गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, December 6, 2023

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक १७)

     
      ●पाऊस असा घनघोर नदील पूर●

     पुण्याला स्थायिक झाल्यावर २००३ मध्ये समीर चव्हाणशी ओळख झाली.(पुढे तो माझा जावई झाला.) त्याने पुण्यातील प्रसिद्ध उर्दू शायर हनीफ़ साग़र यांच्या गझलांचा दिवान वाचायला दिला.गझला इतक्या उत्कृष्ट व मनभावन होत्या की वाचता वाचता सुरावटी येत गेल्या.१०/१२ गझला स्वरबद्ध झाल्यावर समीरने हनीफ़ साग़रांचे शागिर्द हमीदभाई यांना ऐकण्यास निमंत्रित केले.त्यांना हा उपक्रम खूप आवडला.कारण अशा प्रकारे त्यांच्या गझला कोणी स्वरबद्ध केल्या नव्हत्या. लगेच त्यांनी पुण्यातील गझल प्रेमींना ह्या उपक्रमाची माहिती दिली.त्याची परिणीती साग़र साहेबांच्या बरसी निमित्त एक मोठा कार्यक्रम करण्याचे ठरण्यात झाली. आणि बालगंधर्वमध्ये याचे आयोजन करण्यात आले.बालगंधर्व बुक झाल्यावर आमची रोज प्रॅक्टिस असायची.मुलगा निषाद,मुली भैरवी आणि रेणू तिघेही पुण्यात शिकत होते. म्हणजे त्यांची विद्यार्थी दशाच होती.आणि हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच मोठा आणि तो ही उर्दू गझलांचा कार्यक्रम होता.या अगोदर 'सरगम तुझ्याचसाठी' या शिर्षकांतर्गत मी स्वरबद्ध केलेल्या विविध कवींच्या गीत-गझलांचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले होते.पण ह्या कार्यक्रमाचे महत्व त्यांच्या दृष्टीने मोठे होते.असेच एक दिवस प्रॅक्टिस संपल्यावर माझ्या पुतणीने  'मोठे बाबा, तुम्हाला चाली कशा सुचतात'? असा प्रश्न केला.खरे तर मी सतत वाचत राहतो आणि वाचता वाचता सुरावटी येतात.पण तिला हे सगळे सांगण्यापेक्षा हाताशीच असलेला मित्रवर्य स्व.अनिल कांबळेचा कविता संग्रह उघडला व त्यातील समोर आलेली कविता गंमत म्हणून ताबडतोब म्हणून दाखवली.तिचे समाधान झाले.पण आलेल्या सुरावटीने मात्र माझी झोप उडविली.गमती गमतीत थोडा अरेबियन टच असलेली सुरावट आली होती.त्यावर बरेच संस्कार करून अनिलनेच त्याच्या 'युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशन' संस्थेतर्फे एस.एम.जोशी सभागृहात (२८ मे २००३) आयोजित केलेल्या 'सरगम तुझ्याचसाठी' या कार्यक्रमात सादर केली.या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्र संचालन प्रसिद्ध कवी मित्रवर्य नारायण कुलळकर्णी कवठेकर यांनी केले होते.प्रास्ताविक कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे व मनोगत तथा पाहुण्यांचे स्वागत अनिलने  केले.तसेच श्रोत्यांमध्ये प्रसिद्ध हार्मोनियम वादक आप्पा जळगावकर, किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक श्रीकांत देशपांडे,डॉ.विकास कशाळकर वगैरे दिग्गज मंडळी होती. कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण ज्या कॅसेटवर केले ती खराब निघाल्यामुळे व्यवस्थित ऐकू येत नाही.आणि कॅसेटवरून कॉम्प्युटरमध्ये उतरवणे हा द्राविडी प्राणायाम करताना आणखीच क्वालिटी बिघडत जाणे असा प्रकार झाला.पण एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग असल्यामुळे तो आपल्या समोर ठेवावासा वाटला. आवडणे,नावडणे आपल्या हातात आहे.....


 

Saturday, December 2, 2023

राग-रंग (लेखांक ३४) राग मालगुंजी

जनचित्ताचे रंजन कणाऱ्या स्वर आणि वर्ण यांच्या व्यवस्थेला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात राग असे म्हणतात.संगीताच्या इतिहासाच्या सुरूवातीपासूनच 'राग’ हा कल्पनेसारखा गुंतागुंतीचा आणि संस्कारित आविष्कार होता. खरे तर भारतीय संगीताच्या उत्कांतीचा तो एक संकलित परिणाम आहे असे म्हणायला हरकत नाही.अनेकदा असे म्हटले गेले आहे, की भारतीय रंगभूमी-परंपरेचा आद्य तत्त्व ग्रंथ मानल्या गेलेल्या भरताच्या नाटयशास्त्रात राग हा शब्द येतो. कारण त्या काळच्या रंगभूमीत नृत्य, नाटय व संगीत एकत्र आविष्कृत होत होते.असे असले तरी, आजच्या प्रमाणे एक सांगीतिक शक्ती म्हणून राग प्रचारात येण्याची घटना खूप नंतरची आहे.'राग' या कल्पनेस दीर्घ इतिहास असून त्याच्या विकासास अनेक परिमाणे आहेत. तेव्हा तेराव्या शतकात त्याची असंदिग्ध व्याख्या करण्यात आली व त्याच्या शक्यता धुंडाळण्यात येऊ लागल्या, असे मानण्यास हरकत नाही.नंतर घराणे उदयास यायला लागले.घराणे ही संकल्पना एकोणिसाव्या शतकातच प्रसृत झाली, कारण राजाश्रय गेल्यामुळे कलाकारांना शहरी केंद्रांकडे वळावे लागले. आपली खास ओळख कायम ठेवण्यासाठी आपापल्या मूळ गावांची खूण कायम राखणे त्यांना आवश्यक वाटले.त्यावरून घराण्यांची नावे आली.

     राग संगीतामध्ये  धृपद-धमार,लंगडा धृपद, ख्याल, ख्यालनामा, त्रिवट,  रास, चतुरंग,  तराणा, अष्टपदी,  सरगमगीत, टप्पा  हे संगीत प्रकार येतात.

सुगम कंठ संगीतामध्ये  ठुमरी, दादरा, कजरी,  चैती,  सावन, कव्वाली, गझल, भजन, हे प्रकार येतात.

     हिंदुस्थानी संगीतात पद्धतीमध्ये अनेक राग असे आहेत की जे अन्य दोन रागांचे मिश्रण करून तयार झाले आहेत वा तयार केले आहेत. अश्या रागांना 'जोड राग' असे संबोधले जाते. जोड रागात, जे दोन राग अंतर्भूत असतात त्या दोन रागांचे बेमालूम मिश्रण केलेले असते व ते श्रवणास आनंददायी असते.एखादा कलाकार जेव्हा जोड रागाचा विस्तार करतो तेव्हा तो श्रोत्यांना सातत्याने दोन्ही रागांचे रंग आलटून पालटून दाखवत असतो. जोड राग उतम प्रकारे मांडणे, गाणे हे एक अवघड तसेच आव्हानात्मक काम असते.

जोड रागांची भैरव बहार, हिंडोल बहार, बागेश्री बहार,भूप कल्याण ,केदार नट,सुहा कानडा,सुहा बिलावल,

जैत कल्याण,तिलक कामोद,यमन कल्याण,जलधर केदार,

गौड मल्हार,जयंत मल्हार,गौड सारंग,कामोद नट,हमीर नट,जोग कौंस,मधु कौंस,मेघ मल्हार,कौशी कानडा, बसंत बहार,अहिर भैरव,नट भैरव,नट बिहाग,बसंती केदार,  ललिता गौरी, राग अडाणा बहार, भैरव भटियार,सावनी नट वगैरे वगैरे मिश्र रंगांची अशी अनेक उदाहरणे देता येतील. मिश्र प्रकारातील असाच एक गोड राग आहे 'मालगुंजी'.हा राग गोड असला तरी जटिल आहे. यात खरे तर तीन राग दिसून येतात ते म्हणजे रागेश्री,बागेश्री आणि थोडा जैजवंती. ठोकळमानाने आरोहात रागेश्री,अवरोहात बागेश्री  दिसतात असे म्हणता येईल. बागेश्री विरह दाखवितो तर रागेश्री पुनर्मीलन दाखवितो असे म्हणतात.तसेच खमाज थाटातीलच असल्यामुळे काही ठिकाणी खमाज रागाचा पण अंश दिसतो.(काही लोक याला काफी थाटोतपन्न मानतात.) याचा वादी स्वर मध्यम असून संवादी स्वर षड्ज आहे.गान समय रात्रीचा तिसरा प्रहर आहे.

या रागाचा विस्तार तीनही सप्तकात केल्या जातो.

      अनेक गायक मालगुंजीला 'मालगुंजरी' या प्राचीन नावाने संबोधतात.याची प्राचीन विलंबित लयीची पारंपरिक बंदिश 'ये बन में चरावत गइयां, द्रुत लयीतील 'रैन काहे डरावन लागी री, 'मुरली की धुन सुनी सखी री आज' आणि 'तुम मतवारो रे पियरवा प्रसिद्ध आहे. चित्रपट संगीतामध्ये ज्या प्रमाणे भैरवी, खमाज, पीलू, बहार, पहाड़ी, झिंझोटी, मालकौंस आणि शिवरंजनी या रागांचा प्रयोग केल्या गेला त्या प्रमाणे मालगुंजी या रागाचा झाला नाही. मराठीत तर नाहीच नाही.

● चित्रपट गीते...

झनक झनक पायल बाजे मधील अतिशय सुरेल गीत मालगुंजी रागावर आधारित आहे. 'नैन सो नैन नहीं मिलाओ'  लता,हेमंत कुमार. चित्रपट-झनक झनक पायल बाजे, संगीत-वसंत देसाई (१९५५). 

मालगुंजी रागावर आधारित आणखी एक सुंदर रचना संगीतकार मदन मोहन यांनी अदालत चित्रपटा करीता तयार केली होती.'उनको ए शिकायत है कि हम कुछ नहीं कहते' लता. (१९५८). 

'घर आ जा घिर आये बदरा सांवरिया' लता.चित्रपट-छोटे नवाब, संगीत-आर.डी. बर्मन (१९६१) . हे -आर.डी.चे पहिले गाणे होते.असे म्हणतात की, त्या वेळी आर.डी.चे वडील एस. डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यात काही कारणामुळे दुरावा आला होता.त्यामुळे ते एकमेकांशी बोलत नव्हते.व आर.डी.चे हे चित्रपटातील पहिलेच गाणे असल्यामुळे ते लताजींकडून गाऊन घ्यायचे होते.लता मंगेशकर गायला तयार पण होत्या.त्या काळी ध्वनिमुद्रणापूर्वी भरपूर प्रॅक्टिस होत होती.त्यासाठी लता मंगेशकर आर.डी.च्या घरी आल्या होत्या.त्यांना एस.डी. ना भेटायची खूप इच्छा होती.म्हणून तसे आर.डी.ना विचारले.त्यांनी एस.डी. पण भेटायला उत्सुक असल्याचे सांगितले.आणि या गाण्याच्या निमित्ताने एस.डी. व लता मंगेशकर एकत्र येऊन पुन्हा काम करायला लागले. 

'बेदर्दी दगाबाज जा, तू नाहीं बलमा मोरा' लता. चित्रपट-ब्लफ मास्टर, संगीत-कल्याणजी आनंदजी (१९६३). 

'बलमा बोलो ना' लता. चित्रपट-पिकनिक, संगीत- एस.मोहिंदर (१९६६). 

संगीतकार सलिल चौधरींची अनेक गाणी बंगालची सांस्कृतिक ओळख बनली आहे.त्यांच्या संगतामध्ये पाश्चात्य संगीतकार बाख, बीथोवेन, मोजार्ट आणि थोड़ासी चोपिन यांची छाप दिसते. लोक गीतांमध्ये काही प्रमाणात भारतीय शास्त्रीय संगीताचे मिश्रण पण दिसून येते. राग मालगुंजीवर आधारित एक अप्रतिम रचना आनंद या चित्रपटासाठी संगीतबद्ध केली.

