गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, February 28, 2021


 

कलादूत - आशिष ढबाले



        ’शुन्यातून विश्व निर्माण करणे’ प्रत्येकालाच जमते असे नाही.परंतू सुधाकर कदम याला अपवाद आहेत.
आर्णीसारख्या छोट्याशा गावात राहूनही त्यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर आपला रसिक वर्ग निर्माण केला.आज सुधाकर कदम यांना विविध क्षेत्रातील मान्यवर ओळखतात.याला कारण त्यांचे विस्तारलेले कार्यक्षेत्र !वारकरी संप्रदायात रमणारे वडील पांडुरंगजी कदम यांचेकडून संगीताचे बाळकडू मिळालेल्या तसेच भाग्योदय कला मंडळाच्या ’शिवरंजन’ ऑर्केस्ट्रापासून (१९६५) संगीताची कारकीर्द सुरू करणाऱ्या सुधाकर कदम यांनी केवळ गायक म्हणून मर्यादित न राहता ऑर्गन,हार्मोनियम,मेंडोलिन,तबला,सरोद ही वाद्येही अपार मेहनत घेऊन आत्मसात केली.नागपुर आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक व वादक झालेत.
         आर्णीच्या महंत दत्तराम भारती विद्यालयात (१९७२) संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी संगीताचे वाळवंट असलेल्या या गावात गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना केली.पालक व विद्यार्थ्यांमध्ये संगीतप्रेम निर्माण करण्याकरीता पं.पलुस्कर व पं.भातखंडे यांच्य़ा पुण्यतिथी निमित्त संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले.वाढती विद्यार्थी संख्या व पालकांचा प्रतिसाद पाहून सुधाकर कदम यांनी विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा यावा म्हणून स्वतःच्या खिशाला खार लावून छोट्या स्वरूपात कार्यक्रम करण्यास सुरवात केली.सादरीकरणाबरोबरच विद्यार्थ्यांना भविष्याचे दृष्टीने फायद्याचे रहावे या करीता त्यांना संगीताच्या विविध परीक्षांना बसविण्यास सुरवात केली.त्यासाठी महत्प्रयासाने अखिल भारतीय संगीत महाविद्यालय मंडळाचे परीक्षा केंद्र मिळवले.(१९७३ ते २००३ पर्यंत त्यांनी केंद्र व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.)
         नौकरी,संसार,संगीत वर्ग.स्वतःचा रियाज या सर्व गोष्टी सांभाळीत त्यांनी संगीताचा प्रसार व प्रचार वाढविण्याच्या दृष्टीने वर्तमानपत्रातून संगीतविषयक लेखन सुरू केले.त्याचबरोबर हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रकाशित होणाऱ्या भारतीय संगीताला वाहिलेल्या एकमेव अशा “संगीत” मासिकाकरीता “नग़्म-ए-ग़ज़ल’ व “प्रसारगीत” या स्तंभाकरीता संगीत संयोजन व स्वरलिपी तसेच मुंबईच्या “नादब्रह्म”,”संगीत अध्यापक” या त्रैमासिकांकरीता लेख.सांगीतिक शब्दकोडे,विविध कवींच्या मराठी-हिंदी गीतांना चाली लावून त्याची स्वरलिपी प्रसिद्ध करणे सुरू केले.
         महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर कार्यक्रमा करीता फिरताना आलेले गमतीशीर अनुभव मांडण्याकरीता नागपुरच्या तरूण भारत या दैनिकात “विषयांतर” या सदरासाठी स्फूट लेखन केले.इयत्ता १ ते १० वी च्या
पाठ्यपुस्तकातील कविता स्वरबद्ध करून शैक्षणिक दृक-श्राव्य साधन म्हणून ’झुला’ नामक ऑडिओ-व्हिडिओ कॅसेटची निर्मिती केली.नागपुर आकाशवणीच्या “ग्रामीण कला क्षेत्र” या कार्यक्रमाकरीता लोकगीतांचे संगीत नियोजन करून कार्यक्रम दिलेत.पुण्याच्या बालचित्रवाणी करीता समुहगीते संगीतबद्ध केली.यवतमाळ जिल्ह्यावरील माहितीपटाचे शिर्षक गीत स्वरबद्ध करून निवेदनही केले.आकाशवाणी पुणे करीता “अशी गावी मराठी गझल” या कार्यक्रमाचे विशेष ध्वनिमुद्रण १९८२ मध्ये करण्यात आले.यवतमाळ जिल्हा प्रौढ साक्षरता अभियानांतर्गत तयार झालेल्या “अक्षरगाणी” या साक्षरतापर गीतांच्या ध्वनीफितीचे संगीत दिग्दर्शनही केले.
          कवितांची ऑडिओ व व्हिडिओ विकत घेणे प्रत्येकाला सोईचे नाही ही, जाणीव ठेवून त्यांनी “एक सूर-एक ताल” नामक राष्ट्रीय एकात्मतापर गीतांचे पुस्तक प्रकाशित केले.अतिशय महत्वाचे व महत्वाचे म्हणजे सार्क देशाच्या “राष्ट्रीय संगीत” या ग्रंथात सुधाकर कदमांनी स्वरबद्ध केलेल्या तीन हिंदी गीतांचा समावेश होणे, हे महाराष्ट्रवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.
          सुधाकर कदम यांनी केवळ स्वार्थी दृष्टीकोन न ठेवता परिसरातील कलावंतांना मंच मिळावा म्हणून “सरगम” संस्थास्थापन केली.नाट्यप्रेमी लोकांना
एकत्र करून “अभिनय” या संस्थेची स्थापना करून कित्येक वर्षे विदर्भ स्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले.भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीकरीता विद्यार्थी तयार करून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिला.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषदेच्या वतीने होणाऱ्या “गीतमंच” द्वारे मार्गदर्शक म्हणून अनेक वर्षे हजारो विद्यार्थ्यांकडून शिबीराद्वारे गीतमंचाची गीते बसवून घेतली.यात त्यांनी स्वरबद्ध केलेली अनेक गाणी होती.त्यातील कुसुमाग्रजांचे ’महाराष्ट्रगीत’ महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थी अजूनही गात आहेत.तसेच “अशी गावी काविता” हा शैक्षणिक कार्यक्रमही जिल्हाभर यशस्वीपणे राबविला.
नेहरू युवक केंद्र यवतमाळाच्या सहाय्याने अनेक सांस्कतिक कार्यक्रमात सहभाग.यातील महत्वाचा म्हणजे पंजाबातील जगरांव येथील नुकतेच ’ब्ल्यू स्टार’ ऑपरेशन झाले असताना अतिरेक्यांची दहशत असतानाही तेथे जावून राष्ट्रीय एकात्मता शिबीराकरीता त्यांनी दिग्दर्शित केलेला “महाराष्ट्र दर्शन” हा कार्यक्रम होय.
          माहूरगडावर ललिता पंचमीच्या संगीत महोत्सवाचे आयोजन व निवेदन अशा दोन्ही भूमिका त्यांनी अनेक वर्षे निभावल्या.यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या १९९३ मध्ये जवळ पास १३०० शिक्षकांना “एक सूर-एक ताल” या मोहिमे अंतर्गत कविता गायनाचे प्रशिक्षण दिले.परंतू 
मुळातच अती संवेदनशील असणाऱ्या या कलावंताने संगीता सोबतच समाजकार्यातही तितक्याच मोठ्या प्रमाणात झोकून दिले.जनसामान्यातील स्वच्छ 
प्रतिमेमुळे हा कलाकार येथेही अग्रेसर राहिला.आपल्या परिसरात अल्पबचतीचे महत्व पटवून देऊन वृक्षारोपणासारखे राष्ट्रीय उपक्रम आपल्या युवा सोबत्यांच्या सहकार्याने राबविले.गरीब होतकरू विद्यार्थ्यांना संगीत साहित्य उपलब्ध करून दिले.शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यास प्रोत्साहन देऊन जनमानसात अभिरुची वाढविली.
           जवळ जवळ ११ वर्षे पत्रकारिता केली.आर्णी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष स्थानही त्यांनी अनेक वर्षे भूषविले.”कलावैदर्भी” या संस्थेद्वारे विविध क्षेत्रातील लोकांना सन्मानित केले.या सगळ्या धबडग्यात शालोपयोगी गीतांच्या स्वरलिपीचे “सरगम” व तरूण भारत वृत्तपत्रातील विषयांतर सदरात प्रकाशित झालेल्या स्फूट लेखांचे “फडे मधुर खावया...” ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली.यातील “सरगम” या पुस्तकाला इचलकरंजी फाऊंडेशानचा ’ग्रंथोत्तेजक’ पुरस्कारही मिळाला.
        अशा या मनस्वी कलावंताच्या संगीत व मराठी गझल गायनातील योगदानाची दखल घेऊन अनेक संस्थांनी पुरस्कृत केले.पण विदर्भातील कलावंत पुण्या-मुंबईत गेल्याशिवाय विदर्भातील जनता त्यास मोठा कलावंत मानत नाही.हे आमचे दुर्दैव... एक वर्षापूर्वी हा वैदर्भीय कलावंत पुण्यात स्थायीक होऊन कार्यक्रम,म्युझिक अल्बम द्वारे कार्यरत झाला.गायक,संगीतकार,पत्रकार,लेखक,कवी,शिक्षक,
समाजसेवक अशा अनेक भूमिका लीलया पार पाडणाऱ्या या कलाकारास “कलादूत” पुरस्कारा निमित्त विदर्भातील सर्व रसिकांच्या हार्दिक शुभेच्छा !

