Wednesday, October 28, 2020
चकव्यातून फिरतो मौनी...सन्मामग्रंथ.
Monday, October 26, 2020
उर्दू गझलगायन ऐकताना...
https://gazalakar20.blogspot.com/2020/09/blog-post_28.html?m=1
हिंदुस्थानी संगीतातील सगळ्यात लोकप्रिय सुगम संगीत प्रकार म्हणून गझलची गणना करायला हवी.हा एकमेव असा प्रकार आहे की,यात काव्य व संगीत याचा समसमान आनंद घेता येतो.तसे ठुमरी,दादरा, चैती, कजरी वगैरे प्रकारात होत नाही.भारतात शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये शब्दांना तसे फारसे महत्व दिल्या जात नाही.स्वरांना आधार देण्यापुरतेच त्याचे महत्व असते.अर्थात शास्त्रीय संगीताचे गायक हे मान्य करणार नाही,पण हे कटू सत्य आहे.मी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतानाच्या चिजा आठवल्या की अजूनही हसायला येतं. उदा:- "तेंडेरे कारण मेंडेरे यार"....किंवा कॉलेजमध्ये शिकविलेल्या देस रागातील तरण्याचा अंतरा "नादिर दानी तूंदिर दानी दानी त दारे दानी"...ही ओळ गाताना अनेक विद्यार्थी (कारण तो सामूहिक वर्ग असायचा) "नादिर दानी तुंदिर दानी च्या ऐवजी "उंदिर दानी" असे गायचे...अशा अनेक चिजा आम्ही शिकलो.पण अर्थ कळला नाही.... कळले ते फक्त रागांचे स्वर-रूप.
साहित्यातील एक उत्तम प्रकार म्हणून गझलचा छान उपयोग झाला.पण संगीत प्रकार म्हणून जसा व्हावा तसा विचार शास्त्रीय संगीतामध्ये झाला नाही.ज्या लोकसंगीतामधून शास्त्रीय संगीताची उत्पत्ती झाली त्या लोकगीतांनाच शास्त्रकारांनी दूर ठेवून दुय्यम स्थान दिले,ते गझलला कसे काय मोठे स्थान देतील?आपल्या देशात संगीताचे फार मोठे भांडार प्रादेशिक संगीतामध्ये उपलब्ध होते/आहे.यातूनच विविध गान प्रकार तयार झालेत.पण शास्त्रीय संगीताचे पक्के शास्त्र बनवताना या सर्व प्रकारांना सुगम मानून शास्त्रीय संगीताच्या परिघाबाहेर ठेवल्या गेले.त्यामुळे संगीताची एक प्रकारे हानीच झाली.
खरे तर गझल गायकाला चार अवधाने सांभाळावी लागतात.अभ्यास करावा लागतो.
१.त्याला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.
२.तो उत्कृष्ट गायक असायला हवा.
३.त्याला साहित्याची पण चांगली जाण असायला हवी.(म्हणजे अभ्यास आलाच.)
अत्यंत महत्वाचे
४.म्हणजे तो उत्कृष्ट संगीतकारही असायला हवा.
असे असूनही गझल गायन प्रकाराला 'सुगम' म्हणणे हास्यास्पद आहे.
पं. रामकृष्णबुवा वझे सारखे थोर शास्त्रीय गायक गझल गायकीबद्दल काय म्हणतात ते बघा...
"गझल गायकीला आपलं असं स्वतःचं एक आगळं वेगळं अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असते आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असली तर गझल गायनातून ख्याल गायनाइतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभ रित्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकते".
तसेच सुप्रसिद्ध तबला वादक तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर म्हणतात,"गझल गायनामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असली तर ती रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते.भिडते..."असो....
उर्दू गझल गायकीचा शोध घेताना आपल्याला ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर निघालेल्या ध्वनीमुद्रिकांचा अभ्यास करावा लागेल.या इतिहासाचा धांडोळा घेताना भारतीय शास्त्रीय संगीतात उर्दू गझल गायकीचा विकास ठुमरी सोबत झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या गायक/गायिकांचे गझल गायन हे गायन न वाटता पठण वाटत होते असा उल्लेख अशोक दा रानडे यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते...यातुन गायकी अंगाने पुढे जाणाऱ्यांमध्ये गोहरजान,शमशाद, सुंदराबाई आणि त्यावेळच्या इतर गायिका दिसतात.पण खऱ्या अर्थाने गझल गायनाची सर्व यांत्रिक पद्धतीतून मुक्तता होऊन गझल गझलसारखी गाण्याची सुरवात बेगम अख्तर व बरकतअली खान साहेब यांना जाते.
(माझ्या गुरुचे गुरू छोटा गंधर्व नेहमी यवतमाळला यायचे.ते आले की मी त्यांच्या सेवेत असायचो. तसेच विदर्भात जिथे कुठे त्यांचा कार्यक्रम असेल तेथे ते मला हार्मोनियमच्या साथीला घेवून जायचे.असाच एकदा ब्रह्मपुरीला त्यांचा कार्यक्रम होता.मी सोबत होतोच...कार्यक्रमाच्या अगोदर तानपुरे लावून स्वर लावणे सुरू असताना अचानक ते म्हणाले
"तू मराठी गझल गायनाचा नव्याने प्रयत्न करतो असे मला कळले."
मी होय म्हणालो.त्या दिवशी त्यांचा काय मूड लागला कोण जाणे.रियाजात बरकतअली खान साहेबांच्या काही गझला त्यांनी मला गाऊन दाखविल्या. त्यातील बारकावे समजावून सांगितले. इतकेच नव्हे तर मूर्च्छना पद्धतीचा या गायकीत कसा उपयोग करता येतो ते सप्रयोग समजावून सांगितले.तसेच बरकतअलीची गझल गायकी टप्पा अंगाची होती हे ही सांगितले.त्यांच्या या प्रसादाचा उपयोग मला गझल संगीबद्ध करताना आपोआप होत गेला.)
उर्दू गझल गायकी तीन प्रकारांनी आपल्या समोर येते...
१. ठुमरी प्रमाणे - बेगम अख्तर
२. गीतांप्रमाणे - सैगल,मल्लिका पुखराज
३. टप्पा अंगाने - बरकत अली खान
गझल गायकी लोकप्रिय करण्यात या गायक/गायिकांच्या ध्वनिमुद्रीकांसोबतच चित्रपटांचाही मोठा वाटा आहे.
गझल गायकी ही शब्द व संगीत श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे.विसाव्या शतकात भावपूर्ण सादरीकरणासोबतच दरबारी,यमन,मल्हार वगैरे भारदस्त म्हणविल्या जाणाऱ्या रागांमध्ये बंदिशी बनवायला लागले.तसेच काव्य निवडही उत्तम व्हायला लागली.आपापल्या कुवतीप्रमाणे अविर्भाव-तिरोभाव, मूर्च्छना पद्धतीचा वापर करायला लागले.सगळ्याच गझल गायक/गायिकांचा उल्लेख या लेखात करणे अशक्य आहे.कारण प्रत्येक गायक/गायिकेचा आपला एक ढंग आहे.त्यावर लिहायचे तर प्रत्येकावर एक लेख होऊ शकतो.या लेखात अत्यंत लोकप्रिय अशा काही गझल गायकांच्या गायकीची मला दिसलेली वैशिष्ठ्ये थोडक्यात उद्धृत करण्याचा प्रयत्न करतो.
