गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, December 19, 2020

पंडित सुधाकर कदम...सीमा गादेवर

.            १९८१ मध्ये कविश्रेष्ठ सुरेश_भट व गझल गायक सुधाकर_कदम हे  मराठी_गझल गायकी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी निघाले होते.त्याची सुरवात विदर्भापासून झाली.तेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या सुरवातीला पांढरकवडा (जि.यवतमाळ) येथे आले असता माझ्याकडे एक सुंदर मैफिल झाली.आणि तेव्हापासून माननीय सुधाकरजी कदम या गझल गायकांची मी 'पंखा' झाले...ती आजतागायत !

      त्यांच्या " तुझ्यासाठीच मी... ' या अल्बमचे प्रकाशन      झालेय या समजुतीत मी अगदी काल पर्यंत होते...पण काल प्रकाशनाबद्दल fb वर वाचले.आणि लगेच हा अलबम विकत घेतला व त्याचे पारायण केले...हे पारायण करताना मला जे सुचले,भावलेे ते आपणा रसिकांसमोर मांडत आहे.            
                                         
 "तुझ्यासाठीच_मी... " या मराठी गझलच्या  अल्बममध्ये 'गझलगंधर्व'  श्री. सुधाकरजी कदम या गायक व "पंडित" ही ऊपाधी  कमीच पडावी अशा या  संगीतकाराने- कवी श्री.दिलीप पांढरपट्टे  व  गायिका  वैशाली माडेसह  एक  न्  एक गझलेला, गाण्याला....  प्रत्येक ओळीचा  व शब्दातला  भाव  जाणून आपल्या  स्वर-साजाने  नवा आलेख  व आशय  दिला आहे.शब्दांना  वेगवगळ्या  सुरावटीतून  गुंफतांना एक  मायाजालच  आपल्याला हळूहळू  आनंदात सामील करीत आपल्या  कानातून थेट हृदयावर साम्राज्य गाजवते  !  
      
            सगळ्या रचना एकाच संवेदनशील कवीच्या असूनही    लाजवाब आहेत.तरूणाईला तालासूरावर  खिळवून ठेवणारी रचना----
"किती   सावरावे....  कसे   सावरावे"
      ...किती   बहारदार... यातील कोरस,गिटार हलकेच जी  साथ देतात व रूंजी  घालून  गायब होणारी फुलपाखरासारखी अकाँर्डियनची गिरकी यामुळे  ऐकणाऱ्याचा  खरेच झोक   जातो!    
" तुझा भास झाला पुन्हा आडवेळी,  
पहाटे पहाटे जसे ऊन्ह यावे....."    
               या ओळी  तसेच कोरसचे  सूरही वेगळेच रंग     भरणारे आहेत ! क्या बात! याच रचनेतील  
 "ईथे मेघ भरला...तिथे मोर फुलला,
अरे  ईश्वराला असे ओळखावे..."
                ह्या ओळी तर  प्रणयातला  रस  व शॄंगार केवळ एका ओळीच्या  चालीतून व आवाजातून असे जमलेय की ईश्वरी देणगी मिळालेले हे  तिघंही --- गीतकार,संगीतकार व गायक आपणास ईश्वरी सॄजनातील तारतम्य व  तन्मयताही स्वरांच्या व आवाजाच्या  विविध वळणांद्वारे जागो-जागी दाखवतात.                                                                                   यातीलच     
"आसवांना टाळणे आता नको,
दु:ख  हे सांभाळणे आता नको..."       
या गझलेत  शब्द....सूर...लय व  तालाची हलकी रिमझिम घेऊनच अंगावर येते.  
"बोललो  त्याला किती झाली युगे,
हा अबोला टाळणे आता नको..."      
असे मोजके शब्द गायिका वैशाली माडे  यांचे नर्म मधाळ     गळ्यातून ऐकल्यावर आपले काळीज केव्हा काबिज केले गेले हे कळतही  नाही ! 
कसबी संगीतकार  सुधाकरजी यांची नादब्रह्माशी सूर जुळलेली स्वर-रचना...
"घाव  ओला जरासा होता" 
रूपक तालाला 'वेस्टर्न टच' देऊन साईड ऱ्हिदममध्ये चुटक्यांसह इतरही वाद्यांचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून जी झिंग आणली आहे त्याला तोड नाही....तसेच 
"वेदनेचा दिलासा होता" 
या ओळीतील 'वेदनेचा' या शब्दातील वेदना वैशालीने अश्या प्रकारे दाखविली की अंगावर सर्रर्रर्रर्रकन काटा यावा...
प्रत्येक गझलेतील  पुढल्या ऊत्तराच्या  ओळींची गंमत लाजवाबच!     
          सुधाकरजींची गझलेला व गीतांना  नव्या नव्या,     अव्वल चाली देउन  अवघी  मैफिल  वेड्यागत आपलीशी      करून  घेण्याची आदत फार फार जुनी  नाही तर  ; केवळ    पंचेचाळीस  वर्षांपूर्वीची आहे! तेच हे विदर्भातील  एके       काळचे अत्यंत नम्र,  लोकप्रिय  गायक 
!...........आजही तसेच अविरत,शांतपणे तेच  तपस्वी दान परत संगीतकाराच्या रूपाने आपल्या ओंजळीत भरभरून घालत आहेत....दाता बनून  देत आहेत............
याच अल्बमधील
"असेच जगलो झुगारले या जगास जेव्हा,   
असाच झाला तुझा नि माझा प्रवास तेव्हा"      
 या गझलेत सुधाकरजींनी तबला,सतार व  सारंगीचे सूर अचूक    स्थळे हेरून असे काही पेरलेत कि आपण नकळत गुलाम अलीच्या गझलां इतकेच  एका मोहक नादमयी अंमला खाली सूर-शब्द-ताल यांचे वारूवर आरूढ  होत पुढे पुढे जातो !... एक  हूरहूर   लागून   रहाते.........                                      
 "कळे ना मला  हे  कसा नेमका तू ,       
कधी ऊन्ह होशी,कधी चंद्रमा  तू..."    
          या गझलेला अशी काही सुरावट दिली... की   प्रेयसीला पडणारे गोड कोडे सूरांमूळे अलगद सुटल्याचा अफलातून प्रत्यय येतो! (ही रचना ऐकताना  मला मदन मोहन या  प्रख्यात संगीतकाराची प्रकर्षाने आठवण आली.)          
अशीच आणिक एक दुसरी हासरी गझल...                      
 "नुसत्याच तुझ्या हसण्याने जगण्याचे दु:खं वितळले,
एकाच तुझ्या स्पर्शाने आभाळ  मनाचे  भरले...."     
        हे विलोभनिय शब्दांचे अवकाश....तार सप्तकात ऊचलून नेणारे गर्भश्रीमंत सूर.........  अगदी सहजतेने मनाचा ठाव  घेउन आपला ताण विसरायला भाग पाडतात.....

" अक्षरे पुसटली आणिक हरवली खुणेचि पाने,
जाणुन ईशारा मी ही मग पुस्तक माझे मिटले   !"
            कवीने अशी नर्म मर्मस्थळे अनेक जागी पेरलीत! वाद्ये   तर स्वर्ग दोन बोटेच उरलाय असे  वाटायला लावतील एवढी बेजोड. तरीही शब्दांना वाजवी न्याय देत देतच आपले ईमान न सोडता..पेरलीय ! असे नेमके स्वरसौंदर्य शब्दांना  बहाल करणारे सुधाकरजी म्हणजे शास्त्रीय संगीताला नवा अध्याय जोडणारे कलावंत ! हा सच्चा गायक/वादक कलाकार रागांचा व तालांचा सुरेख वापर  मराठी गझलेसाठी करुन हिंदुस्तानी शास्त्रीय  संगीत कलेला एक  नवा साज/वसन बहाल करतोय,ही फार मोठी गोष्ट आहे.

             "तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते"
ही रचना गझल म्हणून व कंपोझिशन म्हणून उचांकच आहेअसे मला वाटते.यातील तरल भाव,हळवअधिरे समर्पण,विलगतेची खंत,तक्रारीचा हळुवार सूर,सलत जाणारी वंचना आपल्या मनात खोलवर रुजत जाते...
"जगाच्या सर्व शपथा मी जरी त्या मोडल्या होत्या,
तुला जे जे दिले ते ते वचन मी पाळले होते...."
          यातील उरात ठसलेल दुखरा सल सुरावटीद्वारे दाखविण्यात सुधाकरजी यशस्वी ठरलेत ! या गझलच्या प्रत्येक शेरातील भाव परस्परांना जराही धक्का लागू न देता एखाद्या माहीर शल्यविशारदाच्या नजाकतीने स्वारांद्वारे हाताळत भावाभिव्यक्ती केली...या अलबम मधील बहुतेक रचना कल्याण थाटावर आधारित आहेत.पण ऐकताना मात्र हे जाणवत नाही.आणि इथेच संगीतकाराचे सारे कौशल्य प्रकर्षाने दिसून येते.
"मनाच्या खोल डोहाच्या तळाशी ठेवले जपुनी,
निखारे धुंद श्वासांचे तुझ्या जे पेटले होते..."
            यातील सुरावटीमुळे 'मनाच्या'शब्दाचे फुलपाखरू बनते व 'खोल डोह' अक्षरश: डोह बनून अंगावर काटा फुलवणारा 'अँटिक पीस' बनून जातो.
               याच अलबम मधील
"आई असते श्रावण अविरत रिमझिमणारा"
हे फार वेगळ्या सुरांसह पूजेचं ताट घेऊन येणारं,आईची महती सांगणारं सुरेख व सुरेल गीत आहे...यातील शांत सागरासारखे रुपेरी सूर संपूर्ण दिवस गोड करून जातात.
             सुधाकरजींनी स्वरबद्ध केलेला "#काटयांची_मखमल" हा सुरेशजी वाडकर व वैशाली माडेच्या आवाजातील असाच एक आणखी 'जानलेवा' अलबम...
         सुरेशजींच्या मुरलेल्या गळ्यातून संगीतकार म्हणून सुधाकरजींनी जे काही गाऊन घेतलेय ते ही अफाटच!
(सुरेशजींनी अलबमच्या प्रकाशन प्रसंगी हे कबूल केल्याचे मी वाचले.तसेच कवी व संगीतकार आदरणीय यशवंतजी देव यांनी सुद्धा "शब्द स्वरांची मखमल" असे या अलबम संबंधी उद्गार काढले.) यातील प्रत्येक गझल ऐकतांना हे फार प्रकर्षाने जाणवते ......     
मराठीतून इतक्या देखण्या सुरावटीच्या गझला  इतके दिवस का नाही  दिसल्या ? हा प्रश्न पडतो.... वैशाली माडेच्या आवाजातील ही गझल हा प्रश्न अधिक तीव्र करते....
"हसू ऊमटले दु:खं भोगता,गंमत आहे,
गझल मिळाली तुला शोधता,गंम्मत आहे"
             आणि या  गझलेत उत्तर ओघानेच मिळून जाते! ......यातील व्हायोलिनच्या सुरावटीने मन शांत शांत होऊन जाते.या गझलमधील एकूण एक शेर शब्द-सूर - लय- तालाची लयलूट करणारा आहे.गिटार , सतार , व्हायलीन
याची  हळूवार मस्ती खऱ्या अर्थाने 'गंमत' आणून आर्ततेच्या टोकाला नेणारी आहेत......
        ..... या दोन्ही अल्बमसाठी जीवतोडपणे मेहनत घेणारी सारी कलाकार मंडळी व कुटुंबीय यांना वंदन...(विशेषतः दोन्ही अलबममधील सारंगी व बासरी कायम लक्षात राहणारी आहे.)सुधाकरजींचा कायम असाच मूड व लोभ रसिकांवर राहून नवनव्या बंदिशी ऐकायला मिळो हीच सदिच्छा !
 -सीमा     गादे    (गादेवार )    
मुम्बई.
---------------------------------------------------------------------
(प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून...)
-----------------------------------------------------------

●पहिले छायाचित्र-सीमा गादेवार, सुरेश भट आणि गाताना अस्मादिक...घरगुती मैफल.
●खाली - दैनिक लोकमत,नागपूरचे कात्रण.(रात्री झालेल्या पांढरकवड्याच्या कृषी भवनातील सुरेश भट व माझ्या संयुक्त कार्यक्रमाचे.)


 

Sunday, December 13, 2020

मराठी गझल गायक सुधाकर कदम...सुरेश गांजरे


 (दैनिक नागपूर पत्रिका,नागपूर.विशेष पुरवणी ४/१२/१९८०)

          मराठी गझलांना स्वरबद्ध करून आपल्या सुरेल आवाजात सादर करण्याचा एक स्तुत्य उपक्रम गायक सुधाकर कदम यांनी सुरू केला आहे. विदर्भातील अनेक शहरात त्यांनी आजवर मराठी गझलांचे अनेक कार्यक्रम पेश केले आहेत.महाराष्ट्रातील गझलकारांच्या गझला सादर करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ असल्याने रसिकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे.

'दुभंगून जाता जाता मी अभंग झालो'

या सुरेश भटांच्या गीताने ते आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतात.त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अप्रतिम गझला सादर होऊ लागतात.रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन आपल्या जिवाचे कान करून ऐकत असतात.

'मी गोड या स्वरांनी गातो जरी तराणे
गीतात हाय येती संदर्भ जीवघेणे...'
ही नीलकांत ढोलेची गझल,

'आम्ही असे दिवाणे आम्हास गाव नाही
आम्ही घरोघरी अन आम्हास नाव नाही'
ही शंकर बडेची गझल,

'फुलवू नकोस आता उसने गुलाब गाली'
ही पुण्याच्या रमण रणदिवेची गझल रसिकांची उत्स्फुर्त दाद घेते.
          श्री सुधाकर कदम हे संगीत विशारद असून आर्णी येथील महंत दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून नोकरी करतात. तेथेही त्यांनी 'गांधर्व संगीत विद्यालय' स्थापन करून आपली कलोपासना सुरूच ठेवली आहे.स्वतः कदम यांना शब्दांची चांगली 'जाण' असल्याने ते शब्द व स्वर याची उत्कृष्ट सांगड घालतात.प्रत्येक शब्दाला असलेला खास रुतबा सांभाळून  पेश केल्याने त्याची खुमारी काही औरच असते.
           सौ.प्रभा मॅथ्यू व कु.रतन जोशीसुद्धा कदमांनी स्वरबद्ध केलेल्या गझला कार्यक्रमातून पेश करतात.तबलापटू श्री.शेखर सरोदे यांच्या बोटांची जादू अप्रतिमच असते.अत्यंत परिश्रम घेऊन श्री.कदमांनी हा संच ग्रामीण भागातून उभारला.ही कौतुकाची बाब आहे.त्यांच्या शाळेचे व्यवस्थापक श्री.राजकमलजी भारती व मुख्याध्यापक श्री.बुटले गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य  त्यांना लाभते.
           हा 'गझल'चा कार्यक्रम कधी कधी अक्षरशः रात्र संपेपर्यंत चालतो.विशेषतः स्वतः कदम

'पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली'
सुरेश भट

'सखे, सांजवेळी नको दूर जाऊ'

अशा नाजूक,शृंगारिक रचना आपल्या मुलायम स्वरात खास ढंगाने सादर करून रसिकांची मने जिंकून घेतात.मधून-मधून ते उर्दू गझळसुद्धा आपल्या खास चालीमध्ये उत्कृष्टपणे सादर करतात.

'मार्गावरून माझ्या मी एकटा निघालो'

ही उ.रा.गिरी यांची गझल म्हणजे या कार्यक्रमाची भैरवी!आपल्या आवाजातील तमाम दर्द ओतून सुधाकर कदम ती पेश करतात.क्षणभरासाठी रसिकांची मने हेलावून जातात.रसिकांच्या वृत्ती गलबलून काढण्याचे सामर्थ्य त्यांच्या स्वरात असते.
          सुरेल आवाजाची देण आणि कठोर परिश्रम यामुळे अल्पावधीतच श्री.कदम यांनी गझल गायनाच्या प्रांतात आपला चांगलाच जम बसविला आहे.एक नवा पायंडा ते पाडत आहेत ही कौतुकाची बाब ठरावी.श्री.सुधाकर कदम यांना त्यांच्या अंगीकृत कार्यात उदंड यश लाभो,ग्रामीण कलावंताची ही प्रतिभा आनंददायी ठरो ही अपेक्षा.

(प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी'मधून...)


 

Friday, December 11, 2020

जाणकार संगीतकार...अनुराधा मराठे


          माझी व सुधाकर कदम यांनी ओळख २००५ मध्ये झाली.ते 'अर्चना' या मराठी भक्तीगीतांच्या अल्बममध्ये काम करीत होते.या अल्बममध्ये गाण्यासाठी त्यांनी मला बोलाविले.हीच आमची पहिली भेट होय.या वेळी ते उत्तम संगीतकार आहेत,उत्तम गझलगायक आहेत याची अजिबात कल्पना नव्हती.ते नागपूरचे आहेत एवढेच मला माहीत होते. नंतर हळू हळू त्यांच्याबद्दल माहिती मिळत गेली.विदर्भासोबतच महाराष्ट्रभर त्यांनी सुरेश भटांसोबत मराठी गझलकारांच्या गझलांना स्वरबद्ध करून गायिल्याचे येथील (पुण्यातील) गझलकारांकडून कळले.तसेच आर्णी या छोट्याशा गावी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना गझल गायकीसोबतच अनेक उपक्रम राबविल्याचेही कळले.
त्यात माझ्या दृष्टीने महत्वाचे कार्य म्हणजे गांधर्व विद्यालयाची स्थापना व परीक्षा केंद्र होय.
          'अर्चना' ह्या अल्बमचे काम सुरू करायचे ठरल्यावर चाली सांगण्यासाठी ते माझ्याकडे आले.दुसऱ्यावर बघताक्षणीच प्रभाव पडेल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.बोलण्याच्या आवाजावरून हा माणूस गात असावा असा अंदाज येणारे अत्यंत मृदू बोलणे.समोरच्या व्यक्तीला सहज आपले करून घेणारे वागणे,यामुळे प्रथमदर्शनीच सुधाकर कदम या व्यक्तीचा अंदाज मला आला.ह्या वेळी त्यांच्या दोन्ही 'गायिका' कन्या त्यांच्या सोबत होत्या.मनात म्हटलं ,'सगळं घरच गाणारं दिसतंय.' असो
          'अर्चना' या अल्बममध्ये माझी पाच गाणी आहेत. अतिशय अप्रतिम व आकर्षक चाली आहेतच.पण त्याचबरोबर श्रवणीय आणि मनात रेंगाळत राहणाऱ्या आहेत.मला वाटते गझल गायकीमुळे शब्द,काव्यातील अर्थ याचा अचूक अंदाज सुधारजींना आहे.त्यामुळेच या अल्बममधील आशा पांडे यांच्या गीतांना समर्पक अशा चाली त्यांनी लावल्याचे दिसून येते.सुंदर शब्द व सुंदर स्वररचना यांचा सुंदर मेळ म्हणजे ,अर्चना'! या अल्बममध्ये एकूण दहा भक्तिरचना आहेत. खालील शब्दांवरून त्या किती प्रासादिक आहेत याची आपणास कल्पना येईल.
१.श्रीहरी रे श्रीहरी,नाद केवळ एक घुमतो,श्रीहरी रे श्रीहरी...
२.शक्ती दे तू आज मजला दुःख सारे वेचणारी...
३.ये मंत्रांची घुमवित वीणा छेड मनाचे मंजुळ तार...
४.तुझीच सुमने तुझे निरंजन,चरणी तुझिया तुझे समर्पण...
५.वेद झाले वेदनांचे,शब्द झाले रे ऋचा...
६.श्याम घन घनश्याम माझा सावळा घनश्याम रे...
७.दयासागरा...
८.माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे...
९.अर्चना...
१०.या देहाचे देऊळ झाले...
           यातील पहिलेच गाणे शुद्ध गांधारावरुन उठणारे भूपाच्या अंगाने जाणारे आहे.भूपामध्ये मधून मधून केलेल्या शुद्ध निषादाच्या वापरामुळे ही बंदिश अतिशय गोड व वेगळी झाली आहे.शौनकचे (अभिषेकी) व माझे 'शक्ती दे तू आज मजला' असे आवाहन करणारे शब्द व त्यानुसार भिन्नषड्ज रागात केलेली रचना,त्यातही मध्यमाला षड्ज करून मूर्च्छना पद्धतीने केलेली पुढील स्वररचना,त्याला लावलेल्या चाचर तालामुळे अतिशय स्फूर्तिदायक झाली आहे.एक आवेश व आवेग या भक्तिगीतामध्ये शब्द-स्वरांद्वारे प्रत्ययास येतो.'अर्चना' हे माझे या अल्बममधील सर्वात आवडते गाणे आहे.
'तूच माझे गीत कोमल,भाव तू उल्हास रे
तूच माझी अर्चना,तू अंतरी विश्वास रे...
सुंदर शब्द व अत्यंत आर्तता असणारी स्वररचना.आणि 'विश्वास रे' वरची अवरोही जागा फारच सुंदर.सुरांचे घरंगळणे. दोरा सुटल्यावर मोती जसे घरंगळतात तसे तसे इथे स्वर घरंगळले आहेत.सुधाकरजी उत्तम संगीतकार असण्याची साक्ष द्यायला हा एकच अल्बम पुरेसा आहे.
           मी त्यांचे पुढील सर्व आयुष्य पूर्ण आयुरारोग्य व सुरांच्या संगतीत जावे अशी प्रार्थना करते.