'ना जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं' लता.(१९७०). 

'जीवन से भारी तेरी आंखे मजबूर करे जीने के लीए' किशोर कुमार. चित्रपट-सफर, संगीत-कल्याणजी आनंदजी (१९७०). 
----------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' रविवार पुरवणी.दि.३/१२/२०२३

 

Wednesday, November 29, 2023

आठवणीतील_शब्द_स्वर (लेखांक १६) 'मिस्सळ'



    'गिल्ली मिस्सळ' म्हटले की प्रत्येक खवैयाच्या तोंडाला पाणी सुटतेच. कारण ही 'डिश' सर्वसाधारण वैदर्भीय खवय्यांची 'मर्मबंधातली ठेव' आहे. महाराष्ट्रभर मिळणाऱ्या या खाऱ्या डिशचे आबालवृध्दांना आकर्षण आहे. याचे कारण मिसळीची चटकदार चव. शेव, गाठी, पापडी, चिवडा (शिळ्या बटाटेवड्याचे व समोस्याचे तुकडे.) व वरून झणझणीत रस्सा आणि थोडे दही... नुसत्या वर्णनानेच तोंडाला पाणी सुटले ना? तर मंडळी, प्रत्येक गावच्या मिसळीची 'किक' थोड्याफार फरकाने सारखीच असते. तरी पण काही काही गावच्या खास खास चवीमुळे त्या त्या गावच्या मिसळी आयुष्यभर लक्षात राहतात. मिसळीमध्येही दोन प्रकार आहेत. एक सुकी मिसळ व दुसरी गिल्ली मिसळ. आपल्याकडे गिल्ली मिसळ लोकप्रिय आहे. कधी कधी रस्सा नाही म्हणून, नाइलाजाने 'फरसाण' या गोंडस नावाने सुकी मिसळही स्वाहा केली जाते. पण खरी मजा मात्र 'गिल्या' मिसळीतच आहे.
     अमरावतीच्या राजकमल चौकातील खड्डा हॉटेलमधील दही मारलेली मिसळ मला लहानपणापासून जीव लावून आहे.  अमरावतीला गेल्यावर ही मिसळ मारल्याशिवाय अमरावती वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नव्हते. आज ते खड्डा हॉटेल आहे की नाही माहीत नाही.जर असेल आणि 'तीच' चव कायम असेल तर त्या मालकाचा व भट्टी मास्तरांचा, समस्त मिसळप्रेमींनी सत्कार करायला काहीच हरकत नाही. 
       झणझणीत मिसळीसाठी एके काळी यवतमाळात जुन्या एस. टी. स्टँडवरील एक सिंधी हॉटेल प्रसिध्द होते. बसस्थानकाची नवी इमारत व्हायची होती. तेथे फक्त टिनाचे एक मोठे शेड होते. तेव्हाची ही गोष्ट आहे. या हॉटेलमध्ये रात्रभर ग्राहकांची वर्दळ असायची. यवतमाळातील बहुतांश कलाकार रात्री येथे येत असत. आम्हीही ऑर्केस्ट्राची प्रक्टिस आटोपली की, रात्री एक ते तीनपर्यंत या हॉटेलात दत्तक गेलेले असायचो. इथली मिसळ काही औरच होती. (मालक तिच्यात आपला 'दिल' टाकत होता, असे तेव्हा म्हणायचे.) या खास चवीमुळे रात्री-बेरात्रीसुध्दा 'रसिकांची' खूप वर्दळ राहायची. रात्री तीन ते चार वाजेपर्यंत मिसळ खाऊ घालणारे ते यवतमाळातील एकमेव हॉटेल होते. आम्ही त्यावेळी शिकत असल्यामुळे पैशाची सदाच कडकी असायची. पण अऑर्केस्ट्राचे कलाकार म्हणून आमच्यावर मालकाची सतत मेहेरनजर असायची. उधारी थकलेली असूनही वेळप्रसंगी तोच आम्हाला आर्थिक मदत करायचा. इथली मिसळ अमरावतीच्या मानाने झणझणीत असायची व पहिल्या घासातच आपला 'ठसका' दाखवायची.
      पुण्या-मुंबईकडेसुध्दा मिसळ प्रकार आहे. पण तिला विदर्भाच्या मिसळीची सर येत नाही. तिकडे पाव-मिसळ किंवा पाव-भाजी प्रकार खूप चालतो. कारण सर्वसाधारणांचे ते 'खास' अन्न आहे. पण श्रीमंतांची चोचलेगिरी करणारी जीभ या खास अन्नाकडेही वळली व सर्वसाधारणांच्या तोंडचा घास पळवून अस्मानाला भाव भिडवून बसली. (भाववाढीचे महकार्य केल्याबद्दल सगळ्या विक्रेत्यांनी या उच्चभ्रू मंडळींचे आभार मानायला हवे. नाही तर कोण विचारत होते या पाव भाजी व मिसळ पावाला!) पण तेही असो. विषय मिसळचा आहे.
     मिसळ हा एक फक्त खाद्यपदार्थ आहे असा आजपर्यंत सार्वत्रिक समज होता. पण वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबद्दलकडे पाहिल्यावर राजकारणातही मिसळ असते.आणि तीही 'गील्ली' व 'सणसणीत' असते याचा अनुभव सर्व महाराष्ट्र वासीयांना आला. खायच्या मिसळीतील बहुतांश पदार्थ बेसनाशी नाळ जोडून असलेले दिसतात. पण या मिसळीत मात्र कोणाची, कोणाशी, कोणत्याच प्रकारे नाळ जुळलेली दिसत नाही. एखाद्या विक्षिप्त माणसाने जर भजी, पेढा, शेव, लाडू, पापडी, जिलेबी, गाठी, गुलाबजाम अशा भिन्न चवीच्या विरुध्द गुणधर्माच्या पदार्थांची मिसळ केली तर तिची चव कशी लागेल याचा अंदाज वाचकांनी घ्यावा व या मिसळीकडे बघावे ! त्यात भरीस भर म्हणून शिळेपाके, नासके पदार्थ टाकले तर? असो!
      अशी ही मिसळ तयार तर झाली आहे, पण जनतेला ती कितपत आवडली याचा अंदाज अजूनपर्यंत घेता आलेला नाही. तरी पण तिच्या चेहऱ्यावरून थोडाफार अदमास यायला लागला आहे. खरे तर, ही मिसळ म्हणजे एक चमत्कृती आहे आणि चमत्कार म्हटले की काहीही होऊ शकते. (असे चमत्कार फक्त भारतवर्षातच होऊ शकतात. इतर देशांची काय मजाल आहे!) आणि हे चमत्कार प्रकरण इतक्यावर थांबलेले नाही. ही मिसळ अजूनही अनेक चमत्कार दाखविणार आहे. तरी बा अदब ! बा मुलाहिजा । होशियाऽऽऽर!



 

 

Saturday, November 25, 2023

राग-रंग (लेखांक ३३) गौडसारंग

गौडसारंग हा एक अत्यंत गोड असा राग आहे.पण याचे नाव मात्र अत्यंत चुकीचे आहे.कारण ज्याप्रमाणे  मधमाद सारंग, शुद्ध सारंग, मियाँ की सारंग, बड़हंस सारंग, सामंत सारंग, वृंदावनी सारंग, लंकादहन सारंग इत्यादी रागांमध्ये 'सारंग अंग' दिसते.तसे या रागात कुठेही सारंग अंग दिसत नाही.जसा 'गोरख कल्याण' मध्ये कल्याण, 'बैरागी भैरव' मध्ये भैरव दिसत नाही,अगदी  तसा! खरे तर पूर्वांगात गौड व उत्तरांगात कल्याण दिसत असल्यामुळे या रागाचे नाव 'गौड कल्याण' असायला हवे. या रागाच्या गानसमयावर सुद्धा विविध मते आहेत.नावात सारंग असल्यामुळे हा राग दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी गावे असे एक सर्वमान्य मत व कल्याण अंग असल्यामुळे रात्रीच्या प्रथम प्रहरी गायिल्या जायला हवा हे दुसरे मत. हा शास्त्रानुसार कल्याण थाटातील मानल्या गेल्यामुळे दुसरे मत अधिक योग्य वाटते.महत्वाचे म्हणजे सारंग रागात  जे दोन स्वर वर्ज आहेत तेच यात वादी संवादी आहेत. म्हणजे गांधार वादी व धैवत संवादी! प रे ही स्वरसंगती या रागाला स्पष्टपणे दाखविते.ग रे म ग, प रे सा इतक्या स्वरांवरून गौड सारंग राग आपले पूर्ण रुप दाखवितो.हा पूर्णतः वक्र स्वरूपाचा राग आहे.दोन्ही मध्यम लागणारे छायानट, केदार, कामोद वगैरे राग यात डोकावण्याची शक्यता असल्यामुळे हा राग गाताना अतिशय सावधपणे गावा लागतो.कदाचित यांच्यापासून बचाव करण्यासाठीच गौड सारंग रागाचे चलन वक्र ठेवले असावे.यात ख्याल,धृपद, तराणा या गानप्रकार गायिल्या जातात.प्राचीन ग्रंथकार कामोद,केदार,आणि हमीर प्रमाणे गौड सारंग रागाला बिलावल थाटजन्य राग मानतात.कारण तेव्हा या रागात तीव्र मध्यम लागत नव्हता. जेव्हा पासून दोन्ही मध्यमांचा प्रयोग व्हायला लागला, तेव्हापासून याला कल्याण थाटातील मानायला लागले.काही संगीत तज्ज्ञ याला 'दिवसाचा बिहाग' असे संबोधतात. एकूण स्वरूप बघता काही प्रमाणात ते योग्यही वाटते.दक्षिणेतील पंडित सुब्बाराव यांच्या 'रागनिधी' या ग्रंथानुसार गौड सारंग सारखा एकही राग दक्षिणेत नाही.परंतू शंकराभरणम् मधील काही राग याच्याशी मिळते-जुळते असल्याचे तामिळचे कृति मुद्दु कुमारय्यन यांचे म्हणणे आहे.

      ज्या लोकसंगीतामधून शास्त्रीय संगीत निर्माण झाले त्या संगीताला जन सामान्यांपासून दूर ठेवण्यास वेदकाळापासूनच सुरवात झालेली दिसून येते.'सामवेद' याचे जिवंत उदाहरण आहे.सरस्वती नदीच्या काठावरील परिसरात वस्ती करून राहणाऱ्यांना काही ऋचा स्फुरल्या.त्या 'ऋग्वेद' म्हणून ओळखल्या जातात.नंतरच्या काळात 'अथर्ववेद' झाले. नंतर दोन्ही वेदांतील काही ऋचांच्या चालीवरून 'सामवेद' सिद्ध झाला.सामवेदातील ऋचा स्वतंत्र नाही.दोन्ही वेदातील ऋचा म्हणण्याचे तंत्र सामवेदात विकसित झाले.

