गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, August 19, 2023

राग-रंग (लेखांक २०) 'हंसध्वनी'.

काही राग कानावर पडल्याबरोबर हृदयात घर करून जातात.त्यातीलच एक राग म्हणजे हंसध्वनी! हा मूळ दक्षिण भारतीय राग असून.याची निर्मिती मुथुस्वामी दिक्षितार यांचे वडील रामास्वामी दीक्षितार (१७३५-१८१७) यांनी केली असे म्हणतात.'वातापि गणपती भजे हम' ही तिकडील लोकप्रिय रचना आहे.या रागाला उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये आणण्याचे श्रेय भेंडीबाजार घराण्याचे गायक उस्ताद अमान अली खान (१८८८-१९५३) यांना जाते.त्यांचे आभार मानायला हवे.कारण आज हा राग उत्तर भारतीय रसिकांचा आवडता राग बनला आहे.'लागी लगन पती सती सन' ही चीज आणि बंदिश त्यांचीच असल्याचेही सांगितले जाते.उस्ताद अमीर खान एकदा मुंबईला गेले असता, ते अमान अली खान यांना भेटले.या भेटीत त्यांनी अमान अली खान यांची वरील बंदिश ऐकली.त्यांना खूप आवडली आणि त्यांनी मोठमोठ्या सभांमधून ख्याल आणि तराण्यासह गायला सुरवात केली.त्यांच्यामुळे हंसध्वनी इतका लोकप्रिय झाला की,उस्ताद राशीद खान(रामपूर),
किशोरी आमोणकर (जयपूर-अत्रौली),पं. ए.टी. कानन (किराणा),पं. अजय चक्रवर्ती (पतियाळा),परवीन सुलताना (पतियाळा) असे उत्तर भारतीय संगीतामधील विविध घराण्याचे प्रसिद्ध गायक  राग मैफिलीत गायला लागले.
       हंसध्वनीशी माझी पहिली भेट नवरंग चित्रपटातील  'रंग दे दे' या गीताने झाली.त्यावेळी मी १० वर्षांचा होतो.या गाण्याने मला वेड लावले होते.रस्त्याने चालताना रेडिओवर लागले तर पूर्ण गाणे ऐकल्याशिवाय पुढे पाय निघत नव्हता.या गाण्यापायी मी घरच्यांच्या व शिक्षकांच्या अनेकदा शिव्या खाल्ल्या आहेत.त्यावेळी हा हंसध्वनी राग आहे हे माहीत पण नव्हते.संगीताचे शिक्षण विशारद पर्यंत येऊन पोहोचल्यानंतर जसे कान फुटले तसे नवनवीन रागांची झाडाझडती सुरू झाली.तेव्हा कळले की हा हंसध्वनी आहे...त्यानंतर वेड लावले ते पंडित जसराजजींच्या 'पवन पूत हनुमान' या हंसध्वनीच्या बंदीशीने.अचानक रेडिओवर ऐकली नि 'सुध-बुध खोना' काय असते ते अनुभवले. या चीजेसाठी मी पैसे जमवून ग्रामोफोन घेतला.एल.पी.रेकॉर्ड आणली आणि पारायण सुरू केले.माझ्या अनेक कार्यक्रमातून ही बंदिश मी गायिलो आहे. माहुरचे राजे मधुकरराव उपाख्य बाबुरावजी देशमुख जसराजजींचे चाहते होते.तसेच माझ्यावरही खूप प्रेम करायचे.त्यांच्या वाड्यात झालेल्या बहुतेक मैफलीत ते मला ही चीज गायला लावायचे.यवतमाळच्या नेहरू युवक केंद्राच्या संगीत विभागासाठी १९७६ मध्ये एक वाद्यवृंद रचना केली होती.या वाद्यवृंदामध्ये सतार, सारंगी,बासरी,व्हायोलिन, हार्मोनियम आणि तबला ही वाद्ये होती. आणि आर्णी (जि. यवतमाळ) येथे संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर अनेक सांगीतिक उपक्रम राबविले.त्यात 'गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना' आणि त्यातील विद्यार्थ्यांचा 'वाद्यवृंद', ह्या दोन्हीसाठी केलेल्या  दोन  वेगवेगळ्या धून (compositions) हंसध्वनी रागावर आधारित होत्या.यात/व्हायोलिन,बासरी, हार्मोनियम,
मेंडोलीन,स्वरमंडळ, जलतरंग आणि तबला अशी वाद्ये होती.(सरोद मी स्वतः वाजवायचो.) यात इयत्ता पाच ते सातचे शालेय विद्यार्थी असल्यामुळे या उपक्रमाचे खूप कौतुक झाले होते.