१३/११/२०१८

प्रा.डॉ.श्रीकृष्ण संपादित व 'अक्षरमानव'प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून....
--------------------------------------------------------------------


 

बाबा-रेणू कदम चव्हाण

.
      मी लेखिका वगैरे नाही.पण काही आठवणी अजूनही कालपरवा घडल्याप्रमाणे डोळ्यापुढे तरळत आहेत,जसजशा आठवतील,तशा सांगायच्या आहेत.
      लाल-तांबूस डोळ्यांचा कोणी एक व्यक्ती माझ्या घरात रोज रात्री यायचा आणि सकाळ झाली की निघून जायचा.तो कोण असेल बरे,मला हा प्रश्न नेहमी पडे. नंतर हळूहळू लक्षात आले की,ते माझे वडील आहेत.
      पूर्वी बाबा फार तापट,रागीट होते.रात्री कार्यक्रम करून उशिरा घरी येणे आणि सकाळी उठून शाळेत रुजू होणे, शाळेतील संगीत कक्षात दिवसभर रियाज,रात्री कार्यक्रम अशी त्यांची दिनचर्या असे.त्यामुळे लहानपणी बाबा आम्हाला कमीच मिळाले.आम्ही आर्णीला एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत रहायचो.नंतर स्वतःचे घर झाले तेव्हा बाबांचा सहवास अधिक प्रमाणात लाभू लागला.तेव्हा बाबा खरेच काय आहे,हे हळूहळू कळायला लागले.
      बाबा हे एक उत्तम संगीतकार तर आहेतच पण त्याचबरोबर एक चांगले शिक्षकसुद्धा आहेत. एखादे गीत व गझल शिकवताना एखाद्या कळीच्या पाकळ्या उमलून त्याचे फुल कसे बनते तसे बाबांचे शिकवणे. जोपर्यंत गळ्यातून निघत नाही तोपर्यंत अजिबात न चिडता सांगत रहायचे.बाबांचे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे त्यांच्या बंदिशी आणि चाली या ऐकायला सोप्या पण गायला अतिशय कठीण.एक किस्सा असाच आठवतो.माझ्या लग्नानंतरची गोष्ट आहे.आम्ही 'तसव्वुर' हा सागर साहेबांच्या उर्दू गझलांचा कार्यक्रम करीत होतो.त्यात 'कहता हूँ मूहब्बत है खुदा सोच समझकर' या भैरवीतील गझलेची रिहर्सल करीत होतो.हार्मोनियमवर भाविक राठोड हा एक उमदा गायक बसला होता. आणि 'कल उम्र का हर लम्हा कहीं सांप न बन जाए' हा शेर चालू होता.तो सारखा सांप च्या जागी अडकायचा. बाबांनी त्याला अस्सल वऱ्हाडीत विचारले,'काहून र बाप्पू का व्हा लागलं? तसा तो म्हणाला ,काही नाही बाबा,साप त सापडला पण शेपूट नाही गवसा लागलं तव्हाचं'.
      बाबांचे व्यक्तिमत्व लोकांना आपलेसे करणारे होते.त्यांचे असंख्य मित्र आणि चाहते यांची घरी नेहमी वर्दळ असायची. आर्णीला आमचे घर कधीच रिकामे राहायचे नाही.कोणी ना कोणी सतत घरी असायचे.
     आज त्यांच्या गौरव ग्रंथासाठी लाख लाख शुभेच्छा.आई आणि बाबा,तुम्हा दोघांना उर्वरित आयुष्य निरोगी आणि सुखासमाधानाचे जावो ही मनापासून इच्छा व्यक्त करून थांबते.धन्यवाद.
--------------------------------------------------------------------
डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित,
'अक्षरमानव' प्रकाशित सन्मानग्रंथ (१३/११/२०१८)
'चकव्यातून फिरतो मौनी' मधून...


 

Sunday, December 6, 2020

मराठी ग़ज़लें भी उर्दू की तरह मधुर होती है...प्रभाकर पुरंदरे.