(सामवेद म्हणजे केवळ गायिलेल्या गानांचा संग्रह नव्हे, तर ज्यावर गायनाची आलापी अभिप्रेत आहे, ज्यात उदात्तादी स्वर आहेत, अशा ऋक्-मंत्रांचा संग्रह होय.सामवेदाला फक्त पदपाठ आहे अन्य विकृतिपाठ नाहीत. अशा सामवेदाचे पूर्वार्चिक व उत्तरार्चिक असे दोन भाग आहेत. पूर्वार्चिकालाच छंद-आर्चिक म्हटले जाते. ‘आरण्य’ या नावाने प्रसिद्घ असलेला भागसुद्घा यात अंतर्भूत आहे. पूर्वार्चिकामध्ये मुख्यतः अग्नी, इंद्र, सोम यांच्या स्तुतिपर मंत्रांचा समूह आहे. यावर आधारलेल्या गायनांच्या संग्रहाला ‘गामगेय’ किंवा ‘गेय-गान’ अशी संज्ञा आहे.) ते संस्कृत भाषेत असल्यामुळे जन सामान्यांना त्याचा लाभ घेता येत नव्हता.नंतरच्या काळात राजे-रजवाडे,बादशहा,नबाब यांच्या दरबारात शास्त्रीय संगीत बंदिस्त झाले.म्हणूनच बोलपटाची सुरवात होऊन त्यात गाणी यायला लागल्या बरोबर लोकप्रिय व्हायला लागली,ती आजतागायत लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. (चित्रपट गीतांना शास्त्रीय संगीतातील पंडित/उस्ताद 'हलके संगीत' म्हणून हिणवतात.पण मला तरी यात हलकेपणा दिसत नाही.लता,रफी,आशा,किशोर वगैरे गायकांच्या प्रमाणे गाण्यासाठी व रागावर आधारित धून बनविण्यासाठी शास्त्रीय संगीताचा प्रचंड अभ्यास, असामान्य प्रतिभा आणि क्षमता आवश्यक असते.) स्वातंत्र्य मिळाल्या नंतर आकाशवाणीच्या माध्यमातून काही प्रमाणात शास्त्रीय संगीत जनसामान्यांपर्यंत पोहोचायला लागले.तरी त्याचा वेग चित्रपट संगीताच्या मानाने एकदमच कमी होता. माझी अनेक विधाने उस्ताद,पंडितांना पचणार नाहीत.पण हे कटू सत्य आहे.असो!

     पंडित डी. व्ही.पलुस्कर, पंडित सी.आर.व्यास, कृष्णराव शंकर पंडित, पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व,उस्ताद निसार हुसेन खान, उस्ताद अमानत अली खान, उस्ताद सरफराज हुसेन खान, उस्ताद गुलाम हुसेन खान, आफताब-ए-मौसिकी फैय्याज खान, उस्ताद युनूस हुसेन खान, यशवंतबुवा जोशी, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, पंडित रामाश्रय झा, पंडिता किशोरी आमोणकर, पद्मा तळवलकर, उल्हास कशाळकर, यांनी गायिलेला व पंडित रविशंकर (सतार),उस्ताद अली अकबर खान (सरोद), यांनी सादर केलेला गौड सारंग अभ्यासनीय आहे.

     या रागाच्या वक्र प्रवृत्तीमुळे शास्त्रीय संगीत सोडले तर नाट्यगीत,चित्रपट गीत,भावगीत,भक्तीगीत वा गझल या प्रकाराशी फारशी सलगी केलेली दिसत नाही.जी काही थोडी-फार जवळीक साधली ती खालील हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या,त्याही जुन्या संगीतकारांच्या रचना खाली देत आहे.

● चित्रपट गीते...

'देखो जादु भरे मोरे नैन' गीता दत्त. चित्रपट-आसमान, संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५२). 

'रितु ऐ रितु जाए' लता,मन्ना डे. चित्रपट-हमदर्द, संगीत-अनिल विश्वास (१९५३). 

'झुला झुलो रे झुलना झुलाऊं' लता. चित्रपट-एकादशी, संगीत-अविनाश व्यास (१९५५). 

'लहरों में झूलूं' आशा भोसले. चित्रपट-समाज, संगीत-एस.डी. बर्मन (१९५५). 

'वो दखें तो उनकी इनायत' आशा भोसले,किशोर कुमार. चित्रपट-फंटूश, संगीत-एस.डी. बर्मन  (१९५६). 

'ना दिर दीम' लता. चित्रपट-परदेसी, संगीत/अनिल विश्वास (१९५७). 

'अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम' लता. चित्रपट-हम दोनो, संगीत- जयदेव (१९६१). 

'कुछ और जमाना' मीना कपूर. चित्रपट-छोटी छोटी बातें, संगीत-अनिल विश्वास (१९६५). 

● गैर-फिल्मी...

'भूली बिसरी चंद उम्मीदें चंद फसाने याद आए' -मेहदी हसन. 

'दैरो हरम में बसने वालों' -जगजीत सिंग.अल्बम-फेस टू फेस.

'सावन रुत आए देखो बलम' सुलतान खान,चित्रा. अल्बम-पिया बसंती (२०००). 
-----------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' रविवार पुरवणी, २६/११/२०२३


 

Wednesday, November 22, 2023

आठवणीतील शब्द स्वर...(लेखांक १५) ●मदरटांग●



    मराठीसारखी मनमिळावू, सर्वधर्मसमभावाची व सोशिक भाषा या जगात दुसरी सापडणे अशक्य आहे. तिच्या सर्वसमावेशकतेमुळे किती तरी परप्रांतीय घुसखोर आपलेच घर समजून मराठीत ठिय्या देऊन बसले व स्वरात स्वर मिसळून गायला लागले आहेत. त्यामुळे मराठीनेसुध्दा 'मिले सुर मेरा तुम्हारा' असे म्हणत त्यांना आपल्या छत्रछायेखाली घेऊन 'सुर की महिमा' साऱ्या जगाला दाखवून दिली. मराठीत असलेले परकीय शब्द, बांगलादेश किंवा पाकी घुसखोरांप्रमाणे वेगळेपण जपून मुळावर घाव घालणारे नसून, मराठीची शोभा वाढविण्याचा प्रयत्न करणारे आहे. त्यामुळे ते मराठीशी इतके एकरूप झाले आहेत की, आज आपण त्यांची हकालपट्टी करतो म्हटले तरी ते शक्य नाही.
     प्रत्येक भाषेचा आपला एक डौल असतो, अदा असते, तरी पण त्या त्या भाषेतील शब्दांचा अपभ्रंश करून बोलणारे सगळी लय बिघडून टाकतात. डौल बिघडवतात. आपल्या मराठी मायबोलीत आलेले इतर भाषांमधील शब्द बिचारे एकजीव होऊन बसले, पण इंग्रजी मात्र अजूनही आपले वेगळेपण जपून आहे. त्यामुळे मराठी बोलतांनासुध्दा एखादा तरी इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय आम्हाला करमतच नाही. कमीत कमी 'इंप्रेशन' पाडायला तरी एखादा इंग्रजी शब्द वापरायचाच हा आमचा मराठी बाणा ! त्यामुळे ओ. सी. (ऑफिस कॉपी) चे ओशी, फाईलचे फायली, 'कम्प्लेंट'चे कंम्प्लेटा असे अनेकवचन व टेम्पररीचे टेंपरवारी, टाईल्सचे स्टाईल, ट्युबचे टूप, पिक्चरचे पिच्चर असे उच्चार होताना दिसून येतात.
     मी कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्याच हजेरीच्या वेळी इंग्रजीच्या राव नामक प्राध्यापकाने मिस्टर एस. पी. कॅडॅम असे नामकरण करून मला धर्मांतराच्या टोकावर नेऊन ठेवले. पहिल्या वर्गापासून सुधाकर पांडुरंग कदम असे पूर्ण नाव शुध्द मराठीत ऐकायची सवय असल्यामुळे त्या दिवशीच्या नामांतर सोहळ्यामुळे आम्ही बेशुध्द व्हायच्या बेताला आलो व आमची पितरे झिंगल्यासारखी होऊन भेलकांडायाला लागली. हे काही बरे नव्हे म्हणून व वर्गातील मुलीही या नावाला फिदीफिदी हासल्या म्हणून मी उभे राहून 'कॅडॅम' नव्हे 'कदम' असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण रावांना मराठी समजत नसल्यामुळे त्यांनी 'यऽऽस, यूऽऽऽ, व्हाट हॅपन्ड ? सिट डाऊन प्लिज ! आऽऽऽय से सिट डाऽऽऊन' केले. पण आमच्या टाळक्यात काहीच न शिरल्याने आम्ही उभेच. हे पाहून पुन्हा 'हेऽऽऽ यूऽऽऽ, गेटआऊट' असले काही तरी इंग्रजीत सांगितले. त्यातील 'गेटआऊट' तेवढे आम्हाला समजले. पहिल्याच दिवशी घोर अपमान होत असलेला बघून आम्हीही तावात आलो व 'यू आर राँग सर, माय नेम इज कदम, अँड यू आर कॉल्ड मी कॅडॅम, देट इज कदम कदऽऽऽम, नॉट कॅडॅम! प्लिज रिपेअर (दुरुस्त करा) माय नेम इन युवर रोल कॉल' अशी मायबोलीतील खडी इंग्रजी सुनावली. पण आमची इंग्रजी रावांना समजेना व रावांचे सांगणे आम्हाला पटेना! वर्षभर असेच चालल्यामुळे आमचे इंग्रजी कच्चे राहिले ते राहिलेच !
     कच्च्या इंग्रजीमुळे काय काय घोटाळे होतात ते आपण नेहमीच बघतो. एकदा बाहेरगावचा कायक्रम आटपून शाळेत पोहचलो, तर सगळीकडे सामसूम दिसले. शांततेसोबतच परिसरही स्वच्छ चकचकीत ! मुलांचा आवाज नाही. शिक्षकही वर्गावर! पण सगळे शांतपणे. या वातावरणामुळे काही तरी गंभीर घडल्याची जाणीव होऊन मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. म्हणून हळूच समोरच्या चपराशाला विचारले, तर तो उत्तरला, 'आज इन्फेक्शन झाले ना म्हणून असे आहे !' प्रथम कळले नाही, पण थोड्याच वेळात 'टूप' पेटली, नुकतेच इन्स्पेक्शन झाल्याचे कळले व हसता हसता पुरेवाट झाली.
     आमच्या चिरंजीवांच्या दहावीच्या परीक्षे अगोदर त्याचा शाळेतील निरोप समारंभ आटोपला. त्याच दिवशी आजी अत्यवस्थ असल्याचा निरोप आला. आम्ही सर्व कुटुंबीय शेवटची भेट घ्यायला खेड्यावर पोहचलो. सगळे नातेवाईक जमा झाले होते. आम्ही सर्व जण आजीला भेटून, निरोप घेऊन खोलीच्या बाहेर आलो. तेवढ्यात गावचे पाटील तिथे आले व दरवाज्यात उभ्या असलेल्या आमच्या चिरंजीवांना म्हणाले. 'काय म्हणते रे आजी? चिरंजीव उद्‌गारले, 'सध्या आजीचा सेंड ऑफचा कार्यक्रम सुरू आहे!'
     घरातूनच असे प्रसंग घडतात असे नाही. कार्यालयांमधूनसुध्दा हे घडतच असतान एकदा आर्णीच्या विद्युत मंडळाच्या कार्यालयात इंजिनियर मित्र श्री. राम पांडेसोबत गप्या मारत बसलो होतो. काही वेळाने एक वायरमन तेथे आला व पांडेना म्हणाला, 'साहेब, झंपर जळाले!' आम्ही त्याचेकडे आश्चयनि बघायला लागलो. पण पांडेसाहेब चेहऱ्यावरची रेषही न हालवता म्हणाले, 'बदलून टाक.' अंगावरील झंपर जळूनही पांडेचा हा तटस्थपणा पाहून आम्हाला राग यायला लागला व तावातावातच आम्ही म्हणालो. 'काय हे पांडेसाहेब झंपर जळाले म्हणजे झंपरवाली बाई पण जळाली असेल ना? मग झंपर बदलून टाक अले म्हणून बोळवण करण्यापेक्षा त्या बाईला दवाखान्यात न्यायला का सांगत नाही!' यावर पांडेसाहेब व वायरमन दोघेही खो-खो करून हसायला लागले व म्हणाले 'तुम्ही समजता तो हा झंपर नाही. हा 'जंपर' आहे. तारांचा जोड असतो त्या खांबाला कट पॉईट म्हणतात. या कट पाँईटवरून इकडून तिकडे विद्युत-वहन होण्याकरिता जो तार बापरतात, त्याला जंपर म्हणतात.' वायरमन या जंपरचा अपभ्रंश सरळ सरळ झंपर असा करून 'झंपर जळाले,' 'झंपर ओपन झाले' 'झंपर तुटले,' असे सांगत असतात.
     मराठीमध्ये इंग्रजी शब्द वापरल्यामुळे होणारे घोटाळे ठीक आहेत, पण आपली मायबोलीच जेव्हा पन्नास कोसावर 'चाल' बदलते, तेव्हा तर आणखीनच गंमत येते. बुलढाणा जिल्ह्यात 'ळ'चा उच्चार 'ड' असा केल्या जातो. त्यामुळे डाळीला दाड, केळीला केडी, फळाला फड, गुळाला गुड, तळ्याला तडे म्हटल्या जाते. तेथील डॉक्टर लोक या लोकांना 'अर्धी गोडी सकाडी व अधीं गोडी संध्याकाडी उकडलेल्या पाण्यासोबत घ्या' असे गंमतीने सांगतात. हाच 'ळ' अमरावती जिल्ह्यात 'य' बनतो. तेव्हा गुळाचा गुय, केळाचे केय होते. तिकडे झाडीपट्टीत तर आणखीनच वेगळे काम आहे तेथे 'ळ'चा 'र' होतो व 'ज' 'च' चा उच्चार ज्य, च्य होतो. 'बाजारात जाशील तर तुरीची डाळ व चांगला गूळ आणशील' हे वाक्य 'बज्यारात ज्याशीन त तुरीची डार अन् च्यांगला गूर आनज्यो' असे रूप घेते.
     सातव्या इयत्तेत असताना माझ्या फाळके नावाच्या वर्गबंधूला 'ळ' चा उच्चार करता येत नव्हता.तो 'ळ' ला 'ड' म्हणायचा.मुलं त्याला 'फाड'के म्हणायची.एकदा मराठीच्या तासिकेला शिक्षकांनी एकेक विद्यार्थ्याला एकेक कविता म्हणायला सांगितली.नेमकी फाळकेच्या वेळी 'फळे मधुर खावया असती नित्य मेवे जरी' ही कविता आली. फाळकेने उच्च सुरात सुरू केली 'फडे मधुर खावया....' अर्थात पुढील ओळी विद्यार्थी व शिक्षकाच्या हस्यकल्लोळात बुडून गेल्या हे सांगणे नकोच!
     तर मंडरी, धीस इज मराठी म्हणजे मदरटांग आणि धीस इज आम्ही! जितके राईटचे तेवढे थोडेच! म्हणून आता आपली 'लीव्ह' घेतो.


