गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, November 26, 2011

गझलवर संगीताचे आक्रमण... किती खरे किती खोटे ?

फुल पातों से नही रंगसे चुना जाता है
भोर हाथोंसे नही तम से बुना जाता है
प्राण की पीर पुकारों मे जगाने वालो
गीत कानो से नही दिल से सुना जाता है...

स्नेहलता स्नेह नावाची ही कवियत्री गीत कसे ऐकावे हे यातून सांगते.कानापेक्षा मनापासून ऐकल्याने कोणत्याही गीत प्रकाराचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येतो.पण गझलच्या बाबतीत मात्र यापेक्षा अधिक काही तरी हवे असते. गझल शब्दांदारे असो वा स्वरांद्वारे सरळ ऐकणा-यांच्या मनात उतरायलाच हवी.मग ती कानाने ऐको वा मनाने ! याचाच अर्थ असा,की शब्द आणि स्वरांनी बरोबरीने हातात हात घालून,एकमेकांचा आब राखून खेळत-बागडत, निर्व्याजपणे रसिकांपुढे यायला हवे. गझल गायन हे सुगम गायन नाही.पण लोकांचा तसा समज आहे,किंवा करून दिला गेल्या आहे.सुगम संगीतापेक्षा थोडे हटके असल्यामुळे माझ्या मते याला सुगम-शास्त्रीय किंवा उप-शास्त्रीय म्हणायला हरकत नसावी.सुगम संगीताला गायक,कवी,संगीतकार अशा अनेकांची साथ लाभते.गझल गायकाला मात्र गायक,संगीतकार व वादक (बहुतेक गझल गायक उत्कृष्ट हामोनियम असल्याचे दिसून येते.)अशा तिहेरी भूमिका वठवाव्या लागतात.शास्त्रीय संगीतासोबच भाषेचाही व्याकरणासह सखोल अभ्यास करावा लागतो.आज आपल्यासमोर अनेक गझल गायक आहेत.परंतू बेगम अख़्तर,मेहदी हसन,फ़रीदा खानम,ग़ुलाम अली आणि जगजितसिंग हीच नावे का आठवतात ? याचे कारण त्यांचा शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास,शब्द-स्वरांची समज,स्वतःच स्वतःची विकसित केलेली गान शैली हे आहे.आपल्या देशात इतरही अनेक गायक-गायिका आहेत.परंतू त्यातील कोणी चांगला संगीतकार आहे तर कोणी चांगला गायक.गझल गातांना,गाणा-यातला गायक आणि संगीतकार हे दोघेही समतुल्य आणि समन्वयक असले तरच ते चीरकाल टिकणारी गायकी देऊ शकतात.
    
"दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है
आख़िर इस दर्द की दवा क्या है"