            साहित्य, कला तथा संगीत किसी जाति, भाषा या देश तक सीमित नही रहते बल्कि उनका प्रभाव मानवी रुचि के अनुरुप व्यापक होता है़ आजकल संगीत के क्षेत्र में ग़ज़ल गाने और सुनने का काफी प्रचलन है । प्रायः ग़ज़ल को लोग उर्दू संस्कृति की देन समझते है । गुलाम अली, मेहदी हसन, जगजीत-चित्रासिंह आदि की हिंदी-उर्दू ग़ज़ले तो वर्षों पहले ही संगीत शौकीनों के दिलों मे घर कर चुकी है । हिंदी-उर्दू के अलावा पंजाबी और गुजराती मे भी ग़ज़लें बरसों से गाई जा रही है । मराठी गायन क्षेत्र मे भी ग़ज़ल तेजी से अपना प्रभाव जमा रही है । मराठी मे ग़ज़ल सबसे पहले माधव पटवर्धन द्वारा लिखी गई थी, परंतु विद्वानों ने उसे ग़ज़ल न मानकर भावगीत की संज्ञा दी । सुप्रसिध्द ग़ज़ल गायक एवं लेखक सुरेश भट ने मराठी ग़ज़लों को लोकप्रिय बनाने में विशेष भूमिका निभाई । उनके बाद अनिल कांबले, श्रीकृष्ण राऊत, उ़. रा़. गिरी, प्रदीप निफाडकर आदि ग़ज़ल लेखकों के नाम आते है । फिलहाल मंगेश पाडगावकर श्रेष्ठ ग़ज़ल रचयिता माने जाते है ।
 पिछले दिनो शहर के जाल सभागृह मे इन श्रेष्ठ रचनाकारों की ग़ज़लें सुनने का अवसर मिला । गायक थे - सुधाकर कदम । सोलह दिसंबर की शाम लगभग चार घंटे तक चले मराठी ग़ज़ल महफिल कार्यक्रम में कदम ने कई ग़ज़लों को अपने मधुर स्वरों में गाकर उपस्थित संगीत रसिकों को आनंदित किया । ‘कुठलेच फूल आता मजला पसंत नाही़’, ‘सूर्य केव्हाच अंधारला यार हो़’, ‘झिंगतो मी कळेना कशाला़’ ‘लोपला चंद्रमा, लाजली पौर्णिमा़,तथा ‘नको स्पर्श चोरू नको अंग चोरू.’ आदि गजलों को श्रोताओ ने खूब पसंद किया ।
 गायक सुधाकर कदम के पिता महाराष्ट्र के वारकरी संप्रदाय के संगीत से संबद्ध रहे है । सो पिता से शास्त्रीय संगीत की उन्हें प्रेरणा मिलना स्वाभाविक है । ग़ज़ल गायकी के क्षेत्र मे आने के पूर्व सुधाकरजी भाग्योदय आर्केस्ट्रा नामक संगीत मंडली को चलाते थे । 'भरारी' नामक उनके ग़ज़लों की कैसेट काफी लोकप्रिय हुई है । हाथरस से प्रकाशित होने वाले संगीत मासिक संगीत के वे स्तंभकार है । इस पत्रिका के ‘नग़्म ए-़ग़ज़ल’ कॉलम के अंतर्गत वे ग़ज़लों की स्वरलिपि लिखते है । ग़ुलाम अली एवं मेहदी हसन जैसे वरिष्ठ गजल गायकों से गजलों से संस्कार आत्मसात करने वाले सुधाकर कदम ने बच्चों के लिए भी कई मधुर कविताओ को भी स्वयं संगीतबद्ध किया है । वे अपनी गाई ग़ज़लों को भी स्वयं ही संगीतबध्द करते है । बच्चों के लिए उन्होने झूला सीरिज के अंतर्गत तीन भागों में कविताओं को संगीतबद्ध कर कैसेट का रूप दिया है ।
 सुधाकरजी से बातचीत के दौरान बताया कि, उन्होंने वर्‍हाडी कवि शंकर बडे की ग़ज़ल को गाया था। ग़ज़ल का पहला कार्यक्रम पुणे के गडकरी हाल में हुआ था । यह कार्यक्रम काफी स्मरणीय था, क्योंकि इसकी अध्यक्षता गजल रचयिता सुरेश भट ने ही की थी । कदम बताते है कि इस कार्यक्रम में संगीत प्रेमियों की उपस्थिति से हाल खचाखच भर गया था । लोगों ने इस कार्यक्रम को खूब पसंद किया ।
 मराठी ग़ज़लों मे कई बार उर्दू भाषा के क्लिष्ट शब्दों का भी प्रयोग किया जाता है, इससे श्रोताओ को समझने में कठिनाई तो महसूस होती होगी? इस सवाल के जवाब मे कदम बताते है कि भाषा संबंधी कठिनाइया तो सभी प्रकार की ग़ज़लों में है । लेकिन जहां तक शुध्द मराठी ग़ज़लों का सवाल है कुछ मराठी ग़ज़ल रचनाकारों ने अत्यंत सरल एवं प्रभावी शब्दों का प्रयोग किया है । सुरेश भट, श्रीकृष्ण राऊत तथा ज्ञानेश वाकुडकर आदि इसके श्रेष्ठ उदाहरण है -
 
 ‘लोपला चंद्रमा लाजली पौर्णिमा,
 चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला.’ (श्रीकृष्ण राऊत)
 
 ‘नको स्पर्श चोरु, नको अंग चोरू
 सखे पाकळ्यांचे नको रंग चोरू.’(ज्ञानेश वाकुडकर)
 
 तथा
 
 ‘कुठलेच फुल आता मजला पसंत नाही
 कळते मला रे हा माझा वसंत नाही.’ (सुरेश भट)

आदि प्रसिद्ध ग़ज़लों में सरल और प्रभावी मराठी शब्दों का प्रयोग हुआ है ।
 महाराष्ट्र और उसके बाहर लगभग ढाई सौ से ज्यादा ग़ज़ल कार्यक्रम सफलतापूर्वक आयोजित करने वाले सुधाकर कदम का मानना है कि मराठी ग़ज़लों का भविष्य काफी उज्ज्वल है । लोग शहरों में नहीं, बल्कि गांवो में भी इसे पसंद कर रहे है । उन्होने इस बात पर खेद व्यक्त किया कि जितनी ग़ज़ले आजकल मराठी मे लिखी जा रही है उतने गायक तैयार नहीं हो पा रहे है । उन्होने मराठी ग़ज़ल गायन के बारे में बेहिचक बताया कि इसमें उर्दू ग़ज़लों की तरह नजाकत होती है ।
 कदम, मराठी के अलावा हिंदी ग़ज़लें भी गाते है । इंदौर के अपने २५० वे कार्यक्रम में उन्होंने कुछ हिंदी ग़ज़लें गाई थी । उन्होंने यह स्वीकार किया कि मराठी श्रोता उर्दू श्रोताओं की तरह दाद नहीं देते । ऐसा विशेष रुप से महाराष्ट्र से बाहर के कार्यक्रमों के जरिए प्रयत्न कर रहे है । महाराष्ट्र मे पुणे, कोल्हापुर, नांदेड, सांगली, अमरावती, औरंगाबाद, जलगांव आदि जगह उनके कार्यक्रम को संगीतप्रेमियों का खूब समर्थन मिला है । सुधाकर कदम की ग़ज़ल गायकी कई विशिष्टताओं से परिपूर्ण है । उन्होंने ग़ज़लों को शास्त्रीय पध्दति में ढालने का प्रयास किया है । यही कारण है कि उनके द्वारा गाई ग़ज़लें सामायिक नहीं वरन सदाबहार बन गई है । जिस तरह उर्दू ग़ज़लों में गायन के पूर्व गायक कुछ एक शेर पेश करते है । ठीक उसी तरह सुधाकर जी भी मराठी ग़ज़ल शुरु करने के पूर्व रुबाई का सफल प्रयोग करते है । महाराष्ट्र के यवतमाल जिले के पच्चीस-तीस हजार आबादी वाले आर्णी नामक कस्बे में रहने वाले सुधाकर कदम एक अच्छे सरोद वादक भी है ।
 सोनम मार्केटिंग एंड कम्यूनिकेशन द्वारा आयोजित तथा डी़ एड़ एच़ सेचरॉन द्वारा प्रायोजित इस अनोखी गजल निशा के दूसरे आकर्षण थे कलीम खान ।संपूर्ण कार्यक्रम का संचालन अपनी मधुर आवाज और विशिष्ट अंदाज में कर कलीम खान ने उपस्थित मराठी भाषियों का दिल जीत लिया । वे एक अच्छे कवि एवं गजल रचयिता भी है । कलीम खान ने ‘कुंकू’ शीर्षक वाली अपनी अत्यंत संवेदनशील कविता सुनाकर श्रोताओं को हतप्रभ कर दिया । तबले की संगत रमेश उइके (नागपुर) ने की जबकि सारंगी वादन मोइनुद्दीन (इंदौर) ने किया ।

दैनिक चौथा संसार,इंदौर,दि.२७/११/१९८९





 

Sunday, November 29, 2020

मराठी गझल गायकीचा उद्गम...डॉ. अनंत ढवळे

.               

         मराठी गझल गायकीच्या उण्यापु-या पाचेक दशकांच्या इतिहासात जे नाव सर्वाधिक ठळकपणे पुढे येते ते सुधाकर कदम यांचे. स्व. सुरेश भटांनी मराठी साहित्याला गझल प्रदान केली तर कदमांनी मराठी संगीताला गझल गायकी. गझल संगीतबद्ध करणे आणि गझल गाणे या दोन्ही गोष्टी गीत गायन, अभंग किंवा चित्रपटसंगीताहून भिन्न व स्वतंत्र आहेत. सुधाकर कदमांनी मराठी गझल गायकीला एक स्वतंत्र व पृथगात्म स्वरूप प्राप्त करून दिले आहे. मी संगीताचा अभ्यासक नसलो तरी माझ्या वाचनात आलेल्या माहितीनुसार गझल गायकीचे स्वतंत्र कार्यक्रम घेणारे पहिले कलाकार म्हणून कदमांचाच उल्लेख करावा लागेल.
      आयुष्यभर एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी चालत राहणा-या कुठल्याही मनस्वी व्यक्तीसारखे भासणारे कदम, गझल गायकी हेच आपल्या जीवनाचे सार्थक मानत आले आहेत. ही निष्ठा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सातत्याने जाणवत राहते. गझलचा विषय निघताच, आठवणींमध्ये रमणारे कदम, आपली कला, अनुभव, प्रयोग आणि आपल्या लोकांबद्दल भरभरून बोलू लागतात. हा आपलेपणा, हे माणसांबद्दलचे निर्व्याज प्रेम हे त्यांच्यातील मोठ्या कलावंताचे स्थायी लक्षण आहे. गझल ही मनुष्याच्या आयुष्याचा, त्याच्या सुखदु:खाचा तळ शोधणारी आत्मधून आहे. मनामध्ये प्रेम, आस्था आणि सांवेदनिक जिवंतपणा असल्याशिवाय गझल लिहिणे अथवा गाणे शक्य नाही. हा जिवंतपणा कदमांना इतर कलावंतापासून कितीतरी वेगळे आणि श्रेष्ठ ठरवितो. कलेसाठी कलोपासकाच्या छातीत इमानी हृदय असणे आवश्यक आहे. बेईमान आणि धूर्त लोकांसाठी हे क्षेत्र, हा प्रदेश निषिद्ध आहे. गझल, स्वत: आणि स्वत:ची गायकी याबद्दलची निर्मळ निष्ठा हीच कदमांच्या एकंदरीत जीवनप्रवासाची सोनेरी किनार बनून राहिलेली आहे.
 सुधाकर कदम यांनी पाकिस्तानी आणि भारतीय उर्दू गझल गायकांच्या अनेकविध शैलींचा अभ्यास करून, मराठी गझल गायकीची स्वतंत्र अशी विकसित शैली निर्माण केली. ध्वनिमुद्रिका हा या श्रवणभक्तीचा स्त्रोत होता. ज्याप्रमाणे लिहिणा-यासाठी पूर्वसूरी आणि समकालीन प्रतिभावंतांचे लेखन वाचणे हा एक प्रकारचा तंत्राभ्यास असतो, तसाच महान गायकांच्या रचना सतत ऐकून त्यातल्या बारीकसारीक अंगभूत वैशिष्ट्यांसह, गायकीचे तंत्र आत्मसात करणे हा गायकांसाठी एक प्रकारचा रियाजच असतो. प्रत्येक गायकाची गायनशैली, चाली बांधण्याची विशिष्ट ढब, शब्दांचे भावानुसार प्रकटीकरण आणि शेर सादर करण्याची पद्धत वेगवेगळी असते. या सर्वांचे सार समजून उमजून आपल्या सर्जनाच्या साच्यात ओतण्याचे काम, ही एक प्रदीर्घ आणि निरंतर प्रक्रिया आहे. वडील पांडुरंग कदमांकडून मिळालेला वारकरी संप्रदायाचा वारसा, पंडित जितेंद्र अभिषेकी व छोटा गंधर्व यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि अनेक वर्षांची प्रचंड साधना या सर्वांचे प्रतिबिंब कदमांच्या गायकीत उमटत राहते. विदर्भाच्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या कदमांनी संतूर, सरोद,  एकॉर्डिएन विविध वाद्यांमध्ये प्राविण्य मिळवून स्वतंत्र वादनाचे (सोलो) देखील कार्यक्रम केले आहेत. कदमांच्या सांगीतिक साधनेचा हा विस्तार थक्क करून सोडणारा आहे. संगीताच्या विविध पातळ्यांवर अनेक प्रयोग करणा-या प्रतिभावंतांची गझल गायकी समृद्ध असणे साहजिकच होते. गझलचा गझलचा स्वभाव, तिचा लयाधारित घाट आणि अर्थानुसार व्यापकता कायम लक्षात ठेवून कवीच्या भावनिक प्रतलाशी समकक्षता साधून गझल संगीतबद्ध करण्याची कठीण कला कदमांनी कमालीची साधली आहे. पत्रकारितेत काढलेली अनेक वर्षे विविध मासिकांतून केलेले स्फुट लेखन, ‘सरगम‘ आणि ‘फळे मधुर खावया‘ या दोन पुस्तकांची निर्मिती लक्षात घेता कदमांची साहित्यातील डूब लक्षात येते. शिवाय सुरेश भटांच्या प्रदीर्घ सहवासाचाही गझलची अंगभूत वैशिष्ट्ये समजून घेण्यात लाभ झाला असावा असे वाटते. आर्केस्ट्रात काम करीत असताना तासन्तास रियाज करणा-या कदमांनी पुढे आकाशवाणी नागपूरची स्वरपरीक्षा देऊन आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलावंताचा दर्जा मिळविला. मला वाटते या सर्व घडामोडींमधून कदमांच्या गझल गायकीचे रंगरूप आकार घेत गेले असावे. १९७५ साली नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उदघाटनाचे वेळी कदमांच्या गायनाचा कार्यक्रमझाला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व. सुरेश भट होते. त्यांनी आपल्या काही गझला कदमांना संगीतबद्ध करण्यासाठी दिल्या. पुढे १९८० पासून या दोघांनी एकत्र कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. या कार्यमातूनच पुढे, ‘अशी गावी मराठी गझल‘ हा संपूर्णपणे गझल गायनास समर्पित असा कार्यक्रम सुरू झाला.