 

Saturday, November 18, 2023

राग-रंग (लेखांक ३२) राग पुरीया धनाश्री



    सौंदर्याची अनंत रूपे आहेत.त्याच्या अभिव्यक्तीची साधने पण अनेक आहेत.या सौंदर्यापासून मिळणारा आनंदही अपरंपार आहे. त्यामुळे सौंदर्य आणि त्याच्या अनुभूतीने होणाऱ्या आनंदाच्या रुपांवर विचार करणारे शास्त्र पण त्यातील रुपांकडे बघता चिंतन करायला प्रवृत्त करून करत.ज्या प्रमाणे आपली वडीलधारी मंडळी आपल्याला बोट पकडून चालायला शिकवतात व आपण चालायला शिकतो.आणि आपल्या पायावर चालता येऊ लागल्यावर निश्चित होऊन आपले बोट सोडून देते. त्याच प्रकारे ज्याला 'शास्त्र' म्हणतात ते आपल्याला आपल्या पूर्वजांनी जे दिलेलं आहे ते आपल्या चिंतनशक्तीला परिपक्व बनवते आणि स्वतंत्र विचार करण्याला प्रेरित करते.ज्यात हे गुण नाहीत ते अपरिपक्व विचाराचे कितीही घनदाट अरण्य असले तरी ते शास्त्र होऊ शकत नाही. 'शास्ता'चा अर्थ 'गुरू', शिष्या'चा अर्थ 'शिक्षापात्र', आणि 'शास्त्रा'चा अर्थ 'शिक्षण देण्याचे साधन'! जर वास्तविक रुपात एखादा ग्रंथ 'शास्त्र' असेल,तर तो शिक्षण देण्याचे साधन पण असू शकतो.जर काल तो शिष्य असेल तर तोच आज गुरूही असतो.म्हणून खरे शास्त्र गुरुचे पण गुरू असते.फक्त ते 'सच्चे' असायला हवे.

     मनुष्याच्या आयुष्यातीळ संसारिक चिंतांमधून मुक्त करण्यासाठी वा थकलेल्या देहाला अलौकिक सुख प्राप्त करुन देण्यासाठी संगीताची निर्मिती झाली आहे.ज्या संगीतामध्ये तसे अलौकिक सुख देऊन काही काळापुरते का होईना चिंतामुक्त करण्याची शक्ती असेल त्यालाच संगीत म्हणता येईल.अन्यथा तो फक्त गोंगाट आहे.मग ती कोणतीही शैली वा प्रकार असो.

     कोणत्याही सप्तकातील आरोह-अवरोह म्हणजे राग नव्हे.अलंकार किंवा पलटे पण राग नव्हे.विशिष्ठ क्रमवारीने केल्या जाणारा प्रयोग,ज्यात विशिष्ठ स्वरांवर करण्यात येत असलेला ठहराव,हळू हळू होत जाणारी रागाची स्थापना, ज्याच्या आधारावर रागाची 'बढत' केल्या जाते ते या स्थापनेचे चार 'स्थान' किंवा 'मुकाम' म्हणजे राग होय. ही बढतच श्रोत्यांना 'तो' आनंद देऊ शकते,ज्यातून त्याचे दुःख-चिंता दूर होते.असे करण्याची शक्ती म्हणजेच संगीत होय.अशी शक्ती प्रत्येक रागात आहे.फक्त त्या त्या रागांचा योग्य प्रकारे उपयोग करता यायला हवा.आता पुरीया धनाश्री रागाचेच बघा! कोमल रिषभ,धैवत असूनही किती विविध प्रकारची गाणी संगीतकारांनी तयार केली आहे.विरह,दुःख,शृंगार,प्रेम सगळं काही त्याच स्वरातून...

