Saturday, July 15, 2023
Friday, July 14, 2023
राग-रंग,लेखांक १५.किरवाणी
सवाई गंधर्व संगीत महोत्सवातील पं. शिवकुमार शर्मा यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला संगतीसोबत संतुरवर सादर केलेला किरवाणी व मेहदी हसन यांच्या 'शोला था जल बुझा हूँ' या गझलमधील किरवाणी रागाने मला अक्षरशः पछाडले होते. अजूनही युट्युबवर या दोघांना ऐकत असतो.पंडितजी आणि उस्तादजी म्हणजे संगीतातील गणितज्ञच.संतुरच्या गोड ध्वनीलहरींसोबत विविध प्रकारच्या लयकाऱ्या,तिहाया आणि त्यास तोडीस तोड झाकिरभाईचा तबला म्हणजे 'सोने पे सुहागा'.तसेच मेहदी हसन यांच्या जव्हारदार मुलायम आवाजातील गझलचचे शब्द व स्वरांची जादूगरी जादू करणारच ना!
तर असा हा किरवाणी मूलतः दक्षिण भारतीय राग आहे.पण उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये इतका रुळला की दक्षिणोत्तर फरकच राहिला नाही.गायकांपेक्षा वादकांनी याला एकदम हृदयाशी धरले.चित्रपट संगीत,गझल,ठुमरी यात किरवाणी जास्ती रमला म्हणा किंवा किरवाणीने यांच्यावर जादू केली म्हणा.रोनू मुजुमदार (बासरी), निखिल बॅनर्जी (सतार) आशा अनेक वादकांनी आपल्या वाद्ययंत्रावर व चित्रपटातील संगीतकारांनी आपल्या संगीत दिग्दर्शनात किरवाणी राग भरपूर वापरला आहे.संपूर्ण जातीच्या या रागात गांधार, धैवत स्वर कोमल व बाकी स्वर शुद्ध आहेत.हा राग उत्तर भारतीय थाट पद्धतीच्या कोणत्याच थाटात बसत नाही.
अमक्या रागाचे स्वर अमक्या रसाचे असतात.असे म्हणण्यात मला तरी गम्य वाटत नाही.प्रत्येक रागात शृंगार,वीर,भक्ती,शांत,विरह रसाची गाणी आपल्याला बघायला मिळतात.ती कमाल संगीतकाराची असते.खालील चित्रपट गीते व भावगीते पहिली तर आपणास हे कळून येईल.
सुगम संगीतामध्ये राग नियमाला थोडेसे डावलून इतर स्वर घेण्याचा खटाटोप केल्या जातो. पण त्यामुळे गाण्यांची लज्जत वाढते. बारकाईने पाहिल्यास किरवाणीमधील खालील गाण्यात कधी शुद्ध धैवत,शुद्ध गांधार व कोमल निषाद यांचाही वापर करून चालीचा गोडवा वाढवलेला दिसतो.खरे म्हणजे ऐकताच हृदयाला स्पर्श करेल तेच खरे गाणे! मग ते शास्त्रीय असो वा अशास्त्रीय.मी आजही शास्त्रीय,सुगम,चित्रपट गीते,ऊर्दू गझल,कव्वाली,पाश्चात्य या सर्व प्रकारचे संगीत ऐकतो,आनंद घेतो.
● चित्रपट गीते...
'ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा',किशोर कुमार.चित्रपट-दिल्ली का ठग. 'तुम बिन जाऊं कहां',रफी-किशोर.चित्रपट-प्यार का मौसम.'बेकरार दिल तू गाये जा',किशोर कुमार.चित्रपट-दूर का राही.'मेरा दिल ये पुकारे आ जा',लता.चित्रपट-नागिन.'का करू सजनी आये न बालम', येसुदास. चित्रपट-स्वामी.'ये समा समा है ये प्यार का', लता.चित्रपट-जब जब फुल खिले.'आनेवाला पल जानेवाला है',किशोर कुमार. चित्रपट-गोलमाल.'रिमझिम गिरे सावन', किशोर कुमार.चित्रपट-मंजिल.'ये रात भीगी भीगी ये मस्त हवाये',लता-मन्ना डे. चित्रपट-चोरी चोरी.'चली जा छोड के दुनिया',लता.चित्रपट-हम लोग.'गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं', किशोर कुमार.चित्रपट-लाल पथ्थर.'ओ निंद न मुझकोआये', लता-हेमंत कुमार.चित्रपट-पोस्ट बॉक्स ९९९.'मेरी भिगी भिगी सी पलकों पे रह गये', किशोर कुमार.चित्रपट-अनामिका.'कहे झूम झूम रात ये सुहानी',लता.लव्ह मॅरेज.'दिल के अरमाँ आंसूओ मे बह गये', सलमा आगा.चित्रपट-निकाह.'मेरी निंदो मे तुम मेरी खव्वाबो मे तुम', किशोर कुमार.चित्रपट-नया अंदाज.'पुकारता चला हूँ मैं', रफी.चित्रपट-मेरे सनम'आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं', आशा भोसले.चित्रपट-
'मैं प्यार का राही हूँ', आशा,रफी.चित्रपट-एक मुसफिर एक हसीना.'याद न जाये बिते दिनो की', रफी.चित्रपट-दिल एक मंदिर.'एक राधा एक मीरा',लता.चित्रपट-राम तेरी गंगा मैली.'मैं शायर तो नहीं',शैलेंद्र सिंग. चित्रपट-बॉबी.
'तू सफर मेरा तू ही मंजिल मेरी', अर्जित सिंग.चित्रपट-ऐ दिल है मुश्किल.'नजर जो तेरी लागी मैं दिवानी हो गयी', श्रेया घोषाल.चित्रपट-बाजीराव मस्तानी.'तुमको पाया है के जैसे खोया हूँ', सोनू निगम.चित्रपट-ओम शांती ओम.
'तोसे नैना लागे', क्षितिज-शिल्पा.चित्रपट-अन्वर.'अंग लगा दे रे', आदिती पौल-शैल हाडा.गोलीयों की रास लीला-राम लीला.'हर तरफ तू ही दिखे', शान-महालक्ष्मी अय्यर.
●उर्दू गझल...
'शोला था जल बुझा हूँ'-मेहदी हसन. 'ऐ हूस्ने बेपर्वा तुझे शबनम कहूँ शोला कहूँ', 'पारा पारा' -गुलाम अली. 'बेसबब बात बढाने की जरूरत क्या है' -जगजीत सिंग. 'हाथ मे लेके मेरा हाथ ये वादा कर लो' -हरिहरन.
●मराठी गाणी...
'अवमानीता मी झाले' -नाट्यगीत. 'सूर सुख खणी', नाटक-संगीत विद्याहरण. 'डोळ्यामधले आसू पुसती ओठांवरले गाणे' -सुधीर फडके. 'ही चिकमोत्याची माळ', -निरुपमा डे. 'विसर गीत विसर प्रीत' - सुधीर फडके.'अशी पाखरे येती' -सुधीर फडके.'तिन्ही लोक आनंदाने भरूनि गाउ दे' -सुधीर फडके'एकाच या जन्मी जणू',आशा भोसले.चित्रपट-आपली माणसं .'जिवलगा कधी रे येशील तू ?' आशा भोसले.-सुहासिनी.'तुझी प्रीत आज कशी स्मरू'.आशा भोसले.चित्रपट- अपराध.'सांग कधी कळणार तुला', सुमन कल्याणपूर,महेंद्र कपूर.चित्रपट-अपराध.
'सैराट झालं जी',अजय-चिन्मयी. चित्रपट-सैराट.'दिल की तपिश है आफताब', राहुल देशपांडे. चित्रपट-कट्यार काळजात घुसली.
●Melodies fusion...
'Voice of the moon' anoushka shankar france 2014,Rag kirwani on satar- with sanjeev shankar (shehnai),danny keane (cello & piano),ayanna vitter,johnson (vocal-piano-celli),pirshanna thevarajah (indian percussion), manu delago (hang-drums-percussion).
'Kirwani' anoushka shankar. Live 2019.
'The best of firdaus orchestra with anoushka shankar'-expo 2020 dubau.
अवश्य ऐकावे.यात किरवाणी रागावर आधारित धून आहेत. युट्युबला सतार वादन ऐकताना मला अचानक सापडलेली सामुग्री.
●मराठी गझल गायकीच्या सुरवातीच्या काळात (१९८१/८२) मी डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची
"दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना
आरती जी गात आहे तीच माझी अर्चना..."
ही गझल किरवाणीमध्ये स्वरबद्ध केली होती.त्यानंतर
२००६ मध्ये मीरा सिरसमकर या कवयित्रीच्या बालगीतांचा 'खूप मज्जा करू' शिर्षकाचा एक अलबम पुण्याच्या 'फाऊंटन म्युझिक कंपनी'ने बनविला होता.संगीत दिगदर्शन माझे होते.त्यात किरवाणी रागावर आधारित एक सुंदर पाऊसगाणे आहे.गायिका नेहा दाऊदखाने सिन्हा हिने अप्रतिम गायिलेले हे गाणे आपण माझ्या 'गीत-गझलरंग' या युट्युब चॅनलवर ऐकू शकता.ऐका, आणि घरातील बाल गोपालांसह आपणही आनंद घ्या.
रिमझिम रिमझिम पाऊस आला
भिरभिर भिरभिर वारा सुटला
या रे नाचू या, थेंब टपोरे झेलू या
झेलू या झेलू या झेलू या
लख लख लख लख विजा चमकल्या
ढगांमधे ढम् ढोल वाजला
कटडम कटडम गारा पडल्या
भिजून सारे वेचू या
या रे नाचू या, थेंब टपोरे झेलू या
झेलू या झेलू या झेलू या
वाटांमधुनी पाणी आले
जागो जागी तळे साचले
इथले तिथले मार्गही अडले
शाळेचे तर रस्ते बुडले
पाटी दफ्तर घेऊ या
या रे नाचू या, थेंब टपोरे झेलू या
झेलू या झेलू या झेलू या
'रिमझिम'ची युट्युब लिंक...
https://youtu.be/zK7Mnj-YblA
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'मंथन' पुरवणी.रविवार दि.९ जुलै २०२३
मज सांग...
मज सांग आज तुझ्याकडे उमलून मी येऊ कशी
भवतालच्या नजरांस या चुकवून मी येऊ कशी
कुठल्या घराचा उंबरा खिळवून मजला ठेवतो
तुझिया करी उल्केपरी निखळून मी येऊ कशी
आली अचानक कोठुनी ही शीळ चंदेरी तुझी
माझ्या मनाच्या पायऱ्या उतरून मी येऊ कशी
माझ्याच श्वासांचा उभा आहे पहारा भोवती
आयुष्य हे की पिंजरा निसटून मी येऊ कशी
-ज्योती राव बालिगा
Sunday, July 2, 2023
राग-रंग, लेखांक १४.
चारुकेशी
चारुकेशी हा राग दक्षिणेकडून उत्तरेकडे आलेला एक अतिशय गोड राग आहे.दक्षिण भारतीय पंडित व्यंकटमखी यांच्या गणितीय बाहत्तर थाट प्रणालीतील सव्वीसाव्वा थाट आहे.कर्नाटक संगीतातील 'मुथुस्वामी दीक्षितार स्कुल'मध्ये याला 'तरंगिनी' म्हणतात.(चारुकेशीचा अर्थ सुकेशा किंवा सुंदर केशसंभार असलेली स्त्री असा पण काढता येतो.) धैवत,निषाद कोमल आणि इतर स्वर शुद्ध असलेला संपूर्ण जातीचा हा राग आता उत्तर भारतीय संगीतामध्ये पण मस्त रुळला आहे.पण याला उत्तर भारतीय संगीत पद्धतीमधील कोणत्या थाटात बसवावे हा प्रश्नच आहे!
मुळात उत्तर भारतीय गायन/वादन पद्धती व उत्तर भारतीय गायन/वादन पद्धती अतिशय भिन्न आहेत.उत्तर भारतीय पद्धतीमध्ये गायक/वादकांना आपल्या कलाविष्काराला भरपूर वाव असल्यामुळे त्याला मनाप्रमाणे राग मांडणी करून गाता येते.दक्षिण भारतीय पद्धतीमध्ये कलाकारांना ज्या रचना लिहून ठेवल्या आहेत त्या परंपरेने गाव्या/वाजवाव्या लागतात.(काही कलाकार अनेक उत्तर भारतीय राग उत्तर भारतीय पद्धतीने सादर करतानाही दिसतात.)
जागतिक संगीतामधील सप्तक म्हणजे एक चमत्कार आहे.शेतकऱ्याप्रमाणे मशागत करून सात स्वर पेरत जा व आपापल्या कल्पनेप्रमाणे विविध सुरावटींचे पीक घेत रहा. जमिनीतून येणाऱ्या पिकाप्रमाणे अविरत चालणारी प्रक्रिया आहे ही.अर्थात ही जमीन सुपीक करण्यासाठी संगीताचे विशुद्ध शिक्षण,मेहनत व रियाजाचे खत यात घालावे लागते.तसेच शुद्ध सोने मिळविण्यासाठी जसे तप्त मुशीतून जावे लागते .तसे यातून तावून सुलाखून निघाल्यावर मग सोन्याप्रमाणे चकाकणाऱ्या स्वरांच्या लगडी निर्माण होतात.शेतकरी जशी पोटाची भूक भागवतो तशी माणसाची मानसिक भूक हे अस्सल संगीत भागवत असते.कुठल्याही देशाचे वा प्रांताचे असो.संगीत हे संगीतच असते.पाश्चात्य संगीतामध्ये दक्षिण भारतीय संगीताप्रमाणे संगीतकारांनी ज्या रचना करून ठेवल्या त्या रचना जशाच्या तशा सादर कराव्या लागतात. अर्थात अशा रचना करणारे संगीकार उच्च कोटीचे असतात.नव्या नव्या कल्पना साकार करून नवनव्या सुरावटी तयार करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे असते.
आपले राग म्हणजे खरोखरच एक चमत्कार आहे…एकाच रागात शब्दानुरूप सुरावटी दिल्या तर वेगवेगळ्या भावाभिव्यक्ती करता येते. भले त्या रागाचा गानसमय कोणताही असो. “पुछो ना कैसे मै ने रैन बिताई” हे मन्ना डॆंच्या आवाजातील चित्रपटगीत अहिर भैरव रागात स्वरबद्ध केले आहे.हे गीत केव्हाही ऐका कानाला गोडच वाटते.गानसमयाप्रमाणे विचार केला तर हे फक्त सकाळीच गोड वाटायला हवे…पण तसे होत नाही.याचाच अर्थ असा की गानसमयापेक्षा शब्दांना योग्य तो स्वरसाज चढणे आवश्यक असते.मग तो राग कोणताही असो.याच रागात शंकर जयकिशन या महान संगीतकार जोडीने “बाजे पायल छम छम होके बेकरार” हे वेगळ्या बाजाचे गाणे कंपोज केले आहे.(भलेही ते रॉन उडविन या पाश्च्यात्य संगीतकाराच्या मूळ रचनेवर बेतलेले असू दे) पण ही दोन गाणी केव्हाही ऐकली तरी चांगलीच वाटतात.पिढ्या न पिढ्या अमुक राग अमुक वेळीच गायिल्या जावा हे बिंबवल्यामुळे राग-गानसमयाच्या संदर्भात मेंदूत सगळा केमिकल लोचा झाला असावा,असे मला वाटते….
सुगम संगीतामध्ये काव्यातील शब्दांचे भाव आणि त्याला अनुरूप केलेली सुरावट यांचं एक नातं असतं. काव्यानुरूप सुरावट असली की,काव्यातील शब्दांनुसार प्रेम,
शृंगार,विरह,कारुण्य,भक्ती,आळवणी,विनवणी असे सर्व भाव रसिकांच्या हृदयापर्यंत थेट पोहोचतात.म्हणून काव्यानुरूप सुरावट असणे महत्वाचे असते.यात शास्त्रीय संगीतातील रागाच्या गानसमयापेक्षा काव्यातील शब्दांना प्राधान्य असल्यामुळे रसिकवर्ग, शब्द आणि स्वरांचा समसमा आनंद घेऊ शकतात.मग ती धून कोणत्याही रागात असो!
खालील प्रतिथयश व नवोदित कलाकारांनी सादर केलेला चारुकेशी युट्युबवर उपलब्ध आहे...
पं. रविशंकर, पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा पं. अजय पोहनकर, उस्ताद शाहिद परवेज, उस्ताद राशीद खान, संजीव अभ्यंकर,पं. अजय चक्रवर्ती, पं. तेजेंद्र मुजुमदार, संदीप रानडे, डॉ. एल.सुब्रमण्यम (कर्नाटक पद्धती), चारुकेशी वर्णम (कर्नाटक) प्रतिभा सारथी,वंदना कृष्णमूर्ती, डॉ. जयंती कुमारेश (वीणा), श्री आर.कुमारेश (व्हायोलिन) कर्नाटक पद्धती,
'पिया मोरा रे' हा कौशिकीने गायिलेला दादरा मला खूप आवडतो. सरोज यांनी वाजविलेली दिलरुबा या वाद्यावरील चारुकेशी धून पण ऐकण्यासारखी आहे.(याचीच तारशहनाई करून पण वाजविल्या जाते.) दीपक पंडित (व्हायोलिन) आणि पारस नाथ (बासरी) यांची जुगलबंदी पण श्रवणीय आहे.
●हिंदी गाणी...
'इक तू जो मिला सारी दुनिया मिली', लता. 'एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है' (एकाच रागातील आनंदी आणि दुःखी गाणं) चित्रपट-हिमालय की गोद मे.
'है मेरे साथ तेरी वफा मैं नहीं तो क्या', लता.चित्रपट-हिंदुस्थान की कसम.'छोड दे सारी दुनिया किसीं के लिए', लता.चित्रपट-सरस्वतीचंद्र. 'है इसी में प्यार की आबरु', लता.चित्रपट-'अकेले है चले आओ जहां हो' रफी. चित्रपट-राज. 'शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम', आरती मुखर्जी, जसपाल सिंग.चित्रपट-गीत गाता चल.
'बैया ना धरो ओ बलमा', लता.चित्रपट-दस्तक. 'वो भुली दासतां लो फिर याद आ गयी', लता. चित्रपट-संजोग. 'कोई जब तुम्हारा हृदय तोड दे', मुकेश.चित्रपट-पूरब और पश्चिम. 'बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है', लता.चित्रपट- आरजू . 'जो हमने दासतां अपनी सुनाई आप क्यूँ रोये',लता.चित्रपट-वोह कौन थी. 'मुहब्बत के सुहाने दिन,जवानी की हसीं राते', रफी. चित्रपट-मर्यादा. 'किसी राह में किसी मोड पर कहीं चल न देना तु छोडकर', लता,मुकेश.चित्रपट-मेरे हमसफर 'तेरे नैना क्यूँ भर आये', लता.चित्रपट-गीत. 'झूठ बोले कौवा काटे', लता,शैलेंद्र सिंग.चित्रपट-बॉबी.'बेखुदी मे सनम',लता,रफी.
चित्रपट-हसीना मान जायेगी. 'और इस दिल में क्या रक्खा है', आशा भोसले,सुरेश वाडकर.चित्रपट-इमानदार. 'मेघा रे मेघा रे', लता,सुरेश वाडकर. चित्रपट-प्यासा सावन. 'धरती सूनहरी अंबर नीला', लता, उदित नारायण.चित्रपट-वीर झारा. 'तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है', कुमार शानु,
साधना सरगम. चित्रपट-दिवाना. 'आहिस्ता आहिस्ता निंदिया तू आ', उदित नारायण,साधना सरगम.चित्रपट-
स्वदेस. 'आज दिल पे कोई जोर चलता नहीं', लता.
चित्रपट-मिलन 'चलो सजना जहां तक घटा चले', लता.
चित्रपट-मेरे हमदम मेरे दोस्त.'जाने जाना ओ जाने जाना', महेश गढवी, सपना मुखर्जी.चित्रपट-जाँबाज 'जब तक सांसे चलेंगी', सवाई भट्ट.चित्रपट-सांसे. 'प्यार क्या होता है',कविता कृष्णमूर्ती,उदित नारायण. 'दिल तो है दिल दिल का ऐतबार क्या कीजे', लता. चित्रपट-मुकद्दर का सिकंदर. 'ये मेहंदी के बुटे इनके रंग अनोखे', उदित नारायण,अलका याज्ञीक. चित्रपट-हमको तुमसे प्यार हैं.
'कितक दिन हरि सुमिरन बिन खोये',पं. जितेंद्र अभिषेकी.
'सुन चरखे दि मिठी मिठी कूक', नुसरत फतेह अली.
झिना झिना झीना रे उडा गुलाल' अर्जित सिंग.
'ओ कडी आ मिल सावल यार वे' कमाल खान.
'मैं होश मे था तो फिर ऊस पे मर गया कैसे', 'तुम आये हो न शबे इंतजार गुजरी है', 'अब दिल की तमन्ना को अश्कों मे बहाते है','जब उस जुल्फ की बात चली' मेहदी हसन.
'ऐसा लगता है जिंदगी तुम हो',चित्रा सिंग.
'दुःख की लहर ने छेडा होगा','पापी पपीहा बोले,ऎसे मे जी ना डोले',गुलाम अली.
●मराठी...
'अवघे पावन पंढरपूर', पं. जितेंद्र अभिषेकी.
'ऋतू बरवा,ऋतू हिरवा', आशा भोसले.
'खेळ मांडला', अजय गोगावले चित्रपट-नटरंग.
'हे सुरांनो चंद्र व्हा', अर्चना कान्हेरे.नाटक-ययाती देवयानी.
(संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी असल्यामुळे त्यांनी गायिलेले जास्ती भावते.)
'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी',सुरेश वाडकर.
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'मंथन' पुरवणी.रविवार २ जुलै २०२३
Monday, June 26, 2023
हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
कोरस व वेस्टर्न तालवाद्यांचा वापर करून संगीबद्ध केलेली
'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे,
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे'
ही माझीच गझल प्राजक्ता सावरकर शिंदेच्या आवाजात सादर करीत आहे. संगीत संयोजन मिलिंद गुणे यांचे असून ध्वनिमुद्रण पुण्याच्या पंचम स्टुडिओत केले आहे.मिक्सिंग व मास्टरिंग अजय अत्रे यांनी केले.मराठी गझल गायकीतील हा पहिलाच प्रयोग आहे.आवडणे,नावडणे हा आपला हक्क आहे.त्यामुळे मनमोकळ्या प्रतिक्रिया अपेकक्षित.
राग पुरिया कल्याण
#राग_रंग १३
मारवा थाटोत्पन्न पुरिया कल्याण हा राग यमन आणि पुरिया मिळून बनला आहे.त्यामुळे याचे नाव पुरिया कल्याण असे पडले आहे.ढोबळमानाने पूर्वांगात पुरिया व उत्तरांगात यमन असे याचे रूप असून यात दोन रागाचे मीलन घडवणारा पंचम स्वर अतिशय महत्वाचा आहे.कोमल रिषभ व तीव्र मध्यम असलेला हा राग गायक आणि वादकांचा अतिशय आवडता आहे. अशा प्रकारे एक वा अधिक रागाचे मिश्रणातून तयार झालेल्या रागास मिश्र राग म्हणतात.पण हे मिश्रण रंजकच असायला हवे.हे मात्र निश्चित! (हे मिश्रण ज्या कुणी केले असेल त्याला साष्टांग दंडवत) भैरव बहार, हिंडोल बहार, बागेश्री बहार,भूप कल्याण ,केदार नट,सुहा कानडा,सुहा बिलावल,जैत कल्याण,तिलक कामोद,यमन कल्याण,जलधर केदार,गौड मल्हार,जयंत मल्हार,गौड सारंग,कामोद नट,हमीर नट,जोग कौंस,मधु कौंस,मेघ मल्हार,कौशी कानडा, बसंत बहार,अहिर भैरव,नट भैरव,नट बिहाग वगैरे वगैरे ही मिश्र रागांची उदाहरणे आहेत. (असाच एक, दोन रागांचे मिश्रण वाटणारा 'गोरख कल्याण' नावाचा राग आहे.पण यात कल्याण कुठेच दिसत नाही.) गायक वादकांना मिश्र रागात आपली कला मांडताना भिन्न प्रकारच्या दोन रागांची रंजक मांडणी करण्यास खूप वाव असतो.तसे हे काम अत्यंत कौशल्याचे आहे यात वाद नाही.एक मात्र खरे की असे राग गायिल्याने गायकाची स्वरावरील हुकूमत दिसून येते,हे मात्र नक्की.
संगीतामध्ये रागांची रचना रसोत्पत्तीसाठीच झाली असावी असे म्हणतात.पण फक्त स्वरांनी रसोत्पत्ती कशी होणार? त्यासाठी शब्द पण हवे ना! संगीताला काव्याची जोड दिल्याशिवाय ते समाजमनावर प्रभाव पाडू शकत नाही.उत्कृष्ट काव्य कशाला म्हणावे यावरील एक संस्कृत श्लोक मला सापडला.तो असा:-
सुस्वरं सुरसं चैव सुरागं मधुराक्षरम् |
सालंकार सप्रमाणं च षड्वर्ग्य गीतलक्षणं ||
पूर्वीच्या काळी धृपद गायकीमध्ये विविध प्रकारचे काव्य असायचे. रागाईतकेच शब्दांना पण त्या काळी खूप महत्व असावे असे तानसेन रचित राजा मानसिंगांची प्रशंसा असलेल्या खालील धृपदावरून दिसून येते.
छत्रपति मान राजा, तुम चिरंजीव रहौ जौलो ध्रुव मेरू तारो |
चहूं देस से गुनीजन आवत, तुम पै धावत सबहिं को जग उज्यारौ ||
तुमसे जो नहीं और कासे जाय कहूँ दौर, मोये रक्षा करन हारौ |
देस करोरन गुनीजन कौं अजाचक किये तानसेन प्रति पारौ ||
राजे रजवाड्याची प्रशांसाच धृपदात नसायची.तर नखशिखांत अंग वर्णन,ऋतू वर्णन वगैरे काव्य पण असायचे.हे तानसेनाच्याच खालील धृपदावरून लक्षात येते.
झुमि झुमि आवत नैना भारे तिहारे | विथुरी अलकै स्याम घन सी लागत
झपकि झपकि उधरि जात मेरे जान तारे | अरुन बरन नैना ता मैं लाल लाल
दोरे तापर यह मौज वारि वारि डारै | तानसेनि कौं प्रभु सदाई छके रहत
कोकिल की धुनि मोहिं बिन अंजन का रै |
त्या मानाने ख्याल गायकीत शब्दांपेक्षा स्वरांना जास्ती महत्व देत असल्याचे दिसते.अर्थात काही मान्यवर गायक याला अपवाद असतीलही.पण बहुतेक गायक स्वरमांडणीकडेच लक्ष देत असल्याचे दिसून येते.जुन्या ग्रंथात श्रुतीची दिप्ता,आयता, मृदू,मध्या व करुणा अशी वर्गवारी केली आहे.पण निरनिराळ्या रागांचा रसांशी संबंध लावण्याच्या कामी या वर्गवारीचा उपयोग होईल असे वाटत नाही.तसेच...
सरी विरेद्भुते रौद्रे धो बीभत्से भयानके |
कार्यो गति तू करूणे हास्यशृंगारयोर्मपौ ||
स्वर आणि रस यांचा संबंध दाखविणारा असा एक संस्कृत श्लोक आहे.पण तेवढ्यावरून राग व रसाचा संबंध ठरविता येत नाही.ते काहीही असले तरी संगीताचा मुख्य उद्देश आनंद निर्मिती हाच आहे.
मला जसराजजींचे गाणे खूप आवडायचे.त्यांनी गायिलेल्या पुरीया कल्याणने मला अक्षरशः वेड लावले होते.यवतमाळला आमच्या ऑर्केस्ट्रामध्ये उत्तम जुळे म्हणून गायक व हार्मोनियम वादक मित्र होता.जसराजजींचे त्याच्याशी नातेसंबंध असल्यामुळे मुंबईला गेला की त्यांना भेटायचा. त्याचेसोबत मी सुध्दा दोन तीनदा पंडितजींकडे जाऊन आशीर्वाद घेऊन आलो. तरुणपणीच्या शास्त्रीय गायनाच्या मैफिलीत मी बहुतेक त्यांच्या बंदिशी गायचो.
●
-सुधाकर कदम यांची धुंद मैफल-
यवतमाळ ता.२२ (वार्ताहर)
'प्रीत मोरी लागी तुमसंग' ह्या
गोरख कल्याण रागातील मोठ्या
ख्यालाने सुरवात करून लगेच
छोटा ख्याल 'नेक कृपा कर आये'
गाऊन सुधाकर कदम यांनी
संगीताच्या धुंद मैफलीत रंग भरला.
येथील 'रविवासरीय चर्चा मंडळाने
हा तीन तासांचा कार्यक्रम आयोजित
केला होता.'घेई छंद मकरंद' 'दिव्य
स्वातंत्र्य रवी' ही नाट्यपदं व 'जाको
मन लाग्यो शाम' हे सुरदासाचे भजन
गाऊन तर रसिकांना श्री कदम यांनी
अक्षरशः वेड लावले.आणि शेवटी पं.
जसराज यांची प्रसिद्ध भैरवी 'सांवरे
रंग राची' त्यांनी गायिली.
संगीताच्या या बेहोष मैफिलीस
साथ दिली अविनाश जोशी,भास्कर
घोटकर,रतन जोशी,विनोदकुमार वाढई
यांनी तर हार्मोनियम आणि तबल्याची
बहारदार साथ केली अनुक्रमे श्री.विनायक
भिसे आणि श्री.बाबा खोतकर यांनी.
श्री.कदमांचा परिचय व उपस्थितांचे
आभार प्रदर्शन श्री.विजय राणे यांनी
केले.
● तरुण भारत,नागपूर.दि.२३ मार्च १९८७
●
त्यांचा किंवा पं.जितेंद्र अभिषेकींचा गंडाबंद शागिर्द व्हायची खूप इच्छा होती.पण आर्थिक परिस्थितीमुळे हे जमले नाही.परंतू या दोन्ही पंडितांच्या व छोटा गंधर्वांच्या सहवासाने बऱ्याच गोष्टी शिकलो.त्या आजही कामी येत आहेत.
उस्ताद अमीर खान, पंडित भीमसेन जोशी,रोशनआरा बेगम, प्रभा अत्रे,गीता गुलवडी, उस्ताद राशीद खान,पं. जगदीश प्रसाद,पं.अजय चक्रवर्ती, व्यंकटेशकुमार,कैवल्य कुमार गुरव,गुलाम हसन खान,विनिता गुप्ता,संगीता बंदोपाध्याय,पं. विजय कोपरकर,संजीव अभ्यंकर,मनाली बोस,कौशिकी चक्रवर्ती,ध्रुव शर्मा,पं. रविशंकर,सहाना बॅनर्जी,संजय देशपांडे (सतार), पं. रामनारायण,दिलशाद खान (सारंगी), पं. हरिप्रसाद चौरसिया,आश्विन श्रीनिवासन,पं. अजय शंकर प्रसन्ना (बासरी),उस्ताद अमजद अली (सरोद),पं. शिवकुमार शर्मा,नंदकिशोर मुळे (संतूर),पं. आनंतलाल आणि पार्टी (शहनाई), प्रवीण गोडखिंडी आणि रफिक खान (बासरी सतार जुगलबंदी) पुरिया कल्यामधील हे सर्व सध्या नेटवर उपलब्ध आहे.
●चित्रपट गीतांमध्ये पुरिया कल्याण रागावर आधारित गाणी नसल्यातच जमा आहे.
'तोरी जय जय करतार', उस्ताद अमीर खान.चित्रपट-बैजू बावरा.
'मेरी सांसों को महका रही है', लता.चित्रपट-बदलते रिश्ते.
●मराठीमध्ये ही दोन गाणी आहेत.
'गुरू एक जगी त्राता' -सुधीर फडके.
पंडित जितेंद्र अभिषेकींनी स्वरबद्ध केलेले 'मुरलीधर शाम हे नंदलाल', अतिशय गोड असे नाट्यगीत रामदास कामत यांनी अतिशय सुंदर गायिले आहे. नाटक-कट्यार काळजात घुसली.
मी नुकताच 'काट्यास फूल आले' हा रविप्रकाश चापके या गझलकाराच्या मराठी गझलांचा अलबम केला आहे.त्यातील एक गझल पुरिया कल्याण रागावर आधारित आहे.या गझलमध्ये पुरिया कल्याण सोबत मारवा पण आपणास दिसेल.फक्त दुसऱ्या मिसऱ्यात रंजकता वाढविण्यासाठी कोमल मध्यमाचा उपयोग केला आहे.हा मध्यम पहिल्या मिसऱ्यात शेवटी तीव्र मधमावर जाताना घासून गेल्याचा पण भास होतो.दुसऱ्या शेरातील आलापात मारवा स्पष्टपणे दिसतो.हा राग मारवा थाटातीलच असल्यामुळे हा आलाप खटकत नाही.गायक आहे मयूर महाजन.यातील उस्ताद लियाकत अली खान यांची सारंगी,निनाद दैठणकरांचे संतूर आणि पांडुरंग पवार यांचा तबला ऐकण्यासारखा आहे.
युट्युबवच्या 'गीत-गझलरंग' या चॅनलवर ही गझल आपण ऐकू शकता.
जळलो धुपापरी मी मज सांगता न आले
माझ्या परी फुलांना गंधाळता न आले...
क्रोधास हाय केव्हा फेकून मौन मारू
आम्हा नजाकतीने का भांडता न आले
मृत्यो तुलाच वेड्या मी मारलेच नसते
थांबून ये म्हणालो तुज थांबता न आले
आजन्म मी खेळलो मी मस्तीत विस्तवाशी
लाचार त्या चितेला मज जाळता न आले
युट्युब लिंक.....
https://youtu.be/QJx6Txf6o60
-------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,नक्षत्र पुरवणी. दि.२५ जून २०२३
Saturday, June 17, 2023
राग झिंझोटी...
झिंझोटी रागाच्या बाबतीत माझी एक अतिशय हृद्य आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते.त्या वेळी मी ऑर्केस्ट्रामध्ये अकॉर्डिअन वाजवायचो. ऑर्केस्ट्राच्या खोलीत कुणी कधी वाजवत नसलेले मेंडोलीन होते. मी तबला,हार्मोनियम,अकॉर्डिअन वाजवीत असल्यामुळे.हे तंतुवाद्य आपल्याला कधीच जमणार नाही म्हणून त्याला कधीच हातात घेतले नाही.दुर्दैव म्हणा की सुदैव, ऑर्केस्ट्राचे निवेदक (विदर्भातील प्रसिध्द वऱ्हाडी कवी) शंकर बडेने त्याचे गावातील शाळेच्या नवीन खोल्या बांधण्यासाठी मदत करायची म्हणून 'दिवा जळू दे सारी रात' हे नाटक बसवायला घेतले.संगीतकार मी होतो. तालमी सुरू झाल्या नि मी आजारी पडलो. आजारपणातील वेळ घालविण्यासाठी ऑर्केस्ट्रातील मेंडोलीन घरी बोलविले.व त्यावर अलंकार घोटणे सुरू केले.आठ दिवसात हात छान रुळला व वाजविण्यात मजा यायला लागली.त्यामुळे पुढे मला जे जे राग माहीत होते त्याचा रियाज सुरूच ठेवला.तशातच नाट्यप्रयोगाच्या दोन दिवस अगोदर माझ्यासोबतचा व्हायोलिनिस्ट आजारी पडला.मग काय? नाटकातील गंभीर प्रसंगी मेंडोलीनचे सूर कामी आले.प्रयोग चांगल्या प्रकारे यशस्वी झाला.
त्याकाळी यवतमाळच्या नेहरू युवक केंद्रातर्फे होणाऱ्या कार्यक्रमात माझा फार मोठा वाटा असायचा. असाच एक कार्यक्रम यवतमाळच्या नगर भवनात आयोजित करण्यात आला होता.गायन,वादनाच्या या कार्यक्रमात मी मेंडोलीनवर एक धून वाजविली.कार्यक्रमाला यवतमाळातील संगीत प्रेमींसह संगीत दर्दी पण होते.त्यात बडे गुलामली खान साहेबांचे शिष्य अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख पंडित मनोहरराव कासलीकरही होते.कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मला जवळ बोलवले व 'तू आज जी धून वाजविली ती कोणत्या रागात होती?' असा प्रश्न केला.त्यावेळी मी जरी तबला,हार्मोनियम,अकॉर्डिअन वाजवीत होती तरी संगीत शिकत होतो.म्हणजे विद्यार्थी दशाच होती.मी केव्हा तरी रेडिओवर ऐकलेल्या गतीची पहिली ओळ डोक्यात होती,ती वाजवून पुढे त्या सुरावटीला अनुसरून स्वरांचे गुच्छ तयार करून पाच मिनिटात वादन संपविले असल्यामुळे राग वगैरे माहीत नव्हता. त्यामुळे 'मला माहित नाही' असे उत्तर देऊन खाली मान घालून गप्प बसलो.तेव्हा त्यांनी मला रागाचे नाव सांगितले 'झिंझोटी'! आणि डोक्यावर हात ठेवून ,'छान वाजवतोस.थोडा जास्ती आणि डोळस रियाज कर' असे सांगून निघून गेले.त्यांच्या या वाक्यावरून मी पुढे दोन वर्षे 'डोळस' रियाज करून नागपूर आकाशवणीचा मान्यताप्राप्त मेंडोलीन वादक झालो.तेव्हापासून झिंझोटी राग कायमचा डोक्यात बसला तो आजतागायत.