तेव्हापासून कदमांनी गझल गायनाचे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर मिळून सुमारे हजारएक कार्यक्रम केले आहेत. सुरेश भटांशिवाय श्रीकृष्ण राऊत, उ. रा. गिरी, ललीत सोनोने, अनिल पाटील, शिवाजी जवरे, अनंत ढवळे तसेच चित्तरंजन भट, समीर चव्हाण, प्रमोद खराडे, दिलीप पांढरपट्टे, ए. के. शेख, संगीता जोशी, म. भा. चव्हाण, दीपक करंदीकर, रमण रणदिवे अशा अनेक गझलनवाजांच्या गझला संगीतबद्ध केल्या आहेत. अलीकडे पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेले कदम स्वत: गायन फारसे करीत नाहीत परंतु गझल संगीतबद्ध करण्याचा उपक्रम मात्र अव्याहत सुरू आहे. सौ. रेणु चव्हाण व कु. भैरवी कदम या दोन्ही कन्यांच्या स्वरमाधुर्यातून त्यांनी परिश्रमपूर्वक घडविलेली गझल ऐकताना त्यांच्या चेह-यावरील समाधान लपत नाही. अलीकडे कदमांच्या प्रोत्साहनातून सुरू झालेला ‘गझलकट्टा’ या मासिक कार्यक्रमाला पुण्यात ब-यापैकी बाळसे धरू लागले आहे.
 भारतीय समाज आपल्या आतिथ्यशीलता आणि गुणीजनगौरवाच्या गुणांसाठी ओळखला जातो. पण या बाबतीत मराठी समाजात मात्र विपरीत चित्र दिसते. हिंदी चित्रपटातील गल्लाभरू, सुमार दर्जाचे अभिनेते आणि टाळ्यामिळवू, तिस-या दर्जाच्या गझल सादर करणा-या पाकिस्तानी गझल गायकांना डोक्यावर घेणारा मराठी समाज, आपल्या मातीतील कलावंतांच्या बाबतीत मात्र प्रचंड उदासीन आहे. सुधाकर कदमांसारख्या अस्सल प्रतिभावंतांची झालेली उपेक्षा दु:खदायी तर आहेच, परंतु उद्वेगजनकसुद्धा आहे. आजकाल मराठी गझल विश्वात झालेली उथळ कवी आणि अजाण गझलगायक पोराटोरांची भरती पाहून, मराठी गझल नेमकी कुठे जात आहे, असा प्रश्न पडतो. मराठी गझलांच्या लहानशा वर्तुळात गेल्या सात-आठ वर्षात सुरू असलेली ही सांठमारी पाहून कदम अनेकदा व्यथित होतात. गावोगाव गझलांचे कार्यक्रम झोडत फिरण-या मंडळींचे अर्थकारण आणि लोकप्रयितेचा हव्यास पाहून गेली काही वर्षे कदम या सर्वांपासून दूर राहणेच श्रेयस्कर, असा विचार करून काहीसे विलगच राहत आले आहेत.
         सुधाकर कदमांनी मराठी गझल गायकीची मुहूर्तमेढ रोवली. या गायकीला स्वत:चे असे एक परिमाण देऊन तिची जोपासना केली. कदमांचा हा वारसा आज त्यांच्या दोन्ही मुली आणि मुलगा (निषाद कदम) नेटाने चालवत आहेत. आर्णीतील आपल्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन गेली काही वर्षे कदम पुण्यात स्थायिक झाले आहेत. वारज्यातील कदमांची सदनिका म्हणजे पुणे शहराचे ‘गझल केंद्र’च बनले आहे. कदमांच्या घरी रंगलेल्या गझल वाचन व गायनाच्या अनेक मैफली माझ्या अनेक कवीमित्रांच्या आठवणीतील अनमोल ठेवाच आहेत. आपले संपूर्ण आयुष्य गझल गायकीला समर्पित करणारे सुधाकर कदम, या उतारवयातही पूर्वीसारखेच कार्यरत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. नव्या दमाच्या आणि नव्या वळणाच्या मराठी गझलांचा कार्यक्रम बसवून तो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोचविण्याचा कदमांचा मनसुबा आहे. 
 या प्रस्तावित उपक्रमासाठी मराठीतल्या बहुतेक गझल लिहिणा-या कवींच्या आणि महाराष्ट्रभर विखुरलेल्या गझल रसिकांच्या शुभेच्छा आहेत. अशा एखाद्या कार्यक्रमाने मराठी गझल गायकीला चैतन्य मिळणे खरे तर कालसंगतच ठरेल. प्रयोगशीलता ही कुठल्याही प्रतिभावंताच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सुधाकर कदमांचीही सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती, त्यांच्या संगीतास अद्याप ताजेतवानं ठेऊन आहे. आजवर प्रकाशित झालेल्या ‘भरारी’, ‘भजन सुधा’, ‘अक्षर गाणी’, ‘झुला’, ‘अशी गावी कविता’, ‘समुहगान’, ‘अर्चना’, ‘खूप मजा करू‘ या ध्वनीफितींच्या माध्यमातून हे निरनिराळे प्रयोग जनपटलावर वेळोवेळी उमटत राहिले आहेत. कदमांच्या या प्रदीर्घ वाटचालीबद्दल लिहिण्या-बोलण्यासारखे आणखी बरेच काही आहे, पण मनाच्या प्रचंड पसा-यात पसरलेल्या हजारो गोष्टींचा उल्लेख दरवेळी सविस्तर करणे कठीण असते. तूर्तास मीर तकी़ मीरने आपल्या कलेला समर्पित केलेला हा शेर कदमांना समर्पित करून हा लेख संपवित आहे.
 
