गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, December 22, 2023

आठवणीतील-शब्द -स्वर (लेखांक २०)

             

           'तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
            तुमच्यात मी येऊ कसा बदनाम झंझावात मी...'

     मराठी गझल गायकीच्या अगदी सुरवातीच्या, म्हणजे सुरेश भट आणि मी महाराष्ट्रभर फिरत असतानाच्या काळातील कार्यक्रमात गायिलेली '#जगलो_असाच_कसा_तरी' ही गझल  जुन्या जीर्ण  कॅसेटमध्ये सापडली.पण कॅसेट इतकी खराब झाली होती की, त्यातील फक्त शेवट कसातरी उतरवता आला. सुरेश भटांनी आग्रहाने ही गझल माझ्याकडून स्वरबद्ध करून घेऊन कार्यक्रमात गायला लावली होती. ही गझल कधी ते त्यांच्या पद्धतीने सादर करायचे, कधी मला गायला सांगायचे. त्या काळात दोन वा तीन माईकवर कार्यक्रम करावा लागायचा. ते पण दर्जेदार असतीलच असे नव्हते.त्या त्या साउंड सिस्टिमवाल्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार चांगले/वांगले असायचे. आमच्यासमोर ''मॉनिटर' पण नसायचे.
कार्यक्रमाची सगळी मदार साउंड सिस्टिमवाल्यावर असायची. रसिकांकडून दाद आली तर कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे असे समजायचे. कार्यकम चांगला वा वाईट करणे त्याच्या मर्जीवर असायचे.  
बिघडवायला तर भोंग्याने मारलेल्या दोन/चार शिट्ट्या सुद्धा पुरायच्या. सिस्टिमवल्याकडे जास्ती करून 'आहुजा' कंपनीचा एम्प्लिफायर,टेप रेकॉर्डर असायचे.हे सुद्धा साउंड सिस्टिमवाल्याने आहुजच्या डेकवर केलेले रेकॉर्डिंग आहे. प्रत एकदमच खराब आहे.तरी पण अनवट रागात कंपोझिशन
असल्यामुळे आपल्या समोर ठेवत आहे.गोड करून घ्यावी.ही विनंती.

सारंगी - मरहूम उस्ताद लतीफ अहमद खान
तबला - तालमणी प्रल्हाद माहुलकर

●headphone or earphone please...


 

Wednesday, December 20, 2023

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक १९) 'मान आणि धन'



     आम्हा कलावंतांच्या आयुष्यात मान आणि धनाचा संबंध, हातातोंडाच्या संबंधाइतका महत्त्वाचा असतो. त्यामुळे मानाचा आणि धनाचा व्यस्त प्रमाणातील अनुभव आमच्या पाचवीलाच पूजला असतो. कधी मान, कधी धन, तर कधी मानासह धन, तर कधी धनासह मान असे प्रकार घडत असल्यामुळे मान आणि धनापैकी किंवा दोन्हीही मिळाले तर 'पदरी पडले पवित्र झाले' असे समजून समाधान मानून घेतो.
     सरस्वती आणि लक्ष्मीचे वाकडे असून, ह्या दोघी एकत्र नांदत नाही, असे म्हणतात.पण सध्याच्या प्रतिथयश कलावंतांकड़े बघून हे पटत नाही. ज्या कलावंतांकडे लक्ष्मी व सरस्वती पाणी भरतात त्या कलावंतांना मानावेच लागते. खरे म्हणजे छोट्या-मोठ्या कलावंतांच्या बाबतीतच वरील उक्ती लागू पडते. कारण त्यांची सरस्वतीची आराधना सुरू असते. एकदा सरस्वती पावली की मग तिला बगल देऊन लक्ष्मीची आराधना सुरू करावी म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतात. पण सच्चा कलावंत ही गोष्ट मान्य करत नाही. त्यामुळे त्याला आयुष्यभर मानाचे आणि धनाचे गणित जुळवत बसावे लागते.
     खरा कलावंत तसा मानाचाच भुकेला असतो असे म्हणतात. प्रसिध्दी मिळणारा असेल तर पैशाचीही फिकीर न करणारा कलावंत नेहमीच आपण बघतो. त्यांच्या या प्रसिध्दीसाठी हपापलेपणाचा गैरफायदा घेऊन, नुसत्या मानाचा वर्षाव करून अनेक जण त्यांना बापरून घेतात व कलाकार मात्र अमक्या अमक्याच्या घरी बैठक झाली. अमक्या अमक्या गावात मैफल गाजवली या विश्वातच खूष असतो.
     जवळ-जवळ पंचेचाळीस वर्षांपूर्वी, मुंबईचा गझल गायनाचा कार्यक्रम आटोपल्यावर ठाण्याच्या माझ्या जिवलग मित्राकडे भेटायला गेलो. नाव आम्बेगावकर ! गेल्या गेल्या सगळ्यांची विचारपूस झाल्यावर मित्राने मुक्कामाबद्दल विचारले. मी थांबणारच होतो. तसे त्याला सांगितल्यावर तो मासळी आणायला बाजारात निघून गेला. मी फ्रेश होऊन वहिनींशी गप्पा मारत बसलो तेवढ्यात मित्र आला व कार्यक्रम करणार का? असे विचारले. मला आढेवेढे घेण्याचे काहीच कारण नव्हते. होकार देऊन टाकला. रात्री तिथल्याच सी. के. पी. हॉलमध्ये मैफल जमवली. रंगली! रसिकांनाही भावली! कार्यक्रमानंतरचे चहापान व भरपूर मानसन्मान सोबत घेऊन आम्ही घरी आलो. आल्या आल्या मित्राने एक पाकीट माझ्या हातात ठेवले. पाकीट म्हणजे पैसे हे मला माहीत असल्यामुळे मी ते घेण्यास नकार दिला. कारण मित्राकडून अशा मैफिलीचे पैसे घेणे मला अजून जमले नाही. त्यावर मित्र म्हणाला, 'बाबा रे, हे पैसे मी देत नसून इथल्या रसिक मंडळींनी दिलेले मानधन आहे. कारण इकडे फुकटात कार्यक्रम बघण्याची किंवा ऐकण्याची प्रथा नाही. फूल ना फुलाची पाकळी, ऐपतीप्रमाणे प्रत्येक जण देतोच. तेच हे पैसे आहेत!' मला आश्चर्य वाटले, कारण तिकीट असलेल्या कार्यक्रमात फुकट कसे घुसता येईल हे पाहणारे 'र-सिक' आमच्या पाहण्यात होते, त्यामुळे हा प्रकार म्हणजे आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. 
     दुसरा किस्सा पुलगावचा आहे. अगोदरच्या दिवशी राळेगावला (जि. यवतमाळ) कार्यक्रम असल्यामुळे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी जेवण व आराम करून पुलगावकडे (जि. वर्धा)  निघालो. पण यवतमाळला येईपर्यंत आमचे तबलजी तालमणी प्रल्हाद माहुलकर यांना सडकून ताप भरला. औषधपाणी होईपर्यंत रात्रीचे आठ वाजले. म्हणून कार्यक्रम रद्द करण्यासंबंधी दूरध्वनी करावयाच्या बेतास आलो. पण तबलजीने 'थोडे बरे वाटत आहे, कार्यक्रम करूनच टाकू' असे म्हटल्यामुळे तडक गाडीत बसून पुलगावला गाठले. पोहोचल्याबरोबर आयोजक मंडळींनी हुज्जत घालायला सुरुवात केली. 'उशिरा आल्यामुळे कलेक्शन झाले नाही,' 'ही यायची वेळ आहे का? वगैरे वगैरे... मी त्यांना तबलजीच्या प्रकृतीविषयी सांगितले, पण ती मंडळी काहीच ऐकून न घेता हमरी-तुमरीवर यायला लागली. यावरून त्यांची नियत बिघडल्याचे माझ्या लक्षात आले. जास्ती वाद न घालता सरळ स्टेजवर गेलो व कार्यक्रम सुरू केला.अर्धे मानधन अनामत म्हणून घेतले होते,बाकी मिळण्याची आशा सोडली.व रसिकांचा हिरमोड होऊ नये म्हणून कार्यक्रम पूर्ण करून निघून आलो.मराठी गझल गायनाचे कार्यक्रम करतानाचे हे अनुभव आहेत.सुरेश भट आणि मी त्या काळी महाराष्ट्रभर भटकंती करताना काय काय सोसले ते आम्हा दोघांनाच माहिती. आम्ही दोघे मिळून कार्यक्रम करीत होतो,तेव्हा मरठी गझल गायनाचे कार्यक्रम करणारा एकही कलाकार नव्हता. हे खरे सत्य आज नवरसिकांच्या पचनी पडत नाही ही दुःखाची बाब आहे.असो!
     तिसरा अनुभव आहे (हा किस्सा 'फिक्कर कराची नाय' या शिर्षकांतर्गत आपण वाचला आहे.तरी पण तीन ठिकाणची मानसिकता कळावी म्हणून येथे पुनश्च देत आहे.) यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा या लहानशा गावाचा. मान आणि धन दोन्हीचा वर्षाव करणारे हे गाव कायम लक्षात राहण्याचे कारण मानधन हे नसून, तिथली पध्दत व कार्यक्रमाची मजा हे होय. त्यावेळी मी भाग्योदय कला मंडळाच्या शिवरंजन ऑर्केस्ट्रामध्ये अॅकार्डीयन वाजवायचो. गणेशोत्सवात मोहद्याचा कार्यक्रम होता. ठरल्याप्रमाणे पोहोचल्याबरोबर नवरदेवाकडील पाहुणे असल्याप्रमाणे हातपाय धुवायला तांब्याच्या घंगाळात गरम पाणी, सुवासिक साबण, नवा कोरा टर्किशचा टॉवेल हा जामानिमा पाहून आश्चर्यचकित झालो. त्यानंतरचा चहा, फराळ, पान-सुपारी आटोपेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले. म्हणून कार्यक्रम स्थळी जावे म्हणून आयोजकांना 'वाद्य वगैरे स्टेजवर न्यायचे का?' विचारले तर ते म्हणाले, 'फिक्चर करू नका! जेवणबिवण आटपू, मग कार्यक्रमाचा पाहू!' आयुष्यात पहिल्यांदा इतकी बिनफिकरी माणसे भेटल्याने काय बोलावे कळेना. मग विचार केला आयोजकांनाच काळजी नाही तर आपण तरी कशाला लोड घ्यावा ! आणि लोडाला टेकून मस्त ताणून दिली. थोड्याच वेळात जेवणाचे निमंत्रण आले. तोंडात विडा ठेवून घड्याळ बघतो तो अकरा वाजलेले. आता मात्र माझे पाच गेले व दहा राहिले. कार्यक्रमाचे कसे होईल, लोक येतील की नाही... आलेल्या लोकांनी धिंगाणा तर घातला नसेल ना? या काळजीने कोणालाही काही न विचारता सरळ स्टेजवर जाऊन बसलो. तेव्हा एका आयोजकाने खुलासा केला, 'राजे हो! आमच्या गावात दोन मंडळ हायंत. कार्यक्रमाचा गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही पॅक केलं आहे. एक दिवस त्यांचा कार्यक्रम आगुदर असते अन् एक दिवस आमचा ! आज त्यायच्या कार्यक्रमाची बारी हाय! थे तिकडं कीर्तन आयकू येते ना! थे संपलं का आपला कार्यक्रम सुरू कराचा. तिथल्ले लोक इकडे येते! म्हून तुमाले सांगो का फिक्कर कराची न्हाई म्हून!'या प्रकारामुळे हसावे की रडावे कळेना, पण त्यांच्या 'पॅक'ची गंमत मनाला भावून गेली. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने जुने वैर काढून एकमेकांची डोकी फोडणारी मंडळी एकीकडे व मोहदावासियांनी केलेले 'पॅक' यातून आपण काय शिकावे, काय घ्यावे हे ठरवायला हरकत नाही. त्यांच्या पॅकमुळे आमचा कार्यक्रम रात्री बारा वाजता सुरू झाला. सकाळपर्यंत चालला. पण एक नवी परंपरा जोपासणाऱ्या गावकऱ्यांच्या आदरातिथ्यामुळे व नवी दिशा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला रात्रभराच्या जागरणाचेसुध्दा काहीच बाटले नाही. कार्यक्रमाच्या अगोदरचा मान व नंतरचे धन याहीपेक्षा महत्त्वाचे एकोपा व सामंजस्य याचे विचारधन घेऊन वापस आलो.

डावीकडे - तबला वादक प्रल्हाद माहुलकर.


 

Thursday, December 14, 2023

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक १८) नोकरी आणि लग्न.


     सुलभाचे आणि माझे  प्रेम प्रकरण यवतमाळात चर्चेचा विषय व्हायला लागला होता.मी कुणबी (पाटील) व सुलभा ब्राह्मण.त्यातही तिवसा (यवतमाळ) येथील प्रसिद्ध जमीनदार स्व.मुकुंदराव सुभेदाराची भाची. ( नुकतेच निधन झालेले शेतीतज्ज्ञ आनंदराव सुभेदार यांची सख्खी मामेबहीण.) त्यामुळे दोन्हीकडून प्रचंड विरोध झाला.पण आम्ही दोघे आमच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे  सुरवातीला असलेला विरोध दोन्ही घरातून चर्चेने सोडवला गेला व लग्न करायचे ठरले.लग्नाची तारीख काढण्यासाठी माझे सासरे स्व.दत्तात्रय चांदेकर हे यवतमाळात प्रसिद्ध असलेल्या एका 'शास्त्री'कडे गेले.शास्त्रीने तारीख तर काढलीच नाही, पण 'तुमच्या मुलीची काही भानगड असल्यामुळे लग्नाची घाई करता काय?' असा उलट प्रश्न करून डिवचले.सासरेबुवा जितके प्रेमळ तितकेच रागीटही होते.त्यांनी शास्त्रीबुवाला 'तसे काही नाही,पण शंकाच असेल तर एक वर्ष लग्न करणार नाही.आणि आता लग्न तिथीवर न लावता नोंदणी पद्धतीने करीन.पण तुमच्याकडे येणार नाही'.असे सणकावून  तेथून निघून आले.अशा प्रकारे आमचे लग्न एक वर्ष पुढे ढकलल्या गेले.(याच शास्त्रीबुवांनी पुढे आपल्या शिष्येशीच काहीतरी गडबड केल्याची चर्चा अख्ख्या यवतमाळात होती.त्याची परिणती मूल होण्यात झाल्याचेही बोलले जात होते.असो!)

