गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, November 18, 2023

राग-रंग (लेखांक ३२) राग पुरीया धनाश्री



    सौंदर्याची अनंत रूपे आहेत.त्याच्या अभिव्यक्तीची साधने पण अनेक आहेत.या सौंदर्यापासून मिळणारा आनंदही अपरंपार आहे. त्यामुळे सौंदर्य आणि त्याच्या अनुभूतीने होणाऱ्या आनंदाच्या रुपांवर विचार करणारे शास्त्र पण त्यातील रुपांकडे बघता चिंतन करायला प्रवृत्त करून करत.ज्या प्रमाणे आपली वडीलधारी मंडळी आपल्याला बोट पकडून चालायला शिकवतात व आपण चालायला शिकतो.आणि आपल्या पायावर चालता येऊ लागल्यावर निश्चित होऊन आपले बोट सोडून देते. त्याच प्रकारे ज्याला 'शास्त्र' म्हणतात ते आपल्याला आपल्या पूर्वजांनी जे दिलेलं आहे ते आपल्या चिंतनशक्तीला परिपक्व बनवते आणि स्वतंत्र विचार करण्याला प्रेरित करते.ज्यात हे गुण नाहीत ते अपरिपक्व विचाराचे कितीही घनदाट अरण्य असले तरी ते शास्त्र होऊ शकत नाही. 'शास्ता'चा अर्थ 'गुरू', शिष्या'चा अर्थ 'शिक्षापात्र', आणि 'शास्त्रा'चा अर्थ 'शिक्षण देण्याचे साधन'! जर वास्तविक रुपात एखादा ग्रंथ 'शास्त्र' असेल,तर तो शिक्षण देण्याचे साधन पण असू शकतो.जर काल तो शिष्य असेल तर तोच आज गुरूही असतो.म्हणून खरे शास्त्र गुरुचे पण गुरू असते.फक्त ते 'सच्चे' असायला हवे.

     मनुष्याच्या आयुष्यातीळ संसारिक चिंतांमधून मुक्त करण्यासाठी वा थकलेल्या देहाला अलौकिक सुख प्राप्त करुन देण्यासाठी संगीताची निर्मिती झाली आहे.ज्या संगीतामध्ये तसे अलौकिक सुख देऊन काही काळापुरते का होईना चिंतामुक्त करण्याची शक्ती असेल त्यालाच संगीत म्हणता येईल.अन्यथा तो फक्त गोंगाट आहे.मग ती कोणतीही शैली वा प्रकार असो.

     कोणत्याही सप्तकातील आरोह-अवरोह म्हणजे राग नव्हे.अलंकार किंवा पलटे पण राग नव्हे.विशिष्ठ क्रमवारीने केल्या जाणारा प्रयोग,ज्यात विशिष्ठ स्वरांवर करण्यात येत असलेला ठहराव,हळू हळू होत जाणारी रागाची स्थापना, ज्याच्या आधारावर रागाची 'बढत' केल्या जाते ते या स्थापनेचे चार 'स्थान' किंवा 'मुकाम' म्हणजे राग होय. ही बढतच श्रोत्यांना 'तो' आनंद देऊ शकते,ज्यातून त्याचे दुःख-चिंता दूर होते.असे करण्याची शक्ती म्हणजेच संगीत होय.अशी शक्ती प्रत्येक रागात आहे.फक्त त्या त्या रागांचा योग्य प्रकारे उपयोग करता यायला हवा.आता पुरीया धनाश्री रागाचेच बघा! कोमल रिषभ,धैवत असूनही किती विविध प्रकारची गाणी संगीतकारांनी तयार केली आहे.विरह,दुःख,शृंगार,प्रेम सगळं काही त्याच स्वरातून...

     राग पुरिया धनाश्री पूर्वी थाटातून निर्माण झालेला एक सायंकालीन संधीप्रकाश राग आहे. (पुर्वी थाटातून निर्माण झालेले काही प्रमुख राग :-‘जैतश्री’, ‘परज’, ‘श्री’, ‘गौरी’, ‘वसंत’ वगैरे.) हा राग करुण रस प्रधान व गंभीर मानल्या जातो.याला जवळचा राग पूर्वी आहे. यात दोन्ही मध्यमांचा प्रयोग केल्या जातो. पुरीया धनाश्रीमध्ये पंचम स्वर अतिशय महत्वपूर्ण आहे. संपूर्ण राग पंचमाभोवती विणल्यासारखा वाटतो.उत्तरांगातील आरोहात याचा प्रयोग थोडा कमी होतो.हा या रागाचा वादी स्वर आहे.

     पंडित भातखंडे कृत क्रमिक पुस्तक मालिकेच्या चौथ्या भागातील (हिंदी प्रथमावृत्ती) पृष्ठ क्रमांक ३४३ वर पुरिया धनाश्री रागाचा वादी स्वर पंचम  व संवादी स्वर रिषभ मानला आहे.नियमाप्रमाणे वादी संवादी स्वरांमध्ये षड्ज पंचम वा षड्ज मध्यम भाव असणे आवश्यक असते.पण पंचम रिषभात असा भाव दिसत नाही.त्यामुळे रिषभाला संवादी स्वर मानणे योग्य वाटत नाही.तसेच पुरीया धनाश्रीतील कोमल रिषभावर कधीच न्यास केल्या जात नाही.त्यामुळे पुरिया धनाश्रीत कोमल रिषभाऐवजी षड्जाला संवादी स्वर मानणे योग्य वाटते.

      पुरिया धनाश्री या नावामुळे हा राग पुरिया व धनाश्री या दोन रागांच्या मिश्रणातून तयार झाला हे स्पष्ट होते. पण प्रचलित धनाश्री काफी थाटातून उत्पन्न झाला आहे.यात गांधार निषाद स्वर कोमल आहेत.त्यामुळे अनेक गायक/वादक पुरिया धनाश्रीला स्वतंत्र राग मानतात.पण तसे नाही,यात पूर्वी थाटजन्य धनाश्री व पुरिया रागांचे मिश्रण आहे.

    (अकबराच्या समकालीन काही ऐतिहासिक तथ्य व दंतकथांवर आधारित चित्रपट बैजू बावरा १९५२ मध्ये प्रदर्शित झाला.ऐतिहासिक कथानक आणि शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी,यामुळे चित्रपटाला अमाप यश मिळाले.भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांमुळे आजही रसिकप्रिय मंडळी ही गाणी ऐकताना दिसतात.चित्रपटाच्या सुरवातीलाच पुरीया धनश्रीच्या स्वरांनी सजलेले,उस्ताद अमीर खान यांनी गायिलेले गीत सुरू होते.याचे चित्रीकरण अकबराच्या दरबारातील संगीततज्ञ तानसेन याला आपल्या महालात रियाज करताना दाखविले आहे.या रचनेत तानसेनाचे नाव आलेले आहे.)

● पुरीया धनाश्रीवर आधारित चित्रपट गीते...
'तोरी जय जय करतारा' उस्ताद अमीर खान.चित्रपट-बैजू बावरा.संगीत निर्देशक-नौशाद (१९५२). 
ल'रुक जा बनवासी राम' चित्रपट-संपूर्ण रामायण (१९६१). 
'प्रेम लगाना' आशा भोसले. चित्रपट-सूरत और सीरत. संगीत-रोशन (१९६२). 
'हम कश्मकशे गम से गुजर क्यूँ नहीं जाते' लता.चित्रपट-फ्री लव्ह.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७४). 
'मेरी सांसों को जो महका रही है' लता,महेंद्र कपूर.चित्रपट-बदलते रिश्ते.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७८). 
'तुमने क्या किया है हमारे लिए' आशा भोसले. चित्रपट-प्रेम गीत. संगीत-जगजीत सिंग (१९८१). 
'सांझ ढले गगन तले' सुरेश वाडकर. चित्रपट-उत्सव, 
संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९८४). 
'कितने दिनों के बाद है आई सजना रात मिलन की' संगीत-आनंद मिलिंद (१९९१). 
'आ के तेरी बाहों में हर शाम लगे सिंदूरी' लता,
बालसुब्रह्मण्यम.चित्रपट -वंश.संगीत-आनंद मिलिंद (१९९२). 
'हाय रामा ये क्या हुवा' हरिहरन,स्वर्णलता.
चित्रपट-रंगीला.संगीत-ए.आर.रहमान (१९९५). 
'लबों से चूम लो,आंखों से थाम लो मुझ को' गायिका-श्रीराधा बनर्जी. चित्रपट-आस्था: इन द प्रिज़न ऑफ स्प्रिंग.संगीत-सारंग देव (१९९७). 
'रुत आ गई रे रुत छा गई रे' सुखविंदर सिंग.चित्रपट-१९४७ अर्थ, संगीत-ए.आर.रहमान (१९९९). '
● गैर फिल्मी...
'कोयलिया उड जा यहां नहीं कोया' मुकेश. (कोयलिया तेरे बोल)गैर फिल्म. (१९६९). 
होट सागर है आँख पैमाना' गुलाम अली.
'पहली बरसात लौट आऊंगा' गुलाम अली.
● मराठी
'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' आशा. संगीत-हृदयनाथ मंगेशकर. 
माझे मन तुझे झाले,तुझे मन माझे झाले' प्रियांका बर्वे.   गीत/संगीत-सुधीर मोघे,टीव्ही मालिका 'स्वामी'.
'या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या' लता.संगीत-श्रीनिवास खळे.अल्बम 'जिव्हाळा'.
'सांग प्रिये सांग प्रिये' गायक-रामदास कामत
'श्रीरामाचे चरण धरावे' सुमन कल्याणपूर
'ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा' सुधीर फडके.गीत रामायण.
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी. दि.१९/११/२०२३


 

Wednesday, November 15, 2023

आठवणीतील शब्द स्वर...(लेखांक १४)


 .                  ◆काही सांगीतिक आठवणी◆

   ● शिवरंजनी' हे नाव जेव्हा पहिल्यांदा माझ्या कानावर पडले,तेव्हा शिवाचे रंजन करणारी रागिणी ती शिवरंजनी असा अर्थ मी काढला.अर्थात त्यावेळी मी फक्त १६ वर्षांचा होतो.वयाच्या अकराव्या वर्षांपासून सोळाव्या वर्षापर्यंत शालेय शिक्षणासोबतच तबला,हार्मोनियम व गायनाचेही प्रशिक्षण सुरू होते.या सहा वर्षात प्रचंड मेहनत घेतल्यामुळे माझा हार्मोनियमचा हात छान तयार झाला होता.१९६५ मध्ये यवतमाळला 'भाग्योदय कला मंडळाची' स्थापना झाली.या मंडळाचा मी सदस्य होतो.या मंडळानेच ऑर्केस्ट्रा काढायचे ठरवले तेव्हा डोक्यात घोळत असलेल्या शिवरंजनी नावाने पुनः उचल खाल्ली. व ऑर्केस्ट्राचे नाव 'शिवरंजन' असे ठेवल्या गेले.त्या वयात शिवरंजनीच्या स्वरांनी इतकी मोहिनी घातली होती की, कार्यक्रमाची सुरुवात आम्ही 'धसां रेंगं रें सां ध प गरे सारे ग s ग रे ग प ध सां'(यात गांधार कोमल आहे) ही शिवरंजनीची त्रितालातील गत वाजवून करायचो.इतका तो राग डोक्यात बसलेला...तो आजतागायत!

  ● 'कोई सागर दिल को बहलाता नहीं' मी ऑर्केस्ट्रामध्ये असतानाच्या काळातील अफाट लोकप्रियता मिळविलेले 'दिल दिया दर्द लिया' या चित्रपटातील हे गीत.घरगुती मैफलीमध्ये मी हमखास गायचो. समोर तरुण मुली असल्या तर एकदम आर्तपणे गायिल्या जायचे. हे गाणे कलावती रागात असल्याचे प्राथमिक ज्ञान तेव्हा मला मिळाले.यात जनसंमोहिनी राग पण आहे हे मला फार उशिरा कळले.या नंतर मुंबईचा जावई या चित्रपटातील 'प्रथम तुज पाहता, जीव वेडावला' या रामदास कामतांनी गायिलेल्या गाण्याने आम्हा (त्या काळातील) तरुण मंडळींना वेड लावले होते.कित्येक वर्षे ही दोन गाणी घरगुती मैफलीत हमखास गायचोच.पण खऱ्या अर्थाने मला कलावती कळला तो प्रभा अत्रे यांच्या 'तन मन धन तो पे वारू'या चिजेने.

     ● त्याकाळी (ऑर्केस्ट्राचा कालखंड) यवतमाळच्या नेहरू युवक केंद्रातर्फे होणाऱ्या कार्यक्रमात माझा फार मोठा वाटा असायचा. असाच एक कार्यक्रम यवतमाळच्या नगर भवनात आयोजित करण्यात आला होता.गायन,वादनाच्या या कार्यक्रमात मी मेंडोलीनवर एक धून वाजविली.कार्यक्रमाला यवतमाळातील संगीत प्रेमींसह संगीत दर्दी पण होते.त्यात बडे गुलामली खान साहेबांचे शिष्य अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख पंडित मनोहरराव कासलीकरही होते.कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मला जवळ बोलवले व 'तू आज जी धून वाजविली ती कोणत्या रागात होती?' असा प्रश्न केला.त्यावेळी मी जरी तबला,हार्मोनियम,

अकॉर्डिअन वाजवीत होती तरी संगीत शिकत होतो.म्हणजे विद्यार्थी दशाच होती.मी केव्हा तरी रेडिओवर ऐकलेल्या गतीची पहिली ओळ डोक्यात होती,ती वाजवून पुढे त्या सुरावटीला अनुसरून स्वरांचे गुच्छ तयार करून पाच मिनिटात वादन संपविले असल्यामुळे राग वगैरे माहीत नव्हता. त्यामुळे 'मला माहित नाही' असे उत्तर देऊन खाली मान घालून गप्प बसलो.तेव्हा त्यांनी मला रागाचे नाव सांगितले 'झिंझोटी'! आणि डोक्यावर हात ठेवून ,'छान वाजवतोस.थोडा जास्ती आणि डोळस रियाज कर' असे सांगून निघून गेले.त्यांच्या या वाक्यावरून मी पुढे दोन वर्षे 'डोळस' रियाज करून नागपूर आकाशवणीचा मान्यताप्राप्त मेंडोलीन वादक झालो.तेव्हापासून झिंझोटी राग कायमचा डोक्यात बसला तो आजतागायत.

     ● हंसध्वनीशी माझी पहिली भेट नवरंग चित्रपटातील  'रंग दे दे' या गीताने झाली.त्यावेळी मी १० वर्षांचा होतो.या गाण्याने मला वेड लावले होते.रस्त्याने चालताना रेडिओवर लागले तर पूर्ण गाणे ऐकल्याशिवाय पुढे पाय निघत नव्हता.या गाण्यापायी मी घरच्यांच्या व शिक्षकांच्या अनेकदा शिव्या खाल्ल्या आहेत.त्यावेळी हा हंसध्वनी राग आहे हे माहीत पण नव्हते.संगीताचे शिक्षण विशारद पर्यंत येऊन पोहोचल्यानंतर जसे कान फुटले तसे नवनवीन रागांची झाडाझडती सुरू झाली.तेव्हा कळले की हा हंसध्वनी आहे...त्यानंतर वेड लावले ते पंडित जसराजजींच्या 'पवन पूत हनुमान' या हंसध्वनीच्या बंदीशीने.अचानक रेडिओवर ऐकली नि 'सुध-बुध खोना' काय असते ते अनुभवले. या चीजेसाठी मी पैसे जमवून ग्रामोफोन घेतला.एल.पी.रेकॉर्ड आणली आणि पारायण सुरू केले.माझ्या अनेक कार्यक्रमातून ही बंदिश मी गायिलो आहे. माहुरचे राजे मधुकरराव उपाख्य बाबुरावजी देशमुख जसराजजींचे चाहते होते.तसेच माझ्यावरही खूप प्रेम करायचे.त्यांच्या वाड्यात झालेल्या बहुतेक मैफलीत ते मला ही चीज गायला लावायचे. यवतमाळच्या नेहरू युवक केंद्राच्या संगीत विभागासाठी १९७६ मध्ये एक वाद्यवृंद रचना केली होती.या वाद्यवृंदामध्ये सतार, सारंगी,बासरी,व्हायोलिन, हार्मोनियम आणि तबला ही वाद्ये होती. आणि आर्णी (जि. यवतमाळ) येथे संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर अनेक सांगीतिक उपक्रम राबविले.त्यात 'गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना' आणि त्यातील विद्यार्थ्यांचा 'वाद्यवृंद', ह्या दोन्हीसाठी केलेल्या  दोन  वेगवेगळ्या धून (compositions) हंसध्वनी रागावर आधारित होत्या.यात/व्हायोलिन,बासरी, हार्मोनियम, मेंडोलीन,स्वरमंडळ, जलतरंग आणि तबला अशी वाद्ये होती.(सरोद मी स्वतः वाजवायचो.) यात इयत्ता पाच ते सातचे शालेय विद्यार्थी असल्यामुळे या उपक्रमाचे खूप कौतुक झाले होते.

     ● राग बिहाग

(सर्वप्रथम जेव्हा बिहाग नाव ऐकले तेव्हा जोरात हसू आले.छोट्याशा खेड्यातून आलेलो मी...खेड्यातला कुचिनपणा अंगात भिनलेला.त्यामुळे मनातल्या मनात  बिहाग शब्दाची फोड (संधी विग्रह) वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे हसू आवरले नव्हते.या हसण्यामुळे मार बसला नाही.पण भरपूर शिव्या खाव्या लागल्या,त्या गुपचूप खाऊन घेतल्या.चिजांच्या बाबतीतही त्यातील न कळणारे शब्द ऐकून वेगवेगळे अर्थ काढल्यामुळे अनेकदा इतर विद्यार्थ्यांसमोर (विशेषतः विद्यार्थिनींसमोर) अनेकदा अपमानित व्हावे लागायचे.शब्दच तसे असायचे...देस मधील 'रब गुना गाय रे तू मना' यातील 'रब'चा अर्थ न लागल्यामुळे व पुढील 'गाय' चा अर्थ 'दूध देणारी गाय असा अर्थ काढून,पुढील 'काहे भटकत फिरे निसदिन' यातील फक्त गाय व भटकणे हे कळल्यामुळे जो अर्थ काढायचा तो काढून मोकळा व्हायचो.शिकविणारे गुरुजी अर्थ सांगण्याच्या भानगडीत न पडता फक्त शिकविण्याचे काम करायचे.बिहाग मधीलच 'जब ते बिछुरे लालन' ह्या चिजेचा अर्थ १० ते १५ वयोमान असलेले विद्यार्थी सांगू शकतील काय? तिलक कामोद मधील 'चंचल चित चोर चतुर अटक मोसे गुईया' या द्रुपदाचा अर्थ काढताना हसू येणार नाही तर काय?भैरव मधील 'धन धन मुरत कृष्ण मुरारी' मधील धन म्हणजे संपत्ती हा अर्थ काढून 'कृष्ण खूप श्रीमंत असल्यामुळे धन मुरवत होता'असे काही बाही डोक्यात यायचे.खरे म्हणजे शिकविणाऱ्यांनी चिजेच्या अर्थासह शिकवायला हवे.पण तसे फारसे घडत नसावे.निव्वळ पोपटपंची असायची. अर्थात त्यातून राग स्वरूप कळायचे हे मात्र तितकेच खरे.चिजा मात्रा डोक्यावरून जायच्या. 'बालमुवा माईरी' बहार,'मोर मोर मुसकात जात' मालकौंस, 'छों छननन छों छननन बिछुवा बाजे' (माझ्या डोक्यातील प्रश्न 'बिच्छू वाजणार कसा?') जौनपुरी. 'लाल मोरीचू s s नरभी s जे s गी' कामोद मधील धमार.एक चीज तर महाराष्ट्रातील आणि त्यातही माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थासाठी अजूनच अनाकलनीय... 'तेंडेरे कारन मेंडेरे यार' मला फक्त 'मेंढरं' माहीत.त्या वयात न कळणाऱ्या चिजांची अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणून गुरुजनांनी शिष्यांना अर्थ कळतील अशाच चीजा शिकवाव्या. किंवा शिकवत असलेल्या चिजांचा अर्थ तरी सांगावा. असे जरी मी म्हणत असलो तरी शास्त्रीय संगीत हाच इतर सर्व शैलींचा पाया आहे,हे ही तितकेच खरे आहे. मी आर्णी (जि. यवतमाळ) येथे ३१ वर्षे संगीत विद्यालय चालविले,अणि विद्यार्थ्यांना कळतील अशा चिजा शिकविणे किंवा न कळणाऱ्या चिजांचा अर्थ सांगणे हे बंधन पाळले.शास्त्रीय संगीतातील प्राचीन अस्पष्ट आणि निरर्थक साहित्यात बदल सध्या अपेक्षित आहे.आज आपल्या देशात चित्रपट संगीत अत्यंत लोकप्रिय आहे.कारण ते रस आणि भाव या दृष्टीने अधिक परिणामकारक आहे.त्यावर कितीही ताशेरे ओढले तरी संगीताच्या प्रसाराचे श्रेय मधल्या काळातील चित्रपट सांगिताला द्यावेच लागते.असो!


     ●संगीताशी जोडलेलले स्वर,लय,भाव ह्या सर्व बाबी नैसर्गिक आहेत.निसर्गाशी जोडलेल्या आहेत.आपल्या हृदयाचे ठोके किती नियमित लयीत असतात ना! त्यात थोडा जरी फरक झाला तर काहीतरी बिघडल्याचे लक्षात येते.तसेच संगीताचे आहे.स्वर,ताल,लय बिघडली की गाणं बिघडतं.

     या बिघडण्यावरून कॉलेजमध्ये असतानाचा एक किस्सा आठवला.संगीत कक्षात जवळ जवळ वीसेक मुला, मुलींना एकत्र शिकविल्या जायचे.आमच्या संगीताच्या प्राध्यापकांनी देस राग शिकवायला घेतला तेव्हाची ही गोष्ट आहे. देसचा छोटा ख्याल 'रब गुना गाय रे तू मना' चार-पाच तासिकांमध्ये संपला. त्यानंतर एक तराणा शिकवायला सुरवात केली.त्याचा अंतरा होता 'नादिर दानी तुंदीर दानी दानी तदारे दानी'. माझ्यासारखे बाल वयापासून संगीत शिकणारे काही, हा अंतरा व्यवस्थित म्हणायचे.कारण त्यांचा तो अगोदरच झालेला होता.पण दहावी नंतर कॉलेजमध्ये (त्यावेळी दहावी नंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळायचा.यातील प्रथम वर्षाला 'प्री युनिव्हर्सिटी' म्हणायचे) प्रथमच संगीत विषय घेणारे विद्यार्थी वरील तराणा म्हणताना 'तुंदिर'चे 'उंदीर' करून गायचे. ते असे :- नादिर दानी उंदीर दानी दानी तदारे दानी'. आणि मग वर्गात हलकीसी खसखस पिकायची.खसखस का पिकते हे शेवटपर्यंत प्राध्यापकांना कळले नाही.कारण हे सगळे 'उंदीर' शेवटच्या दोन रांगात बसायचे.असो!

Wednesday, November 8, 2023

आठवणीतील शब्द स्वर...(लेखांक १३)

 आर्णीला नोकरी लागायच्या अगोदर व लागल्यावर, सुरेश भटांची प्रत्यक्ष भेट होण्याअगोदर यवतमाळातील गायिका प्रमोदिनी मॅथ्यूंना सोबत घेऊन भावगीत,भक्तीगीतांबरोबरच मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचे कार्यक्रम करायचो.सोबतच नाटकांना संगीत देणे,शाळा-शाळातील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गाणी बसवून देणे,अकॉर्डियन वादक म्हणून नाईट प्रमाणे इतरही ऑर्केस्ट्रासोबत काम करणे. असे अनेक सांगीतिक उपदव्याप केलेत पण कुणाच्याही लग्नात कितीही बिदागी देऊ केली तरी मी गायिलो नाही.हां, ऑर्केस्ट्रातील गायक गाणार असले तर त्यांना स्वागतगीत स्वरबद्ध करून द्यायचो,मंगलाष्टकांची तयारी करून द्यायचो. पण मी स्वतः या भानगडीत आयुष्यभर पडलो नाही. असो! आमच्या गीत-गझल मैफलीच्या तबला साथीला शेखर सरोदे असायचा. (शेखर सरोदे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा येथील सरोदे या प्रसिद्ध घरातील व सध्याचा पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदेचा काका.) शारदोत्सव, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, आणि रसिकांनी तिकीट लावून आयोजित केलेले कार्यक्रम विदर्भभर चालत.कधी कधी सूत्र संचालनासाठी कवी शंकर बडे तर कधी सुरेश गांजरे सोबत असायचे.खाजगी घरगुती मैफल असली तर सूत्र संचालन मीच करायचो.त्या काळी रेडिओ सिंगर असणे ही फार मोठी बाब समजल्या जायचे.जाहिरातीच्या पत्रकांवर ( pamphlets) तसे नमूद करायचे.(सोबत वणीच्या साहित्यांकुर शाखेने आयोजित केलेल्या  लोकमान्य टिळक महाविद्यालयातील सभागृहातील पत्रक आणि इतर काही पत्रके ( pamphlets) जोडली आहे.ती अवश्य बघून आनंद घ्यावा.मी पण अधून-मधून घेत असतो,म्हणून म्हटले!)









Monday, November 6, 2023

गझलगंधर्व सुधाकर कदम .


गझलगंधर्व सुधाकर कदम

गझलनवाज सुधाकर कदम

महाराष्ट्राचे मेहदी हसन सुधाकर कदम

अशा विविध संबोधनांनी मराठी गझल रसिकांना परिचित असलेले मराठीचे आद्य #गझलगायक,#संगीतकार,#कवी,#लेखक.

.          महाराष्ट्रातील गझलविधा खेडोपाडी रुजविण्याचे महत्कार्य स्व.सुरेश भटांसोबत फक्त गझलनवाज सुधाकर कदम यांनीच केले.वऱ्हाडातील आर्णी या छोट्या गावातून हा गझल फकीर गावोगावी भटांच्या गझला चालीसह पोहोचवीत होता तेव्हा आजचे नामवंत भावगीत गायक कोळी गीतांवर गुजराण करीत होते.जेव्हा सुधाकर कदम आर्थिक विवंचनेत होते तेव्हा सुरेश भटांनी  स्वखर्चाने आपल्यासोबत महाराष्ट्रभर गझल वाचन-गायनाचा कार्यक्रम करण्याची गळ घातली अन् कदमही आढेवेढे न घेता,कारणे न देता त्यांच्या सोबतीचे फकीर बनले.गाठीशी चांगली नोकरी असताना तिच्या बळावर अथवा अन्य निकषांवर गायन कार्यक्रम मिळविणे,त्यानंतर आर्थिक स्थैर्याची खात्री झाल्यावर व थोडे बहुत नाव झाल्यावर कलेला वाहून घेणे हे कलेच्या क्षेत्रात नेहमीच घडते.पण तदपूर्वीच नोकरी सोडून गायनासाठी आवकाची पर्वा न करता ,न कंटाळता,न वैतागता शेवटपर्यंत संघर्षरत राहणारे सुधाकर कदम हे एकमेव गायक होय.

           सुरेश भटांनी लेखी स्वरूपात ज्यांना #गझलनवाज या उपाधीने गौरविले आहे ते एकमेव सुधाकर कदमच आहेत.शाहीर सुरेशकुमार वैराळकरांच्या आयोजनाखाली झालेल्या एका समारंभात त्यांना गझलगंधर्व ही पदवी बहाल करण्यात आली पण कदमांना त्या पदव्या मिरविण्याचा हव्यास नसावा.त्यांच्या अनेक हिंदी-उर्दू गझल,गीतांवरील स्वरलिपी काका हाथरसीच्या संगीत कार्यालयाच्या ग्रंथात अंतर्भूत आहेत.त्यावरून पंडित ही उपाधी ते सहजपणे लावू शकतात पण ही पदवी शासन दरबारातून किंवा विद्यापीठातून मिळत नाही हे सर्वश्रुत आहे.अशी पदवी स्वयंघोषितच लावतात.स्वतःला बिरुद चिटकवून घेण्याचा त्यांना तिटकारा आहे.

          सुधाकर कदमांचा आवाज,शास्त्रीय संगीताची जाण व गझल ही शब्दप्रधान गायकी आहे या गोष्टींचे भान व रागात गझल बांधण्याचे कसब हे गुण भटांना भावले व त्यामुळेच भटांनी त्यांना सोबत घेतले.

