Monday, August 28, 2023
राग-रंग...(लेखांक २१) भीमपलासी.
भीमपलासी म्हटलं की शिकत असतानाची अर्थ न कळणारी चीज आठवते.
"जा s जा s रे s अ प ने s मं s दि र वा s सु न
पा s वे s गी s सा s स न न दि या"
जे संगीत शिकले नाही त्यांनी याचा अर्थ सांगावा. किंवा शिकले असतील तर ज्या वयात शिकले त्या वयात त्यांना या चिजेचा अर्थ कळला होता काय? हे सांगावे! खरे म्हणजे भीमपलासी हा अतिशय मधुर आणि कर्णप्रिय राग आहे.त्यात चीज पण तशीच सोपी आणि समजणारी असली तर शिकतांना सुद्धा विद्यार्थी एकरूप होऊन शिकू शकतात.शब्दार्थच कळला नाही तर त्यांचा फक्त 'पोपट' होतो.या पोपटपणातून निघायला त्याला बराच काळ लागतो.काही विद्यार्थी तर अशा रटाळपणाला कंटाळून पालकांची इच्छा असूनही संगीत शिकणे सोडून देत असलेले मी पाहिले.यावर गंभीरपणे विचार व्हायला हवा.पण तो होत नाही.सदारंग (मूळ नाव नियामत खान) हे मुहम्मदशाह यांच्या दरबारात गायक होते.मुहम्मदशाह यांना खुश करण्यासाठी त्यांचे नाव टाकून ख्याल पण रचत होते.'मोहमदशा रंगीले रे' ही चीज बहुतेकांना माहीतच असेल.मुहम्मदशाहला खुश करण्यासाठी रचलेली वरील चीज माझ्या दृष्टीने छचोर आहे.थोडी समज आल्यावर या चिजेचा मला कळलेला अर्थ असा आहे. तू (म्हणजे जो कोणी असेल तो,भलत्या वेळी तिच्याकडे आल्यामुळे लग्न झालेली स्त्री म्हणते आहे) तुझ्या घरी निघून जा.तुझे येणे माझ्या सासू,सुनेला कळले तर? आणि अंतऱ्याचा तर धृवपदशी काहीच संबंध नाही.तो पण बघा:-
"सुन हो सदारंग तुमको चाहत है
क्या तुम हमको छगन दिया"
काही गायक "छगन दिया" ऐवजी "छलन किया" असेही गाताना दिसतात.खरे म्हणजे नवाबाने रागावून सदारंगाला दरबारातून काढून टाकल्यावर त्याची मनधरणी करण्यासाठी शिष्यांकरवी अशा बंदिशी मुहम्मदशाह पर्यंत पोहवून त्यांनी पुनश्च कृपा करून दरबारात घ्यावे म्हणून रचलेल्या आहेत. त्याच पिढ्या न पिढ्या गाणे सुरू आहे.दुसरी ओळ "क्यों तुम हमको छोड दिया" अशी सरळ सरळ असायला हवी.किंवा असेलही.पण जिथे सदारंगचा उच्चार सदारौंग केल्या जातो तिथे शुद्ध स्वरूपातील काव्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे.ते काहीही असले तरी राग मात्र गोड आहे.तसेच चिजेची बंदिश सुदधा.सदारंग मला संगीतकार म्हणून पटतो.असो!
हा गोड असा राग काफी थाटातून उत्पन्न झाला असून,शास्त्रानुसार गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर आहे.पण 'भीमपलासी राग केव्हाही गायिल्या गेला तरी तो गोडच वाटतो' असे कुमार गंधर्व म्हणतात.यातील कोमल गांधार व कोमल निषाद स्वरांमुळे त्याचे सौंदर्य अधिक वाढते. आरोहात रिषभ,धैवत वर्ज आहे.अवरोहात सातही स्वर आहेत.पण त्यातील रिषभ आणि धैवतावर जोर देऊन विश्रांती (ठहराव) घेता येत नाही.धैवताला पंचमाचा कण व रिषभाला षड्जाचा कण लावल्याने रागाची शोभा वाढते.हा पूर्वांग प्रधान राग असून तीनही सप्तकात याचा विस्तार होतो.काहींच्या मते हा गंभीर प्रवृत्तीचा आहे तर काहींच्या मते यात शृंगार व भक्तिरस ठासून भरलेला आहे.पण माझ्या मते या परस्पर विधानांना काहीच अर्थ नाही. काव्यानुरूप बंदिश बांधण्याची कुशलता असेल तर सगळे रस याच नव्हे तर सगळ्याच रागात दाखविता येतात.याच्या अवरोहातील रिषभ,धैवत वर्ज केले तर धानी नावाचा राग होतो.काही गायक धानीमध्ये रिषभाचा प्रयोग करतात. त्यामुळे धानी गाताना सावधगिरी बाळगावी लागते. तसा तर धानी राग म्हणजे पहाडी, पिलू,मांड प्रमाणे क्षुद्र समजल्या जाणारी लोकधूनच आहे.त्यामुळे यात ख्याल वगैरे प्रकार दिसत नाही.'भीम' नावाचा पण एक राग होता असे म्हणतात.आजचा 'गावती' म्हणजेच भीम राग हा ही एक प्रवाद आहे.तसेच 'मगध आणि वऱ्हाड प्रांताचे प्राचीन नाव 'पलासी' होते त्यावरून पलासी नाव आले असावे' असे पं. भातखंडे म्हणतात.भीम व पलासी मिळून भीमपलासी राग तयार झाला असेही काहींचे मत आहे.ते काहीही असले तरी दिगग्ज गायकांपासून तर नवोदित गायकांना या रागाने भुरळ पाडली आहे.बहुतेक गायकाने हा राग मैफलीत सादर करून रंगविला आहे.उस्ताद अमीर खान आणि किशोरी अमोणकारांचा भीमपलासी आगळा वेगळा आहे.'रे बिरहा' आणि 'रंग सो रंग मिलाय' अप्रतिमच.भीमपलासी मधील 'बिरज में धूम मचाये शाम' ही चीज लोकप्रिय असूनअनेक गायकांनी गायिली आहे.
● भीमपलासी रागावर आधारित चित्रपट गीते...
'तुम्ही ने मुझको प्रेम सिखाया' सुरेंद्र बिब्बो.
चित्रपट-मनमोहन.(१९३६).
'बीना मधुर मधुर कचछू बोल' सरस्वती राणे.चित्रपट-राम राज्य.(१९४३).
तुम्हे याद करते करते' लता.चित्रपट-आम्रपाली.(१९४५)
'अफसाना लिख रही हूँ' उमा देवी (टुन टुन). चित्रपट-दर्द.(१९४७).
'मन मोर हुवा मतवाला' सुरेय्या.चित्रपट-अफसर.(१९४८).
'आज मेरे मन सखी बांसुरी बजाये कोई' लता.
चित्रपट-आन.(१९५२).
'ए री मैं तो प्रेम दिवानी' लता.चित्रपट-नौबहार.(१९५२).
'दुनिया से जी घबरा गया' लता,तलत महमूद. चित्रपट-लैला मजनू.(१९५३).
'ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया' लता.चित्रपट-अनारकली.(१९५३).
'ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता' सुरेय्या. चित्रपट-मिर्झा गालिब.(१९५४).
'तेरे सदके बलमा' लता.चित्रपट-अमर.(१९५४).
'मेरे मन का बावरा पंछी' लता.चित्रपट-अमरदीप.(२९५८).
'मैं गरीबों का दिल' हेमंत कुमार.चित्रपट-आबे हयात.(१९५५).
'मैं ने चांद और सितारों की रफी' रफी.चित्रपट-चंद्रकांता.(१९५६).
'आ निले गगन तले प्यार' लता,हेमंत कुमार.चित्रपट-बादशाह (१९५६).
'निर्दई प्रीतम' लता.चित्रपट-स्त्री.(१९६१).
'प्रभू तेरो नाम' लता.चित्रपट-हम दोनो.(१९६३)
'झनकार पायल की तो से बिनती करे' आशा भोसले. चित्रपट-नाग देवता.(१९६२).
'चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो' महेंद्र कपूर.चित्रपट-गुमराह.(१९६३)
'मासुम चेहरा' लता,रफी.चित्रपट-दिल तेरा दिवाना.(१९६३)
'ओ बेकरार दिल' लता,हेमंत कुमार.चित्रपट-कोहरा.(१९६४).
'नगमा ओ शेर की सौगात' लता.चित्रपट-गझल.(१९६४).
'कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं' लता मंगेशकर.चित्रपट-अनुपमा.(१९६६)
'नैनो में बदरा छाये बिजली सी चमके हाये' लता.चित्रपट-मेरा साया.( १९६६).
'खिलते हैं गुल यहां खिल के बिखरने को' किशोर कुमार.चित्रपट-शर्मिली.(१९७१)
'है फूल मेरे गुलशन का' माला.चित्रपट-है फूल मेरे गुलशन का.(पाकिस्तानी चित्रपट (१९७४)
'प्यार भरे दो शर्मिले नैन' मेहदी हसन.चित्रपट-चाहत.(पाकिस्तान १९७४)
'गोरी तेरा गांव बडा प्यारा' येसुदास. चित्रपट-चितचोर.(१९७६).
'दिल में तुझे बिठा के' लता.चित्रपट-फकीरा.(१९७६).
'ले तो आये हो हमे सपनो के गांव में' हेमलता.चित्रपट-दुल्हन वो ही जो पिया मन भाये.(१९७७)
हमारी सांसों में आज तक वो हिना की खुशबू' नूरजहां.चित्रपट-मेरे हुजूर.(१९७७ पाकिस्तान).
'दिल के टुकडे टुकडे कर के मुस्कुराकर चल दिये' येसूदास.चित्रपट-दादा.(१९७९).
'तेरी खुशबू में बसे खत मै जलाता कैसे' जगजीत सिंग.चित्रपट-अर्थ.(१९८३)
'समय ओ धीरे चलो' आशा भोसले. चित्रपट-रूदाली.(१९९३)
'तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहीये' कुमार शानु,अलका याज्ञिक,चित्रा.चित्रपट-क्रिमिनल.(१९९४)
'तू चीज बडी है मस्त मस्त' कविता कृष्णमूर्ती,उदित नारायण. चित्रपट-मोहरा.(१९९४).
'तनहा तनहा यहां पे जीना' आशा भोसले.चित्रपट-रंगीला.(१९९५).
'शब्बा शब्बा हाये रब्बा' रानु मुखर्जी,सोनू निगम,नीरज व्होरा.चित्रपट-दौड.(१९९७).
'कहता है मेरा ये दिल' कविता कृष्णमूर्ती.चित्रपट-जीन्स.(१९९७).
'ऐ अजनबी तू भी कभी आवाज दे कहीं से' उदित नारायण.चित्रपट-दिल से.(१९९८).
'किस्मत से तुम हमको मिले हो' सोनू निगम,अनुराधा पौडवाल. चित्रपट-पुकार (२०००)
'मैं निकला गड्डी ले के' उदित नारायण.चित्रपट-गदर.(२००१).
'राधा कैसे ना जले' आशा भोसले,उदित नारायण.चित्रपट-लगान.(२००१)
'येली रे येली क्या है ये पहेली' अलका याज्ञिक,उदित नारायण,कविता कृष्णमूर्ती,हेमा सरदेसाई.चित्रपट-यादें.(२००१).
'खानाबदोश' मोहन.चित्रपट-लंडन ड्रीम्स.(२००९)
● नॉन फिल्मी...(उर्दू,हिंदी)
'कुछ दूर हमारे साथ चलो'-हरिहरन.
'हम तुम होंगे बादल होगा' -मसूद मलिक.
'दर्दे दिल दर्दे आशना जाने'-गुलाम अली.
'दम मस्त कलंदर मस्त मस्त' -नुसरत फतेह अली खान.
'पाणी दा रंग देख के' आयुषमान खुराणा,रोचक कोहली,अभिरुची सिंग.
'है चांद सितारों मे चमक तेरे बदन की' -अहमद हुसेन,महंमद हुसेन.
'ये आईने से अकेले में गुफ्तगू क्या है' -हरिहरन.
'जिंदगी में तो सभी प्यार किया करते है' गीत-मेहदी हसन.
'चुपके चुपके रात दिन आंसू बहाना' गझल-गुलाम अली. (भीमपलासीवर आधारित).
'तुम नहीं गम नहीं शराब नहीं' गझल-जगजीत सिंग.
● मराठी...
'दिलरुबा मधुर हा दिलाच' छोटा गंधर्व.नाटक-देवमाणूस.(१९४८).
'बालसागर तुम्ही वीर खरोखर' निलाक्षी जुवेकर.
नाटक-सौभद्र.
'अवघाची संसार सुखाचा करीन'नाटक-कान्होपात्रा.
'स्वकुलतारक सुता' नाटक-स्वयंवर.
'प्रेमसेवा शरण' नाटक-मानापमान.
'दशरथा घे हे पायसदान' सुधीर फडके.गीत रामायण.
'इंद्रायणी काठी' पं. भीमसेन जोशी.चित्रपट-गुळाचा गणपती.
'सावधान होई वेड्या सावधान होई' पं.वसंतराव देशपांडे.चित्रपट-भोळी भाबडी.
'अमृताहुनी गोड नाम तुझे देव' .माणिक वर्मा.चित्रपट-संत नामदेव.
'तुला पाहते रे' आशा भोसले.चित्रपट-जगाच्या पाठीवर.
'तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे' सुधीर फडके.
'मधु मागशी माझ्या सख्या परी' लता.
'काटा रुते कुणाला' -पंडित जितेंद्र अभिषेकी.
● बिलियन व्ह्यूज असलेले shape of you हे ed shiron हिने गायिलेले पॉप गाणे भीमपलासी रागावर आधारित आहे. हे बहुतेकांना माहीत असणं शक्यच नाही.
-------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी,रविवार दि.२७ ऑगस्ट २०२३.
div class="separator" style="clear: both;">
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment