गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, January 20, 2024

राग रंग (लेखांक ३९) गोरखकल्याण

                             
राग गोरख कल्याण सम सम्वाद द्वितीय रात्रि  ओडव षाडव मान ।
थाट खमाज मानत गुनि जन , गोरख राग बखान ।।

   गोरख कल्याण हा उत्तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधील खमाज थाटोत्पन्न राग आहे. हे नाव उत्तर प्रदेशातील गोरखपुर मधील एका परिसरातील लोक-गीतामधून उत्पन्न झाल्याने पडल्याचे मानल्या जाते. नाव जरी गोरख कल्याण असले तरी यात कल्याण दिसत नसल्यामुळे काही संगीतकार, गायक, संगीततज्ज्ञ
याला फक्त गोरख म्हणणे पसंत करतात.हा एक अतीशय गोड राग आहे. उत्तर भारतीय संगीताच्या नियमानुसार रागातील आरोहावरोहात पाच स्वर आवशयक असतात.पण गोरख कल्याण हा एकमेव असा राग आहे की, ज्यातील आरोहात कोमल निषाद वक्र स्वरूपात येत असल्यामुळे खऱ्या अर्थाने सा रे म ध हे फक्त चारच स्वर लागतात.ही एक मजेशीर बाब आहे.असो!
     या रागात मध्यम स्वर एकदम मजबूत आहे. वादी स्वर षड्ज असून या स्वरासोबत मध्यम स्वर हा एक विश्राम स्वर पण आहे, जो याला 'नारायणी' रागापासून वेगळा करतो. (कर्नाटक संगीतामधून आलेला नारायणी राग खमाजचाच एक प्रकार आहे. गांधार वर्ज करून खमाज गायिला की तो नारायणी होतो.दक्षिणेतील 'हरिकांभोजी' थाट खमाज थाटाप्रमाणे आहे.)/नारायणी रागाचा वादी आणि न्यास स्वर पंचम आहे. गोरख कल्याणमधील मन्द्र सप्तकातील  कोमल निषाद हा विश्राम स्वर आणि रागाचे  प्रमुख लक्षण दाखविणारा स्वर आहे.आरोहातील वर्जित निषाद या रागाला  बागेश्री पासून वेगळा करतो किंवा ठेवतो.तसेच पंचम वर्ज असल्यासारखाच असल्यामुळे दुर्गा रागाला पण दूर ठेवतो.  आरोहात  कोमल निशादाचा अल्प प्रयोग सर्वत्र केल्या जातो. आणि त्यामुळे या रागाचे सौंदर्य अधिक वाढते.तसेच यात पंचम या स्वराचाही अल्प प्रयोग करून रंजकता वाढविण्याचा प्रयत्न  केल्या जातो. अर्थात काही संगीतकार याच्याशी सहमत नाही.या रागाचा विस्तार तीनही सप्तकांमध्ये केल्या जातो.हा विस्तार अतिशय मनमोहक असतो.
     याचा वादी स्वर षड्ज व संवादी स्वर मध्यम आहे. काही विद्वान याचा वादी स्वर मध्यम व संवादी स्वर षड्ज मानतात. पण गानसमय मात्र रात्रीचा दुसरा प्रहर मानतात.म्हणून मग वादी संवादीच्या दृष्टीने उत्तरांग प्रधान आणि गानसमयाच्या दृष्टीने पूर्वांग प्रधान व्हायला हवा.वास्तविकता ही आहे की,गोरख कल्याण पूर्वांग प्रधान राग आहे.त्यामुळे अधिकांश विद्वानांनी षड्ज,मध्यम स्वराला वादी,संवादी स्वर म्हणून मान्यता दिली आहे. रागातील वादी संवादी स्वरांचे स्थान बुद्धिबळातील राजा व वजीरा प्रमाणे असतात,हे सगळ्यांनाच ज्ञात आहे.गोरख कल्याण रागात तर यांचे विशेषच महत्व आहे.व ते सतत जाणवत असते.बाकी सगळे स्वर या दोन स्वरांभोवती अक्षरशः गोंडा घोळताना दिसतात.
आरोह- सा  रे म, ध S (कोमल)नी ध सां
अवरोह- सां ध ध (कोमल)नी ध  म, रे म रे सा (कोमल) ऩी S ध़ सा
पकड- (कोमल) नी ध म, रे म रेसा (कोमल) ऩी S ध़ S सा, रे म
     (एके काळी मुक्त असलेली संगीत कला काही काळानंतर मंदिर, राज-दरबार, सरदार-जागीरदार भवन आणि कोठे वगैरे मधून मुक्त होऊन आकाशवणीमध्ये बंद होते की काय,अशी परिस्थिती असताना पुन्हा संगीत प्रसारक,लेखक, संशोधक,
गायक,वादक यांनी लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.शाळा,महाविद्यालयातून संगीताचे सूर घुमायला लागले.
मोठं-मोठी संमेलने व्हायला लागली.पण गेल्या काही वर्षात शाळांतमधील संगीत विषय बंद करण्याकडे सरकार व संस्थाचालकांचा कल दिसायला लागल्यामुळे शाळेत किलबिलणारे संगीताचे स्वर हळू हळू लोप पावत चालले आहेत. पुढे चालून महाविद्यालयातील संगीत विभाग बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जे संगीत मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकते,ज्या संगीतामुळे सर्व जग एकत्र येऊ शकते त्या संगीत विषयाला सर्वत्र दुय्यम,तिय्यम स्थान दिल्या जायचे.आणि आता तर स्थानच न ठेवण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे.असो..'कालाय तस्मै महा'!)

     उस्ताद सलामत अली नजाकत अली खान,गंगुबाई हंगल, पंडित भीमसेन जोशी,कुमार गंधर्व, पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद गुलाम मुस्तफा खान, उस्ताद उमीद अली खान, पंडित राजन साजन मिश्र,मालिनी राजूरकर, श्रुती सडोलीकर,  विणा सहस्रबुद्धे, पंडित जगदीश प्रसाद, उस्ताद राशिद खान,परवीन सुलताना, देवकी पंडित,अरमान राशिद खान,संजीव अभ्यंकर,सम्राट पंडित (जगदीश प्रसाद पंडितचा मुलगा), पं. कैवल्यकुमार गुरव, जयतीर्थ मेउंडी,  रमाकांत गायकवाड, मौमिता मित्रा, डॉ.प्रवीण गावकर,  झीशान खान, रागेश्री वैरागकर, आस्था-प्रदीप चोप्रा (धृपद),ऋषी-वरुण मिश्रा, सावनी शेंडे, अनुराधा कुबेर, राजेश-रिषभ प्रसन्ना, गुलाम हसन खान, देवर्शी भट्टाचार्य, राजेंद्र कंदलगावकर, अर्चना कान्हेरे, गिरीश गोसावी, डॉ. कल्याणी देशमुख,शुजात अली खान, सुमित्रा गुहा, परितोष पोहनकर, मनाली बोस, अमित कुमार रथ, पं. तुषार दत्त, पं. देवशीष डे, मेघना घेरकर, विनय रामदासन, रोंकिनी गुप्ता.
     पंडित बुधादित्य मुखर्जी (सतार), डॉ.एन. राजम (व्हायोलिन)  उस्ताद शाहीद परवेज खान (सतार), पंडित रोनू मुजुमदार, राकेश चौरसिया (बासरी)-सुनील देव (सतार) जुगलबंदी, राहुल शर्मा (संतूर), पुर्बायन चटर्जी (सतार), सौमिक दत्त (सरोद), संदीप चटर्जी (संतूर), विनय भिडे (गायन)-अनिर्बन दासगुप्ता (सरोद) जुगलबंदी, पं. सुब्रतो डे (सतार), साकेत साहू (व्हायोलिन), फारुख लतीफ (सारंगी), पंडित विश्वमोहन भट (मोहनवीणा)-रोनू मुजुमदार (बासरी) जुगलबंदी, लोकेश आनंद (शहनाई), पं. रबीन घोष (व्हायोलिन), विष्णू देव (बासरी), एस.आकाश (बासरी), नारायण हिरेकोलची (व्हायोलिन), देबस्मिता भट्टाचार्य (सरोद), कमला शंकर (हवाइयन गिटार) या कलाकारांचे गायन/वादन युट्युबवर उपलब्द्ध आहे.
 ● या रागावर आधारित हिंदी,मराठी चित्रपट गीते ,गझला,आणि भक्तीगीते...
'दिल की कश्ती भवर में आयी है' लता. चित्रपट-पालकी, संगीत-नौशाद (१९६७). 
'बा होशो हवास में दिवाना' रफी.चित्रपट-नाईट इन लंडन, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९६७). 
'फिर भोर भई जागा मधूबन' देवकी पंडित. चित्रपट-साज, संगीत-उस्ताद झाकिर हुसैन (२०१०). 
'फिर मुझे दीदा-ए-तर याद आया' लता. संगीत-हृदयनाथ मंगेशकर.
'किसी रंजीश को हवा दो के मै जिंदा हूँ अभी' चित्रा सिंग. 
'दोस्त बन बन के मिले मुझ को मिटाने वाले' जगजीत सिंग.
कबीर भजन- अभिजीत शेनॉय.अल्बम-निनाद (२०१४). 
'सलोनी सांवरी सुरत' गायिका-सुस्मिता दत्त, भजन. 
'मन लोभले मन मोहने' पंडित जितेंद्र अभिषेकी. संगीत-राम फाटक. 
'कंठातच रुतल्या ताना' आशा भोसले. गीत-गंगाधर महांबरे, संगीत-श्रीनिवास खळे (१९९९). 
'स्वप्नात साजणा येशील का' आशा भोसले. चित्रपट-गोंधळात गोंधळ, संगीत-विश्वनाथ मोरे. 
'मोगरा फुलला' लता.संगीत-हृदयनाथ मंगेशकर.
----------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, रविवार दि.१४ जानेवारी २०२४