सर्वप्रथम भारत पाकिस्तानातील जुन्या-नव्या उर्दू गझल गायक/गायिकांची नावे माहिती करून घेऊ.
●मल्लिका पुखराज,उ.अमानत अली खान,अहमद रश्दी,नूरजहां,एम.बी.जॉन,मेहदी हसन,फरीदा खानम,अहमद परवेज,इकबाल बानो,मुन्नी बेगम,हमीद अली खान,हुसैन बख्श,परवेज मेहदी,गुलाम अली,नुसरत फतेह अली, मेहनाज बेगम,नैय्यरा नूर,आबिदा परवीन, असद अमानत अली खान,शफाकत अमानत अली खान,आसिफ मेहदी,सज्जाद अली....पाकिस्तान.
●बेगम अख्तर,तलत महमूद,सैगल,मधुरानी,पंकज उधास, अनुप जलोटा, चंदन दास,जगजित/चित्रा सिंग,भुपेंद्र/मिताली सिंग,राजेंद्र/नीना मेहता, पिनाज मसानी,तलत अजीज,हरिहरन,रुपकुमार राठोड,अहमद,महंमद हुसेन,जसविंदर सिंग...भारत.
(अनवधानाने काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!)
उर्दू गझल गायकीतील सर्वच गायक/गायिकांचे त्यांच्या त्यांच्या परीने मोलाचे योगदान आहे.सगळ्यांवर लिहिणे या एका लेखात शक्य होणार नाही.त्यातल्या त्यात मला भावलेल्या काही जणांच्या गायकीवर थोडे फार भाष्य करण्याचा प्रयत्न करतो.
माझ्या मते उर्दू गझल गायकीत रागदारीचा उत्कृष्ट उपयोग बेगम अख्तर यांनी केला आहे.त्यांची गझल गायकी ठुमरी,दादरा अंगाने जात होती.पण जव्हारदार मधाळ, मधूनच पत्ती लागणाऱ्या आवाजाने तेव्हाच्या रसिकांना वेड लावले होते.आजही त्यांनी गायिलेल्या गझला लोकप्रिय असून गायिल्या जातात.
मेहदी हसन यांची गायकी म्हणजे शब्दांना न्याय देत कसे गावे याची पाठशाळाच.... यावर लेखाच्या शेवटी अजून लिहिले आहे.
फरीदा खानम...शांत,संयत पण ठसठशीत गायकी असलेली गायिका.त्यांच्या "दिल जलाने की बात करते हो","ना रवा ... ","गुलों की बात करो","वो मुझ से हुए" वगैरे गझला ऐकल्यानंतर गायकीची प्रचिती येते.
गुलाम अली म्हणजे अनवट बंदीशीचा बादशहा.गुलाम अली इतका सरगमचा वापर दुसऱ्या कुणीही केला नाही.शब्दानुरूप वेगवेगळ्या सुरावटींचा वापर आणि कार्यक्रमाचे वेळीची देहबोली रसिकांकडून दाद घेणारी..."कहाँ आके रुकने थे रास्ते" या गझलमधील "जहां मोड था" येथील 'मोड',"दिल में इक लहर सी उठी हैं अभी" मधील 'हमींग' व 'लहर' या शदावरील वेगवेगळ्या सुरावटी त्यांच्या गझल गायकीचे वेगळेपण सिद्ध करते.त्यांच्या "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" या गझलने जगभरातील रसिकांना वेड लावलेले सगळ्यांनीच पाहिले.
जगजित सिंग म्हणजे उर्दू गझल गायकीला पडलेले सुरेल स्वप्न आहे.मेहदी हसन प्रमाणेच खर्जयुक्त जव्हारदार मधाळ आवाज,वाद्यवृंदाचा योग्य वापर,गझलांची निवड यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांनी जगजित-चित्रा जोडीला डोक्यावर घेतले.जगजित सिंग हे उत्कृष्ट 'कंपोजर' असल्यामुळे इतर गायक/गायिकांच्या जोडयांपेक्षा ही जोडी जास्ती लोकप्रिय ठरली.गायक जर उत्कृष्ट संगीतकार असेल तर गाणे नक्कीच उठावदार होते,हे अनेक संगीतकार गायकांच्या गायनावरून लक्षात येते.ह्या साऱ्या वैशिष्ठयांमुळे आपल्या देशात जगजित सिंग इतकी लोकप्रियता बेगम अख्तर नंतर कुणालाच मिळाली नाही
●उर्दू गझल गायकीचा बादशहा मेहदी हसन●
मेहदी हसन खां साहेबांचा जन्म १८ जुलै १९२७ ला भारतात लुना या राजस्थातील एका गावात झाला.वडील उस्ताद अझीम खान व काका उस्ताद इस्माईल खान परंपरागत धृपद गायक होते.त्यामुळे संगीत त्यांच्या रक्तातच वंशपरंपरेने आले होते.वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या बंधुसोबत त्यांनी धृपद व ख्याल गायन सादर केले.त्यांचा पिटीव्ही वरील पहिला कार्यक्रम १९५२ मध्ये झाला."नजर मिलते ही दिल की बात का चर्चा ना हो जाए" हे त्यांचे चित्रपटातील पहिले गाणे होते.चित्रपट होता 'शिकार',कवी यजदानी जालंधरी, संगीतकार असगर अली व एम हुसेन.
तसेच चित्रपटातील पहिली गझल होती "गुलों में रंग भरे बादे नौबहार चले" शायर फ़ैज अहमद फ़ैज,संगीत राशीद यांचे.
लता मंगेशकरांसोबत त्यांची दोन गाणी आहेत.एक मदन मोहन यांच्या संगीत दिगदर्शनाखाली गायिलेले 'नैनो में बदरा छाए' मधील एक अंतरा आणि मेहदी हसन यांनी संगीत दिलेल्या 'सरहदें' या अल्बम मधील 'तेरा मिलना बहुत अच्छा लगता है'
दोन्ही गाण्यांची लिंक...
१.
https://youtu.be/ad6Scios6zc
नैनो में बदरा...
२.
https://youtu.be/Do9Q7TwHoCA
तेरा मिलना बहुत अच्छा...
जगभर उर्दू गझल गायन लोकप्रिय करणारा हा कलावंत आयुष्याच्या शेवटापर्यंत गात राहिला.जवळ जवळ साठ वर्षे आवाज सांभाळून त्याच दमाने गात राहणे तोंडाचा खेळ नाही.
खान साहेबांचा शिष्यवर्ग पण छोटा नाही.त्यात प्रामुख्याने परवेज मेहदी,तलत अजीज,राजकुमार रिजवी,गुलाम अब्बास,सलामत अली,अफजल,मुन्नी सुभानी, रेहान अहमद खान,सविता आहुजा,शमशाद हुसेन चांद, शहनवाज बेगम (बांगला देश),यास्मिन मुश्तरी (बांगला देश) आणि हरिहरन ही नावे येतात.
त्यांचे गझल गायन म्हणजे शब्द-सुरांची अप्रतिम उधळण असायची."दिल की बात लबों पर लाकर, अब तक हम दुख सहते थे" हबीब जालीब यांची ही गझल काफी थाटावर आधारित आहे.पण त्यातीलच "बीत गया सावन का महिना मौसम ने नजरे बदली" हा शेर गाताना मध्यमाला षड्ज करून पहाडी रागाच्या स्वरांनी 'सावन'चा इतका मस्त फिल दिला की,कितीही ऐकले तरी समाधान होत नाही.....क्या बात हैं!
मुजफ्फर वारसीची "क्या भला मुझको परखने का नतीजा निकला" या गझलची बंदिश मालकौंस रागात आहे.पण पुढे शेरात दोन्ही गांधार,दोन्ही निषादाचा प्रयोग करुन केलेला अविर्भाव-तिरोभाव अतिशय मनभावन आहे.मालकौंस राग कुठे सोहनी राग कुठे,पण हे स्वरांचे धनुष्य पेलून प्रत्यंचा चढवलीच...
अहमद फराज यांची '"अब के हम बिछडे" ही गझल व बंदिशही तशीच...या सुरावटीचा मोह हृदयनाथ मंगेशकरांसोबतच मलाही पडला.व "मालवून टाक दीप चेतवून अंग अंग,राजसा किती दिसात लाभला निवांत संग" ही सुंदर रचना हृदयानाथांनी व "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही,कळते मला अरे हा माझा वसंत नाही" ही गझल मी स्वरबद्ध केली.
रईस खां साहेबांनी भैरवी रागात स्वरबद्ध केलेलं चित्रपटातील गीत "मैं खयाल हूँ किसी और का,मुझे सोचता कोई और है" जेव्हा कार्यक्रमात गातात तेव्हा त्यातील "सुबहो न मिल सकी" या ओळींवर ललित रागाच्या स्वरांची पखरण करतात तेव्हा जाणकारांच्या अंगावर रोमांच उठतो.ती आर्तता काळजात सरळ घुसते.
"कभी मेरी मूहाब्बत कम न होगी,लुटाने से दौलत कम न होगी" या पाकिस्तानी चित्रपटातील गीतावर बेतलेली खमाज रागातील "मुहब्बत करने वाले कम न होंगे,तेरी महफिल में लेकिन हम न होंगे" ही ठाय लयीतील गझल अफलातूनच आहे.यातील "जमाने भर के गम" या शेरात मिया मल्हारची झलक दाखवणारी सुरावट,"अगर तू इत्तेफाकन मिल भी जाए" या शेरात केलेली विविध रागांच्या स्वरांची उधळण अतिशय रंजक आहे.
मेहदी हसन यांनी जितक्या विविध रागात गझल गायिल्या तितक्या इतर कुणी गायिल्याचे दिसत नाही.(थोडा अपवाद गुलाम अली).
●गुलों में रंग भरे... झिंझोटी.
●शोला था जल बुझा हूँ...
●एक बस तू ही नहीं...मियाँ मल्हार
●कोंपले फिर फूट आए...सारंग
●कुब कू फैल गई बात... दरबारी
●जब उस जुल्फ की बात चली...बसंत मुखारी
●बात करनी मुझे मुश्किल...पहाडी
●बहुत बुरा है मगर...ललित
●रंजिश ही सही... यमन
●अबके हम बिछडे....भुपेश्वरी
अजूनही बरीच उदाहरणे देता येतील पण विस्तार भयास्तव थांबतो...
पुढे खान साहेबांच्या गायकी विषयी त्यांच्याच तोंडूनच ऐका...
मुलाखतीची लिंक
https://youtu.be/KBscPu-iXt4
गझलकार...सीमोल्लंघन विशेषांकामधून साभार...
Saturday, October 17, 2020
प्रेम पिया हम पाये...राजे मधुकरराव देशमुख (माहूर)
Thursday, October 15, 2020
मनोगत-आशिष जाधव
Wednesday, October 14, 2020
गर्भश्रीमंत राग 'यमन'
. यमन रागाच्या नावावर बरेच मतभेद आहेत.काही लोक याला फारसी भाषेतील ’इमन’ चेच यमन मध्ये झालेले रुपांतर मानतात.तसेच हा राग अमीर खुस्रो नावाच्या अल्लाऊद्दीन खिलजीच्या काळातील विद्वान संगीतकाराने प्रचलित केला अशीही मान्यता आहे.एवढे मात्र निश्चित की खुस्रोच्या काळात नव-नवीन राग प्रचारात आलेत.यात फारसी,इराणी सुरावटी भारतीय रागात मिसळल्या गेल्या होत्या.गोपाल नायक हा संगीताचा प्रकांड विद्वान खुस्रोचा समकालीन आहे.दक्षिणेतील पंडीत यमन हा राग ’यमुना कल्याण’चाच एक प्रकार मानतात.या नावाचा उल्लेख दक्षिणेकडील ग्रंथांमध्ये आहे.परंतू यमुना कल्याण आणि यमन यात नावाव्यतिरिक्त काहीच साम्य नाही.उत्तर भारतीय संगीत शास्त्र (भातखंडे कृत) या ग्रंथात हा राग कल्याण थाटातून उत्पन्न झाल्याचे लिहीले आहे.पण त्यातही तथ्य वाटत नाही,हे भातखंडेंचा आदर ठेऊन नमूद करतो..(माझे हे विधान अनेकांना आवडणार नाही.)कारण प्राचिन ग्रंथांमध्ये ’यमन’ नावाच्या रागाचा कुठेच उल्लेख केलेला आढळत नाही.तसेच कोण्या एका शब्दावरून राग आला असेल असेही वाटत नाही.कारण राग निर्मिती ही एक प्रक्रीया आहे.ती एकदम होणारी नाही...
काही लोक याला यमन कल्याण असेही म्हणतात.पण त्यालाही तसा फारसा अर्थ नाही.यमन रागात विवादी स्वराप्रमाणे कधीतरी कोमल मध्यम लावला की तो यमन कल्याण होतो.याला सुद्धा ग्रंथात आधार नाही.अशा प्रकारे एखादा स्वर बदलून किंवा जास्तीचा लावून किंवा विवादी म्हणून एखाद्या स्वराचा प्रयोग करून तो प्रचलित करणे अशी अनेक उदाहरणे आपणास दिसून येतील. ते काहीही असले तरी यमन हा राग अत्यंत लोकप्रिय आहे यात वाद नाही.मी तर त्याला ’गर्भश्रीमंत’ राग म्हणतो.यावर लिहायचे म्ह्टले तर सूर्य,समुद्र,अवकाश,धुमकेतू यावर लिहिण्यासारखे आहे.इतका मोठा आवाका असलेला दुसरा राग माझ्या तरी पाहण्यात आला नाही.तसेच माझ्या मते ’कल्याण’ ऐवजी ’यमन’ हाच थाट असायला हवा होता.यालाच शुद्ध थाट म्हणून मान्यता मिळायला हवी होती.कारण यात सातही स्वर शुद्ध म्हणजे तीव्र आहेत.शुद्ध थाट म्हणविल्या जाणार्या बिलावल थाटातील कोमल मध्यम व कोमल निषादाचा वापर विद्यार्थ्यांना विचारात पाडतो.(शास्त्र म्हणून तेच शिकविल्या जात असल्यामुळे यावर कोणी बोलत नाही ,ही गोष्ट वेगळी.तसेच बोलून फायदा काय ? परीक्षेत हेच लिहावे लागणार नाहीतर गूण कमी होतील !)पण यमनच्या बाबतीत असा संभ्रम रहात नाही.
शास्त्रीय माहितीः- गेल्या २०० ते २५० वर्षांपासून चालत आलेल्या उत्तर भारतीय संगीत शास्त्रानुसार यमन राग कल्याण थाटातून उत्पन्न झाला आहे.वादी स्वर गांधार असून संवादी स्वर निषाद आहे.जाती संपुर्ण असून गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. गानसमयावर या अगोदरही मी थोडक्यात लिहीले आहे या वेळी मात्र सविस्तर लिहीत आहे.खरे म्हणजे रागाचा गानसमय ठरविण्याची अशी कोणतीच साधने प्राचिन ग्रंथंमध्ये नमूद नाहीत.तरी पण रागाचा गानसमय ठरविल्या गेला आहे.कशाकरीता ? माहित नाही.जिथे प्राचिन ग्रंथातील रागांची नावे व आजच्या रागांच्या नावात साम्य नाही,स्वरात साम्य नाही तिथे गानसमय कसा आणि कोण ठरवणार ? काही तरी शास्त्रीय नियम लावायचे म्हणून लावणे या पलिकडे याला अर्थ नाही.माणसाने केव्हा गुणगुणावे,काय गुणगुणावे हे काय ठरवून होणार काय ? सध्याचा थाट पद्धतीचा विचार केला तर मधुवंतीसारखे राग तर थाट पद्धतीमध्ये बसतच नाही.मग दहा पेक्षा अकरा थाट करून त्या ११व्या थाटाला मधुवंती नाव दिले तर काय बिघडेल ? पण नाही, दहा थाटातच ठोक-पिट करून सर्व राग बसविणे...हे अनैसर्गिक वाटत नाही का ? हिंडोल,गौडसारंग,तोडी,मुलतानी या रागांमध्ये तीव्र मध्यम असून त्यांना दिवसा गायिल्या जाणारे राग म्हणून मान्यता दिल्या गेली आहे.खरे तर नियमानुसार तीव्र मध्यम असलेले राग रात्रीच गायिल्या जायला हवे. एक असाही नियम आहे की,’ग’ ’नि’ कोमल असलेल्या रागात तीव्र मध्यम लागत नाही.मग कोमल ग नि सोबत तीव्र म असलेल्या सुरावटीचा राग मधुकंस कसा ? खरे तर राग गाण्याच्या नियमाला फार पुर्वीपासूनच फाटा दिला आहे हे ’दर्पण’ या ग्रंथातील
"यथोत्काल एवैते गेया पूर्व्विधानतः /
राजाज्ञया सदागेया नतु कालं विचारयेत् //
आणि ’तरंगिणी मधील
"दशदंडात्परं रात्रौ सर्वेषां गानमीरीतम् /
रंगभुमौ नृपाज्ञायां कालदोषो न विद्यते //
तसेच श्री बॅनर्जी यांच्या ’गीतसुत्रसार’ (Grammer of vocal music) ग्रंथामध्ये पान ५८ वर म्हणतात...
"हमारे यहाँ राग-रागिनियों को दिन तथा रात्री के नियमित समयों पर गाने की जो प्रथा चली आ रही है,वह केवल काल्पनिक है"
या वरूनही गानसमय प्रथेतील पोकळपण स्पष्टपणे दिसून येतो.खरे म्हणजे स्वर समुदायात अशी काही विशेषता नाही की,ज्यामुळे त्यांना काही खास वेळी न गायिल्याने योग्य तो परिणाम साधल्या जात नाही.संगीताचा उद्देश स्वरांद्वारे भाव व्यक्त करून श्रोत्यांचे मन प्रसन्न करणे एवढाच आहे.म्हणजेच या करीता कोणत्याही विशिष्ठ अशा खास वेळेची गरज नाही.जे भाव सकाळी व्यक्त होऊ शकतात किंवा करू शकतात ते सायंकाळी किंवा रात्री का करू शकत नाही ? नक्कीच करू शकते,शकायलाच पाहीजे.’पारिजात’ या ग्रंथात भूपाली राग सकाळी गायिल्या जातो असा उल्लेख आहे.परंतू सध्या तो रात्रीकालिन मानल्या जातो.(घनःशाम सुंदरा...ही भूपाली रागातील भूपाळी सकाळी गोड वाटत नाही का ? सकाळच्या अहिर भै्रव रागातील ’पु्छो ना कैसे मैने रैन बिताई..’हे चित्रपटातील गाणे रात्री मन मोहतेच ना ?) दक्षिण भारतात यमन राग सकाळी व भैरवी रात्री गायिल्या जाते.तर काहींच्या मते ललित,रामकली,तोडी वगैरे राग सायंकाळी गायिल्याने गानसिद्धी उत्तम प्रकारे होते.म्हणजेच गानसमय हा प्रकार म्हणजे लोकांवर लादलेले थोतांड आहे हे सिद्ध होते.स्वर,स्वर आहे;राग,राग आहे,केव्हाही त्याचा परिणाम सारखाच अपेक्षित आहे.
ते काहीही असले तरी यमन राग हा सर्वांचा आवडता आहे हे मात्र खरे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे कल्पक गायक,वादक,संगीतकारांवर हा लवकर प्रसन्न होऊन वरही देऊन टाकतो.पण जर का यात भरकटला तर ’पचका’ होणे ठरलेले आहे.यमन गाता आला की सर्व राग गाता येतात असे जाणकार सांगतात.हा राग गायिला नाही असा गायक,वादक सापडणे अशक्यच ! इतका हा मधूर आहे.भारताच्या सर्व भाषा-बोलींमधील जेवढी गाणी या रागात बनली असतील तेवढी गाणी दुसर्या रागात तयार झालेली नसावी.सुगम संगीतकारांसाठी तर हा राग वरदानच ठरला आहे.कोणतेही भाव समर्थपणे व्यक्त करण्याची क्षमता यमन मध्ये आहे.हे एक संगीतकार म्हणून मी ठामपणे सांगू शकतो.
(येथे मी तयार केलेल्या यमन रागाच्या विविध मूडच्या रचनांवर कोल्हापूरचे संगीत समीक्षक ऍडव्होकेट राम जोशी यांच्या लेखातील काही भाग देण्याचा मोह मला आवरत नाही.ते म्हणातात... "यमन हा रागच असा की कोणाही संगीतकारानं त्याच्या प्रेमात पडावं. कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत, ती प्रत्येक मुर्ती स्वतंत्र आहे़. प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे, रंग आहे, रुप आहे, व्यक्तिमत्व आहे़. कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात़.
‘सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी
गातो गझल मराठी प्रिये तुझ्याच साठी’
दादर्यातल्या ह्या बंदिशीची यमन मधील ही रचना. अगदी साधी. सुगमसंगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथं अपेक्षित असतं ते श्रवण सौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथं शुध्द यमन शोधण्याची धडपड करू नये कारण तो यमन कल्याणाशी क्षणांत दोस्ती करतो़ आणि दोन्ही माध्यमांच्या अशा हळुवार लगावांची प्रचिती आली की उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच रहात नाही़ ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली व घेतो़.
‘मी असा ह्या बासरीचा सूर होतो,
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो’
ह्या गझलची चालही अशीच आहे़. धृवपदातली -मतल्यातली दुसरी ओळ (ज्याला क्रॉस लाईन म्हणतात) त्याची ठेवण व स्वरसमुहाची रचना अत्यंत मोहक आहे़. त्यातील ‘सूर होतो़’ इथं तार सप्तकातला षडज् सूर ह्या शब्दासाठी खुबीनं वापरला तर आहेच पण ती ओळ म्हणताना ‘सूर’ हा शब्द आणि त्याचा तारषड्जाचा हळूवार पण भरीव लगाव व रुपक तालांचा एक पूर्ण जादा आवर्तन पूर्ण होईपर्यंत जो दीर्घकाळ मुक्काम ठेवतो तो अतीसुंदर लागतो़. संगीत रचनाकाराकडं नुसता सांगीतिक अलंकाराचा साठा असून चालत नाही तर स्वरपोषाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो़. संगीतकार हाच खर्या अर्थानं स्वतःच्या रचना समर्थ पणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो. हा अनुभव मास्तर कृष्णरावांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम, यशवंत देव यांच्या पर्यंत येतो. सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत़. ‘सूऱ होतो’ इथं शब्दकला आणि स्वर माधुर्य असा सुरेख समन्वय झालाय़.
‘सांज घनाच्या मिटल्या ओळी’
हे एक अतिशय हळूवार भावना उलगडून दाखविणारं सरस काव्य़. कदम यांनी बंदीशही यमनमध्येच बांधलीय़. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस़ ‘क्षितीजावरती़’ इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा करॅक्टरच बदललाय असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे ‘क्षितीज’ ह्या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्यायच नाही हे त्वरीत पटते, पुरियाचं होणारं दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळं सुरेख जुळून आलंय़. प्रसिध्द कवी अनिल कांबळे यांच्या
‘जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू /
ऐनवेळी अशी काय करतेस’
तू ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे़. यमन मधली अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना, खेमट्याच्या अंगानं लागणारा दादर्याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही अशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे़. सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास ‘ऐनवेळी अशी काय’ ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमुहरचना म्हणावयास हरकत नाही. ‘सामग, सामगधप’ वगैरे अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे़. ‘तुझ्या नभाला गडे किनारे’ ही सुध्दा यमनमधलीच श्रवणीय रचना आहे. यमन ह्या एकाच रागातल्या चारी रचना त्यांनी मला एकापाठोपाठ ऐकविल्या. पण खासियत अशी की त्यांत तोचतोचपणा नाही़. स्वररचनेची पठडी ठरीव स्वरुपाची नाही. त्यात आहे पूर्णतः वेगळेपण, हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचं वैशिष्ट मानलं जातं. सुगम संगीतात आकर्षक मुखड्याला-धृवपदाला खास महत्व आहे़.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात़. त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असतं ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला. कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे़. मुखड्याच्या चालीला अनुरूप अशी किंबहुना त्याचं सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करुन अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते़. तसे नसेल तर पूर्ण चालच फसते़ अनेक संगीत रचनामध्ये हे दोष दिसतात़. संगीतकाराला इथं आपली प्रज्ञा ओतावी लागते़. सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणार्या आहेत म्हणूनच त्या भावतात़. कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते़. कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणं म्हणजे हळूच मधाचं बोट चाखण्यासारखं गोड मधुर असतं.अर्थातच शेवटच कडवं हे सर्वार्थानं हायलाईट असतं. तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात़. एकाच यमनाची ही विविध रुपे, विविध रंग, त्याचा वेगवेगळा ढंग. आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असं आमच्या भोवती टाकलं की आम्ही स्वतः जाणकार रसिक असूनही फसलो़. मग लक्षात आलं की ही यमनी फसवणूक होती पण ही फसवणूक गोड होती़. निर्भेळ होती.")
यमन हा अभंगापासून तॊ लावणीपर्यंत सर्व प्रकारात रंगतो म्हणा किंवा रंगवितो म्हणा !मराठीमध्ये जवळ-जवळ सर्वच संगीतकारांनी यात स्वररचना केली आहे.त्याची यादी करतो म्हटले तर तो एक मोठा लेखच होईल.तरी पण काहींचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही.’धुंदी कळ्यांना...’, ’का रे दुरावा...’, ’पराधीन आहे जगती...’, ’तोच चंद्रमा...’, ’पिकल्या पानाचा देठ की ग हिरवा...’, ’कबीराचे शेले विणतो...’, ’सुखकर्ता दुखहर्ता...(आरती)’, ’जिथे सागरा धरणी मिळते...’, ’जीवनात ही घडी...’, ’शुक्र तारा...’, ’तिन्ही सांजा सखे मिळाल्या...’, सोबतच अनेक नाट्यगीतेही यात आहेत.त्यातील अभिषेकी बुवांनी मत्स्यगंधा नाटकाकरीता रचलेले स्वरशिल्प ’देवाघरचे ज्ञात कुणाला...’ हे मला अतिशय भावले.गायक आहेत रामदास कामत. हिंदी चित्रपटसृष्टीतही यमन ने धुमाकूळ घातला आहे.सैगलच्या ’मैं क्या जानू क्या जानू रे...’ पासून तर आता-आताच्या ’तुम दिल की धडकन हो....’पर्यंत...यातील उल्लेखनीय गाणी आहेत...’मन रे तू काहे न धीर धरे...’, ’जिया ले गयो...’, ’जा रे बदरा बैरी जा...’, ’वो हँसके मिले हमको...’, ’पान खाये सैयाँ...’, ’इस मोडपर आते है...’, ’चंदन सा बदन...’, ’आँसू भरी है ...’, ’जब दीप जले आना...’ अशी किती गाणी घ्यावीत...............? उर्दू ग़ज़ल मध्ये ’रंजिश ही सही....’ही ग़ज़ल म्हणजे मैलाचा दगड आहे.सोबतच ’वो मुझसे हुये...’, ’शाम-ए-फ़िराक...’ ह्या गझला आणि ’आज जाने की ज़िद ना करो...’ ही फ़रीदा खानम यांनी गायिलेली रचना म्हणजेही कळसच आहे.यात ’मरीज़े मुहब्बत...’, ’दिलवालों क्या देख रहे हो ह्या ग़ुलामलीच्या गझला आपला वेगळा रंग दाखवितात.’क्युँ मुझे मौत के पैग़ाम दिए जाते है...’ (शोभा गुर्टू), ’तुम आए हो तो शबे इंतज़ार गुजरी है...’ (इकबाल बानो), ’आपका इंतज़ार कौन करे...’(शुमोना राय) या गझलाही अतिशय श्रवणीय आहेत. उर्दू गझल गायनातील मेहदी हसन साहेबांनी गायिलेली अहमद फ़राज़ यांची ’रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...’ या गझलने लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढले.(खरे म्हणजे हे ’मोहब्बत’ या १९७२ सालच्या पाकिस्तानी सिनेमातील गाणे (ग़ज़ल) असून,याचे संगीतकार निसार बज़्मी हे आहेत.पण खाँ साहेबांनी महफिलीत गाऊन या रचनेचे सोने केले.)या गझल सोबतच यमन रागाचीही लोकप्रियता (गझल गायनाचे संदर्भात) परमावधीला पोहचली.मूलतःच गोड असलेल्या या रागात फ़राज़ साहेबांचे शब्द, खाँ साहेबांचा जव्हारदार मधाळ आवाज आणि शब्दांना साजेशी विनवणी करणारी बंदिश असा उच्चतम कोटीचा संगम यात झालेला दिसून येतो....
अशीच विनवणी मी स्वरबद्ध केलेल्या #तुझ्यासाठीच_मी या अलबम मधील 'तुझ्यासाठीच मी...'या गझलमध्ये आपणास दिसून येईल.(अर्थात खरे परीक्षक आपण आहात) असा हा यमन...
ऐका तर मग...फक्त मध्य आणि मंद्र सप्तकातील ही बंदिश, वैशाली माडेच्या आवाजात..
तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते
तुझ्यासाठीच स्वप्नांचे दिवे मी लावले होते
-दिलीप पांढरपट्टे
Tuesday, October 6, 2020
सूरों का साधक....चंद्रशेखर बाजोरिया
Tuesday, September 15, 2020
संसार - सुलभा सुधाकर
कलाकाराशी संसार म्हणजे तारेवरची कसरत असते.त्यातही तो जर स्वाभिमानी,परखड बोलणारा,सच्चा मनाचा,स्वावलंबी, कोणासमोरही हात न पसरणार,न वाकणारा ,भल्यांना लंगोटी देऊन नाठाळाना झोडणारा असेल तर सुळावरची पोळी असते.पण मी डोळसपणे हा सूळ स्वीकारला.अनेक वर्षे अनेक प्रकारच्या वेदना सहन करत आज साधी पोळी नाही तर पुरणाची पोळी ,ती ही वाटीभर तुपाशी खात आहे.ज्या दिवशी हळव्या पण कणखर,जिद्दी सुधाकरशी लग्न केले त्या दिवसापासून त्याची प्रतिभा कशी फुलेल याचाच विचार करत करत त्याला जमेल तशी साथ देत गेले.
सुधाकरच्या मराठी गझल गायकीबद्दल स्व.सुरेश भटांनी त्याला १९८१ मध्ये '#महाराष्ट्राचे_मराठी_मेहदी_हसन' ही उपाधी देऊन गौरविले.गझल गायकी हा नवा प्रकार मराठीमध्ये आणल्याबद्दल महाराष्ट्र जेसीजने १९८३ मध्ये '#Out_standing_young_person' हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गोंदिया येथे मा. छेडीलालजी गुप्ता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सुधाकरला दिलेल्या माणपत्रात '#पायोनीअर_ऑफ_मराठी_गझल_गायकी' असा स्पष्ट उल्लेख आहे.कोणी काहीही म्हणोत,पण ह्या दोन्ही उपाध्या मिळण्याअगोदर किमान पाच/सहा वर्षे तरी सुधाकरने मराठी गझल गायकीसाठी मेहनत घेतलीच असेल ना! मधल्या काळात पुण्याला स्थायिक होईपर्यंत काही स्वतःच स्वतःला नावाजणाऱ्या मंडळींनी हे सत्य हेतुपुरस्पर दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला.
१९८१ मध्ये मी आणि सुधाकर स्व.सुरेश भटांकडे मुक्कामी असताना एक दिवस आजचे नावाजलेले एक गायक हार्मोनियम घेऊन आपल्या चाली ऐकवायला आल्याचे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.याला श्रीमती पुष्पाताई सुरेश भट साक्षीदार आहेत.स्व.भट व सुधाकर पलंगावर बसून त्यांच्या चाली ऐकत होते.नंतर दोघांची चर्चा झाली.त्यात सुधाकरने 'त्या' गायकाबद्दल एका शब्दानेही वाईट शेरा दिला नाही.असा हा सुधाकर.आणि सुधाकरचे कार्य लोकांसमोर येऊ नये म्हणून प्रयत्न करणारा 'तो' गायक.असो.
हे एवढ्यासाठीच की काही वर्षांपूर्वी फेसबुकवर झालेली चर्चा मी वाचली.त्यात मराठी गझल गायकीच्या सुरवातीची काहीच माहिती नसलेल्या एका नवोदिताची प्रतिक्रिया होती.'माझा जन्मच तेव्हा झाला नव्हता.' असे होते तर मग चर्चेत सहभागी कसा झालास बाबा! अशा कॉमेंट बघून हसावे की रडावे कळत नव्हते.भटांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाचा खऱ्या अर्थाने दुरुपयोग जर कोणी केला असेल तर तो याच लोकांनी केला.पण सुधाकरचे काम खुद्द भटांसोबतचे आणि भटांच्या हयातीत केलेले असल्यामुळे कोणी कितीही नाकारले तरी सुधाकरच्या नावाशिवाय मराठी गझल गायकीचा इतिहास पुढे जाऊच शकत नाही.
सुधाकर नुसता गझल गायक नाही,तर तो चांगला संगीतकार आहे.सरोद,हार्मोनियम,तबला,मेंडोलीन, अकॉर्डियन या वाद्यांवर त्याचे प्रभुत्व आहे.त्याच्यात एक चांगला लेखक,कवी पण दडलेला आहे.आर्णीला त्याने समाजकारण,राजकारणही केले.तो एक चांगला पती व बापही आहे.संगीताचे शिक्षण घेताना त्याला आलेल्या खडतर अनुभवामुळे त्याने त्याच्याकडे संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बापाच्या मायेने वागविले.त्यामुळे आमचे घर म्हणजे एक मोठे कुटुंबच झाले होते.सोबतच दर वर्षी एक-दोन विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याचा वसा पुण्याला येईपर्यंत सातत्याने तीस वर्षे चालविला. ही सर्कस चालविताना मला खूप कसरत करावी लागायची.पण त्यात खूप आनंद मिळायचा.
माझी सुधाकरशी ओळख झाल्यानंतर काही वर्षे आम्ही प्रेमात पडलो हेच कळले नाही.माझी आई शिक्षिका होती.सुंदर गायची.तिच्या शाळेत तिने त्या वेळच्या अत्यंत लोकप्रिय 'मी डोलकर' या गाण्यावर नृत्य बसविले होते.पण गायक आणि मधले म्युझिक पिसेस वाजवणारे त्यावेळी यवतमाळात कोणीच नसल्यामुळे सुधाकरच्या ऑर्केस्ट्राच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या आमच्या मैत्रिणीच्या टोळक्याने आईला सुधाकरचे नाव सुचवले.सुधाकर त्यावेळी कॉलेज करून ऑर्केस्ट्रासोबतच शाळा-शाळातील अशा प्रकारची कामे करून किंवा पार्ट टाइम जॉब करून स्वतःचा खर्च चालवायचा.या निमित्ताने त्याचे आमच्याकडे येणे सुरू झाले.आणि तो घरातील एक सदस्य बनून गेला.
त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट होती.तरी पण त्याच्या वागण्यात,बोलण्यात,राहण्यात एक वेगळेपणा होता कुठेही लालसा दिसत नव्हती.प्रत्येक ठिकाणी मदतीचा हात पुढे करण्याचा त्यांचा स्वभाव, त्याची दिलदार वृत्ती दाखवून देत होती.अशातच मी एन.सी.सी.त असल्यामुळे कॉलेजतर्फे दार्जिलिंगला होणाऱ्या माउंटेनरिंगच्या कँपसाठी माझी निवड झाली.कँप दोन महिन्यांच्या होता.कँप करीता जाताना तो मला सोडायला बसस्थानकावर आला असता त्याच्या डोळ्यातील भाव मला वेगळा वाटला.
दार्जिलिंगला पोहोचल्यावर आमचे खडतर ट्रेनिंग सुरू झाले. त्या धबडग्यात दिवस कसा निघून जायचा ते कळत नव्हते.पण मोकळा वेळ मिळाला की सुधाकरचे ते डोळे व हिरमुसलेला चेहरा आठवायचा व खूप काही हरवल्यासारखे वाटायचे. आम्ही एकमेकांना पत्र लिहायचो पण त्यात 'तसा' कुठलाच उल्लेख नसायचा. ती पत्रे वाचली की आजही हसायला येतं. मी पत्रात दार्जिलिंग व तेथील कँपविषयी लिहायचे व सुधाकर यवतमाळचे हाल-अहवाल कळवायचा. कँप संपवून परत आल्याबरोबर मी सरळ सुधाकरला भेटायला त्याच्या घरी गेले.त्याला पाहिल्यावर जे काही वाटले त्यावरून मी त्याच्या प्रेमात पडल्याचे कळले.सुधाकरही बोलत नव्हता. पण त्याचे डोळे बोलत होते. त्याची व्यक्त होण्याची ही नेहमीची पद्धत आहे.आजही डोळ्यावरून,चेहऱ्यावरून त्याच्या अंतर्मनाचा अदमास मला येतो.
मी ब्राह्मण,सुधाकर कुणबी.आमचा आंतरजातीय विवाह .हा विवाह त्यावेळी खूप गाजला.तारीख होती २१ नोव्हेंबर १९७३.लग्न झाले तेव्हा सुधाकर आपली सगळी स्वप्ने बाजूला ठेऊन इच्छा नसताना पोटाच्या सोईसाठी आर्णी या वीस हजार लोकवस्तीच्या गावात संगीत शिक्षक म्हणून रुजू झाला.पगार फक्त दिडशे रुपये.त्यात घर चालवणे,येणाऱ्या जाणाऱ्यांचे करणे यात खूप ओढाताण व्हायची.पण त्याची काहीतरी बनण्यासाठी चाललेली मेहनत मला बळ द्यायची.आज ना उद्या या मेहनतीचे फळ मिळणारच याचा मला विश्वास होता.संगीत त्याच्या रोमारोमात भिनले आहे.आजही त्याची सारी धडपड मराठी गझल गायकी लोकप्रिय करण्याकरीताच सुरू आहे.तो ब्राह्मण नसल्यामुळे अनेक वाईट अनुभव त्याच्या वाट्याला आलेत.त्यातच त्याचा स्पष्टवक्तेपणाही त्याला नडतो.घरी आणि दारीही.
आर्णीला आल्यावर त्याचा ऑर्केस्ट्रा सुटला.पुढे काय करावे हा मोठा प्रश्न त्याच्या समोर होता.काही तरी करावे तर कोणाचे मार्गदर्शन नाही.कोणाचा गंडा बांधावा तर आर्थिक परिस्थिती नाही.त्याला ज्यांच्याकडे संगीताचे पुढील शिक्षण घ्यायचे होते ते पं. जसराज,पं. जितेंद्र अभिषेकी ही मंडळी मुंबईला होती.मग सुधाकरने स्वतःच स्वतःचा गुरू बनून एकलव्याप्रमाणे आराधना सुरू केली.त्याला इतर वाद्यांमध्ये गती होती.पण सरोद जास्ती आवडायचे. सरोद शिकायची त्याची तळमळ बघून मी माझ्या बांगड्या विकून सरोद आणायला पैसे दिले.आणि त्याचा बिन गुरूचा,फक्त पुस्तकावरून आणि रेडिओवर सरोद ऐकून रियाज सुरू झाला.तीन वर्षे ढोरमेहनत करून सरोद वादन आत्मसात केले.कार्यक्रमही व्हायला लागले.तरी पण गायन की वादन हा तिढा काही सुटेना.सुरवातीच्या एकल कार्यक्रमात तो सरोद वादन, नाट्यगीत,एखादी उर्दू गझल आणि काही स्वतः स्वरबद्ध केलेल्या रचना सादर करायचा.नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलेल्या अशाच एका कार्यक्रमात सुरेश भटांनी त्याला ऐकले व त्याच्यातील संगीतकार गायकाला हेरले व त्यांच्या काही गझल स्वरबद्ध करण्याकरीता दिल्या.
सुधाकरने दिलेल्या चाली सुरेश भटांना आवडल्या.त्यामुळे मराठी गझल गायन की सरोद वादन हा नवा तिढा समोर आला.या द्विधा मनःस्थितीमधून पं. जितेंद्र अभिषेकींनी त्याला बाहेर काढले व मराठी गझल गायकी या नव्या गायन प्रकाराकडे पूर्ण लक्ष द्यावे असे सांगून मार्गदर्शनही केले.या अगोदर छोटा गंधर्वांकडूनही त्याला खूप काही शिकायला मिळाले.सुधाकरचा हार्मोनियमचा हात चांगला असल्यामुळे छोटा गंधर्वांच्या विदर्भातील कार्यक्रमासाठी कासलीकर गुरुजी सुधाकरला त्यांचेसोबत हार्मोनियमच्या साथीला पाठवायचे.त्यांचे मार्गदर्शन आशीर्वाद सुधाकरला लाभले.ही अतिशय मोलाची गोष्ट होती.कारण तो मुंबई-पुण्याला जाऊन या दिग्गजांकडून धडे घेऊ शकत नव्हता.
हळू हळू जम बसत गेला.मराठी गझल गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले.यासाठी सुरेश भटांसोबत सुधाकरने अतिशय परिश्रम घेतले.हे करताना प्रकृतीकडे हवे तसे लक्ष न दिल्याने नेमके भरात असताना १९८२ मध्ये स्पॉंडीलायसिसचा जोरदार अटॅक आला ट्रक्शन,लाईट,फिजिओथेरपी वगैरेने त्रास कमी झाला.पण सरोदच्या रियाजवर त्याचा परिणाम होऊन अत्यंत आवडीचे असे सरोद वादन त्याला बंद करावे लागले.पण गझल मात्र दवडली नाही.सोबतच इतर अनेक उपद्व्यापांचा धडाका लावला.संगीत विद्यालयाची स्थापना करून १९७३ मध्ये परीक्षा केंद्रही मिळवले.सोबतच अभिनय कला मंडळाची स्थापना करून एकांकिका स्पर्धा,पाठ्यपुस्तकातील कविता स्वरबद्ध करून त्याच्या कॅसेट्स काढणे,जिल्हाभर कविता गायनाची शिबिरे आयोजित करणे,पुण्याच्या गीतमंच विभागासाठी व बालचित्रवाणीसाठी गाणी स्वरबद्ध करणे,पत्रकारिता,राजकारण वगैरे वगैरे...
'अशी गावी मराठी गझल' हा कार्यक्रम भरात असताना सुरेश भटांच्या गीत-गझलांची रेकॉर्ड निघणार होती.तेव्हा संगीतकार म्हणून सुधाकर ते काम करणार होता.पण कुठे माशी शिंकली कोण जाणे,हे काम दुसऱ्या कोणाकडे गेले.याचा सुधाकरला फार मोठा धक्का बसला.त्यावेळी जर हे काम सुधाकरच्या हातून झाले असते तर आजचे चित्र काही निराळेच असते.याउप्परही त्याने मराठी गझल गायकीलाच प्राधान्य देऊन आपले कार्यक्रम सुरूच ठेवले.यावेळी जर पुन्हा ऑर्केस्ट्रा सुरू केला असता तर खूप पैसा कमवता आला असता.पण सुधाकरने तसे केले नाही.महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही त्याचे कार्यक्रम गाजले.तरी पण स्वभावातील रोखठोकपणा,कोणाही समोर मान न झुकवणे,लाळघोटेपणा वगैरे न जमल्यामुळे तसा तो उपेक्षितच राहिला.तरी पण मित्र मंडळीने 'भरारी' नामक महाराष्ट्रातील पहिली कॅसेट काढली .विदर्भात तिला चांगला प्रतिसाद मिळाला.सुधाकरची घोडदौड पुणे-मुंबईतील कार्यक्रमानंतरही सुरूच राहिली.या पाच-सात वर्षात सुरेश भट आमच्या कुटुंबातील एक झाले होते.आर्णीला सतत येणेजाने सुरू असायचे.माझ्या चंद्रमौळी घरात त्यांनी अनेक सुंदर गझला लिहिल्या.कवी व संगीतकार एकत्र आल्यावर जे काही वातावरण तयार व्हायचे ते भारावून टाकणारे असायचे. या वातावरणामुळे भटांचे खाण्याचे चोचले पुरवताना मला पण आनंद मिळायचा.
