्रकारे इतिहासात जमा झाली आहे. या टोप्या प्रकरणात काळी टोपी गेल्या बारा वर्षात एकदम चमकायला लागली. इतकी की, जनतेचे डोळे दिपून गेले आहे.सगळं काही 'फाईव्ह स्टार' चकचकित (जनतेला चकित करणारं) झालं आहे.'कालाय तस्मै नमः!'

------------------------------------------------------------दै. दै.विदर्भ मतदार. अमरावती. रविवार पुरवणी 

दि. २५/१०/२०२६.

No comments:





संगीत आणि साहित्य :