           सुधाकर कदमांच्या गझलगायनाने प्रेरित होऊन विदर्भातील अनेक गायक गझलगायनकडे वळले.त्यातील राजेश उमाळे,मदन काजळे, विजय गटलेवार, भीमराव गुलाबराव पांचाळे ही नावे नमूद करता येईल. कदमांच्या शैलीचा शिक्का आपणावर बसू नये म्हणून काही गायकांनी शब्दांपेक्षा सरगम व वाद्यवृंदाच्या पेशकशीचा आधार घेत आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला.कवीचे गझलेतील भाव तिच्यातील शब्दांद्वारे व आपल्या स्वर व सुरांच्या सहाय्याने रसिक श्रोत्यांच्या मनबुद्धीत संप्रेषित करणे हे गझलगायकाचे आद्य कर्तव्य आहे.(शब्दांना गौण मानून आलापांद्वारे आपले नैपुण्य प्रदर्शित करणे नव्हे.)याचा अनेक लब्धप्रतिष्ठित गवैयांना विसर पडतो 

           सुधाकर कदमांनी सरकार दरबारी पायऱ्या झिजवून अनुदान-याचक बनून जलसे केले नाहीत की आपले गायन क्षेत्र सोडून गझल लेखन क्षेत्रात लुडबुड केली नाही.खरे तर ते लेखक कवीही आहेत.तालवृत्तांएवढेच त्यांना छंदवृत्तांचेही ज्ञान आहे,पण त्यांनी शिष्यवर्ग घडवला तो आपल्या गायन क्षेत्रातच.

           सांदिपनी बनून आश्रमासाठी माधुकरी मागण्याचीही त्यांना आवश्यकता भासत नाही हे विशेष.

          वडील पांडुरंगपंत हे संगीत तज्ञ व संवादिनी वादक असल्याने सुधाकर कदमांना संगीताची गोडी लागणे स्वाभाविकच होते.त्यांनी सुधाकर कदमांना पुरुषोत्तम कासलीकर यांच्याकडे शिकण्यास पाठविले.अल्पावधीतच संगीत विशारद ही पदवी कदमांनी श्रेष्ठ श्रेणीत प्राप्त केली.'अशी गावी मराठी गझल' या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी विविध ठिकाणी,विविध गावी केले.

           कदम म्हणतात,मराठी गझल जशी उर्दूकडून आली तशीच गझलगायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.त्यांनी आपली गायन शैली मेहदी हसन,फरीदा खानम,गुलामअली,जगजितसिंह यांच्या गायकीवरून तयार झाली हे प्रामाणिकपणे मान्य केले आहे.वडिलांचे वारकरी भजन,गायन व शिवरंजनी ऑर्केस्ट्रामधील संयोजन व अकॉर्डियन,सोबत तबला,मेंडोलिन,सरोद,संतूर इत्यादी वाद्यांवर त्यांनी प्राविण्य मिळवले.एवढेच नव्हे तर मुलगा तबला वादक व दोन्ही मुलींना गायक म्हणून घडविले.

           सुधाकर कदमांना बंदिश तयार करणे ही संकल्पना,हा शब्दप्रयोग अयोग्य वाटतो.ते म्हणतात गझल वाचता वाचता आतल्या आत खळखळ सुरू होऊन एखादी सुरावट बाहेर येते,ती खरी बंदिश असते.ती आपली नसते...आपण फक्त माध्यम असतो.आलेल्या चाली (म्हणजे उर्दूतील आमद) आणि बांधलेल्या चाली यातील तफावत आत्मपरीक्षण केल्यास लक्षात येते.शब्द आणि स्वर दोन्हीही दमदार असतील तर फड हमखास मिळते.

           वरील निष्कर्ष सुधाकर कदमांच्या प्रदीर्घ रियाज, अवलोकन,अध्ययन यातून उतरले आहेत हे सहज लक्षात येईल.गझलगायक संगीतकार असूनही त्यांनी आपल्या तालिमीत शिष्य गायक तयार करून त्यांना आपल्या गायनाच्या कार्यक्रमात संधी दिली हे मी फक्त कदमांच्या बाबतीत अनुभवले.एवढेच नव्हे तर गायनाची वर्कशॉप घेण्याची त्यांना गरजही भासली नाही.ते मूलतः कवी व लेखक असल्याने गझल सृजनाचे वर्कशॉप घेऊन मिळकत करणे त्यांना अशक्यही नव्हते.पण गझल गायनाला निष्ठा वाहिल्यामुळे गझलकरांच्या क्षेत्रात चमकोगिरी करून स्वतःचे स्तोम माजविणे व त्या बळावर शासनाकडे गझल भंडारा घालण्यासाठी हात पसरणे त्यांना उचित वाटले नाही.

           गझलच्या नावाखाली एखादी संस्था काढून दरवर्षी गझल उरूस भरवणे चोहीकडे चालले असताना अशा मोहाला कदम बळी पडले नाहीत ही स्पृहणीय बाब होय.त्यासाठी लागणारी लाचरी,संधिसाधुत्व,दूरदृष्टी ठेऊन मैत्री जोडण्याचे कसब (गरज संपतच तोडण्याची चलाखी) इ.चा अभाव असल्याने ते अर्थार्जनात मागे पडले असावेत,पण त्यांना या गोष्टीची खंत नाही.