     राग पुरिया धनाश्री पूर्वी थाटातून निर्माण झालेला एक सायंकालीन संधीप्रकाश राग आहे. (पुर्वी थाटातून निर्माण झालेले काही प्रमुख राग :-‘जैतश्री’, ‘परज’, ‘श्री’, ‘गौरी’, ‘वसंत’ वगैरे.) हा राग करुण रस प्रधान व गंभीर मानल्या जातो.याला जवळचा राग पूर्वी आहे. यात दोन्ही मध्यमांचा प्रयोग केल्या जातो. पुरीया धनाश्रीमध्ये पंचम स्वर अतिशय महत्वपूर्ण आहे. संपूर्ण राग पंचमाभोवती विणल्यासारखा वाटतो.उत्तरांगातील आरोहात याचा प्रयोग थोडा कमी होतो.हा या रागाचा वादी स्वर आहे.

     पंडित भातखंडे कृत क्रमिक पुस्तक मालिकेच्या चौथ्या भागातील (हिंदी प्रथमावृत्ती) पृष्ठ क्रमांक ३४३ वर पुरिया धनाश्री रागाचा वादी स्वर पंचम  व संवादी स्वर रिषभ मानला आहे.नियमाप्रमाणे वादी संवादी स्वरांमध्ये षड्ज पंचम वा षड्ज मध्यम भाव असणे आवश्यक असते.पण पंचम रिषभात असा भाव दिसत नाही.त्यामुळे रिषभाला संवादी स्वर मानणे योग्य वाटत नाही.तसेच पुरीया धनाश्रीतील कोमल रिषभावर कधीच न्यास केल्या जात नाही.त्यामुळे पुरिया धनाश्रीत कोमल रिषभाऐवजी षड्जाला संवादी स्वर मानणे योग्य वाटते.

      पुरिया धनाश्री या नावामुळे हा राग पुरिया व धनाश्री या दोन रागांच्या मिश्रणातून तयार झाला हे स्पष्ट होते. पण प्रचलित धनाश्री काफी थाटातून उत्पन्न झाला आहे.यात गांधार निषाद स्वर कोमल आहेत.त्यामुळे अनेक गायक/वादक पुरिया धनाश्रीला स्वतंत्र राग मानतात.पण तसे नाही,यात पूर्वी थाटजन्य धनाश्री व पुरिया रागांचे मिश्रण आहे.

    (अकबराच्या समकालीन काही ऐतिहासिक तथ्य व दंतकथांवर आधारित चित्रपट बैजू बावरा १९५२ मध्ये प्रदर्शित झाला.ऐतिहासिक कथानक आणि शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी,यामुळे चित्रपटाला अमाप यश मिळाले.भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांमुळे आजही रसिकप्रिय मंडळी ही गाणी ऐकताना दिसतात.चित्रपटाच्या सुरवातीलाच पुरीया धनश्रीच्या स्वरांनी सजलेले,उस्ताद अमीर खान यांनी गायिलेले गीत सुरू होते.याचे चित्रीकरण अकबराच्या दरबारातील संगीततज्ञ तानसेन याला आपल्या महालात रियाज करताना दाखविले आहे.या रचनेत तानसेनाचे नाव आलेले आहे.)

● पुरीया धनाश्रीवर आधारित चित्रपट गीते...
'तोरी जय जय करतारा' उस्ताद अमीर खान.चित्रपट-बैजू बावरा.संगीत निर्देशक-नौशाद (१९५२). 
ल'रुक जा बनवासी राम' चित्रपट-संपूर्ण रामायण (१९६१). 
'प्रेम लगाना' आशा भोसले. चित्रपट-सूरत और सीरत. संगीत-रोशन (१९६२). 
'हम कश्मकशे गम से गुजर क्यूँ नहीं जाते' लता.चित्रपट-फ्री लव्ह.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७४). 
'मेरी सांसों को जो महका रही है' लता,महेंद्र कपूर.चित्रपट-बदलते रिश्ते.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७८). 
'तुमने क्या किया है हमारे लिए' आशा भोसले. चित्रपट-प्रेम गीत. संगीत-जगजीत सिंग (१९८१). 
'सांझ ढले गगन तले' सुरेश वाडकर. चित्रपट-उत्सव, 
संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९८४). 
'कितने दिनों के बाद है आई सजना रात मिलन की' संगीत-आनंद मिलिंद (१९९१). 
'आ के तेरी बाहों में हर शाम लगे सिंदूरी' लता,
बालसुब्रह्मण्यम.चित्रपट -वंश.संगीत-आनंद मिलिंद (१९९२). 
'हाय रामा ये क्या हुवा' हरिहरन,स्वर्णलता.
चित्रपट-रंगीला.संगीत-ए.आर.रहमान (१९९५). 
'लबों से चूम लो,आंखों से थाम लो मुझ को' गायिका-श्रीराधा बनर्जी. चित्रपट-आस्था: इन द प्रिज़न ऑफ स्प्रिंग.संगीत-सारंग देव (१९९७). 
'रुत आ गई रे रुत छा गई रे' सुखविंदर सिंग.चित्रपट-१९४७ अर्थ, संगीत-ए.आर.रहमान (१९९९). '
● गैर फिल्मी...
'कोयलिया उड जा यहां नहीं कोया' मुकेश. (कोयलिया तेरे बोल)गैर फिल्म. (१९६९). 
होट सागर है आँख पैमाना' गुलाम अली.
'पहली बरसात लौट आऊंगा' गुलाम अली.
● मराठी
'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' आशा. संगीत-हृदयनाथ मंगेशकर. 
माझे मन तुझे झाले,तुझे मन माझे झाले' प्रियांका बर्वे.   गीत/संगीत-सुधीर मोघे,टीव्ही मालिका 'स्वामी'.
'या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या' लता.संगीत-श्रीनिवास खळे.अल्बम 'जिव्हाळा'.
'सांग प्रिये सांग प्रिये' गायक-रामदास कामत
'श्रीरामाचे चरण धरावे' सुमन कल्याणपूर
'ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा' सुधीर फडके.गीत रामायण.
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी. दि.१९/११/२०२३


 





संगीत आणि साहित्य :