ही गझल अनेक गायक,गायिकांनी गायिली आहे.परंतू काही निवडकच गायकांच्या आवाजात ती श्रोत्याना आवडते.त्यातल्या त्यात मेहदी हसनच्या आवाजाने तर काळीजच पोखरत जाते.गझल मांडणीसाठी स्वरांचा कसा उपयोग करावा याचे हे एक मोठे उदाहरण आहे.शास्त्रीय संगीतातील अविर्भाव-तिरोभाव,मुर्छना आदि प्रकारांचा उपयोग मेहदी हसन आणि जगजितसिंग यांनी जसा केला, तसा इतर गायकांनी केल्याचे आढळत नाही.ग़ुलाम अलींनी हे न करताही गमक,मुरकी,मींड,नोटेशन याचा वापर करून आपल्या गायकीने गझल अत्यंत श्रीमंत करुन ठेवली.बेग़म अख़्तर पर्यंत गझल गायकीवर शास्त्रीय संगीतातील दादरा,ठुमरी,कजरी,चैती या गान प्रकाराची छाप प्रकर्षाने जाणवते.मेहदी हसन,ग़ुलाम अली यांच्याही सुरवातीच्या गझलांवर हा प्रभाव दिसतो.पण अख़्तरी बाईंपेक्षा मेहदी हसन यांनी शब्दांना प्राधान्य देऊन एक एक शब्द सुरांच्या गोलाईने भरून ऐकणा-यांपर्यंत स्पष्टपणे कसा जाईल याचा विचार जास्ती केलेला दिसतो.ग़ुलाम अलींच्या गझल गायनात कधी स्वरांचे प्राबल्य तर कधी शब्दांचे प्राबल्य्र जाणवते.पण एकूणच त्यांच्या गझल गायकीने जनमानसावर मोहिनी घातली आहे.या सगळ्यात जगजितसिंगची गायकी मात्र आणखीनच वेगळी ठरते.काळीज भेदणारा आवाज,उर्दूचा ’सच्चा’लहजा, शास्त्रीय संगीतावरील मजबूत पकड आणि सतत वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याची मानसिकता यामुळे त्यांच्या तुलनेत भारतातील इतर गझल गायकांचा विचार केला तर त्यांच्या उंचीला कोणीच पोहिचले नाही असे खेदाने म्हणावे लागते.(या बद्दल दुमत असू शकते.)चित्रा सिंगच्या बाबतीत काहीही प्रवाद असले तरी तिने गायिलेल्या ’मिर्झा ग़ालिब’ या मालिकेतील गझला काळजाला भेदून जातात.या दोघांचे गझल गायकीतील योगदान विसरता येण्यासारखे नाही.अनूप जलोटानेही सुरवातीच्या काळात सुंदर गझला रसिकांना दिल्या.तसेच सर्वसामान्यांपर्यंत गझल पोहचवण्याचे काम पंकज उधास यांनी केले आहे.
              मेहदी हसन,ग़ुलाम अली आणि जगजितसिंग या तीन गायकांनी गझल मांडणीसाठी केलेला स्वराविष्कार आणि विचार अतिशय प्रबुद्ध आहे.शब्दातील भावपक्ष कायम ठेवून शेर मांडणे,योग्य ठिकाणी जोड रागांचा वापर करणे,शेरांची मांडणी करतांना मध्यस्थ स्वरांचे महत्व जपणे,अफाट मेहनत,सुक्ष्म विचार,ताल-स्वरांची सौंदर्य दृष्टी ह्या यांच्या गझल गायनातील अतिशय महत्वाच्या आणि भक्कम बाबी आहेत.त्यामुळेच स्नेहलता स्नेहच्या म्हणण्याप्रामाणे ’कानो से नही दिलसे सुननेवाली’ बात,इतर गीतांच्या बाबतीत लागू होईल पण गझलच्या बाबतीत सगळी जबाबदारी ऐकणा-यांवर टाकणे मला पटत नाही.’ग़ज़ल अपने आप दिलमें उतरनी चाहीए’. ती उतरण्यासाठी त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचायला हवी.त्यातही ’मार्केटिंग’ हा महत्वाचा पैलू आहेच...आजच्या काळात हे ही जमायला हवे,व ते ही जमायला हवे.उलट मी असं म्हणेन की ’ते’ नाही जमले तरी ’हे’मात्र जमायलाच हवे....नाही तर त्याचा सुधाकर कदम झाल्याशिवाय राहात नाही....हुसैन बख्श हा माझा आवडता गझल गायक आहे.पण आज तो किती जणांना माहित आहे ? असो...
