गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, October 25, 2026

जीवनाच्या प्रदीर्घ चिंतनातून उमललेले गझल काव्य -डॉ.राम पंडित


     मराठीचे आद्य गझल गायक,गझल गंधर्व सुधाकर कदम हे केवळ भटांच्या किंवा इलाहीच्या दादलेवा गझला संगीतबध्द करून  गाईल्यामुळे प्रसिध्द झालेले व्यक्तिमत्व नाही.त्यांच्यात तेवढ्याच ताकदीचा एक कवी,गझलकार,गीतकार व विडंबनकार विद्यमान आहे. या समग्र विधातील त्यांच्या रचना, खरोखर लक्षणीय असूनही त्यांच्या प्राधान्यक्रमाने  'संगीतकार-गायक' या ओळखीमुळे उशीराने रसिकांच्या मनात शिरल्या. आपल्या वैदर्भीय स्वभावाप्रमाणे खुद्द कदमही काव्य सृजन व प्रकाशनाबाबत 'आस्ते चलो' या वृत्तीचे असावेत हेही खरे. भटांच्या सहवासात राहिल्याने, मूलतः कवीही असलेल्या कदमांच्या लेखणीला गझल आणि तरल गीतांचा संसर्ग होणे स्वाभाविकच होते. 

'काळोखाच्या तपोवनातून' हा सुधाकर कदमांचा दुसरा कविता संग्रह आहे. हा संग्रह गझल,कविता, गीत, अभंग अश्या पद्य विधांच्या  विविध रंगात साकारला आहे.

कदम म्हणतात- 


रंग दिशांचे दिशात विरती

भाव मनाचे मनात सरती

सदैव चाले सरणे विरणे

जशी समुद्री भरती ओहटी


ही भरती म्हणजे सृजनाची उत्स्फूर्तता.ती कवीच्या अंतःकरणातील तरल भाव व बुध्दीतील कल्पनांच्या तरंगांचे आवागमन करीत करीत असते. 


सुधाकर कदमांच्या रचनांचे शब्द सौंदर्य व स्वर लावण्य मनोज्ञ आहे.उदाहरणार्थ-


कधी कुणाला अपुल्या ह्रदयी वसवुन बघ ना

अजून काही नवीन नाती जुळवुन बघ ना 


रंग सारखा सगळ्यांचा तुज दिसून येईल

रक्ताशी तू रक्त तयांचे मिळवुन बघ ना 


सुगंध त्यांच्या देहाचाही तसाच येईल

अपुल्या बागेमध्ये काटे फुलवुन बघ ना


वरील शेरांतील तरलता व आशयघनता गझल व गीतातील सीमारेषा पुसट करतात.कवीच्या रचनात विषयवैविध्य येतं ते त्या त्या वेळी उद्भवलेल्या भाववृत्तींमुळे.अवतीभवतीच्या घटना,समाजातील आर्थिक,सांस्कृतिक,राजकीय परिस्थिती त्याच्या द्रवीभूत अंत:करणाला त्यावर रिएक्ट होण्याला भाग पाडत असते. कधी ती अभिव्यक्ती गझलेच्या स्वरूपात तर कधी गीत वा कवितेच्या रूपात सादर होते.कदम म्हणतात- 


आनंद उफाळे 

झोका जाता उंच

खाली अधिकच

मनमोही... 


मुक्त झुलण्यास

हवा मुक्तपणा

आणिक प्रेरणा

झुलण्याची... 


मनासारखी रचना कागदावर उतरल्या वरचा आनंद अनिर्वचनीय असतो.तो मनाच्या हिंदोळ्यावर शब्दांच्या झुलण्याने  जाणवतो. 

कदमांना अभिप्रेत असलेली उपरोक्त प्रेरणा आदिम आहे. झोका,झुलणे ही आनंद व सकारात्मक मनोवृत्तीचे द्योतक म्हणता येईल.कदमांच्या प्रकृतीत हे संमिश्र भाव प्रकर्षाने जाणवतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर- 


हा भाव-भावनांचा चालूय खेळ सारा

शब्दात मांडलेला नुसताच हा पसारा 


मात्र कधी वैफल्याचेही क्षण येतात तेव्हा ते खेदाने उद्गारतात- 


धुपापरी जळूनी गंधीत होत गेलो

नियती अशी कशी ही ठरलोय मी उबारा 


मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची

काट्यास मात्र येथे कसलाच ना निवारा 


स्वतः संगीतकार-गायक असूनही कदमांनी हेतुपुरस्सर गायनानुकूल गझल अथवा गीते लिहीली नाही ही बाब मला विस्मित करते. खरंतर त्यांच्या तरल रचना गेय व मोहकही आहेत.अभंग विधेतील ही शृंगारिक रचना पहा-


धुंद शृंगारात / वादळी तरंग

तृप्ततेची झिंग / अंगभर... 


थरथरणारे / अबोल ते ओठ

मारतेय गाठ / शब्दांनाही... 


सौंदर्याचा रंग / खुलुनिया येता 

तुटे तटतटा / सारे बंध... 


सभोती सांडता / पौर्णिम चांदणे

कशास झाकणे /  मुखचंद्र... 


मिठीत येताच / सुटे दरवळ

शोधतोय तळ / सुगंधाचा... 


कवेत घेताच / बिलगून वेलू

लागतेय खुलू  / हळू हळू... 


ढळता ढळेना / रात मंतरली

अजून रंगली / पहाटेला... 


शेजीजवळचा / दिवा जरी मंद

दोघांचीही धुंद / उतरेना 


सुधाकर कदमांच्या सामाजिक, राजकीय जाणिवा प्रगल्भ आहेत.

