गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, October 3, 2022

कोमल हृदयाचा रांगडा कवी...शिवा राऊत


     शिवबा रोडबाजी राउत म्हणजे आमचा शिवा राऊत होय.साधा, भोळा,निरागस शिवा, कसा जगला यापेक्षा त्याने साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा कसा उमटवला हे पाहणे महत्वाचे ठरते. सतत मुशाफिरी करणारा रांगडा शिवा स्वतःकडे जरी दुर्लक्ष करीत होता,तरी कवितेचा बाबतीत मात्र अतिशय हळवा होता. आर्णीला (जि.यवतमाळ) असताना प्रवासात जर कविता सुचली तर, सरळ आपल्या पायजाम्यावर लिहायचा.नंतर स्टँडवरून सरळ घरी माझ्याकडे येऊन त्याची एक वही होती,त्यात लिहून ठेवायचा.(ती वही मी जपून ठेवली आहे.)
      कविता सुचणे व पाडणे यात खूप फरक आहे.शिवाने कविता कधीच पाडली नाही.ती आपसूकच आलेली असायची.

अंगांगी कृष्णमिठीने
जन्माचे देऊळ सजले
गोपुरे रचावी त्याचा
हा अक्षर उत्सव चाले

मराठी कवितेला आपला वेगळा बाज देणारा शिवा सतत दुःख झेलत जगला.वेदनांच्या अंतरद्वंदात फसलेला हा विदेही कवी सध्याच्या चकचकीत जगात

मी तो या मातीची
उन्ह विराणी वो
अभंगाला टाहो
वादळाचा...

म्हणत उपेक्षित जीवन जगला.तरी शब्दकळा मात्र त्याची म्हणजे फक्त त्याचीच होती.

सायीच्या सुईने 
काढलास काटा
डोळे पाणवठा
पुनवेचा...

अशा आतडे सोलून काढणाऱ्या ओळी अभंग रूपाने इतक्या ताकदीने मांडणारा शिवा त्या काळातील एकमेव होता असे म्हटले तरी चालेल.
      यवतमाळ जिल्ह्यातील वेणी नावाच्या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या शिवा खेड्यातच वाढला.मोठा झाला व खेड्यातच संपला.त्याच्या कल्पनाशक्तीची भरारी पाहिल्यावर त्याने हे सगळे कोठून मिळविले हा प्रश्न आम्हाला नेहमीच पडायचा.यावर त्याला छेडले असता तो ही समर्पक उत्तर देऊ शकत नसे.कारण अंतर्मनात उफाळलेल्या कल्पनांना शब्द कसे दिल्या जातात हे त्यालाही कळत नव्हते, नसावे. वृत्त्ताकरिता मात्रा मोजायची त्याला कधी गरजच पडत नव्हती. जे काही यायचे ते मुळातच रेखीव,बांधीव असायचे.

स्वप्न प्रहरी धुकाळ धूसर डोंगर पसरण
जशी दुरातुन दिठीत आली भिजली गवळण
अल्याड डोंगर पल्याड गंगा
मधि मारोती गावधुरंधर
उतार भांगातुन कौलाच्या
उन्हे सांडती मोत्याचा चुर
या पूनव पहाटे आला
पाऊस कशाला बाई
ओलेसे अंगण झाले
वाऱ्याला नाचण घाई

अशी अनेक उदाहरणे देता येतील.

      एकदा असेच शिवा म्हणाला "दादासाहेब (तो मला दादा म्हणायचा) तुम्ही आकाशवाणीवर माझ्या कविता गात नाही याचे कारण काय?"
मी म्हणालो, "तुझ्या कविता समजायला जरा कठीण असतात,त्यामुळे लोकांना त्या आवडतील की नाही या भीतीपोटी मी गात नाही."
त्यावेळी शिवा काहीच बोलला नाही. ४/५ दिवसांनी मात्र माहूरच्या रेणुकादेवीवरील एक अप्रतिम रचना  मला आणून दिली व काही न बोलता निघून गेला.मी बघतच राहिलो.ती रचना होती...

घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली
उदे उदे जगदंबे गे रेणुके माऊली...

      माझ्या डोळ्यात खळकन पाणी आलं! ताबडतोब त्याच मूडमध्ये हार्मोनियम घेऊन बसलो पण योग्य अशी चाल काही सुचेना.असाच एक महिना निघून गेला.या एक महिन्यात शिवाने अवाक्षराने सुद्धा मला याबद्दल छेडले नाही.एक दिवस अचानक शिवरंजनीच्या स्वरांनी स्वतःहून या कवितेला सजवलं व मी आकाशवाणीवर (नागपूर) गायिलो.प्रसारणानंतरचा शिवाचा आनंद पाहून मला गहिवरून आले.अशा लहान सहान बाबींनी हरखून जाणारा शिवा एखाद्या निरागस बालकासारखा दिसायचा.
     लग्न झाल्यावरही कौटुंबिक पाश त्याला बांधून ठेवू शकले नाही.या मोहमयी दुनियेत त्याला फक्त एकाच गोष्टीचा मोह होता...तो कवितेचा.त्यांचेकडे बघताना मला का कोण जाणे गाडगे बाबांची आठवण व्हायची.तसे दोघांमध्ये काहीच साम्य नाही.पण मला मात्र वाटायचे...
कदाचित निरागसता व चेहरेपट्टीमुळे असू शकते.गाडगे बाबांनी कशाचाही मोह न करता समाजातील अंधश्रद्धेची जळमटं दूर करण्याचा प्रयत्न करून जनता जनार्दनची सेवा केली.तर शिवाने मोह मायेच्या पल्याड जाऊन साहित्य सेवेत स्वतः ला समर्पित केले.

किती आवर्तने एका समर्पणासाठी
आक्रंदने अधांतरी अंधार हाकाटी
भुकेमुळे ओठ ऊर अपंग पाचोळा
उभा जीव मायपाश देह लोळा गोळा

       अभंग लिहिणारा शिवा आतल्या आत दुभंगत राहिला.हा दुभंग सांध होणे   त्याला शेवटपर्यंत जमले नाही.सध्याच्या जगातील व्यवहार वाद त्याला कळला नाही.प्रसिद्धीसाठी कराव्या लागणाऱ्या लटपटी खटपटी त्याला जमल्या नाही.तो त्याचा पिंड ही नव्हता.खरे म्हणजे त्याच्या कविताच इतक्या जबरदस्त होत्या की,प्रसिद्धी त्याला शोधत यायची.नागपूरच्या तरुण भारत या वर्तमानपत्रातून वामन तेलंग यांनी शिवाला अक्षरशः उचलले व लोकांपर्यंत पोहचवले.आपल्या कविता,कथा छापून याव्या म्हणून नाना प्रकार करणाऱ्या साहित्यिकांच्या जगात शिवासारख्या सरळसोट माणसाच्या कविता कोणत्याही लाग्या बांध्या शिवाय छापून यायला लागल्या यातच शिवाच्या कवितांचे वेगळेपण दडले आहे.या हिऱ्याचे पैलू रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम दै. तरुण भारत ने त्याच्या हयातभर केले.तसेच नागपूर आकाशवाणीच्या बबन नाखले यांनीही शिवाला जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्भेळ प्रयत्न केला. दै.मतदारचे संपादक दिलीप एडतकर यांनीही त्याला व त्याच्यातील कवीला जगवले. 
'सो कोल्ड सोफ़ॅस्टीकेटेड ' लोकांनी त्याचे मद्यपान बंद असेपर्यंतच त्याला थारा दिला.पण मित्र मंडळींनी मात्र त्याला गुण दोषांसह स्वीकारला होता.

नसे आकाशात 
दहा पाच सूर्य
रत्न शिरोधार्य
एखादेच...

      शिवाच्या कवितांवर ग्रेसांप्रमाणे दुर्बोधतेचा शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला.पण रसिकांनी मात्र त्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीचा आणि देखण्या शब्दकळेचा भरपूर आनंद घेतला. यवतमाळ चा कवी गजेश तोंडरे म्हणतो,"शिवाचा अभंग वाचकाला प्रथम मोहवतो,नंतर काळीज सोलून काढतो."

मांडता न आला
दुःखाचा हिशेब
वारंवार नभ
साकळे वो...

नाचो येते मन
हळू गळे पिस
मयुर उदास
आनंदाचा...

     अशा ग्रेसांच्या तोडीच्या या कवीच्या कवितांवर धूळ बसत चालली आहे,ही दुःखाची गोष्ट आहे.आपापला त वा गरम करणाऱ्यांच्या या युगात शिवाचा तवा थंड व्हायला लागला आहे. जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या शिवाला मृत्यूनंतरही न्याय मिळाला नाही.यात नुकसान कोणाचे? शिवाचे की मराठी भाषेचे?
शिवाच्याच शब्दात म्हणावेसे वाटते...

नका करू कधी
मने उकिरडा
अश्वमेध काढा
मानव्याचा...

शिवाने फक्त अभंगच लिहिले असे नाही.

देठ दुखरा हात झाला,चढत गेली बांगडी
काय पुसशी मैत्रिणीला ,गोष्ट थोडी वाकडी
.
बरड भुकेल्या मुखात आचळ पिळून आला पाऊस पान्हा
पुलकित झाले डोंगर काळीज निळा सावळा झेलुन कान्हा
.
नाच पोरी नाच,तुझ्या चा लाला काच
डोळ्यात तिढा पाण्याचा पाढा
गरत्या फिरत्या तालात नाच...
.
विरहात कोंदलेले काळीज मुक्त झाले
आणि मुक्या स्वरांना बिलगून शब्द आले
.
आसवांचे मूळ कोठे ना कळे
आतल्या आतून सारे उन्मळे
.
डोळा घालून घोटाळा केला
उभ्या गावाच्या कानात गेला
पाडपिकल्या देहाची बाई
चव हा सव हुस व होई
कशी सांगू मी चारचौघी ला
.
तू करूणाकर, तूच चराचर, व्यापुनि उरला दशांगुळे
तू अविनाशी, विघ्न विनाशी, तू तेजाची सूर्यकुळे 

      एकाच आवर्तनात न फिरता अशा विविध भाव - भावनांच्या कविता शिवाने लिहिल्या.त्या महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचाव्या तसेच शिवाचा अल्पसा का होईना परिचय व्हावा यासाठी हा अल्पसा प्रयत्न....
कारण

त्यांनी आतड्याचे
सोहळे मांडले
दिले अजिर्णाला
आवतन...

- सुधाकर कदम
--------------------------------------------------------------------------
३०/३२ वर्षांअगोदर स्वरबद्ध केलेली शिवाची 

'घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली
उदे उदे जगदंबे हे रेणुके माऊली...'

गाण्याचा प्रयत्न गोड करून घ्यावा,ही नम्र विनंती...
  • ●Mobile REC...headphone please


 

जो भी तेरी गली मे आता... हनीफ़ साग़र

 


Monday, September 19, 2022

शेतकरी गीत...

 महाराष्ट्रातील संगीत शिक्षक आणि रसिकहो,

१९८५ ते १९९६ या दहा वर्षाच्या कालावधीत संगीतकार (संगीत शिक्षक) म्हणून महाराष्ट्र शासनाच्या 'गीतमंच' (पुणे) विभागासाठी 'हे शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र माऊली' हे महाराष्ट्रगीत (कुसुमाग्रज), 'हे प्रभो जगदीश्वरा (वंदना विटणकर), 'ऊठ ऊठ सह्याद्रे' (विंदा करंदीकर), 'गे मायभू' (सुरेश भट), 'आनंदाने गाऊ या' (राजा मंगळवेढेकर), 'सकाळ' (उ.रा. गिरी), 'बाभळी' (इंदिरा संत) वगैरे कवी/कवयित्रींच्या पाठ्यपुस्तकातील अनेक कविता स्वरबद्ध करून दिल्या होत्या. त्यातील काहींचे ध्वनिमुद्रण शासनाच्याच 'बालचित्रवाणी' या संस्थेमध्ये करण्यात आले.आज त्यापैकीच एक #शेतकरी_गीत 'पीक खुशीत डोलतया भारी,भरला आनंद समद्या शिवारी' हे गीत सादर करीत आहे....(या गीतावर अनेक शाळांमधून नृत्य बसविण्यात आल्याचे अनेक शिक्षकांनी मला कळविले.) येथे फक्त मुखडाच दिला आहे.पूर्ण गीत ऐकण्यासाठी खाली युट्युब लिंक दिली आहे.आवडल्यास अवश्य प्रतिक्रिया द्या.

https://youtu.be/a-wBYxab_0A



Wednesday, August 24, 2022

साठवणीतील आठवण....



  •       सुरेश भट आर्णीला माझेकडे आले की 'रिलॅक्स' व्हायचे.छान मूड लागायचा व गझला लिहायचे... 
२७/१२/१९८० च्या त्यांच्या खालील पत्रावरून कळेलच...
------------------------------------------------------------------
प्रिय सुधाकरराव,
दि.१६ रोजी सायंकाळी साडेचारला सुखरूप पोहोचलो.घरी पोचताच मुलगा परत आल्याचे कळले.फार मोठे दडपण नाहीसे झाले.
मी दि.२१ ला नागपूर सोडत असून चंद्रपूर व मूल 
आटोपून दि.२९ ला परत येईन.
     तुमच्या घरी तुम्ही सर्वांनी  मला फारच आराम दिला.सौ.सुलभाने माझी फारच सेवा केली.असह्य मानसिक दडपण असताना मी कसातरी दिवस काढत होतो.हे दडपण काही अंशी तुमच्या घरी हलके झाले.
जानेवारी महिनाही दौऱ्याचा आहे.२९ व ३० डिसेंबरला नागपूरमध्ये आहे.
     खूप तयारी करा.मुलांना आशीर्वाद.शेखरला (त्या वेळचा तबला वादक) नमस्कार.

तुमचा 
सुरेश भट
---------------
*मानसिक दडपणातून मुक्त झाल्याबरोबर मूल येथे झालेली 'हूल' ही गझल स्वरबद्ध करण्यासाठी पोस्टाने आर्णीला पाठवली होती. ती पण खाली  दिली आहे.




 

Sunday, August 7, 2022

मला आठवेना तुला भेटल्याचे...

 .        लवकरच सर्व ऑडिओ चॅनल्सवर प्रसिद्ध होत असलेल्या #गझल_गुलाबो  या गझलकार रविप्रकाश चापके यांच्या अलबम मधील दुसरी गझल 'मला आठवेना तुला भेटल्याचे'. ही गझल  दहा मात्राच्या #झपताल या तालात आहे. झपताल या तालाचा डौल काही वेगळाच असतो, हा डौल गायत्रीने या गझलमध्ये अतिशय समर्थपणे सांभाळल्याचे आपणास ऐकताना नक्कीच जाणवेल. ऐका तर.....                      

      

गायिका - गायत्री गायकवाड गुल्हाने

सारंगी - उस्ताद लियाकतअली खान

तबला - पांडुरंग पवार

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

संगीत - सुधाकर कदम

संगीत संयोजन - मिलिंद गुणे


●आपल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया अपेक्षित...धन्यवाद!


●headphone please

#gazal #composition #मराठीगझल  #गझल  #music


सुधाकरी तोडी...'गझल गुलाबो'...

.        लवकरच सर्व ऑडिओ चॅनल्सवर प्रसिद्ध होत असलेल्या #गझल_गुलाबो  या गझलकार रविप्रकाश चापके यांच्या अलबम मधील 'माझी गझल गुलाबो' ही गझल मी नव्याने संशोधित केलेल्या सुरावटीत कंपोज केली असून या सुरावटीचे नामकरण बिलासखानी तोडीच्या धर्तीवर '#सुधाकरी_तोडी' असे केले आहे.अशी सुरावट भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अजूनपर्यंत तरी कुठेच उल्लेखलेली नाही.उत्तर प्रदेशातील 'हाथरस' येथून प्रकाशित झालेल्या 'राग-कोष' या ग्रंथात  ५०० रागांची माहिती दिली आहे.पण या सुरावटीचा कुठलाही राग त्यात नाही.एवढेच नव्हे तर पंडित भातखंडे यांच्याही सर्व ग्रंथात असली सुरावट मला आढळली नाही. सुरावट अशी आहे...षड्ज, कोमल रिषभ, कोमल गांधार, पंचम, कोमल निषाद... मध्यम व धैवत वर्ज...
    •       तर,अशा या सुरावटीतील ही गझल संपूर्ण गायकी अंगाने गायक मयूर महाजन यांनी गायिली आहे.तरी आनंद घ्यावा, ही विनंती. (चांगले तुमचे,वांगले आमचे.)

सारंगी - उस्ताद लियाकतअली खान
तबला - पांडुरंग पवार
संगीत संयोजन - मिलिंद गुणे

●आपल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया अपेक्षित...धन्यवाद!

●Headphone please


#gazal #composition #मराठीगझल  #गझल  #music

 

 





संगीत आणि साहित्य :