गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, August 31, 2019

मराठी गझलेचा गंधर्व...

म.टा.नागपूर आवृत्तीत दर शुक्रवारी प्रकाशीत होणाऱ्या "आयुष्याचा सफरनामा" सदरातील या आठवड्याच्या भावना शेअर करतो आहे, कृपया गोड मानून घ्याव्या.
-मसूद पटेल

मनात खरी जिद्द कलेप्रती खरी आसक्ती असली की कितीही विपरीत परिस्थिती माणसाला ध्येयप्राप्तीपासून रोखू शकत नाही.’गझलगंधर्व' सुधाकर कदम यांचा सांगीतिक प्रवास याचे जिवंत उदाहरण आहे.यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात येणार्‍या दोनोडा या लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेले सुधाकर कदम पुढे ’गझलगंधर्व’ पुरस्काराचे मानकरी ठरतील याची त्यावेळी कोणी कल्पनाही केली नसेल.
. चौथ्या वर्गापर्यंतचे शिक्षण गावीच पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी कदम यवतमाळला गेले.शालेय शिक्षणासोबतच वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी दादा पांडे यांचेकडे तबला वादनाचे तर वडिलांकडॆ गायन आणि हार्मोनियम वादनाचे धडे गिरवायला सुरवात केली.वयाच्या अवघ्या सोळा सतराव्या वर्षात संगीतकार म्हणून कारकिर्दीची सुरवात केली.यवतमाळ येथे मित्रमंडळींसह भाग्योदय कला मंडळ’ नावाचा ऑर्केस्ट्रा स्थापन केला यात ते सिनेसंगीतासोबतच स्वत: स्वरबद्ध केलेली गीते गाऊ लागले.त्यांनी सर्वप्रथम स्वरबद्ध केलेली शंकर बडे यांची गझल,’आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाहीआम्ही घरोघरी अन् आम्हास गाव नाही’ आजही लोकप्रिय आहे.
. संगीत विशारद झाल्यावर पोटापाण्याची व्यवस्था म्हणून कदम यांनी आर्णी येथील एका शाळेत संगीत शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली.यासोबतच संगीत विद्यालय आणि संगीत परीक्षा केंद्र सुरू केले.या शहराला सांस्कृतिक ओळख मिळवून दिली.दरम्यानच्या काळात अनवधानाने ते राजकारणाकडे ओढले गेले.त्यांच्याकडे आमदारकीची संधी चालून आली परंतू कुटुंबाचा राजकारणास विरोध असल्याने त्याण्नी उमेदवारीस सविनय नकार दिला.आपले विद्यार्थी श्रीकांत मुनगीनवार यांना पुढे केले.विशेष म्हणजे मुनगीनवार हे विदर्भातील शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडूनही आले होते.
. सुधाकर कदम यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ म्हणजे कवीश्रेष्ठ सुरेश भटांसोबत व्यतीत झालेला काळ होय.याच काळात त्यांनी उत्तमोत्तम गझला स्वरबद्ध करून रसिकांना अर्पित केल्या.मराठी गझल जनसामान्यात रुजविण्यासाठी सुरेश भटांनी चालविलेल्या मोहिमेचे ते खंदे समर्थक होते.मराठी गझलेच्या प्रचारासाठी हे दोघे स्वखर्चाने एसटीचा प्रवास करून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात मराठी गझलचा एकत्रितरित्या कार्यक्रम करायचे.अर्धा कार्यक्रम सुरेश भटांचा,तर अर्धा कार्यक्रम सुधाकर कदम यांचा त्यांच्या वाद्यवृंदासह गझल गायनाचा, असे या एकत्रित कार्यक्रमाचे स्वरूप असायचे.नंतर भटांच्या सूचनेनुसार ’अशी गावी मराठी गझल’ या नावाने कदम हे गझलगायनाचा तीन तासांचा स्वतंत्र कार्यक्रम करू लागले.या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग पुण्याला मसापच्या पटवर्धन सभागृहात १५ जुलै १९८२ रोजी पार पडला.या कार्यक्रमाच्या नामकरणापासून निवेदनापर्यंतच्या जबाबदार्‍या खुद्द सुरेश भटांनी पार पाडल्याने मराठी गझल क्षेत्रातील ही मह्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना होय.येथूनच कदम यांच्या वैयक्तिक गझलगायनाची सुरवात झाली.हा गायन प्रवास अजूनही सुरू आहे.आज त्यांच्या नावावर तीन अल्बम आहेत.
. कदम हे नोकरी निमित्त आर्णीत दीर्घकाळ होते मात्र येथे त्यांचे मन रमले नाही. २००३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून आकाश विस्तारण्यासाठी ते पुण्यात स्थायिक झाले.स्वकष्टाने उद्दीष्ट साध्य करून नवीन पिढीसाठी एक आदर्श वस्तूपाठ त्यांनी ठेवला आहे,बांधन जनप्रतिष्ठान व अभिजात गझल या संस्थांतर्फे देण्यात येणारा ’गझलगंधर्व’,प्रख्यात उर्दू शायर निदा फाजली यांच्यासोबत मिळालेला ’शान-ए-ग़ज़ल’आणि महाराष्ट्र जेसीजतर्फे मिळालेला ’आऊट स्टॅंडिंग यंग पर्सन’ हे तीन पुरस्कार अतिशय महात्वाचे आहेत. या सुरेल प्रवासात त्यांना मोलाची सथ लाभली ती पत्नी सुलभा यांची.आयुष्यभर संगीताची मुशाफिरी करणारा हा अवलिया स्वरयात्री,स्वत:च गायिलेल्या या ओळीद्वारे अतिशय समर्पकरित्या या दुनियेसोबत संवाद साधतो आहे.
’तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते,
मजपाशी पण तुझियासाठी केवळ गाणे होते'.

Thursday, August 15, 2019

आद्य मराठी गझल गायक गझलगंधर्व सुधाकर कदम

.                               -शाहीर सुरेशकुमार वैराळकर

'आजकाल गझलेच्या क्षेत्रात अनेक तोतये उदयाला आले आहेत. सुरेशच्या (गझलसम्राट सुरेश भट ) निधनानंतर त्यांच्यावर हक्क सांगणारा, नको त्या जवळीकीचा दावा करणारा एक वर्ग निर्माण झाला आहे.त्यामुळे या मानपत्रातला एक एक शब्द  पुराव्याच्या कसोटीवर पारखून घ्यायला हवा ’
        प्रा.सुरेशचंद्र नाडकर्णी बोलत होते.फेब्रुवारी २००९ मधला प्रसंग.गझलसम्राट सुरेश भट यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ’गझल मुशायरा आणि मैफल’ या सोहळ्यात सुधकर कदम यांना गझलगंधर्व पदवी देऊन गौरविण्याचे ठरल्यानंतर त्यांना द्यावयाच्या मानपत्राच्या मसुद्याला Approval घ्यायला त्यांच्याकडे गेलो होतो.मानपत्रावर जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्र जाधव, जेष्ठ पत्रकार अनंत दीक्षित,आ.उल्हासदादा पवार यांच्या सह्या घ्यायच्या होत्या.त्यामुळे नाडकर्णी सरांचा आग्रह योग्यच होता.मानपत्रातील 'आद्य मराठी गझल गायक’ आणि ’मराठीचे मेहदी हसन' या वाक्याची सत्यता सिद्ध करण्या बाबत त्यांचा आग्रह होता.स्वत: सुरेश भट यांच्या हस्ताक्षरात १९८०/८१ दरम्यान त्यांनी लिहिलेले "मराठी गझल गायकीचे मेहदी हसन" अशा मजकुराचे एक पत्र उपलब्ध असल्याने तो प्रश्न सुटल होता.’आद्य...’चे काय?