दोघांनी जागवलेल्या अनेक रात्री मला आठवतात.आर्णीकरांसाठी तर ही पर्वणीच असायची.मुलाच्या संदर्भातील सल ते माझ्याजवळ बोलून दाखवायचे.त्यांच्या या हळव्या काळात सुधाकरने व मी त्यांना खूप सांभाळून घेतले.बरेचसे निर्णय ते सुधाकरला विचारून घ्यायचे.नागपुरात कंटाळवाणे झाले की आर्णीला निघून यायचे. मग मैफली रंगायच्या. शंकर बडे,श्रीकृष्ण राऊत,नारायण कुलकर्णी कवठेकर,योगेश बऱ्हाणपूरे,वामन तेलंग,श्रद्धा पराते, जगन वंजारी,कलीम खान वगैरे साहित्यिक ,असहित्यिक व आर्णीची रसिक मंडळी याची साक्षीदार आहे.
गझल हा दोघांमधील समान दुवा असल्यामुळे दोघांनीही गझलचे कार्यक्रम करताना पैशाला दुय्यम स्थान दिले.थोडक्यात काय तर'लष्कराची सेवा'.या सगळ्याला कोणाची दृष्ट लागली कोण जाणे. हा आनंद मेळावा १९९५ नंतर हळूहळू बंद झाला.भटांचे आर्णीला येणे बंद झाले.तरी सुधाकर शेवटपर्यंत त्यांना भेटायला जायचा. सुरेश भटांच्या मृत्यूनंतर त्याने लिहिलेल्या 'मराठी गझलचा आधारवड कोसळला' या लेखावरून सुधाकरच्या हळव्या मनाची आणि भटांवरील प्रेमाची कल्पना येते.
आर्णीला नोकरी सुरू झाल्याबरोबर प्रचंड ऊर्जा असलेल्या सुधाकरने अनेक उपद्व्याप सुरू केले.शिवजयंती उत्सव,अभिनय कला मंडळ,स्वरगंगा या संस्थांची स्थापना करून परिसर नाट्य-संगीतमय करून टाकला.भरीस भर म्हणून पत्रकारिता सुरू केली.तालुका पत्रकार संघाची स्थापना करून त्याचे अध्यक्षपद,तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पदही भूषविले.या सर्व उपक्रमांमुळे सकाळी चहाचे भांडे चुलीवर चढले की,सायंकाळीच उतरायचे.त्यातच शिवसेनेचे काम सुरू केल्यावर तर कार्यकर्त्यांचा राबता अधिकच वाढला. शिवसेनेचे काम करताना त्याच्यावर अनेक केसेस लागल्या. पोलिसांचा ससेमिरा इतका लागला की,त्याला तडीपार व्हावे लागले.पण जन्मजात निडर असलेल्या वृत्तीमुळे सुधाकरमध्ये फारसा फरक पडला नाही.संगीत क्षेत्रातील असल्यामुळे त्याचे सर्व स्तरातील लोकांशी तसेच राजकीय मंडळींशी सुद्धा अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.पण राजकारण म्हटले की हे संबंध वगैरे बाजूला राहतात.त्यातच युतीचे राज्य यायच्या अगोदरच्या निवडणुकीत सुधाकरला शिवसेनेच्या उमेदवारीबद्दल विचारणा झाली होती.पण मी त्याला कठोरपणे विरोध केला.कारण राजकारणात टिकणारी ही वल्ली नाही ,हे मला चांगलेच माहीत होते.माझा टोकाचा विरोध पाहून त्याने श्रीकांत मुनगीनवार या विद्यार्थ्याला उमेदवारी देऊन निवडून आणले व विदर्भाला शिवसेनेचा पहिलावहिला आमदार दिला.पण या कामाची दखल ना शिवसेनेने घेतली ना आमदार झालेल्या विद्यार्थ्याने.त्यामुळे पुढील निवडणुकीत संजय देशमुख या बंडखोर उमेदवाराला सहकार्य केले.तो फक्त १४४ मतांनी विजयी झाला.या कालावधीत त्याला खूप मनस्ताप भोगावा लागला.संगीत दुय्यम झाले.संगीत विद्यालय हा त्याचा हलवा कोपरा होता. त्यामुळे सारे सहन करून विद्यालयाचा डोलारा कायम ठेवला.दर वर्षी वार्षीकोत्सव आयोजित करून गझल गायन स्पर्धा,कलावन्त मेळावे,आकाशवाणी सांस्कृतिक संध्या,कविसंमेलने हे उपक्रम राबवत राहिला.
सुधाकरच्या या अनेक उपद्व्यापामुळे घरात सदा पैशांची चणचण असायची.त्यातच मुले मोठी झालेली.त्यांचे शिक्षण,घरासाठी घेतलेले कर्ज...म्हणून मी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली.घर,शाळा, मुले आणि सुधाकरबाळ यांना सांभाळताना जीव मेटाकुटीस यायचा.पण माझ्या संगीताच्या आवडीमुळे व सुधाकरच्या प्रेमापोटी सारे सहन केले.याच दरम्यान शाळेत मुख्याध्यापकाशी व मॅनेजमेंटशीही खटके उडत गेले.तसेही सुधाकर आर्णीला कंटाळलाच होता.मुख्याध्यापक बनलेल्या ज्या व्यक्तीसाठी सुधाकरने अनेक प्रसंगात जिवाची बाजी लावून वाचवले, तोच जिवावर उठल्यासारखा वागायला लागल्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेऊन आम्ही पुण्याला स्थायिक झालो आणि सुधाकरचे पुणे किंवा मुंबईत स्थायिक होण्याचे स्वप्न वयाच्या पन्नाशीनंतर का होईना पूर्ण झाले.
ज्या व्यक्तीजवळ स्वतःचे असे काहीच नव्हते त्या व्यक्तीबरोबर लग्न करून 'संसार' तडीस नेणे हा तोंडाचा खेळ नाही.पण माझ्यातला 'मी' माझ्याजवळ ठेवून जे काही करायचे ते सुधाकरसाठीच असे ठरवल्यामुळे संसार सुखाचा झाला.सुधाकरला पुण्यात '#गझलगंधर्व' ही उपाधी मिळणे हा माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण होता.एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला सामान्य मुलगा मोळ्या विकून,शेणाच्या गोवऱ्या जमा करून,दर शनिवारी यवतमाळच्या संकटमोचन मारुतीसमोर रुईच्या फुलाचे हार विकून,शाळाशाळांमधून गाणी बसवून व कुठे तरी पार्ट टाईम जॉब करून आपला खर्च भागवणार सुधाकर स्वबळावर येथपर्यंत पोहोचणे स्वप्नवत नाही काय?
आज मी अत्यंत सुखात आहे.पुण्यात टू बीएचके फ्लॅट आहे,कार आहे.सुधाकरला मनासारखे (आतापर्यंत चारअल्बमचे काम केले,दोनचे सुरू आहे.)काम मिळते आहे.यापेक्षा मावळतीच्या वयात आणखी काय हवे?
"चकव्यातून फिरतो मौनी" मधून....