 

Wednesday, January 10, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २३) ●आर्णीतील उपद्व्याप●


      आर्णीला नोकरी तर मिळाली.पण घर मिळणे कठीण होऊन बसले होते.संगीतवाले म्हणजे बँड, तमाशेवाले असा काहीतर समज आर्णीकरांचा होता.आणि तो संयुक्तिक असावा.कारण त्यावेळी वीस हजार लोकवस्तीच्या या गावात बाराही महिने तमाशाचा फड ठिय्या देऊन असायचा.कशी-बशी एक खोली मिळाली.पण मालक इतका कटकट्या होता की, छोटे अडॅप्टर लावून ट्रान्झिस्टर रेडिओ लावला तर इलेक्ट्रीक बिल वाढते म्हणून ओरडायचा. मी यवतमाळात जरी मस्ताडलेला प्राणी होतो तरी आर्णीत मात्र मास्तर असल्यामुळे गोगलगाय झालो होतो.पहिली दोन वर्ष मला कठीण गेली. पण नंतर लक्षात आले की येथे शेर नाही तर सव्वाशेर झाल्याशिवाय काही आपला निभाव लागणार नाही.म्हणून मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.प्रथम संगीत विद्यालय सुरू केले.नंतर संगीत विद्यालयातर्फे छोटे-मोठे सांगीतिक कार्यक्रम सुरू   केले.संस्थाध्यक्ष चितघनानंदजी भारती नाटकाचे शौकीन होते.त्यांना मला घेऊन संत दामाजी हे नाटक बसवायचे होते.या नाटकात ते बिदरच्या बादशहाचे पात्र करून मला दामाजीपंत बनवणार होते. परिसरात भारतीजींचा रुबाब एखाद्या बादशहापेक्षा कमी नव्हता.पण त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे नाटक काही रंगमंचावर आले नाही.
        छोट्या-मोठ्या सांगीतिक कार्यक्रमामुळे आर्णी व परिसरातील संगीत प्रेमी हळू हळू माझ्याशी जुळायला लागले.तसेही रोजच्या शालेय प्रार्थना,१५ ऑगष्ट,२६ जानेवारीच्या कार्यक्रमातील सहभागामुळे माझ्याबद्दल गावकरी व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळा निर्माण व्हायला लागला होता.शाळेत मी अत्यंत कडक होतो.पण शाळेच्या बाहेर 'मऊ मेणहूनी...'! गावातील काही संगीत प्रेमींच्या सहकार्याने साहित्य,संगीताच्या जोपासनेसाठी 'स्वर-गंगा' ही संस्था स्थापन करून शाळेच्या विज्ञान विभागाच्या हॉल मध्ये कार्यक्रम घेणे सुरू केले.या उपक्रमा करीता शाळेतील संगीत प्रेमी शिक्षकांसोबतच मुख्याध्यापक स्व.शंकरराव बुटले गुरुजींचे मोलाचे सहकार्य मिळत होते.वरील सगळ्यांच्या सहकार्यामुळे अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख स्व.पंडित बाळासाहेब कासलीकर,नागपूर आकाशवाणीचे तार शहनाई वादक स्व.बाबासाहेब देशपांडे, कविवर्य स्व.सुरेश भट,दैनिक तरुण भारतचे संपादक स्व.वामन तेलंग,विदर्भातील प्रसिद्ध कीर्तनकार स्व.आप्पामार्जिने, कवी स्व.शंकर बडे, प्रा.श्रीकृष्ण राऊत,मिराताई ठाकरे,नारायण कुळकर्णी कवठेकर,हास्य सम्राट फेम मिर्झा रफी अहमद बेग,राजा धर्माधिकारी यांचे कार्यक्रम आयोजित करता आले तसेच सिंधुताई सपकाळ, विसुभाऊ बापट यांचे, शाळेसह आर्णीच्या विविध संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित करून आर्थिक मदत मिळवून दिली आहे.या वेळी प्रत्येकाचा मुक्काम माझेकडेच असायचा.सिंधुताई सपकाळ तर अनेकदा आर्णीला येऊन गेल्या.(त्या वेळी त्या सेलिब्रेटी नव्हत्या.) आणि जितके दिवस कार्यक्रम असेल तितके दिवस त्यांचा मुक्काम माझ्याकडे असायच्या. सुलभा सगळ्यांची आवभगत अगदी जिव्हाळ्याने करायची.
        पण गावातील लोकप्रियता,शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन असो की, १५ ऑगस्ट,२६ जानेवारी असो माझा वावर आणि सहभाग लक्षणीय असायचा. त्यामुळे मुख्याध्यापक,
संस्थाध्यक्ष यांची माझ्याशी विशेष जवळीक असायची.या सगळ्यामुळे काही शिक्षकांच्या पोटात दुखायला लागले.व त्यांच्या 'काड्या' सुरू झाल्या.त्यावेळी मी ऑर्केस्ट्रामध्ये असल्यामुळे कार्यक्रम सुरूच असायचे.मी आर्णीला आणि ऑर्केस्ट्रा ग्रुप यवतमाळला.ज्या काळात आजच्यासारखी वाहने नव्हती त्या काळात शाळा करून बाहेरगावचे कार्यक्रम करणे किती जिकरीचे असेल हे वाचक जाणू शकतील.मग कधी कधी सलग कार्यक्रम असले की,शाळा संपल्याबरोबर यवतमाळ गाठणे.तेथून भाड्याच्या बसने कार्यक्रमाचे गाव गाठणे,कार्यक्रम करून वापस यवतमाळ व सकाळची पहिली बस पकडून आर्णी...सरळ शाळेत.जागरणामुळे डोळे लाल असायचे.नेमके हेच पकडून पर्यवेक्षकाने 'कदम सर माझ्याकडे लाल डोळे करून बघतात',अशी तक्रार मुख्याध्यापकांकडे करणे,शाळेपेक्षा कार्यक्रमाकडे त्यांचे लक्ष असते, तासिकांवर उशिरा जातात,शिक्षक कक्षात झोपतात वगैरे वगैरे बालिश तक्रारी सुरू झाल्या.परंतू मुख्याध्यापक (स्व.शंकरराव बुटले) व संस्थाचालक (स्व.राजकमलजी भारती) माझी ससेहोलपट बघत असल्यामुळे त्यांच्याकडे तक्रार गेल्यावर दुर्लक्ष करायचे.
       १९७२ ते २००३ या ३१ वर्षांच्या कालखंडात मी आर्णीत बरेच उपदव्याप केलेत.गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना, इयत्ता १ ते १० वीच्या पाठयापुस्तकातील कवितांना स्वरबद्ध करून 'झुला' नामक कॅसेटची तीन भागात निर्मिती, शाळेत 'दत्त जयंती उत्सव समिती', गावात 'शिवजयंती उत्सव समिती स्थापन करून शिवजयंती उत्सव साजरा करणे',विदर्भ स्तरीय एकांकिका स्पर्धा,मराठी गीत-गझल गायन स्पर्धा, आकाशवाणी सांस्कृतिक संध्या, नाट्यप्रेमींसाठी 'अभिनय कला मंडळ','शिवसेनेची स्थापना', 'पत्रकार संघाची स्थापना', 'मराठा सेवा संघ',' वृक्षारोपण कर्यक्रम',वऱ्हाडी कवी संमेलन, हास्य-व्यंग (हिंदी) कवी संमेलन वगैरे वगैरे...या सगळ्या उपदव्यापात आर्थिक गणित मात्र 'व्यस्त' असायचे.त्यामुळे बायको 'त्रस्त' असायची. पण या व्यस्त-त्रस्ततेची झळ तिने मला कधीच लागू दिली नाही.
---------------------------------------------------------------------
गांधर्व संगीत विद्यालयाच्या वार्षिकोत्सव प्रसंगी आयोजित हास्य-व्यंग कवी संमेलनातील कवींचे स्वागत करताना मी... डावीकडे खाली बसलेले, सुप्रसिद्ध मंच संचालक व कवी किरण जोशी आणि एकदम उजवीकडे, प्रसिद्ध हास्य-व्यंग कवी एहसान कुरेशी. #Kiranjoshi #ehsanquraishi #sudhakarkadam