पंढरीच्या विठ्ठलाशी ते संवाद साधतात.तसेच जातीय भेदभावावर,अंधनिष्ठांवर सडकून टीकाही करतात.मात्र टीका वाचकांच्या मनात रुजण्यासाठी ते बहुधा विडंबनात्मक रचना किंवा हजलांची निवड करतात. त्यातील ,प्रतिके उपरोध  भावणारा असतो.प्रथम सश्रध्द मनाचे हे शेर वाचा-


जीवनाची एकतारी  

पंढरीच्या महाद्वारी 


विठ्ठलाच्या पायरीची

चंद्रभागा पापहारी 


वेदनांच्या पालख्यांना

वाहिले मी बिनपगारी 


संपवाया येरझारा 

होउ दे ना एक वारी 


काळ आला न्यावया जर

जीव सोडिन ह्याच दारी


ही भाषा नामदेवाच्या भाषेशी नातं सांगणारी वाटते. तर खालील

अभंगाची भाषा ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाशी जवळीक साधतांना दिसते. 


स्वर चंद्रायणी

येता आस-याला

फुटे अभंगाला

पाचू पंख 


काळजात चंद्र

घेवोनिया वाही

भागेच्या प्रवाही

सूर्यबिंब 


आता विडंबनात्मक रंगाच्या हझलचे शेर  पहा- 


आपण असतो अपुल्यासाठी

उरलो तर मग इतरांसाठी 


कणव न येई शेतक-यांची

असले नेते त्यांच्या  गाठी 


खरेच माणुस चळतो का रे?

उलटल्यावरी त्याची साठी 


उपरोधिक शब्दात कटू सत्य असेही सांगता येते. 


एक दार्शनिक शेर मुलाहिजा हो-


अंथरता भ्रम जाळे

त्यांस फसती पांगळे 


तत्वज्ञानाच्या क्षेत्रात भ्रम या संज्ञेत अज्ञान,नेणिव,आभास इ.अर्थांचा अंतर्भाव होतो,तर 'जाळे' हे आवरण ठरते. इथे अधिष्ठानाच्या जागी विपरीत भासाचे जाळे पसरले आहे,तेव्हा त्याची जाण नसलेले बौध्दिकदृष्टीने पांगळेच गणावे लागते. सकृतदर्शनी बाळबोध वाटणारे पण सखोल दोन शेर याच पठडीतील आहेत ते बघा- 


पानगळीच्याही अगोदर

सर्व इच्छा झडत आहे 


कोण जाणे काय झाले

मन पुन्हा अवघडत आहे 


चांगला कवी तत्त्वचिंतक असतोच.मात्र इकबाल या शायराप्रमाणे

त्याच्या रचनात काव्य लालित्यावर दार्शनिकता मात करत असेल तर तो रसोत्पत्ती पासून दूर जातो.सुदैवाने अनेक ठिकाणी कदमांची कविता तत्वस्पर्शी होऊ लागतेही पण काव्यगुण सोडत नाही.किंबहुना बरीचशी तरल व रोमँटीकच

होतांना दिसते. 


आर्त गाण्यातून फुलता एक नात्याची कहाणी,

मारव्याचा सूर फिरुनी का असा पडतोय कानी 


अत्तरासम घमघमूनी भिरभिरे तो गंध भवती

शोधते मग त्यांस इकडे होउनी केवीलवाणी 


ते तुझे हळुवार गाणे गुंजते कानात अजुनी

भास की आभास न कळे पण जिवाचे होइ पाणी 


किंवा या द्विपदी पहा-

मनात माझ्या अजूनही तू तशीच आहे

फुलासारखी प्रसन्नताही तशीच आहे...

तुझ्या विविध शृंगार त-हांनी देहामध्ये

ऊब मिठीची अजून ताजी तशीच आहे.


सहसा कवी उत्तरार्धात रोमँटीक शेर किंवा कविता लिहित नाहीत."शेरांच्या विषयांवरुन त्याच्या वयाचा अंदाजही बांधता येतो "असे विनोदाने म्हणता येईल.इथे कदमांच्या रचनांवरून त्यांचे वय आहे त्यापेक्षा अर्धेच धरावे लागेल.

सुधाकर कदमांच्या कविता,गझला व हझलांचा बाज कधी चिंतकाचा,कधी कलंदराचा तर कधी खट्याळ.. मिश्किल विडंबनकाराचा आहे.या तिन्हीचे स्वरूप त्यांच्या रचनांसोबत फेसबुकवर ते टाकीत असलेल्या पोस्ट मधून जास्त विस्तृत व सखोलपणे कळू शकेल.

-डॉ. राम pandit

४ एटलांटा, सेक्टर ४०,

सीवुड्स-पश्चिम,

नवी मुंबई ४००७०६

9819723756


स्वयं प्रकाशन चा नवीन कवितासंग्रह 💖

◆ काळोखाच्या तपोवनातून

◆ कवी : गझलगंधर्व सुधाकर कदम

◆ प्रस्तावना : डॉ. राम पंडित 

◆ मुखपृष्ठ : डॉ. अविनाश वानखडे 

◆ प्रकाशक : स्वयं प्रकाशन Shubhanan Chinchkar 


संग्रह मिळवण्यासाठी तपशील -

●टपालखर्चासह फक्त २०० ₹


● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.

A/c no : 053312100004140

IFSE Code : BKID0000533

बँक ऑफ इंडिया,पुणे.


●google pay - 8888858850

No comments:





संगीत आणि साहित्य :