Wednesday, May 8, 2013
याचा संग धरो नये…
गाढवाशी मैत्री
लाथांचा सुकाळ
सदा सर्वकाळ
चालतसे...
किती गूळ चारा
फरक ना पडे
चवीचे वाकडे
जन्मभरी...
हिरव्या कुरणी
जोमात चरोनि
झाडतो दुगाणी
धन्यावरी...
कितीही शिकवा
’गमभन’ त्याला
गावंढळ मेला
समजे ना...
भींतीच्या कडेला
राहोनिया उभा
धरो पाहे गाभा
सावलीचा...
स्थितप्रज्ञाचीच
लक्षणे दिसती
परी ना मानती
योगी त्याला...
पाजळोनि बुद्धी
असे अर्धवट
सांगती अचाट
तत्वज्ञान…
’सुधा’ म्हणे उगि
बेगडाचा रंग
गाढवाचा संग
धरो नये…
सुधाकर कदम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment