गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, July 25, 2024

कविता जगणारी माणसं ! भाग १.


महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन
#गझलगंधर्व  - सुधाकर कदम.
यांच्या दीर्घ मुलाखती मधील... #प्रथम_पुष्प 

विशेष आभार - 
गायक - मयूर महाजन.
तबला वादक - किशोर कोरडे.

●आवडल्यास चॅनेलला like, share आणि subscribe करायला विसरू नका.

धन्यवाद!
    🙏🏻
●headphone please


 

Wednesday, May 15, 2024

कं-दर्प


     सध्या भाव पडल्यामुळे कांदा या विषयाने उग्र रूप धारण केलेले दिसत आहे.भारत सरकारच्या तळ्यात-मळ्यात धोरणामुळे कधी निर्यात बंदी तर कधी निर्यातीला परवानगी देऊन भरपूर कर लावणे या प्रकारामुळे कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे.त्यामुळेच काल नाशिकला झालेल्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 'कांद्यावर बोला'  असे म्हणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.

     कांदा हा गरिबांच्या जेवणातला अनिवार्य घटक आहे. भाव वाढले की कांदे घरात असणे ही तालेवार समजल्या

 जाण्याची लक्षणे मानल्या जातात.. झुणका-भाकर आणि कांदा म्हणजे वऱ्हाडी लोकांची खास 'डिश' आहे. मधल्या काळात युतीच्या राज्यात झुणका-भाकरीला राजाश्रय मिळाल्यामुळे सरकार-दरबारीही तिचे वजन वाढले होते. झुणका-भाकरीची खरी मजा कांद्याशिवाय येत नाही. पण कांदा महागला की झुणका-भाकर खाणे गरिबांना परवडत नाही. उच्चभ्रू मंडळी मात्र या खास 'डिश'ची सामूहिक मजा घ्यायला लागली आहे.

      १९९७ मध्ये मुंबईच्या विधानभवनात कांदा प्रकार खूप गाजला होत्व. काही 'फेक्या' लोकांनी कांद्याचा चेंडू बनवला व सदैव स्वयंपाकघरात मुक्कामी असणाऱ्या कांद्याला विधानभवनात नेऊन 'एक कांदा फेकू बाई, एक कांदा झेलू' या बायकी खेळाचा शौक पुरा केला आणि तेव्हापासून कांद्याला चांगले दिवस यायला लागले. युती सरकारने तेव्हाच, कांद्याचे भाव वाढणार हे समजून घ्यायला हवे होते. पण असे घडले नाही व परिणाम काय झाला हे तेव्हाच्या सरकारने पहिलेच आहे.

     कांद्याला दुसरे नाव आहे कंदर्प ! कंदर्पातील दर्प काही लोकांना सहन होत नाही. पण स्वतःचा 'दर्प' मात्र कायम ठेवणे या लोकांना आवडते. चातुर्मासात चार महिने कांद्याचे दर्शनही न घेणारे, स्वभावातील 'दर्प' मात्र दूर करू शकत नाहीत. त्यामुळे जवळच्या लोकांना जगणे असह्य होते.

     स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याची चळवळ राबविणाऱ्यात जसे दोन गट होते तसेच जहाल व मवाळ... तसे कांद्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. जहाल कांदा त्याचेवर हल्ला करणाऱ्याला रडवून 'दे माय धरणी ठाय' करून सोडतो, तर मवाळ कांदा मात्र कसेही वागलात तरी लाडीगोडी लावत असतो. स्वयंपाक घराशी माझा कधीच संबंध येत नसल्यामुळे जहाल कांद्याचे फार कौतुक वाटते. कारण माझ्या समोर सदैव नखं काढून डरकाळणारी,  वाघिणीच्या कुळातली बायको जेव्हा 

कांद्यासमोर गोगलगाय बनून अश्रू ढाळत बसते तेव्हा मला आसुरी की कोणता तो आनंद उपभोगायला मिळतो.

       दर्प म्हणजे वास. तसेच दर्प म्हणजे गर्व हाही अर्थ निघतो. कांदा आणि दर्प याचा जसा जवळचा संबंध आहे तसा माणूस आणि गर्व याचा आहे. 'गर्वाचे घर खाली', 'गर्व माणसाला धुळीत मिळवतो' हे माहिती असूनही प्रत्येक माणसाला कशाचा ना कशाचा गर्व असतो. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हातानेच जाणार हे लक्षात असूनही मीपणा काही सुटत नाही. माणसांचे एक सोडा ! पण सध्याचे आचार्य, भगवान, महंत स्वामी हे सुद्धा 'मी'च्या दर्पातून सुटले नाहीत. 'हा माझा आश्रम आहे!', 'मी जगाचे कल्याण करतो!', 'हे  विश्व (त्याच्या मठापुरते) मी निर्माण केले आहे!', 'मला शरण या!', 'मी चमत्कार करतो!', 'मी लोकांना मार्ग दाखवितो!' या 'मी' चा दर्प  कं-दर्पापेक्षाही भयानक आहे.

     कांदा तसा बहुगुणी आहे. उन्हाळ्यात कांदा जवळ ठेवला तर ऊन लागत नाही. मिरगी येऊन पडल्यास फोडलेला कांदा हुंगवला की शुद्ध येते. कसेही ऊन लागलेले असो कांद्याचा रस त्याला आराम देणारच. तसेच कांदा हा बलवर्धकही आहे. एका दीर्घायू माणसाने तर आपल्या मुलाखतीत, दीर्घायुष्याचे रहस्य रोज एक कांदा खाणे असल्याचे ठासून सांगितले. औषधी गुणांसोबतच कांद्याची भजी, कांद्याचे पिठलं, कांद्याचा झुणका, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचे लोणचे हे खाद्य पदार्थ खवैयांच्या जिभेला चाळवल्याशिवाय राहत नाही. दररोज एक कांदा खाल्ल्याने जर दीर्घायुष्य लाभत असेल तर आपला कांद्याविषयीचा 'दर्प' बाजूला ठेवून प्रत्येकाने कांदा खायला काय हरकत आहे ?

-सुधाकर कदम

१६ मे २०२४

Sunday, May 12, 2024

मध्यस्थ...

 

      चाटूगिरी या एका शब्दामुळे चाटू, चमचे, पळी, सराटा बगैरे सर्व चमचा-कुळातील वस्तूंच्या बाबतीत एक वेगळाच समज मानव प्राण्यांमध्ये तयार झालो आहे. ढवळाढवळ करणाऱ्या या वस्तूंना हीन लेखण्याचा माणसाचा प्रयत्न मुळातच निषेधार्ह आहे. खरे म्हणजे हात व ज्यात ढवळाढवळ करायची त्या वस्तूमधील मध्यस्थ म्हणजे चमचा-कुळ होय. पण माणसाच्या नको तिथे ढवळाढवळ करण्याच्या सवयीमुळे व नको तिथे 'चाटूगिरी' करण्याच्या पद्धतीमुळे या मध्यस्थांवर फालतूचे आरोप लागून बदनामी होत आहे. 'चाटणे' या शब्दावरून 'चाटूगिरी' हा शब्द आला असला, तरी गरम द्रावणात फिरवल्या जाणाऱ्या पळीलाच आजकाल चाटू म्हणायला लागल्यामुळे समस्त चमचावंशज अत्यंत नाराज झाले आहेत.वास्तविक चमचा-कुलोत्पन्न समस्त वस्तूंचे मानव जातीवर असंख्य उपकार आहेत. कारण खाद्यपदार्थ तयार करताना गरम गरम पदार्थांमध्ये फक्त हीच मंडळी ढवळाढवळ करू शकते. इतरांची बिशाद नाही. ही मंडळी नसती तर माणसांचे किती हाल झाले असते ! अन्न शिजतानाच या मंडळींचा उपयोग होतो असे नाही; आजकाल तर, जेवतानाही काटे-चमचे वापरण्याचा प्रकार रूढ होत चालला आहे. केळीच्या पानावरील गरमसूत जेवण जाऊन चिनीमातीच्या 'डीश' मधील अन्न काठ्या-चमच्याने खाण्यांचे दिवस आले आहेत.

      तर अशा या हाता-तोंडाच्या मध्यस्थांवरून  माणसातील मध्यस्थांना यांची नावे देणे म्हणजे कृतघ्नपणा नव्हे का? आणि माणसातील मध्यस्थांनाही दोन्ही बाजूकडून चटके बसत नाही का? उलट हातातोंडातील मध्यस्थांना फक्त एकीकडचाच चटका बसतो. तोंड फुंकर मारायला तयार असतं. पण माणसातील मध्यस्थांना तर कोठून कसे चटके बसतील, हे सांगताच येत नाही. त्यातल्या त्यात लग्नातल्या मध्यस्थांबद्दल तर न बोललेलेच बरे !

     कचेऱ्यांमध्ये सुद्धा अशा मध्यस्थांची फार गरज असते. 'बॉस' गरम असला की मध्यस्थच त्याला थंड करू शकतात. थंड करताना त्याला बॉसची स्तुती करावी लागते. नसलेल्या गुणांची तारीफ करावी लागते. पण म्हणून काय त्याला 'चमचा' म्हणायचे ? वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवणे, त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान हलविणे, भाजीपाला नेऊन देणे, सिगारेट पेटवून देणे, वाढदिवसाला घरची सर्व कामे करून भेटवस्तूही देणे, या माणूसकी, बंधुभाव, प्रेम, त्याग शिकविणाऱ्या गोष्टी अंगिकारल्याबरोबर त्याला चमचा, चाटू वगैरे उपमा देणे बरोबर आहे का ? उलट अशी माणसे आपल्याजवळ नसल्यामुळे आपले किती नुकसान होते, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा ! कारण बस, रेल्वेचे आरक्षण; शाळा-कॉलेजमधील प्रवेश,  पुढाऱ्यांच्या भेटी, साहेबाकडील जिल्हा व तहसील कचेऱ्यातील काम, कोर्टातील व पोलिस ठाण्यातली कामे आणि काळ्या बाजारातील वस्तू वगैरे मिळवायला मध्यस्थाशिवाय पर्याय नसतो. 'अडत्या' नामक एक मध्यस्थ तर धान्यबाजारातील देवाप्रमाणे असतो. शेतकरी व खरेदीदार यामधला महत्त्वाचा दुवा म्हणजे हा मध्यस्थ ! पण ह्याला अडत्या किंवा दलाल असे म्हणतात. तर मंडळी! या मध्यस्थांशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. दिल्लीत तर ह्यांनाच पॉवर-ब्रोकरही म्हणतात. अशी एकूण वस्तुस्थिती आहे. आपल्या देशात तर राजकारणी मंडळीत प्रत्येकागणिक एक दलाल म्हणजे मध्यस्थ आढळतो. एकूण झालेल्या खरेदीमध्ये मोठ मोठे मध्यस्थ दलाली खाताना दिसून आले आहेत. पण ही दलाली मात्र देशाच्या दृष्टीने घातक ठरून सरकारी तिजोरीला मोठे खिंडार पाडणारी ठरते.  तसेच बँकांचे कर्ज न फेडता ते बुडवून पळून जाणारी मंडळी सुद्धा देशाची गुन्हेगार  आहे.या लोकांना जेरबंद करून तो पैसा का वसूल केल्या जात नाही, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो.पण त्यासाठी  लागणारा बुद्धिमान मध्यस्थ त्यांच्या जवळ नसल्यामुळे नुसताच प्रश्न उभा राहतो. आणि प्रश्न फक्त उभा राहून सुटत नसतो. तो सोडवावा लागतो. पण सोडवल्याही तेव्हाच जाऊ शकतो, जेव्हा सोडवणारी मंडळी 'चोर चोर मौसेरे भाई' नसतील तेव्हा ! राजकीय दूधभाऊ तर एका स्तनातले दूध तू पी. दुसऱ्या स्तनातले मी पितो, असे म्हणून देशाला शुष्क करीत असतात.

     सध्या निवडणूक सुरू आहे.निकाला अगोदर मतदारांना पैसे देऊन फितविण्याऱ्या व निकाल लागल्यावर निवडून आलेल्यांची खरेदी-विक्री करण्याऱ्या राजकीय मध्यस्थांचा धंदा तेजीत येऊन त्यांची चांदीच चांदी होते! 

     खरे म्हणजे प्रगल्म लोकशाही असलेले राष्ट्र म्हणून आपणच आपला डिंडीम पिटून, मतदानाच्या अगोदरच्या दिवशी राजकीय दलालांच्या... माफ करा हं! राजकीय मध्यस्थांच्या हस्ते 'मतपरिवर्तन' (साम, दाम, दंड, भेदाने का होईना) करून आपणच आपल्या प्रगल्भ लोकशाहीचा गळा घोटत असतो. षण राजकारण करायचे म्हटले की हे सर्व करावेच लागणार ! शेषन् सारखा मध्यस्थही जिथे हात टेकतो तिथे इतरांचे काय ?

     राजकारणाचा धंदा बद करणारा, चाटूगिरीपासून पुढाऱ्यांना दूर ठेवणारा, कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणारा, भारताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्याला रोखणारा, सर्वसामान्य नागरिकांबद्दल आत्मीयता बाळगणारा मध्यस्थ या भारतवर्षी केव्हा जन्म घेईल कुणास ठाऊक!

Wednesday, May 8, 2024

सामना



     लोकसभेचा सामना जाहीर झाल्याबरोबर  भारतातील समस्त राजकीय संघ धूळ झटकून कंबर कसून मैदानात उतरले आहे. हा सामना जरा लवकर व्हावा अशी काही संघांची इच्छा होती. तर जुन्या विजेत्या संघाला तयारी व 'साफसफाईकरिता' वेळ मिळावा म्हणून हा सामना उशीरा व्हावा असे वाटत होते. आपाल्या कप्तानपदाला शह देणाऱ्या खेळाडूंना संघाबाहेर पाठवून नवीन खेळाडूंना वाव देवून आपले कप्तानपद कायम ठेवण्याकरिता हा वेळ मिळणे आवश्यक होते. यात ते काही अंशी सफलही झाले.
     या सामन्यात अखिल भारतीय स्तरावरील सर्व संघ खेळणार असले तरी त्यातील दोनच संघ अत्यंत बलाढ्य  असल्यामुळे विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार यावर प्रेक्षकांमध्ये करोडो रूपयांचा सट्टा लावणे सुरू झाले आहे. (खेळावर लावलेला सट्टा, जुगार या संज्ञेत मोडत नसल्यामुळे यावर कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे तुम्हीही प्रयत्न करायला हाकत नाही. "जमी तो जमी, नहीं तो मोहंमद शमी !") या सामन्याचे वैशिष्ठ्य म्हणजे संघाचा विजय हा खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांवर अवलंबून असतो. ज्या संघावर प्रेक्षक खूष तो संघ जिंकणार. पण प्रेक्षक मात्र कोणावर खूप आहे या बाबतीत ताकास सूर लागू देत नाही.
     या सामन्यातील प्रत्येक संघ आपला संघ कसा चांगला आहे याचे तुणतुणे सतत वाजवून आम्ही जिंकलो तर काय काय करणार याचे (फुटके) ढोल बडवत असतात. पण आजकाल प्रेक्षकही या दोन्ही आवाजाला सरसावल्यामुळे मुळीच दाद देत नसल्याचे दिसून येते. था देशब्यापी सामन्याला अमाप खर्च येतो. खेळ जरी राजकीय संघ खेळणार असले व विजयी संघ जरी पाच वर्षे मलिदा खाणार असला, तरी हा खर्च मात्र प्रेक्षकांच्या पैशातून होणार असतो. ही परंपरा फार प्राचीन असल्यामुळे यात बदल घडून येण्याची शक्यता फार कमी आहे. तरीपण कोणे एके काळी शेषन नामक मुख्य पंचाने सामन्याच्या सुरवातीला होणाऱ्या धुळवडीच्या मैदानी आतिषबाजीवर बंदी घातत्यामुळे कोट्यावधी रूपये वाचले होते असे म्हणतात. पण त्यामुळे सर्व संघांना झीम्मा, फुगडी या बायंकी खेळावर समाधान मानून दुधाची तहान ताकावर भागशवी लागली होती अशी वदंता आहे. यावेळी मात्र एका स्त्री खेळाडूला तिच्याच संघातल्या लोकांनी फुगडी घालायला मनाई केल्यामुळे तिने खो-खो खेळायला सुरवात केली आहे.
     स्त्री व पुरुष खेळाडूंनी एकत्र खेळण्याचा हा एकमेव खेळ असल्यामुळे समानतेचे युग आल्याची सर्वांना खात्री पटते. प्रेक्षक वर्गही सामन्याच्या दिवशीपर्यंत चेअरींग' देवून खेळाडूंना प्रोत्साहीत करीत असतात. या खेळात प्रत्यक्ष सामन्यापेक्षा अगोदरच्या खेळात अधिक मजा येत असल्यामुळे प्रेक्षक व खेळाडू आपले एकमेकावर किती प्रेम् आहे हे दाखविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतांना दिसून येतात. खेळ सांघिक जरी असला तरी प्रत्येक खेळाडूला एक एक मैदान वाटून देवून त्याला एकटे सोडण्यात येते. या मैदानात प्रत्येक संघाचा एक एक खेळाडू उत्तरलेला असतो. प्रत्येक  संघातील खेळाडूंना विरुद्ध संघाच्या खेळाडूंवर होळीच्या बोंबांप्रमाणे बो बो बोंबा मारायचे प्रशिक्षण खास ढंगात दिल्या जात असल्यामुळे 'रसिक' प्रेक्षकांना  'शिमग्याची' मजा लुटायला मिळते,
     ते काहीही असले तरी यावेळी  प्रेक्षकांना मात्र ते आपल्या खऱ्या-खुऱ्या मायबापापेक्षाही जास्ती मान देवून, सामना जिंकून देण्याची विनंती करीत असतात. या सामन्यातील खेळाडू आपआपल्या संघाच्या रंगसंगतीचे कपडे वापरत असल्यामुळे लात, निळा, भगवा, तिरंगी, लात-हिरवा,पिवळा अशा विविध रंगाचे मिश्रण पाहण्याचा अभूतपूर्व योग समस्त भारतवासीयांना दर निवडणुकीत बघायला मिळतो.यातील काही खेळाडू सरावासाठी आलेला निधी हडपून बसतात. त्यामुळे संघांतर्गत दुफळी सुरू होते.पण वरची फळी जर मजबूत असली तर या दुफळीचा फारसा परिणाम होत नाही.
      सध्या एकमेकांच्या संघातील खेळाडू चोरून सामना रंगविण्याचा नवीनच प्रकार सुरू झाला आहे.परंतू या प्रकारामुळे देशातील समस्त संघ मेटाकुटीला आले असून मूळ खेळाडू नाराज होऊन लाल-हिरवे होऊन 'आवजी-जावजी हाय हाय'चे नारे लावताना दिसत आहे.या 'आवजी-जावजी' प्रकारामुळे शीतयुद्ध सुरू झाले आहे.तसेच संस्थांतर्गत रंगयुद्धही सुरू झाले असून 'आवजी-जावजी'वाल्या खेळाडूंना परत पाठविण्याची तयारी समस्त भारतवासी प्रेक्षक करीत असल्याचे दिसत आहे.पण हे काही बरोबर नाही.याला 'स्पोर्ट्समन स्पिरिट' म्हणत नाही.खेळाडू तो खेळाडू, मग तो कोणत्या का संघाचा असेना त्याला 'चेअरींग' दिलेच पाहिजे.

