Saturday, January 6, 2024
राग-रंग (लेखांक ३७) राग आसावरी
Wednesday, January 3, 2024
आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २२)
Wednesday, December 27, 2023
आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २१)
. -दोन आठवणी-
यवतमाळला नगर पालिका संगीत महाविद्यालयात शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना दोन महत्वाच्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या.त्या म्हणजे तत्कालीन नगर पालिकेचे अध्यक्ष संगीत प्रेमी आदरणीय स्व. बाबासाहेब घारफळकर आणि माहुरचे राजे स्व. मधुकरराव उपाख्य बाबुरावजी देशमुख.दोघेही संगीतावर अपार प्रेम करणारे.बाबासाहेब बाल गंधर्वांची पदे अप्रतिम गायचे. ते आले की जवळ जवळ तीन तासांची मैफल ठरलेली असायची.या निमित्ताने आम्हा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्षपणे बालगंधर्वांची गायकी ऐकायला मिळायची.दुसरे राजे मधुकरराव...ते आले की, आल्या आल्या दहा रुपयाची नोट काढून चपराशाला पेढे आणण्याकरिता पिटाळायचे.(त्या काळी, म्हणजे १९७० च्या दशकातील दहा रुपये...त्या दहा रुपयांची आजची किंमत किती असेल विचार करा.) कासलीकर गुरुजींच्या मैफली सोबतच गोड पेढ्यांनी सगळ्यांचे तोड गोड व्हायचे.त्यांनी त्या काळातील बहुतेक गायक/वादक ऐकले होते.पंडित उस्ताद अमीर खान, जसराज त्यांचे आवडते गायक होते.ते रसिक तर होतेच पण उत्कृष्ट लेखक,उत्कृष्ट शिकारी होते.सह्याद्री बुक्स तर्फे त्याचे शिकारीवरील 'शिकारनामा' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.यात त्यांनी केलेल्या १४ शिकारीचे वर्णन आहे.या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी आमहू उभयता उपस्थित होतो..माझे संगीत शिक्षण,ऑर्केस्ट्रा,नेहरू युवक केंद्रातील काम,मेंडोलीन वादन,गायन प्रवास ते बघत आले होते.आर्णीला संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर गांधर्व संगीत विद्यालय स्थापन केले.त्याच्या वार्षिकोत्सवाला राजे आवर्जून उपस्थित राहायचे.मी शास्त्रीय संगीताच्या मैफलीत जसराजजींच्या बंदिशी गायचो. पंडितजी त्यांचेही आवडते गायक असल्यामुळे माहूरला त्यांच्या वाडयात माझ्या अनेक मैफली आयोजित करून माहुरकरांना ऐकवायचे.माहुरच्या रेणुकादेवीसमोर ललिता पंचमीला आम्ही हजेरी लावायचो.त्या काळी सभामंडपात ही हजेरी असायची.गाणारे व ऐकणारे गाभाऱ्यात मावतील इतके असायचे.हळू हळू गर्दी वाढायला लागली, तसे माझे मित्र असलेलले प्रमुख भोपी स्व. रेणूकदासजींनी या हजेरीला संगीत संमेलनाचे रूप देण्याचे ठरवून मंदिराच्या बाहेर प्रांगणात हजेरी लावण्याची ध्वनिवर्धकासह सोय करून आयोजनाची जबाबदारी माझ्यावर टाकली.जोपर्यंत माझ्यावर जबाबदारी होती त्या कालखंडात छोटा गंधर्वां सारखी दिगग्ज मंडळी या संगीत संमेलनात गाऊन गेली.
माझ्या सांगीतिक प्रवासाचे साक्षीदार असलेल्या स्व.बाबुरावजी यांनी गांधर्व संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवा निमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकात एक लेख लिहिला होता.तो खाली देत आहे. नक्की वाचा...आपणासही आवडेल.
#प्रेम_पिया_हम_पाये
‘हरचंद सुरीली नग़मोंसे
जज़बात जगाये जाते है,
उस वक़्त की तलखी याद करो,
जब साज़ मिलाये जाते है।’
निःसंशय सुरेल गीतांनी आपल्या भावना उल्हासित, प्रफुल्लित होतात़. परंतु त्या एकमेवाद्वितीय क्षणाची उत्कटता लक्षात घ्या की जेव्हा वाद्ये स्वरात मिळविली जातात़. निःसंशय तो क्षण शब्दातीत, वर्णनातीत आहे़. तितकाच शब्दातीत, वर्णनातीत तोहि क्षण आहे की जेव्हा गायक तन्मय होऊन गात असतो. आणि स्वरवेडा श्रोता आपले प्राण कानात आणून ऐकत असताना आत्मविस्मृतीत जातो़. एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती, किमया, करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे़. माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले. त्याचे गमक वरील शेरमध्ये आहे़.
कुणाशी नाते जुळते ते उगीचच नाही़. खटपट, प्रयत्न करुन जुळविण्याची ही बाब नाही़. आपल्या काही ऋणानुबंधाच्या गाठी पडलेल्या असतात़. त्या केव्हा पडलेल्या असतात याची आपल्याला कल्पनाही नसते़. परंतु केव्हातरी अनाहुतपणे ती आपल्याला सापडते. आणि त्या गाठीचे रहस्य उलगडत जाते़. त्यावेळी जो आनंद होतो त्या सुखद संवेदनांचं वर्णन करता येत नाही़. माझा आणि सुधाकर कदम यांचा संबंध आला त्याचं रहस्य या ऋणानुबंधाच्या गाठीत आहे़. मला एकवेळा गुरुवर्य पुरुषोत्तमराव कासलीकर म्हणाले होते, “बाबुरावजी, स्वरराजांच्या स्वराला मधाची उपमा दिल्याने मधाची महती वाढते, स्वरराजांची नाही!" आज एका निमित्ताने सुधाकर कदम विषयी लिहीत आहे, तेव्हा मला नेमकं वरील विधान आठवलं. वाटते की माझ्या लिहीण्याने सुधाकरची शान वाढत नाही; वाढलीच तर माझी वाढेल़. मी एक स्वरवेडा माणूस आहे़; तो कानी पडला की माझं मन तिकडे धाव घेते़. त्यावेळी माझी जात कोणती पुसू नका. आठवते़ सुधाकर स्वराचा ठेवा आहे़. स्वराचा वाहता निर्झर आहे़. त्या ठेव्याजवळ बेभान होऊन धाव घेणे हा मधुकराचा स्वभावधर्मच आहे़. नाही तरी ‘घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद’ आपल्याला हाच संकेत देतो की नाही?
या साडेतीन दशकात अतूट, अजोड सहवासातून मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकलं आहे़. नाट्यपदे ऐकली आहेत़. त्यांची गझल गायकी ऐकली आहे़. पदेही ऐकली आहे़. हे सर्व ऐकून माझे मन प्रसन्न झाले आहे़. याचे कारण हे की या वेगवेगळ्या गायकीमधून जात असतांना त्यांनी आपला स्वर सोडला नाही़. तालाचे तर भान ठेवलेच पण गायकी ही श्रोत्यांना प्रसन्न करणारी असावी याचेही अवधान ठेवले. यातच त्यांच्या गायकीचे गम्य आहे़. सुधाकर जेव्हा गझल गायकी कडे वळले; त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टीकाही झाली असेल, पण ते बरोबर नाही़. साचेबंद ख्याल गायकी आणि राग दारीच्या पूर्वापार चालत असलेल्या मजबूत बंदिशी मधून ते घरसले असे म्हणता येईल का? महाराष्ट्रीय श्रोता नाट्यपदवेडा आहे़. ख्याल ऐकल्यानंतर आपल्या आवडत्या नाट्यगीताची तो फरमाईश करतोच़. परंतु त्या नाट्यपदाला कोणता रागाधार आहे. वगैरे चौकशा करुन त्या पदाचा उपमर्द करतो का? नाही ना?
दिले नादॉं तुझे हुवा क्या है ।
आखिर इस दर्द की दवा क्या है ॥
ही मिर्झा गालिबची गझल कोणत्या एका रागाच्या ख्याल गायकी अंगाने गायची. हा जगावेगळा अट्टाहास वरील गझलचा आशय, अर्थ, भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे; यात गझल गायकाचे कौशल्य आहे़. आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा आधक अवधान बाळगले आहे़. पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून, विलंबित ख्याल गायक, ज्याला अक्षरमंत्राचा साक्षात्कार झाला आहे, तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल़. या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे़.
स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले़. त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्योत्तम श्री पुरुषोत्तम कासलीकरांकडे असे़. अशावेळी मला आवर्जून बोलाविल्या जायचे़ .स्वरराज आले की कासलिकरांच्या घराला सम्मेलनाचे रुप यायचे़. या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे पेश असत़. छोटा गंधर्व त्यांचेशी विशेष सलगीने, आपुलकीने वागत असतांना मी त्यांना पाहिले आहे़. अनेकदा हार्मोनियमच्या साथीला सुधाकर कदम यांना बरोबर घेऊन जायचे़.माहुरचे आद्य दैवत श्री रेणुकादेवी़. रेणुकेचे नवरात्र हे माहुरच्या खास आकर्षणाचा काऴ. त्यातल्या त्यात ललिता पंचमीचे महत्व तर अनन्य साधारण़. आपली संगीत सेवा रेणुकेच्या चरणी अर्पण करण्यास दूरजवळचे अनेक कलाकार येत़. त्यात सुधाकर कदम हे प्रामुख्याने असत़. त्या दिवशीच्या संचलनाची जिम्मेदारी आम्ही त्यांचेवर टाकत असू़. ही जबाबदारी ते रात्री नऊपासून सकाळी सुर्योदयापर्यंत निरलसपणे पार पाडत़. संगीत महफिलीचे संचलन करणे ही स्वयं एक कलाच आहे़. त्याला संगीताचा आत्मा ओळखणारा जाणकारच हवा़. येर्या गबाळ्याचे ते काम नाही़. संगीताप्रमाणे गोड वाणी, प्रसन्न मुद्रा, उत्तम जोपासलेले शरीर सौष्ठव, मनमिळाऊ स्वभाव या सर्वामुळे ते त्या नऊ-दहा तासाच्या स्टेजवर मानापमानातल्या धैर्यधरासारखे वाटत़. यावेळचा त्यांचा पोषाखही अगदी प्रसंगाला अनुरुप असा चोखंदळ असे़. अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्र- मध्यप्रदेशात गाजली़. त्यांच्या मैफिलींचे वृत्त वर्तमान पत्रातून मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा़.
सुधाकर कदम आर्णीला़ स्थायिक झाले़. गांधर्व संगीत विद्यालय ही स्वतंत्र संस्था निर्माण करून संगीताचे दान त्यांनी दिले़. या संस्थेच्या विद्यमाने ते दरवर्षी संगीत सम्मेलन घेतात़. या वेळी ते जीव ओतून त्यात राबतात़. सम्मेलन असते एक ना दोन दिवसाचे़ पण त्यामागचे जे कष्ट एक महिना आधीपासून उपसावे लागतात; याचा प्रामाणिक आढावा घेतला तर सम्मेलन काय असते ते कळेल़. संगीत सम्मेलनासोबतच अभिनय कला मंडळ, शिवजयंती उत्सव समिती, तालुका पत्रकार संघ, सरगम, अशा अनेक संस्थांची स्थापना करून सामाजिक, राजकीय, सांगीतिक, बौध्दिक या सर्व स्तरावर आपल्या जीवनाची वाटचाल दमदारपणे चालत असता त्यांनी थोड्याच काळात अमाप लोकप्रियता मिळवली़. हिंदू आणि मुस्लिम समाजात ते सारखेच लोकप्रिय आहेत़. हरदिल अजीज़ आहेत़. भावी आयुष्यात त्यांना आणखी लोकप्रियता मिळो, सगळ्यांचे हरदिल अजीज़ होवो ही या रौप्य महोत्सव प्रसंगी कामना.
-राजे मधुकरराव देशमुख (माहूर)
(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. रौप्य महोत्सवी विशेषांक १९९९)
-----------------------------------------------------------------------
१९८२ ची गोष्ट असेल, त्या वेळी माहुरला ललिता पंचमी च्या दिवशी रात्रभर संगीत सेवा असायची, अनेक नामवंत कलावंत सेवेला येत असत. सुधाकर कदम ह्या कार्यक्रमाचं नियोजन करीत असत. त्या वर्षी मी गेलो आणि गायची संधी मिळाली. बाल कलावंत म्हणून कौतुकही झालं. २, ४ दिवसानीच एक पत्र आलं, "छान गायलास, पण ह्या कौतुकाने हुरळून जाऊ नकोस, रियाजात राहा माझे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तुझाच सुधाकर कदम."
एका मोठ्या कालावंताकडून मिळालेल्या त्या पहिल्या शुभेच्छा होत्या, आजही ते पत्र मी जपून ठेवलं आहे. संगीत, साहित्य आणि वक्तृत्वाच्या माझ्या प्रवासात आजही कदम सर वेळोवेळी माझं कौतुक करतात. दुसऱ्याला मनमोकळी दाद देणे , कौतुक करणे हा एक दिव्य गुण आहे, ईश्वरानी तो सगळ्यांनाच दिला नाही. कदम सर ह्या दिव्य गुणाचे धनी आहेत.
सगळेच लोक चालतात त्याच वाटेवरून सरांना कधीच चलावसं वाटलं नाही. If you want to be a path finder, you must be a path breaker, त्या काळापासून सरांनी प्रस्थापित वाटेवरून चालणं नाकारलं होतं म्हणून मराठी गझलेच्या प्रांतात इतक्या प्रदीर्घ काळापासून आपल्याच मस्तीत , आपल्याच शैलीत, विदर्भातला असूनसुद्धा ताठ मानेने वाटचाल करणारा तो एकटा टायगर आहे.
संगीता शिवाय सरांनी लेखन केलं, समाजकारण केलं, राजकारण केलं, भ्रमंती केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचं documentation केलं. पुढच्या पिढीसाठी हा फार मोठा ठेवा आहे.
सरांच्या कर्तृत्ववाचा आवाका इतका मोठा आहे की तो लेखणीत बांधणं माझ्यासारख्यासाठी अशक्य आहे.
३, ४ महिन्यांपूर्वी यवतमाळ वरुन पुण्याला जाताना सर माझ्या घरी आले, मनमोकळ्या गप्पा केल्या , आनंद वाटत फिरणारा माणुस आपल्या घरी येऊन गेल्या सारखं वाटलं.
सरांच्या संगीत रचना अनेक नामवंत कलावंतांनी गायल्या आहेत. कवींच्या शब्दांना व ती रचना गाणाऱ्या गायकाच्या गळ्याला न्याय देणारा संगीतकार म्हणजे सुधाकर कदम.
मेहदी हसनला ऐकताना ,रंजीश ही सही ऐकताना असं वाटतं साधा यमनच तर आहे.. पण नीट ऐकल्यावर लक्षात येतं, मानवी मनातील सर्व भावना व्यक्त करण्यासाठी यमनाला मेहंदी हसनचा गळा शोधावा लागतो.
कदम सरांना मराठीतला मेहंदी हसन का म्हणत असतील... ?
शब्द आणि स्वरातील भव्य दिव्यता अत्यंत साधेपणाने मांडणे हा दोघांच्याही संगीतातील स्थायीभाव आहे , ऐकताना वाटतं 'अरे किती सोपं आहे पण म्हणून बघताना त्यातला परमेश्वर दिसतो असं मला सापडलेलं उत्तर आहे.
आज सरांचा वाढदिवस आहे.
जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रातील सरांची मुशाफिरी अशीच सुरू राहो व त्यासाठी सरांना निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.
कदम सरांच्या आयुष्याकडे बघताना मला असं सतत वाटतं मिर्झा गालिबने हा शेर सरांसाठीच लिहिला असावा
हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले।
बहोत निकले मेरे अरमा, मगर फिर भी कम निकले।
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर।
- डॉ सुशील देशपांडे
कारंजा लाड
१३/११/२०२२
Saturday, December 23, 2023
राग-रंग (लेखांक ३६) जौनपुरी
कोण्या एका रागाचे नाव कोण्या एका गावाशी/जागेशी जोडलेले असण्याचे एकमेव उदाहरण म्हणजे राग 'जौनपुरी होय.उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये गावाच्या नावाने घराणे आहेत.पण राग मात्र एकच 'जौनपुरी'! १३९४ ते १४७९ मध्ये जौनपूर हे एक स्वतंत्र राज्य होते.यावर 'शर्की' वंशाची हुकूमत होती.(१५ व्या शताब्दीमध्ये वाराणाशी आणि जौनपूर हे उत्तर भारतीय संगीताचे मुख्य क्षेत्र होते.)
ख्वाजा-ए-जहां मलिक सरवर या राज्याचे पहिले शासक होते.(जे कधी नसिरुद्दीन शाहचे वजीर होते.) या राज्याचे शेवटचे शासक होते सुलतान हुसेनशाह शर्की (१४५८-१४८५) काही इतिहास तज्ज्ञ हा काळ १४५८ ते १५०५ असा सांगतात. सुलतान हुसेनशाह शर्की हे फार मोठे संगीत प्रेमी व जाणकार होते.त्यांना गंधर्व उपाधीने नावाजले होते.ते ख्याल गायकीला प्रोत्साहन देण्याबद्दल प्रसिद्ध आहेत.त्यांनी 'मल्हार शाम','गौड शाम' आणि 'भूपाल शाम' या सारखे दुर्लभ राग बनविल्याचेही सांगितले जाते.आपल्या संगीत प्रेमापोटी त्यांनी आणखी एक राग तयार केला, ज्याला नाव दिले राग 'हुसैनी'.हाच हुसैनी पुढे जौनपुरी नावाने प्रसिद्ध झाला.जो आज उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एक लोकप्रिय राग असून बहुतेक सर्व गायक वादक हा राग आवर्जून सादर करताना दिसतात.या कालखंडात दिल्ली आणि जौनपूर सत्तासंघर्ष चरम सीमेवर होता.शेवटी बहलोल लोदीने जौनपुरवर ताबा मिळवून दिल्लीमध्ये सामिल करून घेतल्यामुळे हुसेन शर्की आपले राज्य गमावून बसले.पण त्यांच्या या सांगीतिक योगदानाबद्दल त्यांची आठवण संगीत प्रेमींच्या मनात कायम राहणार आहे.
जौनपुरी राग आसावरी थाटातून उत्पन्न झाला आहे. याला जीवनपुरी असेही म्हटले जाते. या रागात 'गांधार' ‘धैवत’आणि ‘निषाद’ हे स्वर कोमल आहेत.आरोहात गांधार वर्ज असून अवरोहात सातही स्वर लागतात.त्यामुळे याची जाती षाडव संपूर्ण आहे.वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे.गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर.हा राग उत्तरांग प्रधान आहे. याचा विस्तार मध्य आणि तार सप्तकात केल्या जातो.याला गंभीर प्रकृतीचा का राग मानतात. आसावरी आणि जौनपुरी एकदम जवळचे राग आहेत.त्यामुळे गाताना फार सावधगिरी बाळगावी लागते.आसावरीमध्ये आरोहात निषाद वर्ज आहे तर जौनपुरीमध्ये आरोहात निषाद घेतल्या जातो.या रागात पूर्वांगात 'सारंग' व उत्तरांगात 'आसावरी' दिसून येतो. सध्या अप्रचलीत असलेला 'गांधारी' राग जौनपुरीशी बराच मिळता-जुळता आहे.
आरोह– सा रे म प ध नी सां
अवरोह– सां नी ध प, म ग, रे सा
पकड़– म प, नी ध प, ध म प ग S रे म प
भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एक खास अशी बाब आहे की,दोन रागांचे स्वर एकसारखे असूनही स्वरलगावाच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे राग वेगवेगळे होतात.प्रत्येक रागात वेगवेगळ्या पद्धतीने स्वर लावल्यामुळे प्रत्येक रागाचे वेगळे रूप आपल्या समोर येते.राग जौनपुरी, राग दरबारी कानडा आणि राग अडाणा या रागांचे स्वर सारखेच आहेत.परंतू ज्या पद्धतीने गायिल्या जाते त्याने प्रत्येक राग पूर्णपणे वेगळा होतो.
केसरबाई केरकर,उस्ताद बडे गुलाम अली खान, रोशनआरा बेगम, गिरीजा देवी, मास्टर कृष्णराव, माणिक वर्मा, पं. डी. व्ही.पलुस्कर, उस्ताद नजाकत अली सलामत अली, पंडित भीमसेन जोशी,पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद फतेह अली खान, मालिनी राजूरकर, पंडित राजन साजन मिश्र, किशोरी आमोणकर,वीणा सहस्रबुद्धे,अश्विनी भिडे,आरती अंकलीकर,उस्ताद नुसरत फतेह अली खान, परवीन सुलताना, पंडित अजय चक्रवर्ती,पं. ज्ञान प्रकाश घोष, पं. व्यंकटेश कुमार, पं. जयतीर्थ मेवूंडी, शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर,अपूर्वा गोखले,मंजुषा पाटील,मौमिता मित्रा,कौशिकी चक्रवर्ती,पं. हरीश तिवारी,रवींद्र परचुरे,गौरी पठारे,मंजिरी असनारे,उस्ताद बिस्मिल्ला खान (शहनाई), उस्ताद अली अकबर खान (सरोद), पं.पुर्बायन चटर्जी (सतार),उस्ताद शाहीद परवेज खान (सतार), पं. निखिल बॅनर्जी (सतार), कला रामनाथन (व्हायोलिन), रुपा पानेसर (सतार), कल्याणी रॉय (सतार) अली अहमद हुसैन (शहनाई) जुगलबंदी.अभ्यासकांसाठी या दिग्गजांचे व्हीडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.
● जौनपुरीवर आधारित हिंदी,उर्दू चित्रपट गीते...
'मेरी याद में तुम ना आंसू बहाना' तलत महमूद. चित्रपट-मदहोश, संगीत-मदन मोहन (१९५१).
‘जाएं तो जाएं कहां’ लता,तलत.चित्रपट-टॅक्सी ड्रायव्हर, संगीत-एस.डी. बर्मन (१९५४). (आधारित)
'रहीए अब ऐसी जगह' सुरैय्या. चित्रपट-मिर्झा गालिब,संगीत-गुलाम मोहम्मद (१९५४).
'पिया ते कहां गयो नेहरा लगा' लता.चित्रपट-तुफान और दिया, संगीत-वसंत देसाई (१९५६).
'दिल छेड़ कोई ऐसा नगमा' लता,आशा,हेमंत कुमार. चित्रपट-इंस्पेक्टर, संगीत-हेमंत कुमार(१९५६).
'टुटे हुये ख्वाबो ने' रफी.चित्रपट-मधुमती, संगीत-सलील चौधरी (१९५८).
'चितनंदन आगे नाचूंगी' लता.चित्रपट-दो कलियां, संगीत- (१९६८).
'आज सोचा तो आंसू भर आये' लता. चित्रपट-हंसते जख्म, संगीत-मदन मोहन (१९७०).
'दिल में हो तुम आंखो में तुम' एस जानकी,बप्पी लहरी. चित्रपट-सत्यमेव जयते, संगीत-बप्पी लहरी (१९८७)
'पल पल है भारी' मधुश्री,चित्रपट-स्वदेस, संगीत-ए.आर. रहमान (२००५).
या रागाची रेंज इतकी भारी आहे की,संगीतकार एस.डी. बर्मन,मदन मोहन,हेमंत कुमार पासून तर बप्पी लहरी, ए.आर.रहमान यांनी जौनपुरीच्या जमिनीवर आपल्या गाण्याची धून बनविली आहे.
● नॉन फिल्मी...
'श्रीराम भजो सुख में दुख में'गायक-के.सी.डे. (१९३०).
'प्रेम भावे जीव जगी या' उस्ताद अब्दुल करीम खान.अल्बम-हिराबाई बडोदेकर मराठी गीते.
'राम प्रभू आधार जगत के' पंडित भीमसेन जोशी.संत तुलसीदास.
● मराठी...
'देवा तुझा मी सोनार' गायक-रामदास कामत. अभंग-संत नरहरी सोनार, संगीत यशवंत देव.
'तुझे रूप चित्ती राहो' गायक/संगीतकार-सुधीर फडके.
चित्रपट-संत गोरा कुंभार.
'अवघे गरजे पंढरपूर' गायक-प्रकाश घांग्रेकर/शौनक अभिषेकी.नाटक-संगीत संत गोरा कुंभार,संगीत-पंडित जितेंद्र अभिषेकी. (१९७४).
----------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी,दि.२४/१२/२०२३
Friday, December 22, 2023
आठवणीतील-शब्द -स्वर (लेखांक २०)
Wednesday, December 20, 2023
आठवणीतील शब्द स्वर (लेखांक १९) 'मान आणि धन'
Thursday, December 14, 2023
आठवणीतील शब्द स्वर (लेखांक १८) नोकरी आणि लग्न.
सुलभाचे आणि माझे प्रेम प्रकरण यवतमाळात चर्चेचा विषय व्हायला लागला होता.मी कुणबी (पाटील) व सुलभा ब्राह्मण.त्यातही तिवसा (यवतमाळ) येथील प्रसिद्ध जमीनदार स्व.मुकुंदराव सुभेदाराची भाची. ( नुकतेच निधन झालेले शेतीतज्ज्ञ आनंदराव सुभेदार यांची सख्खी मामेबहीण.) त्यामुळे दोन्हीकडून प्रचंड विरोध झाला.पण आम्ही दोघे आमच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे सुरवातीला असलेला विरोध दोन्ही घरातून चर्चेने सोडवला गेला व लग्न करायचे ठरले.लग्नाची तारीख काढण्यासाठी माझे सासरे स्व.दत्तात्रय चांदेकर हे यवतमाळात प्रसिद्ध असलेल्या एका 'शास्त्री'कडे गेले.शास्त्रीने तारीख तर काढलीच नाही, पण 'तुमच्या मुलीची काही भानगड असल्यामुळे लग्नाची घाई करता काय?' असा उलट प्रश्न करून डिवचले.सासरेबुवा जितके प्रेमळ तितकेच रागीटही होते.त्यांनी शास्त्रीबुवाला 'तसे काही नाही,पण शंकाच असेल तर एक वर्ष लग्न करणार नाही.आणि आता लग्न तिथीवर न लावता नोंदणी पद्धतीने करीन.पण तुमच्याकडे येणार नाही'.असे सणकावून तेथून निघून आले.अशा प्रकारे आमचे लग्न एक वर्ष पुढे ढकलल्या गेले.(याच शास्त्रीबुवांनी पुढे आपल्या शिष्येशीच काहीतरी गडबड केल्याची चर्चा अख्ख्या यवतमाळात होती.त्याची परिणती मूल होण्यात झाल्याचेही बोलले जात होते.असो!)
गावात,नातेवाईकांमध्ये चर्चा व्हायला लागल्या म्हणून कुठे तरी काम करून चार पैसे कमावणे आवश्यक होते.त्याशिवाय लग्न करणे शक्य नव्हते.कल्याणला शंकर बडेचे जावई रहायचे.त्यांना आम्ही दाजी म्हणत असू.शंकरला नट व्हायचे होते व मला संगीतकार. त्यासाठी अधून मधून मुंबई वारी करत असू.असेच एका उन्हाळ्यात दाजीकडे जाऊन मुंबईत दूरदर्शन,एच एम व्ही,संगीतकार,नाटककार यांचे उंबरठे झिजवत असताना दाजीकडे माझ्या वडिलांचे पत्र आले.त्यात आर्णीतील महंत दत्तराम भारती विद्यालकडून संगीत शिक्षकाच्या जागेसाठीच्या मुलाखतीचे पत्र आल्याचा उल्लेख होता.तसेच त्वरित निघून ये अशी आज्ञा पण! मला कळेचना की हा चमत्कार कसा झाला.कारण मी कुठल्याही प्रकारचा अर्ज केलेला नव्हता.कल्याणला असल्यामुळे जाहिरात केव्हा आली तेच माहीत नव्हते तर अर्ज कसा करणार?पण बापजींची आज्ञा म्हटल्यावर वापस जाणे भाग होते.यवतमाळला पोहोचल्यावर अर्जाचा उपदव्याप कवी मित्र सुभाष परोपटेने केल्याचे कळले.त्यावरून सुभाषची बरीच धुलाई केली.कारण मला शिक्षक व्हायचे नव्हते.मग आलीया भोगासी म्हणत मुलाखतीला जायची तयारी करणे सुरू केले.तुम्ही म्हणाल तयारी म्हणजे काय उत्तरे द्यायची वगैरे वगैरेची तयारी...पण नाही! माझी तयारी वीतभर बॉटमचा पायजामा व भगवे शर्ट.(त्या काळी कपड्याच्या पन्ह्याइतक्या बॉटमचा पायजामा असायचा).हा अवतार कशासाठी?तर मुलाखतीमध्ये निवड होऊ नये म्हणून.म्हणता म्हणता मुलाखतीचा दिवस उजाडला.या मुलाखतीच्या वेळी शंकरने मित्रवर्य डॉक्टर सुधाकर पुरी यांना सोबत घेऊन जायला सांगितले.का ते मात्र सांगितले नाही.डॉक्टर व मी आर्णीला पोहोचलो.मी शाळेत व डॉक्टर संस्थेचे अध्यक्ष चित्घनानंदजी भारती यांचेकडे गेले.शाळेतील बाबूने बरोबर अकरा वाजता भारतीजींच्या भव्य वाड्यातील बैठकीबाहेर असलेल्या बेंचवर सगळ्या मुलाखतकारांना नेऊन बसवले.माझा पुकारा झाला...वीतभर बॉटमचा पायजामा व भगवे शर्टअशा अवतारात आत गेलो.थोडीफार प्रश्नोत्तरे व प्रमाणपत्रे पाहून 'दुपारी पुन्हा या' असे सांगून सोडले.या दरम्यान डॉक्टर पुरी कुठे होते ते कळलेच नाही.त्यावेळी आर्णी गाव इतके लहान होते की खानावळ सुद्धा नव्हती.त्यावेळी गांधी गेटजवळ 'शाम' हे एकमेव हॉटेल होते. हॉटेलमध्ये जे मिळेल ते खाऊन दुपारी बैठकीत हजर झालो.तिथे संस्थाध्यक्ष भारतीजी,
सदस्यगण,संगीत रसिक दानशूर बापुसाहेब बुटले,
मुख्याध्यापक शंकरराव बुटले काही ज्येष्ठ शिक्षक बसले होते.(अर्थात ही नावे मला नंतर कळली.)आणि मग मला गायला सांगितले.अर्धा-पाऊण तासाची मैफल केल्यावर मला शाळेत जाण्यास सांगितले.मुख्याध्यापक अगोदरच पोहोचले होते.एकूण निवड होण्याची लक्षणे दिसायला लागली होती.निवड होऊ नये म्हणून काय करावे हा विचार सुरू असताना मुख्याध्यापकांनी 'तुमचे लग्न झाले काय' असा प्रश्न केला.मी हीच वेळ साधून अगदी टपोरी पोरासारखे 'नौकरी नहीं तो छोकरी कौन देंगा' असे उत्तर दिले. त्यांनी तिरप्या नजरेने माझ्याकडे पाहिले व बाबूकडून नियुक्तीपत्र घेवून जाण्यास सांगितले.माझी सगळी मेहनत पाण्यात गेली होती.हिरमुसला होऊन शाळेच्या बाहेर आलो तर डॉक्टर पुरी माझी वाट बघत असल्याचे दिसले. यवतमाळला वापस जाण्यासाठी बस स्थानकावर आलो तर कळले की सायंकाळी चार नंतर यवतमाळसाठी कुठलीच बस नाही.कसे बसे एका ट्रकवाल्याला पैसे देऊन यवतमाळ गाठले.ठरलेल्या दिवशी कामावर रुजू झालो.पण माझी निवड का झाली हे कळेचना.बऱ्याच कालावधीनंतर शंकरने खुलासा केला की, मुलाखत प्रसंगीची माझी मैफल छान रंगली होती व मला बरीच वाद्ये वाजविता येतात हे त्यांना आवडले होते, (१९७१ मध्ये आमचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आर्णीला होऊन गेला होता.त्यावेळी माझे अकॉर्डियन वादन आर्णीकरांनी अनुभवले होते.ती कीर्ती पण संस्थाचालकांपर्यंत अगोदरच पोहोचली होती.) आणि या सोबतच महत्वाचे म्हणजे डॉ.पुरी हे भारतींचे जवळचे नातेवाईक आहेत हे ही शंकर कडून कळले.व सगळे कोडे उलगडत गेले अशा प्रकारे शिक्षक न होण्याची प्रतिज्ञा करूनही मी जून १९७२ मध्ये संगीत मास्तर म्हणून श्री महंत दत्तराम भारती विद्यालयात रुजू झालो.
शास्त्रीबुवाला बोलल्याप्रमाणे सासरेबुवांनी नोकरी लागल्यावर एक वर्षानंतर २१ नोव्हेंबर १९७३ ला नोंदणी पद्धतीने आमचे लग्न लावून दिले. हे लग्न जास्ती टिकणार नाही,दोन तीन वर्षातच घटस्फोट होईल असे भाकित करणाऱ्या यवतमाळातील होरातज्ज्ञ व भविष्यकर्त्यांना, आज पन्नास वर्षे होऊनही आमचे प्रेम तसेच 'तरुण' असून, लग्नही टिकून आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटत आहे. माझ्या सांगीतिक वाटचालीमध्ये सुलभाचा सिंहाचा वाटा आहे.माझा उत्कर्ष व्हावा म्हणून तिने खूप सोसले.आज मी जो काही आहे त्यात ७५ टक्के वाटा तिचा आहे.हे कबूल करण्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही.माझ्या दृष्टीने ती आदर्श सून,आदर्श पत्नी,आदर्श आई व आदर्श आजी आहे.(आदर्श मैत्रीण पण आहे असे तिच्या मैत्रिणी सांगतात.विशेषतः संगीता सिडाना,अमृतसर... पूर्वाश्रमीची रिता वर्मा, यवतमाळ.)