(कलादूत पुरस्काराच्या निमित्त)
दैनिक लोकदूत,यवतमाळ.दि.२१.११.२००४
____________________________________________
डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित आणि #अक्षर_मानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून ...



 

सरगम - मधुरिका गडकरी



      विदर्भातील रसिले गझलगायक म्हणून सुधाकरजी कदम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. मराठी गझलांना सुंदर स्वरसाजासह अधिकच रसिल्या स्वरूपात सादर करणे हा या रसिक गायकाचा खरा आनंद आहे.यवतमाळजवळील आर्णी येथील गांधर्व संगीत विद्यालयाचे ते प्राचार्य आहेत.त्यामुळे संगीत संवर्धनाचे,अध्यापनाचे त्यांचे कार्य सतत सुरू असते.संगीताची ओळख,जाण विद्यार्थ्यांना करून देतानाच गीतमंच,एक सूर एक ताल, कविता,गायन,वगैरे अनेक उपक्रमही त्यांच्या नावावर जमा आहेत.आणि हे सारे करता करताच विद्यार्थ्यांकरता त्यांनी अनेक सुंदर स्वररचना तयार केल्या.यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांमधून ही गाणी समूह स्वरूपात सादर होत असतात.
       'सरगम' या पुस्तकात विद्यार्थ्यांना गाता येतील व सहज समजतील अशा सुलभ व मधुर स्वररचना श्री.कदम यांनी पेश केल्या आहेत.मराठीतील नामवंत कवींच्या उत्तम काव्यरचनांना त्यांनी संगीतबद्ध केले आहे.महाराष्ट्रातील सर्व संगीत शिक्षकांनी प्रस्तुत रचना सरगम मार्गदर्शनानुसार आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या,तर संपूर्ण संगीत जगतासाठी तो एक प्रशंसनिक उपक्रम ठरू शकेल निःसंशय!
           'सरगम'ला प्रस्तावना देण्यात यशवंत देव व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कुठेही कमतरता ठेवली नाही.शब्दांची कुठलीही कंजुषी केलेली नाही.परंतु पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते संलग्न व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक नव्हे अनिवार्य असते.त्याबाबतीत मात्र संगीताच्या दुनियेतील मान्यवरांचे अपेक्षित सहकार्य सरगम प्रसारणासाठी लाभलेले नाही हे कटू सत्य आहे.सुधाकरजी कदम यांची धडपड केवळ 'सरगम' प्रकाशनापुरती नसून,ते पुस्तक संगीतोपासक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे ही आहे.अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ कवींच्या सुंदर व लोकप्रिय रचना निवडताना त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय पानोपानी येतो.संपूर्ण गीत लिपीबद्ध करताना वाद्यवृंदासाठी आवश्यक असलेला स्वरसमूह देखील वेगवेगळा लिपीबद्ध केलेला आहे.एकूण,पाश्चात्य पद्धतीप्रमाणे ऑर्केस्ट्रा संचातील प्रत्येक वाद्यांसाठी केलेली स्वतंत्र स्वरबद्धता त्यांनी या पुस्तकात वापरली आहे.आज अगदी लहानसहान शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगीत हा विषय शिकवला जातो.त्यामुळे संगीताची जुजबी ओळख विद्यार्थ्यांना करून देणे; त्यासाठी संगीत शिक्षकांना अतिशय उपयोगी ठरणारे असे हे पुस्तक आहे.संगीत जगताच्या प्रथम पायरीवर पाऊल ठेवताना सर्वांसाठी मौलिक ठरणारी सुधाकर कदमांची ही 'सरगम' आहे.
           'सरगम' निर्मिती विद्यार्थ्यांवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार व्हावेत,धार्मिक,प्रांतिक व भाषिक विवादीत्व संपून त्यांची शक्ती राष्ट्रउभारणीच्या विधायक कार्यास लागावी या उच्च  हेतूने केली असल्याचे कदम यांनी पुस्तकाच्या मनोगतात स्पष्ट केले आहे.महाराष्ट्रातील तमाम संगीत शिक्षकांनी ही गीते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली तरच माझ्या प्रयत्नाचे चीज होणार आहे,अन्यथा... हे अंतरीच्या गाण्यातील उद्गारही यात व्यक्त झालेले आहेत.सरगम निर्मितीसाठी प्रोत्साहित करणाऱ्या पं. जितेंद्र अभिषेकींपासून संगीत क्षेत्रातील  अनेक दिग्गजांचे जे प्रोत्साहन त्यांना वेळोवेळी लाभले,त्या सर्वांचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख प्रस्तावनेत आहे.यावरून सरगमची श्रेष्ठ मौलिकता सिद्ध होते.
           कविवर्य कुसुमाग्रज,विंदा करंदीकर,गौतम सुत्रावे,वा.गो.मायदेव,द.ना.गवाणकर,गोविंद, शंकर बडे,वसंत बापट,संत तुकडोजी महाराज,बहिणाबाई चौधरी,शिवा राऊत,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे, शंकर वैद्य,कलीम खान,विजय देशमुख,गजेश तोंडरे,सौ. मंगला पत्की,कृष्णराव भट्ट,माया भट्टाचार्य, नर्मदाप्रसाद खरे,रवी शुक्ल,इ.नामवंत कवींच्या रचनांना संगीताच्या उपासकांनी,विद्यार्थ्यांनी अधिक लोकाभिमुख करावे म्हणून हा प्रयत्न कौतुकास्पद तर आहेच,पण अनुकरणीयही.
            'सरगम'ची मौलिकता फार मोठी आहे.पण सरगमची खरी उपयुक्तता शाबीत होण्यासाठी महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी उदार मानसिकता व संपूर्ण सहकार्य सर्वार्थाने आवश्यक व अपेक्षित आहे.भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात आगामी सव्वीस जानेवारीपासून या पुस्तकानुरूप विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावभक्तीयुक्त रचनांची ओळख व त्यांच्या फुलणाऱ्या गायकीतून त्याचे प्रसारण झाल्यास 'सरगम' निर्मितीमागील लेखकाचा उद्देश संपूर्णतः फलद्रुप होऊ शकेल.शिक्षक क्षेत्रातील व सांस्कृतिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सरगमची दखल खऱ्या अर्थाने घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात राबवावी तसेच दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शाळाशाळांतून वितरीत करावी इतकाच मानस प्रस्तुत सरगम समीक्षालेखनाचा आहे.आर्णीसारख्या महानगरांपासून दूर असलेल्या ठिकाणच्या एका गुणी,विद्वान,मान्यवर संगीत प्राचार्यांच्या प्रस्तुत 'सरगम'चे स्वागत व उपयोग तमाम रसिक व शासनासाठी एक फार मौलिक उपलब्धी आहे हेच खरे!