      उस्ताद अमीर खान यांनी गायिलेली झपतालातील'जय माता विलंब तज दे','सुब्बूलक्ष्मी (वातापि गणपती भजे हम.कर्नाटक),'किशोरी आमोणकारांची 'गणपत विघन हरन', वगैरेंसह पं. रविशंकर (सतार),उस्ताद अमजद अली खान (सरोद),पं.हरिप्रसाद चौरसिया (बासरी),'रघुनाथ सेठ (बासरी(,पं. शिवकुमार शर्मा (संतूर),उस्ताद राशीद खान,उस्ताद दिलशाद खान,परवीन सुलताना,वीणा सहस्रबुद्धे,पं. छन्नुलाल मिश्रा (दुर्गा स्तुती),उस्ताद शाहिद परवेज (यांनी सितारवर वाजवलेली एकतालातील गत अप्रतिम आहे.),पं.अजय चक्रवर्ती,पं.विश्वमोहन भट (मोहन वीणा),पं. राजन साजन मिश्र,अश्विनी भिडे देशपांडे, कौशिकी चक्रवर्ती,जयतीर्थ मेउंडी,राकेश चौरसिया (बासरी),एन.राजम आणि टी.इन.कृष्णन यांची व्हायोलिन जुगलबंदी,( ऐकण्यासारखी आहे.),ज्योत्स्ना श्रीकांत (कर्नाटक),अदनान खान (सतार),'हार्मनी' (वादक-राकेश चौरसिया,रूपक कुलकर्णी,सुनील दास,उल्हास बापट,मधु धुमाळ,संभाजी धुमाळ),परवीन गोडखिंडी (बासरी),तथागत मिश्रा (इसराज),संजीव अभ्यंकर,सिद्धार्थ मिश्रा हा सगळा अनमोल ऐवज अभ्यासकांसाठी युट्युबवर उपलब्ध आहे. या रागात हिंदी इतकीच मराठी गाणी आहेत हे विशेष.
●चित्रपट गीते...
'कजरारी मदभरी अखियां' राजकुमारी. संगीत-रोशन. चित्रपट-नौबहार (१९५२).
'जा तोंसे नहीं बोलू कन्हैया' लता,मन्ना डे.संगीत-सलील चौधरी.चित्रपट-परिवार (१९५६).
'सखी री सुन बोले पपिहा उस पार' लता,आशा.संगीत-हेमंत कुमार. चित्रपट-मिस मेरी (१९५७). 'ओ चांद जहां वो जाये' लता,आशा.संगीत-सी.रामचंद्र.चित्रपट-शारदा (१९५७).
'रंग दे दे' आशा,मन्ना डे. संगीत-सी.रामचंद्र.चित्रपट-नवरंग (१९५९). 'लागी लगन पती सखी सन' पं. ए.टी. कानन.बंगाली चित्रपट-मेघ ढाका तारा (१९६०) 'जा रे बदरा बैरी जा' लता.संगीत-मदन मोहन.चित्रपट-बहाना (१९६०) 'लै जा रे बदरा' संजीव अभ्यंकर.चित्रपट-दिल पे मत ले यार (२०००) 'तेरे नैना हस दिये' शंकर महादेवन,श्रेया घोषाल.संगीत-शंकर महादेवन,एहसान नुरानी,लॉय मेंडोंसा.चित्रपट-चांदनी चौक टू चायना (२००९)
● नॉन फिल्मी...
'करम की गत न्यारी' लता.संगीत-हृदयनाथ मंगेशकर.अल्बम-चाला वाही देस (मीरा भजन).
'जय जय गणपती देवा' भक्तीगीत.गायक-कार्तिक रमण.
काव्य आणि संगीत-रामाश्रय झा. 'होरी खेले महादेव' गायक-जयतीर्थ मेउंडी. शब्द/संगीत-राकेश त्रिपाठी.
'गणेश वंदना'(कर्नाटक पद्धती) गायक-विश्वेश भट.
●मराठी...
'अखेरचा हा तुला दंडवत' लता. संगीत-आनंदघन.
चित्रपट-मराठा तितुका मिळवावा. (१९६४). 'शूर अम्ही सरदार' हृदयनाथ मंगेशकर.संगीत-आनंदघन.चित्रपट
-मराठा तितुका मिळवावा (१९६४). 'अग नाच नाच नाच राधे उडवू या रंग' सुरेश वाडकर,उत्तरा केळकर.
संगीत-विश्वनाथ मोरे.चित्रपट-गोंधळात गोंधळ (१९६८).
'जागे व्हा मुनिराज' आशा भोसले.संगीत-प्रभाकर जोग.
चित्रपट-दाम करी काम (१९७१). 'आली हासत पहिली रात' लता.संगीत-वसंत प्रभू.चित्रपट-शिकलेली बायको (१९८१)
'चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले' आशा भोसले. संगीत-हृदयनाथ मंगेशकर.(१९६५) 'जयोस्तुते' गायक-
मंगेशकर भावंडं.संगीत-मधुकर गोळवलकर.अल्बम-जय जय महाराष्ट्र माझा. 'आस आहे अंतरी या' सुमन कल्याणपूर.अल्बम-जुळल्या सुरेल तारा (१९९०) हंसध्वनीवर आधारित.'युवती मना दारुण रण' नाटक-संगीत मानापमान.




 

पद्म श्री सुरेश वाडकरांचे मनोगत...

दि.१७ ऑगस्ट २०२३

 

गझल रेकॉर्डिंग,मुंबई.

दि.१७ ऑगस्ट २०२३
चंदना सोमाणी यांच्या गझलचे ध्वनिमुद्रण पद्म श्री सुरेश वाडकर यांचे आवाजात.आजीवासन स्टुडिओ, मुंबई.

         गायक-सुरेश वाडकर, संगीतकार-सुधाकर कदम

          चंदना सोमाणी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम

सोमनाथ सोमाणी,निषाद कदम,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,चंदना सोमाणी. 

Saturday, August 12, 2023

राग रंग (लेखांक १९) अहीर भैरव.

     संगीताचे शिक्षण सुरू असताना सकाळी सकाळी एखादेवेळी एखादा गवैय्या रेडिओवर'अहीर भैरव' गायचा.उद्घोषणात हे कानी पडायचे.अहीर भैरवशी आलेला संबंध हा तेव्हढ्यापुरताच, कारण विशारद पर्यंत हा राग अभ्यासक्रमात नव्हता.(आता असेल तर माहीत नाही.) अहीर भैरव या नावावरून अहीर आणि भैरव या दोन रागांचे मिश्रण असावे असे वाटते.पण अहीर नावाचा राग असण्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत.होता व नव्हता असे. पूर्वांगात भैरव व उत्तरांगात काफी अशा दोन रागांच्या मिश्रणातून बनलेला अतिशय गोड राग म्हणजे अहीर भैरव.हा भैरव थाटोत्पन्न मानतात. पण भैरव थाटात तर कोमल धैवत आहे.मग हा भैरव थाटोत्पन्न कसा? हा किडा थोडे-फार संगीत कळायला लागल्यापासून वळवळतो आहे.संपूर्ण जातीचा हा राग सकाळी म्हणजे प्रातः काळी गातात.संपूर्ण जाती म्हणजे ज्यातील आरोहावरोहात सातही स्वर लागतात तो!
सात स्वरांबद्दल 'नारदीय शिक्षा' या प्राचीन ग्रंथात एक श्लोक आहे...

षड्जस्य ऋषभश्चैव गान्धारो मध्यमस्तथा |
पञ्चमो धैवतश्चैव निषाद: सप्तम: स्वर: ||

अहीर भैरव हा आनंद भैरव रागाला हा जवळचा आहे.तसेच कालिंगडा,रामकली हे सुध्दा समप्राकृतीक रागात मोडतात.कर्नाटकातील 'चक्रवाकम' सुद्धा अहीर भैरवशी मिळता जुळता आहे. मूळ भैरव रागाप्रमाणे हा प्राचीन राग नाही.त्यामुळे इतर प्राचीन रागांप्रमाणे यात बंदिशी पण कमीच दिसतात. शास्त्रानुसार हा राग गंभीर प्रकृतीचा आहे. पण 'ज्वेल थिफ' या चितत्रपटातील लताबाईंनी गायिलेले 'होटों मे ऐसी बात मै  छुपाके चली आयी' हे गाणे ऐकल्यावर तसे वाटत नाही.मी पुनः पुनः सांगतो की,रागाला प्रकृती नसते.प्रकृती काव्याची असते.त्याप्रमाणे स्वरसाज चढतो.आणि प्रकृती बदलते.याच रागातील 'मेरी सूरत तेरी आंखे' या चित्रपटातील 'पुछो ना कैसे मैं ने रैन बिताई' हे मन्ना दा ने गायिलेले गाणे गंभीर या सदरात मोडेल. पण ते त्यातील शब्दांमुळे.आणि शब्दानुरूप दिलेल्या सुरावटीमुळे.या रागात गुजराथी लोकगीतं सुद्धा स्वरबद्ध केलेली मला आढळली.काव्याबद्दल एक संस्कृत श्लोक प्रसिद्ध आहे...

न सा विद्या न सा रीतिर्न तच्छास्त्रं न सा कला |
जायते यन्न काव्यांगमहो  भारो महान् कवे: ||

