https://gazalakar20.blogspot.com/2020/09/blog-post_28.html?m=1
हिंदुस्थानी संगीतातील सगळ्यात लोकप्रिय सुगम संगीत प्रकार म्हणून गझलची गणना करायला हवी.हा एकमेव असा प्रकार आहे की,यात काव्य व संगीत याचा समसमान आनंद घेता येतो.तसे ठुमरी,दादरा, चैती, कजरी वगैरे प्रकारात होत नाही.भारतात शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये शब्दांना तसे फारसे महत्व दिल्या जात नाही.स्वरांना आधार देण्यापुरतेच त्याचे महत्व असते.अर्थात शास्त्रीय संगीताचे गायक हे मान्य करणार नाही,पण हे कटू सत्य आहे.मी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतानाच्या चिजा आठवल्या की अजूनही हसायला येतं. उदा:- "तेंडेरे कारण मेंडेरे यार"....किंवा कॉलेजमध्ये शिकविलेल्या देस रागातील तरण्याचा अंतरा "नादिर दानी तूंदिर दानी दानी त दारे दानी"...ही ओळ गाताना अनेक विद्यार्थी (कारण तो सामूहिक वर्ग असायचा) "नादिर दानी तुंदिर दानी च्या ऐवजी "उंदिर दानी" असे गायचे...अशा अनेक चिजा आम्ही शिकलो.पण अर्थ कळला नाही.... कळले ते फक्त रागांचे स्वर-रूप.
साहित्यातील एक उत्तम प्रकार म्हणून गझलचा छान उपयोग झाला.पण संगीत प्रकार म्हणून जसा व्हावा तसा विचार शास्त्रीय संगीतामध्ये झाला नाही.ज्या लोकसंगीतामधून शास्त्रीय संगीताची उत्पत्ती झाली त्या लोकगीतांनाच शास्त्रकारांनी दूर ठेवून दुय्यम स्थान दिले,ते गझलला कसे काय मोठे स्थान देतील?आपल्या देशात संगीताचे फार मोठे भांडार प्रादेशिक संगीतामध्ये उपलब्ध होते/आहे.यातूनच विविध गान प्रकार तयार झालेत.पण शास्त्रीय संगीताचे पक्के शास्त्र बनवताना या सर्व प्रकारांना सुगम मानून शास्त्रीय संगीताच्या परिघाबाहेर ठेवल्या गेले.त्यामुळे संगीताची एक प्रकारे हानीच झाली.
खरे तर गझल गायकाला चार अवधाने सांभाळावी लागतात.अभ्यास करावा लागतो.
१.त्याला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.
२.तो उत्कृष्ट गायक असायला हवा.
३.त्याला साहित्याची पण चांगली जाण असायला हवी.(म्हणजे अभ्यास आलाच.)
अत्यंत महत्वाचे
४.म्हणजे तो उत्कृष्ट संगीतकारही असायला हवा.
असे असूनही गझल गायन प्रकाराला 'सुगम' म्हणणे हास्यास्पद आहे.
पं. रामकृष्णबुवा वझे सारखे थोर शास्त्रीय गायक गझल गायकीबद्दल काय म्हणतात ते बघा...
"गझल गायकीला आपलं असं स्वतःचं एक आगळं वेगळं अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असते आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असली तर गझल गायनातून ख्याल गायनाइतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभ रित्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकते".
तसेच सुप्रसिद्ध तबला वादक तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर म्हणतात,"गझल गायनामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असली तर ती रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते.भिडते..."असो....
उर्दू गझल गायकीचा शोध घेताना आपल्याला ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर निघालेल्या ध्वनीमुद्रिकांचा अभ्यास करावा लागेल.या इतिहासाचा धांडोळा घेताना भारतीय शास्त्रीय संगीतात उर्दू गझल गायकीचा विकास ठुमरी सोबत झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या गायक/गायिकांचे गझल गायन हे गायन न वाटता पठण वाटत होते असा उल्लेख अशोक दा रानडे यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते...यातुन गायकी अंगाने पुढे जाणाऱ्यांमध्ये गोहरजान,शमशाद, सुंदराबाई आणि त्यावेळच्या इतर गायिका दिसतात.पण खऱ्या अर्थाने गझल गायनाची सर्व यांत्रिक पद्धतीतून मुक्तता होऊन गझल गझलसारखी गाण्याची सुरवात बेगम अख्तर व बरकतअली खान साहेब यांना जाते.
(माझ्या गुरुचे गुरू छोटा गंधर्व नेहमी यवतमाळला यायचे.ते आले की मी त्यांच्या सेवेत असायचो. तसेच विदर्भात जिथे कुठे त्यांचा कार्यक्रम असेल तेथे ते मला हार्मोनियमच्या साथीला घेवून जायचे.असाच एकदा ब्रह्मपुरीला त्यांचा कार्यक्रम होता.मी सोबत होतोच...कार्यक्रमाच्या अगोदर तानपुरे लावून स्वर लावणे सुरू असताना अचानक ते म्हणाले
"तू मराठी गझल गायनाचा नव्याने प्रयत्न करतो असे मला कळले."
मी होय म्हणालो.त्या दिवशी त्यांचा काय मूड लागला कोण जाणे.रियाजात बरकतअली खान साहेबांच्या काही गझला त्यांनी मला गाऊन दाखविल्या. त्यातील बारकावे समजावून सांगितले. इतकेच नव्हे तर मूर्च्छना पद्धतीचा या गायकीत कसा उपयोग करता येतो ते सप्रयोग समजावून सांगितले.तसेच बरकतअलीची गझल गायकी टप्पा अंगाची होती हे ही सांगितले.त्यांच्या या प्रसादाचा उपयोग मला गझल संगीबद्ध करताना आपोआप होत गेला.)
उर्दू गझल गायकी तीन प्रकारांनी आपल्या समोर येते...
१. ठुमरी प्रमाणे - बेगम अख्तर
२. गीतांप्रमाणे - सैगल,मल्लिका पुखराज
३. टप्पा अंगाने - बरकत अली खान
गझल गायकी लोकप्रिय करण्यात या गायक/गायिकांच्या ध्वनिमुद्रीकांसोबतच चित्रपटांचाही मोठा वाटा आहे.
गझल गायकी ही शब्द व संगीत श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे.विसाव्या शतकात भावपूर्ण सादरीकरणासोबतच दरबारी,यमन,मल्हार वगैरे भारदस्त म्हणविल्या जाणाऱ्या रागांमध्ये बंदिशी बनवायला लागले.तसेच काव्य निवडही उत्तम व्हायला लागली.आपापल्या कुवतीप्रमाणे अविर्भाव-तिरोभाव, मूर्च्छना पद्धतीचा वापर करायला लागले.सगळ्याच गझल गायक/गायिकांचा उल्लेख या लेखात करणे अशक्य आहे.कारण प्रत्येक गायक/गायिकेचा आपला एक ढंग आहे.त्यावर लिहायचे तर प्रत्येकावर एक लेख होऊ शकतो.या लेखात अत्यंत लोकप्रिय अशा काही गझल गायकांच्या गायकीची मला दिसलेली वैशिष्ठ्ये थोडक्यात उद्धृत करण्याचा प्रयत्न करतो.
सर्वप्रथम भारत पाकिस्तानातील जुन्या-नव्या उर्दू गझल गायक/गायिकांची नावे माहिती करून घेऊ.
●मल्लिका पुखराज,उ.अमानत अली खान,अहमद रश्दी,नूरजहां,एम.बी.जॉन,मेहदी हसन,फरीदा खानम,अहमद परवेज,इकबाल बानो,मुन्नी बेगम,हमीद अली खान,हुसैन बख्श,परवेज मेहदी,गुलाम अली,नुसरत फतेह अली, मेहनाज बेगम,नैय्यरा नूर,आबिदा परवीन, असद अमानत अली खान,शफाकत अमानत अली खान,आसिफ मेहदी,सज्जाद अली....पाकिस्तान.
●बेगम अख्तर,तलत महमूद,सैगल,मधुरानी,पंकज उधास, अनुप जलोटा, चंदन दास,जगजित/चित्रा सिंग,भुपेंद्र/मिताली सिंग,राजेंद्र/नीना मेहता, पिनाज मसानी,तलत अजीज,हरिहरन,रुपकुमार राठोड,अहमद,महंमद हुसेन,जसविंदर सिंग...भारत.
(अनवधानाने काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!)
उर्दू गझल गायकीतील सर्वच गायक/गायिकांचे त्यांच्या त्यांच्या परीने मोलाचे योगदान आहे.सगळ्यांवर लिहिणे या एका लेखात शक्य होणार नाही.त्यातल्या त्यात मला भावलेल्या काही जणांच्या गायकीवर थोडे फार भाष्य करण्याचा प्रयत्न करतो.
माझ्या मते उर्दू गझल गायकीत रागदारीचा उत्कृष्ट उपयोग बेगम अख्तर यांनी केला आहे.त्यांची गझल गायकी ठुमरी,दादरा अंगाने जात होती.पण जव्हारदार मधाळ, मधूनच पत्ती लागणाऱ्या आवाजाने तेव्हाच्या रसिकांना वेड लावले होते.आजही त्यांनी गायिलेल्या गझला लोकप्रिय असून गायिल्या जातात.
मेहदी हसन यांची गायकी म्हणजे शब्दांना न्याय देत कसे गावे याची पाठशाळाच.... यावर लेखाच्या शेवटी अजून लिहिले आहे.
फरीदा खानम...शांत,संयत पण ठसठशीत गायकी असलेली गायिका.त्यांच्या "दिल जलाने की बात करते हो","ना रवा ... ","गुलों की बात करो","वो मुझ से हुए" वगैरे गझला ऐकल्यानंतर गायकीची प्रचिती येते.
गुलाम अली म्हणजे अनवट बंदीशीचा बादशहा.गुलाम अली इतका सरगमचा वापर दुसऱ्या कुणीही केला नाही.शब्दानुरूप वेगवेगळ्या सुरावटींचा वापर आणि कार्यक्रमाचे वेळीची देहबोली रसिकांकडून दाद घेणारी..."कहाँ आके रुकने थे रास्ते" या गझलमधील "जहां मोड था" येथील 'मोड',"दिल में इक लहर सी उठी हैं अभी" मधील 'हमींग' व 'लहर' या शदावरील वेगवेगळ्या सुरावटी त्यांच्या गझल गायकीचे वेगळेपण सिद्ध करते.त्यांच्या "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" या गझलने जगभरातील रसिकांना वेड लावलेले सगळ्यांनीच पाहिले.
जगजित सिंग म्हणजे उर्दू गझल गायकीला पडलेले सुरेल स्वप्न आहे.मेहदी हसन प्रमाणेच खर्जयुक्त जव्हारदार मधाळ आवाज,वाद्यवृंदाचा योग्य वापर,गझलांची निवड यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांनी जगजित-चित्रा जोडीला डोक्यावर घेतले.जगजित सिंग हे उत्कृष्ट 'कंपोजर' असल्यामुळे इतर गायक/गायिकांच्या जोडयांपेक्षा ही जोडी जास्ती लोकप्रिय ठरली.गायक जर उत्कृष्ट संगीतकार असेल तर गाणे नक्कीच उठावदार होते,हे अनेक संगीतकार गायकांच्या गायनावरून लक्षात येते.ह्या साऱ्या वैशिष्ठयांमुळे आपल्या देशात जगजित सिंग इतकी लोकप्रियता बेगम अख्तर नंतर कुणालाच मिळाली नाही
●उर्दू गझल गायकीचा बादशहा मेहदी हसन●
मेहदी हसन खां साहेबांचा जन्म १८ जुलै १९२७ ला भारतात लुना या राजस्थातील एका गावात झाला.वडील उस्ताद अझीम खान व काका उस्ताद इस्माईल खान परंपरागत धृपद गायक होते.त्यामुळे संगीत त्यांच्या रक्तातच वंशपरंपरेने आले होते.वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या बंधुसोबत त्यांनी धृपद व ख्याल गायन सादर केले.त्यांचा पिटीव्ही वरील पहिला कार्यक्रम १९५२ मध्ये झाला."नजर मिलते ही दिल की बात का चर्चा ना हो जाए" हे त्यांचे चित्रपटातील पहिले गाणे होते.चित्रपट होता 'शिकार',कवी यजदानी जालंधरी, संगीतकार असगर अली व एम हुसेन.
तसेच चित्रपटातील पहिली गझल होती "गुलों में रंग भरे बादे नौबहार चले" शायर फ़ैज अहमद फ़ैज,संगीत राशीद यांचे.
लता मंगेशकरांसोबत त्यांची दोन गाणी आहेत.एक मदन मोहन यांच्या संगीत दिगदर्शनाखाली गायिलेले 'नैनो में बदरा छाए' मधील एक अंतरा आणि मेहदी हसन यांनी संगीत दिलेल्या 'सरहदें' या अल्बम मधील 'तेरा मिलना बहुत अच्छा लगता है'
दोन्ही गाण्यांची लिंक...
१.
https://youtu.be/ad6Scios6zc
नैनो में बदरा...
२.
https://youtu.be/Do9Q7TwHoCA
तेरा मिलना बहुत अच्छा...
जगभर उर्दू गझल गायन लोकप्रिय करणारा हा कलावंत आयुष्याच्या शेवटापर्यंत गात राहिला.जवळ जवळ साठ वर्षे आवाज सांभाळून त्याच दमाने गात राहणे तोंडाचा खेळ नाही.
खान साहेबांचा शिष्यवर्ग पण छोटा नाही.त्यात प्रामुख्याने परवेज मेहदी,तलत अजीज,राजकुमार रिजवी,गुलाम अब्बास,सलामत अली,अफजल,मुन्नी सुभानी, रेहान अहमद खान,सविता आहुजा,शमशाद हुसेन चांद, शहनवाज बेगम (बांगला देश),यास्मिन मुश्तरी (बांगला देश) आणि हरिहरन ही नावे येतात.
त्यांचे गझल गायन म्हणजे शब्द-सुरांची अप्रतिम उधळण असायची."दिल की बात लबों पर लाकर, अब तक हम दुख सहते थे" हबीब जालीब यांची ही गझल काफी थाटावर आधारित आहे.पण त्यातीलच "बीत गया सावन का महिना मौसम ने नजरे बदली" हा शेर गाताना मध्यमाला षड्ज करून पहाडी रागाच्या स्वरांनी 'सावन'चा इतका मस्त फिल दिला की,कितीही ऐकले तरी समाधान होत नाही.....क्या बात हैं!
मुजफ्फर वारसीची "क्या भला मुझको परखने का नतीजा निकला" या गझलची बंदिश मालकौंस रागात आहे.पण पुढे शेरात दोन्ही गांधार,दोन्ही निषादाचा प्रयोग करुन केलेला अविर्भाव-तिरोभाव अतिशय मनभावन आहे.मालकौंस राग कुठे सोहनी राग कुठे,पण हे स्वरांचे धनुष्य पेलून प्रत्यंचा चढवलीच...
अहमद फराज यांची '"अब के हम बिछडे" ही गझल व बंदिशही तशीच...या सुरावटीचा मोह हृदयनाथ मंगेशकरांसोबतच मलाही पडला.व "मालवून टाक दीप चेतवून अंग अंग,राजसा किती दिसात लाभला निवांत संग" ही सुंदर रचना हृदयानाथांनी व "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही,कळते मला अरे हा माझा वसंत नाही" ही गझल मी स्वरबद्ध केली.
रईस खां साहेबांनी भैरवी रागात स्वरबद्ध केलेलं चित्रपटातील गीत "मैं खयाल हूँ किसी और का,मुझे सोचता कोई और है" जेव्हा कार्यक्रमात गातात तेव्हा त्यातील "सुबहो न मिल सकी" या ओळींवर ललित रागाच्या स्वरांची पखरण करतात तेव्हा जाणकारांच्या अंगावर रोमांच उठतो.ती आर्तता काळजात सरळ घुसते.
"कभी मेरी मूहाब्बत कम न होगी,लुटाने से दौलत कम न होगी" या पाकिस्तानी चित्रपटातील गीतावर बेतलेली खमाज रागातील "मुहब्बत करने वाले कम न होंगे,तेरी महफिल में लेकिन हम न होंगे" ही ठाय लयीतील गझल अफलातूनच आहे.यातील "जमाने भर के गम" या शेरात मिया मल्हारची झलक दाखवणारी सुरावट,"अगर तू इत्तेफाकन मिल भी जाए" या शेरात केलेली विविध रागांच्या स्वरांची उधळण अतिशय रंजक आहे.
मेहदी हसन यांनी जितक्या विविध रागात गझल गायिल्या तितक्या इतर कुणी गायिल्याचे दिसत नाही.(थोडा अपवाद गुलाम अली).
●गुलों में रंग भरे... झिंझोटी.
●शोला था जल बुझा हूँ...
●एक बस तू ही नहीं...मियाँ मल्हार
●कोंपले फिर फूट आए...सारंग
●कुब कू फैल गई बात... दरबारी
●जब उस जुल्फ की बात चली...बसंत मुखारी
●बात करनी मुझे मुश्किल...पहाडी
●बहुत बुरा है मगर...ललित
●रंजिश ही सही... यमन
●अबके हम बिछडे....भुपेश्वरी
अजूनही बरीच उदाहरणे देता येतील पण विस्तार भयास्तव थांबतो...
पुढे खान साहेबांच्या गायकी विषयी त्यांच्याच तोंडूनच ऐका...
मुलाखतीची लिंक
https://youtu.be/KBscPu-iXt4
गझलकार...सीमोल्लंघन विशेषांकामधून साभार...
No comments:
Post a Comment