किया था रेख्तां पर्दासुखन का
यही आखिर को ठहरा फन हमारा.

**************************************

‘शब्द्सृष्टी’ (७ नोव्हेंबर २००९) भारतीय ग़ज़ल विशेषांकातून साभार गझलगंधर्व विशेषांकात व त्यातून 'मौनी' मध्ये...


 

Thursday, November 19, 2020

आणि इंदूर जिंकले! -सुनील शिनखेडे


           १६ डिसेंबर, इंदोऱ. सायंकाळची वेऴ. अगदी कडाक्याची थंडी़. वातावरणात कमालीचा गारठा असूनही जाल सभागृहात रसिकांची गर्दी हळूहळू जमू लागली़. साडेसातच्या सुमारास हॉल अगदी गच्च भरलेला़. वास्तविक अशी अपेक्षा कुणाला नव्हतीच मुळी़. कारण इंदोरच्या रसिकांसाठी कार्यक्रम काहीसा वेगळाच होता़. मराठी गीत-गझल गायनाचा़. कलावंतही इंदोरसाठी नवीनच़. सुधाकर कदम़ इंदोरमध्ये आपला कार्यक्रम व्हावा अशी कदमांची बरेच दिवसांची इच्छा होती़. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कार्यक्रम झाले होते़. मूळचे ते यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी ह्या गावचे. त्यामुळे विदर्भात ते विशेष परिचित़. परंतु इंदोर सारख्या हिंदी भाषी परिसरात मराठी रसिकांसाठी मैफल व्हावी ही त्यांची इच्छा. तसे योग जुळून आलेत़. मूळचे आर्णीचेच परंतु इंदोरला स्थायिक झालेले वानखडे बंधुद्वयांची समॅक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुढे आली़. ह्या कंपनीचे अभियंते श्री अविनाश वानखडे ह्यांनी आयोजनाचा संपूर्ण भार सांभाळला़. प्रमोद कोठारी, अनिल वानखडे, दीपक शिंदे, अभिलाष खांडेकर व अन्य चाहते मंडळी मदतीला धावली़.
 संपूर्ण सभागृहच मोगर्‍याच्या सुवासाने धुंद झालं होतं. इंदोरचे प्रसिध्द रंगकर्मी बाबा डिकेंच्या प्रमुख उपस्थितीत मैफल सुरु झाली़. आणि कवी कलीमखान ह्यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली.
 वेळ सायंकाळची़. सायंकाळच्या प्राथनेची़. कलीमखानांनी सुरेश भटांचे शब्द दिलेत -
 ‘माझीया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे़’ सुधाकर कदमांचे सूर साथीला आलेत़. संपूर्ण हॉल स्तब्ध, शांत़ कदमांचा स्पष्ट व मोकळा आवाज़ साथील तबल्यावर नागपूरचेच रमेश उइके आणि सारंगीवर इंदोरचे आकाशवाणीचे प्रसिध्द सांरगीवादक मोइनुद्दीन खॉ साहेब़ शब्दसुरांची गाठ पडली़. कदमांची मध्यप्रदेशातील पहिलीच मराठी गीत-गझलांची मैफल रंगू लागली़.
 तसा गझलांचा चाहता वर्ग मोठा परंतु मराठी गझलांचा मोजकाच़. इंदोरसाठी तर मराठी गझल गायन हा प्रकारच नवीन होता़. त्यामुळे येथील मराठी रसिक कदमांना कितपत स्वीकारतील ह्याबद्दल आयोजक साशंक होते़. परंतु मैफलीच्या पूर्वार्धातच रसिकांनी अगदी मनापासून दाद दिली़. ह्या कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या ह्या शहरात मराठी रसिकांचा भरणा काहीसा कमीच. परंतु ह्या नव्या कलाकारांच्या इथल्या पहिल्याच मैफलीत काही वेगळेच दृश्य दिसले़. सुरुवातीपासूनच उपस्थितांची जबर दाद मिळवून कदमांनी रसिकांचे हृदय काबीज केले़.
 कवी कलिमखान ह्यांनी कधी कवठेकरांच्या, कधी बोरकरांच्या, तर कधी स्वतःच्या मार्मिक ओळी व कविता पेश करुन मैफलीला अनुकूल असे वातावरण जिवंत ठेवले़ त्यांच्या ‘कुंकू’ ह्या कवितेतला तर अशी काही दाद मिळाली की रसिकांच्या आग्रहाखातर त्यांना ती कविता पुन्हा म्हणावी लागली़
 ‘दीनरात ज्याचे गान मी गातो
 तो भारतभाग्यविधाता
 रस्त्यावर चिवडा खातो.’
 ह्या त्यांच्याच ओळी सद्यःपरिस्थितीचे भान जागवणार्‍या़ आणि श्रोत्यांना विचारात टाकणार्‍या़. अशा वैचारिक तर कधी श्रृंगारिक शब्दांची, कवितांची पेरणी करत कलीमखानांनी मैफलींचे सारथ्य केले. आणि श्रोत्यांना बांधून ठेवले़. सोबत कदमांनीही कधी श्रृंगार, कधी याचना, तर कधी यातना असे विविध भाव ओतले़.
 भटांच्या‘झिंगतो मी कळेना कशाला, जीवनाचा रिकामाच प्याला़’
 ह्या गझलेतील झिंगतो हा शब्द म्हणण्याचा कदमांचा आगळा ढब रसिकांची दाद घेऊन गेला़
 ‘ऐन वेळी अशी का करतेस तू़’
 ह्या गोड, लाडिक व काहीशा धीट गझला सादर करुन कदमांनी रसिकांची तब्येत खूष केली़.
 मध्यंतरामध्ये आयोजकांतर्फे सर्व रसिक श्रोत्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम होता़. तसा हा सुद्धा आयोजनातील आगळावेगळा गोड अनुभव. इंदोरच्या श्रोत्यांसाठी नवाच होता! मैफलीला खास रंग चढला तो मध्यंतरानंतरच़ रात्रीला कमालीची थंडी असूनही सर्वच रसिक पुन्हा स्थानापन्न झाले़. उत्तरार्धाच्या सुरुवातीस कदमांनी श्रीकृष्ण राऊतांचे
 ‘दुःख माझे देव झाले, शब्द झाली प्रार्थना आरती जी गात आहे, तिच माझी वेदना’.
 नंतरही एकसे एक गझला सादर करून कदमांनी भरपूर टाळ्या घेतल्या़-
 कलीमखान यांच्या
 ‘मोगरा वेणीत पोरी माळण्याचे दिवस आले
 आपुले अपुल्यावरी भाळण्याचे दिवस आले!’
 ह्या गीताने एवढ्या गारव्यातही रसिकांना गोड गुलाबी दिलासा दिला़. संपूर्ण मैफलीत कधी तबल्याचे साथी रमेश उईकेंनी, तर कधा मोइनुद्दीन खॉं साहेबांच्या सारंगीच्या मधुर सुरांनी रसिकांना दाद देण्यास भाग पाडले़. कवठेकरांच्या‘मस्तीत गीत गारे देतील साथ सारे़’ ह्या गीताला तर रसिकांनी उत्स्फुर्तपणे टाळ्यांचा ठेका दिला़.सतत चार तासपर्यंत सर्वच रसिक ह्या शब्दसुरांच्या आगळ्या वेगळ्या मैफलीचा आनंद मनसोक्त लुटत होते़ भारदस्त गझला, त्यांना स्वरसुरांचा साज, कलीमखान यांचे खुसखुसीत संचालन, उत्कृष्ट आयोजन व इतर प्रत्येकच बाबतीत वेगळेपणा सिद्ध करणार्‍या ह्या मैफलीची सांगता भैरवीने झाली़.
 अत्युत्कृष्ट आयोजन व बहारदार मैफलीच्या इंदोरच्या पहिल्याच उपक्रमासाठी अभिनंदनपर संदेश अद्यापही येत आहेत़ दुसरी मैफल कधी? ही विचारणा करणार्‍या पत्रांचा ढीग लागतो आहे़. मध्यप्रदेशातील महू, उज्जैन, देवास, रतलाम येथूनही कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मंडळांची निमंत्रणे आली आहेत़. केवळ एकाच मैफलीने कदमांनी इंदोरच्या रसिकांची हृदयं काबीज केलीत़.

तरुण भारत,नागपूर
१४ जानेवारी १९९०

(डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून साभार...)

 





संगीत आणि साहित्य :