म्हणजेच ज्यात काव्यांग नाही अशी कोणती न विद्या, न रीती, न शास्त्र, न कला! 
      एकोणविसाव्या शतकापर्यंत सहा राग व त्या रागांचा परिवार ही रागवर्गीकरणाची पद्धत होती.शिवमत,0कल्लीनाथ मत,भरत मत,हनुमान मत या सर्वांचे या बाबतीत एकमत होते.आणि या सगळ्यांच्या मतानुसार मुख्य सहा रागात भैरव हा राग हा होता.म्हणजेच भैरव हा प्राचीन व अहीर भैरव हा अर्वाचीन राग असल्याचे स्पष्ट होते.सोळाव्या शतकाच्या पुर्वार्धात दक्षिणेतील संत गायक पुरंदरदास भारत भ्रमण करत असताना त्यांचा परिचय भैरव थाटाशी झाला.उत्तर भारतात भैरव थाटाला राग शिक्षणाचा मूळ आधार मानत असल्याचे बघून ते भैरवाला उत्तर भारतातून दक्षिण भारतात घेऊन गेले.आणि त्यांनी कर्नाटक  संगीतातील राग शिक्षणाचा मूळ आधार थाट बनविला.त्या युगातील ग्रंथकार रामामात्य यांनी या थाटाला 'मालवगौड' असे म्हटले आहे.मालवगौडचा अर्थ 'मालवा आणि गौड प्रांतातील प्रचलित थाट'. कर्नाटक संगीतामधील 'मायामालवगौड' भैरव रागाशी मिळता जुळता आहे.(पण दक्षिण भारतीय संगीत पध्दतीमध्ये रागायनासाठी वेळेचे बंधन नसल्यामुळे तो आपल्याकडील भैरव व भैरव थाटीय राग सकाळीच गायला हवे असे त्यावर बंधन नाही.उत्तर भारतीय संगीतामधील ही बंधने शिथिल करायला काय हरकत? कोणताही राग केव्हाही गायीला तरी गोडच वाटणार ना!(तसेही आकाशवाणीवरुन सादर होणाऱ्या शास्त्रीय गायन/वादनात रागगायन संबंधीचे नियम पाळल्या जातातच असे नाही.) पुंडरिकाने आपल्या 'रागमाला' ग्रंथातही प्रथम राग भैरव असे म्हटले आहे.प्राचीन धृपद संग्रहात सुद्धा सर्वप्रथम भैरव रागाच्या चिजा संग्रहित केलेल्या दिसतात.
     शहाजहानच्या काळात बख्शूने केलेल्या 'सहसरस' नामक धृपद संग्रहात पहिली बंदिश भैरव रागात असल्याचा उल्लेख आहे.(मुसलमान और भारतीय संगीत,पान ६२). भैरव रागाचे अनेक प्रकार आहेत.जसे:- नट भैरव, आनंद भैरव,बंगाल-भैरव, सौराष्ट्र-भैरव,शिवमत-भैरव,आलम भैरव, बैरागी भैरव, मोहिनी भैरव, बीहड़ भैरव, प्रभात भैरव, भावमत भैरव, देवता भैरव, कबीर भैरव, गौरी भैरव, हिजाज़ भैरव आणि त्यातीलच एक अहीर-भैरव.सध्या प्रचारात मात्र काही प्रकारच आहेत.त्यातही नट भैरव, बैरागी भैरव जास्ती चलनात व लोकप्रिय आहेत.यातील बैरागी भैरव हा भैरव कुळातील असला तरी त्यातील कोमल निषादामुळे भैरवाहून वेगळा वाटतो.त्यामुळे त्याला फक्त बैरागी म्हणून संबोधतात. 'नेट'च्या युगात जुन्यांपासून नवीन गायक/वादकांनी गायिलेल्या व आपापल्या वाद्यावर वाजविलेल्या अहीर भैरवसह इतर भैरव प्रकार आपण युट्युबवर ऐकू शकता.
अहीर भैरव रागावर आधारित चित्रपट गीते :-
'अपने जीवन की उलझन को' लता.चित्रपट-उलझन.'चलो मन जाए घर अपने'येसुदास.चित्रपट-स्वामी विवेकानंद.'धीरे धीरे सुबह हुई'चित्रपट-हैसीयत.'माई री मैं कासे कहूं' लता.
चित्रपट-दस्तक.(अहीर भैरव आणि काही अन्य रंगांचे मिश्रण).'मैं तो कबसे तेरी शरण में' हरिहरन,नीलिमा सहानी.- राम नगरी'मन आनंद आनंद छाया' आशा भोसले,सत्यशील देशपांडे. चित्रपट-विजेता.'अपने जीवन की उलझन को' किशोर कुमार. चित्रपट-उलझन.
'मेरी वीणा तुम बिन रोये' लता.चित्रपट-देख कबीरा रोया.
'मेरी गलियों से लोगों की यारी' लता मंगेशकर,महेंद्र कपूर.चित्रपट-धर्मात्मा.'पूछो ना कैसे मैंने रेन बिताई' मन्ना डे.चित्रपट-मेरी सूरत तेरी आंखें.'वक्त करत जो वफा आप हमारे होते' मुकेश.चित्रपट-दिल ने पुकारा.'राम तेरी गंगा मैली हो गई' लता.चित्रपट-राम तेरी गंगा मैली.'प्यार तेरी पहली नज़र को सलाम' लता.चित्रपट-एक दूजे के लिए. 
'सोलह बरस की बाली उमर को सलाम' लता.चित्रपट-एक दूजे के लिए.'वंदना करो, अर्चना करो' लड़की सह्याद्री की पं. जसराज।'अलबेला साजन आयो रे' उस्ताद सुलतान खान,कविता कृष्णमूर्ती.चित्रपट-हम दिल दे चुके सनम.
'जिंदगी को संवरना होगा' येसुदास.चित्रपट–आलाप.
'अब तेरे बिन जी लेंगे हम' कुमार शानु.चित्रपट-आशिकी.
गैर फिल्मी...
'हमे कोई गम नहीं था' -मेहदी हसन.
'राम का गुणगान करिए' -लता,पंडित भीमसेन.
'जय शंकरा गंगाधरा' नाट्यगीत.गायक-पं. राम मराठे.
'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल' संत नामदेव,पं. भीमसेन जोशी.
'फिर उसी रहगुजर पर शायद' -गुलाम अली.
'तेरे हिज्र में सजना कबसे जागी न सोई' -फरिहा परवेज. कवी/संगीतकार फहीम मजहर.

 ● बऱ्याच वर्षांपुर्वी सुरेश भटांना श्रद्धांजली म्हणून पुण्यातील स्नेहसदनमध्ये मराठी गझल गायनाचा कार्यक्रम केला होता.त्यावेळी ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांची खालील गझल मी स्वरबद्ध केली होती.ही अहीर भैरव रागावर आधारित असून यातील मतल्याच्या पहिल्या मिसऱ्यात मी दोन्ही रिषभांचा प्रयोग केला आहे.नंतर पुढे विविध स्वरांचा व मु्र्छनाचा प्रयोग यात केला आहे.पण यातील  'दोन्ही रिषभांचा' प्रयोग मला सगळ्यात जास्ती भावला.कारण कोणत्याही प्रकारे रसहानी न होता अशा प्रकारे गोडवा वाढणे किंवा वाढविणे हे कौशल्याचे काम आहे.अर्थात शेवटी रसिक हेच खरे न्यायाधीश असतात हेही तेवढेच खरे! प्रयोग आवडल्यास आपला.नावडल्यास माझा.युट्युब लिंक खाली दिली आहे...

outube link...

रानात पाखरांची नाही कुठे निशाणी
रोमांचल्या ऋतूंनी जावे कुण्या ठिकाणी

हासून बोलण्याचा तो काळ दूर गेला
आता न बोलताही झाली व्यथा शहाणी

पानातल्या कळीने लाजू नये असे की
डोळ्यामधे उन्हाच्या यावे फिरून पाणी

येथे न राहिलेले कोणीच सोबतीला
माझीच हिंडते ही छाया उदासवाणी

गायिका-भैरवी कदम (देव)
तबला-निषाद कदम
व्हायोलिन-प्रमोद जांभेकर
हार्मोनियम-भाविक राठोड
सूत्र संचालन-शाहीर सुरेशकुमार वैराळकर

 

 

 

Saturday, August 5, 2023

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


 

राग-रंग (लेखांक १८) #पहाडी.


