गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, September 2, 2023

राग_रंग (लेखांक २२) दुर्गा...

स्त्रीलिंगी नाव असलेल्या 'कलावती','सरस्वती','बागेश्री', 'धनाश्री','मधुवंती','रागेश्री' 'सावनी','भैरवी' अशापैकीच एक राग 'दुर्गा'! नाव जरी स्त्रीलिंगी असले तरी ह्या रागांना 'ही' राग न म्हणता 'हा' राग असे पुल्लिंगीच संबोधल्या जाते.ही पण एक गंमत आहे. हा राग बिलावल थाटातून निर्माण झालेला मधुर राग आहे.बिलावल थाटाने भारतीय शास्त्रीय संगीताला मोहून टाकणारे खूप राग बहाल केले आहेत.त्यातीलच अतिशय साधा,सोपा पण गोड असा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ‘दुर्गा’ हा राग आहे. बिलावल थाटाचे पूर्वीचे ग्रंथातील नांव, ‘धीरशंकराभरण’ हेआहे. या थाटातून बावीस रागांची निर्मिती होते, असे ग्रंथकार सांगतात. रात्री गायल्या जाणाऱ्या रागातील लोकांना आवडणारा, मधुर वाटणारा हा राग आहे. या रागाची प्रकृती गंभीर म्हणता येणार नाही, किंवा चंचल म्हणता येणार नाही. कर्नाटक संगीतातील ‘शुद्ध सावेरी’ या रागाशी साधर्म्य सांगणारा हा राग, मात्र दोन्ही रागांचे चलन वेगळे आहे. कर्नाटक संगीतातून जरी हा राग आला असला, तरी उत्तर हिंदुस्थानी संगीतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे.खरे म्हणजे संगीताच्या शैली जरी भिन्न असल्या तरी भेद केवळ दोनच असते. ते म्हणजे,चांगले वा वाईट.म्हणून शैलींमुळे नाही तर खास विशेष गुणांनी कलांना महान बनविल्या जाते असे म्हटले तर वावगे होणार नाही. संगीताचा मुख्य आधार नाद आहे.ज्याला मनुष्य आपल्या कंठाद्वारे व विविध वाद्यांद्वारे उत्पन्न करतो.या नादाचे नियम काही सिद्धांतानुसार करण्यात आले असून, या सिंद्धांताच्या आधारावर संगीतातील सात स्वरांची निश्चिती करण्यात आली आहे.आणि तेच संगीत कलेचा प्राण आहे.संगीताचे मुख्य माध्यम स्वर आणि लय हे आहे.हे माध्यम अतिशय आंतरिक आहे.आपणाला यास बाहेरून एकत्र करायची गरज पडत नाही.तसेच संगीतामध्ये दोन अशा विशेषता आहे,की ज्या दुसर्‌या कोणत्याच कलांमध्ये नाहीत.त्यातील एक आहे ’काकु’.काकु हा शब्द ’के’ धातुपासून उत्पन्न झाला आहे.ज्याचा अर्थ आहे ’लोकोपतापयोः...’ म्हणजे ध्वनीची हृदयापासून निघणारे सुक्ष्मभाव व्यक्त करण्याची क्षमता...! ही शक्ती किंवा क्षमता फक्त ध्वनी किंवा स्वरातच आहे,शब्दात नाही.दुसरी विशेषता ही आहे,की ध्वनीमध्ये कर्षण (ताणणे)गूण आहे.याला आपण कितीही मात्रांपर्यंत ओढू (ताणू) शकतो.शब्दाला जर जास्ती ओढ दिली तर शब्दत्वाची हानी होऊन त्याचे ध्वनीत परिवर्तन होते.या दोन विशेषत्वामुळे संगीतामध्ये जी सुक्ष्म भाव व्यक्त करण्याची शक्ती येते ती अन्य कोणत्याच कलांमध्ये नाही.स्वरांमध्ये जो सलगपणा (Immediacy) आहे तो अन्य कोणत्याच माध्यमात नाही.शब्दाच्या भावाभिव्यक्तित अडथळा येऊ शकतो परंतू स्वरांच्या भावामध्ये तो येत नाही.ही एक सरळ भाषा आहे.जिचा उपयोग पशु-पक्षी सुद्धा करतात.ध्वनीचे वैशिष्ठ्य म्हणजे ती एका हृदयातून निघते आणि दुसर्‌या हृदयात पोहोचते..शब्दांना समजणे कठीण जाऊ शकते पण स्वर म्हणजे मानवाची मातृभाषा आहे.त्याची अभिव्यक्ती हृदयातून होते आणि त्यामुळेच या भाषेने पशु-पक्षी सुद्धा प्रभावित होतात..असो! दुर्गा रागात गांधार व निषाद वर्ज असल्यामुळे याची जाती औडव औडव आहे.यात सर्व स्वर शुद्ध आहेत.वादी स्वर धैवत असून संवादी स्वर रिषभ आहे.गानसमयरात्रीचा पहिला प्रहर. हा पूर्वांगप्रधान राग आहे.संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक-वादक अत्यंत सोप्या अशा या रागातून काय अप्रतिम चित्र उभे करतात,ते त्यांच्या गायन,वादनातून दिसून येते.या रागातली 'गावत दुर्गा रागिनी’ हे पं. शंकरराव व्यास, यांनी रचलेले लक्षणगीत व "सखी मोरी रुमझुम...' ही प्रसिद्ध बंदिश शास्त्रीय संगीताच्या रसिकांनी नक्कीच ऐकली असेल.सा रे म प ध सा इतक्याच स्वरात रंगणाऱ्या या रागात विविध स्वरांच्या मुर्छना केल्या तर वेगवेगळे राग आपणास दिसून येतात.जसे:- धैवताला षड्ज मानून दुर्गा रागाचे स्वर घेतले असता 'मालकौंस', रिषभाला षड्ज केल्यास 'धानी', मध्यमाला षड्ज केल्यास 'भूप', पंचमाला षड्ज केल्यास 'मधमाद सारंग'! विभिन्न स्वरांपासून आरंभ होणाऱ्या सप्तकाच्या क्रमशः आरोहावरोहाला 'मुर्छना' असे म्हणतात.संगीतातील 'ग्राम' ही संकल्पना मुर्छना पद्धतीचा आधार आहे. या रागात चित्रपट किंवा इतर गीते फारशी नाहीत.पण जी काही आहेत ती श्रवणीय आहे.तसे पाहिले तर शास्त्रीय संगीत व चित्रपट संगीताचा उद्देश केवळ मनोरंजन असल्याचे दिसून येते.फरक इतकाच की शास्त्रीय संगीत कठीण नियमाच्या साखळीत बांधून रसिकांसमोर येते.या उलट चित्रपट संगीत हलक्या-फुलक्या पद्धतीने आणि चित्रीकरणासह लोकांसमोर आल्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते व लोकप्रिय होते.जरी चित्रपटातील गाण्यांचा शास्त्रीय संगीत हा बेस असला तरी मनोरंजनाच्या शर्यतीमध्ये शास्त्रीय संगीत चित्रपट संगीताच्या मानाने मागेच राहते.म्हणजेच फक्त श्राव्यपेक्षा दृक माध्यमांद्वारे संगीत आबाल-वृद्धांच्या अंतर्मनापर्यंत थेटपणे पोहोचते असे बर्नार्ड शा (१९२५ चे नोबेल पुरस्कार साहित्य विजेता महान नाटककार व कुशल राजनीतिज्ञ मानवतावादी व्यक्तित्व), हर्बर्ट रीड (एक इंग्रजी कला इतिहासकार, कवि, साहित्यिक आलोचक आणि दार्शनिक होते),प्लेटो (प्रसिद्ध दार्शनिक) या पाश्चात्य तज्ज्ञांचे म्हणणे बरोबर आहे असे वाटते. दुर्गा राग बहुतेक आजी,माजी कलाकारांनी गायीला व आपापल्या वाद्यांवर अतिशय सुंदर रीतीने सादर केला आहे.याचे सर्व व्हीडिओ युट्युबवर असल्यामुळे आपण बघू शकता. ● चित्रपट गीते... 'ऐ बादे सबा आहिस्ता चल' हेमंत कुमार.चित्रपट-अनारकली.संगीत-सी.रामचंद्र (१९५३). 'ओ दूर के मुसफिर हमको भी साथ ले ले रे' रफी. चित्रपट-उडन खटोला. संगीत-नौशाद (१९५५). 'वृन्दावन का कृष्ण कन्हैया सबकी आंखों का तारा' चित्रपट-मिस मेरी.संगीत-हेमंत कुमार (१९५७). 'चंदा रे मोरी पतीया ले जा' लता,मुकेश.चित्रपट-बंजारन. संगीत-परदेसी (१९६०). 'गीत गाया पत्थरोंने' आशा भोसले,किशोरी आमोणकर,महेंद्र कपूर. चित्रपट-गीत गाया पत्थरोंने.संगीत-रामलाल हिरापन्ना (१९६४). 'जानेवाले ओ मेरे प्राण तेरी खुशी है मेरी बहार' आशा भोसले.चित्रपट-गीत गाया पत्थरोंने.