गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, October 3, 2026

'जे न देखे रवी... (खुसखुशीत)

               

     'जे न देखे कवी' ही उक्ती किती सार्थ आहे ते आमच्या येथील एका कवीच्या 'अक्षरांच्या वेदनेची वैखरी क्षितिजावरी, अक्षरांचे जोंधळे  दळते जनी जात्यावरी' या ओळींवरून कळते.काही वर्षांपूर्वी राबविलेल्या महाराष्ट्र 

शासनाच्या प्रौढ साक्षरता मोहिमेमुळे अनेक कवींना आपल्या सुप्त गुणांची जाणीव होऊन ते कविता करायला लागले होते.त्यापैकी काहींनी आपल्या मेहनतीने संभाजीनगर, मुंबई ते दिल्ली अशी मुसंडी मारली.साक्षरता मोहिमेचे इतर फायदे काय आहेत ते न पाहता कलावंतांच्या दृष्टीने विचार केला, तर त्यांचा मात्र या मोहिमेमुळे खूप फायदा होऊन ते लोकांच्या नजरेपुढे आले.

    'कवी जन्माला यावा लागतो' असे म्हणतात. म्हणजेच 'घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही!' वरील ओळी वाचल्यावर खरेच कवी जन्माला यावा लागतो? हा प्रश्न मला पडला.आता जन्मजात कवी कोणता व नंतर बनलेला कवी कोणता हे कसे ओळखावे हाही प्रश्नच आहे.कारण कवी काही एकाच प्रकारचे असतात असे नाही.प्रत्येकाचा बाज वेगळा असतो, जातकुळी वेगळी असते.जसे:- मुक्तछंदी कवी, छंदी (फंदी) कवी, पापड कवी,पावशा कवी (पावसावर लिहिणारा), गझल कवी, द्रोही-विद्रोही कवी, राजकवी, लोककवी, हास्य कवी, व्यंग कवी, रड कवी,शिमग्या कवी (फक्त शिमग्यालाच आपले कवित्व पाजळणारा), दीर्घ कवी, चौर्य कवी (दुसऱ्यांच्या कविता चोरून आपल्या नावावर खपवणारा), प्रस्थापित कवी,नवकवी आणि शेवटी शीघ्र कवी.(यात काही प्रकार सुटले असतील तर त्या त्या कवींनी मला उदार हृदयाने क्षमा करावी.)

     कवी आणि कविता यांचा संबंध फक्त कविता होईपर्यंतच असतो,असे आम्हाला वाटते. कारण प्रत्यक्षात तसा संबंध शोधण्याचा प्रयत्न केला, तर निराशाच पदरी पडते.प्रेमकाव्य करणारा प्रेमात पडलेलाच असतो असे नाही.समरगीते लिहिणाऱ्याला समरांगण माहीतीच असेल असे नाही.गझल लिहिणारा कवी 'उमर खैय्यामच्याच' वंशातला असेल असेही नाही.तरी पण सर्वसाधारणपणे असेच असते असेही नाही.वऱ्हाडात धुमाकूळ घालणारा वऱ्हाडी हास्य कवी मिर्झा रफी अहमद बेग हा त्याच्या कवितांप्रमाणेच,स्वभावानेही विनोदी होता.लोकांना हसवणे किती कठीण काम आहे हे हसवणाऱ्यांनाच विचारावे.

त्यातल्या त्यात आपले दुःख सदैव पोटात घेऊन (किडनी स्टोन)  लोकांना हसवणे हे तर अतिशय कठीण.पण आपल्या वेदना विसरून रसिकांना आपल्या वेदना विसरायला लावताना त्याला मी पाहिले आहे.

          कवी हा समाजाला काही तरी देणे देतो असे म्हणतात.(नेमके काय देतो हे मला अजूनपर्यंत कळले नाही.) त्यामुळे त्याला समाजात एक वेगळे असे आदराचे स्थान प्राप्त झालेले दिसून येते.याच लालसेपोटी  आमच्यासारखे न-कवीही कवी होण्याचा प्रयत्न करतात व आपला सार्वत्रिक बँडबाजा वाजवून घेतात.

           समाजात कवी म्हणून आपल्यालाही आदराचे स्थान मिळावे म्हणून आम्ही सर्वप्रथम खादीचा लांबलचक बंगाली शर्ट व पायजमा शिवला.सोबत स्लीपरही आणली. या वेशाला पूर्णत्व येण्यासाठी शबनम आवश्यक असते, म्हणून तीही घेतली.एवढ्याने भागले नाही म्हणून दाढीही वाढविली व आपल्याच तंद्रीत असल्यासारखे वावरणे सुरू केले. पण लोकही चतुर.नुसत्या वेशांतराला ते भाळले नाही. म्हणून आम्ही मग कविता करायला तंद्री लावून बसलो. आमची ही थेरं सौभाग्यवती तटस्थपणे बघत होती. कारण आपला नवरा किती 'नवटंक्या' आहे हे तिला चांगल्या प्रकारे माहीत होते. लोकांनीच कुठे तरी हात दाखविल्याशिवाय हे सर्व थांबणार नाही हेही तिला  ठाऊक होते.(कवीची बायको असल्याच्या वेदना कवीच्या बायकोलाच माहीत.)

          तर मित्रहो! आम्ही कविता करायला बसलो पण 'आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? (आडे आणि पोहरे हे आडनाव या म्हणीवरून तर आले नाही ना?) खूप प्रयत्न करूनही नवीन काहीच न सुचता जुन्याच ऐकलेल्या कविता नजरेसमोर यायला लागल्या.

असे जवळ जवळ पंधरा दिवस निघून गेले. पण नवनिर्मीतीसाठी लागणारी प्रतिभाच जागृत होईना. शेवटी सगळ्या कवींच्या रचना वाचून काढायचे ठरवले.सरळ बाजारात जाऊन सापडतील तेवढे कवितासंग्रह व भक्तिगीतांची व भावगीतांची पुस्तके घेऊन आलो. आणि कविता पाडणे सुरू केले.


१. तुज सगुणा म्हणू की चांगुणा गं

     सगुणा चांगुणा मज दोघी आवडी गं


२. घराची तिजोरी, कुटुंबची ठेवा

    सर्व मिळुनी खाऊ देवा, रोज सुका मेवा

    पिती रोज दूध कुत्री, मांजरीही घरची

    कुणाही न वाटे कधीही, भीती मालकाची

    घरोघरी याच सुखाचा, वसो नित्य ठेवा

    सर्व मिळुनी खाऊ देवा रोज सुका मेवा...


३. भरून आहे पात्र अजुनी, बेवड्या निजलास का रे?

     एवढ्यातच झिंगुनी, तू असा पडलास का रे ?


     सांग, या मोसंबीच्या बंपराला काय सांगू?

     उमलला अंगांगी पेला आणि तू चिमलास का रे?


    ओठ झाले बंद का रे? श्वास झाले कुंद का रे?

    बोल बाजेच्या उरावर तू असा पडलास का रे?


    उसळती गुत्त्यात सगळ्या, 'गावरानी' धुंद लाटा

    तू रिकाम्या बाटलीसम कोरडा झालास का रे?


४. आजकाल रात्री लवकर झोपतात सारे,

     मी उगीच झिजवित बसतो नखांचे किनारे


     मला हीच पटली वस्ती, किती धुंद इथली मस्ती;

     इथे थाप देण्याआधी उघडतात दारे!


     कधी तरी तेव्हा चुकलो, एकदाच तेथे घुसलो;

     हळुच बाप पुसतो माझा 'तू इथे कसा रे?'


     वरील प्रकारच्या अनेक 'आशयघन' कविता आम्ही रचल्या व वर्तमानपत्राकडे पाठविल्या.पण नवोदितांची कदर करतील ती वर्तमानपत्रे कसली? काहींनी 'साभार परत'च्या शिक्क्यासह त्या वापस पाठविल्या, तर काहींनी तेवढेही सौजन्य दाखविले नाही.तरी पण आम्ही हिंमत न हारता, सर्व वर्तमानपत्राच्या संपादकांच्या नाकावर टिच्चून , एका कवीमित्राच्या लग्याने कविसंमेलनात वर्णी लावून घेतली.पण हाय रे दैवा! येथेही आमचे नशीब आडवे आले. आमच्या वऱ्हाडी शब्दकळेवर लोकांनी गदारोळ करून आम्हाला संमेलनातून हुसकावून लावले.तेव्हापासून आम्ही कवितेकडे बघणे सोडून दिले,लिहिणे वाचणे तर दूरच.

------------------------------------------------------------

दै. विदर्भ मतदार. रविवार पुरवणी दि. ४/९/२०२६

Friday, October 2, 2026

#भूप रागावर आधारित भक्तीगीत... आणि भूप रागावरील माझे विवेचन.



       जगातील कोणतेही सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, सांगीतिक वैविध्याचे भांडार हे कोणत्याही एका व्यक्तीने तयार केलेले नाही. तसेच त्यासंबंधीचे नियम, कायदे, कानूनही एका व्यक्तीने बनविलेले नाही. त्यात सातत्याने बदल होत गेला आहे. माणसाच्या आयुष्यात यातील संगीत, काव्य,चित्रकला हया कलेचे रुप महत्वपूर्ण (Sjgnificant Form)) आहे. या कलांकडे दोन प्रकारांनी बघता येते. व्यावहारिक (Practical) आणि कलात्मक (Aesthetic). यात कलात्मक दृष्टी ही व्यावहारिक दृष्टीपेक्षा अधिक सत्य आहे.असे  क्लाइव बेल (Cive Bell) म्हणतो.
        कलाकृती फक्त बघण्याची किंवा ऐकण्याची वस्तू नाही. त्या कलाकृतीत रसिक ध्यानमग्न होवून तल्लीन व्हायला हवे. सौंदर्य स्वादाचे तसे तीन स्तर आहेत. १) आपल्या इंद्रियाद्वारे सौंदर्यास्वाद घेणे. २) आंतरिक अनुभूती ३) त्यात स्वत; हरवणे. यापैकी एका तरी प्रकाराने माणसाला आनंद घेता येणे यातच त्या कलाकाराचे यश आहे. शब्द, छंद, अलंकार हे कवितेचे माध्यम आहे. तसे स्वर, ताल, लय, हे संगीताचे माध्यम आहे. यांची एक विशेषता ही की याला कोणताच बाह्य आधार नसतो. हे संगळे कलाकाराच्या आत उर्मी रुपाने सतत जागृत राहून बाहेर येण्यासाठी तडफ़ड करीत असते. या तडफडीतून बाहेर आलेली कोणतीही रचना मग ती कविता असो,चित्र असो,एखादी सुरावट असो वा कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती असो. ती आपला प्रभाव माणसाच्या मनावर पाडतेच.    
        एवढी मोठी प्रस्तावना करण्यामागचा उद्देश एकच की, हे अमक्याने निर्माण केले,ते अमक्याने निर्माण केले हा जो भ्रम पसराविण्यात आला आहे तो दूर व्हावा...बस! संगीत किंवा त्यातील राग, ताल, स्वर,शब्द,लिपी,काव्य ही एकाची निर्मिती नसून यासाठी खूप मोठा कालावधी लागला असून आपणास माहित नसलेल्या अनेक व्यक्तींचा यात हात आहे.शास्त्रीय संगीतातील महत्वाचे वाद्य तानपुरा...! याचा शोध कोणी लावला हे आजतागायत कोणी सांगू शकले नाही.याचे कारण मी वर केलेल्या वक्तव्यात आहे.
       आजचा आपला विषय आहे. राग भूप... या रागात पाचंच स्वर आहेत. सा  रे ग ध प... सर्व स्वर शुध्द. हा राग अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात प्रारंभिक म्हणजे पूर्वप्राथमिक वर्गात शिकविल्या जातो... ठरलेली सरगम, लक्षणगीत, ख्याल पुढे वरच्या वर्गात गेल्यावर मोठा ख्याल वगैरे वगैरे... परंतू खरा भूप राग इथे कळतच नाही. भूप कळायला तेवढ्याच ताकदीने गाणारा वा गाणारी आणि रंगवणारा वा रंगविणारी हवी. तरच भूप कळतो, आवडायला लागतो. त्यामुळे मैफ़िलीतही हा राग फ़ार कमी ऐकायला मिळतो. मी मी म्हणणारे गायकसुध्दा त्याच्या वाटेला जात नाही. मी अनेकांच्या गळ्यातून भूप ऐकला परंतू खरा भूप कळला आणि भावला तो किशोरी आमोणकरांच्या ’सहेला’ मुळे ! त्यानंतर शिवकुमारच्या संतुर आणि हरिप्रसादच्या बासरी वरील भुपाने वेडं केलं. "काल ऑफ दी व्हॅली”तील भूपाची किती पारायणे केली याची गणतीच नाही... तर असा हा भूप ऐकायला सोपा, रंगवायला कठीण ...
      भूप रागाचे मूळ लोकसंगीतात आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासींच्या लोकगीतांमध्ये याची सुरावट सापडते. नेमक्या त्या सुरावटीचा उपयोग संगीतकार आर.डी.बर्मन यांनी ’हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ’कांची रे कांची रे...’ या गाण्याच्या धृवपदात जसाच्या तसा केलेला दिसून येतो. गायक आहेत किशोर कुमार लता मंगेशकर. या रागात स्वरबध्द केलेली अनेक गाणी मराठी/हिंदी चित्रपटांमध्ये आहे त्यातील सुधीर फडक्यांनी स्वरब्ध्द केलेले व लताबाईनी गायिलेले ’भाभी की चुडिया’ या चित्रपटातील ’ज्योति कलश छ्लके...’ हे गाणे अतिशय मनमोही आहे. ’घन; श्याम सुंदरा...’ ही भुपाळी सुध्दा तशीच सकाळी सकाळी मनाची सगळी मरगळ दुर करणारी आहे. भुपाळी जरी सकाळी गात असले तरी भूप रागाचा गानसमय शास्त्रीय द्दृष्ट्या सायंकाळचा आहे.तसेच ’लव्ह इन टोकियो’ या चित्रपटातील, शंकर जयकिशन यांनी स्वरब्ध्द केलेले आणि लताबाईनी गायिलेले ’सायोनारा...’ हे गाणे ही याच रागात आहे. मी सुद्धा पाठयपुस्तकातील कवितांच्या झुला या कॅसेटमध्ये 'धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान' याच रागात स्वरबद्ध केली आहे. या रागाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे ’रिषभावर’ मुर्छना केली की ’मधमाद सांरग’, ’गांधारावर’ मुर्छना केली की ’मालकौंस’, ’पंचमावर’ मुर्छना केली की ’दुर्गा’ राग दिसतो. पं. शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या Water या अल्बमध्ये हे स्पष्टपणे दाखविले आहे.'दिल हूम हूम करे' हे लताबाईंनी गायिलेले रुदालीमधील अप्रतिम गाणे भूप रागातच आहे.
      या वेगवेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर येणा-या भूपात  ’रंज की जब गुफ़्तगू होने लगी,आपसे तुम तुमसे तू होने लगी’ ही दाग़ यांची गझल गुलामअली गायले आहेत. मतला पूर्णपणे भूपात बांधला आहे. अंत-यातील...काही शेर भूपाला कल्याणाची जोड देऊन इतक्या सुंदर रीतीने सादर केले की तोंडून आपोआपच वाहव्वा निघून जाते. तानांच्या छोट्या छोट्या लडया,वरच्या पंचमापर्यंतची रुपक तालाशी खेळत खेळत केलेली स्वरांची कलाकुसर आपल्याला थक्क करते. सोबतच सुरेल ’नोटेशन’सह विविध प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण तिहाया,विवादी स्वर घेऊन विविध रागाच्या छटा दाखवून वाढवलेली रंजकता,मक्त्यामध्ये केलेले जयजयवंती रागाचे लोभस मिश्रण गुलाम अलीच्या परिपूर्ण गायकीची ग्वाही देते.या गझल सोबतचा तारिक हुसैन यांचा तबला म्हणजे ’सोने पे सुहागा...’! असा तबला भारतातील गझलच्या साथीदारांकडून ऐकायला मिळत नाही.यात त्यांनी टाकलेल्या तबल्याच्या विविध विधा,तुकडे,मुखडे आणि वेगवेगळ्या तिहाया हे दुसरे फार मोठे आकर्षण यात आहे.(मी स्वतः १९५८ ते १९६३ मध्ये यवतमाळला दादासाहेब पांडे यांचेकडून तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असल्यामुळे  तबल्या विषयी लिहू शकलो.) त्यामुळे राग जरी एकच असला तरी पण त्याची विविध रुपे आपल्यासमोर उभी राहतात.मला जर गझल गायन ऐकायला का आवडते ? असा कोणी प्रश्न केला तर, "#गझलमध्ये '#काव्य','#संगीत' आणि '#ताल' या तिन्हीची मजा घेता येते" हे माझे उत्तर राहील....
          
गझलगंधर्व
सुधाकर कदम
पुणे

Thursday, October 1, 2026

श्रेष्ठ कलाकार, श्रेष्ठ माणूसही! दिलीप पांढरपट्टे

     सुधाकर कदम यांचा माझा स्नेहसंबंध सुमारे पंधरा वर्षांचा आहे आणि दिवसेंदिवस हा स्नेह वाढतच आहे हे मी सुरुवातीलाच आनंदाने सांगू इच्छितो.

माझ्या आठवणीप्रमाणे ते मुंबईत बांद्र्याला झालेल्या गझल संमेलनात मला पहिल्यांदा भेटले.

     यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीहून ते लांबलचक आणि खडतर प्रवास करून मुंबईच्या या संमेलनात गझल सादर करण्यासाठी आले होते. त्यांची ही तळमळ आणि गझलसाठी प्रसंगी शारीरिक आणि मानसिक त्रास सोसण्याची तयारी मला तेव्हा खूपच भावली होती.

(त्यांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास तेव्हाही होता, हे लक्षात घेतले तर त्यांच्या या प्रवासातले त्यांचे धाडस लक्षात येते.)

     त्याच संमेलनात 'शब्द झाले सप्तरंगी' या माझ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन झाले होते. तो संग्रह मी त्यांना आवर्जून भेटही दिला होता.या घटनेला सात-आठ वर्षे उलटून गेली आणि सुधाकरजींचा एके दिवशी

अचानक फोन आला. दरम्यानच्या काळात ते निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले होते आणि माझ्या काही गझलांना त्यांनी चाली लावल्या होत्या हे मला त्यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणातून कळले. त्यांच्या गायनाबद्दल आणि संगीतकार म्हणून असलेल्या त्यांच्या मातब्बरीबद्दल मला आधीपासूनच आदर होता. त्यामुळे या फोनमुळे मी साहजिकच हरखून गेलो आणि त्यांच्या चालींमध्ये त्यांच्याच आवाजात त्या गझला ऐकण्याची उत्सुकता वाटू लागली. यथावकाश आमची भेटही झाली; आणि त्या भेटीची #मैफल  कशी झाली ते कळलेच नाही. पुण्यातल्या वारजे इथल्या

त्यांच्या घरी पुढे अशा अनेक मैफली जमल्या. त्यांच्या कुटुंबियांच्या स्नेहशील स्वभावामुळे त्यांच्या घरी बसलो की, वेळ कापरासारखा उडून जातो हा अनुभव मला नेहमीच येतो.

     सुधाकरजी हे केवळ #गायक व #संगीतकार  नाहीत; तर ते एक चांगले वाचक आणि लेखकही आहेत. '#फडे_मधुर_खावया' या त्यांच्या छोटेखानी गद्य पुस्तकात अनेक खुमासदार लेख आहेत. त्यातून त्यांच्या बहुश्रुतेचे आणि एकूणच जगण्याकडे बघण्याच्याउमद्या वृत्तीचे प्रत्यंतर येते.

     '#काट्यांची_मखमल' आणि '#तुझ्यासाठीच_मी' या दोन गझल अल्बममध्ये माझ्या गझलांना त्यांनी संगीतबध्द केले आहे. सुरेश वाडकर आणि वैशाली माडे या लोकप्रिय गायक-गायिकांनी या गझल गायिल्या आहेत. सुधाकरजींनी या दोघांकडून ज्या कौशल्याने या गझला गाऊन घेतल्या आहेत, ते केवळ थक्क करणारे आहे. त्यांच्या आजवरच्या संगीतसाधनेचा आणि व्यासंगाचा पुरा अर्क या गझल अल्बममध्ये उतरला आहे असे निश्चितपणे म्हणता येते.

     यवतमाळ जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात बहुतेक सर्व आयुष्य व्यतीत झाल्यामुळे त्यांना मुंबई-पुण्याचा फारसा 'वारा' लागलेला नाही हे त्यांना भेटल्यावर एक-दोन मिनिटांतच कुणालाही सहज पटेल. प्रसिध्दीची फारशी सोय नसल्याने आणि त्यासाठी अंगी असावे लागणारे #तंत्र  ही त्यांच्याकडे नसल्याने ते म्हणावे तितके प्रसिध्दीच्या झोतात आले नसतीलही, पण तो त्यांचा पिंडच नाही असे मला वाटते. त्याची त्यांना फार खंतही नाही.कारण तो त्यांचा स्वभाव नाही. जीवन समरसून जगण्यावर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे आयुष्यात काय मिळाले, काय नाही याचा ते फारसा विचार करीत नाहीत, कधी केलाच,तर तो स्थितप्रज्ञतेने किंवा साक्षीभावानेच करताना ते दिसतात.

