गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, October 17, 2020

प्रेम पिया हम पाये...राजे मधुकरराव देशमुख (माहूर)

.        

 ‘हरचंद सुरीली नग़मोंसे
 जज़बात जगाये जाते है,
 उस वक़्त की तलखी याद करो,
 जब साज़ मिलाये जाते है।’
 
     निःसंशय सुरेल गीतांनी आपल्या भावना उल्हासित, प्रफुल्लित होतात़. परंतु त्या एकमेवाद्वितीय क्षणाची उत्कटता लक्षात घ्या की जेव्हा वाद्ये स्वरात मिळविली जातात़. निःसंशय तो क्षण शब्दातीत, वर्णनातीत आहे़. तितकाच शब्दातीत, वर्णनातीत तोहि क्षण आहे की जेव्हा गायक तन्मय होऊन गात असतो. आणि स्वरवेडा श्रोता आपले प्राण कानात आणून ऐकत असताना आत्मविस्मृतीत जातो़. एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती, किमया, करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे़. माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले. त्याचे गमक वरील शेरमध्ये आहे़.
       कुणाशी नाते जुळते ते उगीचच नाही़. खटपट, प्रयत्न करुन जुळविण्याची ही बाब नाही़. आपल्या काही ऋणानुबंधाच्या गाठी पडलेल्या असतात़. त्या केव्हा पडलेल्या असतात याची आपल्याला कल्पनाही नसते़. परंतु केव्हातरी अनाहुतपणे ती आपल्याला सापडते. आणि त्या गाठीचे रहस्य उलगडत जाते़. त्यावेळी जो आनंद होतो त्या सुखद संवेदनांचं वर्णन करता येत नाही़. माझा आणि सुधाकर कदम यांचा संबंध आला त्याचं रहस्य या ऋणानुबंधाच्या गाठीत आहे़. मला एकवेळा गुरुवर्य पुरुषोत्तमराव कासलीकर म्हणाले होते, “बाबुरावजी, स्वरराजांच्या स्वराला मधाची उपमा दिल्याने मधाची महती वाढते, स्वरराजांची नाही!" आज एका निमित्ताने सुधाकर कदम विषयी लिहीत आहे, तेव्हा मला नेमकं वरील विधान आठवलं. वाटते की माझ्या लिहीण्याने सुधाकरची शान वाढत नाही; वाढलीच तर माझी वाढेल़. मी एक स्वरवेडा माणूस आहे़; तो कानी पडला की माझं मन तिकडे धाव घेते़. त्यावेळी माझी जात कोणती पुसू नका. आठवते़ सुधाकर स्वराचा ठेवा आहे़. स्वराचा वाहता निर्झर आहे़. त्या ठेव्याजवळ बेभान होऊन धाव घेणे हा मधुकराचा स्वभावधर्मच आहे़. नाही तरी ‘घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद’ आपल्याला हाच संकेत देतो की नाही?
       या साडेतीन दशकात अतूट, अजोड सहवासातून मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकलं आहे़. नाट्यपदे ऐकली आहेत़. त्यांची गझल गायकी ऐकली आहे़. पदेही ऐकली आहे़. हे सर्व ऐकून माझे मन प्रसन्न झाले आहे़. याचे कारण हे की या वेगवेगळ्या गायकीमधून जात असतांना त्यांनी आपला स्वर सोडला नाही़. तालाचे तर भान ठेवलेच पण गायकी ही श्रोत्यांना प्रसन्न करणारी असावी याचेही अवधान ठेवले. यातच त्यांच्या गायकीचे गम्य आहे़. सुधाकर जेव्हा गझल गायकी कडे वळले; त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टीकाही झाली असेल, पण ते बरोबर नाही़. साचेबंद ख्याल गायकी आणि राग दारीच्या पूर्वापार चालत असलेल्या मजबूत बंदिशी मधून ते घरसले असे म्हणता येईल का? महाराष्ट्रीय श्रोता नाट्यपदवेडा आहे़. ख्याल ऐकल्यानंतर आपल्या आवडत्या नाट्यगीताची तो फरमाईश करतोच़. परंतु त्या नाट्यपदाला कोणता रागाधार आहे. वगैरे चौकशा करुन त्या पदाचा उपमर्द करतो का? नाही ना?

दिले नादॉं तुझे हुवा क्या है ।
आखिर इस दर्द की दवा क्या है ॥

      ही मिर्झा गालिबची गझल कोणत्या एका रागाच्या ख्याल गायकी अंगाने गायची. हा जगावेगळा अट्‌टाहास वरील गझलचा आशय, अर्थ, भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे; यात गझल गायकाचे कौशल्य आहे़. आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा आधक अवधान बाळगले आहे़. पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून, विलंबित ख्याल गायक, ज्याला अक्षरमंत्राचा साक्षात्कार झाला आहे, तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल़. या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे़.
       स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले़. त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्योत्तम श्री पुरुषोत्तम कासलीकरांकडे असे़. अशावेळी मला आवर्जून बोलाविल्या जायचे़ .स्वरराज आले की कासलिकरांच्या घराला सम्मेलनाचे रुप यायचे़. या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे पेश असत़. छोटा गंधर्व त्यांचेशी विशेष सलगीने, आपुलकीने वागत असतांना मी त्यांना पाहिले आहे़. अनेकदा हार्मोनियमच्या साथीला सुधाकर कदम यांना बरोबर घेऊन जायचे़.माहुरचे आद्य दैवत श्री रेणुकादेवी़. रेणुकेचे नवरात्र हे माहुरच्या खास आकर्षणाचा काऴ. त्यातल्या त्यात ललिता पंचमीचे महत्व तर अनन्य साधारण़. आपली संगीत सेवा रेणुकेच्या चरणी अर्पण करण्यास दूरजवळचे अनेक कलाकार येत़. त्यात सुधाकर कदम हे प्रामुख्याने असत़. त्या दिवशीच्या संचलनाची जिम्मेदारी आम्ही त्यांचेवर टाकत असू़. ही जबाबदारी ते रात्री नऊपासून सकाळी सुर्योदयापर्यंत निरलसपणे पार पाडत़. संगीत महफिलीचे संचलन करणे ही स्वयं एक कलाच आहे़. त्याला संगीताचा आत्मा ओळखणारा जाणकारच हवा़. येर्‍या गबाळ्याचे ते काम नाही़. संगीताप्रमाणे गोड वाणी, प्रसन्न मुद्रा, उत्तम जोपासलेले शरीर सौष्ठव, मनमिळाऊ स्वभाव या सर्वामुळे ते त्या नऊ-दहा तासाच्या स्टेजवर मानापमानातल्या धैर्यधरासारखे वाटत़. यावेळचा त्यांचा पोषाखही अगदी प्रसंगाला अनुरुप असा चोखंदळ असे़. अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्र- मध्यप्रदेशात गाजली़. त्यांच्या मैफिलींचे वृत्त वर्तमान पत्रातून मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा़.
       सुधाकर कदम आर्णीला़ स्थायिक झाले़. गांधर्व संगीत विद्यालय ही स्वतंत्र संस्था निर्माण करून संगीताचे दान त्यांनी दिले़. या संस्थेच्या विद्यमाने ते दरवर्षी संगीत सम्मेलन घेतात़. या वेळी ते जीव ओतून त्यात राबतात़. सम्मेलन असते एक ना दोन दिवसाचे़ पण त्यामागचे जे कष्ट एक महिना आधीपासून उपसावे लागतात; याचा प्रामाणिक आढावा घेतला तर सम्मेलन काय असते ते कळेल़. संगीत सम्मेलनासोबतच अभिनय कला मंडळ, शिवजयंती उत्सव समिती, तालुका पत्रकार संघ, सरगम, अशा अनेक संस्थांची स्थापना करून सामाजिक, राजकीय, सांगीतिक, बौध्दिक या सर्व स्तरावर आपल्या जीवनाची वाटचाल दमदारपणे चालत असता त्यांनी थोड्याच काळात अमाप लोकप्रियता मिळवली़. हिंदू आणि मुस्लिम समाजात ते सारखेच लोकप्रिय आहेत़. हरदिल अजीज़ आहेत़. भावी आयुष्यात त्यांना आणखी लोकप्रियता मिळो, सगळ्यांचे हरदिल अजीज़ होवो ही या रौप्य महोत्सव प्रसंगी कामना.

(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. रौप्य महोत्सवी विशेषांक १९९९)

'मौनी' मधून....


 

Thursday, October 15, 2020

मनोगत-आशिष जाधव

                       
( ...मराठी गझलगायक म्हणून सुधाकर कदमांचं मोठेपण मांडण्याची हीच वेळ आहे. ही बाब खरीच आहे, सुधाकर कदम यांना पाहिजे तशी संधी आणि प्रसिद्धी त्यांच्या गायनकलेच्या किंवा सृजनशीलतेच्या काळात विदर्भात आणि तिथून मुंबई-पुण्याकडं मिळाली नाही. )

- [ ] मी साधारणत: आठ वर्षांचा असेल १९८१ मध्ये खामगावच्या घरी सुधाकर कदमांची मैफल झाली. ती मैफल आणि ते दोन दिवस मला आजही लक्षात आहेत. माझ्या वडिलांचे (बी.एल.जाधव) मित्र म्हणून सुधाकर कदम, त्यांच्याबरोबर वडिलांचे लहान भावासारखे असलेले कवी कलीम खान(ज्यांच्या आर्णीच्या घरातला माझा आणि आमच्या खेड्यातल्या घरातला त्यांचा जन्म), कवी श्रीकृष्ण राऊत, नारायण कुळकर्णी-कवठेकर आणि शेखर सरोदे(ॲड. असीम सरोदेचे काका) असे सगळे दोन दिवस  आमच्या घरी मुक्कामी होते. रात्री मैफल झाली. कदाचित ती माझी ऐकलेली पहिली मैफल आणि म्हणूनच आजही ती स्मरणात आहे. सुरेश भटांच्या मराठी गझला सुधाकर कदमांनी गायल्या होत्या. तबल्यावर शेखर सरोदे होते. कलीम खान, नारायण कवठेकर यांचं निवेदन होतं. संध्याकाळी सुरू झालेली मैफल मध्यरात्री उशिरापर्यंत चालली होती, हे मला दुसऱ्यादिवशी कळलं होतं. त्या मैफलीत एक उर्दू नज़्म सुधाकर कदमांनी दोनदा गायली होती. ते शब्द पाठ झाले होते, 'बात निकलेगी तो दूर तलक जायेगी'... नंतर कळलं ती प्रसिद्ध नज़्म जगजितसिंग यांची  होती. वडिलांकडे गजलांच्या एलपी रेकाॅर्डचा नंतर कॅसेटचा मोठा खजाना आहे. माझ्या लहानपणापासून मी गुलाम अली-मेहदी हसन-हुसेन बक्श ऐकत आलोय. त्यामुळं लहान वयातच गाणं ऐकण्याची सवय लागलेली होती. आणि म्हणूनच सुधाकर कदमांची ती मी आयुष्यात ऐकलेल्या पहिल्या मैफलीची आठवण खोलवर मनात रुजली असेल कदाचीत. 

- [ ] पुढे जेव्हा मला गझल कळायला लागली, तेव्हा त्या मैफलीची रेकाॅर्डेड कॅसेट मी कित्येकदा ऐकली. (आजही सुधाकर कदमांच्या त्या रेकॉर्डिंगच्या कॅसेटस् वडिलांकडे आहेत.) महान गझलकार सुरेश भट यांच्या सुरूवातीच्या काळातल्या जवळजवळ सर्वच गाजलेल्या गझला सुधाकर कदमांनी त्या मैफलीत स्वत:च्या चालीत गायल्या होत्या. नंतर जेव्हा मी मुंबईत आलो आणि काही गझलनवाजांच्या मराठी गझला ऐकल्या तेव्हा तर सुधाकर कदम यांच्या गझल गायकीचं, त्यांच्या सृजनशिलतेचं, त्यांच्या मखमली आवाजाचं मोठेपण प्रकर्षानं जाणवलं. कुठेही उगाचच स्वर लांबवणे किंवा स्वरच्छल नाही की कुठे उगीच काही वेगळी हरकत घेतल्याचा आव. शास्त्रीय संगितातल्या रागदारीत राहून शब्दांना न्याय्य न्याय देणारी गझलगायकी, हेच सुधाकर कदमांच्या गझलगायनाविषयीचं माझं ठाम मत आहे. मला गझल आणि गायकी समजून-उमजून ऐकण्याचा चांगला कान देवानं दिलाय, म्हणूनही मी म्हणत असेल. त्यामुळेच कलेच्या बाजारीकरणाच्या जगात सच्च्या रसिकांपर्यंत पोहोचण्यात सुधाकर कदम कमी पडले, हेही आवर्जून सांगावं लागेल. तो त्यांचा की परिस्थितीचा की विदर्भातल्या आडमार्गाला असलेल्या आर्णीसारख्या केवळ नावालाच तालुका असलेल्या गावाचा दोष आहे, याचा विचार मी जेव्हा मुंबईतल्या प्रसारमाध्यमामधला आघाडीचा पत्रकार म्हणून करतो, तेव्हा काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, हे लक्षात येतं.  

गत ४० वर्षांपासून मनात दाटलेल्या आठवणींना लिहितं करावंसं वाटलं एवढंच....

-आशिष जाधव


 

Wednesday, October 14, 2020

गर्भश्रीमंत राग 'यमन'


.      यमन रागाच्या नावावर बरेच मतभेद आहेत.काही लोक याला फारसी भाषेतील ’इमन’ चेच यमन मध्ये झालेले रुपांतर मानतात.तसेच हा राग अमीर खुस्रो नावाच्या अल्लाऊद्दीन खिलजीच्या काळातील विद्वान संगीतकाराने प्रचलित केला अशीही मान्यता आहे.एवढे मात्र निश्चित की खुस्रोच्या काळात नव-नवीन राग प्रचारात आलेत.यात फारसी,इराणी सुरावटी भारतीय रागात मिसळल्या गेल्या होत्या.गोपाल नायक हा संगीताचा प्रकांड विद्वान खुस्रोचा समकालीन आहे.दक्षिणेतील पंडीत यमन हा राग ’यमुना कल्याण’चाच एक प्रकार मानतात.या नावाचा उल्लेख दक्षिणेकडील ग्रंथांमध्ये आहे.परंतू यमुना कल्याण आणि यमन यात नावाव्यतिरिक्त काहीच साम्य नाही.उत्तर भारतीय संगीत शास्त्र (भातखंडे कृत) या ग्रंथात हा राग कल्याण थाटातून उत्पन्न झाल्याचे लिहीले आहे.पण त्यातही तथ्य वाटत नाही,हे भातखंडेंचा आदर ठेऊन नमूद करतो..(माझे हे विधान अनेकांना आवडणार नाही.)कारण प्राचिन ग्रंथांमध्ये ’यमन’ नावाच्या रागाचा कुठेच उल्लेख केलेला आढळत नाही.तसेच कोण्या एका शब्दावरून राग आला असेल असेही वाटत नाही.कारण राग निर्मिती ही एक प्रक्रीया आहे.ती एकदम होणारी नाही...

काही लोक याला यमन कल्याण असेही म्हणतात.पण त्यालाही तसा फारसा अर्थ नाही.यमन रागात विवादी स्वराप्रमाणे कधीतरी कोमल मध्यम लावला की तो यमन कल्याण होतो.याला सुद्धा ग्रंथात आधार नाही.अशा प्रकारे एखादा स्वर बदलून किंवा जास्तीचा लावून किंवा विवादी म्हणून एखाद्या स्वराचा प्रयोग करून तो प्रचलित करणे अशी अनेक उदाहरणे आपणास दिसून येतील. ते काहीही असले तरी यमन हा राग अत्यंत लोकप्रिय आहे यात वाद नाही.मी तर त्याला ’गर्भश्रीमंत’ राग म्हणतो.यावर लिहायचे म्ह्टले तर सूर्य,समुद्र,अवकाश,धुमकेतू यावर लिहिण्यासारखे आहे.इतका मोठा आवाका असलेला दुसरा राग माझ्या तरी पाहण्यात आला नाही.तसेच माझ्या मते ’कल्याण’ ऐवजी ’यमन’ हाच थाट असायला हवा होता.यालाच शुद्ध थाट म्हणून मान्यता मिळायला हवी होती.कारण यात सातही स्वर शुद्ध म्हणजे तीव्र आहेत.शुद्ध थाट म्हणविल्या जाणार्‍या बिलावल थाटातील कोमल मध्यम व कोमल निषादाचा वापर विद्यार्थ्यांना विचारात पाडतो.(शास्त्र म्हणून तेच शिकविल्या जात असल्यामुळे यावर कोणी बोलत नाही ,ही गोष्ट वेगळी.तसेच बोलून फायदा काय ? परीक्षेत हेच लिहावे लागणार नाहीतर गूण कमी होतील !)पण यमनच्या बाबतीत असा संभ्रम रहात नाही.

शास्त्रीय माहितीः- गेल्या २०० ते २५० वर्षांपासून चालत आलेल्या उत्तर भारतीय संगीत शास्त्रानुसार यमन राग कल्याण थाटातून उत्पन्न झाला आहे.वादी स्वर गांधार असून संवादी स्वर निषाद आहे.जाती संपुर्ण असून गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. गानसमयावर या अगोदरही मी थोडक्यात लिहीले आहे या वेळी मात्र सविस्तर लिहीत आहे.खरे म्हणजे रागाचा गानसमय ठरविण्याची अशी कोणतीच साधने प्राचिन ग्रंथंमध्ये नमूद नाहीत.तरी पण रागाचा गानसमय ठरविल्या गेला आहे.कशाकरीता ? माहित नाही.जिथे प्राचिन ग्रंथातील रागांची नावे व आजच्या रागांच्या नावात साम्य नाही,स्वरात साम्य नाही तिथे गानसमय कसा आणि कोण ठरवणार ? काही तरी शास्त्रीय नियम लावायचे म्हणून लावणे या पलिकडे याला अर्थ नाही.माणसाने केव्हा गुणगुणावे,काय गुणगुणावे हे काय ठरवून होणार काय ? सध्याचा थाट पद्धतीचा विचार केला तर मधुवंतीसारखे राग तर थाट पद्धतीमध्ये बसतच नाही.मग दहा पेक्षा अकरा थाट करून त्या ११व्या थाटाला मधुवंती नाव दिले तर काय बिघडेल ? पण नाही, दहा थाटातच ठोक-पिट करून सर्व राग बसविणे...हे अनैसर्गिक वाटत नाही का ? हिंडोल,गौडसारंग,तोडी,मुलतानी या रागांमध्ये तीव्र मध्यम असून त्यांना दिवसा गायिल्या जाणारे राग म्हणून मान्यता दिल्या गेली आहे.खरे तर नियमानुसार तीव्र मध्यम असलेले राग रात्रीच गायिल्या जायला हवे. एक असाही नियम आहे की,’ग’ ’नि’ कोमल असलेल्या रागात तीव्र मध्यम लागत नाही.मग कोमल ग नि सोबत तीव्र म असलेल्या सुरावटीचा राग मधुकंस कसा ? खरे तर राग गाण्याच्या नियमाला फार पुर्वीपासूनच फाटा दिला आहे हे ’दर्पण’ या ग्रंथातील

 

"यथोत्काल एवैते गेया पूर्व्विधानतः /

राजाज्ञया सदागेया नतु कालं विचारयेत् //

 

आणि ’तरंगिणी मधील

 

"दशदंडात्परं रात्रौ सर्वेषां गानमीरीतम् /

रंगभुमौ नृपाज्ञायां कालदोषो न विद्यते //

 

तसेच श्री बॅनर्जी यांच्या ’गीतसुत्रसार’ (Grammer of vocal music) ग्रंथामध्ये पान ५८ वर म्हणतात...

"हमारे यहाँ राग-रागिनियों को दिन तथा रात्री के नियमित समयों पर गाने की जो प्रथा चली आ रही है,वह केवल काल्पनिक है"

या वरूनही गानसमय प्रथेतील पोकळपण स्पष्टपणे दिसून येतो.खरे म्हणजे स्वर समुदायात अशी काही विशेषता नाही की,ज्यामुळे त्यांना काही खास वेळी न गायिल्याने योग्य तो परिणाम साधल्या जात नाही.संगीताचा उद्देश स्वरांद्वारे भाव व्यक्त करून श्रोत्यांचे मन प्रसन्न करणे एवढाच आहे.म्हणजेच या करीता कोणत्याही विशिष्ठ अशा खास वेळेची गरज नाही.जे भाव सकाळी व्यक्त होऊ शकतात किंवा करू शकतात ते सायंकाळी किंवा रात्री का करू शकत नाही ? नक्कीच करू शकते,शकायलाच पाहीजे.’पारिजात’ या ग्रंथात भूपाली राग सकाळी गायिल्या जातो असा उल्लेख आहे.परंतू सध्या तो रात्रीकालिन मानल्या जातो.(घनःशाम सुंदरा...ही भूपाली रागातील भूपाळी सकाळी गोड वाटत नाही का ? सकाळच्या अहिर भै्रव रागातील ’पु्छो ना कैसे मैने रैन बिताई..’हे चित्रपटातील गाणे रात्री मन मोहतेच ना ?) दक्षिण भारतात यमन राग सकाळी व भैरवी रात्री गायिल्या जाते.तर काहींच्या मते ललित,रामकली,तोडी वगैरे राग सायंकाळी गायिल्याने गानसिद्धी उत्तम प्रकारे होते.म्हणजेच गानसमय हा प्रकार म्हणजे लोकांवर लादलेले थोतांड आहे हे सिद्ध होते.स्वर,स्वर आहे;राग,राग आहे,केव्हाही त्याचा परिणाम सारखाच अपेक्षित आहे.

ते काहीही असले तरी यमन राग हा सर्वांचा आवडता आहे हे मात्र खरे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे कल्पक गायक,वादक,संगीतकारांवर हा लवकर प्रसन्न होऊन वरही देऊन टाकतो.पण जर का यात भरकटला तर ’पचका’ होणे ठरलेले आहे.यमन गाता आला की सर्व राग गाता येतात असे जाणकार सांगतात.हा राग गायिला नाही असा गायक,वादक सापडणे अशक्यच ! इतका हा मधूर आहे.भारताच्या सर्व भाषा-बोलींमधील जेवढी गाणी या रागात बनली असतील तेवढी गाणी दुसर्‍या रागात तयार झालेली नसावी.सुगम संगीतकारांसाठी तर हा राग वरदानच ठरला आहे.कोणतेही भाव समर्थपणे व्यक्त करण्याची क्षमता यमन मध्ये आहे.हे एक संगीतकार म्हणून मी ठामपणे सांगू शकतो.


(येथे मी तयार केलेल्या यमन रागाच्या विविध मूडच्या रचनांवर कोल्हापूरचे संगीत समीक्षक ऍडव्होकेट राम जोशी यांच्या लेखातील काही भाग देण्याचा मोह मला आवरत नाही.ते म्हणातात... "यमन हा रागच असा की कोणाही संगीतकारानं त्याच्या प्रेमात पडावं. कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत, ती प्रत्येक मुर्ती स्वतंत्र आहे़. प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे, रंग आहे, रुप आहे, व्यक्तिमत्व आहे़. कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात़.

 

‘सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी

गातो गझल मराठी प्रिये तुझ्याच साठी’

 

दादर्‍यातल्या ह्या बंदिशीची यमन मधील ही रचना. अगदी साधी. सुगमसंगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथं अपेक्षित असतं ते श्रवण सौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथं शुध्द यमन शोधण्याची धडपड करू नये कारण तो यमन कल्याणाशी क्षणांत दोस्ती करतो़ आणि दोन्ही माध्यमांच्या अशा हळुवार लगावांची प्रचिती आली की उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच रहात नाही़ ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली व घेतो़.

 

‘मी असा ह्या बासरीचा सूर होतो,

नेहमी ओठांपुनी मी दूर होतो’

 

ह्या गझलची चालही अशीच आहे़. धृवपदातली -मतल्यातली दुसरी ओळ (ज्याला क्रॉस लाईन म्हणतात) त्याची ठेवण व स्वरसमुहाची रचना अत्यंत मोहक आहे़. त्यातील ‘सूर होतो़’ इथं तार सप्तकातला षडज्‌ सूर ह्या शब्दासाठी खुबीनं वापरला तर आहेच पण ती ओळ म्हणताना ‘सूर’ हा शब्द आणि त्याचा तारषड्जाचा हळूवार पण भरीव लगाव व रुपक तालांचा एक पूर्ण जादा आवर्तन पूर्ण होईपर्यंत जो दीर्घकाळ मुक्काम ठेवतो तो अतीसुंदर लागतो़. संगीत रचनाकाराकडं नुसता सांगीतिक अलंकाराचा साठा असून चालत नाही तर स्वरपोषाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो़. संगीतकार हाच खर्‍या अर्थानं स्वतःच्या रचना समर्थ पणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो. हा अनुभव मास्तर कृष्णरावांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम, यशवंत देव यांच्या पर्यंत येतो. सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत़. ‘सूऱ होतो’ इथं शब्दकला आणि स्वर माधुर्य असा सुरेख समन्वय झालाय़.

‘सांज घनाच्या मिटल्या ओळी’

हे एक अतिशय हळूवार भावना उलगडून दाखविणारं सरस काव्य़. कदम यांनी बंदीशही यमनमध्येच बांधलीय़. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस़ ‘क्षितीजावरती़’ इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा करॅक्टरच बदललाय असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे ‘क्षितीज’ ह्या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्यायच नाही हे त्वरीत पटते, पुरियाचं होणारं दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळं सुरेख जुळून आलंय़. प्रसिध्द कवी अनिल कांबळे यांच्या

 

‘जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू /

ऐनवेळी अशी काय करतेस’

 

तू ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे़. यमन मधली अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना, खेमट्याच्या अंगानं लागणारा दादर्‍याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही अशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे़. सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास ‘ऐनवेळी अशी काय’ ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमुहरचना म्हणावयास हरकत नाही. ‘सामग, सामगधप’ वगैरे अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे़. ‘तुझ्या नभाला गडे किनारे’ ही सुध्दा यमनमधलीच श्रवणीय रचना आहे. यमन ह्या एकाच रागातल्या चारी रचना त्यांनी मला एकापाठोपाठ ऐकविल्या. पण खासियत अशी की त्यांत तोचतोचपणा नाही़. स्वररचनेची पठडी ठरीव स्वरुपाची नाही. त्यात आहे पूर्णतः वेगळेपण, हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचं वैशिष्ट मानलं जातं. सुगम संगीतात आकर्षक मुखड्याला-धृवपदाला खास महत्व आहे़.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात़. त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असतं ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला. कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे़. मुखड्याच्या चालीला अनुरूप अशी किंबहुना त्याचं सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करुन अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते़. तसे नसेल तर पूर्ण चालच फसते़ अनेक संगीत रचनामध्ये हे दोष दिसतात़. संगीतकाराला इथं आपली प्रज्ञा ओतावी लागते़. सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणार्‍या आहेत म्हणूनच त्या भावतात़. कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते़. कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणं म्हणजे हळूच मधाचं बोट चाखण्यासारखं गोड मधुर असतं.अर्थातच शेवटच कडवं हे सर्वार्थानं हायलाईट असतं. तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात़. एकाच यमनाची ही विविध रुपे, विविध रंग, त्याचा वेगवेगळा ढंग. आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असं आमच्या भोवती टाकलं की आम्ही स्वतः जाणकार रसिक असूनही फसलो़. मग लक्षात आलं की ही यमनी फसवणूक होती पण ही फसवणूक गोड होती़. निर्भेळ होती.")

 

      यमन हा अभंगापासून तॊ लावणीपर्यंत सर्व प्रकारात रंगतो म्हणा किंवा रंगवितो म्हणा !मराठीमध्ये जवळ-जवळ सर्वच संगीतकारांनी यात स्वररचना केली आहे.त्याची यादी करतो म्हटले तर तो एक मोठा लेखच होईल.तरी पण काहींचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही.’धुंदी कळ्यांना...’, ’का रे दुरावा...’, ’पराधीन आहे जगती...’, ’तोच चंद्रमा...’, ’पिकल्या पानाचा देठ की ग हिरवा...’, ’कबीराचे शेले विणतो...’, ’सुखकर्ता दुखहर्ता...(आरती)’, ’जिथे सागरा धरणी मिळते...’, ’जीवनात ही घडी...’, ’शुक्र तारा...’, ’तिन्ही सांजा सखे मिळाल्या...’, सोबतच अनेक नाट्यगीतेही यात आहेत.त्यातील अभिषेकी बुवांनी मत्स्यगंधा नाटकाकरीता रचलेले स्वरशिल्प ’देवाघरचे ज्ञात कुणाला...’ हे मला अतिशय भावले.गायक आहेत रामदास कामत. हिंदी चित्रपटसृष्टीतही यमन ने धुमाकूळ घातला आहे.सैगलच्या ’मैं क्या जानू क्या जानू रे...’ पासून तर आता-आताच्या ’तुम दिल की धडकन हो....’पर्यंत...यातील उल्लेखनीय गाणी आहेत...’मन रे तू काहे न धीर धरे...’, ’जिया ले गयो...’, ’जा रे बदरा बैरी जा...’, ’वो हँसके मिले हमको...’, ’पान खाये सैयाँ...’, ’इस मोडपर आते है...’, ’चंदन सा बदन...’, ’आँसू भरी है ...’, ’जब दीप जले आना...’ अशी किती गाणी घ्यावीत...............? उर्दू ग़ज़ल मध्ये ’रंजिश ही सही....’ही ग़ज़ल म्हणजे मैलाचा दगड आहे.सोबतच ’वो मुझसे हुये...’, ’शाम-ए-फ़िराक...’ ह्या गझला आणि ’आज जाने की ज़िद ना करो...’ ही फ़रीदा खानम यांनी गायिलेली रचना म्हणजेही कळसच आहे.यात ’मरीज़े मुहब्बत...’, ’दिलवालों क्या देख रहे हो ह्या ग़ुलामलीच्या गझला आपला वेगळा रंग दाखवितात.’क्युँ मुझे मौत के पैग़ाम दिए जाते है...’ (शोभा गुर्टू), ’तुम आए हो तो शबे इंतज़ार गुजरी है...’ (इकबाल बानो), ’आपका इंतज़ार कौन करे...’(शुमोना राय) या गझलाही अतिशय श्रवणीय आहेत. उर्दू गझल गायनातील मेहदी हसन साहेबांनी गायिलेली अहमद फ़राज़ यांची ’रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...’ या गझलने लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढले.(खरे म्हणजे हे ’मोहब्बत’ या १९७२ सालच्या पाकिस्तानी सिनेमातील गाणे (ग़ज़ल) असून,याचे संगीतकार निसार बज़्मी हे आहेत.पण खाँ साहेबांनी महफिलीत गाऊन या रचनेचे सोने केले.)या गझल सोबतच यमन रागाचीही लोकप्रियता (गझल गायनाचे संदर्भात) परमावधीला पोहचली.मूलतःच गोड असलेल्या या रागात फ़राज़ साहेबांचे शब्द, खाँ साहेबांचा जव्हारदार मधाळ आवाज आणि शब्दांना साजेशी विनवणी करणारी बंदिश असा उच्चतम कोटीचा संगम यात झालेला दिसून येतो....


अशीच विनवणी मी स्वरबद्ध केलेल्या #तुझ्यासाठीच_मी या अलबम मधील 'तुझ्यासाठीच मी...'या गझलमध्ये आपणास दिसून येईल.(अर्थात खरे परीक्षक आपण आहात) असा हा यमन...

ऐका तर मग...फक्त मध्य आणि मंद्र सप्तकातील ही बंदिश, वैशाली माडेच्या आवाजात..

               तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते

              तुझ्यासाठीच स्वप्नांचे दिवे मी लावले होते

                                              -दिलीप पांढरपट्टे

 

Tuesday, October 6, 2020

सूरों का साधक....चंद्रशेखर बाजोरिया

.         मित्रता कब होंगी । कैसे होंगी, जीवन के किस मोड पर होगी, कहा नही जा सकता । कभी कभी कोई व्यक्ति आपके जीवन मे इस तरह प्रवेश कर जाता है कि वह तुम्हारे जीवन का अभिन्न अंग बन जाता है ।
 इसी तरह एक मुलाकात हुई सुधाकर कदम से । भाग्योदय ऑर्केस्ट्रा में अकॉर्डीअन बजाते देखा था, बादमे मुलाकात हुई एक शास्त्रीय संगीत सभा में । मालुम पडा इनका रुझान अब लाईट म्युझिक से शास्त्रीय संगीत की ओर मुड गया है और अपने शास्त्रीय संगीत मे संगीत विशारद की उपाधी भी प्राप्त कर ली है ।
 यही से हमारी मैत्री बढने लगी । साथ में जुड गये स्व़ श्री शेखर सरोदे, प्रा़.विनायक भीसे । संगीत की बैठके होने लगी । इन्ही बैठकों मे मुझे सुधाकर के बारे में काफी कुछ जानने को मिला ।
 सुधाकर कभी दकीयानुसी विचारो का नही रहा । उसने शास्त्रीय संगीत की तपस्या की तो लाईट म्युझीक को पूजा भी है । गायन मे महारथ हासील करने की कोशीश की तो वाद्य यंत्रों से खेला भी है । खुद के संगीत के रीयाज के साथ दूसरो को भी संगीत की शिक्षा देने की कोशिश की है ।
 इस संगीत का सफर तय करने में उसे कितनी मुश्कीलों का सामना करना पडा मै जानता हूँ।
 चांदेकर परिवार की कन्या से प्रेम विवाह करने के बाद पारीवारिक जीम्मेवारी, आर्थिक समस्या सामने खडी थी । यवतमाल में कहीं नौकरी उपलब्ध न थी अंत मे समझोता कर आर्णी जैसे छोटे से गॉंव मे संगीत शिक्षक की नौकरी कर ली ।
 आर्णी में कोई संगीत का मार्गदर्शक नही । कुछ करने की तमन्ना मनमें है । पर किसी का प्रोत्साहन नही । आजकल कला के क्षेत्र में भी उँचाइयों को छूने के लिये किंग मेकर की जरुरत होती है । वो भी उपलब्ध नही ।
 अंत में एकलव्य का ही सिध्दांत अपनाकर पंडीत जसराजजी को प्रेरणा स्त्रोत बनाकर आर्णी मे ही रियाज शुरु किया । उस वक्त गजल का दौर शुरु हो चुका था । गुलाम अली, मेहदी हसन, पंकज उधास, अनुप जलोटा इनका नाम शीर्षस्थ पर चल रहा था । उसी वक्त सुधाकर कदम मराठी के शीर्षस्थ कवि श्री सुरेशजी भट के संपर्क में आये और उनकी लिखी हुई मराठी की गजलो को संगीत में ढाला ।
 मुझे याद है वह रात जब शायद पहली बार सुधाकर कदम ने यवतमाल जूनिअर चेंबर्स के तत्वावधान में मराठी के गजलों का कार्यक्रम स्थानीय टाऊन हॉल मे दिया था । रसिक वृंद झूम उठे थे । शायद यवतमाल के रसिको को पहली बार आभास हुआ कि यवतमाल में एक इतना अच्छा कलाकार है । उसी वर्ष इन्हे भारतीय जुनिअर चेंबर ने महाराष्ट्र के दस सर्वोत्कृष्ट युवकों में से एक का पुरस्कार दिया । संपूर्ण महाराष्ट्र में सुधाकर कदम के मराठी गजलों के कार्यक्रम हुए, सराहें गये ।
 इन्ही व्यस्तताओं के बावजुद आर्णी में गांधर्व संगीत विद्यालय की स्थापना की । कई विद्यार्थीयों को संगीत की शिक्षा दी । आर्णी मे हर वर्ष कलाकारों के लिये प्रतियोगिता आयोजीत की उन्हे पुरस्कृत किया ।
 एक खास बात देखी, वो सिर्फ खुद के लिये नही जीता बल्की संगीत के लिये जीता है, सूरों के लिए जीता है ।

अध्यक्ष, 
यवतमाल कॉटन सिटी जेसीज.
१९८३



 

Tuesday, September 15, 2020

संसार - सुलभा सुधाकर


          कलाकाराशी संसार म्हणजे तारेवरची कसरत असते.त्यातही तो जर स्वाभिमानी,परखड बोलणारा,सच्चा मनाचा,स्वावलंबी, कोणासमोरही हात न पसरणार,न वाकणारा ,भल्यांना लंगोटी देऊन नाठाळाना झोडणारा असेल तर सुळावरची पोळी असते.पण मी डोळसपणे हा सूळ  स्वीकारला.अनेक वर्षे अनेक प्रकारच्या वेदना सहन करत आज साधी पोळी नाही तर पुरणाची पोळी ,ती ही वाटीभर तुपाशी खात आहे.ज्या दिवशी हळव्या पण कणखर,जिद्दी सुधाकरशी लग्न केले त्या दिवसापासून त्याची प्रतिभा कशी फुलेल याचाच विचार करत करत त्याला जमेल तशी साथ देत गेले.

           सुधाकरच्या मराठी गझल गायकीबद्दल स्व.सुरेश भटांनी त्याला १९८१ मध्ये '#महाराष्ट्राचे_मराठी_मेहदी_हसन' ही उपाधी देऊन गौरविले.गझल गायकी हा नवा प्रकार मराठीमध्ये आणल्याबद्दल महाराष्ट्र जेसीजने १९८३ मध्ये '#Out_standing_young_person' हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गोंदिया येथे मा. छेडीलालजी गुप्ता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सुधाकरला दिलेल्या माणपत्रात '#पायोनीअर_ऑफ_मराठी_गझल_गायकी' असा स्पष्ट उल्लेख आहे.कोणी काहीही म्हणोत,पण ह्या दोन्ही उपाध्या मिळण्याअगोदर किमान पाच/सहा वर्षे तरी सुधाकरने मराठी गझल गायकीसाठी मेहनत घेतलीच असेल ना! मधल्या काळात पुण्याला स्थायिक होईपर्यंत काही स्वतःच स्वतःला नावाजणाऱ्या मंडळींनी हे सत्य हेतुपुरस्पर दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला.

           १९८१ मध्ये मी आणि सुधाकर स्व.सुरेश भटांकडे मुक्कामी असताना एक दिवस आजचे नावाजलेले एक गायक हार्मोनियम घेऊन आपल्या चाली ऐकवायला आल्याचे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.याला श्रीमती पुष्पाताई सुरेश भट साक्षीदार आहेत.स्व.भट व सुधाकर पलंगावर बसून त्यांच्या चाली ऐकत होते.नंतर दोघांची चर्चा झाली.त्यात सुधाकरने 'त्या' गायकाबद्दल एका शब्दानेही वाईट शेरा दिला नाही.असा हा सुधाकर.आणि सुधाकरचे कार्य लोकांसमोर येऊ नये म्हणून प्रयत्न करणारा 'तो' गायक.असो.

            हे एवढ्यासाठीच की काही वर्षांपूर्वी फेसबुकवर झालेली चर्चा मी वाचली.त्यात मराठी गझल गायकीच्या सुरवातीची काहीच माहिती नसलेल्या एका नवोदिताची प्रतिक्रिया होती.'माझा जन्मच तेव्हा झाला नव्हता.' असे होते तर मग चर्चेत सहभागी कसा झालास बाबा! अशा कॉमेंट बघून हसावे की रडावे कळत नव्हते.भटांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाचा खऱ्या अर्थाने दुरुपयोग जर कोणी केला असेल तर तो याच लोकांनी केला.पण सुधाकरचे काम खुद्द भटांसोबतचे आणि भटांच्या हयातीत केलेले असल्यामुळे  कोणी कितीही नाकारले तरी सुधाकरच्या नावाशिवाय मराठी गझल गायकीचा इतिहास पुढे जाऊच शकत नाही.

          सुधाकर नुसता गझल गायक नाही,तर तो चांगला संगीतकार आहे.सरोद,हार्मोनियम,तबला,मेंडोलीन, अकॉर्डियन या वाद्यांवर त्याचे प्रभुत्व आहे.त्याच्यात एक चांगला लेखक,कवी पण दडलेला आहे.आर्णीला त्याने समाजकारण,राजकारणही केले.तो एक चांगला पती व बापही आहे.संगीताचे शिक्षण घेताना त्याला आलेल्या खडतर अनुभवामुळे त्याने त्याच्याकडे संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बापाच्या मायेने वागविले.त्यामुळे आमचे घर म्हणजे एक मोठे कुटुंबच झाले होते.सोबतच दर वर्षी एक-दोन विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याचा वसा पुण्याला येईपर्यंत सातत्याने तीस वर्षे चालविला. ही सर्कस चालविताना मला खूप कसरत करावी लागायची.पण त्यात खूप आनंद मिळायचा.

            माझी सुधाकरशी ओळख झाल्यानंतर काही वर्षे आम्ही प्रेमात पडलो हेच कळले नाही.माझी आई शिक्षिका होती.सुंदर गायची.तिच्या शाळेत तिने त्या वेळच्या अत्यंत लोकप्रिय 'मी डोलकर' या गाण्यावर नृत्य बसविले होते.पण गायक आणि मधले म्युझिक पिसेस वाजवणारे त्यावेळी यवतमाळात कोणीच नसल्यामुळे सुधाकरच्या ऑर्केस्ट्राच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या आमच्या मैत्रिणीच्या टोळक्याने आईला सुधाकरचे नाव सुचवले.सुधाकर त्यावेळी कॉलेज करून ऑर्केस्ट्रासोबतच शाळा-शाळातील अशा प्रकारची कामे करून किंवा पार्ट टाइम जॉब करून स्वतःचा खर्च चालवायचा.या निमित्ताने त्याचे आमच्याकडे येणे सुरू झाले.आणि तो घरातील एक सदस्य बनून गेला.

            त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट होती.तरी पण त्याच्या वागण्यात,बोलण्यात,राहण्यात एक वेगळेपणा होता कुठेही लालसा दिसत नव्हती.प्रत्येक ठिकाणी मदतीचा हात पुढे करण्याचा त्यांचा स्वभाव, त्याची दिलदार वृत्ती दाखवून देत होती.अशातच मी एन.सी.सी.त असल्यामुळे कॉलेजतर्फे दार्जिलिंगला होणाऱ्या माउंटेनरिंगच्या कँपसाठी माझी निवड झाली.कँप दोन महिन्यांच्या होता.कँप करीता जाताना तो मला सोडायला बसस्थानकावर आला असता त्याच्या डोळ्यातील भाव मला वेगळा वाटला.

           दार्जिलिंगला पोहोचल्यावर आमचे खडतर ट्रेनिंग सुरू झाले. त्या धबडग्यात दिवस कसा निघून जायचा ते कळत नव्हते.पण मोकळा वेळ मिळाला की सुधाकरचे ते डोळे व हिरमुसलेला चेहरा आठवायचा व खूप काही हरवल्यासारखे वाटायचे. आम्ही एकमेकांना पत्र लिहायचो पण त्यात 'तसा' कुठलाच उल्लेख नसायचा. ती पत्रे वाचली की आजही हसायला येतं. मी पत्रात दार्जिलिंग व तेथील कँपविषयी लिहायचे व सुधाकर यवतमाळचे हाल-अहवाल कळवायचा. कँप संपवून परत आल्याबरोबर मी सरळ सुधाकरला भेटायला त्याच्या घरी गेले.त्याला पाहिल्यावर जे काही वाटले त्यावरून मी त्याच्या प्रेमात पडल्याचे कळले.सुधाकरही बोलत नव्हता. पण त्याचे डोळे बोलत होते. त्याची व्यक्त होण्याची ही नेहमीची पद्धत आहे.आजही डोळ्यावरून,चेहऱ्यावरून त्याच्या अंतर्मनाचा अदमास मला येतो.

              मी ब्राह्मण,सुधाकर कुणबी.आमचा आंतरजातीय विवाह .हा विवाह त्यावेळी खूप गाजला.तारीख होती २१ नोव्हेंबर १९७३.लग्न झाले तेव्हा सुधाकर आपली सगळी स्वप्ने बाजूला ठेऊन इच्छा नसताना पोटाच्या सोईसाठी आर्णी या वीस हजार लोकवस्तीच्या गावात संगीत शिक्षक म्हणून रुजू झाला.पगार फक्त दिडशे रुपये.त्यात घर चालवणे,येणाऱ्या जाणाऱ्यांचे करणे यात खूप ओढाताण  व्हायची.पण त्याची काहीतरी बनण्यासाठी चाललेली मेहनत मला बळ द्यायची.आज ना उद्या या मेहनतीचे फळ मिळणारच याचा मला विश्वास होता.संगीत त्याच्या रोमारोमात भिनले आहे.आजही त्याची सारी धडपड मराठी गझल गायकी लोकप्रिय करण्याकरीताच सुरू आहे.तो ब्राह्मण नसल्यामुळे अनेक वाईट अनुभव त्याच्या वाट्याला आलेत.त्यातच त्याचा स्पष्टवक्तेपणाही त्याला नडतो.घरी आणि दारीही.

                 आर्णीला आल्यावर त्याचा ऑर्केस्ट्रा सुटला.पुढे काय करावे हा मोठा प्रश्न त्याच्या समोर होता.काही तरी करावे तर कोणाचे मार्गदर्शन नाही.कोणाचा गंडा बांधावा तर आर्थिक परिस्थिती नाही.त्याला ज्यांच्याकडे संगीताचे पुढील शिक्षण घ्यायचे होते ते पं. जसराज,पं. जितेंद्र अभिषेकी ही मंडळी मुंबईला होती.मग सुधाकरने स्वतःच स्वतःचा गुरू बनून एकलव्याप्रमाणे आराधना सुरू केली.त्याला इतर वाद्यांमध्ये गती होती.पण सरोद जास्ती आवडायचे. सरोद शिकायची त्याची तळमळ बघून मी माझ्या बांगड्या विकून सरोद आणायला पैसे दिले.आणि त्याचा बिन गुरूचा,फक्त पुस्तकावरून आणि रेडिओवर सरोद ऐकून रियाज सुरू झाला.तीन वर्षे ढोरमेहनत करून सरोद वादन आत्मसात केले.कार्यक्रमही व्हायला लागले.तरी पण गायन की वादन हा तिढा काही सुटेना.सुरवातीच्या एकल कार्यक्रमात तो सरोद वादन, नाट्यगीत,एखादी उर्दू गझल आणि काही स्वतः स्वरबद्ध केलेल्या रचना सादर करायचा.नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलेल्या अशाच एका कार्यक्रमात सुरेश भटांनी त्याला ऐकले व त्याच्यातील संगीतकार गायकाला हेरले व त्यांच्या काही गझल स्वरबद्ध करण्याकरीता दिल्या.

                  सुधाकरने दिलेल्या चाली सुरेश भटांना आवडल्या.त्यामुळे मराठी गझल गायन की सरोद वादन हा नवा तिढा समोर आला.या द्विधा मनःस्थितीमधून पं. जितेंद्र अभिषेकींनी त्याला बाहेर काढले व मराठी गझल गायकी या नव्या गायन प्रकाराकडे पूर्ण लक्ष द्यावे असे सांगून मार्गदर्शनही केले.या अगोदर छोटा गंधर्वांकडूनही त्याला खूप काही शिकायला मिळाले.सुधाकरचा हार्मोनियमचा हात चांगला असल्यामुळे छोटा गंधर्वांच्या विदर्भातील कार्यक्रमासाठी कासलीकर गुरुजी सुधाकरला त्यांचेसोबत हार्मोनियमच्या साथीला पाठवायचे.त्यांचे मार्गदर्शन आशीर्वाद सुधाकरला लाभले.ही अतिशय मोलाची गोष्ट होती.कारण तो मुंबई-पुण्याला जाऊन या दिग्गजांकडून धडे घेऊ शकत नव्हता.

                हळू हळू जम बसत गेला.मराठी गझल गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले.यासाठी सुरेश भटांसोबत सुधाकरने अतिशय परिश्रम घेतले.हे करताना प्रकृतीकडे हवे तसे लक्ष न दिल्याने नेमके भरात असताना १९८२ मध्ये स्पॉंडीलायसिसचा जोरदार अटॅक आला ट्रक्शन,लाईट,फिजिओथेरपी वगैरेने त्रास कमी झाला.पण सरोदच्या रियाजवर त्याचा परिणाम होऊन अत्यंत आवडीचे असे सरोद वादन त्याला बंद करावे लागले.पण गझल मात्र दवडली नाही.सोबतच इतर अनेक उपद्व्यापांचा धडाका लावला.संगीत विद्यालयाची स्थापना करून १९७३ मध्ये परीक्षा केंद्रही मिळवले.सोबतच अभिनय कला मंडळाची स्थापना करून एकांकिका स्पर्धा,पाठ्यपुस्तकातील कविता स्वरबद्ध करून त्याच्या कॅसेट्स काढणे,जिल्हाभर कविता गायनाची शिबिरे आयोजित करणे,पुण्याच्या गीतमंच विभागासाठी व बालचित्रवाणीसाठी गाणी स्वरबद्ध करणे,पत्रकारिता,राजकारण वगैरे वगैरे...