रविवार दि. १ नोव्हेंबर १९९७
------------------------------------------------
मधुरिका गडकरी
४९,फ्रेंड्स ले-आउट नं.४ 
रवींद्र नगर,नागपूर २२
-------------------------------------------------

प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षर_मानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ '#चकव्यातून_फिरतो_मौनी' मधून...




 

Sunday, January 31, 2021

गझलगंधर्व सुधाकर कदम यांची 'काट्यांची मखमल'-प्रा. डॉ.श्रीकृष्ण राऊत

.   #गझलगंधर्व सुधाकर कदमांची #काट्यांची_मखमल :                                               
.                               -श्रीकृष्ण राऊत

          तारीख    १६ जानेवारी २०१२.मुंबईचे रविन्द्र नाट्य मंदिर,प्रभादेवी.(पु.ल.देशपांडे सभागृह.) एका मराठी गझल अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांच्या भेटी झाल्या.सर्वजण आपापल्या क्षेत्रातले दिग्गज.‘काट्यांची मखमल’असे काव्यात्म शीर्षक असलेला हा अल्बम म्हणजे मराठी गझलविश्वातला अनोखा आविष्कार.एक सुरमयी माईलस्टोन.गझलकार दिलीप पांढरपट्टे यांच्या लेखणीतून उतरलेल्या नाविण्यपूर्ण कल्पना मांडणार्‍या शब्दांनी ह्या गझला अभिव्यक्त झाल्या आहेत. आणि ह्या गझलांना त्या शब्दांना लाभलेल्या गझलगंधर्व सुधाकर यांच्या दीर्घकाळच्या चिंतनातून तयार झालेल्या स्वररचना म्हणजे सोन्याला सुगंध.एरवी चकाकतं ते सर्व सोनं नसतं हा आपला नेहमीचा अनुभव.त्याची एक झलक-

"तू हासलीस की ,सगळ्या काट्यांची मखमल होते!
तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते!"
          ही गझलांची हिरवळ कानातून मनात उतरत जाते ती सुरेश वाडकरांच्या मखमली स्वरातून.खूप दिवसांनी एव्हढ्या गोड चाली ऐकल्या आणि कान तृप्त झाले. संगीत ही साधना आहे असं जे म्हटल्या जातं ते काही खोटं नाही.नाही तर प्रख्यात गझलकार दुष्यंतकुमार म्हणतातचना-
कैसे मंज़र सामने आने लगे हैं
गाते-गाते लोग चिल्लाने लगे हैं
          युनिव्हर्सल म्युझिक कंपनीने सादर केलेल्या "काट्यांची मखमल" या मराठी गझलच्या अल्बमच्या प्रकाशन प्रसंगी ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी असेच उद्गार काढले.ते म्हणतात-"काट्यांची मखमल..." ही जलेबी,चमेलीच्या जमान्यातील एक सुरेल स्वरयात्रा आहे.
         या अल्बममध्ये वेगवेगळ्या ’मूड्स"च्या ९ गझला आहेत.सुरेश वाडकर आणि वैशाली माडेंच्या स्वरातल्या
"तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते...","येता येता गेला पाऊस..." आणि "जीवनाचा खेळ रंगाया हवा..." या गझलांमधून वेगवेगळे भावदर्शन घडते.वाडकरांच्या आवाजात "कळेना कसा हा जगावेगळा मी..." ही सुफियाना ढंगाची आणि "गाऊ नये कुणीही रात्री अशी विराणी..."ही खास गझलीयत दाखविणारी गझल आहे.दुसरीकडे वैशालीच्या आवाजातील "किती सावरावे,कसे सावरावे...",दूर गेल्या फुलांतल्या वाटा..." आणि ’हसू उमटले दुःख भोगता गंमत आहे..."या तीन ’मूड’च्या तीन गझला आहेत.याबद्दल बोलताना सारेगमपची ही महागायिका म्हणाली,"इतक्या सुरेल आणि आशयपुर्ण गझला मला सुरेशजींसोबत गायला मिळाल्या हे मी माझे भाग्य समजते आणि याचे सारे श्रेय गझलगंधर्वांना जाते".
          "धांगडधिंगा गाण्याकडे मी लक्ष देत नाही.मला सुरेल गाणी आवडतात.या अल्बममधील गाणी ऐकत राहावीत अशी आहेत.गझलांचे लिखाण ताकदवर आहेतच, त्याला पूरक स्वररचना असून सुरेशजींच्या आणि वैशालीच्या आवाजाची साथ लाभल्यामुळे हा अल्बम श्रवणीय झाला आहे."असे मनोगत अशोक पत्की यांनी केले.  ह्या गझला गाताना मिळालेलं समाधान सुरेश वाडकरांनी पुढील शब्दात मांडले-.." हा अल्बम म्हणजे अशी रेकॉर्ड आहे की जिच्याशी सर्वजण स्वतःला जोडू शकतील कारण या गझलांच्या बांदिशींमध्ये संगीतकार गझलगंधर्व सुधाकर कदम यांनी आपला आत्मा ओतला असून,वैशाली माडे,दिलीप पांढरपट्टे यांचेसोबत काम करताना मला खूप आनंद मिळाला.याचे कारण असे की,फार मोठ्या कालावधीनंतर इतके सुरेल (मेलोडिअस) गाणे मला गायला मिळाले.मला खात्री आहे की हा अल्बम रसिकांना निश्चितच आवडेल".
          आपले मनोगत व्यक्त करताना सुधाकर कदम म्हणाले,"संगीत म्हणजे केवळ तंत्र नसून ती अंतर्मनातून स्फुरीत होणारी एक शक्ती असून ते इश्वर प्राप्तीचे साधन आहे.मात्र त्यासाठी तपश्चर्या करणे आवश्यक असते,तसेच गझल हा काव्यप्रकार इतर गीत प्रकाराहून वेगळा असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या सुरावटी तयार कराव्या लागतात..."
          आता तुम्ही म्हणाल की हे गझलगंधर्व आहेत तरी कोण? तर तुमचं काही चुकलं नाही.हा मराठी गझलगायनाच्या इतिहासातील एक महत्वाची कारकीर्द गाजवणारा कलावंत होय. तो आहे आद्य मराठी गझलगायक गझलगंधर्व सुधाकर कदम.हा गझल गायक-संगीतकार 'आपल्याच मस्तीत मी जाई पुढे मात्र बाजारू कवाडे लागती’ अशा खास वैदर्भीय वाणा-गुणाचा आहे.
          विदर्भपुत्र सुरेश भटांच्यामुळे जशी अस्सल मराठी गझल महाराष्ट्राला मिळाली आणि मराठी कवितेचा समृद्घ प्रवाह अधिक श्रीमंत झाला, तसाच मराठी गझल गायकीचा उगम विदर्भात होणे अपरिहार्य होते.आद्य मराठी गझलगायक होण्याचा मान यवतमाळ येथे दि. १३ नोव्हें. १९४९ रोजी जन्मलेल्या गझलगंधर्व सुधाकर कदम यांचेकडे जातो. ‘गझलगंधर्व कदम’ ह्या दैनिक लोकमतच्या (पुणे)अग्रलेखात जेष्ठ संपादक अनंतराव दीक्षित ह्यांनी केलेली नोंद ह्या संदर्भात महत्त्वाची आहे. ते लिहितात, ‘गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे. अशी गावी मराठी गझल या स्वरूपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत. गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्त्व असते. सांगितिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे. त्यामागे त्यांचे चिंतन आहे.’ त्यांनी बांधलेल्या गझलांच्या चालीवर फिदा होऊन ‘महाराष्ट्राचे मेहदी हसन’ म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले आहे. सुरेश भटांचा मुक्काम आर्णीत बरेचदा सुधाकर कदम यांचेकडे असायचा. आर्णीत सुधाकर कदम ह्यांचेकडे मुक्कामी असताना सुरेश भटांनी दि. ९-९-१९८१ ला ‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची’ आणि दि. १२-९-१९८१ ला ‘हा चंद्र ही रात फिरायासाठी’ तसेच ‘उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद’ ही नात लिहिल्याची नोंद आहे.
           सुधाकर  कदमांच्या गझलगायकीचा आदर्श महाराष्ट्रापुढे ठेवण्यासाठी ‘अशी गावी मराठी गझल’ हे मैफलीचे शीर्षक जसे सुरेश भटांनी दिले तसेच अनेक मैफलींचे निवेदन सुरेश भटांनी स्वत: केले आहे.तीन तासांची ही मैफिल केवळ मराठी गझलांची असायची. आजकालच्या मैफिलींसारखी उर्दू-हिन्दी गझलांची व्यावसायिक पेरणी तिच्यात नसायची. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प. मध्ये झालेल्या ‘अशी गावी मराठी गझल’ ह्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि त्यांच्या आवाजातील गझल गायनाची बहुतांश ध्वनिमुद्रणे आणि निवडक व्हिडिओ रसिक अभ्यासकांसाठी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ह्या निमंत्रण पत्रिकेत सुधाकर कदमांचा उल्लेख गझल ‘गझलनवाज’ म्हणून करण्यात आलेला आहे. १९८३ साली ‘भरारी’ शीर्षकाची त्यांची ध्वनिफीत प्रसिद्घ झाली. ज्यात सुरेश भट, उ. रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, अनिल कांबळे, सतिश डुंबरे ह्यांच्या गझला आहेत.
         सुरेश भट आणि सुधाकर कदम ह्यांनी एकत्र वणी-नागपूर-मानवत-देगलूर-औरंगाबाद-इचलकरंजी-कोल्हापुर-पुणे असा महाराष्ट्रभर दौरा केला होता. कोल्हापुरच्या त्यांच्या एका मैफलीचे निवेदन डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केले होते.आर्णी या आडवळणाच्या गावी संगीत शिक्षकाची नोकरी करीत असलेल्या सुधाकर कदमांना दूरदर्शन आणि मुंबई -पुण्याची इतर प्रसिद्धी माध्यमे ह्यांचा लाभ होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या मराठी गझलगायकीचे योगदान १९८१ नंतर जन्माला आलेल्या आजच्या तरुण पिढीला ठाऊक नसावे ह्यात काहीच आश्चर्य नाही. पाठीच्या दुखण्यामुळे १९९७ नंतर त्यांच्या जाहीर मैफली कायमच्या थांबल्या.
          सुधाकर कदमांच्या ह्या योगदानाची यथोचित दखल घेऊन दि. १५ मार्च, २००९ रोजी गझल अभ्यासक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी,प्रख्यात सिनेदिग्दर्शक राजदत्त आणि पुणे विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरु नरेन्द्र जाधव ह्यांच्या उपस्थितीत त्यांना आद्य मराठी गझलगायक म्हणून ‘गझलगंधर्व’ ह्या उपाधीने सन्मानित करण्यात आले.मराठी गझल-गायकीच्या रूपाने गझलगंधर्व सुधाकर कदमांनी लावलेल्या ह्या ‘इवल्याशा रोपाचा’ वेलू नंतर विदर्भातल्याच गझलनवाज भीमराव पांचाळे ह्यांनी ‘गगनावेरी’ नेल्याचा अलिकडचा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे.ह्या दोन गझलनवाजांच्या नंतरच्या पिढीमध्ये विदर्भाचे डॉ. राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार ही तरूण मंडळी मराठी गझल गायकीच्या क्षेत्रामध्ये नव्या दमाने पुढे येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शुभेच्छांची फुले घेऊन महाराष्ट्र उभा आहे.