संगीत-रामलाल हिरापन्ना (१९६४) 'हम ईंतजार कंटेंगे तेरा कयामत तक' रफी,आशा.चित्रपट-बहू बेगम.संगीत-रोशन (१९६७). 'सावन का महिना पवन करे सोर'लता,मुकेश. चित्रपट-मिलन.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल.(१९६७). 'जीवन से ना हार जीनेवाले' गायक,संगीतकार-किशोर कुमार.चित्रपट-दूर का राही (१९७१). 'कहां तक ये मन को अंधेरे छलेंगे' किशोर कुमार.चित्रपट. बातों बातों में.संगीत-राजेश रोशन (१९७९). 'तू इस तरहा से मेरी जिंदगी में शामिल है' मनहर उधास. चित्रपट-आप ऐसे तो न थे.संगीत-उषा खन्ना (१९८०) ●हिंदी... 'हे राम हे राम' भजन-जगजीत सिंग. 'देवी भजो दुर्गा' भजन-मीता पंडित. 'जय जय जय दुर्गे मां भवानी' गायक-डॉ.रामगोपाल त्रिपाठी. ●मराठी... 'कर हा करी धरीला शुभांगी' संगीत नाटक 'संशय कल्लोळ'. 'चंद्रिका ही जणू' संगीत नाटक 'मानापमान'. 'या लता शिकविती गीत' संगीत नाटक 'धाडिला राम तिने का वनी' गायक- नारायणराव बोडस. 'केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा' -सुमन कल्याणपूर. 'पायो जी मैंने राम रतन धन पायो' 'केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली' आशा.सुरेश भट, हृदयनाथ मंगेशकर. --------------------------------------------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी, रविवार दि.३ सप्टेंबर २०२३.

काट्यांची मखमल..

नुसत्याच तुझ्या हसण्याने...

Monday, August 28, 2023

राग-रंग...(लेखांक २१) भीमपलासी.

भीमपलासी म्हटलं की शिकत असतानाची अर्थ न कळणारी चीज आठवते. "जा s जा s रे s अ प ने s मं s दि र वा s सु न पा s वे s गी s सा s स न न दि या" जे संगीत शिकले नाही त्यांनी याचा अर्थ सांगावा. किंवा शिकले असतील तर ज्या वयात शिकले त्या वयात त्यांना या चिजेचा अर्थ कळला होता काय? हे सांगावे! खरे म्हणजे भीमपलासी हा अतिशय मधुर आणि कर्णप्रिय राग आहे.त्यात चीज पण तशीच सोपी आणि समजणारी असली तर शिकतांना सुद्धा विद्यार्थी एकरूप होऊन शिकू शकतात.शब्दार्थच कळला नाही तर त्यांचा फक्त 'पोपट' होतो.या पोपटपणातून निघायला त्याला बराच काळ लागतो.काही विद्यार्थी तर अशा रटाळपणाला कंटाळून पालकांची इच्छा असूनही संगीत शिकणे सोडून देत असलेले मी पाहिले.यावर गंभीरपणे विचार व्हायला हवा.पण तो होत नाही.सदारंग (मूळ नाव नियामत खान) हे मुहम्मदशाह यांच्या दरबारात गायक होते.मुहम्मदशाह यांना खुश करण्यासाठी त्यांचे नाव टाकून ख्याल पण रचत होते.'मोहमदशा रंगीले रे' ही चीज बहुतेकांना माहीतच असेल.मुहम्मदशाहला खुश करण्यासाठी रचलेली वरील चीज माझ्या दृष्टीने छचोर आहे.थोडी समज आल्यावर या चिजेचा मला कळलेला अर्थ असा आहे. तू (म्हणजे जो कोणी असेल तो,भलत्या वेळी तिच्याकडे आल्यामुळे लग्न झालेली स्त्री म्हणते आहे) तुझ्या घरी निघून जा.तुझे येणे माझ्या सासू,सुनेला कळले तर? आणि अंतऱ्याचा तर धृवपदशी काहीच संबंध नाही.तो पण बघा:- "सुन हो सदारंग तुमको चाहत है क्या तुम हमको छगन दिया" काही गायक "छगन दिया" ऐवजी "छलन किया" असेही गाताना दिसतात.खरे म्हणजे नवाबाने रागावून सदारंगाला दरबारातून काढून टाकल्यावर त्याची मनधरणी करण्यासाठी शिष्यांकरवी अशा बंदिशी मुहम्मदशाह पर्यंत पोहवून त्यांनी पुनश्च कृपा करून दरबारात घ्यावे म्हणून रचलेल्या आहेत. त्याच पिढ्या न पिढ्या गाणे सुरू आहे.दुसरी ओळ "क्यों तुम हमको छोड दिया" अशी सरळ सरळ असायला हवी.किंवा असेलही.पण जिथे सदारंगचा उच्चार सदारौंग केल्या जातो तिथे शुद्ध स्वरूपातील काव्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे.ते काहीही असले तरी राग मात्र गोड आहे.तसेच चिजेची बंदिश सुदधा.सदारंग मला संगीतकार म्हणून पटतो.असो! हा गोड असा राग काफी थाटातून उत्पन्न झाला असून,शास्त्रानुसार गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर आहे.पण 'भीमपलासी राग केव्हाही गायिल्या गेला तरी तो गोडच वाटतो' असे कुमार गंधर्व म्हणतात.यातील कोमल गांधार व कोमल निषाद स्वरांमुळे त्याचे सौंदर्य अधिक वाढते. आरोहात रिषभ,धैवत वर्ज आहे.अवरोहात सातही स्वर आहेत.पण त्यातील रिषभ आणि धैवतावर जोर देऊन विश्रांती (ठहराव) घेता येत नाही.धैवताला पंचमाचा कण व रिषभाला षड्जाचा कण लावल्याने रागाची शोभा वाढते.हा पूर्वांग प्रधान राग असून तीनही सप्तकात याचा विस्तार होतो.काहींच्या मते हा गंभीर प्रवृत्तीचा आहे तर काहींच्या मते यात शृंगार व भक्तिरस ठासून भरलेला आहे.पण माझ्या मते या परस्पर विधानांना काहीच अर्थ नाही. काव्यानुरूप बंदिश बांधण्याची कुशलता असेल तर सगळे रस याच नव्हे तर सगळ्याच रागात दाखविता येतात.याच्या अवरोहातील रिषभ,धैवत वर्ज केले तर धानी नावाचा राग होतो.काही गायक धानीमध्ये रिषभाचा प्रयोग करतात. त्यामुळे धानी गाताना सावधगिरी बाळगावी लागते. तसा तर धानी राग म्हणजे पहाडी, पिलू,मांड प्रमाणे क्षुद्र समजल्या जाणारी लोकधूनच आहे.त्यामुळे यात ख्याल वगैरे प्रकार दिसत नाही.'भीम' नावाचा पण एक राग होता असे म्हणतात.आजचा 'गावती' म्हणजेच भीम राग हा ही एक प्रवाद आहे.तसेच 'मगध आणि वऱ्हाड प्रांताचे प्राचीन नाव 'पलासी' होते त्यावरून पलासी नाव आले असावे' असे पं. भातखंडे म्हणतात.भीम व पलासी मिळून भीमपलासी राग तयार झाला असेही काहींचे मत आहे.ते काहीही असले तरी दिगग्ज गायकांपासून तर नवोदित गायकांना या रागाने भुरळ पाडली आहे.बहुतेक गायकाने हा राग मैफलीत सादर करून रंगविला आहे.उस्ताद अमीर खान आणि किशोरी अमोणकारांचा भीमपलासी आगळा वेगळा आहे.'रे बिरहा' आणि 'रंग सो रंग मिलाय' अप्रतिमच.भीमपलासी मधील 'बिरज में धूम मचाये शाम' ही चीज लोकप्रिय असूनअनेक गायकांनी गायिली आहे. ● भीमपलासी रागावर आधारित चित्रपट गीते... 'तुम्ही ने मुझको प्रेम सिखाया' सुरेंद्र बिब्बो. चित्रपट-मनमोहन.(१९३६). 'बीना मधुर मधुर कचछू बोल' सरस्वती राणे.चित्रपट-राम राज्य.(१९४३). तुम्हे याद करते करते' लता.चित्रपट-आम्रपाली.(१९४५) 'अफसाना लिख रही हूँ' उमा देवी (टुन टुन). चित्रपट-दर्द.(१९४७). 'मन मोर हुवा मतवाला' सुरेय्या.चित्रपट-अफसर.(१९४८). 'आज मेरे मन सखी बांसुरी बजाये कोई' लता. चित्रपट-आन.(१९५२). 'ए री मैं तो प्रेम दिवानी' लता.चित्रपट-नौबहार.(१९५२). 'दुनिया से जी घबरा गया' लता,तलत महमूद. चित्रपट-लैला मजनू.(१९५३). 'ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया' लता.चित्रपट-अनारकली.(१९५३). 'ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता' सुरेय्या. चित्रपट-मिर्झा गालिब.(१९५४). 'तेरे सदके बलमा' लता.चित्रपट-अमर.(१९५४). 'मेरे मन का बावरा पंछी' लता.चित्रपट-अमरदीप.(२९५८). 'मैं गरीबों का दिल' हेमंत कुमार.चित्रपट-आबे हयात.(१९५५). 'मैं ने चांद और सितारों की रफी' रफी.चित्रपट-चंद्रकांता.(१९५६). 'आ निले गगन तले प्यार' लता,हेमंत कुमार.चित्रपट-बादशाह (१९५६). 'निर्दई प्रीतम' लता.चित्रपट-स्त्री.(१९६१). 'प्रभू तेरो नाम' लता.चित्रपट-हम दोनो.(१९६३) 'झनकार पायल की तो से बिनती करे' आशा भोसले. चित्रपट-नाग देवता.(१९६२). 'चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो' महेंद्र कपूर.चित्रपट-गुमराह.(१९६३) 'मासुम चेहरा' लता,रफी.चित्रपट-दिल तेरा दिवाना.(१९६३) 'ओ बेकरार दिल' लता,हेमंत कुमार.चित्रपट-कोहरा.(१९६४). 'नगमा ओ शेर की सौगात' लता.चित्रपट-गझल.(१९६४). 'कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं' लता मंगेशकर.चित्रपट-अनुपमा.(१९६६) 'नैनो में बदरा छाये बिजली सी चमके हाये' लता.चित्रपट-मेरा साया.( १९६६). 'खिलते हैं गुल यहां खिल के बिखरने को' किशोर कुमार.चित्रपट-शर्मिली.(१९७१) 'है फूल मेरे गुलशन का' माला.चित्रपट-है फूल मेरे गुलशन का.(पाकिस्तानी चित्रपट (१९७४) 'प्यार भरे दो शर्मिले नैन' मेहदी हसन.चित्रपट-चाहत.(पाकिस्तान १९७४) 'गोरी तेरा गांव बडा प्यारा' येसुदास. चित्रपट-चितचोर.(१९७६). 'दिल में तुझे बिठा के' लता.चित्रपट-फकीरा.(१९७६). 'ले तो आये हो हमे सपनो के गांव में' हेमलता.चित्रपट-दुल्हन वो ही जो पिया मन भाये.(१९७७) हमारी सांसों में आज तक वो हिना की खुशबू' नूरजहां.चित्रपट-मेरे हुजूर.(१९७७ पाकिस्तान). 'दिल के टुकडे टुकडे कर के मुस्कुराकर चल दिये' येसूदास.चित्रपट-दादा.(१९७९). 'तेरी खुशबू में बसे खत मै जलाता कैसे' जगजीत सिंग.चित्रपट-अर्थ.(१९८३) 'समय ओ धीरे चलो' आशा भोसले. चित्रपट-रूदाली.(१९९३) 'तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहीये' कुमार शानु,अलका याज्ञिक,चित्रा.चित्रपट-क्रिमिनल.(१९९४) 'तू चीज बडी है मस्त मस्त' कविता कृष्णमूर्ती,उदित नारायण. चित्रपट-मोहरा.(१९९४). 'तनहा तनहा यहां पे जीना' आशा भोसले.चित्रपट-रंगीला.(१९९५). 'शब्बा शब्बा हाये रब्बा' रानु मुखर्जी,सोनू निगम,नीरज व्होरा.चित्रपट-दौड.(१९९७). 'कहता है मेरा ये दिल' कविता कृष्णमूर्ती.चित्रपट-जीन्स.(१९९७). 'ऐ अजनबी तू भी कभी आवाज दे कहीं से' उदित नारायण.चित्रपट-दिल से.(१९९८). 'किस्मत से तुम हमको मिले हो' सोनू निगम,अनुराधा पौडवाल. चित्रपट-पुकार (२०००) 'मैं निकला गड्डी ले के' उदित नारायण.चित्रपट-गदर.(२००१). 'राधा कैसे ना जले' आशा भोसले,उदित नारायण.चित्रपट-लगान.(२००१) 'येली रे येली क्या है ये पहेली' अलका याज्ञिक,उदित नारायण,कविता कृष्णमूर्ती,हेमा सरदेसाई.चित्रपट-यादें.(२००१). 'खानाबदोश' मोहन.चित्रपट-लंडन ड्रीम्स.(२००९) ● नॉन फिल्मी...(उर्दू,हिंदी) 'कुछ दूर हमारे साथ चलो'-हरिहरन. 'हम तुम होंगे बादल होगा' -मसूद मलिक. 'दर्दे दिल दर्दे आशना जाने'-गुलाम अली. 'दम मस्त कलंदर मस्त मस्त' -नुसरत फतेह अली खान. 'पाणी दा रंग देख के' आयुषमान खुराणा,रोचक कोहली,अभिरुची सिंग. 'है चांद सितारों मे चमक तेरे बदन की' -अहमद हुसेन,महंमद हुसेन. 'ये आईने से अकेले में गुफ्तगू क्या है' -हरिहरन. 'जिंदगी में तो सभी प्यार किया करते है' गीत-मेहदी हसन. 'चुपके चुपके रात दिन आंसू बहाना' गझल-गुलाम अली. (भीमपलासीवर आधारित). 'तुम नहीं गम नहीं शराब नहीं' गझल-जगजीत सिंग. ● मराठी... 'दिलरुबा मधुर हा दिलाच' छोटा गंधर्व.नाटक-देवमाणूस.(१९४८). 'बालसागर तुम्ही वीर खरोखर' निलाक्षी जुवेकर. नाटक-सौभद्र. 'अवघाची संसार सुखाचा करीन'नाटक-कान्होपात्रा. 'स्वकुलतारक सुता' नाटक-स्वयंवर. 'प्रेमसेवा शरण' नाटक-मानापमान. 'दशरथा घे हे पायसदान' सुधीर फडके.गीत रामायण. 'इंद्रायणी काठी' पं. भीमसेन जोशी.चित्रपट-गुळाचा गणपती. 'सावधान होई वेड्या सावधान होई' पं.वसंतराव देशपांडे.चित्रपट-भोळी भाबडी. 'अमृताहुनी गोड नाम तुझे देव' .माणिक वर्मा.चित्रपट-संत नामदेव. 'तुला पाहते रे' आशा भोसले.चित्रपट-जगाच्या पाठीवर. 'तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे' सुधीर फडके. 'मधु मागशी माझ्या सख्या परी' लता. 'काटा रुते कुणाला' -पंडित जितेंद्र अभिषेकी. ● बिलियन व्ह्यूज असलेले shape of you हे ed shiron हिने गायिलेले पॉप गाणे भीमपलासी रागावर आधारित आहे. हे बहुतेकांना माहीत असणं शक्यच नाही. ------------------------------------------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी,रविवार दि.२७ ऑगस्ट २०२३. div class="separator" style="clear: both;">

आग़ाज़-ए-तरन्नुम...उर्दू ग़ज़ल महफिल.

Saturday, August 19, 2023

राग-रंग (लेखांक २०) 'हंसध्वनी'.

काही राग कानावर पडल्याबरोबर हृदयात घर करून जातात.त्यातीलच एक राग म्हणजे हंसध्वनी! हा मूळ दक्षिण भारतीय राग असून.याची निर्मिती मुथुस्वामी दिक्षितार यांचे वडील रामास्वामी दीक्षितार (१७३५-१८१७) यांनी केली असे म्हणतात.'वातापि गणपती भजे हम' ही तिकडील लोकप्रिय रचना आहे.या रागाला उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये आणण्याचे श्रेय भेंडीबाजार घराण्याचे गायक उस्ताद अमान अली खान (१८८८-१९५३) यांना जाते.त्यांचे आभार मानायला हवे.कारण आज हा राग उत्तर भारतीय रसिकांचा आवडता राग बनला आहे.'लागी लगन पती सती सन' ही चीज आणि बंदिश त्यांचीच असल्याचेही सांगितले जाते.उस्ताद अमीर खान एकदा मुंबईला गेले असता, ते अमान अली खान यांना भेटले.या भेटीत त्यांनी अमान अली खान यांची वरील बंदिश ऐकली.त्यांना खूप आवडली आणि त्यांनी मोठमोठ्या सभांमधून ख्याल आणि तराण्यासह गायला सुरवात केली.त्यांच्यामुळे हंसध्वनी इतका लोकप्रिय झाला की,उस्ताद राशीद खान(रामपूर),
किशोरी आमोणकर (जयपूर-अत्रौली),पं. ए.टी. कानन (किराणा),पं. अजय चक्रवर्ती (पतियाळा),परवीन सुलताना (पतियाळा) असे उत्तर भारतीय संगीतामधील विविध घराण्याचे प्रसिद्ध गायक  राग मैफिलीत गायला लागले.