     आपले शास्त्रीय संगीत लोकसंगीमधून निर्माण झाले आहे.संगीत तज्ज्ञ आणि शास्त्रकारही ही बाब मान्य करतात.लोकसंगीत अविकसनशील आहे असे मानणे अत्यंत चूक आहे.आपल्या संगीताचे ते अभिन्न अंग आहे.प्रत्येक काळातील तत्कालीन परिस्थितीचे,प्राकृतिक प्रवृत्तीचे,विकासाचे ढोबळ रूप लोकसंगीताने जपले आहे.वास्तविक पाहता संगीताच्या दोन्ही रुपात (लोकसंगीत/शास्त्रीय संगीत) अप्रत्यक्षपणे देवाण-घेवाण सुरूच असते.त्यामुळेच अनेक राग आपल्याला लोकप्रिय सुरावटींचे स्मरण करून देत राहतत्.आणि म्हणूनच लोकसंगीतामध्ये अनेक प्राचीन राग जसेच्या तसे दिसतात.,टप्पा,ठुमरी सारखे अनेक प्रकार लोकसंगीतामधून आलेले आहेत.पूर्वीच्या काळी ख्याल गायन शास्त्रसम्मत नव्हते.पण आज मात्र ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.म्हणूनच शास्त्रीय संगीत रुपी वृक्षाची मुळे लोकसंगीत आहे असे म्हणावे लागते.
     पहाडी राग मूलतः काश्मिरी लोकसंगीताचा सरळ राग आहे.कोणी याला 'धून' म्हणतात.राजस्थानातील 'मांड' आणि हिंदी पट्टयातील 'पिलू' रागाप्रमाणेच हा ही क्षुद्र प्रवृत्तीचा मानल्या जातो.सुगम संगीतामध्ये हा विशेष करून लोकप्रिय आहे.याला विशिष्ठ आरोहावरोहत बांधणे कठीण आहे.तरी पण कुशल गायक वादक यात बाराही स्वरांचा प्रयोग करून उच्च कोटीला पोहोचवू शकतात. मंद्र ससप्तकातील धैवत हा पहाडीमध्ये म्हत्वाचा स्वर आहे.हा अतिशय मनमोहक राग आहे.याचे सौंदर्य त्याच्या नाजूकपणात आहे.पं. शिवकुमार शर्मा यांनी संतुरवर छेडलेला पहाडी 'माझ्या जिवीची आवडी' आहे. हा यमन,दरबारी,मल्हार, वगैरेसारख्या प्रमुख राग नाही.पण याचा गोडवा काही औरच आहे.
      पहाडी बिलावल थाटोत्पन्न मानतात.भूप,देशकार,शुद्ध कल्याणमध्ये जे स्वर लागतात तेच स्वर मध्यमाला षड्ज करून गायिले की पहाडी राग दिसतो.याला ठराविक असा गानसमय नाही.दिवस रात्रीच्या कुठल्याही प्रहरी हा गोडच वाटतो.काव्यातील वेगवेगळे भाव व्यक्त करण्यासाठी पहाडी अतिशय योग्य राग आहे. झिंझोटी प्रमाणेच या रागातही भरपूर गाणी आहेत.
      ● पहाडी रागावर आधारित चित्रपट गीते...
'जवां है मोहब्बत, हसीं है जमाना',नूरजहां
चित्रपट-अनमोल घड़ी.
'सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे',रफी.चित्रपट-दुलारी.
'जो वादा किया वो निभाना पडेगा',रफी लता.
चित्रपट-ताज महल.
'ना मारो नजरिया के बान',लता.चित्रपट-पहली झलक.
' दिन हैं बहार के, तेरे मेरे इकरार के',   चित्रपट-वक्त
'कौन आया की निगाहों में चमक जाग उठी', आशा.चित्रपट-वक्त.
'दो दिल धडक रहे हैं और आवाज एक है',तलत महमूद,आशा.चित्रपट-इंसाफ.
'मेरी आंखों में बस गया कोई रे',लता.चित्रपट-बरसात.
चल उड जा रे पंछी के अब ये देश हुआ बेगाना',मोहम्मद रफी. चित्रपट-भाभी.
'सखी री मेरा मन उलझे तन डोले',लता.चित्रपट-
'शाम ढले खिड़की तले तुम सीटी बजाना छोड़ दो',
चित्रपट-अलबेला
'लग जा गले फिर ऐसी हसीं रात हो ना हो',लता.
चित्रपट-वह कौन थी
 'ओ दरवाजे के मुसाफिर, हम को भी साथ ले ले',मोहम्मद चित्रपट-उड़न खटोला.
'दो सितारों का ज़मीन पर है मिलन आज की रात',रफी
लता.चित्रपट-कोहिनूर.
'तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी पशेमानी मुझे दे दो',जगजीत कौर.चित्रपट-शगुन.
'पर्बतों के पेड़ों पर, शाम का बसेरा है',रफी, सुमन कल्याणपूर.चित्रपट-शगुन.
'वृंदावन का कृष्ण कन्हैया',रफी लता.चित्रपट-मिस मैरी.
'इशारों इशारों में दिल लेने वाले',रफी आशा.
चित्रपट-कश्मीर की कली.
'सुन री सखी मोहे सजना बुलाएं',लता.चित्रपट-नागिन
'तस्वीर बनाता हूं, तस्वीर नहीं बनाती',तलत महमूद.
चित्रपट-बारादरी
कोई प्यार की देखे जादूगरी',लता,रफी.चित्रपट-कोहिनूर.
'चौदहवीं का चांद हो, या आफताब हो',रफी.चित्रपट-चौदहवीं का चांद.
'दिल तोड़ने वाले, तुझे दिल ढूंढ रहा है', लता,रफी. चित्रपट-सन ऑफ इंडिया.
'वो दिल कहां से लाऊं तेरी याद जो भूला दे',लता.
चित्रपट-भरोसा.
'आज की रात मेरे दिल की सलामी ले ले',मोहम्मद रफी.
चित्रपट-राम और श्याम.
'अरे जा रे हट नटखट ना छेर मेरा घूंघट', आशा,महेंद्र कपूर,रामचंद्र चितळकर.चित्रपट-नवरंग.
'निले गगन के तले धरती का प्यार पले',महेंद्र कपूर.चित्रपट हमराज
'चाहूँगा मैं तुझे सांझ सवेरे',मोहम्मद रफी.चित्रपट-दोस्ती
''ओ मोरा नादान बालमा ना जाने दिल की बात',लता.
चित्रपट-उजाला.
'तू इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल है',रफी. चित्रपट-आप तो ऐसे न थे.
'जाने क्या ढूंढती रहती हैं',रफी. चित्रपट-शोला और शबनम.
 'आ जा रे, आ जे रे ओ मेरे दिलबर आजा',नितिन मुकेश.
चित्रपट-नूरी
'सावन का महीना, पवन करे सोर',मुकेश.चित्रपट-मिलन.
'दिल करादा, ओ यारा दिलदारा मेरा दिल करादा',महेंद्र कपूर, बलबिर,जोगिंदर सिंग लुथ्रा.
चित्रपट-आदमी और इंसान.
'दिल पुकारे आ रे आ रे आ रे', रफी लता.चित्रपट-ज्वेल थीफ.
'कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है',मुकेश.चित्रपट-कभी कभी.
'ये शाम मस्तानी',किशोर कुमार.चित्रपट-कटी पतंग.
'कोरा कागज था ये मन मेरा',किशोर कुमार.चित्रपट-आराधना.
'दिल पुकारे आ रे आ रे आरे',रफी,लता.चित्रपट-आराधना.
'ये दिल और उनकी निगाहों के साये',लता.चित्रपट-प्रेम पर्बत.
'चलो दिलदार चलो चांद के पार चलो',लता.लता.चित्रपट-पाकिजा.
'सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे',रफी.
चित्रपट-दुलारी.
'कैसे जिऊंगा मैं',अनुराधा पौडवाल,जॉली मुखर्जी.चित्रपट-साहिबां.
'आईना वो ही रहता है चेहरे बदल जाते है',लता.चित्रपट-शालिमार.
'पत्ता पत्ता बुटा बुटा हाल हमारा जाने है',लता,रफी.चित्रपट-एक नजर.
'आज मौसम बडा बेईमान है', रफी.चित्रपट-लोफर.
'बहारों मेरा जीवन भी संभालो',लता.चित्रपट-आखरी खत.
'पीतल की मोरी गागरी, दिल्ली से मोल मंगाई रे',परवीन सुल्ताना मीनू पुरषोत्तम.चित्रपट-दो बूंद पानी.
'तेरे मेरे होठों पे, मीठे मीठे गीत मिटावा',लता,बाबला मेहता.चित्रपट-चांदनी.
'देखा एक खव्वाब तो ये सिलसिले हुए',लता,किशोर.
चित्रपट-सिलसिला.
'करवटें बदलते रहे सारी रात हम',लता,किशोर कुमार.चित्रपट-आपकी कसम.
'हुस्न पहाडों का क्या कहना', लता,सुरेश वाडकर.राम तेरी गंगा मैली.
'तेरे बिन नहीं जीना ढोलना',लता.चित्रपट-कच्चे धागे.
'संदेसे आते है', रुपकुमार राठोड,सोनू निगम. चित्रपट-बॉर्डर.

● उर्दू गझल...
'बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो न थी', -मेहदी हसन.
'दिल मैं इक लहर सी उठी है अभी', 'बहारों को चमन याद आ गया है' -गुलाम अली.
'ऐ मेरे हमनशीं चल कहीं और चल' -मुन्नी बेगम.
'सात सुरों का बहता दरिया तेरे नाम' -परवेज मेहदी.
'हम तो है परदेस मे देस मे निकला होगा चांद' -जगजीत सिंग.

● भजन,ठुमऱ्या,अभंग,गीत...
'घनश्याम हृदय के आंगन में कब आओगे' (भजन) -सी.एच. आत्मा.
'तेरे भरोसे हे नंदलाला' (भजन) -मोहम्मद रफी.
'आख नाल आख खैन दे' (गीत)- मेहदी हसन.
'पायो जी मैंने राम रतन धन पायो'(भजन)-डी.वी.पलुस्कर.
'सैंय्या बिना घर सूना' (ठुमरी) -नजाकत-सलामत अली.
'बागों में पडे झुले'-बरकत अली,गुलाम अली.
'मोरी छोडो गगरिया शाम'(ठुमरी) -लक्ष्मीशंकर.
'रंगी सारी गुलाबी चुनरिया'(ठुमरी) -शोभा गुर्टू.
'लागी रे मनवा मे चोट'
'माये नि मेरिये' (गीत) -मोहित चौहान.
●नाट्यगीते...
'खरा तो प्रेमा'
'नाचत ना गगनात नाथा' 
'विराट ज्ञानी' 
'रुणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी' 
'मजवरी तयाचे प्रेम' 
●मराठी गीते...
'दिसते मजला सुखस्वप्न नवे' -अनुराधा पौडवाल.
'जाग रे यादवा', सुमन कल्याणपूर. चित्रपट-प्रेम आंधळे असते.
'त्या तिथे पलीकडे',मालती पांडे. चित्रपट-लाखाची गोष्ट.
'ऐसा महिमा प्रेमाचा' -रतीलाल भावसार.
'कशी रे तुला भेटू मला वाटे लाज' -मालती पांडे.
'थंडगार ही हवा त्यात तू जवळ हवा',आशा भोसले.
'बगळ्यांची माळ फुले' -वसंतराव देशपांडे.
'कृष्णा पुरे न थट्टा' -माणिक वर्मा.
'घन नीळा लडिवाळा' -माणिक वर्मा.
'असा मी काय गुन्हा केला' -आशा भोसले.चित्रपट-एक धागा सुखाचा.
'सहज सख्या एकटाच येशी सांजवेळी' -आशा भोसले.
'सखी शेजारीणी तू हसत रहा' -अरुण दाते.
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' -शोभा गुर्टू.
'असा मी काय गुन्हा केला' -आशा भोसले.
'राम रंगी रंगले मन' -भीमसेन जोशी.
'चल उठ रे मुकुंदा झाली पहाट झाली' -सुमन कल्याणपूर.
'केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा' -सुमन कल्याणपूर.
'फुलले रे क्षण माझे', -आशा भोसले.
------------------------------------------------------------------------
'नक्षत्र' पुरवणी.दैनिक उद्याचा मराठवाडा.रविवार दि.६ ऑगष्ट २०२३.


 

Saturday, July 29, 2023

राग-रंग...लेखांक १७



     कलावती आणि जनसंमोहिनी हे दोन राग इतके जवळचे आहेत की,सर्वसामान्यांना या दोहोतील फरक कळणे कठीणच! दोन्ही राग अतिशय गोड आहेत.हे दोन्ही राग दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमधील (कर्नाटक) आहेत.
यांच्या गोडव्यामुळे हे दोन्ही राग उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये स्वीकारल्या गेले व लोकप्रियही झालेत.यांचा थाट खमाज असून निषाद सोडून बाकी स्वर शुद्ध आहेत.कलावतीमध्ये रिषभ नाही.कलावतीमध्ये रिषभ घेतला की जनसंमोहिनी होतो.यात रिषभाचा प्रयोग कल्याण अंगाने होतो.जनसंमोहिनी रागाचे मूळ नाव 'शिव कल्याण' असल्याचेही बोलल्या जाते.
       'कोई सागर दिल को बहलाता नहीं' मी ऑर्केस्ट्रामध्ये असतानाच्या काळातील अफाट लोकप्रियता मिळविलेले 'दिल दिया दर्द लिया' या चित्रपटातील हे गीत.घरगुती मैफलीमध्ये मी हमखास गायचो. समोर तरुण मुली असल्या तर एकदम आर्तपणे गायिल्या जायचे. हे गाणे कलावती रागात असल्याचे प्राथमिक ज्ञान तेव्हा मला मिळाले.यात जनसंमोहिनी राग पण आहे हे मला फार उशिरा कळले.या नंतर मुंबईचा जावई या चित्रपटातील 'प्रथम तुज पाहता,
जीव वेडावला' या रामदास कामतांनी गायिलेल्या गाण्याने आम्हा (त्या काळातील) तरुण मंडळींना वेड लावले होते.कित्येक वर्षे ही दोन गाणी घरगुती मैफलीत हमखास गायचोच.पण खऱ्या अर्थाने मला कलावती कळला तो प्रभा अत्रे यांच्या 'तन मन धन तो पे वारू'या चिजेने.
एकतालातील ही चीज बाराव्या मात्रेपासून सुरू होते.'न' वरील सम ऐकणाऱ्यास एकदम बांधून ठेवते.त्यांची गाण्याची पद्धत आणि चिजेतील बोलाप्रमाणे येणारी सुरावट अत्यंत मोहमयी.आजही ती चीज तरुणच वाटते.तसेच डॉ.वसंतराव देशपांडे यांनी गायिलेली झपतालातील 'ये हो काहे' सुद्धा अतिशय श्रवणीय असल्यामुळे ती माझी आवडती होती.आलापी,
सरगम,तानांचा अतिशय योग्य वापर करून समेवर येण्याची त्यांची पद्धत अतिशय वेगळी होती.ताल त्यांच्या अंगात इतका भिनला होता की, कुठल्याही मात्रेपासून तान सुरू करुन तबलजीला इशारा करून त्यालाही मोकळे सुटायची खूण करायचे.आणि दोघेही जेव्हा धाडकन समेवर यायचे तेव्हा 'जोर का झटका जोर से'च लागत होता.तालाशी मस्तवालपणे खेळत गाणे ही त्यांची खासियत होती.तबला वादक पांडुरंग मुखडे आणि वसंतरावांची अशी जुगलबंदी सवाई गंधर्वमध्ये मी ऐकली आहे.दोघेही समेवर आले की अंगावर सर्रर्रर्रर्रर्रकन काटा यायचा. त्यावेळी ते नटभैरव गायिले होते.त्यानंतर काही महिन्यातच हे जग सोडून गेले.अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायिलेली 'शिवनंदन गजानन' ही रुपकमधील चीज सुद्धा माझी आवडती आहे.कलावती आणि जनसंमोहिनी राग अनेक गायक/गायिकांनी गायीला व वादकांनी वाजविला आहे.पं. रवीशंकर (सतार) पं. हरिप्रसाद (बासरी) झरीन दारुवाला (सरोद) यांचा जनसंमोहिनी श्रवणीय आहे.तसेच
हरिप्रसाद चौरसिया और झाकिर हुसैन (बासरी-तबला),कृष्णा भट आणि झाकीर हुसेन (सतार-तबला), संदीप मिश्रा,अमित मिश्रा (सितार - सारंगी)'जोनाथन वोयर और शॉन मेटिवत्स्की (संतूर आणि तबला), उस्ताद रफाकत अली खान आणि छोटा उस्ताद बख्त अली खान यांनी गायिलेल्या कलावतीमध्ये छोट्या बख्त अलीने कमाल केली आहे. नुसरत फतेह अली खान यांनी कलावती रागात गायिलेल्या 'तन मन तुम पे वारू' या त्रितालातील बंदीशीत घेतलेल्या विविध प्रकारच्या तिहायासह,वेगवान सरगम अत्यन्त आश्चर्यकारक आणि श्रवणीय आहे.हे तेच करू जाणे!