     गावात,नातेवाईकांमध्ये चर्चा व्हायला लागल्या म्हणून कुठे तरी काम करून चार पैसे कमावणे आवश्यक होते.त्याशिवाय लग्न करणे शक्य नव्हते.कल्याणला शंकर बडेचे जावई रहायचे.त्यांना आम्ही दाजी म्हणत असू.शंकरला नट व्हायचे होते व मला संगीतकार. त्यासाठी अधून मधून मुंबई वारी करत असू.असेच एका उन्हाळ्यात दाजीकडे जाऊन मुंबईत  दूरदर्शन,एच एम व्ही,संगीतकार,नाटककार यांचे उंबरठे झिजवत असताना दाजीकडे माझ्या वडिलांचे पत्र आले.त्यात आर्णीतील महंत दत्तराम भारती विद्यालकडून संगीत शिक्षकाच्या जागेसाठीच्या मुलाखतीचे पत्र आल्याचा उल्लेख होता.तसेच त्वरित निघून ये अशी आज्ञा पण! मला कळेचना की हा चमत्कार कसा झाला.कारण मी कुठल्याही प्रकारचा अर्ज केलेला नव्हता.कल्याणला असल्यामुळे जाहिरात केव्हा आली तेच माहीत नव्हते तर अर्ज कसा करणार?पण बापजींची आज्ञा म्हटल्यावर वापस जाणे भाग होते.यवतमाळला पोहोचल्यावर अर्जाचा उपदव्याप कवी मित्र सुभाष परोपटेने केल्याचे कळले.त्यावरून सुभाषची बरीच धुलाई केली.कारण मला शिक्षक व्हायचे नव्हते.मग आलीया भोगासी म्हणत मुलाखतीला जायची तयारी करणे सुरू केले.तुम्ही म्हणाल तयारी म्हणजे काय उत्तरे द्यायची वगैरे वगैरेची तयारी...पण नाही! माझी तयारी वीतभर बॉटमचा पायजामा व भगवे शर्ट.(त्या काळी कपड्याच्या पन्ह्याइतक्या बॉटमचा पायजामा असायचा).हा अवतार कशासाठी?तर मुलाखतीमध्ये निवड होऊ नये म्हणून.म्हणता म्हणता मुलाखतीचा दिवस उजाडला.या मुलाखतीच्या वेळी शंकरने मित्रवर्य डॉक्टर सुधाकर पुरी यांना सोबत घेऊन जायला सांगितले.का ते मात्र सांगितले नाही.डॉक्टर व मी आर्णीला पोहोचलो.मी शाळेत व डॉक्टर संस्थेचे अध्यक्ष चित्घनानंदजी भारती यांचेकडे गेले.शाळेतील बाबूने बरोबर अकरा वाजता भारतीजींच्या भव्य वाड्यातील बैठकीबाहेर असलेल्या बेंचवर सगळ्या मुलाखतकारांना नेऊन बसवले.माझा पुकारा झाला...वीतभर बॉटमचा पायजामा व भगवे शर्टअशा अवतारात आत गेलो.थोडीफार प्रश्नोत्तरे व प्रमाणपत्रे पाहून 'दुपारी पुन्हा या' असे सांगून सोडले.या दरम्यान डॉक्टर पुरी कुठे होते ते कळलेच नाही.त्यावेळी आर्णी गाव इतके लहान होते की खानावळ सुद्धा नव्हती.त्यावेळी गांधी गेटजवळ 'शाम' हे एकमेव हॉटेल होते. हॉटेलमध्ये जे मिळेल ते खाऊन दुपारी बैठकीत हजर झालो.तिथे संस्थाध्यक्ष भारतीजी,

सदस्यगण,संगीत रसिक दानशूर बापुसाहेब बुटले,

मुख्याध्यापक शंकरराव बुटले काही ज्येष्ठ शिक्षक बसले होते.(अर्थात ही नावे मला नंतर कळली.)आणि मग मला गायला सांगितले.अर्धा-पाऊण तासाची मैफल केल्यावर मला शाळेत जाण्यास सांगितले.मुख्याध्यापक अगोदरच पोहोचले होते.एकूण निवड होण्याची लक्षणे दिसायला लागली होती.निवड होऊ नये म्हणून काय करावे हा विचार सुरू असताना मुख्याध्यापकांनी 'तुमचे लग्न झाले काय' असा प्रश्न केला.मी हीच वेळ साधून अगदी टपोरी पोरासारखे 'नौकरी नहीं तो छोकरी कौन देंगा' असे उत्तर दिले. त्यांनी तिरप्या नजरेने माझ्याकडे पाहिले व बाबूकडून नियुक्तीपत्र घेवून जाण्यास सांगितले.माझी सगळी मेहनत पाण्यात गेली होती.हिरमुसला होऊन शाळेच्या बाहेर आलो तर डॉक्टर पुरी माझी वाट बघत असल्याचे दिसले. यवतमाळला वापस जाण्यासाठी बस स्थानकावर आलो तर कळले की सायंकाळी चार नंतर यवतमाळसाठी कुठलीच बस नाही.कसे बसे एका ट्रकवाल्याला पैसे देऊन यवतमाळ गाठले.ठरलेल्या दिवशी कामावर रुजू झालो.पण माझी निवड का झाली हे कळेचना.बऱ्याच कालावधीनंतर शंकरने खुलासा केला की, मुलाखत प्रसंगीची माझी मैफल छान रंगली होती व मला बरीच वाद्ये वाजविता येतात हे त्यांना आवडले होते, (१९७१ मध्ये आमचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आर्णीला होऊन गेला होता.त्यावेळी माझे अकॉर्डियन वादन आर्णीकरांनी अनुभवले होते.ती कीर्ती पण संस्थाचालकांपर्यंत अगोदरच पोहोचली होती.) आणि या सोबतच महत्वाचे म्हणजे डॉ.पुरी हे भारतींचे जवळचे नातेवाईक आहेत हे ही शंकर कडून कळले.व सगळे कोडे उलगडत गेले अशा प्रकारे शिक्षक न होण्याची प्रतिज्ञा करूनही मी जून १९७२ मध्ये संगीत मास्तर म्हणून श्री महंत दत्तराम भारती विद्यालयात रुजू झालो.

    शास्त्रीबुवाला बोलल्याप्रमाणे सासरेबुवांनी नोकरी लागल्यावर एक वर्षानंतर २१ नोव्हेंबर १९७३ ला नोंदणी पद्धतीने आमचे लग्न लावून दिले. हे लग्न जास्ती टिकणार नाही,दोन तीन वर्षातच घटस्फोट होईल असे भाकित करणाऱ्या यवतमाळातील होरातज्ज्ञ व भविष्यकर्त्यांना, आज पन्नास वर्षे होऊनही आमचे प्रेम तसेच 'तरुण' असून, लग्नही टिकून आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटत आहे. माझ्या सांगीतिक वाटचालीमध्ये सुलभाचा सिंहाचा वाटा आहे.माझा उत्कर्ष व्हावा म्हणून तिने खूप सोसले.आज मी जो काही आहे त्यात ७५ टक्के वाटा तिचा आहे.हे कबूल करण्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही.माझ्या दृष्टीने ती आदर्श सून,आदर्श पत्नी,आदर्श आई व आदर्श आजी आहे.(आदर्श मैत्रीण पण आहे असे तिच्या मैत्रिणी सांगतात.विशेषतः संगीता सिडाना,अमृतसर... पूर्वाश्रमीची रिता वर्मा, यवतमाळ.)



Saturday, December 9, 2023

राग-रंग (लेखांक ३५) राग खमाज



नाहं वसामि वैकुण्ठे योगिनां हृद ये न च |
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ||

     संगीत कोण्या समाजविशेषाचे प्रतिनिधित्व करणारी कला नाही.ही तर सर्व मानवीय भावांना मूर्त रूप प्रदान करणारी कला आहे.सुख असो वा दुःख संगीत हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनादी काळापासून मानवासोबत राहिले आहे.भारतीय संगीताच्या क्रियात्मक पक्षांतर्गत शास्त्रीय संगीत,  उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, लोकसंगीत आणि चित्रपट संगीत असे पाच प्रकार येतात. हे पाचही प्रकार आतून एकमेकांशी संबंधित असून एक दुसऱ्याच्या प्रगतीने प्रभावित होणारे आहे.यातील प्रत्येकाची सांगीतिक व साहित्यिक विशेषता आहे. यांच्या परस्पर संबंधाचे पैलू समजून घेऊन त्यातील अंतर समजून घेणे हे प्रत्येक संगीतप्रेमींसाठी आवश्यक आहे. हेच संगीताच्या क्रमिक विकासाचे विभिन्न पडाव आहेत.कोणतीही कला जिवंत ठेवण्यासाठी तिचे नाते मुळाशी घट्ट असायला पाहिजे. आणि सर्व कलांचे मूळ आहे 'लोक-कला'! आजच्या सर्व परिष्कृत कला, लोककलांवर आधारित आहे. याच लोककलांमधील लोकसंगीत म्हणजे खमाज थाट व त्यातून निर्माण झालेले राग आहेत.
     खमाज राग हा खमाज थाटाचा आश्रय राग आहे.थाट खमाज आणि त्यावर आधारीत असलेले राग म्हणजे मधाळ स्वरांचे पोळेच जणू ! थाट खमाजवर आधारीत कुठलाही राग ऐका, त्याचे सूर आपल्या हृदयात एक अनोखा, हवाहवासा वाटणारा गोडवा जागवतील हे अगदी नक्की! ह्या थाटातील, राग खमाज, जैजवंती, गारा, कलावती, खंबावती, देस, गोरख कल्याण, दुर्गा (खमाज अंग), तिलक कामोद, रागेश्री, झिंझोटी, मांझ खमाज, तिलंग, सोरठ व त्यावर आधारलेली गीते ऐकल्यावर ह्या अवर्णनीय गोडव्याचा आपणास प्रत्यय आला नाही तरच नवल ! या रागाचा विस्तार मध्य आणि तर सप्तकात केल्या जातो.जेव्हा या रागात विविध रागांचे मिश्रण करून गायिल्या जातो तेव्हा त्याला 'मिश्र खमाज' असे संबोधले जाते.मराठी संगीत रंगभूमीवर नाट्यपदांतून येणारा राग खमाज, अनुरागानं रंगलेला आहे. तर चित्रपटसंगीतातला खमाज पैंजणपावलांनी येणारा, मुग्ध प्रणयानं भारलेला आहे.चंचल म्हणत असले तरी हळवा पण आहे.खमाज रागात बहुतकरून ठुमरी, टप्पा,दादरा, चैती गायिल्या जातात.वादक मात्र या रागात रजाखानी व मसीतखानी म्हणजेच विलंबित व द्रुत गत वाजवितात.खरे तर गायक सुद्धा या रागात ख्याल रंगवू शकतील असे मला वाटते.
     "रात्रीच्या वेळी गायिल्या जाणाऱ्या रागातील शृंगाराने ओत प्रोत भरलेला व चंचल प्रकृतीचा राग खमाज" म्हणजे काय ते मला समजले नाही.नंतर असेही विधान आहे..."या रागात गंभीरता कमी आहे म्हणून यात ख्याल गायिले जात नाही." काय खरे काय खोटे हे अशी विधाने करणारेच सांगू शकतील.
● हिंदी चित्रपट गीते...
'सजना सांझ भई आन मिलो'  सितारा देवी. चित्रपट-रोटी, संगीत-अनिल विश्वास (१९४२). 
'हम अपना उन्हे बना ना सके' के.एल.सैगल. चित्रपट-भंवरा, संगीत-खेमचंद प्रकाश (१९४४). 
'वो न आयेगी पलटकर' मुबारक बेगम. चित्रपट-देवदास, संगीत-एस.डी. बर्मन (१९५५). 
'चुनरिया कटती जाए' लता,रफी. चित्रपट-मदर इंडिया. संगीत-नौशाद (१९५७). 
'सखी रे सून बोले पपिहा उस पार' लता,आशा. चित्रपट-मिस मेरी, संगीत-हेमंत कुमार (१९५७). 
'नजर लागी राजा तोरे बंगले पर' आशा. चित्रपट-काला पानी, संगीत-एस.डी. बर्मन (१९५८). 
'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना' रफी,आशा. चित्रपट-काला पानी, संगीत-एस.डी. बर्मन (१९५८). 
'पिया तोसे नैना लागे रे' लता. चित्रपट-गाईड, संगीत-एस.डी. बर्मन (१९५९). 
'आ दिल से दिल मिला ले' आशा भोसले.चित्रपट-नवरंग,
संगीत-सी.रामचंद्र (१९५९). 
'ढल चुकी शाम-ए-गम' रफी. चित्रपट-कोहिनूर, संगीत-नौशाद (१९६०). 
'ओ सजना बरखा बहार आयी' लता. चित्रपट-परख, संगीत-सलील चौधरी (१९६०). 
'दिवाना मस्ताना हुवा दिल' रफी,आशा. चित्रपट-बंबई का बाबू, संगीत-एस.डी. बर्मन (१९६०). 
'खोया खोया चांद खुला आसमाँ' रफी. चित्रपट-काला बाजार, संगीत-एस.डी. बर्मन (१९६०). 
'ढल चुकी शाम-ए-गम मुस्कुरा ले सनम' रफी. चित्रपट-कोहिनूर, संगीत-नौशाद (१९६०). 
'ना तो कारवां की तलाश है' आशा भोसले,मन्ना डे,सुधा मल्होत्रा. चित्रपट-बरसात की एक रात, संगीत-रोशन (१९६०). 
'नैन लड गई जैहैं तो मनवा मा कसक' रफी. चित्रपट-गंगा जमुना, संगीत-नौशाद (१९६१). 
'तोरा मन बडा पापी सांवरिया रे' आशा भोसले.चित्रपट-गंगा जमुना, संगीत-नौशाद (१९६१). 
'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' रफी. चित्रपट-हम दोनो, संगीत-जयदेव (१९६१). 
'तेरे बिना सजना लागे ना जिया हमार' लता,रफी. चित्रपट-आरती, संगीत-रोशन (१९६२). 
'अब क्या मिसल दूं मैं तेरे शबाब की' रफी.चित्रपट-आरती, संगीत-रोशन (१९६३). 
'पिया तोसे नैना लागे रे' लता. चित्रपट-गाईड, संगीत-एस.डी. बर्मन (१९६५). 
'ऐसे तो ना देखो के हमको नशा हो जाये' रफी.चित्रपट-तीन देवीयां, संगीत-एस.डी.बर्मन (१९६५). 
'ये कहां आ गये हम'  चित्रपट-सिलसिला, संगीत-शिव हरी (१९६५). 
'खत लिख दे सावरीयां के नाम बाबू' आशा भोसले. चित्रपट-आये दिन बहार के, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९६६).
'इक हसीं शाम को दिल मेरा खो गया' रफी. चित्रपट-दुल्हन एक रात की, संगीत-मदन मोहन (१९६६). 
'रहते थे कभी उनके दिल में' लता. चित्रपट-ममता, संगीत-रोशन (१९६६). 
'धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार' लता. चित्रपट-अनुपमा, संगीत-हेमंत कुमार (१९६६). 
'जाओ रे जोगी तुम जाओ रे' लता. चित्रपट-आम्रपाली, संगीत-शंकर जयकिशन (१९६६). 
'शाम ढले जमुना किनारे' लता,मन्ना डे. चित्रपट-पुष्पांजली, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७०). 
'आयो कहाँ से घनश्याम' मन्ना डे,अर्चना.चित्रपट-बुढ्ढा मिल गया, संगीत-आर.डी. बर्मन (१९७१). 
'अनके खयाल आये तो आते चले गये' रफी. चित्रपट-लाल पत्थर, संगीत-शंकर जयकिशन (१९७१). 
'जिया ना लागे मोरा' लता.चित्रपट-बुढ्ढा मिल गया, संगीत-आर.डी. बर्मन (१९७१). 
'बडा नटखट है रे कृष्ण कन्हैया' लता. चित्रपट-अमर प्रेम, संगीत-आर.डी. बर्मन (१९७१). 
'मेरा मन तेरा प्यासा' रफी. चित्रपट-गँबलर, संगीत-आर.डी. बर्मन (१९७१). याचे ध्रुवपद खमाज मध्ये आहे.अंतर मात्र खमाज थाटातीलच दुसऱ्या रागात आहे.
'कुछ तो लोग कहेंगे,लोगों का काम है कहना' किशोर कुमार. चित्रपट-अमर प्रेम, संगीत-आर.डी. बर्मन (१९७१). 
'तेरे मेरे मिलन की ये रैना' लता,किशोर कुमार. चित्रपट-अभिमान, संगीत-एस.डी. बर्मन (१९७३). 
'कसमें हम जानकी खाये चले गये' अन्वर हुसेन. चित्रपट-मेरे गरीब नवाज.संगीत-कमाल राजस्थानी (१९७३). 
'चोरी चोरी चुपके चुपके' लता. चित्रपट-आपकी कसम, संगीत-आर.डी. बर्मन (१९७४). 
'चांद अकेला जाये सखी री' येसुदास. चित्रपट-आलाप, संगीत-जयदेव (१९७७). 
'मेरे तो गिरीधर गोपाल' वाणी जयराम,दिनकर कामण्णा. चित्रपट-मीरा, संगीत-पं. रवी शंकर (१९७९). 
'रघुवर तुमको मेरी लाज' पं. भीमसेन जोशी. चित्रपट-अनकही, (१९८४). 
'चंदा देखे चंदा' लता,किशोर कुमार. चित्रपट-झुटी, संगीत-बप्पी लहरी (१९८६). 
'छोटीसी आशा' मिनमिनी. चित्रपट-रोजा, संगीत-ए.आर.रहमान (१९९२). 
'प्यार हुवा चुपके से' कविता कृष्णमूर्ती. चित्रपट-१९४२ लव्ह स्टोरी, संगीत-आर.डी. बर्मन (१९९४). 
'तू ही रे तेरे बिना मैं' हरिहरन. चित्रपट-बॉंबे, संगीत-ए.आर.रहमान (१९९४). 
'दो दिल मिल रहे है चुपके चुपके' कुमार शानु. चित्रपट-परदेस, संगीत-नदीम श्रवण (१९९७). 
'आन मिलो सजना' (ठुमरी) अजय चक्रवर्ती,परवीन सुलताना.  चित्रपट-गदर, संगीत-उत्तम सिंग (२००१). 
'मेरे मन ये बता दे तू किस ओर चला है तू' शफाकत अमानत अली, शंकर महादेवन, करलीसा. चित्रपट-मितवा, संगीत-शंकर एहसान लॉय (२००६)
'मैं रंग शरबातों का तू मीठे घाट का पानी' अतिफ असलम, चिन्मयी श्रीपाद. चित्रपट-फटा पोस्टर निकला हिरो,संगीत-प्रीतम (२०१३). 
'जगावे सारी रैना' रेखा भारद्वाज. चित्रपट-डेढ इश्कीया,  संगीत-विशाल भारद्वाज (२०१४). 
'सजणा' विश्वजीत महापात्रा,दिप्तीरेखा.ओडिसी चित्रपट-काबूला बारबूला संगीत-प्रेम आनंद.
● नॉन फिल्मी...
'वैष्णव जन तो तेणे कहिये जो पीर पराई जाणे है'
(भारत रत्न एम० एस०  सुब्बालक्ष्मी पासून तर लता मंगेशकर पर्यंत, आणि अनूप जलोटा अनुराधा पासून तर अनुराधा पौडवाल पर्यंत प्रत्येकाने हे भजन गायिले आहे, दूसरीकडे मोठ्यात मोठ्ठया शास्त्रीय वादकांनी सुद्धा हे भजन आपापल्या वाद्यांवर वाजविले. हीच तर खमाज रागाची खासियत आहे.) 
'मोरा सैयां मोसे बोले ना' शफाकत अमानत अली खान.
'मुहब्बत करने वाले कम न होंगे
तेरी महाफिल में लेकिन हम न होंगे'...मेहदी हसन.
या गझलवर लिहावं तितकं कमीच आहे.
● मराठी
'या नवनवल नायनोत्सवा' छोटा गंधर्व.नाटक-संगीत मानापमान, संगीत-गोविंदराव टेंबे.
'ही बहू चपल वारांगना' नाटक-संगीत संशय कल्लोळ.
'धीर धरी धीर धरी जागृत गिरीधरी' पं. वसंतराव देशपांडे 
'मधुमधुरा तव गिरा' नाटक-विद्याहरण.संगीत-भास्करबुवा बखले.
'माझ्या प्रीतीच्या फुला' उषा मंगेशकर.
'या जन्मावर या मरणावर शतदा प्रेम करावे' अरुण दाते. संगीत-यशवंत देव.
'गुंतता हृदय हे’ नाटक-संगीत मत्स्यगंधा, ‘छेडियल्या तारा' नाटक-संगीत हे बंध रेशमाचे.
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी.दि.१०/१२/२०२३


 

Wednesday, December 6, 2023

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक १७)

     
      ●पाऊस असा घनघोर नदील पूर●

     पुण्याला स्थायिक झाल्यावर २००३ मध्ये समीर चव्हाणशी ओळख झाली.(पुढे तो माझा जावई झाला.) त्याने पुण्यातील प्रसिद्ध उर्दू शायर हनीफ़ साग़र यांच्या गझलांचा दिवान वाचायला दिला.गझला इतक्या उत्कृष्ट व मनभावन होत्या की वाचता वाचता सुरावटी येत गेल्या.१०/१२ गझला स्वरबद्ध झाल्यावर समीरने हनीफ़ साग़रांचे शागिर्द हमीदभाई यांना ऐकण्यास निमंत्रित केले.त्यांना हा उपक्रम खूप आवडला.कारण अशा प्रकारे त्यांच्या गझला कोणी स्वरबद्ध केल्या नव्हत्या. लगेच त्यांनी पुण्यातील गझल प्रेमींना ह्या उपक्रमाची माहिती दिली.त्याची परिणीती साग़र साहेबांच्या बरसी निमित्त एक मोठा कार्यक्रम करण्याचे ठरण्यात झाली. आणि बालगंधर्वमध्ये याचे आयोजन करण्यात आले.बालगंधर्व बुक झाल्यावर आमची रोज प्रॅक्टिस असायची.मुलगा निषाद,मुली भैरवी आणि रेणू तिघेही पुण्यात शिकत होते. म्हणजे त्यांची विद्यार्थी दशाच होती.आणि हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच मोठा आणि तो ही उर्दू गझलांचा कार्यक्रम होता.या अगोदर 'सरगम तुझ्याचसाठी' या शिर्षकांतर्गत मी स्वरबद्ध केलेल्या विविध कवींच्या गीत-गझलांचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले होते.पण ह्या कार्यक्रमाचे महत्व त्यांच्या दृष्टीने मोठे होते.असेच एक दिवस प्रॅक्टिस संपल्यावर माझ्या पुतणीने  'मोठे बाबा, तुम्हाला चाली कशा सुचतात'? असा प्रश्न केला.खरे तर मी सतत वाचत राहतो आणि वाचता वाचता सुरावटी येतात.पण तिला हे सगळे सांगण्यापेक्षा हाताशीच असलेला मित्रवर्य स्व.अनिल कांबळेचा कविता संग्रह उघडला व त्यातील समोर आलेली कविता गंमत म्हणून ताबडतोब म्हणून दाखवली.तिचे समाधान झाले.पण आलेल्या सुरावटीने मात्र माझी झोप उडविली.गमती गमतीत थोडा अरेबियन टच असलेली सुरावट आली होती.त्यावर बरेच संस्कार करून अनिलनेच त्याच्या 'युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशन' संस्थेतर्फे एस.एम.जोशी सभागृहात (२८ मे २००३) आयोजित केलेल्या 'सरगम तुझ्याचसाठी' या कार्यक्रमात सादर केली.या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्र संचालन प्रसिद्ध कवी मित्रवर्य नारायण कुलळकर्णी कवठेकर यांनी केले होते.प्रास्ताविक कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे व मनोगत तथा पाहुण्यांचे स्वागत अनिलने  केले.तसेच श्रोत्यांमध्ये प्रसिद्ध हार्मोनियम वादक आप्पा जळगावकर, किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक श्रीकांत देशपांडे,डॉ.विकास कशाळकर वगैरे दिग्गज मंडळी होती. कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण ज्या कॅसेटवर केले ती खराब निघाल्यामुळे व्यवस्थित ऐकू येत नाही.आणि कॅसेटवरून कॉम्प्युटरमध्ये उतरवणे हा द्राविडी प्राणायाम करताना आणखीच क्वालिटी बिघडत जाणे असा प्रकार झाला.पण एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग असल्यामुळे तो आपल्या समोर ठेवावासा वाटला. आवडणे,नावडणे आपल्या हातात आहे.....


 

Saturday, December 2, 2023

राग-रंग (लेखांक ३४) राग मालगुंजी

जनचित्ताचे रंजन कणाऱ्या स्वर आणि वर्ण यांच्या व्यवस्थेला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात राग असे म्हणतात.संगीताच्या इतिहासाच्या सुरूवातीपासूनच 'राग’ हा कल्पनेसारखा गुंतागुंतीचा आणि संस्कारित आविष्कार होता. खरे तर भारतीय संगीताच्या उत्कांतीचा तो एक संकलित परिणाम आहे असे म्हणायला हरकत नाही.अनेकदा असे म्हटले गेले आहे, की भारतीय रंगभूमी-परंपरेचा आद्य तत्त्व ग्रंथ मानल्या गेलेल्या भरताच्या नाटयशास्त्रात राग हा शब्द येतो. कारण त्या काळच्या रंगभूमीत नृत्य, नाटय व संगीत एकत्र आविष्कृत होत होते.असे असले तरी, आजच्या प्रमाणे एक सांगीतिक शक्ती म्हणून राग प्रचारात येण्याची घटना खूप नंतरची आहे.'राग' या कल्पनेस दीर्घ इतिहास असून त्याच्या विकासास अनेक परिमाणे आहेत. तेव्हा तेराव्या शतकात त्याची असंदिग्ध व्याख्या करण्यात आली व त्याच्या शक्यता धुंडाळण्यात येऊ लागल्या, असे मानण्यास हरकत नाही.नंतर घराणे उदयास यायला लागले.घराणे ही संकल्पना एकोणिसाव्या शतकातच प्रसृत झाली, कारण राजाश्रय गेल्यामुळे कलाकारांना शहरी केंद्रांकडे वळावे लागले. आपली खास ओळख कायम ठेवण्यासाठी आपापल्या मूळ गावांची खूण कायम राखणे त्यांना आवश्यक वाटले.त्यावरून घराण्यांची नावे आली.