              माझी गझलशी तोंड ओळख १९६६/६७ च्या दरम्यान यवतमाळला आँर्केस्ट्रा मध्ये असतांना झाली.प्रँक्टीस संपल्यावर रात्री १२/१ च्या नंतर पाकिस्थान रेडिओ लावून गप्पा मारत बसणे,जेवणे वगैरे चालायचे.सकाळी ४/५ ला सर्वजण आपापल्या घराकडे निघाल्यावर झोपायचे,असा आमचा ’रात्र’क्रम होता.त्यावेळी बरकत अली खान,अमानत अली खान,मुन्नी बेगम,इक्बाल बानो,मल्लिका पुखराज,सलामत-नज़ाकत अली, मेहदी हसन,नुरजहान नंतर नंतर ग़ुलाम अली,यांचे गझल गायना सोबतच शास्त्रीय संगीत सुद्धा मनसोक्त ऐकायला मिळाले.त्या काळात रेडिओला पर्याय नव्हता व रात्री फक्त पाकिस्थान रेडिओच सुरु राहात असे.त्यामुळे सतत ऐकून ऐकून मेहदी हसनशी तेव्हा झालेली मैत्री आजतागायत कायम आहे.मेहदी हसन नंतर माझे टाळके सरकवले ते ग़ुलाम अली आणि जगजितसिंग यांनी...दोघांच्या दोन त-हा...पण दोन्हीही काळजात हात घालणा-या.गुलाम अलीच्या गळ्यात हार्मोनियम फिट केली की काय असे वाटावे इतका तयार गळा,हार्मोनियमवर फिरणारी बोटे व डोक्यातील कल्पना सगळे एकजीव होऊन इतक्या आक्रमकपणे पुढे येई की चांगल्या चांगल्या गायक,वादक आणि संगीतकारांनी सुद्धा आश्चर्याने तोंडात बोट घालावे.या उलट जगजितसिंगचे...यांना ऐकणे माझ्यासारख्या खेडे गावात राहणा-याला खूप कठीण जायचे.पुढे पुढे रेकाँर्ड प्लेअर,कँसेट प्लेअर आल्यामुळे या मंडळींना ऐकणे सोपे झाले. आँर्केस्ट्राच्या या काळात गझलने केलेले गारूड मला गझल गायकीकडे घेऊन जाईल असे कधीच वाटले नाही.पण सुरेश भटांची भेट झाली आणि मी मराठी गझल गायकीत स्वतःला झोकून दिले.
        सुरेश भट व डाँ.नईमभाई यांच्यामध्ये अमरावतीत रंगलेल्या चर्चांमुळे माझा गझलचा अभ्यास आपोआप होत गेला, त्यांनी भटांना इस्लामपूर्व गझलेचा शेर काढून दिला त्या प्रसंगी मी आणि भटांचे जीवलग मित्र वलीभाई उपस्थित होतो.मलाही ख-या अर्थाने गझल कळली ती या दोघांच्या चर्चेतून आणि त्यानंतर भटांसोबतच्या बैठकीतून... या बैठकांमध्ये उर्दू गझल व मराठी गझल याची तुलनात्मक चर्चा,त्यातून येणारे नवनवीन मुद्दे,माहिती,बहर,व्याकरण,रदीफ,काफिया,मिसरा,उर्दू गझल गायकांची गायकी,शब्दफेक,स्वररचना,गाण्याच्या पद्धती वगैरे-वगैरे अनेक विषयांवर रात्र-रात्रभर खल चालायचा.सुरेश भट आर्णीला मुक्कामी असले की या चर्चेत कवी कलीम खानही सहभागी व्हायचे.(माझ्या बहुतेक कार्यक्रमाचे सूत्र संचालन कलीम खान करायचे.ते स्वतः उर्दू,मराठीचे जाणकार असून उत्कृष्ट कवी आहेत.आपल्या माहितीसाठी या लेखाच्या शेवटी त्यांच्या रचना देत आहे.)त्यावेळी गझलशिवाय दुसरा विषय नसायचा.मराठी गझल गाणा-यांपासून लिहीणा-यांपर्यंत सा-यांवर ही चर्चा असायची. या चर्चेत गाणा-यांनी लिहीणा-यांवर किंवा लिहीणा-यांनी गाणा-यांवर अतिक्रमण करण्याचा विषय कधीच पुढे आला नाही.मात्र काही वर्षांपुर्वी एका पुस्तकात "संगीताचे गझलेवरील अतिक्रमण" या लेखावरील भाष्य वाचल्यापासून त्यावर लिहावे-लिहावे करता करता जवळ-जवळ सहा वर्षानंतर लिहून झाले
.ते आपणासमोर ठेवत आहे.नीर-क्षीर विवेक बुद्धीने या लेखावर आपल्या प्रतिक्रीया नोंदवाव्या,ही विनंती.

