गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, October 15, 2020

मनोगत-आशिष जाधव

                       
( ...मराठी गझलगायक म्हणून सुधाकर कदमांचं मोठेपण मांडण्याची हीच वेळ आहे. ही बाब खरीच आहे, सुधाकर कदम यांना पाहिजे तशी संधी आणि प्रसिद्धी त्यांच्या गायनकलेच्या किंवा सृजनशीलतेच्या काळात विदर्भात आणि तिथून मुंबई-पुण्याकडं मिळाली नाही. )

- [ ] मी साधारणत: आठ वर्षांचा असेल १९८१ मध्ये खामगावच्या घरी सुधाकर कदमांची मैफल झाली. ती मैफल आणि ते दोन दिवस मला आजही लक्षात आहेत. माझ्या वडिलांचे (बी.एल.जाधव) मित्र म्हणून सुधाकर कदम, त्यांच्याबरोबर वडिलांचे लहान भावासारखे असलेले कवी कलीम खान(ज्यांच्या आर्णीच्या घरातला माझा आणि आमच्या खेड्यातल्या घरातला त्यांचा जन्म), कवी श्रीकृष्ण राऊत, नारायण कुळकर्णी-कवठेकर आणि शेखर सरोदे(ॲड. असीम सरोदेचे काका) असे सगळे दोन दिवस  आमच्या घरी मुक्कामी होते. रात्री मैफल झाली. कदाचित ती माझी ऐकलेली पहिली मैफल आणि म्हणूनच आजही ती स्मरणात आहे. सुरेश भटांच्या मराठी गझला सुधाकर कदमांनी गायल्या होत्या. तबल्यावर शेखर सरोदे होते. कलीम खान, नारायण कवठेकर यांचं निवेदन होतं. संध्याकाळी सुरू झालेली मैफल मध्यरात्री उशिरापर्यंत चालली होती, हे मला दुसऱ्यादिवशी कळलं होतं. त्या मैफलीत एक उर्दू नज़्म सुधाकर कदमांनी दोनदा गायली होती. ते शब्द पाठ झाले होते, 'बात निकलेगी तो दूर तलक जायेगी'... नंतर कळलं ती प्रसिद्ध नज़्म जगजितसिंग यांची  होती. वडिलांकडे गजलांच्या एलपी रेकाॅर्डचा नंतर कॅसेटचा मोठा खजाना आहे. माझ्या लहानपणापासून मी गुलाम अली-मेहदी हसन-हुसेन बक्श ऐकत आलोय. त्यामुळं लहान वयातच गाणं ऐकण्याची सवय लागलेली होती. आणि म्हणूनच सुधाकर कदमांची ती मी आयुष्यात ऐकलेल्या पहिल्या मैफलीची आठवण खोलवर मनात रुजली असेल कदाचीत. 

- [ ] पुढे जेव्हा मला गझल कळायला लागली, तेव्हा त्या मैफलीची रेकाॅर्डेड कॅसेट मी कित्येकदा ऐकली. (आजही सुधाकर कदमांच्या त्या रेकॉर्डिंगच्या कॅसेटस् वडिलांकडे आहेत.) महान गझलकार सुरेश भट यांच्या सुरूवातीच्या काळातल्या जवळजवळ सर्वच गाजलेल्या गझला सुधाकर कदमांनी त्या मैफलीत स्वत:च्या चालीत गायल्या होत्या. नंतर जेव्हा मी मुंबईत आलो आणि काही गझलनवाजांच्या मराठी गझला ऐकल्या तेव्हा तर सुधाकर कदम यांच्या गझल गायकीचं, त्यांच्या सृजनशिलतेचं, त्यांच्या मखमली आवाजाचं मोठेपण प्रकर्षानं जाणवलं. कुठेही उगाचच स्वर लांबवणे किंवा स्वरच्छल नाही की कुठे उगीच काही वेगळी हरकत घेतल्याचा आव. शास्त्रीय संगितातल्या रागदारीत राहून शब्दांना न्याय्य न्याय देणारी गझलगायकी, हेच सुधाकर कदमांच्या गझलगायनाविषयीचं माझं ठाम मत आहे. मला गझल आणि गायकी समजून-उमजून ऐकण्याचा चांगला कान देवानं दिलाय, म्हणूनही मी म्हणत असेल. त्यामुळेच कलेच्या बाजारीकरणाच्या जगात सच्च्या रसिकांपर्यंत पोहोचण्यात सुधाकर कदम कमी पडले, हेही आवर्जून सांगावं लागेल. तो त्यांचा की परिस्थितीचा की विदर्भातल्या आडमार्गाला असलेल्या आर्णीसारख्या केवळ नावालाच तालुका असलेल्या गावाचा दोष आहे, याचा विचार मी जेव्हा मुंबईतल्या प्रसारमाध्यमामधला आघाडीचा पत्रकार म्हणून करतो, तेव्हा काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, हे लक्षात येतं.  

गत ४० वर्षांपासून मनात दाटलेल्या आठवणींना लिहितं करावंसं वाटलं एवढंच....

-आशिष जाधव


 

No comments:





संगीत आणि साहित्य :