माझे मन सुमारे तीस वर्षे मागे गेले. १९७९ - ८० चा काळ.अकोला येथे प्राचार्य डॅडी देशमुख यांचेकडे भट साहेबांचा मुक्काम होता ,सोबत मी. "अकोल्याचे एक संगीतकार तुझ्या निवडक गझलांना चाली देऊन संपूर्ण मराठी गझलांचा कार्यक्रम करू इच्छितात त्यांना तुझी भेट हवी आहे." असे डॅडी देशमखांनी सांगितले.
"यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील एका संगीत शिक्षकाने माझ्या ब-याच रचनांना चांगल्या चाली लावल्या आहेत. अशा अशा स्वरूपाचा कार्यक्रम तो करतो.चाली पण भजन-भावगीत-सुगम संगीत वळणाच्या नसून गझलच्याच आहेत.आधी त्यांच्याशी चर्चा करायला सांग त्यांना, सधाकर कदम त्याचे  नाव..."
कार्यक्रमाचे शीर्षक मीच सुचवले आहे  . 'अशी गावी मराठी गझल'. भट साहेबांनी सांगितले.
सधाकर कदम हे नाव पहिल्यांदा अशा प्रकारे  कानी पडल्यानंतर उत्सुकता निर्माण झाली.

भेटीचा योग लवकरच नागपूर येथील भट साहेबांच्या घरीच आला.नागपूरच्या या मुक्कामात सुधाकरने चाली बांधलेल्या’सूर्य केव्हाच अंधाराला यार हो' 'हा ठोकरून गेला' 'आसवांनी मी मला भिजवू कशाला’ ’झिंगतो मी कळे ना कशाला’ ह्या अप्रकाशित रचनांसोबत 
 (१९८३ साली प्रकाशित 'एल्गार ' या संग्रहात या रचना समाविष्ट आहेत,त्या वेळी अप्रकाशित होत्या) 'रंग माझा
वेगळा’ ’रूपगंधा’ मधील काही रचना ऐकायला मिळाल्या.त्यांच्या सादरीकरणाबाबत काही सूचना भट साहेबांनी केल्या.या नागपूर भेटीत सुधाकर कदम या अवलियासोबत जमलेली घट्ट मैत्री ही एक चांगली कमाई.
नंतरच्या काळात भेटी होत गेल्या तसतसे त्याच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचे वेग-वेगळे पैलू समोर येत गेले.संगीत शिक्षक,मुक्त पत्रकार,खुसखुशीत सदर लिहिणारा स्तंभलेखक, सामाजिक भान आणि जाण असलेला ग्रामीण कार्यकर्ताअशा विविध रुपातला सधाकर सामोरा येत गेला आणि आमचे मैत्र अधिकाधिक घट्ट होत गेले.

दरम्यानच्या काळात तमाशा कलावंतांच्या संघटनेच्या कामाच्यानिमित्ताने मुंबईचे संघटनेचे अध्यक्ष .मधुकर नेराळे यांच्या सोबत विदर्भ दौ-यावरअसतांना दिग्रस मुक्कामी,घरी बनवलेले जेवण घेउन मोटार सायकलरून येवून पाहुणचार करणारा सुधाकर नेराळे दादांच्या पण कायम लक्षात राहिला..पुढे १९८१-८२ दरम्यान पुणे-कोल्हापूर -इचलकरंजी आणि महाराष्ट्रातील  इतर भागात 'अशी गावी मराठी गझल 'चे अनेक  कार्यक्रम झाले.. काही कार्यक्रमाचे निवेदन स्वत: सुरेश भट साहेबांनी तर काही ठीकाणी डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी केले. 

         मानपत्राच्या मजकूराबाबत बोलतांना '१९७२ साली मराठी गझलचा कार्यक्रम केल्याचा एका गायकाने केल्याचा  दावा केला आहे’ असा  उल्लेख आला. तो निखालस खोटाअसल्याचे मी निक्षून सांगितले ,कारण मुळातच  'रंग माझा वेगळा' हा संग्रह १९७४ साली प्रकाशित झाला. त्यापुर्वी मराठी गझल हा प्रकार गायकीच्या अंगाने फारसा ग्यात नव्हता. माधव यांच्या रचना आणि मंगेश पाडगावकर , विंदा करंदीकर यांच्या कथित गझल रचनांना चाली लावल्याचा दावा त्या गायकाने सुद्धा केलेला नाही ' रंग माझा वेगळा' मध्ये सुद्धा एकूण १९ गझलरचना बाकीच्या कविता. यापैकी ब-याचा रचनांना मोठ्या संगीतकारांनी चाली
दिलेल्या. मराठी गझलांचा स्वतंत्र कार्यक्रम करण्याइतपत संखेने गझल रचना उपलब्ध झाल्या त्या १९७४ ते १९८० या दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’च्या प्रकाशनानंतरच्या काळातील भट साहेबांच्या वेगवेगळ्या नियतकालिकांमधून प्रकाशित आणी नंतर १९८३ साली आलेल्या 'एल्गार’ मध्ये समाविष्ट  रचनांच्या रुपात.
त्यामळे १९७२ साली संपूर्ण मराठी गझलांचा कार्यक्रम करण्यासाठी पुरेशा संखेत उपलब्ध असण्याची सुतराम शक्यता नव्हती.शिवाय  सुधाकर कदमांच्या कार्यक्रमात निवेदन करतांना स्वत: सरेश भट त्यांचा उल्लेख ’आद्य मराठी गायक’ असा करायचे. 

          डिसेंबर १९८१ मध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशन काळात विधान परिषदेचे तत्कालीन सभापती भट साहेबांचे मित्र रा.सू गवई यांच्या शासकीय निवासस्थानी खास निमंत्रितांसाठी सुधाकरच्या गझल गायनाची मैफल आयोजित केली होती.तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.अंतुले साहेब,मा.ना.जवाहरलाल दर्डा,मा.तेजसिंगराव भोसले आणि बरेच मंत्री मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी यवतमाळ जिल्ह्याची शान म्हणून मा.दर्डाजींच्या हस्ते त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला होता.त्या ठिकाणी सुद्धा भट साहेबांनी सुधाकरचा परिचय , "आद्य मराठी गझल गायक,मराठी गझल गायकीचा मेहदी हसन" असाच करून दिला होता.हीच बाब मी नाडकर्णी सरांच्या निदर्शनास आणून दिली आणि ‘आद्य मराठी गझल गायक गझलगंधर्व सधाकर कदम’ या मानपपत्रातील वाक्यावर शिक्कामोर्तब झाले.

       यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या लहानश्या खेडेवजा शहरापासन सुरू होऊन वेगवेगळे टप्पे ओलांडत सध्या तरी पुणे शहरापयर्यंत पोचलेला सधाकर कदमांचा जीवनप्रवास हा एका अर्थाने प्रातिनिधिक म्हणावा लागेल. रगेल.वडिलोपार्जित शेतीच्या जोडीला उपजीविकेचे साधन म्हणून गावातच संगीत शिक्षकाची नोकरी हे खरे तर सखवस्तू जीवन जगण्यासाठी पुरेसे भांडवल त्यात हार्मोनियम,ॲकॉर्डिअन,सरोद,मेंडोलीन,
तबला ही वाद्ये वाजवण्याचे कैशल्य या भांडवलावर स्वत;चा ऑर्केस्ट्रा  चांगल्या प्रकारे जोडधंदा म्हणून वाढवता आला असता.पण मराठी गझलच्या  काहीतरी भरीव करून दाखवण्याच्या हेतूने त्याने अस्थिर भटकंती स्वत:वर लादून घेतली. निव्वळ कलेच्या जोरावर मुंबई -पुण्यासारख्या महानगरांम्ध्ये जम बसवणे अत्यंत अवघड .त्यासाठी चांगल्या पगाराची कायम नोकरी किंवा अशा स्वरूपाची कायम नोकरी असलेली छोकरी बायको म्हणून गाठीशी-पाठीशी असावी लागते हे शहाणपणाचे सुत्र वेळेआधी कुणालाच कळत नाही..
ह्या क्षेत्रातील सगळ्याच बर्‍या-वाईट  बाबींचा सामना करत त्याने टिकवलेले सातत्य कौतकास्पद आहे  .गझलेच्या कॅसेट,सीडीज,मंचीय कार्यक्रम याबरोबरच नव्या-जुन्या गझलकारांना सोबत घेऊन
‘गझलकट्टा’ हा सर्वकष गझलचर्चेला वाहिलेला उपक्रम त्याने पुण्यात बरीच वर्षे राबविला.तीनही मुला-मुलींना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देऊन गझल मैफिलीमध्ये सहभागी करून घेतले. 'अशी गावी मराठी गझल' च्या एका मैफिलीत मंचावर सुधाकरच्या साथीला तबल्यावर निषाद,गझल गायनासाठी भैरवी आणि रेणू ह्या दोन्ही कन्या असे चित्र पाहून सभागृहात शेजारी बसलेल्या सुलभा (कदम) वहीनींना मी म्हणालो सुद्धा,’वहिनी तानपरा घेऊन मागे बसा म्हणजे ’गझलकुटुंब’ ही संकल्पना साकार होईल’.

आजमितीस सुधाकरच्या नावावर लेखक/कवी म्हणून ’फडे मधुर खावया…’(स्फूट लेख), ’सरगम’(स्वरलिपी), व
’चकव्यातून फिरतो मौनी’(काव्य संग्रह) अशी तीन पुस्तके,तसेच ’भरारी’(मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट)'अर्चना’ (टी सिरीज),’खूप मजा करू’(फाऊंटॆन ,म्युझिक कं),’काट्यांची मखमल’ (युनिव्हर्सल म्युझिक कं),’तुझ्यासाठीच मी...’( युनिव्ह्रर्सल म्युझिक कं) ह्या कॅसेट्स सीडीज आहेत.

        सुधाकरनेच स्वरबद्ध केलेला  हनिफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्द गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत आहेत. सरेश वाडकरांपा्सून पं.शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे ,वैशाली माडे,नेहा दाउदखाने,रसिका जानोरकर,मयूर महाजन,गाथा जाधव,आदित्य फडके,रफ़िक शेख,वैशाली पुल्लीवार,अविनाश जोशी,सचिन डाखोरे सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी त्याने स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.

       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेशभट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत भापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊर,इलाही जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोषी,म.भा.चव्हाण.रमण रणदिवे,सदानंद डबीर,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,
कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,्गंगाधर मुटे,बदिउज्जमा बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,प्रमोद खराडॆ,जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,मीरा सिरसमकर,

        आणि उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा,हनुमंत नायडू,शॆरजंग गर्ग,प्रेमनाथ कक्कर,शंकर दीक्षित,श.न.तरन्नुम,बलबीरसिंह रंग,’राग’ कानपुरी,मोहन वर्मा ’साहिल’,प्रभा ठाकूर,मयंक अकबराबादी,समद रजा,’शेरी’ भोपाली,’बेताब’ अलिपुरी,इंदू कौशिक,अशोक अंजूम.सैफुद्दीन सैफ,सुरेश्चंद्र वर्मा,’निजाम’ रामपुरी,गोवर्धन भारती,विनू महेंद्र,प्यारेलाल श्रीमाल,’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध करण्याचे खूप मोठे काम त्याने केले आहे....

आयुष्याच्या अत्यंत समृद्ध टप्प्यावर माझा हा कलंदर मित्र उभा आहे.त्याला आरोग्यपूर्ण,समृद्ध दीर्घ आयुष्य लाभॊ यासाठी माझ्या शुभेच्छा...!

शाहीर सुरेशकुमार वैराळकर
संस्थापक अध्यक्ष
सुरेश भट गझल मंच
पुणे.

(चकव्यातून फिरतो मौनी मधून...)

Wednesday, July 10, 2019

मला भावलेला संगीतकार...पद्मश्री सुरेश तळवलकर.

('चकव्यातून फिरतो मौनी ' मधील तालयोगी पद्मश्री  सुरेश तळवळकरांचा लेख...)
.
-मला भावलेला संगीतकार-
.
श्री सुधाकर कदम यांचे चिरंजीव श्री निषाद कदम माझ्या निकटतम शिष्यांपैकी एक आहेत.त्यामुळे माझा आणि सुधाकरजी यांचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा स्नेह आहे.मी सुधाकरजींचे काम फार जवळून ऐकले आहे.अनेकदा त्यांनी केलेल्या रचनांचा मनसोक्त आनंद घेतला आहे.
प्रत्येक कलाकार त्याच्या कामामध्ये आपल्यामधील कल्पकतेनुसार वैविध्यता आणायचा आटोकाट प्रयत्न करत असतो.सुधाकरजी यांच्या रचना ऐकताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की, त्यांच्या संगीत रचनांमध्ये विविधता आहे.प्रत्येक रचनेला स्वतंत्र अशी एक ओळख आहे.एका रचनेसारखी दुसरी रचना नाही.ही विविधता आणत असताना,ते ती रचना यांत्रिक किंवा कोरडेपणाकडे झुकू देत नाहीत.सुधाकरजी त्यांच्या रचनांमध्ये एक प्रकारचा हळवेपणा,ओलेपणा जपल्याची जाणीव देतात.गझल या प्रकारामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असणे गरजेचे असते.अशी रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयाला भिडते,याची जाणीव सुधाकरजींना आहे.त्यांना असलेली ही जाणीव ते त्यांच्या रचनांमधून श्रोत्यांच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहचवतात.त्यांच्या रचनांमधील ’संवेदनशीलता’ मनाला भिडते.संगीत रचनेमध्ये भावनिकता ही फार महत्वाची आहे,जी सुधाकरजींच्या रचनांमध्ये जाणवते.
गझल काव्यातून आलेला भावार्थ,त्या काव्याला असलेली लयीची नादमयता,ही सुधाकरजींना अगोदरच जाणवलेली असल्यामुळे ते त्यास संगीत देत नाहीत तर ते त्यांच्याकडून घडले जाते.सुधाकरजींच्या गझल रचनांमध्ये एकाचवेळी खुलेपणा आहे आणि तितकाच हळूवारपणाही आहे.असे फार कमी वेळा ऐकायला मिळ्ते.संगीताच्या दृष्टीकोनातून खुलेपणा आणि हळूवारपणा ही एकमेकांविरोधी तत्वे आहेत.पण सुधाकरजींच्या रचनांमध्ये खुलेपणा व हळूवारपणा या दोन्हीही गोष्टींचा सुरेल संगम ऐकायला मिळतो.
सुधाकरजींनी त्यांच्या रचनांसाठी वेगवेगळ्या तालांचा चपखल वापर केला आहे.कधी रुपक तर कधी दादरा-केरवा तर कधी अप्रचलित ११ मात्रांचा ताल अशा वेगवेगळ्या तालांमध्ये त्यांनी रचना केलेल्या आहेत.अशा अवघड आणि अप्रचलित असलेल्या बौद्धिक तालांचा वापर करताना गझलचे मर्म समजल्या जाणार्‍या भावनिक तरलतेवर ते कोठेही विपरीत परिणाम होऊ देत नाहीत.
सुधाकरजींच्या रचनांचा शास्त्रीय संगीताशी घनिष्ट संबंध आहे.गझल गायनाच्या परंपरेमध्ये गझल गायकाला सादरीकरण करताना रचनेपेक्षा वेगळा सांगीतिक विस्तार करण्याचे स्वातंत्र्य असते.सुधाकरजींच्या गझल रचना पूर्णपणे स्वतंत्र असूनसुद्धा त्यांच्या रचनांमध्ये गझल गायकाला मुक्तपणे गाण्यासाठी वाव असतो.तो त्याच्या मनाने गाऊ शकतो.
संगीताच्या सर्व प्रकारांमध्ये मग ते शास्त्रीय असो,उपशास्त्रीय असो किंवा सुगम संगीत असो,’अस्थाई’ अतिशय महत्वपूर्ण असते.अस्थाईला सुगम संगीतामध्ये धृवपद असेही म्हणतात.संगीत रचनेमध्ये अस्थाई परत परत गायली जावी असे वाटणे हे ती सांगीतिक रचना उत्कृष्ट असल्याचे द्योतक आहे.सुधाकरजींच्या सर्व रचना या प्रकारामध्येच समाविष्ट असतात. अस्थाई जितकी सांगीतिकदृष्ट्या परिपूर्ण असेल तितका तिचा विस्तार करणे सोपे जाते.अस्थाई परत परत गावी असे वाटणे म्हणजेच त्याची धून होणे असे मला वाटते.आणि अशा प्रकारे धून झालेली कोणतीही रचना श्रोत्यांच्या ओठांवर तरळत राहते.सुधाकरजींच्या अनेक सांगीतिक रचना मी ऐकल्या आहेत.त्याचा आनंद घेतला आहे.
जेवढी अस्थाई सांगीतिक दृष्ट्या परिपूर्ण तेवढी ती रचना विस्तार करायला गायकाला जास्त वाव मिळ्तो.अशा प्रकारची सांगीतिकदृष्ट्या परिपूर्ण असलेली अस्थाई ही त्या रचनेची ताकद बनते.अस्थाईतील शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन त्या शब्दांना यथायोग्य सांगीतिक वृत्तामध्ये (मीटर) बसवणे हे फार बौद्धिक काम आहे.सुधाकरजींनी हे शिवधनुष्य अतिशय लीलया पेलले असून अशा प्रकारची बौद्धिक चमक त्यांच्या अनेक रचनांमध्ये ऐकायला मिळ्ते.त्यांच्या रचनांमध्ये स्वरवैचित्र्यही पहायला मिळ्ते.(ज्या प्रमाणे शास्त्रीय संगीतामध्ये जोड रागांची संकल्पना आहे त्याप्रमाणे) अशी सांगीतिक रचना करणे ही एक बौद्धिक क्रिया आहे.पण या बौद्धिक क्रियेमध्ये सुद्धा गझलमधील भावनिक तरलतेवर विपरित परिणाम होणार नाही याचे अतिशय योग्य भान त्यांनी ठेवलॆ आहे.सुधाकरजींना त्यांच्या रचनांमध्ये शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक संतुलन अतिशय उत्कृष्टपणे आणि कलात्मकतेने जमलेले आहे.
गझल हा प्रकार प्रामुख्याने काव्य प्रकार असूनसुद्धा त्याचे संगीतमय सादरीकरण हे शास्त्रीय संगीताच्या खूप जवळ जाणारे असते.शिवाय गझलच्या संगीतमय सादरीकरणाच्या रिवाजामध्ये तबला वादकाला त्याचे काम करण्याची संधी उपलब्ध असते.त्यामुळे गझल गायकाबरोबर तबला वादक कोण आहे,त्याची पात्रता काय आहे याची पण गझल गायन ऐकणार्‍या श्रोत्यांना उत्सुकता असते.गझलच्या सांगीतिक रचनेची जी अस्थाई (धृवपद) असते ती जरी,बरोबर वाजणार्‍या तालाशी गणिती किंवा ठॊस संबंध दाखविणारी नसली तरी त्यामध्ये त्या तालाच्या आवर्तनाची आकृती सक्षमपणे उभी अहात असते.अशा अस्थाईचे वारंवार सादरीकरण लेहेर्‍या इतके सक्षम असल्यामुळे तबला वादकाला त्याचे काम सादर करण्याची संधी मिळते.सुधाकरजींच्या रचनांमध्ये सुद्धा ही खासियत दिसून येते.
मी गेले तीन-चार वर्ष त्यांनी केलेल्या अनेक संगीत रचना ऐकल्या आहेत.त्या मला मनापासून भावल्या आहेत.सुधाकरजींच्या गझला या शास्त्रीय संगीतातील बंदिशींसारख्याच विस्तारक्षम असून,अशा संगीत रचना ताकदीने उभा करणारा कंपोझर म्हणून सुधाकरजींकडे आदराने पाहिले जाते.त्यांचा बराच मोठा काळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेला.विदर्भ,यवतमाळ या परिसराला कवी,साहित्यिक,कलाकार अशा मंडळींचा वारसा लाभला आहे.सुधाकरजींनी बर्‍याच काळापर्यंत प्रसिद्ध कवी,गझलकार कै.सुरेश भट यांच्या समवेत व्यतीत केला.कै.भट हे एक प्रभावी आणि आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते.त्यांच्यासारख्या प्रतिभाशाली व्यक्तीच्या सहवासातून सुधाकरजींनी मराठी गझल ही सर्वमान्य श्रोत्यांपर्यंत पोहचवली.
सुधाकरजींना त्यांच्या वाढदिवसाबद्दल मन:पूर्वक शुभेच्छा!

शब्दांकन : मोहना रामदास पळसुले

संदर्भ : श्री सुधाकरजींनी स्वरब्द्ध केलेल्या गझलांचे इतर गायकांनी केलेले कार्यक्रम तसेच ’काट्यांची मखमल’,’तुझ्यासाठीच मी…’ आणि ’अर्चना’ हे अल्बम.
...................................................






संगीत आणि साहित्य :