*** *** आगे बढो हम तुम्हारे साथ हय....
भारत माता की जय!!!


 

Saturday, April 20, 2024

लोपला चंद्रमा...मराठी गझल.


     डॉ.श्रीकृष्ण राऊतांची 'लोपला चंद्रमा' ही वेगळ्या ढंगात स्वरबद्ध झालेली बहुप्रतिक्षित गझल पद्म श्री सुरेश वाडकरांच्या मधाळ आवाजात नुकतीच ध्वनिमुद्रित केली.ही गझल माझ्या प्रत्येक कार्यक्रमात 'वन्समोअर' घ्यायची. खरे तर ही सुरावट जवळ-जवळ ४२/४४ वर्षांअगोदरची आहे.पण सुरेशजींनी एकदम नवी करून तिला वेगळीच झळाळी दिली.बऱ्याच वर्षात अशा प्रकारची रचना रसिकांना ऐकायला मिळाली नसावी असे मला वाटते.
       संगीत संयोजन जयपूरचे ऋषिकेश सोनी यांचे असून, यातील ठसकेदार तबला व ढोलक संगत किशन कथक (जयपूर) आणि बहारदार बॅंजो वादन फल्ला भाई (अलवर) यांचे आहे. 'व्हाईस रेकॉर्डिंग' मुंबईच्या आजीवासन स्टुडिओमध्ये केले असून,बाकी ध्वनिमुद्रण,मिक्सिंग, मास्टरिंग 'रॅप' स्टुडिओ जयपूर,राजस्थान येथे केले आहे.
 #sudhakarkadamscomposition

●headphone or earphone please


 

Tuesday, April 16, 2024

आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज... डॉ.श्रीकृष्ण राऊत.


         १९८० ते १९९० हे दशक मराठी कवितेत ख-या अर्थाने ‘गझल दशक’ होते. असं म्हणावयाला हरकत नाही.मंगेश पाडगावकरांचा 'गझल'(१९८१) सुरेश भटांचा ’एल्गार’ (१९८३) खावर यांचा 'गझलात रंग माझा '(१९८५)आणि 'माझिया गझला मराठी'(१९८६)आणि श्रीकृष्ण राऊत यांचा 'गुलाल'(१९८९) हे गझलसंग्रह याच दशकात प्रकाशित झालेत.ह्याच दशकात सुरेश भटांच्या ’रंग माझा वेगळा’, ’एल्गार’ ह्या कार्यक्रमांना अगदी तिकिट विकत घेऊन रसिक श्रोत्यांनी गर्दी केली.मराठी गझलचा प्रचार-प्रसार करणारं एक गझलव्रत ह्या काळात सुरेशभटांनी घेतलं होतं. गावोगावच्या नव्याने लिहू लागलेल्या गझलकारांना पत्रातून-प्रत्यक्ष भेटीत सुरेश भट त्यांना इस्लाह देत. मेनका, लोकमत, लोकसत्ता इ. नियतकालिकात नवोदितांच्या गझलांना प्रसिद्धी देणारी सदरे ह्याच दशकात प्रसिद्ध होत होती.गझलने भारावलेल्या सांस्कृतिक वातावरणाची दखल घेण्यासाठी ठाण्याच्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात ’गझलचे मराठी कवितेवर आक्रमण’ असा परिसंवाद ठेवल्या गेला.
         १९८० - १९९०ह्या दशकाच्या आरंभीच टेप रेकॉर्डर आणि कॅसेट संस्कृती आम होऊ लागली होती.'चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है' ही गुलाम अलींची गझल एवढी लोकप्रिय झाली की तिला 'निकाह' चित्रपटात बॅकग्राऊंडला का होइना पण स्थान मिळाले. मराठी गझलगायनाच्या जन्मासाठी आवश्यक असे सांस्कृतिक पर्यावरण तयार झालेले होते. संगीताची उत्तम जाण असलेले सुरेश भट मराठी गझलेच्या प्रसारासाठी गुणी गझलगायकाच्या शोधात होते.त्याच दरम्यान त्यांची सुधाकर कदमांची भेट झाली आणि मराठी गझल गायनकलेला पहिला गायक-संगीतकार मिळाला.
प्रस्तुत ग्रंथातील तीन लेख ह्या संदर्भात अतिशय महत्वाचे आहेत.
           1.'सुरेश भटांसोबतचे दिवस ' ह्या सुधाकर कदम ह्यांच्या लेखात १९७७- ७८ ला झालेल्या सुरेश भटांच्या पहिल्या भेटीपासूनच्या बारीक-सारीक घटनांचा सविस्तर तपशील आपल्याला वाचायला मिळतो.भट आता हयात नाहीत आपल्या करिअरसाठी त्यांच्या नावावर 'काहीही ' खपवण्याचे प्रयत्न काही व्यावसायिक कलावंतांनी केलेत.त्यामुळे हा तसाच प्रकार असावा अशी शंका येणे रास्त आहे.पण दुस-या बाजुने त्या काळातली सुरेश भटांनी सुधाकर कदमांना लिहिलेली पत्रे वाचली की ह्या शंकाचे निरसन होते.त्यातल्या काही महत्वाच्या पत्राच्या फोटो इमेजेस ह्या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.त्या काळात पु.ल.देशपांडे,व.पु.क¬ाळे यांच्या कथाकथनाच्या आणि सुरेश भटांच्या काव्यगायनाची कॅसेट पुण्याच्या अलुरकर कॅसेट कंपनीने काढली होती.त्या कॅसेट कंपनीकडून सुरेश भटांच्या गझला सुधाकर कदमांच्या चालीत काढण्याचे चालले होते.अरेंजर म्हणून आनंद मोडक सहाय्य करतील असा उल्लेख १९.१२.८१ ला सुरेश भट यांनी लिहिलेल्या पत्रात आहे.
कुठल्या तरी कारणाने ही कॅसेट निघाली नाही.पण तो पर्यंत सुरेश भट यांच्या दहा-बारा गझलांच्या चाली सुरेश भटांना आवडतील अशा गझलगायन शैलीत सुधाकर कदमांनी तयार केल्या होत्या.

            2.'माझी मराठी गझलगायकी' ह्या आपल्या दुस-या लेखात सुधाकर कदमांनी आपल्या वडिलांकडून १९५८ ला हार्मोनियम शिकले. नंतर तबला,गिटार,सरोद अशी वाद्ये शिकल्याचा उल्लेख आहे.मी तेव्हापासूनच गझल गायला सुरुवात केली होती.असेही ते म्हणू शकले असते.पण त्या गोष्टीला काही अर्थ नाही.स्वतःच्या परिपक्व चाली घेऊन आपला जाहीर कार्यक्रम ज्या दिवशी पहिल्यांदा सादर करता ते तुमचे रसिकमान्य असलेले पहिले गझलगायन ह्याची नम्र जाणीव त्यांना आहे.
           3.'मराठी गझलगायनाविषयी थोडेसे'ही सुरेश भटांची प्रतिक्रिया 'केसरी'त प्रकाशित झालेली आहे.सुधाकर कदमांचे गझलगायन हे भावगीत गायनापेक्षा कसे वेगळे आहे.हे सुरेश भट यांनी अधोरेखित केले आहे. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प मध्ये झालेल्या सुधाकर कदमांच्या 'अशी गावी मराठी गझल' ह्या कार्यक्रमाचे निवेदन दस्तुरखुद्द सुरेश भट ह्यांनी केले होते.त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचा फोटो ह्या ग्रंथात दिलेला आहे.तसेच ह्या कार्यक्रमातील सुरेश भट यांच्या निवेदनासह सुधाकर कदमांनी गायिलेल्या इतर अनेक गझला-गीतेही अभ्यासक - संशोधकांसाठी यु ट्युबला उपलब्ध आहेत. सुधाकर कदम हे 'महाराष्ट्राचे मेहदी हसन'आहेत असा अभिप्राय सुरेश भट यांच्या हस्ताक्षरात ह्या ग्रंथात आपल्याला सापडतो.
सुधाकर कदम तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी सारख्या आडवळणाच्या छोट्याशा गावी संगीत शिक्षक म्हणून नोकरी करायचे. त्यांच्या प्रेमाखातर सुरेश भट अनेकदाआर्णीला मुक्कामी रहायचे. 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची '(दि. ९/९/¬८१-आर्णी)'हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी' (दि. १२/९/८१-आर्णी) 'येणारा दिवस मला हेटाळत हसणारच'( ३०/१२/¬ ८१-काठोडा) ह्या प्रसिध्द गझला आणि 'उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद '( १२/९/८१ -आर्णी) ही प्रसिद्ध नात सुरेश भटांनी आर्णी-काठोडा मुक्कामातच लिहिल्या आहेत. भटांच्या हस्ताक्षरातील ह्या रचनांचे फोटो ह्या ग्रंथात आहेत.
त्यातील गझलसंहिते सोबतच स्वरांच्या काही नोटेशनच्या नोंदी सुधाकर कदमांच्या हस्ताक्षरात आढळतात. गझल लेखनासोबतच त्या गझलची चाल बांधण्याच्या प्रक्रियेत भट आणि कदम हे दिग्गज एकाचवेळी सहभागी असण्याचा तो सुवर्णक्षण होता.

ह्या कालखंडात असे भाग्य सुधाकर कदमांशिवाय अन्य गायकाला लाभले नाही.
म्हणूनच हा ग्रंथ आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज ठरतो.
           अगदी बालपणी तबला,संवादिनी अशी वाद्ये शिकणारे सुधाकर कदम पुढे गायनाकडे वळले.गायनासोबत पुढे मेंडोलिन,अॅकाॅर्डियन¬,संतुर,सरोद अशी वाद्ये वाजवण्यात त्यांचा हातखंडा झाला.गायन की वादन ह्या द्वैतातून त्यांना पं.जितेन्द्र अभिषेकी बुवांनी सोडवले.आणि त्यांची गायनाची वाट नक्की झाली. वरील सर्व वाद्यांच्या वादनप्रभुत्वाने त्यांना संगीतकार म्हणून परिपक्व केले. 
            सुधाकर कदम हे भाग्यवान आहेत, ते ह्या अर्थानं की त्यांचे गुरुवर्य पुरुषोत्तम कासलीकर ह्यांचा लेख जसा ह्या ग्रंथात आहे तसाच त्यांची शिष्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ. सीमा काशेट्टीवार ह्यांचाही लेख आहे.कोणत्याही कलेत कलावंताचे योगदान हे त्या कलावंताच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढीशी सांधलेले असते. ह्या दुव्यालाच आपण परंपरा म्हणतो.अशा परंपरेच्या संदर्भातच त्या कलावंताच्या योगदानाचे मूल्यांकन होऊन त्या कलावंताचे ऐतिहासिक स्थान प्रस्थापित होत असते.ह्या दृष्टीने मला हे दोन्ही लेख त्यातील प्रामाणिक भावनाभिव्यक्तीच्या अंगाने अघिक मोलाचे वाटतात.
          यशवंत देव, अशोक पत्की,सुरेश वाडकर,वैशाली माडे,अनुराधा मराठे ह्या संगीत आणि गायन क्षेत्रातील नामवंतानी सुधाकर कदमांच्या चालींचा मुक्तकंठाने केलेला गौरव हा प्रस्तुत ग्रंथाचा आत्मा आहे.
           राम जोशी,सौ.रजनी करकरे-देशपांडे,सीमा गादेवार,मधुरिका गडकरी ह्या संगीतातल्या जाणकारांनी,सुधाकर कदमांनी बांधलेल्या गझलांच्या बंदिशीतले संगीतसौंदर्य आस्वादकतेने त्यांच्या लेखात अनावरित केले आहे. हे सर्व लेख अभ्यासकांनी,रसिकांनी¬ मुळातूनच वाचावेत असे आहेत.
          १९८० ते १९९० ह्या दशकातील सुधाकर कदमांच्या मराठी गझलगायनाच्या कारकिर्दीचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या दोन मान्यवरांनी लिहिलेले लेख ह्या ग्रंथाचे ऐतिहासिक महत्ता विशद करणारे शीलालेख ठरावेत इतके मौल्यवान आहेत.ते दोन मान्यवर आहेत ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित आणि ज्येष्ठ गझलअभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर.ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षितांनी वेगवेगळ्या निमित्ताने दोन लेख लिहिलेत.
त्यातला पहिला लेख दै.सकाळ मध्ये लिहिला,त्याला निमित्त होते सुधाकर कदमांच्या कोल्हापूरात संपन्न झालेल्या गझलमैफिलीचे .दुसरा अग्रलेख दै.लोकमत मध्ये त्यांनी लिहिला त्याला निमित्त होते सुधाकर कदमांना पुण्यात 'गझलगंधर्व' उपाधी प्रदान करण्यात आली,त्या सोहळ्याचे.
          ज्येष्ठ गझलअभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर हे मराठी गझलच्या उगमाचा,विकासाचा आणि संवर्धनाचा चालता-बोलता इतिहास आहेत.सुरेश भट-सुधाकर कदमांच्या अनेक मैफिलींचे नेटके निवेदन त्यांनी केले आहे.अगदी सुरेश भटांच्या मांडीला मांडी लावून प्रथमतः मराठी गझलगायनाची मुहूर्तमेढ रोवणा-या सुधाकर कदमांचे योगदान वैराळकरांनी आपल्या लेखात अधोरेखित केले आहे.
         कदमांच्या वाढदिवशी १३ नोव्हेंबर २००९ ला नेटवरील 'गझलकार' ब्लाॅगवर त्यांचा एक विशेषांक मी संपादित करून प्रकाशित केला होता.त्यातील सर्व लेख ह्या ग्रंथात समाविष्ट आहेत.तसेच प्रस्तुत ग्रंथाच्या निमित्ताने तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर,डॉ.राम पंडित,डॉ.किशोर सानप,शाहिर सुरेशकुमार वैराळकर,दिलीप पांढरपट्टे,म.भा.चव्हाण,दत्ता जाधव ह्यांनी लिहिलेल्या लेखांनी हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.

        इंटरनेटचे तंत्रज्ञान सुधाकर कदमांसारख्या कितीतरी कलावंतांसाठी वरदान ठरले आहे. 'गझलगंधर्व' 
(www.gazalgazal.blogspot.com) हा  कदमांचा ब्लॉग नेटवर आहे. त्यात बेगम अख्तर -मेहदी हसन - 
गुलाम अली -मधुराणी -जगजित सिंग यांच्या गझलांविषयी गायन कलेच्या अंगाने कदमांनी लिहिलेले लेख आहेत.१९८६ ते १९९६ या काळात हाथरसच्या  
'संगीत ' मासिकातील  'नग्म- ए - ग़ज़ल ' आणि  'अपने अपने गीत ' ह्या दोन सदरात  उर्दू -हिन्दी गझल - गीतांना कदमांनी लावलेल्या चालींची   नोटेशन्स प्रसिद्ध झाली होती . ती अभ्यासकांना  त्यांच्या ब्लॉगवर वाचायला मिळतात. तसेच  कदमांनी गायिलेल्या गझला - गीते यू ट्युबवर रसिकांसाठी पहायला-ऐकायला  उपलब्ध आहेत.
इंटरनेट नसते तर  कदमांच्या योगदानाचा हा  अमूल्य खजिना काळाच्या पोटात कधीच गडप झाला असता.
        वादन-गायन-लेखन अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या सुधाकर कदमांच्या कारकिर्दीचा आलेख वाचकांसमोर मांडताना मला संपादक म्हणून समाधान आहे.
आणि 
मित्र म्हणून अभिमानही.

प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत
जठारपेठ,
अकोला
------------------------------------------------------------------
.                   
                        प्रा. श्रीकृष्ण राऊत यांची ही पोस्ट वाचल्यानंतर सुधाकर कदम यांच्याविषयी, त्यांच्या आठवणीविषयी लिहिण्याचा मोह आवरत नाहीये. मला वाटतं, मराठी गझलगायक म्हणून सुधाकर कदमांचं मोठेपण मांडण्याची हिच वेळ आहे. ही बाब खरीच आहे, सुधाकर कदम यांना पाहिजे तशी संधी आणि प्रसिद्धी त्यांच्या गायनकलेच्या किंवा सृजनशीलतेच्या काळात विदर्भात आणि तिथून मुंबई-पुण्याकडं मिळाली नाही.

- [ ] मी साधारणत: आठ वर्षांचा असेल १९८१ मध्ये खामगावच्या घरी सुधाकर कदमांची मैफल झाली. ती मैफल आणि ते दोन दिवस मला आजही लक्षात आहेत. माझ्या वडिलांचे (बी.एल.जाधव) मित्र म्हणून सुधाकर कदम, त्यांच्याबरोबर वडिलांचे लहान भावासारखे असलेले कवी कलीम खान(ज्यांच्या आर्णीच्या घरातला माझा आणि आमच्या खेड्यातल्या घरातला त्यांचा जन्म), कवी श्रीकृष्ण राऊत, नारायण कुळकर्णी-कवठेकर आणि शेखर सरोदे(ॲड. असीम सरोदेचे काका) असे सगळे दोन दिवस आमच्या घरी मुक्कामी होते. रात्री मैफल झाली. कदाचित ती माझी ऐकलेली पहिली मैफल आणि म्हणूनच आजही ती स्मरणात आहे. सुरेश भटांच्या मराठी गझला सुधाकर कदमांनी गायल्या होत्या. तबल्यावर शेखर सरोदे होते. कलीम खान, नारायण कवठेकर यांचं निवेदन होतं. संध्याकाळी सुरू झालेली मैफल मध्यरात्री उशिरापर्यंत चालली होती, हे मला दुसऱ्यादिवशी कळलं होतं. त्या मैफलीत एक उर्दू नज़्म सुधाकर कदमांनी दोनदा गायली होती. ते शब्द पाठ झाले होते, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी... नंतर कळलं ती प्रसिद्ध नज़्म जगजितसिंग यांची पहिली नज़्म होती. वडिलांकडे गजलांच्या एलपी रेकाॅर्डचा नंतर कॅसेटचा मोठा खजाना आहे. माझ्या लहानपणापासून मी गुलाम अली-मेहदी हसन-हुसेन बक्श ऐकत आलोय. त्यामुळं लहान वयातच गाणं ऐकण्याची सवय लागलेली होती. आणि म्हणूनच सुधाकर कदमांची ती मी आयुष्यात ऐकलेल्या पहिल्या मैफलीची आठवण खोलवर मनात रुजली असेल कदाचीत. 
- [ ] पुढे जेव्हा मला गझल कळायला लागली, तेव्हा त्या मैफलीची रेकाॅर्डेड कॅसेट मी कित्येकदा ऐकली. (आजही सुधाकर कदमांच्या त्या रेकांर्डिंगच्या कॅसेटस् वडिलांकडे आहेत.) महान गझलकार सुरेश भट यांच्या सुरूवातीच्या काळातल्या जवळजवळ सर्वच गाजलेल्या गझला सुधाकर कदमांनी त्या मैफलीत स्वत:च्या चालीत गायल्या होत्या. नंतर जेव्हा मी मुंबईत आलो आणि काही गझलनवाजांच्या मराठी गझला ऐकल्या तेव्हा तर सुधाकर कदम यांच्या गझल गायकीचं, त्यांच्या सृजनशिलतेचं, त्यांच्या मखमली आवाजाचं मोठेपण प्रकर्षानं जाणवलं. कुठेही उगाचच स्वर लांबवणे किंवा स्वरच्छल नाही की कुठे उगीच काही वेगळी हरकत घेतल्याचा आव. शास्त्रीय संगितातल्या रागदारीत राहून शब्दांना न्याय्य न्याय देणारी गझलगायकी, हेच सुधाकर कदमांच्या गझलगायनाविषयीचं माझं ठाम मत आहे. मला गझल आणि गायकी समजून-उमजून ऐकण्याचा चांगला कान देवानं दिलाय, म्हणूनही मी म्हणत असेल. त्यामुळेच कलेच्या बाजारीकरणाच्या जगात सच्च्या रसिकांपर्यंत पोहोचण्यात सुधाकर कदम कमी पडले, हेही आवर्जून सांगावं लागेल. तो त्यांचा की परिस्थितीचा की विदर्भातल्या आडमार्गाला असलेल्या आर्णीसारख्या केवळ नावालाच तालुका असलेल्या गावाचा दोष आहे, याचा विचार मी जेव्हा मुंबईतल्या प्रसारमाध्यमामधला आघाडीचा पत्रकार म्हणून करतो, तेव्हा काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, हे लक्षात येतं. 
- [ ] आज कवी प्रा.श्रीकृष्ण राऊत यांची सुधाकर कदम यांच्यावरील ही सुरेख पोस्ट वाचल्यावर आपसूकच ३८ वर्षांपासून मनात दाटलेल्या आठवणींना लिहितं करावंसं वाटलं....

- Ashish Jadhao
-------------------------------------०------------------------
● अक्षर मानव प्रकाशन,
पुणे
किंमत-पोस्टेजसह ३००रु.
● पुस्तक घरपोच मिळण्यासाठी 
8888858850 गुगल पे.
9822400390
या क्रमांकावर फोन करून पुस्तक बुक करता येईल.
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.


 

Friday, April 5, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक ३०)

       १९८०/८१/८२ या काळात पुण्यातील तेव्हाचे नवोदित, समवयस्क गझलकार इलाही जमादार,अनिल कांबळे, म.भा.चव्हाण,रमण रणदिवे,प्रदीप निफाडकर,दीपक करंदीकर वगैरे वगैरे मंडळी मी महाराष्ट्रातील एकमेव मराठी गझल गायक असल्यामुळे फार सलोख्याने,मित्रत्वाच्या नात्याने वागायचे.यातील बहुतेकांच्या रचना स्वरबद्ध करून माझ्या कार्यक्रमात गायिलो आहे.सुरेध भट आणि मी,

आम्ही विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यावर माझे पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद,फर्ग्युसन कॉलेज,राजवाडे सभागृग,गांधर्व संगीत विद्यालय असे अनेक कार्यक्रम होत गेले. पुढे १९८४ नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आर्णी ते पुणे,मुंबई संपर्क हळू हळू कमी झाला. महाराष्ट्र शासनाच्या #गीतमंच विभागासाठी बरीच गाणी स्वरबद्ध करून दिल्यामुळे 'रिसोर्स पर्सन' म्हणून राज्य स्तरावरील प्रशिक्षण वर्गात संगीत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी व बालचित्रवाणी करीता गाणी रेकॉर्ड करायची असल्याने अधून मधूम पुण्यात येणे होत होते.
      २००३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन पुण्यात स्थायिक झालो तेव्हा वरील काही मंडळी 'प्रतिथयश' या पदाला पोहोचली होती.मी अनेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु यातील एक-दोन सोडले तर सर्वजण आपल्या तोऱ्यात असलेले दिसले.म्हणजे खास पुणेरी...तरी पण सगळ्यांनी एकत्र यावे म्हणून दर महिन्याला #गझलकट्टा  आयोजित करायचो.प्रतिसाद चांगला मिळायचा पण आर्थिक झळ मात्र मलाच बसायची.याच दरम्यान बालचित्रवाणीला असलेले मित्र विकास कशाळकर यांना काही बालगीतं स्वरबद्ध करून हवी होती.(या अगोदर मी आर्णीला असताना कुमाग्रजांचे 'महाराष्ट्रगीत' व विंदा करंदीकरांचे 'उठ उठ सह्याद्रे' ही दोन गीते बालचित्रवाणीकरिता त्यांनी माझ्याकडून स्वरबद्ध करून घेतली होती.) त्यांनी मला विचारले.मी होकार दिला.व मीरा सिरसमकर यांची दोन गीतं नेहा दाऊदखाने (सध्याची नेहा सिन्हा) या बाल गायिकेकडून गाऊन घेतली.ही गाणी माझ्या वेगळ्या बाजामुळे छान झाली.त्यावरून सिरसमकरांच्या डोक्यात बालगीतांचा अल्बम करण्याची कल्पना आली.आणि मग '#खूप_मजा_करू' हा बालगीतांचा अल्बम आकाराला येऊन फाउंटन म्युझिक कंपनी तर्फे तो बाजारात आला.पुण्यात आल्यानंतरचे हे माझे पहिले काम होते.
      आर्णीला असताना नागपूरच्या कवयित्री आशा पांडे यांची गीते-भक्तिगीते वर्तमानपत्रांमधून प्रकाशित व्हायचची.त्यांच्या ओघवती लिखाणामुळे परिचय नसतानाही मी अनेक गीते स्वरबद्ध करून संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गाऊन घ्यायचो.गझलकार प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची आशा पांडेंशी ओळख होती.त्यानेच मला त्यांना भेटायला सांगितले.एकदा आकाशवाणीचे (नागपूर) ध्वनिमुद्रण संपल्यानंतर आशा पांडे यांना भेटलो.गप्पा-गोष्टी-चर्चा झाल्या त्यानंतर विषय संपला.
     मी पुण्यात स्थायिक झसल्यावर त्यांनी भक्तीगीतांच्या अलबमचे प्रपोजल समोर ठेवले.मी तत्काळ स्वीकारले.आणि कामाला लागलो. अभिषेकी बुवांशी जुनाच संबंध असल्यामुळे व मला थोड्याफार प्रमाणात त्यांचे मार्गदर्शन लाभलेले असल्यामुळे ते गुरुसमानच होते.आणि तसेच गाणे शौनकचे होते. म्हणून शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजात अल्बम करायचे निश्चित केले.हे प्रपोजल घेऊन मी शौनकला भेटलो.यवतमाळच्या एका कार्यक्रमाल बुवांसोबत बालशौनक पण होता.त्यांच्या जेवणाची व्यवस्था मी बघत होतो.ती आठवण ताजी झाली.आणि शौनकचा होकार आला. अनुराधाबाई पण तयार झाल्या आणि आमच्या रिहलस सुरू झाल्या अनुराधा बाईंची प्रॅक्टीस त्यांच्याकडे व्हायची. शौनकच्या प्रॅक्टीससाठी कधी मी शौनककडे जायचो तर कधी शौनक माझ्याकडे यायचे.शौनक कडील प्रॅक्टीस विद्याताई आवर्जून ऐकायच्या.आणि प्रॅक्टीस संपली की पहिल्या मजल्यावरील संगीत कक्षातून खाली आलो की चालींवर छान छान प्रतिक्रिया देऊन प्रोत्साहित करायच्या.खरे म्हणजे माझी आणि त्यांची ही पहिलीच भेट होती.पण पहिल्या भेटीत परकेपणा जाणवला नाही.या महिना दीड महिन्याच्या कालखंडात त्यांच्याशी अनेकदा मनमोकळ्या गप्पा व्हायच्या.त्यांच्या या प्रेममय वागण्यामुळे इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे व कौटुंबिक जबाबदरीमुळे बुवांकडे गुरुकुल पद्धतीने शिकू न शकल्याची खंत मनात घर करून गेली.नंतर हा अलबम पुण्यातील एलकॉम स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित झाला.याचे संगीत संयोजन मिलिंद गुणे यांनी केले होते.मिलिंद सोबतचा हा माझा पहिला प्रोजेक्ट होता.त्यानंतर आमची जी नाळ जुळली ती आजतागायत जुळून आहे.या अलबमचे शीर्षक होते 'अर्चना'.याच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कवी  सुधीर मोघे आणि कवी गंगाधर महांबरे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.हा अलबम टी सिरीजतर्फे बाजारात आला .वर्ष होते २००६. हा माझा दुसरा अलबम. त्यानंतर संगीतकार म्हणून माझ्या कामाने जो वेग घेतला तो आजतागायत कायम आहे. हे अभिषेकी बुवांचे व विद्याताईंचे आशीर्वादच समजतो.

●'अर्चना' मधील गीतांची युट्युब लिंक खाली देत आहे.आनंद घ्यावा....
https://youtu.be/DKkZmnDd-WU?si=aY-YTRfHogl_zodw

-----------------------------------------------------------------------
#अर्चना तयार होतानापासून लोकार्पणापर्यंतची काही क्षणचित्रे...

पुण्यातील वारजे येथील माझ्या घरी शौनक अभिधेकींची प्रॅक्टीस.....



प्रकाशन सोहळा - डावीकडून गायिका अनुराधा मराठे,कवी/संगीतकार सुधीर मोघे,कवी गंगाधर महांबरे,अस्मादिक,गायक शौनक अभिषेकी.

'अर्चना' मधील भक्तीगीतांचे सादरीकरण...



रसिकांनी तुडुंब भरलेले यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,पुणे.


 





संगीत आणि साहित्य :