       हंसध्वनीशी माझी पहिली भेट नवरंग चित्रपटातील  'रंग दे दे' या गीताने झाली.त्यावेळी मी १० वर्षांचा होतो.या गाण्याने मला वेड लावले होते.रस्त्याने चालताना रेडिओवर लागले तर पूर्ण गाणे ऐकल्याशिवाय पुढे पाय निघत नव्हता.या गाण्यापायी मी घरच्यांच्या व शिक्षकांच्या अनेकदा शिव्या खाल्ल्या आहेत.त्यावेळी हा हंसध्वनी राग आहे हे माहीत पण नव्हते.संगीताचे शिक्षण विशारद पर्यंत येऊन पोहोचल्यानंतर जसे कान फुटले तसे नवनवीन रागांची झाडाझडती सुरू झाली.तेव्हा कळले की हा हंसध्वनी आहे...त्यानंतर वेड लावले ते पंडित जसराजजींच्या 'पवन पूत हनुमान' या हंसध्वनीच्या बंदीशीने.अचानक रेडिओवर ऐकली नि 'सुध-बुध खोना' काय असते ते अनुभवले. या चीजेसाठी मी पैसे जमवून ग्रामोफोन घेतला.एल.पी.रेकॉर्ड आणली आणि पारायण सुरू केले.माझ्या अनेक कार्यक्रमातून ही बंदिश मी गायिलो आहे. माहुरचे राजे मधुकरराव उपाख्य बाबुरावजी देशमुख जसराजजींचे चाहते होते.तसेच माझ्यावरही खूप प्रेम करायचे.त्यांच्या वाड्यात झालेल्या बहुतेक मैफलीत ते मला ही चीज गायला लावायचे.यवतमाळच्या नेहरू युवक केंद्राच्या संगीत विभागासाठी १९७६ मध्ये एक वाद्यवृंद रचना केली होती.या वाद्यवृंदामध्ये सतार, सारंगी,बासरी,व्हायोलिन, हार्मोनियम आणि तबला ही वाद्ये होती. आणि आर्णी (जि. यवतमाळ) येथे संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर अनेक सांगीतिक उपक्रम राबविले.त्यात 'गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना' आणि त्यातील विद्यार्थ्यांचा 'वाद्यवृंद', ह्या दोन्हीसाठी केलेल्या  दोन  वेगवेगळ्या धून (compositions) हंसध्वनी रागावर आधारित होत्या.यात/व्हायोलिन,बासरी, हार्मोनियम,
मेंडोलीन,स्वरमंडळ, जलतरंग आणि तबला अशी वाद्ये होती.(सरोद मी स्वतः वाजवायचो.) यात इयत्ता पाच ते सातचे शालेय विद्यार्थी असल्यामुळे या उपक्रमाचे खूप कौतुक झाले होते.