'मैं जिंदगीका साथ निभाता चला गया,

हर फिक्रको धुएँमे उडाता चला गया'

अशा भावनेने जगणारा हा #कलंदर कलावंत आहे. 

म्हणून मला ते एक श्रेष्ठ #कलाकार  वाटतात आणि एक श्रेष्ठ माणूसही! 


- डॉ.दिलीप पांढरपट्टे

---------------------------------------------------------------------

●डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित गझलगंधर्व सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून...

गांधीजयंती... सुरेश भट.


 

म.गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन...


 

कविता... लालसा जोवरी.


 

Tuesday, September 29, 2026

दुःखाशी नाते जडता जडता जडते...

 .                                 


                                 -मैत्र-

१९६५ ते ७५ ऑर्केस्ट्रातील दगदग (त्यावेळी आमच्याकडे रेकॉर्ड प्लेअर वा टेपरेकॉर्डर नसल्यामुळे दुपारभर रेडिओवर हव्या त्या गाण्याची वाट बघत बसणे. ते लागले तर जीवाचे कान करून ऐकणे व कडव्यामधील म्युझिकचे लक्षात राहतील तेवढे पिसेस लक्षात ठेवणे.त्याची प्रॅक्टीस करणे.नंतर रात्री सर्व कलाकारांसोबत पुन्हा प्रॅक्टीस करणे.म्हणजे अकॉर्डिअन खांद्यावरच्या खांद्यावरच असायचे.आणि असे रोज चालायचे.)त्यातच, आकाशवाणी नागपूरचा मान्यताप्राप्त गायक,मेंडोलीन वादक असल्यामुळे दर दोन/तीन महिन्यात कार्यक्रम असायचा. त्याची प्रॅक्टीस. त्यानंतर तीन वर्षे सुरेश भटांसोबतची एस टी ने महाराष्ट्र भ्रमंती,#मराठी_गझल चे माझे एकल कार्यकम,ते पण एस टीचा प्रवास करतच,रात्री बेरात्री खाणे,जागरण,गाण्याचा अतिरिक्त रियाज,सरोद वादन,सकाळची शाळा करून सायंकाळी ४ ते रात्रीचे १० वाजेपर्यंत संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांना बैठक मारून  शिकविणे,समाजकारण,राजकारण...

या सगळ्या उपदव्यापामुळे मला पाठीच्या दुखण्यासोबतच व्होकल कॉर्ड्सचा पण त्रास सुरू झाला .त्यामुळे १९९० नंतर जाहीर मैफलीतून गाणे बंद केले.म्हणून मग मी स्वरबद्ध  केलेल्या गीत-गझलांचा कार्यक्रम माझ्या मुली भैरवी व रेणू करायला लागल्या होत्या.तबला संगत निषाद व हार्मोनियम संगत मी करायचो.२००३ ला पुण्याच्या अनिल कांबळे या गझलकार मित्राने त्याच्या "#पोएट्री_फाउंडेशन' संस्थेद्वारे एस.एम.जोशी सभागृहात #सरगम_तुझ्याचसाठी हा मुलींचा कार्यक्रम आयोजित केला होता.सूत्र संचालन अकोल्याचे प्रसिद्ध कवी #नारायण_कुळकर्णी_कवठेकर यांनी केले होते.या कार्यक्रमात मनोहर रणपिसेंची सुंदर प्रकारे स्वरबद्ध झालेली हळवीशी रचना दोघींनी सादर केली होती.तीच रचना मयूर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे यांच्या आवाजात पदरमोड करून नुकतीच रेकॉर्ड केली आहे.गोड करून घ्यावी.ही नम्र विनंती.

●mobile REC... headphone please


दुःखाशी नाते, जडता जडता जडते

हे मैत्र अनोखे, घडता घडता घडते


घुटमळत राहते, फांदीवर स्वप्नांच्या

पाखरू प्रितीचे, उडता उडता उडते


डोळ्यात असावे सहज कधी का येती

भरतीचे पाणी, भरता भरता भरते


प्रेमात मनाच्या सुरेल जुळती तारा

हृदयास हृदय पण भिडता भिडता भिडते


-मनोहर रणपिसे





संगीत आणि साहित्य :