         त्या लेखावरील भाष्यात गायकांवर गझल हडपण्याचा आरोप केला आहे
. तो मला मान्य नाही. कारण गायक ’ही माझी गझल आहे’ असे कधीच म्ह्णत नाही. तो कवीच्या नावाचा उल्लेख करतोच. गेल्या ३५/४० वर्षांच्या कालावधीत मी अनेक कवींच्या रचना स्वरबध्द केल्या, गायिलो,गाऊन घेतल्या आणि अजुनही गाऊन घेत आहे.परंतू कवीच्या नावाचा उल्लेख करूनच. जगजितसिंगची गझल, मेहदी हसनची गझल असा उल्लेख श्रोते करतात, गायक नाही ! त्यामुळे याला जबाबदार गायक होवू शकत नाही. आणि श्रोत्यांचीही फार मोठी चूक होते, असे नाही. ज्या गायकाच्या तोंडून ती श्रोत्यांच्या कानावर पडून लोकप्रिय होते. ती गझल कोणी लिहीली याच्याशी श्रोत्यांना काहीच देणे घेणे नसते. ज्याच्या तोंडून ऐकली असेल त्याचेच नाव ऐकणा-यांच्या तोंडी बसते.त्याला काहीच इलाज नाही. चिकीत्सक जाणकार किंवा रसिक मात्र ती गझल कोणी लिहीली हे माहिती करून घेतात. या प्रकाराला अतिक्रमण म्हणावे का ? तसेच "आशयप्रधान गायनात संगीताला फ़ारसा वाव नसावा" असेही म्हटल्या जाते. यालाही तसा कही फारसा अर्थ नाही.कारण शब्दांना स्वरांचे योग्य अवगुंठन बसले तर ज्या रचना नुसत्या वाचून लोकांच्या मनाचा ठाव घेवू शकत नाही त्या रचना लोकांना आवडायला लागतात, हा माझा अनुभव आहे. "या एकलेपणाचा छेडित मी पियानो" ही स्व.उ.रा.गिरींची रचना शब्दानुरुप स्वररचना करुन कार्यक्रमात सादर करायला लागल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमात फ़रमाईश व्हायला लागली. तो पर्यंत ही रचना लोकांना माहितही नव्हती. त्यामुळे मला वाटते की कवी आणि रसिक यांच्यातील माध्यम किंवा दुवा हा गायक असतो. त्यामुळे त्याला कोणत्याही काव्य प्रकारावर अतिक्रमण करण्याची गरज नाही. सुरेश भटांची "हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही" ही गझल आणि माझी चाल एक रात्रीत तयार झाली. ती गझल भटांची आहे हे कार्यक्रमात सांगूनही सुधाकर कदमची ’हे तुझे अशा वेळी ऐकली का’ असे जर श्रोते म्हणत असतील तर त्यात माझा काय दोष ? त्याला लुटारुपणा म्हणावा का ? शब्दाला पोषक स्वर किंवा स्वराला पोषक शब्द हा सुगम संगीताचा महत्वाचा पैलू आहे. गझल गायनही सुगम संगीत प्रकारामध्येच मोडते. त्यामुळे थोडे फार इकडे-तिकडे होणारच.आणि फारच गंभीरपणे विचार केला तर संगीताच्या अभिव्यक्तीला शब्दांच्या कुबडयांचीही गरज नाही हे वाद्यसंगीतावरून कोणाच्याही लक्षात येईल. तसे नसते तर ४०/४२ वर्षांपुर्वीची "काँल आफ दी व्हँली" ही संतूर,बासरी आणि गिटार या वाद्यसंगीताची रेकाँर्ड लोकप्रिय झालीच नसती.(या रेकाँर्डने त्यावेळचे विक्रीचे सर्व उच्चांक मोडीत काढले होते.) सरोद,सितार,संतूर,बासरी,शहनाई,व्हायोलिन वैगरे वाद्यांना कुठे शब्दांची गरज असते ? बिना शब्दांनीसुद्धा ते श्रोत्यांना मोहवितातच ना ? त्यामुळे गझलेवर संगीताचे अतिक्रमण वगैरे या भाष्याला फ़ारसा अर्थ राहात नाही. हा, हे मात्र खरे की गायकाने शब्दानुरुप स्वररचना करायला हवी. कवीला काय म्हणायचे ते श्रोत्यांपर्यत स्पष्टपणे पोहोचवायला हवे. शब्दोच्चार स्पष्ट असावे. आणि कवीच्या नावाचा उल्लेख करायलाच हवा,हे माझे मत आहे.
          शास्त्रीय संगीत लोकसंगीतापासून तयार झाले. सुरवातीच्या काळात शब्दांशिवाय गुणगुणणे असा प्रकार होता. हळु हळू गुणगुणण्यासोबत शब्दांचाही वापर व्हायला लागला. आणि नंतरच्या काळात लोकगीतांच्या सुरावटीवरुन संगीताचे व्याकरण तयार होवून किंवा राग निर्मिती होवून व्याकरण तयार झाले. अजूनही राग निर्मिती करणा-यांची नावे कोणालाच माहित नाही. आणि श्रोत्यांना त्याच्याशी देणे घेणेही नसते. "भीमसेनचा तोडी ऐकला का" ? "जसराजचा दरबारी ऐकला का" ? किंवा "किशोरीचा भुपाली खरोखरच ऐकण्यासारखा आहे". असेच उद्गार ऐकणा-यांच्या तोंडून निघतात. म्हणून काही या मंडळींनी यावर अतिक्रमण केले असे म्हणता येणार नाही. माझ्या दृष्टीने गायक हा फ़क्त माध्यम असतो. त्याची प्रस्तूती ही त्याच्या प्रकृतीनुसार असते. एकच राग विभीन्न गायकांच्या गळ्यातून वेगवेगळी अनुभूती देत जातो. तसेच वेगवेगळे गझल गायक जरी एकच गझल गात असले तरी त्यांची स्वर रचना, त्यांच्या ढंग,त्यांचे सादरीकरण वेगळे राहणारच. या सर्व बाबींवरुन कोणी कोणावर अतिक्रमण करीत आहे असे का वाटावे हे मला कळले नाही. सर्वसामान्य श्रोता ज्याच्या तोंडून जे ऐकले त्याचे श्रेय गाणा-याला देतो यात अतिक्रमण वगैर प्रकार नाही. जर एखादा गायक दुस-या कवीची रचना आपल्या नावावर खपवत असेल तर त्याला आपण अतिक्रमण किंवा तस्करी म्हणू. जाणकार आणि सर्वसामान्या श्रोता, यातील जाणकार हा गझलकाराचे नाव लक्षात ठेवेल. पण सर्वसामान्य रसिक मात्र गायकाचेच नाव लक्षात ठेवणार याला गायक तरी काय करणार ? यावर एवढेच म्हणावेसे वाटते की कवी, संगीतकार,गायक यांनी एकमेकांच्या हातात हात घालून मराठी गझल व गझल गायकी पुढे नेण्याचा प्रयत्न करुन मराठी गझलला सोन्याचे दिवस दाखवावे.बस्स..........