प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत
शंकर नगर,जठारपेठ
अकोला (महाराष्ट्र)





 

Monday, January 4, 2021

दोन आठवणी...शंकर बडे



              ●मी कॉलेजमध्ये शिकत असताना मला एक वर्ष ज्युनिअर महेश शिरे नावाचा विद्यार्थी होता.हा १९६७/६८ चा काळ. त्यावेळी एन. सी.सी. आणि एक कँप केला नाही तर विद्यापीठाच्या परीक्षेला बसायची परवानगी नसे.त्यात पुसद तालुक्यातील भोजला येथे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचा कँप झाला होता.शेवटच्या दिवशी रात्री झालेल्या कार्यक्रमाचे संचालन मी केले होते.ते ही बिनाका गीतमाला सिलोनवरून सादर करणाऱ्या अमीन सयानी स्टाईलने. माझं संचालन भाव खाऊन गेलं.त्यावेळी शिरे यवतमाळ येथील भाग्योदय कला मंडळाचा जो शिवरंजन ऑर्केस्ट्रा होता त्यात गायक होता.माझं संचालन ऐकल्यामुळे आम्ही परत आल्यावर तो माझ्या मागे लागला की, तुम्ही आमच्या ऑर्केस्ट्रात या.मला भीती होती हे माहीत झाल्यावर बावाजी (वडील) भैरवी सुनावतील याची.शेवटी मलाही राहवलं नाही आणि महेश शिरे सोबत त्यांच्या ऑर्केस्ट्राच्या कार्यालयात गेलो.सुधाकरची आणि माझी पहिली भेट तिथे झाली आणि या ओळखीचं  मैत्रीत कसं रूपांतर झालं हे आमचं आम्हालाही समजलं नाही.
      (कार्यक्रम करताना)  पुढं आमच्या हे ध्यानात आलं की दोन सव्वा दोन तासानंतर आमची (श्रोत्यांवरची) पकड ढिली पडायला लागते.याचे कारण कुठला तरी विनोदी ऍटम मधे मधे घालायला हवा असं आमच्या लक्षात आलं.पण कुठला हे कुणाला सुचेना.मग मी सुधाकरला म्हटले, मी कॉलेजमध्ये कार्यक्रमात अमरावतीचे श्री मनोहर कवीश्वर आणि वर्धेचे वऱ्हाडी कवी प्रा.देविदास सोटे यांच्या कविता म्हणत असतो.त्यावर टाळ्या पडतात.त्या घेऊन पहायच्या का?सुधाकरला ही कल्पना आवडली आणि त्याच्या होकारानंतर पहिला प्रयोग हनुमान आखाडा (यवतमाळ) चौकातील कार्यक्रमात घेऊन  पाहिल्या.लोकांनी टाळ्यांनी पसंती दिली.दोन वर्षे निघून गेल्यावर सुधाकर मला म्हणाला,'ही उसनवारी किती दिवस?आता तू लिहून पहा.' 
मी? 
माझा प्रश्न..
त्यावर सुधाकरचं म्हणणं होतं की,तू चांगली कविता लिहू शकतो याची मला खात्री आहे.तू मनावर घे, बस जमते.खरं तर स्टेजवरची कविता तिथेच पास की नापास हे कळते म्हणून जरा धाकधूक होती.त्या वर्षी पावसाळा पावसासारखा बरसत होता.सात दिवसाची झड लागली,नदीला पूर,नागो बुढ्याचं बुढीसंग झमकनं हे सारं मनात झिरपत गेलं आणि कविता पाच मिनिटात कागदावर उतरली.
'पावसानं इचिन कहरच केला,
नागो बुढा काल वाहुनच गेला.'
सुधाकरचं पेरणं कामी आलं.आणि मी बोलीतील कवितांचं पीक घेत गेलो.ते अजूनही गेली पंचेचाळीस  वर्षे अव्याहत चालू आहे.
             ●सुधाकरच्या अनेक आठवणी असल्या तरी आणखी एक आठवण सांगितल्याशिवाय राहवत नाही.मला वाटते अंदाजे ती १९७९८/८९ ची गोष्ट असावी.मी आणि सुधाकर  माझ्या मोठ्या बहिणीकडे कल्याणला गेलो होतो.दुसऱ्या दिवशी फिरायला म्हणून आम्ही दोघे मुंबईला गेलो.आणि मंत्रालयात पोहोचलो.त्या आधी कधीच व त्यानंतर आजतागायत कधी तेथे जायचा योग आला नाही.किंवा तसे काम पडले नाही.तेव्हाही आम्ही सहज गेलो होतो.आम्ही भटकतांना पाहतो तर काय समोर कविवर्य सुरेश भट ! माझ्या 'इरवा' या कविता संग्रहास त्यांनी प्रस्तावना दिली होती.तेव्हापासून परिचय व नंतर भेटी होत गेल्या.मला ते दिसताच मी जाऊन त्यांना नमस्कार केला.मला अचानक पाहिल्यामुळे त्यांनाही आश्चर्य वाटले.आणि मला विचारले,
'तुझे काय काम आहे?'
 त्यावर मी म्हटले,'काहीच नाही.'
'म्हणजे तुम्ही मोकळेच आहात!.
म्हटलं 'हो.'
'मग चला माझ्या सोबत'.सुरेश भट.
आम्ही तिघे बाहेर पडल्यावर मी म्हटले , 'बावाजी (आम्ही त्यांना बावाजी म्हणायचो) हा माझा  दोस्त सुधाकर कदम'. 
'बर!चला मग बोलू'.
एक दोन ठिकाणी टॅक्सीने घेऊन गेले.रस्त्याने एखादे चांगले हॉटेल दिसले की,'येथे मछली खूप छान मिळते,आपण सायंकाळी येऊ.'शेवटी (फिरून) आम्ही आमदार निवासात परत आल्यावर ते ज्या आमदाराच्या खोलीत थांबले होते तेथे घेऊन गेले.बसल्यावर मला त्यांनी पंखा लावायला सांगितला. सुधाकर बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला तेव्हा मी सुरेश भटांना म्हटलं,
 'बावाजी हा माझा दोस्त संगीतात छान आहे.' 
त्यावर त्यांनी विचारलं,'टण्ण वाजते का?'
मी म्हटले,'मला तर त्यातला 'सा' पण समजत नाही.तुम्ही त्याच्याशी बोलून तपासून घ्या.'
हा परत आल्यावर  मी बाथरूमला गेलो? आणि सुधाकर सुरेश भटांजवळ बसला.मी फ्रेश होऊन आलो तरी बावजीची व त्याची चर्चा सुरूच होती.
      नंतर माझ्याजवळ बावाजीचा अभिप्राय होता,
'पोट्ट कलदार आहे.' मग यांच्या भेटी वाढत गेल्या आणि कविवर्य सुरेश भट एके दिवशी आर्णी (जिथे सुधाकर शिक्षकाची नोकरी करीत होता) येथे मुक्कामी आले.काही नवीन गझला लिहिल्या गेल्या.काही गझलांना चाली दिल्या गेल्या.पण मला तेव्हा आर्णीला जाता आले नाही.मी फक्त ऐकून होतो.नंतर या दोघांचे एकत्र कार्यक्रम कार्यक्रम कोल्हापूर पासून पुण्यापर्यंत झाले.पण प्रत्यक्ष ऐकणे माझ्या नशिबात नव्हते.पण आपण त्यांची ओळख करून दिल्याचे निमित्त झालो त्या भेटीला आलेला बहर सुखावत होता.अशा अनेक आठवणीतील या दोन आठवणी.

पेशवे प्लॉट,
यवतमाळ
२/४/२०१४




 

Wednesday, December 30, 2020

सुरेश भट आणि मी...


          माझी आणि भटांची पहिली भेट मुंबईला झाली. मी आणि शंकर बडे त्या वेळी मुंबानगरीत हात पाय मारत होतो. १९७७/७८ची घटना असावी. दिवसभर दूरदर्शन, एच.एम.व्ही संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची भेट अशी भटकंती करुन थकलेल्या अवस्थेत रात्री पंढरीनाथ सावंतांकडे खास माशाच्या कोकणी कालवणाचे जेवण झाल्यावर चर्चा सुरू असताना अचानक पंढरीनाथ सावंतांनी सुरेश भट मुंबईत असल्याचे सांगितले. आम्ही दुसरे दिवशी भटांना भेटायला आमदार निवासात पोहचलो. शंकरची भटांशी नुकतीच ओळख झाली होती. त्याने माझी ओळख करून दिली. लगेच भटांनी सवयीप्रमाणे ‘‘गाऊन दाखवा’’ असा आदेश दिला. बिना साथीने मला जसे जमेल तसे गाऊन दाखवले, हे प्रकरण इथेच संपले. त्यानंतर नागपुरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उद्घाटनाप्रित्यर्थ गडकरी सभागृहात माझा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भट होते.या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी सरोद वादन केले. त्यानंतर मराठी-उर्दू गझला सादर केल्या. माझ्या स्वररचना भटांना आवडल्या. इथून आमची मैत्री सुरु झाली. सुरुवातीला त्यांनी ‘हा ठोकरुन गेला’ ‘कुठलेच फुल आता पसंत नाही’ अशा आणखी तीन गझला स्वरबद्ध करायला दिल्या. एक महिन्यानंतर नागपूरला चक्कर झाली तेव्हा त्यांना ‘ठोकरुन’ व ‘पसंत नाही’ या दोन गझला ऐकवल्या. ‘ठोकरुन’ची बंदिश त्यांना आवडली. पण ‘पसंत नाही’ वर मात्र ‘तू घरंदाज बाईला तमाशात नाचवले’ अशा शेरा मारला. त्यावरुन काहीतरी चुकल्याचे लक्षात आले. माझा पडलेला चेहरा पाहून गझलची शब्दानुरुप बंदिश कशी असायला हवी हे कळावे म्हणून मेहदी हसन, फरीदा खानम, गुलामअली यांच्या ध्वनिफिती देऊन त्यांच्या गायकीचा अभ्यास करायला सांगितले. तो पर्यंत मी अनेक गाणी बसविली होती, अनेक नाटकांना संगीत दिले होते. पंधरा वर्षांचा ऑर्केस्ट्राचा अनुभव होता. तरी सतत वर्षभर या ध्वनिफितीतील बंदि्शी, शब्दोच्चार, शब्दानुसार स्वररचना, शब्दफेक, भावाभिव्यक्ती याचा अभ्यास केला आणि नंतर आमचा मराठी गझला महाराष्ट्रभर पोहचवण्याचा ऐतिहासिक दौरा सुरु झाला. 
या दरम्यान मी जसा नागपूरला जायचो,तसे भटही आर्णीला यायचे.आर्णीला गझल आणि संगीत याशिवाय दुसरी चर्चा नसायची. भटांच्या गझला, माझ्या बंदिशी आणि रंगलेल्या मैफिली असा नुसता जल्लोष असायचा. 
           भटांसोबतच्या काही वर्षांच्या सहवासात अनेक मजेदार घटना घडल्या. खरे म्हणजे ‘त्या’ आमच्यातील वैयक्तिक ठेवा  आहेत. एकदा नागपूरला गायक अनिल खोब्रागडे, कादरभाई, गायिका प्रमोदिनी क्षत्रिय, व्हायोलिन वादक प्रभाकर धाकडे वगैरे मंडळी सोबत मैफल जमविण्याचे ठरले होते. मैफल रात्री होती. मी दुपारी भटांकडे पोहोचलो. सायंकाळ झाल्यावर त्यांनी आपण जरा बाहेर जाऊ असे म्हणून व त्यांच्याकडे असलेली हार्मोनियम त्यात टाकून आम्ही निघालो. भटांचा त्या दिवशीचा मूड जरा वेगळाच वाटला. सदैव बोलणारे भट त्या दिवशी अबोल होते. जवळ-जवळ एक तास दिशाहीन भटकंती झाल्यावर हळूच म्हणाले ‘‘सुधाकर आपण कुठं तरी बसू या का? या वेळेपर्यंत 8 वाजले होते. 9 वाजता आमची मैफल ठरली असल्यामुळे मी त्या काळजीत. पण भटांनीच कुठेतरी बसू म्हटल्यावर नाही म्हणणे शक्य नव्हते. म्हणून माझ्या साळ्याकडे-अनिल चांदेकरकडे मोर्चा वळवला. त्याच्याकडे पोहोचल्याबरोबर सौ. चांदेकरांना झुणका भाकर व पोळ्या करण्याचा हुकूम करुन भट बैठकीत एका बाजूला कागद पेन घेऊन बसले. एव्हाना रात्रीचे 10 वाजले. आमच्या मैफलीचे काय झाले ते आपण समजू शकता. थोड्याच वेळात त्यांनी ‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’ हा मतला मला दिला व चाल बसत गेली, तिकडे गझल पूर्ण होत गेली. रात्री दोन अडीच वाजता पूर्ण गझल लिहून मला कागद दिला.
आमची ठरलेली मैफल हुकली पण रात्र मात्र संस्मरणीय ठरली. या गझलने माझ्या प्रत्येक कार्यक्रमात दाद घेतली हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.
- औरंगाबाद, देगलूर, मानवत, नांदेड असा मराठवाड्याचा दौरा आटोपून परत नागपूरला निघालो असताना भटांनी नांदेडला एक तलवार व एक कुकरी विकत घेतली. ती सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्या दुर्दैवाने आमची एस.टी. बस मधल्या कुठल्यातरी थांब्यावर बंद पडली. एस. टी. बदलणे, त्यात सामान टाकून आसन मिळवणे या प्रकारात तलवार व कुकरी बंद पडलेल्या एस. टी. बसमध्येच राहिली. आमची बस व्हाया यवतमाळ नागपुर असल्यामुळे मी यवतमाळला उतरुन दुस-या बसने आर्णीला जाणार होतो. यवतमाळला मी बसमधून बॅग घेऊन उतरत असताना तलवार व कुकरी कुठे आहे असे भटांनी विचारले तसे मी सामान ठेवायची जागा पाहू लागलो व दोन्ही शस्त्र बंद पडलेल्या एस. टी. त राहिल्याचे लक्षात आले. ही गोष्ट मी भटांना सांगितली तसे भट मिश्किलपणे म्हणाले ‘‘कसा रे तू मराठा? साधी तलवार व कुकरी सांभाळता आली नाही!’’ मी क्षणभर विचार केला अन उत्तरलो ‘‘मी तर तलवार अन कुकरीच गमावली तुम्ही तर अख्खी मराठेशाही गमावली !’’ यावर जोरजोरात हसत त्यांनी ‘‘क्या बात है!’’ असा प्रतिसाद दिला.
 विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे दौरे आटोपल्यावर, पुण्यात ‘अशी गावी मराठी गझल’ नावाचा कार्यक्रम झाल्यावर नागपुरातील रसिक मंडळींनी धनवटे सभागृहात माझा एकट्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला मी भटांकडे गेलो. बराच वेळ गप्पाटप्पा झाल्यावर कार्यक्रमाविषयी सांगून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यावर
‘‘मी काहून कार्यक्रमाले यावं? असा प्रश्न भटांनी केला.
‘‘माझा कार्यक्रम आहे म्हणून’’ मी.
‘‘तू कोन टिकोजी लागला का?’’ भट.
‘‘टिकोजी नाही पण तुमचा कोणी तरी लागतो ना?’’ मी.
‘‘तुले तं मालूम आहे का मी ऐ-या गै-याच्या कार्यक्रमाले जात नाही!’’ भट.
अशी गंमत सुरू असताना भटांनी कपाटातली ‘अंगूर की बेटी’ काढली.  मलाही आग्रह केला परंतु दिवसाढवळ्या ‘दारूकाम’ न करण्याचे ठरवल्यामुळे ‘नाही’ म्हणालो. लगेच भट म्हणाले ‘‘आता सांग तू का म्हंतं ते!’’ यावर मी, ‘‘पिदाडांशी जास्ती बोलत नसतो’’असे म्हणताच भट खो खो करुन हसायला लागले व ‘‘लयच चालू आहे रे तू!’’ असे म्हणून पुन्हा जोरजोरात हसायला लागले.
