गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, May 22, 2013

आळवणी...



 
पृथ्वीला लागल्या
आलिंगन कळा
घेऊन ये ना रे
घन घन माळा
 
वेदनेलाला येई
उदयास्ताचे रंग
रोजची दुपार
पेटविते अंग
 
पशु पक्षी सारे
लाहा लाहा करी
बरसव आता
सरीवर सरी
 
वैराण वावरे
निष्पर्ण खराटे
घेई जगण्याशी
रोज रोज खेटॆ
 
कधी नव्हे अशी
तापून निघाली
दोन थेंबांसाठी
काया आसुसली
 
पिण्यासाठी नसे
चुल्लूभरपाणी
मरणही करी
त्याची आळवणी
 
देहा फुटे झरा
पाणी शोधताना
कोसकोस घाव
वेगाने घेताना
 
डोळ्यावर दाटे
कारुण्याचे धुके
जनावरांचेही
हंबरणे मुके
 
ओढाळ हा वारा
उदास होउनी
उन्हाच्या कुशीला
मारतो ढोसणी
 
काळ्या धरतीची
भेगाळली काया
लवकर येई
तिजला झाकाया
 
सुधाकर कदम
..२०१३

Sunday, May 12, 2013

दस्त-ऐवज



 
 तुम्ही उघडले आहे
दस्तऐव
नोंदणी कार्यालय
(दस्तऐवज म्हंजे काय रे भौ ?)
पुंगळ्या करून
जमा करण्यासाठी
जे कोणालाच नंतर दिसत नाही,
(म्हणजे तो एक इतिहास झाला तर !)
या ऐतिहासिक नोंदींना
दस्तऐवज म्हणावे की दस्तावेज ?
आम्ही गावंढळ,
अशुद्ध बोलणारे,लिहिणारे
तुम्ही मात्र कार्यालयीन
ग्रांथिक भाषा बोलणारे,सुसंस्कृत
(’भैय्या ! दुधमे पानी कम मिसळोनावाले…!)
म्हणून विचारले !
 
आम्ही धटींगण
(’अबे,दुधात पानी मिसळतं का बे भडव्या…!’)
असा दम देणारे
उद्धट…! असंस्कृत…!
म्हणून सांगतो,
आम्हाला अर्थ कळो वा नाकळो...
कृपया
आमचा इतिहास बदलण्याच प्रयत्न
करू नकानाही तर,
आमचे दस्ततुमचा ऐवज
निकामी केल्याशिवाय
राहणार नाही…!
 
सुधाकर कदम
..२०१३

Wednesday, May 8, 2013

याचा संग धरो नये…



 
गाढवाशी मैत्री
लाथांचा सुकाळ
सदा सर्वकाळ
चालतसे...
 
किती गूळ चारा
फरक ना पडे
चवीचे वाकडे
जन्मभरी...
 
हिरव्या कुरणी
जोमात चरोनि
झाडतो दुगाणी
धन्यावरी...
 
कितीही शिकवा
’गमभन’ त्याला
गावंढळ मेला
समजे ना...
 
भींतीच्या कडेला
राहोनिया उभा
धरो पाहे गाभा
सावलीचा...
 
स्थितप्रज्ञाचीच
लक्षणे दिसती
परी ना मानती
योगी त्याला...
 
पाजळोनि बुद्धी
असे अर्धवट
सांगती अचाट
तत्वज्ञान…
 
’सुधा’ म्हणे उगि
बेगडाचा रंग
गाढवाचा संग
धरो नये…
 
सुधाकर कदम

Monday, April 29, 2013

दूर गेल्या फुलांतल्या वाटा...


                                                   
                                                       गायिका-वैशाली माडे
                                                       गझलकार-दिलीप पांढरपट्टे
                                                       संगीत-सुधाकर कदम
                                                       अल्बम-काट्यांची मखमल
                                                       (युनिव्हर्सल म्युझिक कंपनी) 

Tuesday, April 23, 2013

चैत्रपालवी...



रुणुझुणु वारा 
अस्पष्टसा स्पर्श 
हलकसं पीस
देहावरी...

रंगात रचना 
रचनेत रंग 
मन होई दंग 
पिशागत...

पावलांचे शब्द 
करी कानगोष्टी 
रस्ता पाठी पोटी 
घेवोनिया...

भिर भिर भिरी
मनाची पाकोळी
गुलाबी झळाळी
चढवोनि...

विचाराची चाले
भरती ओहोटी
मारोनिया मिठी
किनार्‍याला...

थरथरणारी
मखमली रेघ
हिरवा परीघ
आखतसे...

जिवंत नक्षीची
अनंत पाऊले
दुडुदुडु चाले
मूकपणे...

खट्याळ वार्‍याचा 
अवखळपणा 
करतो बटांना
सैरभैर...

ओलेत्या खुणांची 
आठवण जुनी
येई कोसळोनि
एकाएकी...

रिमझिमणारी
चैत्राची पालवी
हळूच खुणावी
वैशाखाला...

सुधाकर कदम
२१.४.२०१३








संगीत आणि साहित्य :