     राग संगीतामध्ये  धृपद-धमार,लंगडा धृपद, ख्याल, ख्यालनामा, त्रिवट,  रास, चतुरंग,  तराणा, अष्टपदी,  सरगमगीत, टप्पा  हे संगीत प्रकार येतात.

सुगम कंठ संगीतामध्ये  ठुमरी, दादरा, कजरी,  चैती,  सावन, कव्वाली, गझल, भजन, हे प्रकार येतात.

     हिंदुस्थानी संगीतात पद्धतीमध्ये अनेक राग असे आहेत की जे अन्य दोन रागांचे मिश्रण करून तयार झाले आहेत वा तयार केले आहेत. अश्या रागांना 'जोड राग' असे संबोधले जाते. जोड रागात, जे दोन राग अंतर्भूत असतात त्या दोन रागांचे बेमालूम मिश्रण केलेले असते व ते श्रवणास आनंददायी असते.एखादा कलाकार जेव्हा जोड रागाचा विस्तार करतो तेव्हा तो श्रोत्यांना सातत्याने दोन्ही रागांचे रंग आलटून पालटून दाखवत असतो. जोड राग उतम प्रकारे मांडणे, गाणे हे एक अवघड तसेच आव्हानात्मक काम असते.

जोड रागांची भैरव बहार, हिंडोल बहार, बागेश्री बहार,भूप कल्याण ,केदार नट,सुहा कानडा,सुहा बिलावल,

जैत कल्याण,तिलक कामोद,यमन कल्याण,जलधर केदार,

गौड मल्हार,जयंत मल्हार,गौड सारंग,कामोद नट,हमीर नट,जोग कौंस,मधु कौंस,मेघ मल्हार,कौशी कानडा, बसंत बहार,अहिर भैरव,नट भैरव,नट बिहाग,बसंती केदार,  ललिता गौरी, राग अडाणा बहार, भैरव भटियार,सावनी नट वगैरे वगैरे मिश्र रंगांची अशी अनेक उदाहरणे देता येतील. मिश्र प्रकारातील असाच एक गोड राग आहे 'मालगुंजी'.हा राग गोड असला तरी जटिल आहे. यात खरे तर तीन राग दिसून येतात ते म्हणजे रागेश्री,बागेश्री आणि थोडा जैजवंती. ठोकळमानाने आरोहात रागेश्री,अवरोहात बागेश्री  दिसतात असे म्हणता येईल. बागेश्री विरह दाखवितो तर रागेश्री पुनर्मीलन दाखवितो असे म्हणतात.तसेच खमाज थाटातीलच असल्यामुळे काही ठिकाणी खमाज रागाचा पण अंश दिसतो.(काही लोक याला काफी थाटोतपन्न मानतात.) याचा वादी स्वर मध्यम असून संवादी स्वर षड्ज आहे.गान समय रात्रीचा तिसरा प्रहर आहे.

या रागाचा विस्तार तीनही सप्तकात केल्या जातो.

      अनेक गायक मालगुंजीला 'मालगुंजरी' या प्राचीन नावाने संबोधतात.याची प्राचीन विलंबित लयीची पारंपरिक बंदिश 'ये बन में चरावत गइयां, द्रुत लयीतील 'रैन काहे डरावन लागी री, 'मुरली की धुन सुनी सखी री आज' आणि 'तुम मतवारो रे पियरवा प्रसिद्ध आहे. चित्रपट संगीतामध्ये ज्या प्रमाणे भैरवी, खमाज, पीलू, बहार, पहाड़ी, झिंझोटी, मालकौंस आणि शिवरंजनी या रागांचा प्रयोग केल्या गेला त्या प्रमाणे मालगुंजी या रागाचा झाला नाही. मराठीत तर नाहीच नाही.

● चित्रपट गीते...

झनक झनक पायल बाजे मधील अतिशय सुरेल गीत मालगुंजी रागावर आधारित आहे. 'नैन सो नैन नहीं मिलाओ'  लता,हेमंत कुमार. चित्रपट-झनक झनक पायल बाजे, संगीत-वसंत देसाई (१९५५). 

मालगुंजी रागावर आधारित आणखी एक सुंदर रचना संगीतकार मदन मोहन यांनी अदालत चित्रपटा करीता तयार केली होती.'उनको ए शिकायत है कि हम कुछ नहीं कहते' लता. (१९५८). 

'घर आ जा घिर आये बदरा सांवरिया' लता.चित्रपट-छोटे नवाब, संगीत-आर.डी. बर्मन (१९६१) . हे -आर.डी.चे पहिले गाणे होते.असे म्हणतात की, त्या वेळी आर.डी.चे वडील एस. डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यात काही कारणामुळे दुरावा आला होता.त्यामुळे ते एकमेकांशी बोलत नव्हते.व आर.डी.चे हे चित्रपटातील पहिलेच गाणे असल्यामुळे ते लताजींकडून गाऊन घ्यायचे होते.लता मंगेशकर गायला तयार पण होत्या.त्या काळी ध्वनिमुद्रणापूर्वी भरपूर प्रॅक्टिस होत होती.त्यासाठी लता मंगेशकर आर.डी.च्या घरी आल्या होत्या.त्यांना एस.डी. ना भेटायची खूप इच्छा होती.म्हणून तसे आर.डी.ना विचारले.त्यांनी एस.डी. पण भेटायला उत्सुक असल्याचे सांगितले.आणि या गाण्याच्या निमित्ताने एस.डी. व लता मंगेशकर एकत्र येऊन पुन्हा काम करायला लागले. 

'बेदर्दी दगाबाज जा, तू नाहीं बलमा मोरा' लता. चित्रपट-ब्लफ मास्टर, संगीत-कल्याणजी आनंदजी (१९६३). 

'बलमा बोलो ना' लता. चित्रपट-पिकनिक, संगीत- एस.मोहिंदर (१९६६). 

संगीतकार सलिल चौधरींची अनेक गाणी बंगालची सांस्कृतिक ओळख बनली आहे.त्यांच्या संगतामध्ये पाश्चात्य संगीतकार बाख, बीथोवेन, मोजार्ट आणि थोड़ासी चोपिन यांची छाप दिसते. लोक गीतांमध्ये काही प्रमाणात भारतीय शास्त्रीय संगीताचे मिश्रण पण दिसून येते. राग मालगुंजीवर आधारित एक अप्रतिम रचना आनंद या चित्रपटासाठी संगीतबद्ध केली.