चित्रपटातील गाणी वा भावगीते एक विशिष्ठ रागात पूर्णतः बांधलेली नसतात.ती केवळ त्या रागावर आधारित असतात.खालील गाण्यांमध्ये काही कलावती रागावर तर काही जनसंमोहिनी रागावर आधारित आहे.या रागातील स्वरांव्यतिरिक्त इतर स्वरांचाही वापर रंजकता वाढविण्यासाठी या गाण्यांमध्ये केला जातो.
● चित्रपट गीते...
'पिया नहीं आये',अमानत अली,नूरजहां. चित्रपट-
दरवाजा.'हाये रे वो दिन क्यों ना आये', लता.संगीतकार-पं. रवी शंकर,चित्रपट-अनुराधा.'आयी परी रंगभरी किसने पुकारा', आशा भोसले.चित्रपट-दो फूल.'आ जा रे मेरे प्यार', लता.चित्रपट-ऊंचे लोग. 'कोई सागर दिल को बहलता नहीं', (जनसंमोहिनी आणि कलावतीचे मिश्रण) रफी.चित्रपट-दिल दिया दर्द लिया.'सुन चंद मेरी ये दास्तान', मुकेश.चित्रपट-नागज्योती.'काहे तरसाये जियरा', आशा भोसले,उषा मंगेशकर.   चित्रपट-चित्रलेखा.'ना तो कारवां की तलाश है' (या कव्वालीच्या फक्त सुरवातीलाच कलावती दिसतो,कडव्यांमध्ये विविध रागांचा प्रयोग केला आहे.) रफी,मन्ना डे,आशा भोसले,सुधा मल्होत्रा.चित्रपट-बरसात की रात.'सुबह और शाम काम ही काम',लता.चित्रपट-
उलझन.'कभी तो मिलोगे जीवन साथी', चित्रपट-सती सावित्री.'वही उड़ी उड़ी घटाएं हैं एक तुम नहीं हो तो कुछ नहीं', मुकेश.चित्रपट-मेरा घर मेरे बच्चे.'सनम तू बेवफा के नाम से मशहूर हो जाये', लता.चित्रपट-खिलौना.'भजन बिना चैन न आये राम', चित्रपट-रफु चक्कर.'अगर दिलबर की रुसवाई'लता.चित्रपट-खिलोना.'मै का पिया बुलावे अपने मंदिरवा', लता.चित्रपट-सूर संगम.'वो घटा सावरी थोडी थोडी बावरी' चित्रपट-अभिनेत्री.'है अगर दुश्मन  दुश्मन जमाना गम नहीं' रफी,लता.चित्रपट-हम किसी से कम नहीं.'ये तारा वो तारा हर तारा', उदित नारायण.
चित्रपट-स्वदेस'जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो' रुपकुमार राठोड,सोनू निगम.चित्रपट-सरफरोश.
● मराठी गाणी...
'अनंता अंत नको पाहू' -माणिक वर्मा.'भाव विणेवर आठवणींच्या तारा मी छेडिते' -सुलोचना चव्हाण.
'प्रथम तुज पाहता', रामदास कामत. चित्रपट-मुंबईचा जावई.'प्रिया आज माझी नसे साथ द्याया' -सुधीर फडके.
'दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी' -आशा भोसले.'गोविंदा निन्ना' -उन्नीकृष्णन (कर्नाटक)
        ● जनसंमोहिनी रागावर आधारित मी एक माझीच गझल स्वरबद्ध केली आहे.गायक आहे मयूर महाजन.पहिल्या ओळीत जनसंमोहिनी स्पष्ट दिसतो.पुढे वेगवेगळे राग दिसायला लागतात.
जीवना सांभाळतो मी तू दिलेल्या प्राक्तनाला
का उगाची दुःख सारे दाखवावे या जगाला

मांडलेला डाव सारा पाहिला मोडून मी ही
अन् समोरी येत गेला जीवनाचा रंग काळा

सोबती गेले जिवाचे राहिलो मी एकटा
लागता झड आठवांची दाटुनी येतो उमाळा

जीवघेणे वागताती आपुले परके असे का
वंचना साऱ्या जगाची सोसवेना काळजाला

युट्युब लिंक....
https://youtu.be/99hi7chw-Aw
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'मंथन' पुरवणी,रविवार दि.३० जुलै २०२३.


 





संगीत आणि साहित्य :