 मराठवाडा दौ-याचे वेळी औरंगाबाद मुक्कामी लोकमत कार्यालयातील कार्यक्रम आटोपल्यावर दुसरे दिवशी सकाळीच भटांना गझलचा मुखडा सुचला तो मला दिला. मी चाल बसवायला लागलो व भट लिहायला लागले. चौथा शेर मला त्यांनी दिला परंतु वाचल्यानंतर त्याचा अर्थ उमगायला वेळ लागला. म्हणून मी भटांना म्हटले ‘‘हे शेर गझल मध्ये ठेवू नका, कारण याचा अर्थ पटकन ध्यानात येत नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शेर वाचला की ऐकणा-याला पटकन कळायला हवा. यावर भट म्हणाले ‘‘कवी कोण आहे? मी का तू?’’ तू आपलं काम कर’’ त्यावेळी मी चूप बसलो. या प्रसंगानंतर काही महिन्यांनी पुण्याला कार्यक्रम होता. आम्ही भटांच्या सासुरवाडीत सदाशिवपेठेत मुक्कामी होतो. कार्यक्रम सायंकाळी असल्यामुळे दुपारी घरीच मैफल जमली. त्यावेळचे सर्व नवोदित गझलकार याप्रसंगी उपस्थित होते. ‘‘मी असा त्या बासरीचा सूर होतो, नेहमी ओठांपुनी मी दुर होतो’’ ही गझल गायला सुरवात केली. यमनमधील या बंदिशीत दुसरा शेर सादर करताना दोन्ही मध्यमांचा वापर केला. गझल संपल्यावर भट म्हणाले ‘‘तो दुस-या शेरात तू कोणता सुर लावला तो काही जमल्यासारखा वाटला नाही’’ माझ्या मनात औरंगाबाद खदखदत होतेच. मी लगेच म्हणालो ‘‘बावाजी संगीतकार कोण आहे? मी का तुम्ही? भटांच्या लगेच लक्षात आले व म्हणाले ‘‘वा औरंगाबादकर!’’. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो. सुरेश भटांमुळे मी मराठी गझल गायक झालो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्यामुळेच मला अमरावतीत झालेल्या डॉ. नईमभाईंच्या चर्चेत सहभागी होता आले. इस्लामपूर्व गझलेचा शेर नईमभाईंनी सुरेश भटांना काढून दिला या ऐतिहासिक प्रसंगाला उपस्थित राहू शकलो. भटांमुळेच सुरवातीच्या काळात वर्धेसाठी शेतकरी मेळाव्यात श्री शरद पवारांसमोर कार्यक्रम करु शकलो. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना नागपूरच्या अधिवेशन काळात रा. सु. गवई यांचे कॉटेजवर अंतुले, जवाहरलाल दर्डा प्रभृतींसमोर कार्यक्रम सादर करु शकलो. सत्कारही स्वीकारु शकलो. शाहीर सुरेशकुमार वैराळकर या प्रसंगी हजर होते. 1982 पासून तिकीट लावून माझे कार्यक्रम सुरू झालेत याचे श्रेयही भटांनाच आहे. ते मला तेव्हाच ‘गझलनवाज़’ म्हणायचे परंतु मेहदी हसन, गुलाम अली, जगजित सिंग सारख्या मंडळीसमोर आपण क:पदा्र्थ असल्यामुळे स्वत:ला ‘गझलनवाज़’ म्हणवून घेणे मला पटले नाही. त्याची गरजही वाटली नाही, वाटत नाही.
             आठवणींच्या गराड्यात अनेक आठवणी पिंगा घालीत आहेत. एक महत्वाची आठवण नमुद करुन संपवितो. मिरजेतील नवरात्र संगीत महोत्सवातील कार्यक्रम आटपून महाराष्ट्र एक्सप्रेसने धामणगाव-यवतमाळ असा प्रवास करुन आर्णीला साडेचार वाजता पोहोचलो. तर घरी भटांची तार येऊन पडलेली ‘‘ताबडतोब निघुन अमरावतीला ढवळेंकडे यावे, हृदयनाथ मंगेशकर येत आहेत’’ ही घटना 1981-82 च्या दरम्यानची असावी. त्यावेळी आर्णीहून बाहेरगावी जाण्यासाठी एकही बस नव्हती. पदर पसरून कशीबशी एकाजणाची मोटारसायकल मिळवून वासुदेव भगत या जिवलग मित्राला सोबत घेऊन अमरावतीकडे निघालो. यवतमाळच्या थोडे पुढे जात नाही तो मोटारसायकल बंद पडली. भगत हे कसलेले मेकॅनिक असल्यामुळे कसेबसे सकाळपर्यंत अमरावतीला पोहोचलो. भटांची भेट झाल्यावर रात्री ढवळेंकडे हृदयनाथांसोबत जेवण व माझी मैफल असा कार्यक्रम असल्याचे कळले. सायंकाळी 6 वाजता मंगेशकर आले. सगळ्यांशी गप्पा झाल्यावर भटांनी मला व हृदयनाथांना एका खोलीत नेऊन बसवले. आमची दर्जेदार‘व्यवस्था’करून दिली व ‘चलने दो’ चा इशारा करुन खोलीतून निघून गेले. आम्ही दोघांनी मस्तपैकी आस्वाद घेत संगीत नियोजन, बंदिशी, ध्वनीमुद्रण यावर एक दीड तास चर्चा केली. नंतर सोबत जेवण केले. मैफल जमवली. हृदयनाथ मंगेशकरांसमोर गाणे म्हणजे तोंडाचा खेळ नव्हता. परंतु भटांनी अतिशय समजुतदारपणे आमची अगोदरची ‘‘बैठक’’ जमविल्यामुळे मैफल जमवायला त्रास झाला नाही. मैफिलीनंतरही रात्री दोन वाजेपर्यंत मी आणि मंगेशकर गप्पा मारीत बसलो होतो. हे सगळे भटांमुळेच होऊ शकले.
 सर्व सामान्यापेक्षा वेगळं रसायन कवटीत घेवून जन्मलेले एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश भट होय. त्यांच्यामधे नेहमी एक कवी, तत्त्वज्ञ वावरायचा त्याच वेळी एक क्षणात रागावणारं, क्षणात गळ्यात पडणारं, क्षणात हसणारं, क्षणात आकांडतांडव करणार अवखळ निरागस व हट्टी मूलही त्यांच्यात हुंदडत असायचं... त्यांच्यातली मिश्किली भल्याभल्यांना कोड्यात टाकायची. सुरेश भटांच्या सहवासातील अनेक वर्षात मी त्यांच्या स्वभावाची जवळ-जवळ सर्व रुपे पाहिली. त्यातील काही रुपे आजही स्वच्छपणे समोर दिसतात. त्यांचे नवोदित गझलकारांना पोटतिडकीने मार्गदर्शन करतांनाचे आणि त्यांच्या आकाशवाणीवरील 65 च्या कराराकरीता केंद्र निदेशकाशी वाद घालतानाचे भट... नवीन गझल लिहीणा-यांमध्ये एखादा फार जवळीक निर्माण करणारा जर परिस्थितीने गांजला असेल तर त्याला स्वत: व आमच्या सारख्यांना सांगून धान्य पुरवणारे कुटूंबप्रमुख भट... एखाद्याचा मुद्दा पटला नाही तर तोंडावर सांगण्याचा सडेतोडपणा व आवडला तर आवर्जून सांगणारे भट... जगण्यातील बिनधास्तपणा व त्यामुळे घडणा-या प्रसंगाला तोंड देणारे बिनधास्त भट... एखाद्या विषयी कसा का होईना गैरसमज झाला तर कोणी कितीही आणि कसेही समजाऊन सांगितले तरी न ऐकता गैरसमज कायम ठेवणारे एक वेगळे भट... जेवताना किंवा काही खाताना इतरांकडे लक्ष न देता ‘‘पार्वती पते हरहर महादेव’’ करणारे लहान मुलासारखे भट... जेवणातील एखादा पदार्थ आवडला तर बनविणा-या सुगृहिणीचे/बल्लवाचार्याचे मनापासून कौतुक करून त्यांची रेसिपी समजून घेणारे खवय्ये भट... भल्या-भल्यांशी पंगा घेणारे भट... स्वत:च्या मुलाच्या- हर्षवर्धनच्या भविष्याच्या काळजीने व्यथित होणारे भट... सामाजिक कार्यात पोटतिडकीने भाग घेणारे भट... सामाजिक, राजकीय व्यंगावर रोखठोकपणे लिहिणारे भट... जेवणापेक्षाही चहा-तंबाखूवर जास्ती प्रेम करणारे भट...सुरेश भटांची अशी कितीतरी रूपं माझ्या स्मरणात  अजूनही दरवळतात.
           आमची ही मैत्री म्हणजे एक वेगळं विश्व होतं आम्ही भांडायचो, वाद व्हायचे, प्रसंगी अबोला-रुसवा सुद्धा व्हायचा. शेवटी शेवटी मतभेदांमुळे थोडा दुरावा येत गेला पण मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली. त्यांच्या कडू-गोड आठवणी आणि स्वरबद्ध केलेल्या त्यांच्या चाळीस गझला व दहा गीते आजही मला साथ देत आहे. वरून फणसासारखा भासणा-या सुरेश भटांचे अंतरंग अच्छाअच्छांना कळले नाही.केवळ त्यांच्या खाण्या-‘पिण्याची’ चवीने चर्चा करणा-यांना ते कधी कळणारही नाही.या फणसातील गोड गरे चाखण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
 