'ना जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं' लता.(१९७०). 

'जीवन से भारी तेरी आंखे मजबूर करे जीने के लीए' किशोर कुमार. चित्रपट-सफर, संगीत-कल्याणजी आनंदजी (१९७०). 
----------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' रविवार पुरवणी.दि.३/१२/२०२३

 

Wednesday, November 29, 2023

आठवणीतील_शब्द_स्वर (लेखांक १६) 'मिस्सळ'



    'गिल्ली मिस्सळ' म्हटले की प्रत्येक खवैयाच्या तोंडाला पाणी सुटतेच. कारण ही 'डिश' सर्वसाधारण वैदर्भीय खवय्यांची 'मर्मबंधातली ठेव' आहे. महाराष्ट्रभर मिळणाऱ्या या खाऱ्या डिशचे आबालवृध्दांना आकर्षण आहे. याचे कारण मिसळीची चटकदार चव. शेव, गाठी, पापडी, चिवडा (शिळ्या बटाटेवड्याचे व समोस्याचे तुकडे.) व वरून झणझणीत रस्सा आणि थोडे दही... नुसत्या वर्णनानेच तोंडाला पाणी सुटले ना? तर मंडळी, प्रत्येक गावच्या मिसळीची 'किक' थोड्याफार फरकाने सारखीच असते. तरी पण काही काही गावच्या खास खास चवीमुळे त्या त्या गावच्या मिसळी आयुष्यभर लक्षात राहतात. मिसळीमध्येही दोन प्रकार आहेत. एक सुकी मिसळ व दुसरी गिल्ली मिसळ. आपल्याकडे गिल्ली मिसळ लोकप्रिय आहे. कधी कधी रस्सा नाही म्हणून, नाइलाजाने 'फरसाण' या गोंडस नावाने सुकी मिसळही स्वाहा केली जाते. पण खरी मजा मात्र 'गिल्या' मिसळीतच आहे.
     अमरावतीच्या राजकमल चौकातील खड्डा हॉटेलमधील दही मारलेली मिसळ मला लहानपणापासून जीव लावून आहे.  अमरावतीला गेल्यावर ही मिसळ मारल्याशिवाय अमरावती वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नव्हते. आज ते खड्डा हॉटेल आहे की नाही माहीत नाही.जर असेल आणि 'तीच' चव कायम असेल तर त्या मालकाचा व भट्टी मास्तरांचा, समस्त मिसळप्रेमींनी सत्कार करायला काहीच हरकत नाही. 
       झणझणीत मिसळीसाठी एके काळी यवतमाळात जुन्या एस. टी. स्टँडवरील एक सिंधी हॉटेल प्रसिध्द होते. बसस्थानकाची नवी इमारत व्हायची होती. तेथे फक्त टिनाचे एक मोठे शेड होते. तेव्हाची ही गोष्ट आहे. या हॉटेलमध्ये रात्रभर ग्राहकांची वर्दळ असायची. यवतमाळातील बहुतांश कलाकार रात्री येथे येत असत. आम्हीही ऑर्केस्ट्राची प्रक्टिस आटोपली की, रात्री एक ते तीनपर्यंत या हॉटेलात दत्तक गेलेले असायचो. इथली मिसळ काही औरच होती. (मालक तिच्यात आपला 'दिल' टाकत होता, असे तेव्हा म्हणायचे.) या खास चवीमुळे रात्री-बेरात्रीसुध्दा 'रसिकांची' खूप वर्दळ राहायची. रात्री तीन ते चार वाजेपर्यंत मिसळ खाऊ घालणारे ते यवतमाळातील एकमेव हॉटेल होते. आम्ही त्यावेळी शिकत असल्यामुळे पैशाची सदाच कडकी असायची. पण अऑर्केस्ट्राचे कलाकार म्हणून आमच्यावर मालकाची सतत मेहेरनजर असायची. उधारी थकलेली असूनही वेळप्रसंगी तोच आम्हाला आर्थिक मदत करायचा. इथली मिसळ अमरावतीच्या मानाने झणझणीत असायची व पहिल्या घासातच आपला 'ठसका' दाखवायची.
      पुण्या-मुंबईकडेसुध्दा मिसळ प्रकार आहे. पण तिला विदर्भाच्या मिसळीची सर येत नाही. तिकडे पाव-मिसळ किंवा पाव-भाजी प्रकार खूप चालतो. कारण सर्वसाधारणांचे ते 'खास' अन्न आहे. पण श्रीमंतांची चोचलेगिरी करणारी जीभ या खास अन्नाकडेही वळली व सर्वसाधारणांच्या तोंडचा घास पळवून अस्मानाला भाव भिडवून बसली. (भाववाढीचे महकार्य केल्याबद्दल सगळ्या विक्रेत्यांनी या उच्चभ्रू मंडळींचे आभार मानायला हवे. नाही तर कोण विचारत होते या पाव भाजी व मिसळ पावाला!) पण तेही असो. विषय मिसळचा आहे.
     मिसळ हा एक फक्त खाद्यपदार्थ आहे असा आजपर्यंत सार्वत्रिक समज होता. पण वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबद्दलकडे पाहिल्यावर राजकारणातही मिसळ असते.आणि तीही 'गील्ली' व 'सणसणीत' असते याचा अनुभव सर्व महाराष्ट्र वासीयांना आला. खायच्या मिसळीतील बहुतांश पदार्थ बेसनाशी नाळ जोडून असलेले दिसतात. पण या मिसळीत मात्र कोणाची, कोणाशी, कोणत्याच प्रकारे नाळ जुळलेली दिसत नाही. एखाद्या विक्षिप्त माणसाने जर भजी, पेढा, शेव, लाडू, पापडी, जिलेबी, गाठी, गुलाबजाम अशा भिन्न चवीच्या विरुध्द गुणधर्माच्या पदार्थांची मिसळ केली तर तिची चव कशी लागेल याचा अंदाज वाचकांनी घ्यावा व या मिसळीकडे बघावे ! त्यात भरीस भर म्हणून शिळेपाके, नासके पदार्थ टाकले तर? असो!
      अशी ही मिसळ तयार तर झाली आहे, पण जनतेला ती कितपत आवडली याचा अंदाज अजूनपर्यंत घेता आलेला नाही. तरी पण तिच्या चेहऱ्यावरून थोडाफार अदमास यायला लागला आहे. खरे तर, ही मिसळ म्हणजे एक चमत्कृती आहे आणि चमत्कार म्हटले की काहीही होऊ शकते. (असे चमत्कार फक्त भारतवर्षातच होऊ शकतात. इतर देशांची काय मजाल आहे!) आणि हे चमत्कार प्रकरण इतक्यावर थांबलेले नाही. ही मिसळ अजूनही अनेक चमत्कार दाखविणार आहे. तरी बा अदब ! बा मुलाहिजा । होशियाऽऽऽर!



 

 





संगीत आणि साहित्य :