 

Saturday, January 6, 2024

राग_रंग (लेखांक ३८) ललित


    ललित हा फार प्राचीन राग आहे.याच्या जातीबद्दल व त्यात घेतल्या जाणाऱ्या स्वरांबद्दल विभिन्न मते असून बराच वाद आहे.सध्या मात्र दोन अलग अलग ललित आहेत.एक पूर्वी थाटातून उत्पन्न होणारा कोमल धैवत असलेला ललित.दुसरा मारवा थाटातून उत्पन्न होणारा शुद्ध धैवत असलेला ललित.(मारवाआणि पूर्वी क्रमशः कर्नाटक पध्दती मधील गमनाश्रम आणि कामवर्धिनी मेलकर्ता आहे.) यातील पूर्वी थाटोत्पन्न ललित उत्तर भारतीय संगीतामध्ये जास्ती लोकप्रिय आहे.यात पंचम स्वर नसल्यामुळे याची जाती षाडव षाडव आहे.यात रिषभ,धैवत स्वर कोमल असून दोन्ही मध्यमाचा प्रयोग केल्या जातो.पण यातील मध्यम स्वर केदार,हमीर,
गौडसारंग, बिहाग,बसंत,मारुबिहाग,पुर्वी वगैरे रागाप्रमाणे येत नाही.ललित मधील मध्यम स्वराला षड्ज समजून ललितचे स्वर घेतल्यास तोडी राग स्वच्छपणे दिसतो.
ललित रागाचे वैशिष्ठय म्हणजे याच्या अवरोहात दोन्ही मध्यम पाठोपाठ घेतल्या जातात.ज्यामुळे हा राग स्पष्टपणे दिसून येतो.परज,पुरिया धनाश्री,पूर्वी,श्री हे राग पूर्वी थाटजन्य असले तरी प्रत्येकाचा गानसमय वेगवेगळा आहे.हे विशेष.थाट म्हणजे घरचा प्रमुख व राग म्हणजे त्याची वेगवेगळ्या स्वभावाची पण एकमेकांशी घट्ट जुळलेली मुले...असेच काहीसे! ललीतचा गानसमय प्रातःकाल आहे.वादी स्वर शुद्ध मध्यम व संवादी स्वर षड्ज आहे.हा एक मध्यम स्वर प्रधान राग आहे.ललित नाव 'ललिता' शब्दापासून आले असावे.ज्याचा अर्थ कोमल,आकर्षक,सुंदर,मधुर आवाजाचा/ची वगैरे...
     कोणत्याही रागाच्या स्वरांशी मैत्री करण्याचा सोपा उपाय म्हणजे चित्रपट गीते.चित्रपट संगीतामध्ये प्रयोग केल्या जाणारे राग व मैफलीत गायक/वादकांद्वारे शास्त्रीय संगीत ऐकणे हे शास्त्रसार समजून घेण्यास उपयोगी पडते.हा माझा ऑर्केस्ट्रातील वावरामुळे अनुभव आहे.
        शास्त्रीय संगीत शिकत असताना ललित राग शिकलो.पण भिडला तो पंडित जसराज यांच्या 'रतनारे नैनो में मोहन की मूरत' या झपतालातील चिजेने,संगीत मृच्छकटिक नाटकातील पंडित जितेंद्र अभिषेकींनी गायिलेल्या 'हे सखी शशी  वदने' या नाट्यगीताने,आणि नंतर जगजीत सिंगच्या १९७९ मध्ये आलेल्या 'come alive' अलबम मधील सईद राही यांच्या 'कोई पास आया सवेरे सवेरे' या गझलच्या बंदीशीने... अगदी पार वेडे केले होते.दहा मात्राचा झपताल न वापरता फक्त पाच मात्रा वापरून ही बंदिश बनविली होती. त्यातही सुरवातीलाच गांधाराला षड्ज करून ललीतमध्ये भूपाची छाया दाखवत घेतलेला आलाप,मधील गिटार सोबतचे 'नोटेशन' सगळंच अफलातून होतं ! तेव्हापासून मी ललिताच्या जो प्रेमात पडलो तो आजतागायत.
       काही गुणीजणांचा थाट या प्रकारावर/बद्दल आक्षेप आहे.ते म्हणतात थाटाच्या कितीतरी अगोदर राग अस्तित्वात आले.राग गायिल्या जातात,थाट नाही.त्यामुळे थाटाला जनक म्हणनेच मुळात चूक असून,राग एक निश्चित स्वरसमूह असून त्या अंतर्गत थाट येत असतो.तसेच थाट पद्धतीत अनेक विसंगती दिसून येते.त्यामुळे थाटापेक्षा रागांग प्रकार योग्य वाटतो.प्रत्येक रागाची एक विशेषता असते.ओळख असते.
ज्यामुळे तो ओळखल्या जातो.ही विशेषता थाट पद्धतीमध्ये नेहमी दिसत नाही.
    उस्ताद बडे गुलाम अली खान, पं. डी. व्ही. पलुस्कर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अमीर खान, पं.रवी शंकर,  कुमार गंधर्व, पं. मणी प्रसाद, किशोरी आमोणकर,पं जितेंद्र अभिषेकी, इंद्राणी मुखर्जी, पं. जगदीश प्रसाद, परवीन सुलताना, पं. जसराज, पं. भीमसेन जोशी,पं.अजय चक्रवर्ती,उस्ताद राशिद खान,पं. हरिप्रसाद चौरसिया,डॉ.अश्विनी भिडे, पं. निखिल बॅनर्जी, पं.उल्हास कशाळकर, पं. व्यंकटेश कुमार, पं. राजन साजन मिश्र, पं. विजय कोपरकर, पं. रॅम कुमार मलिक,समित मलिक, उस्ताद मशकुर अली खान वगैरे गायक/वादकांनी सादर केलेला ललित युट्युबवर उपलब्ध आहे.
● हिंदी,उर्दू...
'प्रीतम दरस दिखाओ' लता. चित्रपट-चाचा जिंदाबाद, संगीत-मदन मोहन (१९५९). 
'तू है मेरा प्रेम देवता' मन्ना डे,रफी.चित्रपट-कल्पना, संगीत-ओ.पी.नैय्यर (१९६०)
'एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल' लता,रफी. चित्रपट-लीडर, संगीत- नौशाद (१९६४). 
फारसी गझल...झकेरीया राहीं.चित्रपट-लीडर (१९६४)
'तू है सरापा ताजमहल' गायक-उस्ताद नजाकत अली, सलामत अली.चित्रपट-ताजमहल (पाकिस्तान).संगीत-निसार बजमी (१९६८). 
'बडी धीरे जली रैना भी' रेखा भारद्वाज. चित्रपट-इश्किया, संगीत-विशाल भारद्वाज (२०१०). 
'साच कहूँ सून ले सभई' गायक-भाई संदीप सिंग हजुरी रागी, पंजाबी.गुरुबानी. 
'कोई पास आया सवेरे सवेरे' गायक/संगीतकार-जगजीत सिंग. उर्दू गझल. 
● मराठी...
'ते माझे घर,ते माझे घर,जगावेगळे असेल सुंदर' आशा.संगीत-सुधीर फडके, चित्रपट-पोष्टातील मुलगी (१९५४). 
'विनायका हो सिद्ध गणेशा' गायक-रामदास कामत, संगीत-विश्वनाथ मोरे.नाटक-दार उघड बया दार उघड. 
'हे सखे शशी वदने' गायक-पंडित जितेंद्र अभिषेकी. नाटक-संगीत मृच्छकटिक. 
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी, रविवार दि. ७ जानेवारी २०२४.


 

राग-रंग (लेखांक ३७) राग आसावरी

              
दहा थाटांची ग्रंथानुसार शास्त्रीय माहिती...

भैरव भैरवि आसावरी, यमन बिलावल ठाट।
तोड़ी काफ़ी मारवा, पूर्वी और खमाज।।
शुद्ध सुरन की बिलावल, कोमल निषाद खमाज
म तीवर स्वर यमन मेल, ग नि मृदु काफ़ी ठाट।।
गधनि कोमल से आसावरी, रे ध मृदु भैरव रूप।
रे कोमल चढ़ती मध्यम, मारवा ठाट अनूप।।
उतरत रे ग ध अरु नी से, सोहत ठाट भैरवी।
तोड़ी में रेग धम विकृत, रेधम विकृत ठाट पूर्वी।।

      प्राचीन भारतीय संगीत तज्ज्ञांच्या मतानुसार आसावरी राग 'श्री' रागाची प्रमुख रागिणी आहे.ऋतू,वेळ,भाव आदींचे वैज्ञानिक विश्लेषण करून त्यांनी १३२ प्रकारच्या राग-रागिणींची कल्पना केली आहे.परंतू आधुनिक विद्वानांनी हा भेद बाजूला ठेवून सगळ्याला राग ही संज्ञा दिली असल्याचे म्हटले आहे.या रागांची लक्षणे इ.स.१८९९ मधील 'रागप्रकाशिका' या ग्रंथात दिली आहेत.
     आसावरी हा एक थाट असून त्यातूनच निर्माण झालेला आसावरी राग होय.याला जनक राग असेही म्हणतात.यात गांधार,धैवत व निषाद हे तीन स्वर कोमल आहेत.वादी स्वर कोमल धैवत असून संवादी स्वर कोमल गांधार आहे. 
आरोह: सारेमपध॒सां
अवरोह: सांनि॒ध॒पमग॒रेसा
पकड़: रेमपनि॒ध॒प
हा राग उत्तरांगवादी आहे. जातीऔडव-संपूर्ण असून गानसमय दिवसाचा प्रथम प्रहर आहे. आसावरी थाट उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतामधील महत्वाचा मानल्या जातो. भातखंडे पद्धतीनुसार वर्गीकरणपद्धतीनुसार आसावरी थाटात आसावरी, जौनपुरी, गंधारी, देवगांधार, सिंधुभैरवी, देसी, कौशी, दरबारी कानडा, अडाणा, नायकी कानडा या रागांचा अंतर्भाव होतो. खट, झीलफ यांचाही समावेश याच थाटात करण्यात येतो. या सर्व रागांचे तीन उपवर्ग पडतात : (१) दोन्ही गंधार घेणारे खट, झीलफ, देवगांधार (२) दोन्ही ऋषभ घेणारे गंधारी, सिंधुभैरवी (३) अवरोहात धैवत वर्ज्य करणारे दरबारी कानडा व अडाणा.हिंदुस्थानी संगीतशास्त्रानुसार दरबारी कानडा, अडाणा व कौशी हे राग रात्रिगेय असून या थाटातील बाकीचे राग दिनगेय आहेत. दाक्षिणात्य पद्धतीतील नटभैरवी मेल आसावरी थाटाशी जुळता आहे. दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये आसावरी थाटाला  'नटभैरवी मेल' या नावाने ओळखतात.
     आसावरीच्या मूळ स्वरूपात रिषभ,गांधार, धैवत व निषाद ह्या चार कोमल स्वरांचा उपयोग केल्या जात होता.जवळ जवळ भैरवी प्रमाणेच. जेव्हा पंडित भातखंडे यांनी उत्तर भारतीय रोगांना दहा थाटात बंदिस्त केले तेव्हा त्यांनी थाटाच्या प्रमुख रागाच्या स्वरूपात आसावरी रागाला शुद्ध रिषभाच्या रुपात निवडले.त्यामुळे मूळ आसावरी रागाला 'कोमल रिषभ आसावरी' या नावाने ओळखल्या जायला लागले.नवीन आसावरीमुळे,आसावरीची लोकप्रियता कमी होऊन जौनपुरी रागाची लोकप्रियता वाढली.गमतीची गोष्ट अशी आहे की, शुद्ध रिषभाच्या आसावरीपेक्षा जौनपुरीची लोकप्रियता वाढल्यामुळे कोमल रिषभ आसावरी पुनः लोकप्रिय झाला.फक्त 'आसावरी' हे शीर्षक असलेले बहुतेक ध्वनिमुद्रण कोमल रिषभ आसावरी रागात आहे, देव गंधार रागात कोमल गांधारासोबतच शुद्ध गांधाराचाही अल्प प्रयोग केल्या जातो.आसावरी,जौनपुरी व देवगंधार हे तीनही राग जवळ जवळ सारखेच आहेत.पंडीत ओंकारनाथ ठाकूर यांचेसह अनेक संगीत विशेषज्ञ आसावरी व जौनपुरी या दोन रागांना वेगळे मानत नव्हते. तसेच काही गायक कोमल रिषभ आसावरीला 'आसावरी तोडी' असे पण संबोधतात.एक 'जोगी आसावरी' पण आहे.
      शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रथम आसावरी व नंतर जौनपुरी राग शिकलो.पण दोन्ही राग इतके सारखे आहेत की, कोणत्या रागात कोणते स्वर कसे घ्यायचे ते कळत नव्हते.त्यातही जौनपुरी कळला तो किशोरी आमोणकारांचा ऐकल्या नंतर. कोमल रिषभ आसावरी तर त्यावेळी माहीतही नव्हता.सर्वप्रथम आकाशवाणीवरुन पंडित भीमसेन जोशी यांच्या ऐकण्यात आला.तेव्हा कळला. नवीन नवीन राग माहिती करून घेण्याची उत्सुकता असायची.पण सांगणार कोण?विचारणार कोणाला? आर्थिक परिस्थितीमुळे मानसिक परिस्थियी पण गरीबच ठेवावी लागायची.असो!
     उत्तर भारतीय शीख प्रणालीत आसावरी व कोमल रिषभ आसावरी हे दोन्ही राग दिसून येतात.हे दोन्ही राग श्री गुरू ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथाचा एक एक हिस्सा आहे.तसेच शीख गुरू श्री रामदासजी आणि श्री गुरू अर्जुन देवजी यांनी या रागांचा प्रयोग केल्याचा उल्लेख आहे.श्री गुरू ग्रंथ साहेबात कोमल रिषभ आसावरी 'राग असावरी सुधंग' या रुपात दिसून येते.
     उस्ताद बडे गुलाम अली खान, सवाई गंधर्व, पंडित ओंकारनाथ ठाकूर, उस्ताद अमीर खान, उस्ताद शराफत हुसैन खान, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज,पंडित राजन साजन मिश्र, मंजिरी आलेगावकर, पं. उल्हास कशाळकर, पं. उदय भवाळकर, पं.जयतीर्थ मेवूंडी, पं. व्यंकटेश कुमार, पं.सुरेश बापट (जोगी आसावरी), पंडित राधा गोविंद दास, 
उस्ताद बिस्मिल्ला खान (शहनाई), उस्ताद अली अकबर खान (सरोद), उस्ताद असद अली खान (रुद्र वीणा), इम्रत खान (सुरबहार), पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरी), आतिष मुखोपाध्यय (सरोद)...यात आसावरीचे सर्व प्रकार आलेले आहेत.पंजाबी भक्तिगीते व कीर्तन यात बहुतेक शुद्ध रिषभाचा आसावरी दिसतो.
 
● आधारित चित्रपट गीते...
'चले जाना नहीं नैना मिलाके' लता. चित्रपट- बड़ी बहन,संगीत-हूस्नलाल भगतराम (१९४९). 
'तू ने हाये मेरे ज़ख़्म-ए जिगर को छू लिया' लता.चित्रपट- नगीना (जुना),संगीत-शंकर जयकिशन (१९५१). 
'ना ये चाँद होगा,न तारे रहेंगे' गीता दत्त, हेमन्त कुमार.चित्रपट - शर्त, संगीत-हेमन्त कुमार (१९५४). 
'पिया ते कहा गयो नेहारा' लता. चित्रपट-तूफान और दिया, संगीत-वसंत देसाई (१९५६). 
'बेरेहम असमान मेरी मंजिल बता है कहां' तलत महमूद.
चित्रपट-बहाना, संगीत-मदन मोहन (१९६०). 
 'मुझे गले से लगालो बहुत उदास हूं मैं' आशा,रफी.चित्रपट -आज और काल, संगीत-रवी (१९६३). 
'रुक जा रात ठहर जा रे चंदा' लता. चित्रपट-दिल एक मंदिर, संगीत-शंकर जयकिशन (१९६३). 
'लो आ गई उनकी याद वो नहीं आए' लता. चित्रपट-दो बदन, संगीत-रवी (१९६६). 
सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है' मुकेश. चित्रपट-तीसरी कसम, संगीत-शंकर जयकिशन (१९६६). 
'हमें और जीने की चाहत ना होती' किशोर कुमार.चित्रपट- अगर तुम ना होते, संगीत-आर.डी. बर्मन (१९८३). 
'सुन साहिबा सुन प्यार की धून, लता. चित्रपट-राम तेरी गंगा मैली, संगीत-रवींद्र जैन (१९८५). 
'जादू तेरी नज़र' उदित नारायण.चित्रपट- डर,संगीत-शिव-हरी (१९९३). 
'सिलसिला ये चाहत का ना मैं ने बुझने दिया' श्रेया घोषाल. चित्रपट-देवदास, संगीत-इस्माईल दरबार,मॉन्टी शर्मा (२००२). 

' तुम जिद तो कर रहे हो,हम क्या तुम्हे सुनाए' -मेहदी हसन (युट्युब पाकिस्तान). 
'जदों होली जय लेंदा मेरा ना' नूरजहाँ.- चित्रपट-अत्त खुदा दा वैर,(पाकिस्तान). 
'जब भी चाहें इक नई सूरत सजा लेते हैं लोग' मेहदी हसन.(पाकिस्तान). 
'मुझे आवाज दे तू कहां है' मेहदी हसन. चित्रपट-घूंघट (पाकिस्तान). 
● मराठी...
'अवघे गरजे पंढरपुर' पंडित जितेंद्र अभिषेकी. 
'काय वधिं मे ति सुमति'
'तीर्थ विट्ठल क्षेत्र विट्ठल' पंडित भीमसेन जोशी, संगीत-राम फाटक. 
प्रेमभावे जीव जगि या नटला' संगीत नाटक-मानापमान. 
'छेडिली मी आसावरी' सुधीर फडके. 
'दुर आर्त सांग कुणी छेडिली असावरी' मूळ गायक,संगीतकार माहीत नाही. 
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, दि.५ जानेवारी २०२४.


 

Wednesday, January 3, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २२)

.                       ●प्रश्न आणि उत्तर●

     काही प्रश्न आणि उत्तरे यांचा ताळमेळ कधीच बसत नाही.मग तो शिक्षक असो,कलाकार असो की सामान्य माणूस असो! कारण प्रश्न एक व उत्तर दुसरे असा प्रकार नेहमीच घडत असल्याने तो एक मनोरंजनाचा भाग ठरतो. कसा?  हे बघा! दोन बहिरे सकाळी सकाळी भेटल्यावर...
'काय ? फिरायला निघाला वाटतं?' पहिला.
'नाही, नाही, फिरायला निघालो!' दुसरा.
'असं असं, मला वाटलं फिरायला निघालात.' पहिला.     
      १९८३ मध्ये  पुण्याच्या 'रस्टन ग्रीव्हज्' कंपनीतर्फे राजवाडे हॉलमध्ये माझा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम झाला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध भावगीत गायक स्व. गजाननराव वाटवे हे होते.(माझ्याबद्दल "मला आवडलेला गझलिया" असा उल्लेख त्यांचा रोजनिशीमध्ये असल्याचे,दैनिक सकाळामध्ये आलेल्या त्यांच्यावरील एका लेखामुळे बऱ्याच कालावधीनंतर मला कळले.तो लेख माझ्याकडे आहे.) सूत्र संचालन सध्याचे लोकसत्ताचे संपादक मुकुंद संगोराम यांचे वडील, तत्कालीन प्रसिद्ध संगीत समीक्षक स्व. श्रीरंग संगोराम यांनी केले होते. कार्यक्रमानंतर एक व्यक्ती मला भेटायला आली व 'ओळखलं का?' हा प्रश्न बंदुकीच्या गोळीसारखा नेम धरून माझ्याकडे भिरकावती झाली,  मी पडलो भिडस्त ! (१९८२ मध्ये पुण्यात बरेच कार्यक्रम झालेले असल्याने कुणीतरी रसिक असावा म्हणून उगीच त्याला इतक्या लोकांमध्ये ओळखले नाही असे कसे म्हणायचे?) म्हणून 'वाऽ वाऽ ओळखले ना!' असे म्हणून सुटकायचा प्रयत्न करायला लागलो तर तो जवळ येऊन ह्याSSS ह्याSSS असे चार मजली हसत, 'मला वाटलंच ओळखाल म्हणून, उगीच नाही मी माझ्या भाच्याला सांगितलं!' असे म्हणून लहानग्या भाच्याला पुढे करून नमस्कार करायला सांगितले. मी प्रतिनमस्कार करून त्याला कटविण्याकरिता 'बराय येतो' असे म्हणताच तो जळूप्रमाणे चिटकून म्हणाला, 'मी सध्या पुण्यातच आहे. उद्या घरी या ना!' मी त्याला टाळण्याकरिता होयबाची भूमिका वठवत हो हो म्हणून जायला निघालो, तसा आडवा होऊन म्हणतो कसा, 'कसे याल?' मग मात्र नको तो स्वर लागल्याने गाणाऱ्याची जशी पंचाईत होते, तशी माझी झाली. माझ्या चेहन्यावरचे भाव पाहून त्याला मात्र आसुरी आनद झालेला मला दिसला आणि बरोबर पेचात पकडल्याचा आव आणत स्वतःचे नाव विचारायला लागला. आता मात्र माझे सातही स्वर बेसूर झाल्याचे लक्षात आले व अSSS आSSS SSS SSS SSS अशी बाराखडी सुरू झाली, पण आता का माघार घेतली तर पुढे कठीण जाईल हे लक्षात येऊन हो म्हणालो, 'चेहरा आठवतो हो, पण नाव काही आठवत नाही! खूप लोक ठिकठिकाणी भेटतात प्रत्येकाचे नाव लक्षात ठेवू शकत नाही.' वगैरे वगैरे प्रकार करून त्याच्याकडून त्याचे नाव वदवून घेतले व कशीबशी बोळवण करून सुटकेचा श्वास टाकला. खरे म्हणजे त्याने सांगितलेल्या नावाच्या व्यक्तीला मी कधीच भेटलो नव्हतो.
    शिक्षक असताना तर प्रश्न एक व उत्तर दुसरे असे नेहमीच घडत गेले. नागरिकशास्त्राच्या एका प्रश्नपत्रिकेत 'नागरी जीवनाचा पाया मजबूत करण्याची आवश्यकता का असते?' असा प्रश्न होता. एका विद्यार्थ्याने उत्तर लिहिले, 'पावसाळ्यात खूप पाऊस येऊन नदीला पूर आल्यास घरे वाहून जाऊ नयेत म्हणून नागरी जीवनाचा पाया मजबूत करणे आवश्यक असते.' इतिहासाच्या एका प्रश्नपत्रिकेत 'बौध्दकालीन स्तुपांची माहिती लिहा' असा प्रश्न होता. उत्तर लिहिले गेले, 'बौध्द काळात दोन प्रकारचे तूप प्रसिध्द होते. १) गायीचे तूप २) म्हशीचे तूप.
     सातवीच्या विज्ञानविषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नासोबत 'आकृती काढा' असे लिहिले होते व एका पठ्याने प्रश्न सोडवून सोबत एक तोंड वासलेल्या कुत्रीचे चित्र काढले व त्याखाली 'ही आकुत्री आहे' असे मोठ्या टेचात लिहून ठेवले. ही उत्तरपत्रिका पूर्ण शाळाभर फिरली व दाद घेऊन गेली.
      याच प्रश्नपत्रिकेत दुसरा प्रश्न होता 'सुर्यकुलाचे घटक कोणते ?' उत्तर होते- तीळ, जवस, करडई, शेंगदाणा, वगैरे वगैरे सूर्यफुलाचे घटक आहेत. सूर्यकुलाला सूर्यफूल समजून इतरांना बिगफूल बनविणाऱ्या या विद्यार्थ्याचेही 'कौतुक' झाले.
     प्रश्न एक व उत्तरे दुसरे यातून इतिहासही सुटला नाही. एक प्रश्न होता, 'इतिहासातील दोन बाजींबद्दल थोडक्यात माहिती द्या.' एकाचे उत्तर होते, 'माझ्या घरी दोन ऐतिहासिक बाजी आहेत. एकीवर माहा बा झोपतो व एकीवर माही माय!'
     मायबोलीची चिरफाड तर सदैव सुरूच असते. याला कोण जबाबदार हे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनीच शोधावे. प्रश्न होता 'वर्णाचे प्रकार लिहा.' उत्तर होते, 'वर्णाचे दोन प्रकार आहेत १) साधे वर्ण २) फोडणीचे वर्ण.
     विद्यार्थ्यांचे एक सोडा, मोठी माणसे तरी प्रश्न तसे उत्तर देतात काय ? एकदा आणींच्या बसस्थानकावर चौकशी खिडकीवर जाऊन 'माहूर बस किती वाजता आहे?' असा प्रश्न फेकला तर तेथील चौकशी साहेब, होऽऽ होऽऽ, साहेबच मुद्राभिनय करून सल्ला देतो. 'टाईमटेबल देखो ना, एज्युकेटेड तो दिख रहे हो, कहाँ कहाँसे आ जाते यहाँ पर !' मला सांगा, हे प्रश्नाचे उत्तर झाले काय ?
     जगत असताना हे असेच सदैव घडत असते. प्रश्न विचारतो एक अन् उत्तर मात्र दुसरेच मिळत असते. बालपणी आईवडिलांची उत्तरे, तरुणपणी शिक्षक-प्राध्यापकांची उत्तरे, नोकरीमध्ये वरिष्ठांची उत्तरे व आयुष्यभर बायकोची उत्तरे... आपण ठोंब्या असल्याचा साक्षात्कार करणारीच असतात. त्याला मात्र इलाज नाही.


 

Wednesday, December 27, 2023

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २१)

.                             -दोन आठवणी-

      यवतमाळला नगर पालिका संगीत महाविद्यालयात शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना दोन महत्वाच्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या.त्या म्हणजे तत्कालीन नगर पालिकेचे अध्यक्ष संगीत प्रेमी आदरणीय स्व. बाबासाहेब घारफळकर आणि माहुरचे राजे स्व. मधुकरराव उपाख्य बाबुरावजी देशमुख.दोघेही संगीतावर अपार प्रेम करणारे.बाबासाहेब बाल गंधर्वांची पदे अप्रतिम गायचे. ते आले की जवळ जवळ तीन तासांची मैफल ठरलेली असायची.या निमित्ताने आम्हा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्षपणे बालगंधर्वांची गायकी ऐकायला मिळायची.दुसरे राजे मधुकरराव...ते आले की, आल्या आल्या दहा रुपयाची नोट काढून चपराशाला पेढे आणण्याकरिता पिटाळायचे.(त्या काळी, म्हणजे १९७० च्या दशकातील दहा रुपये...त्या दहा रुपयांची आजची किंमत किती असेल विचार करा.) कासलीकर गुरुजींच्या मैफली सोबतच गोड पेढ्यांनी सगळ्यांचे तोड गोड व्हायचे.त्यांनी त्या काळातील बहुतेक गायक/वादक ऐकले होते.पंडित उस्ताद अमीर खान, जसराज त्यांचे आवडते गायक होते.ते रसिक तर होतेच पण उत्कृष्ट लेखक,उत्कृष्ट शिकारी होते.सह्याद्री बुक्स तर्फे त्याचे शिकारीवरील 'शिकारनामा' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.यात त्यांनी केलेल्या १४ शिकारीचे वर्णन आहे.या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी आमहू उभयता  उपस्थित होतो..माझे संगीत शिक्षण,ऑर्केस्ट्रा,नेहरू युवक केंद्रातील काम,मेंडोलीन वादन,गायन प्रवास ते बघत आले होते.आर्णीला संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर गांधर्व संगीत विद्यालय स्थापन केले.त्याच्या वार्षिकोत्सवाला राजे आवर्जून उपस्थित राहायचे.मी शास्त्रीय संगीताच्या मैफलीत जसराजजींच्या बंदिशी गायचो.  पंडितजी त्यांचेही आवडते गायक असल्यामुळे माहूरला त्यांच्या वाडयात माझ्या अनेक मैफली आयोजित करून माहुरकरांना ऐकवायचे.माहुरच्या रेणुकादेवीसमोर ललिता पंचमीला आम्ही हजेरी लावायचो.त्या काळी सभामंडपात ही हजेरी असायची.गाणारे व ऐकणारे गाभाऱ्यात मावतील इतके असायचे.हळू हळू गर्दी वाढायला लागली, तसे माझे मित्र असलेलले प्रमुख भोपी स्व. रेणूकदासजींनी या हजेरीला संगीत संमेलनाचे रूप देण्याचे ठरवून मंदिराच्या बाहेर प्रांगणात हजेरी लावण्याची ध्वनिवर्धकासह सोय करून आयोजनाची जबाबदारी माझ्यावर टाकली.जोपर्यंत माझ्यावर जबाबदारी होती त्या कालखंडात छोटा गंधर्वां सारखी दिगग्ज मंडळी या संगीत संमेलनात गाऊन गेली.

     माझ्या सांगीतिक प्रवासाचे साक्षीदार असलेल्या स्व.बाबुरावजी यांनी गांधर्व संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवा निमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकात एक लेख लिहिला होता.तो खाली देत आहे. नक्की वाचा...आपणासही आवडेल.


                          #प्रेम_पिया_हम_पाये 


‘हरचंद सुरीली नग़मोंसे

जज़बात जगाये जाते है,

उस वक़्त की तलखी याद करो,

जब साज़ मिलाये जाते है।’


     निःसंशय सुरेल गीतांनी आपल्या भावना उल्हासित, प्रफुल्लित होतात़. परंतु त्या एकमेवाद्वितीय क्षणाची उत्कटता लक्षात घ्या की जेव्हा वाद्ये स्वरात मिळविली जातात़. निःसंशय तो क्षण शब्दातीत, वर्णनातीत आहे़. तितकाच शब्दातीत, वर्णनातीत तोहि क्षण आहे की जेव्हा गायक तन्मय होऊन गात असतो. आणि स्वरवेडा श्रोता आपले प्राण कानात आणून ऐकत असताना आत्मविस्मृतीत जातो़. एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती, किमया, करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे़. माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले. त्याचे गमक वरील शेरमध्ये आहे़.

       कुणाशी नाते जुळते ते उगीचच नाही़. खटपट, प्रयत्न करुन जुळविण्याची ही बाब नाही़. आपल्या काही ऋणानुबंधाच्या गाठी पडलेल्या असतात़. त्या केव्हा पडलेल्या असतात याची आपल्याला कल्पनाही नसते़. परंतु केव्हातरी अनाहुतपणे ती आपल्याला सापडते. आणि त्या गाठीचे रहस्य उलगडत जाते़. त्यावेळी जो आनंद होतो त्या सुखद संवेदनांचं वर्णन करता येत नाही़. माझा आणि सुधाकर कदम यांचा संबंध आला त्याचं रहस्य या ऋणानुबंधाच्या गाठीत आहे़. मला एकवेळा गुरुवर्य पुरुषोत्तमराव कासलीकर म्हणाले होते, “बाबुरावजी, स्वरराजांच्या स्वराला मधाची उपमा दिल्याने मधाची महती वाढते, स्वरराजांची नाही!" आज एका निमित्ताने सुधाकर कदम विषयी लिहीत आहे, तेव्हा मला नेमकं वरील विधान आठवलं. वाटते की माझ्या लिहीण्याने सुधाकरची शान वाढत नाही; वाढलीच तर माझी वाढेल़. मी एक स्वरवेडा माणूस आहे़; तो कानी पडला की माझं मन तिकडे धाव घेते़. त्यावेळी माझी जात कोणती पुसू नका. आठवते़ सुधाकर स्वराचा ठेवा आहे़. स्वराचा वाहता निर्झर आहे़. त्या ठेव्याजवळ बेभान होऊन धाव घेणे हा मधुकराचा स्वभावधर्मच आहे़. नाही तरी ‘घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद’ आपल्याला हाच संकेत देतो की नाही?

       या साडेतीन दशकात अतूट, अजोड सहवासातून मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकलं आहे़. नाट्यपदे ऐकली आहेत़. त्यांची गझल गायकी ऐकली आहे़. पदेही ऐकली आहे़. हे सर्व ऐकून माझे मन प्रसन्न झाले आहे़. याचे कारण हे की या वेगवेगळ्या गायकीमधून जात असतांना त्यांनी आपला स्वर सोडला नाही़. तालाचे तर भान ठेवलेच पण गायकी ही श्रोत्यांना प्रसन्न करणारी असावी याचेही अवधान ठेवले. यातच त्यांच्या गायकीचे गम्य आहे़. सुधाकर जेव्हा गझल गायकी कडे वळले; त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टीकाही झाली असेल, पण ते बरोबर नाही़. साचेबंद ख्याल गायकी आणि राग दारीच्या पूर्वापार चालत असलेल्या मजबूत बंदिशी मधून ते घरसले असे म्हणता येईल का? महाराष्ट्रीय श्रोता नाट्यपदवेडा आहे़. ख्याल ऐकल्यानंतर आपल्या आवडत्या नाट्यगीताची तो फरमाईश करतोच़. परंतु त्या नाट्यपदाला कोणता रागाधार आहे. वगैरे चौकशा करुन त्या पदाचा उपमर्द करतो का? नाही ना?


दिले नादॉं तुझे हुवा क्या है ।

आखिर इस दर्द की दवा क्या है ॥


      ही मिर्झा गालिबची गझल कोणत्या एका रागाच्या ख्याल गायकी अंगाने गायची. हा जगावेगळा अट्‌टाहास वरील गझलचा आशय, अर्थ, भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे; यात गझल गायकाचे कौशल्य आहे़. आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा आधक अवधान बाळगले आहे़. पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून, विलंबित ख्याल गायक, ज्याला अक्षरमंत्राचा साक्षात्कार झाला आहे, तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल़. या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे़.

       स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले़. त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्योत्तम श्री पुरुषोत्तम कासलीकरांकडे असे़. अशावेळी मला आवर्जून बोलाविल्या जायचे़ .स्वरराज आले की कासलिकरांच्या घराला सम्मेलनाचे रुप यायचे़. या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे पेश असत़. छोटा गंधर्व त्यांचेशी विशेष सलगीने, आपुलकीने वागत असतांना मी त्यांना पाहिले आहे़. अनेकदा हार्मोनियमच्या साथीला सुधाकर कदम यांना बरोबर घेऊन जायचे़.माहुरचे आद्य दैवत श्री रेणुकादेवी़. रेणुकेचे नवरात्र हे माहुरच्या खास आकर्षणाचा काऴ. त्यातल्या त्यात ललिता पंचमीचे महत्व तर अनन्य साधारण़. आपली संगीत सेवा रेणुकेच्या चरणी अर्पण करण्यास दूरजवळचे अनेक कलाकार येत़. त्यात सुधाकर कदम हे प्रामुख्याने असत़. त्या दिवशीच्या संचलनाची जिम्मेदारी आम्ही त्यांचेवर टाकत असू़. ही जबाबदारी ते रात्री नऊपासून सकाळी सुर्योदयापर्यंत निरलसपणे पार पाडत़. संगीत महफिलीचे संचलन करणे ही स्वयं एक कलाच आहे़. त्याला संगीताचा आत्मा ओळखणारा जाणकारच हवा़. येर्‍या गबाळ्याचे ते काम नाही़. संगीताप्रमाणे गोड वाणी, प्रसन्न मुद्रा, उत्तम जोपासलेले शरीर सौष्ठव, मनमिळाऊ स्वभाव या सर्वामुळे ते त्या नऊ-दहा तासाच्या स्टेजवर मानापमानातल्या धैर्यधरासारखे वाटत़. यावेळचा त्यांचा पोषाखही अगदी प्रसंगाला अनुरुप असा चोखंदळ असे़. अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्र- मध्यप्रदेशात गाजली़. त्यांच्या मैफिलींचे वृत्त वर्तमान पत्रातून मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा़.

       सुधाकर कदम आर्णीला़ स्थायिक झाले़. गांधर्व संगीत विद्यालय ही स्वतंत्र संस्था निर्माण करून संगीताचे दान त्यांनी दिले़. या संस्थेच्या विद्यमाने ते दरवर्षी संगीत सम्मेलन घेतात़. या वेळी ते जीव ओतून त्यात राबतात़. सम्मेलन असते एक ना दोन दिवसाचे़ पण त्यामागचे जे कष्ट एक महिना आधीपासून उपसावे लागतात; याचा प्रामाणिक आढावा घेतला तर सम्मेलन काय असते ते कळेल़. संगीत सम्मेलनासोबतच अभिनय कला मंडळ, शिवजयंती उत्सव समिती, तालुका पत्रकार संघ, सरगम, अशा अनेक संस्थांची स्थापना करून सामाजिक, राजकीय, सांगीतिक, बौध्दिक या सर्व स्तरावर आपल्या जीवनाची वाटचाल दमदारपणे चालत असता त्यांनी थोड्याच काळात अमाप लोकप्रियता मिळवली़. हिंदू आणि मुस्लिम समाजात ते सारखेच लोकप्रिय आहेत़. हरदिल अजीज़ आहेत़. भावी आयुष्यात त्यांना आणखी लोकप्रियता मिळो, सगळ्यांचे हरदिल अजीज़ होवो ही या रौप्य महोत्सव प्रसंगी कामना.


-राजे मधुकरराव देशमुख (माहूर)


(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. रौप्य महोत्सवी विशेषांक १९९९)

-----------------------------------------------------------------------


     १९८२ ची गोष्ट असेल, त्या वेळी माहुरला ललिता पंचमी च्या दिवशी रात्रभर संगीत सेवा असायची, अनेक नामवंत कलावंत सेवेला येत असत. सुधाकर कदम ह्या कार्यक्रमाचं नियोजन करीत असत. त्या वर्षी मी गेलो आणि गायची संधी मिळाली. बाल कलावंत म्हणून कौतुकही झालं. २, ४ दिवसानीच एक पत्र आलं, "छान गायलास, पण ह्या कौतुकाने हुरळून जाऊ नकोस, रियाजात राहा माझे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तुझाच सुधाकर कदम."

     एका मोठ्या कालावंताकडून मिळालेल्या त्या पहिल्या शुभेच्छा होत्या, आजही ते पत्र मी जपून ठेवलं आहे. संगीत, साहित्य आणि वक्तृत्वाच्या माझ्या प्रवासात आजही कदम सर वेळोवेळी माझं कौतुक करतात. दुसऱ्याला मनमोकळी दाद देणे , कौतुक करणे हा एक दिव्य गुण आहे, ईश्वरानी तो सगळ्यांनाच दिला नाही. कदम सर ह्या दिव्य गुणाचे धनी आहेत. 

सगळेच लोक चालतात त्याच वाटेवरून सरांना कधीच चलावसं वाटलं नाही. If you want to be a path finder, you must be a path breaker, त्या काळापासून सरांनी प्रस्थापित वाटेवरून चालणं नाकारलं होतं म्हणून मराठी गझलेच्या प्रांतात इतक्या प्रदीर्घ काळापासून आपल्याच मस्तीत , आपल्याच शैलीत, विदर्भातला असूनसुद्धा  ताठ मानेने वाटचाल करणारा तो एकटा टायगर आहे. 

     संगीता शिवाय सरांनी लेखन केलं, समाजकारण केलं, राजकारण केलं, भ्रमंती केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचं documentation केलं. पुढच्या पिढीसाठी हा फार मोठा ठेवा आहे.  

सरांच्या कर्तृत्ववाचा आवाका इतका मोठा आहे की तो लेखणीत बांधणं माझ्यासारख्यासाठी अशक्य आहे. 

  ३, ४ महिन्यांपूर्वी यवतमाळ वरुन पुण्याला जाताना सर माझ्या घरी आले, मनमोकळ्या गप्पा केल्या , आनंद वाटत फिरणारा माणुस आपल्या घरी येऊन गेल्या सारखं वाटलं. 

सरांच्या संगीत रचना अनेक नामवंत कलावंतांनी गायल्या आहेत. कवींच्या शब्दांना व ती रचना गाणाऱ्या गायकाच्या गळ्याला न्याय देणारा संगीतकार म्हणजे सुधाकर कदम. 

मेहदी हसनला ऐकताना ,रंजीश ही सही ऐकताना असं वाटतं साधा यमनच तर आहे.. पण नीट ऐकल्यावर लक्षात येतं, मानवी मनातील सर्व भावना व्यक्त करण्यासाठी यमनाला मेहंदी हसनचा गळा शोधावा लागतो. 

कदम सरांना मराठीतला मेहंदी हसन का म्हणत असतील... ?

     शब्द आणि स्वरातील भव्य दिव्यता अत्यंत साधेपणाने मांडणे हा दोघांच्याही संगीतातील स्थायीभाव आहे , ऐकताना वाटतं 'अरे किती सोपं आहे पण म्हणून बघताना त्यातला परमेश्वर दिसतो असं मला सापडलेलं उत्तर आहे. 

आज सरांचा वाढदिवस आहे. 

जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रातील सरांची मुशाफिरी अशीच सुरू राहो व त्यासाठी सरांना निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. 

     कदम सरांच्या आयुष्याकडे बघताना मला असं सतत वाटतं मिर्झा गालिबने हा शेर सरांसाठीच लिहिला असावा

हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले।

बहोत निकले मेरे अरमा, मगर फिर भी कम निकले।

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर।

       - डॉ सुशील देशपांडे

          कारंजा लाड

          १३/११/२०२२

Saturday, December 23, 2023

राग-रंग (लेखांक ३६) जौनपुरी

कोण्या एका रागाचे नाव कोण्या एका गावाशी/जागेशी जोडलेले असण्याचे एकमेव उदाहरण म्हणजे राग 'जौनपुरी होय.उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये गावाच्या नावाने घराणे आहेत.पण राग मात्र एकच 'जौनपुरी'! १३९४ ते १४७९ मध्ये जौनपूर हे एक स्वतंत्र राज्य होते.यावर 'शर्की' वंशाची हुकूमत होती.(१५ व्या शताब्दीमध्ये वाराणाशी आणि जौनपूर हे उत्तर भारतीय संगीताचे मुख्य क्षेत्र होते.)

     ख्वाजा-ए-जहां मलिक सरवर या राज्याचे पहिले शासक होते.(जे कधी नसिरुद्दीन शाहचे वजीर होते.) या राज्याचे शेवटचे शासक होते सुलतान हुसेनशाह शर्की (१४५८-१४८५) काही इतिहास तज्ज्ञ हा काळ १४५८ ते १५०५ असा सांगतात. सुलतान हुसेनशाह शर्की हे फार मोठे संगीत प्रेमी व जाणकार होते.त्यांना गंधर्व उपाधीने नावाजले होते.ते ख्याल गायकीला प्रोत्साहन देण्याबद्दल प्रसिद्ध आहेत.त्यांनी 'मल्हार शाम','गौड शाम' आणि 'भूपाल शाम' या सारखे दुर्लभ राग बनविल्याचेही सांगितले जाते.आपल्या संगीत प्रेमापोटी त्यांनी आणखी एक राग तयार केला, ज्याला नाव दिले राग 'हुसैनी'.हाच हुसैनी पुढे जौनपुरी नावाने प्रसिद्ध झाला.जो आज उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एक लोकप्रिय राग असून बहुतेक सर्व गायक वादक हा राग आवर्जून सादर करताना दिसतात.या कालखंडात दिल्ली आणि जौनपूर सत्तासंघर्ष चरम सीमेवर होता.शेवटी बहलोल लोदीने जौनपुरवर ताबा मिळवून दिल्लीमध्ये सामिल करून घेतल्यामुळे हुसेन शर्की आपले राज्य गमावून बसले.पण त्यांच्या या सांगीतिक योगदानाबद्दल त्यांची आठवण संगीत प्रेमींच्या मनात कायम राहणार आहे.

     जौनपुरी राग आसावरी थाटातून उत्पन्न झाला आहे. याला जीवनपुरी असेही म्हटले जाते. या रागात 'गांधार' ‘धैवत’आणि ‘निषाद’ हे स्वर कोमल आहेत.आरोहात गांधार वर्ज असून अवरोहात सातही स्वर लागतात.त्यामुळे याची जाती षाडव संपूर्ण आहे.वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे.गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर.हा राग उत्तरांग प्रधान आहे. याचा विस्तार मध्य आणि तार सप्तकात केल्या जातो.याला गंभीर प्रकृतीचा का राग मानतात. आसावरी आणि जौनपुरी एकदम जवळचे राग आहेत.त्यामुळे गाताना फार सावधगिरी बाळगावी लागते.आसावरीमध्ये आरोहात निषाद वर्ज आहे तर जौनपुरीमध्ये आरोहात निषाद घेतल्या जातो.या रागात पूर्वांगात 'सारंग' व उत्तरांगात 'आसावरी' दिसून येतो. सध्या अप्रचलीत असलेला 'गांधारी' राग जौनपुरीशी बराच मिळता-जुळता आहे.

आरोह– सा रे म प नी सां

अवरोह– सां नी प, म ग, रे सा

पकड़– म प, नी प, म प S रे म प

      भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एक खास अशी बाब आहे की,दोन रागांचे स्वर एकसारखे असूनही स्वरलगावाच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे राग वेगवेगळे होतात.प्रत्येक रागात वेगवेगळ्या पद्धतीने स्वर लावल्यामुळे प्रत्येक रागाचे वेगळे रूप आपल्या समोर येते.राग जौनपुरी, राग दरबारी कानडा आणि राग अडाणा या रागांचे स्वर सारखेच आहेत.परंतू ज्या पद्धतीने गायिल्या जाते त्याने प्रत्येक राग पूर्णपणे वेगळा होतो.

    केसरबाई केरकर,उस्ताद बडे गुलाम अली खान, रोशनआरा बेगम, गिरीजा देवी, मास्टर कृष्णराव, माणिक वर्मा, पं. डी. व्ही.पलुस्कर, उस्ताद नजाकत अली सलामत अली, पंडित भीमसेन जोशी,पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद फतेह अली खान, मालिनी राजूरकर, पंडित राजन साजन मिश्र, किशोरी आमोणकर,वीणा सहस्रबुद्धे,अश्विनी भिडे,आरती अंकलीकर,उस्ताद नुसरत फतेह अली खान, परवीन सुलताना, पंडित अजय चक्रवर्ती,पं. ज्ञान प्रकाश घोष, पं. व्यंकटेश कुमार, पं. जयतीर्थ मेवूंडी, शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर,अपूर्वा गोखले,मंजुषा पाटील,मौमिता मित्रा,कौशिकी चक्रवर्ती,पं. हरीश तिवारी,रवींद्र परचुरे,गौरी पठारे,मंजिरी असनारे,उस्ताद बिस्मिल्ला खान (शहनाई), उस्ताद अली अकबर खान (सरोद), पं.पुर्बायन चटर्जी (सतार),उस्ताद शाहीद परवेज खान (सतार), पं. निखिल बॅनर्जी (सतार), कला रामनाथन (व्हायोलिन), रुपा पानेसर (सतार), कल्याणी रॉय (सतार) अली अहमद हुसैन (शहनाई) जुगलबंदी.अभ्यासकांसाठी या दिग्गजांचे व्हीडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.

● जौनपुरीवर आधारित हिंदी,उर्दू चित्रपट गीते...

'मेरी याद में तुम ना आंसू बहाना' तलत महमूद. चित्रपट-मदहोश, संगीत-मदन मोहन (१९५१). 

‘जाएं तो जाएं कहां’ लता,तलत.चित्रपट-टॅक्सी ड्रायव्हर, संगीत-एस.डी. बर्मन (१९५४). (आधारित)

'रहीए अब ऐसी जगह' सुरैय्या. चित्रपट-मिर्झा गालिब,संगीत-गुलाम मोहम्मद (१९५४). 

'पिया ते कहां गयो नेहरा लगा' लता.चित्रपट-तुफान और दिया, संगीत-वसंत देसाई (१९५६). 

'दिल छेड़ कोई ऐसा नगमा' लता,आशा,हेमंत कुमार. चित्रपट-इंस्‍पेक्‍टर, संगीत-हेमंत कुमार(१९५६). 

'टुटे हुये ख्वाबो ने' रफी.चित्रपट-मधुमती, संगीत-सलील चौधरी (१९५८). 

'चितनंदन आगे नाचूंगी' लता.चित्रपट-दो कलियां, संगीत- (१९६८). 

'आज सोचा तो आंसू भर आये' लता. चित्रपट-हंसते जख्म, संगीत-मदन मोहन (१९७०). 

'दिल में हो तुम आंखो में तुम' एस जानकी,बप्पी लहरी. चित्रपट-सत्यमेव जयते, संगीत-बप्पी लहरी (१९८७)

'पल पल है भारी' मधुश्री,चित्रपट-स्वदेस, संगीत-ए.आर. रहमान (२००५). 

या रागाची रेंज इतकी भारी आहे की,संगीतकार एस.डी. बर्मन,मदन मोहन,हेमंत कुमार पासून तर बप्पी लहरी, ए.आर.रहमान यांनी जौनपुरीच्या जमिनीवर आपल्या गाण्याची धून बनविली आहे.

● नॉन फिल्मी...

'श्रीराम भजो सुख में दुख में'गायक-के.सी.डे. (१९३०). 

'प्रेम भावे जीव जगी या' उस्ताद अब्दुल करीम खान.अल्बम-हिराबाई बडोदेकर मराठी गीते.

'राम प्रभू आधार जगत के' पंडित भीमसेन जोशी.संत तुलसीदास. 

● मराठी...

'देवा तुझा मी सोनार' गायक-रामदास कामत. अभंग-संत नरहरी सोनार, संगीत यशवंत देव. 

'तुझे रूप चित्ती राहो' गायक/संगीतकार-सुधीर फडके. 

चित्रपट-संत गोरा कुंभार. 

'अवघे गरजे पंढरपूर' गायक-प्रकाश घांग्रेकर/शौनक अभिषेकी.नाटक-संगीत संत गोरा कुंभार,संगीत-पंडित जितेंद्र अभिषेकी. (१९७४).

----------------------------------------------------------

दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी,दि.
२४/१२/२०२३


 





संगीत आणि साहित्य :