      उस्ताद अमीर खान यांनी गायिलेली झपतालातील'जय माता विलंब तज दे','सुब्बूलक्ष्मी (वातापि गणपती भजे हम.कर्नाटक),'किशोरी आमोणकारांची 'गणपत विघन हरन', वगैरेंसह पं. रविशंकर (सतार),उस्ताद अमजद अली खान (सरोद),पं.हरिप्रसाद चौरसिया (बासरी),'रघुनाथ सेठ (बासरी(,पं. शिवकुमार शर्मा (संतूर),उस्ताद राशीद खान,उस्ताद दिलशाद खान,परवीन सुलताना,वीणा सहस्रबुद्धे,पं. छन्नुलाल मिश्रा (दुर्गा स्तुती),उस्ताद शाहिद परवेज (यांनी सितारवर वाजवलेली एकतालातील गत अप्रतिम आहे.),पं.अजय चक्रवर्ती,पं.विश्वमोहन भट (मोहन वीणा),पं. राजन साजन मिश्र,अश्विनी भिडे देशपांडे, कौशिकी चक्रवर्ती,जयतीर्थ मेउंडी,राकेश चौरसिया (बासरी),एन.राजम आणि टी.इन.कृष्णन यांची व्हायोलिन जुगलबंदी,( ऐकण्यासारखी आहे.),ज्योत्स्ना श्रीकांत (कर्नाटक),अदनान खान (सतार),'हार्मनी' (वादक-राकेश चौरसिया,रूपक कुलकर्णी,सुनील दास,उल्हास बापट,मधु धुमाळ,संभाजी धुमाळ),परवीन गोडखिंडी (बासरी),तथागत मिश्रा (इसराज),संजीव अभ्यंकर,सिद्धार्थ मिश्रा हा सगळा अनमोल ऐवज अभ्यासकांसाठी युट्युबवर उपलब्ध आहे. या रागात हिंदी इतकीच मराठी गाणी आहेत हे विशेष.
●चित्रपट गीते...
'कजरारी मदभरी अखियां' राजकुमारी. संगीत-रोशन. चित्रपट-नौबहार (१९५२).
'जा तोंसे नहीं बोलू कन्हैया' लता,मन्ना डे.संगीत-सलील चौधरी.चित्रपट-परिवार (१९५६).
'सखी री सुन बोले पपिहा उस पार' लता,आशा.संगीत-हेमंत कुमार. चित्रपट-मिस मेरी (१९५७). 'ओ चांद जहां वो जाये' लता,आशा.संगीत-सी.रामचंद्र.चित्रपट-शारदा (१९५७).
'रंग दे दे' आशा,मन्ना डे. संगीत-सी.रामचंद्र.चित्रपट-नवरंग (१९५९). 'लागी लगन पती सखी सन' पं. ए.टी. कानन.बंगाली चित्रपट-मेघ ढाका तारा (१९६०) 'जा रे बदरा बैरी जा' लता.संगीत-मदन मोहन.चित्रपट-बहाना (१९६०) 'लै जा रे बदरा' संजीव अभ्यंकर.चित्रपट-दिल पे मत ले यार (२०००) 'तेरे नैना हस दिये' शंकर महादेवन,श्रेया घोषाल.संगीत-शंकर महादेवन,एहसान नुरानी,लॉय मेंडोंसा.चित्रपट-चांदनी चौक टू चायना (२००९)
● नॉन फिल्मी...
'करम की गत न्यारी' लता.संगीत-हृदयनाथ मंगेशकर.अल्बम-चाला वाही देस (मीरा भजन).
'जय जय गणपती देवा' भक्तीगीत.गायक-कार्तिक रमण.
काव्य आणि संगीत-रामाश्रय झा. 'होरी खेले महादेव' गायक-जयतीर्थ मेउंडी. शब्द/संगीत-राकेश त्रिपाठी.
'गणेश वंदना'(कर्नाटक पद्धती) गायक-विश्वेश भट.
●मराठी...
'अखेरचा हा तुला दंडवत' लता. संगीत-आनंदघन.
चित्रपट-मराठा तितुका मिळवावा. (१९६४). 'शूर अम्ही सरदार' हृदयनाथ मंगेशकर.संगीत-आनंदघन.चित्रपट
-मराठा तितुका मिळवावा (१९६४). 'अग नाच नाच नाच राधे उडवू या रंग' सुरेश वाडकर,उत्तरा केळकर.
संगीत-विश्वनाथ मोरे.चित्रपट-गोंधळात गोंधळ (१९६८).
'जागे व्हा मुनिराज' आशा भोसले.संगीत-प्रभाकर जोग.
चित्रपट-दाम करी काम (१९७१). 'आली हासत पहिली रात' लता.संगीत-वसंत प्रभू.चित्रपट-शिकलेली बायको (१९८१)
'चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले' आशा भोसले. संगीत-हृदयनाथ मंगेशकर.(१९६५) 'जयोस्तुते' गायक-
मंगेशकर भावंडं.संगीत-मधुकर गोळवलकर.अल्बम-जय जय महाराष्ट्र माझा. 'आस आहे अंतरी या' सुमन कल्याणपूर.अल्बम-जुळल्या सुरेल तारा (१९९०) हंसध्वनीवर आधारित.'युवती मना दारुण रण' नाटक-संगीत मानापमान.




 





संगीत आणि साहित्य :