सुधाकर कदम
सी१सी/१३,गिरीधर नगर.वारजे-माळवाडी,
मुंबई बंगळूर महामार्ग.पुणे ५८
२६/११/२०११ 
kadamsudhakar59@gmail,com
www.gazalgazal.blogspot.com


(एका रोमँटिक मराठी गझलचा मतला व एक शेर.)

मोगरा वेणीत पोरी माळण्याचे दिवस आले
अन्‌ अता हळव्या जीवांना जाळण्याचे दिवस आले

करुनिया लटकाच आता लक्ष्य नसल्याचा बहाणा
पदर वरती ओढणेही टाळण्याचे दिवस आले...कलीम खान.

(उर्दू गझलचा मतला व काही शेर)

जलाए जब तुम्हे शबनम तो मुझको याद कर लेना
उभर आए पुराना ग़म तो मुझको याद कर लेना

तुम्हारे मन के आंगन में,अकेलेपन के पायल की
कभी होने लगे छम छम,तो मुझको याद कर लेना

भले ही भूल जाओ तुम, मुझे ता-ज़िंदगी लेकिन
सुनो जब मौत की सरगम,तो मुझको याद कर लेना...कलीम खान.

Sunday, October 30, 2011

"अशी गावी मराठी गझल" या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...



* मराठी ग़ज़लों के गायक श्री सुधाकर कदम ने सगीत के कई आयामों को पार किया है.अब उन्होंने मराठी़

ग़ज़लों को आकाशवाणी तथा अन्य मंचो के जरिये जनमानस तक पहुंचाना प्ररंभ किया

है...........................................................................................दै.नवभारत,नागपुर.१९८०


* स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-आँपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. .........................दै.नागपुर पत्रिका,११/४/१९८१

* कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात................................................दै.लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२

* सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला............................................................................................ तरूण भारत,पुणे.१६/७/१९८२.

* सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची गझल
 ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ स्वागत केले आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत
पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे.......................................................सुभाष इनामदार, सा.लोकप्रभा,मुंबई.दि.१५ आँगष्ट १९८२.

 
* सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला.दै.लोकसत्ता,२३/७/१९८२

* ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला..........................................................दै.केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२.

* मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी..................................................................................... दै.सकाळ,पुणे.

* गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते...........................................................अनंत दीक्षित,दै.सकाळ,कोल्हापुर.६ जुलै १९८२

* सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले...........................................दै.लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२

* Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches......................................................................... The Hitwad,Nagpur.23/4/1984

* सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली.........................................................................दै.नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४

* कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला असावा....................................................................................................दै.लोकमत,नागपुर.१३/७/१९८४

* मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है..........................दै.चौथा संसार,इंदौर.२७/१२/१९८९

* मराठी गझल गायकीतील भरीव कमगिरीबद्दल अखिल भारतीय गझल परिषदेने कदमांना निदा फाज़ली आणि इलाही ज़मादार यांचे सोबत ’शान-ए-ग़ज़ल’ पुरस्काराने सन्मानित केले.आणि २००९ मध्ये सुरेश भट पुरस्कारासोबत जागतिक कीर्तीचे अर्थतध्न्य डाँ.नरेंद्र जाधव यांचे हस्ते.मा.राजदत्त,डाँ.सुरेशचंद्र नाडकर्णी,आमदार उल्हासदादा पवार,अनंत दीक्षित(संपादक दै.लोकमत,पुणे.) यांचे प्रमूख उपस्थितीत पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात ’गझल गंधर्व’ ही उपाधी बहाल करुन मानपत्र देण्यात आले.विशेष म्हणजे यातील एकही पुरस्कार शासकीय नाही.


या वेळी काही मान्यवरांचे आशिर्वादपर बोल येथे टाकल्याशिवाय राहावत नाही...

स्वरराज छोटा गंधर्व "मराठी गझल गायकीच्या नवीन वाटचालीस माझा आशिर्वाद आहे."(१९७५)

पं.जितेंद्र अभिषेकी "सातत्य आणि परिश्रम आपणास यश मिळवून देईल."(१९७७)

सुरेश भट "महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन".(१९८१)

"गझलनवाज".(१९८२)
गजानन वाटवे "मला आवडलेला गझलिया..."(१९८३)

डा.यु.म.पठाण "मराठी गझलेस योग्य स्वरसाज चढविला".(१९८३)

मा.सुधाकरराव नाईक "शब्द-स्वरांच्या झुल्यावर झुलविणारा कलाकार".(१९८५)

.................काही गायक,पत्रकार,समीक्षक,अभ्यासक,संशोधक आणि चाहत्यांच्या प्रतिक्रीया...........

* करवीर कोकिळा रजनी करकरे देशपांडे * (पार्श्वगायिका,कोल्हापुर.)
१९८२ च्या सुमारास सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता
.व्यक्तिशः मला गझलेबद्दल प्रेम असल्यामुळे ह्या कार्यक्रमास मला आवर्जून बोलावण्यात आले होते.कदमांनी सर्व गझला स्वतः स्वरबद्ध केल्या होत्या.चाली अत्यंत आकर्षक,अर्थाला अनुरुप अशा होत्या.एकूण कार्यक्रम निटनेटका,चांगला झाला व कदमांबद्दल कौतुक वाटले.एकच व्यक्ती हार्मोनियम वाजविते,गाते,बोलते व संगीतही देऊ शकते,हे वेगळेपण होतेच.

* Maharashtra Jaycees *Tha pioneer in tha introduction of MARATHI GAZAL GAYAKI.
(2003)

* मधुरिका गडकरी *(ज्येष्ठ संगीत समीक्षिका,नागपुर.)
विदर्भातील रसिले गझल गायक म्हणून श्री सुधाकरजी कदम महाराष्ट्राला परिचित आहेत
.मराठी गझलांना सुंदर स्वरसाजासह अधिकच रसिल्या स्वरुपात सादर करणे हा या रसिक गायकाचा खरा आनंद आहे.
(’सूरसुधा’दिवाळी अंक,१९९६)

* वामन तेलंग *(संपादक-तरुण भारत,नागपुर)
आर्णीसारख्या आडगावात राहूनही सुधाकर कदमांनी आपल्या गायकीचा रंग
-ढंग जोपासला आणि आर्णीच्या मातीचा गंध महाराष्ट्रात नेला.आपले वेगळेपण ठसविण्यासाठी अनवट अशी वाट निवडली.’मराठी गझल’ हा प्रकार कार्यक्रमासाठी पसंत केला.हिंदी-उर्दू गझल गाणे वेगळे आणि मराठी गझल पेश करणे वेगळे.हिंदी-हिंदुस्थानी,मराठी या केवळ भाषा नाहीत.भाषेबरोबरच त्या त्या भाषांची संस्कृतीही प्रवाहित होत असते.संस्कृतीनुसार भाषांचा बाज बदलत असतो आणि भाषा-वैशिष्ट्यांमुळे संस्कृतीचा मळा श्रीमंत होत असतो.गझलच्या संदर्भात ते अधिकच खरे आहे.कारण तो ढंग काही मराठीचा नव्हे.अरबी-उर्दू ही त्या प्रकारातील काव्याची गर्भगत नाळ.सांगायचा मुद्दा असा की जो प्रकार आपल्या भाषिक कुळातला नाही तो प्रकार घेऊन सुधाकर कदमने आपले कार्यक्रम यशस्वी केले.ही वाट वहीवाट नव्हती.हिंदी-उर्दू गझल अशीच वहिवाट होती.सुधाकरने ती सोडली आणि मराठी गझल लोकप्रिय करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला
(कार्तिकएकादशी/१९९८)

* डाँ.अनंत ढवळे *(गझलकार,पुणे.)
मराठी गझल गायकीच्या उण्यापु-या ४/५ दशकांच्या इतिहासात जे नाव सर्वाधिक ठळकपणे पुढे येते ते म्हणजे सुधाकर कदम होय.सुरेश भटांनी मराठी साहित्याला गझल दिली आणि कदमांनी मराठी संगीताला गझल गझल गायकी.
(गझल गंधर्व विशेषांक,2010)               


* रसिकाग्रणी राजे मधुकरराव देशमुख * (माहुरगड.जि.नांदेड)

’हरचंद सुरीली नग़्मोंसे,
जज़बात जगाए जाते है,
उस वक़्त की तल्ख़ी याद करो,
जब साज़ मिलाए जाते है’....

एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती
,किमया,करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे.माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले त्याचे गमक वरील शरामध्ये आहे.या साडेतीन दशकात मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकले.त्यांची गझल गायकी ऐकली.सुधाकर जेव्हा गझल गायकीकडे वळले त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टिकाही झाली.गझलचा आशय,अर्थ.भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे यात गझल गायकाचे कौशल्य आहे.आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा अधिक अवधान बाळगले आहे.पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून विलंबित ख्याल गायक,ज्याला अक्षर मंत्राचा साक्षात्कार झाला आहे,तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल.या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे.स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले
.त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्य पुरुषोत्तम कासलीकरांकडे असायचा.यावेळी त्यांच्या घराला सम्मेलनाचे रूप यायचे.या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे असत.छोटा गंधर्व सुधाकरशी विशेष सलगीने,आपुलकीने वागत असतांना मी पाहिले आहे.अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्रात व मध्यप्रदेशात गाजली.त्यांच्या मैफिलींचे इतिवृत्त वर्तमानपत्रांतून समिक्षणात्मक रुपाने मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा.

* डाँ.राजेश उमाळे *(सुप्रसिद्ध मराठी गझल गायक,संगीतकार,संशोधक.अमरावती.)
१९७१ ते १९८० या काळात विदर्भाचे गायक सुधाकर कदम यांनी गझलांचे अनेक लहान मोठे कार्यक्रम सुरू केल्याचे त्यांच्या मुलाखतीवरून आढळून आले
.मैफिलीचा दर्जा प्राप्त करणा-या या कार्यक्रमांनी गझलचे रसिक तयार होणे सुरू झाले.गझलचा परिचय झाला.मराठी गझलची सुरवात सुरेश भटांपासून मानली तर गझल गायनाची सुरवात सुधाकर कदमांपासून मानावी लागेल.म्हणजे मराठी गझल गायकीचे वय फार फार तर ३० ते ३५ वर्षे मानावे लागेल.

* प्रा.काशिनाथ लाहोरे *(दै.लोकमत प्रतिनिधी.यवतमाळ)
गझलसम्राट सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी महाराष्ट्राचे आद्य मराठी गायक म्हणून ज्यांचा गौरव केला .ज्यांना स्वतः सुरेश भटांनी स्वहस्ताक्षरात
’महाराष्ट्राचे मेहदी हसन’म्हणून ३० मार्च १९८१ रोजी शेरा देऊन स्वाक्षरी केली.ज्यांना सुरेश भटांच्या सहाव्या स्मृती दिनी २००९ साली’गझल गंधर्व’या किताबाने पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाँ.नरेंद्र जाधव यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.मराठी गझल गायकी महाराष्ट्रभर रुजविण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा ’तो’ कलावंत म्हणजे आर्णी गावातील साधा संगीत शिक्षक सुधाकर पांडुरंग कदम होय.

* अनंत दीक्षित * दै.लोकमत,पुणे.
पुण्यात बांधण जनप्रतिष्ठान आणि अभिजात गझल या संस्थेच्या वतीने सुरेश भट यांचा स्मृतीदिन झाला.यावेळी जेष्ठ गझल गायक सुधाकर कदम यांना गझलगंधर्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे.अशी गावी मराठी गझल या स्वरुपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत.गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्व असते.सांगीतिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील साधा शिक्षक माणूस साहित्याची आणि रसिकांची कशी सेवा करतो याचा आदर्श कदम यांनी उभा केला.
(संपादकीय १७ मार्च २००९)

