Wednesday, May 22, 2013
आळवणी...
पृथ्वीला लागल्या
आलिंगन कळा
घेऊन ये ना रे
घन घन माळा
वेदनेलाला येई
उदयास्ताचे रंग
रोजची दुपार
पेटविते अंग
पशु पक्षी सारे
लाहा लाहा करी
बरसव आता
सरीवर सरी
वैराण वावरे
निष्पर्ण
खराटे
घेई जगण्याशी
रोज रोज खेटॆ
कधी नव्हे अशी
तापून निघाली
दोन थेंबांसाठी
काया आसुसली
पिण्यासाठी नसे
‘चुल्लूभर’ पाणी
मरणही करी
त्याची आळवणी
देहा फुटे झरा
पाणी शोधताना
कोसकोस घाव
वेगाने घेताना
डोळ्यावर दाटे
कारुण्याचे धुके
जनावरांचेही
हंबरणे मुके
ओढाळ हा वारा
उदास होउनी
उन्हाच्या कुशीला
मारतो ढोसणी
काळ्या धरतीची
भेगाळली काया
लवकर येई
तिजला झाकाया
सुधाकर कदम
२१.५.२०१३
Wednesday, May 15, 2013
Sunday, May 12, 2013
दस्त-ऐवज
तुम्ही उघडले आहे
’दस्तऐवज’
नोंदणी
कार्यालय…
(दस्तऐवज
म्हंजे काय रे भौ ?)
पुंगळ्या
करून
जमा
करण्यासाठी…
जे
कोणालाच नंतर दिसत नाही,
(म्हणजे तो एक इतिहास
झाला तर !)
या
ऐतिहासिक नोंदींना
दस्तऐवज
म्हणावे की दस्तावेज ?
…
आम्ही
गावंढळ,
अशुद्ध
बोलणारे,लिहिणारे…
तुम्ही
मात्र कार्यालयीन
ग्रांथिक
भाषा बोलणारे,सुसंस्कृत…
(’भैय्या ! दुधमे पानी कम मिसळोना’ वाले…!)
म्हणून
विचारले !
आम्ही
धटींगण…
(’अबे,दुधात पानी मिसळतं का बे भडव्या…!’)
असा
दम देणारे
उद्धट…! असंस्कृत…!
म्हणून
सांगतो,
आम्हाला
अर्थ कळो वा नाकळो...
कृपया
आमचा
इतिहास बदलण्याच प्रयत्न
करू
नका…नाही तर,
आमचे
’दस्त’ तुमचा ’ऐवज’
निकामी
केल्याशिवाय
राहणार
नाही…!
सुधाकर
कदम
९.५.२०१३
Wednesday, May 8, 2013
याचा संग धरो नये…
गाढवाशी मैत्री
लाथांचा सुकाळ
सदा सर्वकाळ
चालतसे...
किती गूळ चारा
फरक ना पडे
चवीचे वाकडे
जन्मभरी...
हिरव्या कुरणी
जोमात चरोनि
झाडतो दुगाणी
धन्यावरी...
कितीही शिकवा
’गमभन’ त्याला
गावंढळ मेला
समजे ना...
भींतीच्या कडेला
राहोनिया उभा
धरो पाहे गाभा
सावलीचा...
स्थितप्रज्ञाचीच
लक्षणे दिसती
परी ना मानती
योगी त्याला...
पाजळोनि बुद्धी
असे अर्धवट
सांगती अचाट
तत्वज्ञान…
’सुधा’ म्हणे उगि
बेगडाचा रंग
गाढवाचा संग
धरो नये…
सुधाकर कदम
Sunday, May 5, 2013
Monday, April 29, 2013
दूर गेल्या फुलांतल्या वाटा...
गायिका-वैशाली माडे
गझलकार-दिलीप पांढरपट्टे
संगीत-सुधाकर कदम
अल्बम-काट्यांची मखमल
(युनिव्हर्सल म्युझिक कंपनी)
Subscribe to:
Posts (Atom)