यवतमाळ येथीलच झिंझोटी रागाचा एक किस्सा ऐविल्याशिवाय राहावत नाही...आमच्या टोळक्यात एक पात्र सोडून बहुतेक सर्वजण संगीतप्रेमी होते.त्यामुळे गावात कुठेही संगीत मैफल असली की आम्ही तेथे जायचो. 'त्या' एकालाही संगीताची गोडी लागावी म्हणून त्याला सुद्धा सोबत घेऊन जायचो.पण तो थोड्याच वेळात झोपायचा व घोरायला लागायचा. त्याच्या घोरण्याच्या आवाजामुळे तेथून आमची हकालपट्टी व्हायची.तरी पण आम्ही त्या 'घोरी'ला 'अघोरी' बनविण्याचा चंगच बांधला होता. एकदा यवतमाळातील प्रसिद्ध वकीलाकडे एका खांसाहेबांची मैफल असल्याचे कळले.आम्ही त्या 'घोरी'सह आमचा मोर्चा तिकडे वळविला.कुप्रसिद्धीमुळे आम्हाला सगळ्यात शेवटी बसण्याची कशीबशी अनुमती मिळाली.खान साहेबांनी मैफलीत कुणीही झिंझोटी राग गात नाही,पण आज मी गाणार आहे.असे म्हणून मोठ्या ख्यालाला हात घातला. थोड्याच वेळात आमचा मित्र झोपण्याच्या बेतात आला.तो झोपू नये म्हणून आम्ही त्याला मधून मधून टोचण्या द्यायला लागलो.कारण खान साहेब झिंझोटी राग मस्त रंगवून अतिशय उत्कृष्टपणे सादर करीत होते.छोटा ख्याल संपेपर्यंत आमचा मित्र स्वतःच्या झिंज्या उपटण्याच्या बेतात आला होता. छोटा ख्याल संपल्यानंतर खान साहेबांनी 'मै तोड लायी राजा' हा दादरा सुरू केला.वेगवेगळ्या सुरवटींनी ही ओळ ते सजवीत होते.मैफल मस्त रंगली होती.रसिकांकडून वाह व्वा ची बरसात सुरू होती.आम्ही पण गुंगलो होतो.अशा प्रकारे जवळ जवळ दहा मिनिटे 'मै तोड लायी राजा' गायिल्या नंतर जेव्हा पुढे 'जमुनवा की डाली' असे त्यांच्या तोंडून आले तसा आमचा घोरी मित्र करवादला 'इत्ती देर मे तो मै अक्खा पेड उखाडकर लाता था...'! यानंतर काय घडले असेल याची कल्पना तुम्ही करू शकता.असो!
झिंझोटी हा खमाज थाटोत्पन्न क्षुद्र प्रवृत्तीचा राग मानल्या जातो.(क्षुद्र प्रवृत्तीचे वा हलक्या प्रकारचे मानल्या गेलेले पिलू,मांड वैगेरे राग मांडायला व गायकाला डोक्यात घ्यायला बरेच परिश्रम करावे लागतात.तरी पण त्यांना क्षुद्र म्हणून का हिणवल्या गेले कळत नाही.खरे तर ज्यावरून शास्त्रीय संगीत निर्माण झाले त्या लोकगीतांच्या सुरावटी आहेत.) बहुतेक क्षुद्र प्रवृत्तीचा मानला गेलेल्या या रागात मानवी वृत्तीच्या सर्व भावना व्यक्त करण्याची क्षमता आहे हे खालील चित्रपट गीतांच्या यादीवरून आपल्या लक्षात येईल.बहुतेक गायक हा राग मैफिलीत गात नाही असे म्हणतात.पण वादक आणि संगीतकार मात्र या रागावर फिदा असल्याचे दिसून येते..
कोमल मनि झिंझूटी है , चढ़त न लगे निषाद ।
कहूँ कोमल गन्धार है , ध – ग संवादि – वादि ।।
– राग चन्द्रिकासार
झिंझोटीचे दोन प्रकार आहेत.एकात दोन्ही गांधाराचा प्रयोग होतो.दुसऱ्यात फक्त शुद्ध गांधाराचा प्रयोग होतो.यातील शुद्ध गांधाराचा झिंझोटी लोकप्रिय आहे.हा हलका आणि चंचल प्रकृतीचा राग असल्याचे म्हटल्या जाते.का? ते माहीत नाही.माझ्या मते कुठलाच राग हलका नसतो.तुमच्यात रंगविण्याची कुवत असेल तर कोणताही राग रंगविता येतो.हे उस्ताद फ़ैय्याज खान, उस्ताद निसार हुसेन खान,पंडित नारायणराव व्यास,कुमार गंधर्व,पंडित जितेंद्र अभिषेकी,पंडित राजन साजन मिश्र,पंडित अजय पोहनकर,किशोरी आमोणकर,मालिनी राजुरकर,उस्ताद राशीद खान,उस्ताद डागर बंधू,गुंधेचा बंधू,पंडित दिनकर कैकिणी,पंडित हनुमान सहाय,अश्विनी भिडे देशपांडे ('पतिदेवन महादेव' माझ्या अतिशय आवडीचे आहे.),पंडित जानोरीकर,पंडित राजशेखर मन्सूर,अरुण कशाळकर,शुभा मुद्गल,रघुनंदन पणशीकर,पंडित तुषार दत्त,शाश्वती मंडल,प्रचला आमोणकर,पूजा बाक्रे,शुभंकर डे,पंडित कौशिक भट्टाचार्य,ब्रजेश्वर मुखर्जी,श्रीमती देवी,मौमिता मित्रा,षड्ज अय्यर,सबिना मुमताज इस्लाम,मुकुल कुलकर्णी,शराफत हुसेन खान वगैरे गायक, गायिकांनी रंगविलेल्या झिंझोटीवरून लक्षात येते.