-सुधाकर कदम
सी-१-सी/१३,गिरीधर नगर,
वारजे-माळवाडी,पुणे-५८. 
मोबा.९८२२४००५०९





 

Tuesday, December 22, 2020

गझलयात्रा...अमोल सिरसाट


'चकव्यातुन फिरतो मौनी'

         अवलिया हा शब्द सुफी संतांमुळे भारतात आला. सुफी संतांसारखे पायघोळ झगे घालतेले, सतत अल्लाहचे नाव घेत जगणारे लोक म्हणजे अवलिया असा समज प्रचलित आहे. परंतु मराठीत या शब्दाला स्वच्छंदी, छांदीष्ट किंवा आपल्याच धुंदीत जगणारा असे अनेक अर्थ प्राप्त झाले आहेत. भारतात गझलही सुफी पंथातील अवलिया संतांनीच आणली. मराठीत गझल रुजविणा-या अवलिया सुरेश भटांबरोबर सर्वप्रथम मराठी गझल गायकी रुजविणासाठी धडपडणारा एक चकव्यातून फिरणारा मौनी म्हणजे सुधाकर कदम! शास्त्रीय संगीतातील बहुतेक वाद्यांवर प्रभुत्व असलेल्या सुधाकर कदमांनी सुरुवातीच्या काळात सुरेश भटांबरोबर प्रसंगी पदराला खार लावून मराठी गझलेच्या प्रसार प्रचारासाठी प्रयत्न केला आहे.
 