* प्रा.डाँ.श्रीकृष्ण राऊत *(कवी,गझलकार,संशोधक.)
कवीला काय म्हणायचे आहे
? काय सांगायचे आहे ? काय सुचवायचे आहे ? ते कवी कमीतकमी आणि नेमक्या शब्दात मांडतो तरी आशयाचा एखादा पैलू,अर्थाचा पदर रसिकाला गझल वाचून पुर्णपणे उलगडेलच असे नाही आणि गझलच्या बाबतीत तर ’समजणे’ हे क्रियापद किती थिटे आहे हे आपल्याला कालांतराने का होईना पण समजल्या शिवाय राहत नाही तेव्हा अर्थाच्या पूर्णत्वाकडे आणि आशयाच्या सघनतेकडे रसिकाला हळुवार सुरावटीतून घेऊन जाण्याचे काम गझल गायक आपल्या गळ्याच्या ताकदीने करीत असतो.आणि मला वाटतेगझल गायनाचं खरं सामर्थ्य यातच आहे.ही जाण सुधाकर कदमांना आहे याचा मनापसून आनंद झाला.ती जसजशी विकसित झली,तसतशी गझल त्यांना प्रसन्न झाली.
(लोकमत, ’साहित्यजत्रा’ १०.७.१९८३)

* मनोज पाटील माहुरे *(काठोडा,यवतमाळ.)
मराठी गझल गायनाच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असणारा हा कलावंत आजच्या जाहिरात व शोमँनशीपच्या युगात मागे पडला ही खरी शोकांतिका आहे,मराठी गझलला त्यांनी दिलेल्या बंदिशी म्हणजे सरस्वतीने त्यांना मुक्तहस्ताने दिलेलं दान आहे.सुरेश भट सुद्धा आमच्या समोर हे मान्य करायचे.

* अनिल कांबळे *(गझलकार,पुणे.)
सुरेश भट म्हणजे मराठी गझल हे समीकरण जसे रुढ झाले आहे तसे १९९० च्या दशकात मराठी गझल गायकी म्हणजे सुधाकर कदम हे समीकरण रुढ होते
,नव्हे ख-या अर्थाने सुरवातच सुधाकर कदमांनी केली.१९८२ मध्ये पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेला ’अशी गावी मराठी गझल’ हा कार्यक्रम मराठी गझल गायकीबद्दल मार्गदर्शक ठरावा असा होता.स्वतः सुरेश भटांनी निवेदन केलेल्या या कार्यक्रमात सुधाकर कदमांनी सादर केलेल्या...

’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही,चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’
’झिंगतो मी कळे ना कशाला,जीवनाचा रिकामाच प्याला’

या सारख्या अनेक गझलांच्या बंदिशी आजही रसिकांच्या मनात रेंगाळत आहे
.या कार्यक्रमानंतर कदमांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो कार्यक्रम केले.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसारख्या ग्रामीण भागात राहून त्यांनी एकलव्यासारखी साधना करून अतिशय कष्टाने मराठी गझल गायक म्हणून मान्यता मिळविली.त्या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा सलग तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही गायक नसल्याचे सुरेश भट सांगत.

* अजीम नवाज राही *
कविवर्य सुरेश भट यांच्या समर्थ लेखणीतून प्रसवलेल्या गझलांना खरा न्याय दिला तो आर्णी
(जि.यवतमाळ) येथील प्रख्यात मराठी गझल गायक सुधाकर कदम यांनी.प्रसिद्ध मराठी कवी कलीम खान यांच्या रसाळ सूत्रसंचालनाखाली या जोडगोळीचा ’अशी गावी मराठी गझल’हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला.इंदूर,उजैन,नागदा या मध्यप्रदेशातल्या शहरांमध्ये झालेल्या सुधाकर आणि कलीम खान याच्या मैफिलीच्या आठवणी आजही तिथल्या रसिकांच्या मनात दरवळत आहेत.नंतर मराठी गझलेच्या क्षितिजावर भीमराव पांचाळे यांचा उदय झाला.अल्पावधीत मराठी गझलेच्या प्रांतावर या प्रतिभासंपन्न गायकाचे साम्राज्य पसरले.

(दै.सकाळ,नागपुर.११.११.२००९)
"अशी गावी मराठी गझल"

ज्यांना मराठी गझल गायकीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल त्यांनी या कार्यक्रमातील सुरेश भटांचे प्रास्ताविक आणि गझल नंतरचे निवेदन ऐकावे...

 

"अशी गावी मराठी गझल"





संगीत आणि साहित्य :