आता आपण हिंदी चित्रपटसृष्टीचा आढावा घेऊ या...
झिंझोटी रागावर आधारित इतक्या विविध मूडची इतकी गाणी,गझला दुसऱ्या कुठल्या रागावर आधारित मी तरी पाहिल्या नाहीत.
'सो जा राजकुमारी सो जा', के.एल.सहगल.चित्रपट-जिंदगी.
'पिया बिन नहीं आवत चैन', के.एल.सहगल.तिमिर बरन, चित्रपट-(जुना)देवदास
'चली बन के दुल्हन उनसे लागी लगन',
लता. चित्रपट-सुबह का तारा.
'जा जा रे जा बालमवा', लता.चित्रपट-बसंत बहार
'छुप गया कोई रे दूर से पुकार के,दर्द अनोखे हाय दे गया प्यार के', लता.चित्रपट-चंपाकली.
'तेरी आंखों के सिवा दुनिया में रक्खा क्या है', रफी. चित्रपट-चिराग.
'रहते थे कभी उन के दिल मे', लता. चित्रपट-ममता.
'दिल के टुकडे हुए और जिगर लूट गया' लता.चित्रपट-सन ऑफ इंडिया.
'बदली बदली दुनिया है मेरी' महेंद्र कपूर.चित्रपट-संगीत सम्राट तानसेन.
एक रात मे दो दो चांद खिले', मुकेश-लता. चित्रपट-बरखा.
'ता थै तत थै', आशा भोसले.चित्रपट-तेरे मेरे सपने.
'फिरतेरी कहानी याद आई,फिर तेरा फसाना याद आया', लता.चित्रपट-दिल दिया दर्द लिया.
'संसार से भागे फिरते हो', लता.चित्रपट-चित्रलेखा.
'जाऊं कहां बता ये दिल दुनिया बडी है संगदिल', मुकेश. चित्रपट-छोटी बहन.
'जो गुजर रही है मुझपर उसे कैसे मैं बताऊं', रफी. चित्रपट-मेरे हुजूर.
'इक हसीं शाम को दिल मेरा खो गया', रफी. चित्रपट-दुल्हन एक रात की.
'कैसे कटेगी जिंदगी...' (अनरिलीज्ड मदन मोहन)
'कोई हमदम न रहा कोई सहारा न रहा', किशोर कुमार. चित्रपट-झुमरू.
'जिंदगी का सफर है ये कैसा सफर', किशोर कुमार. चित्रपट-सफर.
'ये लाल रंग कब मुझे छोडेगा', किशोर कुमार. चित्रपट-प्रेम नगर.
'सखी रे पी का नाम,नाम न पुछो',लता.चित्रपट-सती सावित्री.
'आज है प्यार का फ़ैसला', लता. चित्रपट-लीडर.
'हम आज कहीं दिल खो बैठे', मुकेश. चित्रपट-अंदाज.
घुंगरू की तऱ्हा बजता ही राहा हूँ मैं',किशोर कुमार. चित्रपट-चोर मचाये शोर.
'जो गुजर रही है मुझपर', रफी.चित्रपट-मेरे हुजूर.
'दो दिल टूटे दो दिल हारे', लता.चित्रपट-हीर रांझा
'क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार मे' रफी आणि 'मोसे छल किये जा',रफी-लता,चित्रपट-गाईड.(धून एक,गाणी दोन)
'रात निखरी हुई,जुल्फ बिखरी हुई', मुकेश. चित्रपट-हम हिंदुस्थानी.
'तेरा मेरा साथ रहे' लता.चित्रपट-सौदागर.
'क्या खबर क्या पता क्या खुशी है गम है क्या', किशोर कुमार. चित्रपट-साहेब
'मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया',किशोर कुमार. चित्रपट-कोरा कागज
'सजी नहीं बारात तो क्या,आयी ना मिलन की रात तो क्या', किशोर कुमार. चित्रपट-बिन फेरे हम तेरे
'मेरे मेहबूब तुझे मेरी मुहब्बत की कसम', रफी. चित्रपट-मेरे मेहबूब.
'तुमने किसीं की जान को जाते हुए देखा है,वो देखो मुझ से रुठकर मेरी जान जा रही है', रफी. चित्रपट-राजकुमार.
'मुझे दर्दे दिल का पता न था मुझे आप किस लिए मिल गये', रफी. चित्रपट-आकाशदीप.
'तुम मुझे यूं भुला न पाओगे', रफी. चित्रपट-पगला कहीं का.
'जिंदगी जिंदगी मेरे घर आ ना', अनुराधा पौडवाल. चित्रपट-दुरीयां
'सुनी रे नगरिया' लता. चित्रपट-उपहार.
'रिमझिम बरसता सावन होगा रफी',लता.चित्रपट-जीवन मृत्यू.
'पिया बिन नहीं आवत चैन' ही अब्दुल करीम खां साहेबांनी गायिलेली अप्रतिम ठुमरी प्रसिद्धआहे.हीच ठुमरी (जुन्या) देवदास या चित्रपटात के.एल.सैगल यांनी गायिली आहे.आणि पुढे रोशनआरा बेगम, लक्ष्मीशंकर, पंडित भीमसेन जोशी, फरीद हसनसह अनेक गायक/गायिकांनी गायिली आहे.
'देख तो दिल की जाँ से उठता है', 'आंखे सज्जादा', 'नावक अंदाज', 'हुवा जो तीरे नजर', 'गुलों में रंग भरे बादे नौ बहार चले','देखे भाले दोस्त हमारे' गायक-मेहदी हसन
'मैं नजर से पी रहा हूँ', गझल-गुलाम अली
'दिल परेशान है क्या किया जाये' गझल.गायक-कनिष्क सेठ.
'साहिब तेरी बंदिया बंदिया के चंगिया' - नूरजहां आणि नुसरत फतेह अली.
मराठी सुगम संगीतमध्ये मात्र झिंझोटीचा फारसा वापर झालेला दिसत नाही.
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,दि. १८ जून २०२३
Subscribe to:
Posts (Atom)




