माझी व सुधाकर कदम यांनी ओळख २००५ मध्ये झाली.ते 'अर्चना' या मराठी भक्तीगीतांच्या अल्बममध्ये काम करीत होते.या अल्बममध्ये गाण्यासाठी त्यांनी मला बोलाविले.हीच आमची पहिली भेट होय.या वेळी ते उत्तम संगीतकार आहेत,उत्तम गझलगायक आहेत याची अजिबात कल्पना नव्हती.ते नागपूरचे आहेत एवढेच मला माहीत होते. नंतर हळू हळू त्यांच्याबद्दल माहिती मिळत गेली.विदर्भासोबतच महाराष्ट्रभर त्यांनी सुरेश भटांसोबत मराठी गझलकारांच्या गझलांना स्वरबद्ध करून गायिल्याचे येथील (पुण्यातील) गझलकारांकडून कळले.तसेच आर्णी या छोट्याशा गावी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना गझल गायकीसोबतच अनेक उपक्रम राबविल्याचेही कळले.
त्यात माझ्या दृष्टीने महत्वाचे कार्य म्हणजे गांधर्व विद्यालयाची स्थापना व परीक्षा केंद्र होय.
'अर्चना' ह्या अल्बमचे काम सुरू करायचे ठरल्यावर चाली सांगण्यासाठी ते माझ्याकडे आले.दुसऱ्यावर बघताक्षणीच प्रभाव पडेल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.बोलण्याच्या आवाजावरून हा माणूस गात असावा असा अंदाज येणारे अत्यंत मृदू बोलणे.समोरच्या व्यक्तीला सहज आपले करून घेणारे वागणे,यामुळे प्रथमदर्शनीच सुधाकर कदम या व्यक्तीचा अंदाज मला आला.ह्या वेळी त्यांच्या दोन्ही 'गायिका' कन्या त्यांच्या सोबत होत्या.मनात म्हटलं ,'सगळं घरच गाणारं दिसतंय.' असो
'अर्चना' या अल्बममध्ये माझी पाच गाणी आहेत. अतिशय अप्रतिम व आकर्षक चाली आहेतच.पण त्याचबरोबर श्रवणीय आणि मनात रेंगाळत राहणाऱ्या आहेत.मला वाटते गझल गायकीमुळे शब्द,काव्यातील अर्थ याचा अचूक अंदाज सुधारजींना आहे.त्यामुळेच या अल्बममधील आशा पांडे यांच्या गीतांना समर्पक अशा चाली त्यांनी लावल्याचे दिसून येते.सुंदर शब्द व सुंदर स्वररचना यांचा सुंदर मेळ म्हणजे ,अर्चना'! या अल्बममध्ये एकूण दहा भक्तिरचना आहेत. खालील शब्दांवरून त्या किती प्रासादिक आहेत याची आपणास कल्पना येईल.
१.श्रीहरी रे श्रीहरी,नाद केवळ एक घुमतो,श्रीहरी रे श्रीहरी...
२.शक्ती दे तू आज मजला दुःख सारे वेचणारी...
३.ये मंत्रांची घुमवित वीणा छेड मनाचे मंजुळ तार...
४.तुझीच सुमने तुझे निरंजन,चरणी तुझिया तुझे समर्पण...
५.वेद झाले वेदनांचे,शब्द झाले रे ऋचा...
६.श्याम घन घनश्याम माझा सावळा घनश्याम रे...
७.दयासागरा...
८.माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे...
९.अर्चना...
१०.या देहाचे देऊळ झाले...
यातील पहिलेच गाणे शुद्ध गांधारावरुन उठणारे भूपाच्या अंगाने जाणारे आहे.भूपामध्ये मधून मधून केलेल्या शुद्ध निषादाच्या वापरामुळे ही बंदिश अतिशय गोड व वेगळी झाली आहे.शौनकचे (अभिषेकी) व माझे 'शक्ती दे तू आज मजला' असे आवाहन करणारे शब्द व त्यानुसार भिन्नषड्ज रागात केलेली रचना,त्यातही मध्यमाला षड्ज करून मूर्च्छना पद्धतीने केलेली पुढील स्वररचना,त्याला लावलेल्या चाचर तालामुळे अतिशय स्फूर्तिदायक झाली आहे.एक आवेश व आवेग या भक्तिगीतामध्ये शब्द-स्वरांद्वारे प्रत्ययास येतो.'अर्चना' हे माझे या अल्बममधील सर्वात आवडते गाणे आहे.
'तूच माझे गीत कोमल,भाव तू उल्हास रे
तूच माझी अर्चना,तू अंतरी विश्वास रे...
सुंदर शब्द व अत्यंत आर्तता असणारी स्वररचना.आणि 'विश्वास रे' वरची अवरोही जागा फारच सुंदर.सुरांचे घरंगळणे. दोरा सुटल्यावर मोती जसे घरंगळतात तसे तसे इथे स्वर घरंगळले आहेत.सुधाकरजी उत्तम संगीतकार असण्याची साक्ष द्यायला हा एकच अल्बम पुरेसा आहे.
मी त्यांचे पुढील सर्व आयुष्य पूर्ण आयुरारोग्य व सुरांच्या संगतीत जावे अशी प्रार्थना करते.
१३/११/२०१८
प्रा.डॉ.श्रीकृष्ण संपादित व 'अक्षरमानव'प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून....
--------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment