हनीफ़ साग़र साहब की यह ग़ज़ल जल्द ही आपकी ख़िदमत में.
कोई मोसम हो ख़िज़ाँ बरसात धूप
फूल के जैसा खिला लगता है तू...
सी-१-सी/१३,गिरीधर नगर,वारजे-माळवाडी,पुणे-५८. मोबा.8888858850
माझी मराठी गझल गायकीमराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल) |
हनीफ़ साग़र साहब की यह ग़ज़ल जल्द ही आपकी ख़िदमत में.
कोई मोसम हो ख़िज़ाँ बरसात धूप
फूल के जैसा खिला लगता है तू...
पद्मश्री सुरेश वाडकरजी की पुत्री अनन्या वाडकर की आवाज़ में,पुणे के मशहूर शायर मरहूम हनीफ़ साग़रजी की एक उर्दू ग़ज़ल अभी अभी रेकॉर्ड की है।.मिक्सिंग,मास्टरिंग के पहले एक शेर आपकी खिदमत में पेश है....
चंद सांसें गुज़ारने के लिए
कितने अरमान ख़्वाहिशें कितनी
मेरी दुनिया में गर्दिशें कितनी
ज़िंदगी एक रंजिशें कितनी
आर्णीला नोकरी (१९७२) तर मिळाली.पण घर मिळणे कठीण होऊन बसले होते.संगीतवाले म्हणजे बँड, तमाशेवाले असा काहीतर समज आर्णीकरांचा होता.आणि तो संयुक्तिक असावा.कारण त्यावेळी वीस हजार लोकवस्तीच्या या गावात बाराही महिने तमाशाचा फड ठिय्या देऊन असायचा.
कशी-बशी एक खोली मिळाली.पण मालक इतका कटकट्या होता की, छोटे अडॅप्टर लावून ट्रान्झिस्टर रेडिओ लावला तर इलेक्ट्रीक बिल वाढते म्हणून ओरडायचा. मी यवतमाळात जरी मस्ताडलेला प्राणी होतो तरी आर्णीत मात्र मास्तर असल्यामुळे गोगलगाय झालो होतो.पहिली दोन वर्ष मला कठीण गेली. पण नंतर लक्षात आले की येथे शेर नाही तर सव्वाशेर झाल्याशिवाय काही आपला निभाव लागणार नाही.म्हणून मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.प्रथम संगीत विद्यालय सुरू केले.
नंतर संगीत विद्यालयातर्फे छोटे-मोठे सांगीतिक कार्यक्रम केले.संस्थाध्यक्ष चितघनानंदजी भारती नाटकाचे शौकीन होते.त्यांना मला घेऊन संत दामाजी हे नाटक बसवायचे होते.या नाटकात ते बिदरच्या बादशहाचे पात्र करून मला दामाजीपंत बनवणार होते. परिसरात भारतीजींचा रुबाब एखाद्या बादशहापेक्षा कमी नव्हता.पण त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे नाटक काही रंगमंचावर आले नाही.
छोट्या-मोठ्या सांगीतिक कार्यक्रमामुळे आर्णी व परिसरातील संगीत प्रेमी हळू हळू माझ्याशी जुळायला लागले.तसेही रोजच्या शालेय प्रार्थना,१५ ऑगष्ट,२६ जानेवारीच्या कार्यक्रमातील सहभागामुळे माझ्याबद्दल गावकरी व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळा निर्माण व्हायला लागला होता.शाळेत मी अत्यंत कडक होतो.पण शाळेच्या बाहेर 'मऊ मेणहूनी...'! गावातील काही संगीत प्रेमींच्या सहकार्याने साहित्य,संगीताच्या जोपासनेसाठी 'स्वर-गंगा' ही संस्था स्थापन करून शाळेच्या विज्ञान विभागाच्या हॉल मध्ये छोटे-मोठे कार्यक्रम घेणे सुरू केले.या उपक्रमा करीता शाळेतील संगीत प्रेमी शिक्षकांसोबतच मुख्याध्यापक स्व.शंकरराव बुटले गुरुजींचे मोलाचे सहकार्य मिळत होते.वरील सगळ्यांच्या सहकार्यामुळे अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख स्व.पंडित बाळासाहेब कासलीकर,नागपूर आकाशवाणीचे तार शहनाई वादक स्व.बाबासाहेब देशपांडे, कविवर्य स्व.सुरेश भट,दैनिक तरुण भारतचे संपादक स्व.वामन तेलंग,विदर्भातील प्रसिद्ध कीर्तनकार स्व.आप्पामार्जिने, कवी स्व.शंकर बडे, प्रा.श्रीकृष्ण राऊत,मिराताई ठाकरे,नारायण कुळकर्णी कवठेकर,हास्य सम्राट फेम मिर्झा रफी अहमद बेग,राजा धर्माधिकारी यांचे कार्यक्रम आयोजित करता आले.बरीच नावे आता आठवत नाही. तसेच सिंधुताई सपकाळ, विसुभाऊ बापट यांचे, आमच्या शाळेसह आर्णीच्या विविध संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित करून आर्थिक मदत मिळवून दिली आहे.या वेळी प्रत्येकाचा मुक्काम माझेकडेच असायचा.सिंधुताई सपकाळ तर अनेकदा आर्णीला येऊन गेल्या.(त्या वेळी त्या सेलिब्रेटी नव्हत्या.) आणि जितके दिवस कार्यक्रम असेल तितके दिवस त्यांचा मुक्काम माझ्याकडे असायच्या. सुलभा सगळ्यांची आवभगत अगदी जिव्हाळ्याने करायची.
पण गावातील लोकप्रियता,शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन असो की, १५ ऑगस्ट,२६ जानेवारी असो माझा वावर आणि सहभाग लक्षणीय असायचा. त्यामुळे मुख्याध्यापक,संस्थाध्यक्ष यांची माझ्याशी विशेष जवळीक असायची.या सगळ्यामुळे काही शिक्षकांच्या पोटात दुखायला लागले.व त्यांच्या 'काड्या' सुरू झाल्या.त्यावेळी मी ऑर्केस्ट्रामध्ये असल्यामुळे कार्यक्रम सुरूच असायचे.मी आर्णीला आणि ऑर्केस्ट्रा ग्रुपयवतमाळला.
ज्या काळात आजच्यासारखी वाहने नव्हती त्या काळात शाळा करून बाहेरगावचे कार्यक्रम करणे किती जिकरीचे असेल हे वाचक जाणू शकतील.मग कधी कधी सलग कार्यक्रम असले की,शाळा संपल्याबरोबर यवतमाळ गाठणे.तेथून भाड्याच्या बसने कार्यक्रमाचे गाव गाठणे,कार्यक्रम करून वापस यवतमाळ व सकाळची पहिली बस पकडून आर्णी...सरळ शाळेत.जागरणामुळे डोळे लाल असायचे.नेमके हेच पकडून पर्यवेक्षकाने 'कदम सर माझ्याकडे लाल डोळे करून बघतात',अशी तक्रार मुख्याध्यापकांकडे करणे,शाळेपेक्षा कार्यक्रमाकडे त्यांचे लक्ष असते, तासिकांवर उशिरा जातात,
शिक्षक कक्षात झोपतात वगैरे वगैरे बालिश तक्रारी सुरू झाल्या.परंतू मुख्याध्यापक (स्व.शंकरराव बुटले) व संस्थाचालक (स्व.राजकमलजी भारती) माझी ससेहोलपट बघत असल्यामुळे, तसेच शाळेचा नावलौकिक वाढत असल्यामुळे त्यांच्याकडे तक्रार गेल्यावर दुर्लक्ष करायचे.
(१९८० नंतर "सुधाकर कदम,आर्णी" एवढ्या पत्यावर माझी पत्र यायची.ती आजही माझ्याकडे आहेत.यात माझा मोठेपणा दाखविण्याचा उद्देश नसून वस्तुस्थिती आपल्या समोर ठेवणे एवढाच आहे.)
१९७२ ते २००३ या ३१ वर्षांच्या कालखंडात मी आर्णीत बरेच उपदव्याप केलेत.गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना, इयत्ता १ ते १० वीच्या पाठयापुस्तकातील कवितांना स्वरबद्ध करून 'झुला' नामक कॅसेटची तीन भागात निर्मिती, शाळेत 'दत्त जयंती उत्सव समिती', गावात 'शिवजयंती उत्सव समिती स्थापन करून शिवजयंती उत्सव साजरा करणे',विदर्भ स्तरीय एकांकिका स्पर्धा,मराठी गीत-गझल गायन स्पर्धा, आकाशवाणी सांस्कृतिक संध्या, नाट्यप्रेमींसाठी 'अभिनय कला मंडळ','शिवसेनेची स्थापना', 'पत्रकार संघाची स्थापना', 'मराठा सेवा संघ',' वृक्षारोपण कर्यक्रम',वऱ्हाडी कवी संमेलन, हास्य-व्यंग (हिंदी) कवी संमेलन वगैरे वगैरे...या सगळ्या उपदव्यापात आर्थिक गणित मात्र 'व्यस्त' असायचे.त्यामुळे बायको 'त्रस्त' असायची. पण या व्यस्त-त्रस्ततेची झळ तिने मला कधीच लागू दिली नाही.
-----------------------------------------------------------------------
● गांधर्व संगीत विद्यालयाच्या वार्षिकोत्सव प्रसंगी आयोजित हास्य-व्यंग कवी संमेलनातील कवींचे स्वागत करताना मी... डावीकडे खाली बसलेले, सुप्रसिद्ध मंच संचालक व कवी किरण जोशी, ज्यांचे स्वागत करीत आहे ते डॉ.नीरज व्यास,कमल सागर आणि एकदम उजवीकडे, प्रसिद्ध हास्य-व्यंग कवी एहसान कुरेशी.
आणि बाकी उदव्याप....
मज कळले तू माझी पण सगळे घडल्यावर
तू माझ्या गगनातुन उल्केपरी ढळल्यावर
कळत न ही आज कुठे वनवासी वाट वळे ?
स्वप्नाच्या सरितेवर ही कुठली लाट जळे ?
हरवुन संदर्भ उभे जळ कुठल्या वळणावर
डोळ्याचे डोह दोन भरून आज आलेले
अश्रूंच्या पावसात चांद्रबिंब न्हालेले
क्रुसावर सनईच्या चंद्रकौंस खिळल्यावर
अजून कापऱ्या जळात प्रतिबिंबित आठवणी
अजून विराणी तळात गात कुणी जलराणी
एक कहाणी विझली मूक नदी काठावर
● सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड).सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.
● दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.
#गीत #song #music #composition #sudhakarkadamscomposition #गीतकार #संगीतकार #कवी #कविता
मुक्काम पांढरकवडा, २६ डिसेंबर ८१ ची ती रात्र. दहा वाजले. स्थानिक पुरोगामी साहित्य कलासंघ द्वारा आयोजित '#रंग_माझा_वेगळा'... कृषी भवन श्रोत्यांनी गच्च भरलेले. सुरेश भटांचा रंग वेगळा आहे हे इथल्या रसिकांना केवळ वृत्तपत्रे वाचून ठाऊक होते. उत्कटता शिगेला पोचलेली. हारतुरे, परिचयादी उपचार घाईघाईने उरकण्यात आले.
मायभूमीला नतमस्तक होऊन #सुरेश_भटांनी रंग भरण्यास सुरूवात केली.
'जय जन्मभू जय पुण्यभू जय स्वर्गभू सुखदायिनी
जय धर्मभू जय कर्मभू जय वीर भू जय शालिनी।।
काश्मीरच्या छातीतुनी जखमा तुझ्या बघ वाहती
जय कोटी जय गणमानीनी जय सकल मानस मोहिनी।।
ऊंच स्वरः नीरव स्तब्धता, भारतमातेचे ते 'जयगान' भारतामाता तेजस्वी आहे: विजेसारखी प्रखर, ह्या काळोखी विश्वात ही मायभूमी 'सौदामिनी' आहे:
नाही बरे माझा तुझा जनती जिव्हाळा संपला
साध्या सुध्या शब्दात या, तू ओतिली मंदाकिनी।।
लगेच 'वय निघून गेल्या' ची खंत सुरेश भटांनी प्रदर्शित केली-
देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले
गेले ते उडुन रंग उरले हे फिकट संग
हात पुढे करण्याचे वय निघून गेले
रिमझिमतो रातंदिन स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले
हृदयाचे तारुणपण ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले
आणि खरेच विसाण्याची गरज दिसू लागली. रंगावर भुलण्याची हात पुढे करण्याची, चेहऱ्यात जगण्याची, नावगाव पुसण्याची मजा काही 'और' असतेः परंतु नियती इथेही भींत बनते कालसीमेच्या रुपाने. म्हणूनच काही वेळासाठी सुप्रसिद्ध गायक #सुधाकर_कदम यांचेकडे व्यासपीठ सुपूर्दः-
'हा ठोकरून गेला, तो ठोकरून गेला
जो भेटला मला तो, वांधा करुन गेला
चाहूल ही तुझी की, ही हुल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी, तोही दुरुन गेला।
वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला
आपल्या मनाच्या वेशीवर आलेले आपलेच सवाल आपल्याच ओठात जेव्हा जिरतात, आपल्यालाच वगळून फुलांची दिंडी जेव्हा निघून जाते तेव्हा माणसे चलबिचल झाल्याशिवाय कसा राहणार? श्रोतृवृंदास चिंतनाच्या गर्तेत सुधाकर कदमाने आपल्या मधुर कंठाने अशाप्रकारे लोटले खरे आणि सुरेश भटांनी 'अजून काही' सांगण्यास सुरूवात केली-
'तुझ्था नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही
तसा न रस्त्यात, आज धोका मला परंतु
घरात येतात वाटमारे, अजून काही।
(वाटमाऱ्यांचा पद्यांश पुन्हा ऐकावासा वाटल्यावरुन श्रोत्यातून 'वन्स मोर'चा आवाज.)
करु नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे, अजून काही
विझून माझी चिता युगे लोटले तरीही
विझायचे राहिले निखारे, अजून काही
सुखाव्या निवांत दारास आपण नको असलो तरीही व्यथांची काही दारे अजूनही सताड उघडी आहेत आणि दिशांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न करुनही बंडखोर वारे वाहत असतातच. श्रोत्यांनी मनमुरादपणे दाद दिली.
परत एकदा सुधाकर कदम मुक्तीनाथाची भूमिका बजावतात पण 'भलत्याच वेळी लाजणं बरं नव्हें' चा इशारा देत
हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही
आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही
मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणाऱ्याने जागणे बरे नाही
एकमेकांचा जीव जाळणे, लाजणाऱ्याने जागणे बरं नव्हे असा सुरेश भटांचा हितोपदेश सुधाकर कदमाच्या सुरेल आवाजाने रसिकांची श्रृंगार मने चाळवून गेली.
हरवलेले सुगंधित क्षण पदरात बांधून व पूर्णिमेची चांदणी वेणीत माळून येण्याची प्रतीक्षा करता करताच आयुष्याच्या संध्याकाळची दुखद चाहूल रसिकांना स्पर्शन गेली.
जितके जगावयाचे, तितके जगून झाले
फिरते उगीच जाते, जगणे दळून झाले
तुमच्या खिशात ठेवा, तुमचे रुमाल कोरे
आत्ताच आसवांनी, डोळे पुसून झाले।
रसिकांच्या मनातील हुरहुर विरते न विरते तोच अध्यात्मिक तार्किक विद्रोहाची विषमतेची जाण उफाळून आली ती अशी-
शेवटी वेदमंत्रांनी अन्याय एवढा केला
मशहूर ज्ञानया झाला, गोठ्यातच जगला हेला।
पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना
कोणीच विचारत नाही, माणूस कोणता मेला?
जगण्याचे मद्य व जन्माची घूंद हवी असणाऱ्यांनी हृदयाचा फुटका पेला आपल्याच रवताने विसरले पाहिजेल असे सांगून परत सुधाकरांनी माईक घेतला...
चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला।
ओठ ओठांना सतावू लागले
श्वास गालाला छळाया लागला।
तोच मी होतो गडे हा तोच मी
जो तुला आता कळाया लागला।
लोकप्रिय व उत्साही माजी नगराध्यक्ष डॉ. धावडे यांच्या 'फरमाईश' वरुन उपरोक्त गझल गाण्यात आली:
चंद्र तसा तो मावळतीचा, आणि आता 'हा असा चंद्र'---
हा असा चंद्र, अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठीं।
काय आगीत कधी आग जळाली होती?
लोक नेतील मला खोल पुरायासाठी।
नेहमीचेचे जुने घाव मोजायचे सोडून उभा जन्म चिरायासाठी सखीला 'ये गडे' म्हणताना टाळ्यांचा कडकडाट झाला. राग, रंग, रस, जीवनानूभती, इत्यादींवर आरुढ होतहोत 'रंग माझा वेगळा'चे प्रथम चरण संपले.
कार्यक्रमाच्या पूर्वाधातील कुणी काव्यांश गुणगुणत, कुणी त्यावर भाष्य करीत करीत या रसिकांनी सभागृहात पुनश्चप्रवेश केला आणि सुरेश भटांनी गझल रूपातील 'पूर्तना' ही कविता गाण्यास सुरूवात केली.
'पूर्तता माझ्या व्यथेची, माझी मृत्यूत व्हावी
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी।
सोबती काही जीवाचे, मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली, चिता माझी जळावी।
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने कार्यक्रमाचा उत्तरार्ध प्रारंभ झाला आणि अत्यंत उंच आवाजात सिंहाच्या आरोळी समान सभागृह दणाणून गेले ते 'भीमवंदना 'ने-
भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना।
कोणते आकाश हे? तू अम्हा नेले कुठे?
तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे?
या भरार्या आमुच्या, ही पाखरांची वंदना।
जाळले गेलो तरी सोडले नाही तुला
कापले गेलो तरी तोडले नाही तुला
मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना।
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावनस्मृतीच्या वंदनेनंतर सुधाकर कदमांनी आपली गझल पेश केली अश्रूला जन्मभर नानाविध बहाणे सांगितले खरे परंतु फसव्या जिण्याचे दांभिकपण शिकता येऊ नये तर. आणि मग अशी 'रात्र'-
केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकुनि डोळे, हरवून रात्र गेली।
अजून सुगंधी येई, खोलीत मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली।
देहभान विसरून रसिक तल्लीन झालेले: साज, रसिकता शिखर गाठतागाठताच साऱ्यांची काळिजे चरचरुन जाणारी दुःखद बातमी श्रोत्यांपर्यंत येऊन थडकली. आणि साऱ्यांचच डोकं सुन्न झाले, अचानक कु. माया बोरेले निघून गेल्याची ती दुष्ट वाता ऐकून:
पायाशी लोळण घेणाऱ्या कांचनाला तिच्या सामाजिक व साहित्यिक मनोकामनेने केव्हाच ठोकरले होतेः माया कवयित्री होती. सुरेश भटांचेही मन हेलावून गेले. काही क्षण डोक्यावर हात ठेऊन स्तब्ध बसले आणि समारोप असा केला-
कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही।
हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही।
मी रंग पाहिला या मुदांड मैफिलीचा
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही।
-हरिश्चंद्र भेले याजकडून
दैनिक लोकमत, नागपूर
. -आस्वाद-
#काळोखाच्या_तपोवनातही_प्रकाशाची_वाट...
मराठी साहित्यात आणि त्यातही गझलच्या प्रांतात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.ज्यांची शब्दसंपत्ती वाचकांना अंधाराच्या पायवाटे सोबत चालतांना प्रकाशाची उधळण करीत दिशा दाखवतील असा अनुभव सातत्याने मिळत राहतो.पुस्तक हाती पडल्यावर सुटत नाही असा सुधाकर कदम यांचा “ #काळोखाच्या_तपोवनातून ” हा
काव्य संग्रह वाचताना वाचकांना आत्मभान देत जातो. सुधाकर कदम हे अवघ्या महाराष्ट्राला गझल संगीतबध्द करणारे संगीतकार म्हणून माहीत असले तरी ते शब्दाचे पूजक आणि साधक आहेत.त्यांनी गझल,कविता,
विडंबनकार,गीतकार असा बराच प्रवास केला आहे.त्यांचा हा संग्रह वाचतांना वाचकांना भावतरलता आणि त्याचवेळी त्यांचे जीवन चिंतनाचा अनुभव वाचायला मिळतो.माणसं माणसांपासून वर्तमानात दूर जाता आहेत.माणसांची नाती सैल होता आहेत.नात्यातही व्यवहार पाहिला जातो आहे.स्वार्थाच्या बाजारातील बंध अधिक घटट होत असल्याने नाते विरळ होता आहेत.याचे कारण ती नाती हदयांसी बांधली गेलेली नाही हे वर्तमानातील वास्तव आहे.आपण जेव्हा हदयाशी नाते सांगत बंध निर्माण करतो तेव्हा त्याचा अनुभव वेगळाच असतो.
त्यातील अनुभूतीचा आंनदही अनुभवायला हवा आहे.ते लिहितात...
'कधी कुणाला अपुल्या हदयी वसवून बघ ना
अजून काही नवीन नाती जुळवुन बघ ना...'
खरेतर कविता,गझलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असताना अनेकदा कवी जीवन तत्वज्ञानाचे दर्शन घडवत असतो. अनेकदा समाजाचे वास्तव दर्शनही त्या शब्दांच्या माध्यमातून घडते . त्यासाठी कवी आपल्या जीवनाचे अनुभव,आपल्या भोवताल मध्ये जे काही दिसते तेही शब्दात नेमकेपणाने व्यक्त करीत वाचकांना आनंद आणि तत्वज्ञानाचे दर्शन घडवितांना दिसतात. वरवरच्या सौंदर्यांच्याला भाळत लोक त्याचे कौतूक करतील पण ते सौंदर्य ज्या काटयावरती टिकून आहे त्या काटयांच्या वाटयालाही दुःख आहेच.समाज व्यवस्थेतही सत्याच्या वाटेने जाणा-याच्या वाटयाला काटयासारखी उपेक्षा येत असते.आपण शेर समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर बरेच काही उलगडत जाते.त्यामुळे आपल्या भोवतालमध्ये जे काही दिसते आहे ते खेदाने व्यक्त करताना म्हणतात...
'मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची
काटयास मात्र येथे कसलाच ना निवारा...'
गझल,कवितामधून प्रेम व्यक्त केले जाते. प्रत्येकाच्या तारूण्यात मनातील भावभावनांच्या गंधीत आठवणी असतातच.त्या काळात मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून कविता आधार बनतात.तर वाचकांही तारूण्यातील प्रेमासाठी अनेकदा शेर उपयोगी पडत असतात. जीवन अनुभव घेऊन आपला प्रवास सुरू राहीला तर वय वाढत जाते पण मनातील भावना मात्र सतत ताज्या आणि टवटवीत असतात.त्या जुन्या आठवणीना आजही उजाळा देताना कदम लिहितात...अर्थात हा अनुभव प्रत्येकाचाच असतो.आनंदाच्या आठवणी नेहमीच प्रसन्न असतात..
मनात माझ्या अजूनही तू तशीच आहे
फुलासारखी प्रसन्नताही तशीच आहे..
माणसांच्या ढोंगीपणाचा कळसही आपल्या भोवतालमध्ये सातत्याने दिसत असतो.माणसं वरवर फारच देखावा करतात.वर्तनातील बाहय वर्तन बदलते .मात्र अंतरिक परीवर्तनाची कास असावी लागते ती हरवली जाते.माणसं बदलतात मात्र या बदलाने फार काही साधले जात नाही.अनेकदा भगवे वस्त्र अंगावर घेतले जात असले तरी वरून साधू बनता येईल पण त्या वस्त्राच्या आत असलेला त्याग आणि वैराग्य आतून यायला हवे असते.त्यामुळे वस्त्र परीधान करूनही भोगाची वृत्ती संपत नाही त्याबददल खंत समाजाला असतेच.असे सर्वच क्षेत्रात सुरू आहे..त्या देखाव्यावरती प्रहार करताना गाळ अंतरिच्या या गझलेत ते लिहितात...
'भगव्यास पांघरूनी वरतून शुध्द झालो.
पण गाळ अंतरीचा तो राहिला बिचारा...'
माणसांचे जीवन खरेतर त्या एका नियती नावाच्या अनामिक शक्तीशी जोडलेले आहे.जीवन म्हणजे दुःखाचा सागर आहे हे संतानी वास्तव सांगितले आहेच.मात्र तरी जीवन रूपी चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागतो.त्यातून सुटका करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यावर मात करणे होत नाही.जे संचिती असते ते भोगावेच लागते.कारण नियती जोखडून ठेवत असते..त्या संदर्भाने कवी लिहितात...
'आयुष्याच्या चक्रव्यूहातून कधीच सुटका नसते.
नियती त्याला दळण्यासाठी खुंटा मारून बसते...'
जीवनात दुःख सामावलेले आहे.ते दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने माणसं करीत असतात.अशा परीस्थितीत वास्तवाचा स्वीकार करीत त्यावर मात करण्याची गरज आहे.मात्र या कालचक्रातील या वर्तूळात हे घडत राहाणार आहे त्याला आपण का भ्यावे ? त्याला सामोरे जाताना आपण अधिक आंनदाने प्रवास करायला हवा.त्याकरीता मानवी जीवनात हास्य हा महत्वाचा उपाय आहे.माणसांने सतत हसत रहावे आणि त्याच बरोबर इतरांना हास्य देत रहावे हे जीवनसूत्र पाळत गेलो तर बरेच प्रश्न सुटू शकतात म्हणून कवी लिहितात...
'हासुनी हसवायचा हा मंत्र घे
दुःख का कुरवाळतो तू सांग ना!'
आपण जीवनात सुख दुःखाचा अनुभव घेत असतो.त्या अनुभवात हसणे आणि रडणे या नैसर्गिक क्रीया घडत असतात.खरेतर जीवनात कोणताही अनुभव आला तरी त्या परीस्थितीत आपले आपणच जगत असतो.हा सारा अनुभव आपला व्यक्तीगत असतो.त्यामुळे या काळात आपण स्वतःला समजावत दुःखाच्या काळात सुखाने फुलता यायला हवे.अर्थात आपण जीवनाकडे कसे पाहतो याला अधिक महत्व आहे.त्यामुळे वाचकांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलावे म्हणून ते म्हणतात...
'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे...
जीवनात माणसांने आपला प्रवास कसा सुरू ठेवायचा यामागे प्रत्येकाचे असे काही तत्वज्ञान असू शकते.जीवन अनुभव भिन्न असले तरी अनेकदा दुःखावर मात करण्यासाठी असलेले मार्ग समान असू शकतात.त्या संदर्भाने कवी वाचकांना काही सांगू पाहता आहेत.त्याच बरोबर आपला अध्यात्मिक प्रवास हा देखील मुक्तीसाठी असतो.ती मुक्ती प्राप्त करण्यासाठी लोक कितीतरी विविध मार्गाने प्रयत्न करतात.मात्र कवी मुक्तीचा साधा सोपा उपाय सांगता आहेत.कवी त्यासाठी अभंग या प्रकारात उपदेश करतांना लिहितात
'दीन दुःखितांना / मदत जे करी
तेणे मुक्ती चारी / साधलिया...'
माणसं जीवनभर आपला प्रवास सुरू ठेवताना तो सुखाचा व्हावा म्हणून एका शक्तीमान असलेल्या निर्मिकाची प्रार्थना करीत असतात.ती प्रार्थना प्रत्येक धर्माची व्यक्ती करीत असते.आपला देव वेगळा असला तरी त्याचेकडे मागणे एकच आहे.ते मागणे जीवनशुध्दी आणि जीवनातील दुःख कमी करण्यासाठी असते.जीवनातील दुःखाचे मुळ कारण केवळ तृष्णा आहे हे कवीला माहित आहे.आपली जीवनातील तृष्णा संपली , की जीवनानंदाचा प्रवास सुरू होईल म्हणून ते अज्ञाताची हाक या कवितेत लिहितात..
'कोणाचिही करा / एकत्र प्रार्थना
मिटवाया तृष्णा / निरागस...'
जीवनाच्या वास्तवाचे दर्शन अनेकदा काव्यातून वाचकांना होत असते.आपण जीवनभर आपले आपले असे करत जगतोच.स्वार्थाच्या पलिकडचा प्रवास तसा फारसा होत नाही.अशा परीस्थितीत आपण बरेच काही गमावत असतो.त्या गमविण्याची चिंता आयुष्याच्या शेवटी लागते.अशा परीस्थितीत जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जीवनाच्या वास्तवाचे दर्शन घडते.जीवनाचा प्रवास प्रत्येकाला एकटयालाच करायचा आहे.सोबत कोणीच नसते अखेरच्याक्षणी..मात्र ही जाणीव आयुष्यात होत नाही..जीवनाचे वास्तव दर्शित करताना कवी सांगू पाहाता आहेत.
'सरणावरती चढतो जेव्हा
कोणी नसते त्याच्या पाठी'
आपल्या भोवती जे काही दिसते त्याच्या वेदना साहित्यातून येण्याची गरज असते.साहित्य हे अनुभवाची मांडणी असते.त्या अनुभवाच्या शिवाय येणारे साहित्य हे वाचकांच्या अंतकरणाला स्पर्श करू शकणार नाही.मात्र अलिकडे साहित्यातही बरेच काही घडते आहे.साहित्यातील वास्तवाचे दर्शन ते घडवितात.आपण गरीबीच्या वेदना पोटभर आहार घेऊन मांडल्याने त्यातून त्या साहित्यातून फार काही परीवर्तन घडण्याची शक्यता नाही.अनुभव शुन्यतेची मांडणी समाज परीवर्तन करू शकणार नाही.ही जाणीव निर्मळ अंतकरणाच्या लेखकाला असते म्हणून कवी ती सल मांडताना लिहितात
'ए.सी.त बसोनी / शेतक-यावरी
लिही कांदबरी / मुंबईत...'
माणसं ढोंगीपणाने वागत असतात ,त्या ढोंगीपणावर केलेला प्रहार अनेकदा वाचताना मिळतोच.समाजातील या वास्तवाचे निरिक्षण करीत असताना ,त्यांना काय म्हणावे ? असे प्रश्न पडतो तेव्हा कवी अत्यंत सोप्या भाषेत त्याची उत्तरे देऊ पाहाता आहेत.उत्तम समाजाची निर्मिती हे प्रत्येक चांगल्या माणसांचे स्वप्न असते.त्या प्रवासात चांगली माणसं कोणती याची उत्तरे आपल्याला मिळत जातात..कवी काही माणसांची लक्षणे नमूद करतात..ते लिहितात..
'ज्याच्या तोंडामध्ये / तंबाखू नि बिडी
तयासी पाखंडी / म्हणावे गा...'
व्यसनापासून मुक्त असलेला समाज हा नेहमीच चांगल्या समाजाचे लक्षण आहे.या कविता संग्रहात कधी गझल , कधी अंभग ,कधी निव्वळ कविता अनुभवायला मिळते.शब्दाचा फुलोरा न करता जीवन तत्वज्ञानाचे दर्शन या संग्रहात घडते.अत्यंत सुक्ष्म निरिक्षणही आपल्याला अनुभवायला मिळते.संगीत साधनेने जीवनाला मिळालेला आंनदाचा मार्गही अनुभवता येतो.कविता संग्रह अत्यंत वाचनीय झाला आहे.कविता संग्रहाचे अविनाश वानखेडे यांचे मुखपृष्ठही वाचकांना चिंतन करण्यास भाग पाडते.
◆ काव्य संग्रह : काळोखाच्या तपोवनातून
◆ कवी : गझलगंधर्व सुधाकर कदम #sudhakarkadam
◆ प्रस्तावना : डॉ. राम पंडित #rampandit
◆ मुखपृष्ठ : डॉ. अविनाश वानखडे #avinashwankhade
◆ प्रकाशक : स्वयं प्रकाशन मो. 8888769659
◆पाने : ९६
◆मूल्य : १५० ₹
-संदीप वाकचौरे #sandipwakchaure
संग्रह मिळवण्यासाठी तपशील -
किंमत रु. १५० + टपालखर्च ५०
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.
google pay - 8888858850