               'अशी गावी मराठी गझल' हा कार्यक्रम भरात असताना सुरेश भटांच्या गीत-गझलांची रेकॉर्ड निघणार होती.तेव्हा संगीतकार म्हणून सुधाकर ते काम करणार होता.पण कुठे माशी शिंकली कोण जाणे,हे काम दुसऱ्या कोणाकडे गेले.याचा सुधाकरला फार मोठा धक्का बसला.त्यावेळी जर हे काम सुधाकरच्या हातून झाले असते तर आजचे चित्र काही निराळेच असते.याउप्परही त्याने मराठी गझल गायकीलाच प्राधान्य देऊन आपले कार्यक्रम सुरूच ठेवले.यावेळी जर पुन्हा ऑर्केस्ट्रा सुरू केला असता तर खूप पैसा कमवता आला असता.पण सुधाकरने तसे केले नाही.महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही त्याचे कार्यक्रम गाजले.तरी पण स्वभावातील रोखठोकपणा,कोणाही समोर मान न झुकवणे,लाळघोटेपणा वगैरे न जमल्यामुळे तसा तो उपेक्षितच राहिला.तरी पण मित्र मंडळीने 'भरारी' नामक महाराष्ट्रातील पहिली कॅसेट काढली .विदर्भात तिला चांगला प्रतिसाद मिळाला.सुधाकरची घोडदौड पुणे-मुंबईतील कार्यक्रमानंतरही सुरूच राहिली.या पाच-सात वर्षात सुरेश भट आमच्या कुटुंबातील एक झाले होते.आर्णीला सतत येणेजाने सुरू असायचे.माझ्या चंद्रमौळी घरात त्यांनी अनेक सुंदर गझला लिहिल्या.कवी व संगीतकार एकत्र आल्यावर जे काही वातावरण तयार व्हायचे ते भारावून टाकणारे असायचे. या वातावरणामुळे भटांचे खाण्याचे चोचले पुरवताना मला पण आनंद मिळायचा.

                दोघांनी जागवलेल्या अनेक रात्री मला आठवतात.आर्णीकरांसाठी तर ही पर्वणीच असायची.मुलाच्या संदर्भातील सल ते माझ्याजवळ बोलून दाखवायचे.त्यांच्या या हळव्या काळात सुधाकरने व मी त्यांना खूप सांभाळून घेतले.बरेचसे निर्णय ते सुधाकरला विचारून घ्यायचे.नागपुरात कंटाळवाणे झाले की आर्णीला निघून यायचे. मग मैफली रंगायच्या. शंकर बडे,श्रीकृष्ण राऊत,नारायण कुलकर्णी कवठेकर,योगेश बऱ्हाणपूरे,वामन तेलंग,श्रद्धा पराते, जगन वंजारी,कलीम खान वगैरे साहित्यिक ,असहित्यिक व आर्णीची रसिक मंडळी याची साक्षीदार आहे.

               गझल हा दोघांमधील समान दुवा असल्यामुळे दोघांनीही गझलचे कार्यक्रम करताना पैशाला दुय्यम स्थान दिले.थोडक्यात काय तर'लष्कराची सेवा'.या सगळ्याला कोणाची दृष्ट लागली कोण जाणे. हा आनंद मेळावा १९९५ नंतर हळूहळू बंद झाला.भटांचे आर्णीला येणे बंद झाले.तरी सुधाकर शेवटपर्यंत त्यांना भेटायला जायचा. सुरेश भटांच्या मृत्यूनंतर त्याने लिहिलेल्या 'मराठी गझलचा आधारवड कोसळला' या लेखावरून सुधाकरच्या हळव्या मनाची आणि भटांवरील प्रेमाची कल्पना येते.

            आर्णीला नोकरी सुरू झाल्याबरोबर प्रचंड ऊर्जा असलेल्या सुधाकरने अनेक उपद्व्याप सुरू केले.शिवजयंती उत्सव,अभिनय कला मंडळ,स्वरगंगा या संस्थांची स्थापना करून परिसर नाट्य-संगीतमय करून टाकला.भरीस भर म्हणून पत्रकारिता सुरू केली.तालुका पत्रकार संघाची स्थापना करून त्याचे अध्यक्षपद,तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पदही भूषविले.या सर्व उपक्रमांमुळे सकाळी चहाचे भांडे चुलीवर चढले की,सायंकाळीच उतरायचे.त्यातच शिवसेनेचे काम सुरू केल्यावर तर कार्यकर्त्यांचा राबता अधिकच वाढला. शिवसेनेचे काम करताना त्याच्यावर अनेक केसेस लागल्या. पोलिसांचा ससेमिरा इतका लागला की,त्याला तडीपार व्हावे लागले.पण जन्मजात निडर असलेल्या वृत्तीमुळे सुधाकरमध्ये फारसा फरक पडला नाही.संगीत क्षेत्रातील असल्यामुळे त्याचे सर्व स्तरातील लोकांशी तसेच राजकीय मंडळींशी सुद्धा अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.पण राजकारण म्हटले की हे संबंध वगैरे बाजूला राहतात.त्यातच युतीचे राज्य यायच्या अगोदरच्या निवडणुकीत सुधाकरला शिवसेनेच्या उमेदवारीबद्दल विचारणा झाली होती.पण मी त्याला कठोरपणे विरोध केला.कारण राजकारणात टिकणारी ही वल्ली नाही ,हे मला चांगलेच माहीत होते.माझा टोकाचा विरोध पाहून त्याने श्रीकांत मुनगीनवार या विद्यार्थ्याला उमेदवारी देऊन निवडून आणले व विदर्भाला शिवसेनेचा पहिलावहिला आमदार दिला.पण या कामाची दखल ना शिवसेनेने घेतली ना आमदार झालेल्या विद्यार्थ्याने.त्यामुळे पुढील निवडणुकीत संजय देशमुख या बंडखोर उमेदवाराला सहकार्य केले.तो फक्त १४४ मतांनी विजयी झाला.या कालावधीत त्याला खूप मनस्ताप भोगावा लागला.संगीत दुय्यम झाले.संगीत विद्यालय हा त्याचा हलवा कोपरा होता. त्यामुळे सारे सहन करून विद्यालयाचा डोलारा कायम ठेवला.दर वर्षी वार्षीकोत्सव आयोजित करून गझल गायन स्पर्धा,कलावन्त मेळावे,आकाशवाणी सांस्कृतिक संध्या,कविसंमेलने हे उपक्रम राबवत राहिला.

             सुधाकरच्या या अनेक उपद्व्यापामुळे घरात सदा पैशांची चणचण असायची.त्यातच मुले मोठी झालेली.त्यांचे शिक्षण,घरासाठी घेतलेले कर्ज...म्हणून मी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली.घर,शाळा, मुले आणि सुधाकरबाळ यांना सांभाळताना जीव मेटाकुटीस यायचा.पण माझ्या संगीताच्या आवडीमुळे व सुधाकरच्या प्रेमापोटी सारे सहन केले.याच दरम्यान शाळेत मुख्याध्यापकाशी व मॅनेजमेंटशीही खटके उडत गेले.तसेही सुधाकर आर्णीला कंटाळलाच होता.मुख्याध्यापक बनलेल्या ज्या व्यक्तीसाठी सुधाकरने अनेक प्रसंगात जिवाची बाजी लावून वाचवले, तोच जिवावर उठल्यासारखा वागायला लागल्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेऊन आम्ही पुण्याला स्थायिक झालो आणि सुधाकरचे पुणे किंवा मुंबईत स्थायिक होण्याचे स्वप्न वयाच्या पन्नाशीनंतर का होईना पूर्ण झाले.

              ज्या व्यक्तीजवळ स्वतःचे असे काहीच नव्हते त्या व्यक्तीबरोबर लग्न करून 'संसार' तडीस नेणे हा तोंडाचा खेळ नाही.पण माझ्यातला 'मी' माझ्याजवळ ठेवून जे काही करायचे ते सुधाकरसाठीच असे ठरवल्यामुळे संसार सुखाचा झाला.सुधाकरला पुण्यात '#गझलगंधर्व' ही उपाधी मिळणे हा माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण होता.एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला सामान्य मुलगा मोळ्या विकून,शेणाच्या गोवऱ्या जमा करून,दर शनिवारी यवतमाळच्या संकटमोचन मारुतीसमोर रुईच्या फुलाचे हार विकून,शाळाशाळांमधून गाणी बसवून व कुठे तरी पार्ट टाईम  जॉब करून आपला खर्च भागवणार सुधाकर स्वबळावर येथपर्यंत पोहोचणे स्वप्नवत नाही काय?

               आज मी अत्यंत सुखात आहे.पुण्यात टू बीएचके फ्लॅट आहे,कार आहे.सुधाकरला मनासारखे (आतापर्यंत चारअल्बमचे काम केले,दोनचे सुरू आहे.)काम मिळते आहे.यापेक्षा मावळतीच्या वयात आणखी काय हवे?


"चकव्यातून फिरतो मौनी" मधून....

Saturday, September 12, 2020


 प्रत्येक रसिक चाहत्यापर्यंत "चकव्यातून फिरतो मौनी" हा डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित सन्मानग्रंथ पोहोचलाच असेल असे नाही.काही रसिकांनी मागणी केली पण आवृत्ती संपत आल्यामुळे ते पण शक्य नव्हते.म्हणून हे पेज तयार केले आहे.यात सन्मानग्रंथातील सर्व लेख रसिकांना वाचावयास मिळतील.तरी या पेजला अवश्य भेट देऊन लेखांचा आस्वाद घेत जावा,ही विनंती.

लिंक...

https://www.facebook.com/चकव्यातून-फिरतो-मौनी-101099181746471/

Thursday, July 2, 2020

.                      #एक_कलंदर_कलावंत
                 
          खरे म्हणजे या माणसाबद्दल दोन चार शब्द लिहिणे तेही माझ्यासारख्याने,तसे ऐपतीबाहेरचे काम आहे.तरी पण या माणसाबद्दल माझ्या मनात जो आदर, जिव्हाळा,आपुलकी आहे;ती मला ऐपतीबाहेर काम केल्याशिवाय स्वस्थ बसू देणार नाही. याची जाणीव होती  म्हणून गांधर्व संगीत विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्य हा प्रयत्न! माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल काही लिहितो तेव्हा लिहिणाऱ्याचे त्या व्यक्तीसोबत निश्चितच काही तरी स्नेहबंध असतात,नाते असते?यापैकी काहीच नसेल तर किमान शत्रुत्व तरी असते आणि यापैकीच कोणत्या तरी कारणामुळे आपण आपल्या भावना शब्दरूपात व्यक्त करतो.
              सुधाकर कदम यांच्याशी माझे नाते काय?काय संबंध? खूपदा शोधूनही या प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही.कारण  शालेय जीवनात त्यांचा विद्यार्थी म्हणून आणि सध्या असलेली आदरयुक्त मैत्री,यापैकी नेमका कुठल्या भावनेने त्यांच्याशी बांधला जाऊन कोणत्या भावनेने मी लिहीत आहे,याचा उलगडा होणे कठीणच!
तरी पण या व्यक्तीशी  कुठे तरी माझ्या मनाच्या तारा जुळल्या आहेत एवढे मात्र निश्चित.मी जेव्हा पाचव्या इयत्तेमध्ये आर्णीला शिकायला आलो त्याच वर्षी सुधाकर कदम हे संगीत शिक्षक म्हणूनआमच्या शाळेत रुजू झाले.स्वभावाने थोडे रागीट वाटणाऱ्या (असणाऱ्या) कदम सरांनी आमचे विद्यार्थी जीवन सप्तसुरात न्हाऊन काढले.अगोदर बेसूरी वाटणारी  शाळा आणि आम्ही विद्यार्थी सुरात आलो.संगीत शिक्षक म्हणून त्यांच्या कार्याची ही पावतीच नाही का?
               पुढे जसजसा काळ पुढे सरकत गेला,सुधाकर कदमांच्या व्यक्तिमत्वाचा एक एक पैलू उजळत गेला, अनुभवास येऊ लागला.संगीताच्या क्षेत्रात तर त्यांनी आर्णीसारखे खेडेवजा गाव प्रसिद्ध केलेच,पण त्याचबरोबर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी करून आम्हा तरुणांना एक दिशा दिली.अनेक संस्था स्थापन केल्या.अनेक उपक्रम राबविले आणि आजही राबवित आहेत.आम्हा आर्णीकरांना संगीत,नाट्य,साहित्य या अभिजात कलांचा कलांच्या रसास्वादाची जाण करून दिली.नाटक,संगीत,व्याख्यान,कविसम्मेलनं कशी पाहावी,कशी ऐकावी याचे भान करून दिले.एवढेच नव्हे तर आर्णीसारख्या छोट्याशा गावातील कलाकारांचे चेहरे त्यांच्या अविरत अविश्रांत परिश्रमामुळे मुंबई दूरदर्शनवर झळकलेले आर्णीकरांना पाहता आले.
                मी ज्या खेड्यात राहतो त्या काठोडा गावी प्रसिद्ध गझलकार कविश्रेष्ठ सुरेश भट,प्रसिद्ध तबला वादक विठ्ठलराव क्षीरसागर (पुणे),बासरी वादक स्व.दत्ता चौगुले (वसमत),पुणे आकाशवाणीचे सारंगीवादक पैगंबरवासी लतीफ अहमद खान,कवी लक्ष्मीकांत तांबोळी (देगलूर),पं. जितेंद्र अभिषेकींचे पट्टशिष्य राजा काळे यांच्यासारखे थोर कलावंत,साहित्यिक केवळ सुधाकर कदमांमुळे आमच्याकडे येऊन गेले.माहुरे कुटुंबाला संगीत आणि सूर यांचा अगदी जवळून परिचय करून दिला.काठोड्यात जमलेल्या त्यांच्या मैफिलींनी व त्यामुळे घडलेल्या सहवासामुळे आमचे गळे जरी तयार झाले नाही तरी कसं मात्र उत्तम प्रकारे तयार होऊन कानसेन या संज्ञेस पात्र झालो एवढे मात्र निश्चित.
              मराठी गझलला योग्य प्रकारच्या बंदिशी बांधून मराठी गझल,गझलसारखी सादर करून सन्मानाने श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचे फार मोठे कार्य त्यांनी सर्वप्रथम केले.मराठी गझल गायनाच्या क्षेत्रात खरोखरच सर्वश्रेष्ठ असणारा हा कलावंत आजच्या जाहिरात व शोमॅनशीपच्या युगात मागे पडला ही खरी शोकांतिका आहे.मराठी  गझलला त्यांनी दिलेल्या बंदिशी म्हणजे सरस्वतीने त्यांना मुक्तहस्ताने दिलेले दान आहे.सुरेश भटसुद्धा आमच्या समोर हे मान्य करायचे. जवळच्या सुरांची मुक्त उधळण समर्थपणे व मुक्तपणे करूनसुद्धा आमच्या समाजाचा दळभद्रीपणा असा की,ते श्रीमंत स्वर आम्ही वेचून पदरात सामावून घेऊ शकलो नाही.कारण आमचा पदरच तोकडा पडला.त्यांच्या संगीत साधनेला,उपासनेला,मेहनतीला आपण कधीच न्याय देऊ शकलो नाही असे खेदाने म्हणावे लागते.पण आपल्याच मस्तीत जगणाऱ्या सुधाकर कदमांनी कोण न्याय देतो वा देत नाही याची कधीच फिकिर केली नाही.प्रखर स्वाभिमानी,पैसा, नावलौकिक,प्रसिद्धी यासाठी लाळघोटेपणा,चाटूगिरी,चरण छू इत्यादी किळसवाणे प्रकार कधीच केले नाहीत.पण आजच्या जगाचे मुख्य क्वालिफिकेशन तेच असल्यामुळे हा कलावंत लौकिक दृष्ट्या मागे राहिला.त्यामुळेच हा असाधारण व्यक्तिमत्वाचा धनी मात्र कधी कधी एकाकी वाटतो.
                संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या २५/२६ वर्षांपासून पोटतिडकीने कार्यरत असलेले सुधाकर कदम आजही एकाकी वाटतात याचे कारण आपली बहुजन समाजाची साहित्य व संस्कृतीबद्दलची अनासक्ती हेच आहे.पण या ध्येयवेड्या माणसाने या गोष्टीची कधीच दखल घेतली नाही.घेतलेला वसा सोडला नाही."जिसका जितना आचल होता है,उतनीही सौगात उसे मिलती है",असे सांगत सप्तस्वरांच्या सानिध्यात राहणारा, स्वरांच्या अवगुंठानात जगणारा कलंदर आजही झुंजत आहे.पुढेही झुंजत राहणार याची खात्री आहे.
               सध्या आर्णीत सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमांना जो प्रतिसाद मिळत आहे तो पाहून उशिरा का होईना त्यांची मेहनत फळाला येत आहे.त्यांची जिद्द व धडपड एक रूप घेऊन आकाराला येत आहे हे ही नसे थोडके!
               शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,खूप काही सोसूनही त्यांनी स्वतःतला कलावंत जिवंत ठेवून संगीतावरील अपार श्रद्धा जपली.ईश्वर या लढवय्या कलावंतास दीर्घायु-आरोग्य देवो.बस!

-मनोज पाटील माहुरे
मु.काठोडा, ता. आर्णी
जिल्हा यवतमाळ

(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. रौप्यमहोत्सवी स्मरणिका,१९९९ मधून...)




संगीत आणि साहित्य :