हरदिके हात ओले आसू खुसीके आखीने
असो चेहरा हासरो फूल फुल्यो आंगनने
जसी आयी कोजागरी घरे दसरा दिवारी
परसाको झाळ लाल जाई फुलीती लाजरी
सब ऋतू एक तभे रिमझिम बरसाद
दूर दूर अभारने इंद्रधनू देये साद
चैत्रपालवी भोवती कुहू कुहू कोकिळको
झाळ आंबाको मोहर्यो हासे फूल बहावाको
शब्दार्थ:- हरदीके = हळदीचे, हासरो =हसरा, परसाको = पळसाचे, तभे =तेव्हा, अभारने = आभाळत, देये = देतो, झाळ = झाड, आंबाको = आंब्याचे
------------------------------------------------------------------------
रसिकहो,
महाराष्ट्रातील विविध भौगोलिक भागात विविध बोली भाषा बोलल्या जातात.त्याचप्रमाणे कलाली ही बोली विदर्भातील कलाल समाजात बोलली जाते. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना कदाचित माहीत नसेल.पण खूप गोड बोली आहे.कलाली बोलीतील गीतांना स्वरबद्ध करणे हे काम माझ्यासाठी आव्हानात्मक होते.कारण माझा बाज वेगळा आणि लोकगीतांसारख्या गाण्यांना स्वरबध्द करणे एकदम वेगळे.परंतू माझा जन्म,बालपण,शिक्षण, नोकरी विदर्भातच झाल्यामुळे विदर्भातीलच विविध बोली भाषा व त्या त्या बोलीतील गाणी माझ्या कानावरून गेली होती.
त्यामुळे मी हे आव्हान स्वीकारले व कामाला लागलो.कवी डॉ. रामदास चवरे यांची गीते वाचता वाचता सुरावटी येत गेल्या आणि चार गाणी तयार झाली.मेलोडीअस चालींना संगीत संयोजक मिलिंद गुणे यांनी पूरक असा स्वरसाज चढवून 'चार चांद' लावले.संपूर्ण गीत ऐकल्यानंतर त्याची प्रचिती आपणास येईलच.ही सगळी गाणी लोकगीताच्या अंगाने गाणे आवश्यक होते.आणि प्राजक्ता गायीलच याची मला खात्री होती.चारही गाणी, गाताना दम लागणारी होती.कारण एक ओळ पुनःश्च गाताना वा प्रत्येक गाण्याच्या दोन दोन ओळी सलग गाताना त्यात श्वास घ्यायला जागाच नव्हती.पण प्राजक्ताने हा अवघड 'श्वासगड' सर केला,
त्याबद्दल तिचे कौतुक.
'हरदिके हात ओले' हे त्यातल्या त्यात इतर तीन गीतांपेक्षा थोडे वेगळ्या ढंगाचे झाले आहे.यात लोकगीताचा बाज दिसणार नाही. पण उत्स्फूर्त आलेली सुरावट आपणास निश्चित आवडेल याची मला खात्री आहे.हे गीत आज मा. डॉ.अविनाश आवलगावकर, कुलगुरू, मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर,अमरावती. यांचे हस्ते लोकार्पण करतो आहे.
आपल्या व्यस्त दैनंदिनीतून वेळ काढून शब्दांना पूरक असा सुंदर व्हिडीओ विवेक काजरेकरांनी तयार केला आहे. ध्वनिमुद्रण पंचम स्टुडिओमध्ये करण्यात आले असून, मास्टरिंग अजय अत्रे यांनी केले आहे.हे वेगळ्या बोलीतील नावीन्यपूर्ण गीत ऐका, आणि आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा.
आपला
सुधाकर कदम

No comments:
Post a Comment