       फारसी–उर्दू-हिंदी गझल गायकीला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. उर्दू गझल गायकीचे चाहते जगभरात पसरले आहेत. मराठी गझल गायकीला तशी परंपरा नाही. मराठीत गझलगायनाचे जे प्रयत्न झाले. त्यात सुगम संगीत आणि भावगीतासारख्या चाली देऊन गझल सादर केल्या जात. १९७५ मधे सुधाकर कदम यांनी ‘आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही’ ही यवतमाळच्या शंकर बडे यांची गझल १९७५ मधे सुधाकर कदम यांनी स्वरबद्ध करून नागपूर येथे विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उद्घाटन प्रसंगी सादर केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भट होते. इथूनच सुरेश भट आणि सुधाकर कदम या द्वयींचे सूर जुळले आणि मराठी गझल गायकीच्या परंपरेचा जन्म झाला. भटांनी सुधाकर कदमांना आपल्या अनेक रचना स्वरबद्ध करण्यासाठी दिल्या. हळुहळु त्यांनी स्वरबद्ध केलेल्या मराठीतील काही गझलांचा तीन तासांचा कार्यक्रम तयार झाला. या कार्यक्रमाला भटांनी ‘अशी गावी मराठी गझल’ असे शीर्षक दिले आणि महाराष्ट्रभरात या कार्यक्रमाचे प्रयोग सुरु झाले. १५ जुलै १९८२ ला पुण्यात झालेल्या कार्यक्रमाचे वृत्तांकन करताना साप्ताहिक ‘लोकप्रभा’ मधे छापून आलेला मजकूर अत्यंत उल्लेखनीय आहे. ‘सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची गझल ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी 'सा' लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्फूर्तपणे स्वागत केले. आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका... गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दांच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझलगायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे.’ गायकीच्या अंगानेसुद्धा मराठी गझल हा वेगळा प्रकार आहे. गझलेची बंदिश (सोप्या भाषेत चाल) प्रत्येक शब्दाला जिवंत करून अर्थाचे वेगवेगळे आयाम प्राप्त्त करून देत असते. गझलगायक प्रत्येक शब्दाला हळुवारपणे गोंजारत गझलकाराच्या मनातील भावनांचा प्रवाह रसिकाच्या हृदयापर्यंत थेट पोहोचविण्याचे काम करीत असतो. अशाप्रकारे गझल स्वरबद्ध करून मराठीत सर्वप्रथम गझलगायनाचे श्रेय सुधाकर कदम यांचेकडेच जाते.
            यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या छोट्याशा गावी १३ नोव्हेंबर १९४९ रोजी जन्मलेल्या सुधाकर कदम यांचे वडील पांडुरंग कदम हे वारकरी संप्रदायातील विदर्भातील सुप्रसिद्ध गायक आणि हार्मोनियम वादक होते. सुधाकर कदमांना संगीताचे प्राथमिक धडे त्यांच्याकडूनच मिळाले. यवतमाळला शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असतानाच ‘शिवरंजन’ ऑर्केस्ट्रामधे संगीत संयोजन, ऍकॉर्डियन वादन व गायन असा व्याप सांभाळता सांभाळता त्यांना चाली बसविण्याचा छंद जडला. सतत दहा वर्षे दहा बारा तास रियाज करून त्यांनी विविध तंतूवाद्ये आणि तालवाद्ये हाताळण्यात प्राविण्य मिळविले. याचा फायदा आकाशवाणी नागपूरची स्वरपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी झाला व ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक व मेंडोलिन वादक झाले. आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायक-वादकांना त्याकाळात सन्मानाचे स्थान होते. त्यानंतर सुधाकर कदम हे आर्णी येथेच संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले.
              सुरेश भट कदमांकडे आर्णीला मुक्कामी असायचे. आर्णीला मुक्कामी असताना त्यांनी अनेक गझला लिहिल्या. त्यापैकी एक गझल म्हणजे –

ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची

            ही गझल भटांनी लिहिली आणि लगेच सुधाकर कदमांना चाल लावण्यासाठी दिली. ते लगेच हार्मोनिअम घेऊन बसले आणि अख्खी रात्र जागून एक वैशिष्ट्यपूर्ण चाल दिली. भट त्यांची रात्रभराची तगमग पहात होते. त्यांनी सकाळी मनभरून दाद दिली. सृजनासाठी धडपडणा-या प्रत्येकाला ही तगमग स्वस्थपणे जगूच देत नाही. रात्रीअपरात्री भोवताली निरव शांतता असते मात्र कलावंताच्या मनात मात्र प्रचंड वादळ उठलेले असते. तो सगळे प्रहर जागून काढतो तेव्हांच उत्तम कलाकृती निर्माण होतात. सुधाकर कदमांनी भटांसह अनेक गझलकांरांच्या रचनास्वरबद्ध केल्या आहेत. त्याच्या मराठीसह उत्तमोत्तम हिंदी-उर्दू बंदिशींचा खजिना पुढील पिढ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. सुधाकर कदमांच्या कन्या भैरवी आणि रेणू यासुद्धा त्यांच्या गझलगायकीचा वारसा समर्थपणे चालवित आहेत. त्यांचे चिरंजीव निषाद कदम हे उत्तम तबलावादक आहेत. त्यांचे संपूर्ण कुटूंबच गझलमय झाले आहे असे म्हणावे लागेल.
             सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी महाराष्ट्राचे आद्य मराठी गझल गायक म्हणून त्यांचा गौरव केला आहे. सुरेश भट तर त्यांना ‘ महाराष्ट्राचे मेहदी हसन’ असे संबोधत असत. पुण्यातल्या त्यांच्या मैफिलींचे निवेदन खुद्द सुरेश भटांनी केले होते. मराठी गझल जनमानसात रुजविण्याचे या मंडळींचे कार्य पाहिले की खरोखरच नतमस्तक व्हावेसे वाटते. आणि म्हणूनच पुणे विद्यापिठाने कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते व ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या उपस्थितीत त्यांना सुरेश भटांच्या सहाव्या स्मृतिदिनी ‘सुरेश भट स्मृतिपुरस्कार २००९ ‘ व ‘गझलगंधर्व’ हा किताब देऊन सन्मानित केले आहे. पुण्याच्या अक्षर मानव प्रकाशनाने ‘चकव्यातून फिरतो मौनी’ हा गौरवग्रंथ श्रीकृष्ण राऊत यांच्या संपादनात प्रकाशित केला आहे. गायनासाठी स्व.छोटा गंधर्व आणि आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे मार्गदर्शन लाभलेले सुधाकर कदम हे एक उत्तम शिक्षक, संगीतकार, गायक, वादक तर आहेतच पण विनोदी लेखक, आणि कवी सुद्धा आहेत. 

सुधाकर कदम सी-१-सी/१३, गिरीधरनगर, वारजे माळवाडी ', पुणे - ४११०५८ भ्रमणध्वनी- ८८८८८५८८५०
..............................
अमोल बी शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

यापूर्वी प्रकाशित झालेले लेख वाचण्यासाठी अवश्य भेट द्या 👉
http://gazalyatra2020.blogspot.com


 





संगीत आणि साहित्य :