           गझल लेखन ही आता विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी राहिली नाही.या पूर्वार्ध वाक्याचा उत्तरार्ध असा की,गझल गायन ही आता विशिष्ट व्यक्तींचीही मक्तेदारी उरलेली नाही.डॉ.राजेश उमाळे,मदन काजळे,दत्तप्रसाद रानडे,विजय गटलेवार,दिनेश अर्जुना, आदित्य फडके,मयूर महाजन,राहुलदेव कदम,गायत्री गायकवाड गुल्हाने,प्राजक्ता सावरकर शिंदे ,संकेत नागपूरकर इ.कदमांचे प्रसंशक व शिष्य यांनी माझे हे म्हणणे सत्य ठरविले आहे.

           सुरेश भटांच्या 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची' या गझलेसाठी भूपाळीचे स्वर कदमांना खुणावीत होते.पण अधीर या शब्दासाठी उचित सुरावट आढळेना अन् अवचित भूपाळीत अंतर्भूत नसलेला शुद्ध निषाद त्यांच्या मनात हजर झाला अन् तापलेल्या अधीर पाण्याची ही दुसरी ओळही स्वरबद्ध झाली.हा किस्सा इथे उद्धृत करण्यामागे हेतू एवढाच की कदमांपासून गझलगायनाची प्रेरणा घेणाऱ्या व अन्य गायकांनी हे जाणावे की, खरी चाल ,बंदिश ही आपण बांधली अशी गर्वोक्ती व्यर्थ आहे.

           इथे एक किस्सा नमूद करतो...

नबाब संत रहीम हे अत्यंत दानशूर होते तेवढेच विनम्रही होते.दोन हात उंचावून याचकांना दान देताना त्यांची दृष्टी जमातीकडे लावलेली असे.यावर गंग कवीने विचारले, 

          सीखे कहां नबाबजूं ऐसी देनी देन

          ज्यों ज्यों कर उंचा करा त्यों त्यों नीचे नैन

रहीम उतरले,

          देन हार कोई और है भेजत सो दिन रैन

          लोग भरम हम पै धरे यात नीचें नैन

नामवंतांनी 'देन हार कोई और है' याचं भान ठेवणं आवश्यक आहे अन् 'याते निचें नैन' ही वृत्ती बाणवणेही गरजेचे आहे.

           सुधाकर कदमांचा परिवार गायन क्षेत्रातच आहे.त्यांचा मुलगा व दोन्ही मुली शिष्य परिवारातच मोडतात.आपण गझलगायन इतरांना शिकवलं तर आपल्याला सरपास करून ते आपल्याहून अधिक विख्यात होतील अशा भयगंडाने शिकू इच्छिणाऱ्यांना त्यांनी कधी विन्मुख पाठविले नाही.गायकांना विद्यादानाची उदारवृत्ती कदमांनी आपल्यात रुजवली आहे.त्यामुळेच आपल्या नॅरेशन्स त्यांनी प्रकाशित करून नवोदित गझलकारांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

            ख्यालगायक एखादा राग पेश करताना जी शब्दरचना वापरतो त्या रचनेचा कवी बरेचदा त्यास ज्ञात नसतो. ती रचना त्याला परंपरेने प्राप्त झाली असते.इथे रागाची पेशकश प्रमुख असते.सहसा काव्य संप्रेषित होतेच असे नाही,पण गझलगायनात शब्द हे प्रधान असतात.गायक संगीतकार गझलेला स्वरसाज चढवीत असतो.(सुरावटीवरही गझल पाडून देणारे अनेक महाभाग असतीलही कदाचित अशांना गायनानुकूल न म्हणता गायनानुकूल गझलकार म्हणावे लागेल.) काही गझलगायक (गझलकारास त्याची गझल गायल्याचे मानधन तर देतच नाहीत.) गझल गाताना त्या गझलेच्या कवीचे नावदेखील मैफिलीत सांगण्याचे औदार्य दाखवीत नाहीत.एवढेच नव्हे तर त्याची गझल गाताना अन्य गझलकाराचे शेरही नाव न घेता घुसडतात.हे अनुचित व अनैतिक वर्तन म्हणावे लागेल.सुधाकर कदमांच्या मैफिलीत गझलकाराचा आवर्जून उल्लेख होतो.एवढेच नव्हे ते आपल्या साथीदारांचाही पूर्ण परिचय करून देतात.या गोष्टी गायकाबद्दल श्रोत्यांना अनुकूल मत नोंदविण्यास सहाय्यक ठरतात.गायकाच्या व्यक्तिमत्वाशी एक जमेची बाजू ठरते.विशेषतः कदमांसारखे आकर्षक व्यक्तिमत्व नसेल अशांनी ही बंधने अवश्य पाळावी. त्याने त्याचा दिलदारपणा श्रोत्यांना जाणवून अन्य न्यूनतेकडे दुर्लक्ष होईल.

           खरे तर सुधाकर कदम यांचा गौरव ग्रंथ त्यांची गझल गायनातील ज्येष्ठता व स्थान लक्षात घेता फार पूर्वीच यायला हवा होता,पण बाजारात ओरिजनल वस्तू महाग असते व चायनामेड स्वस्त व विपुल प्रमाणात उपलब्ध असते,त्यामुळे चायनाचे तकलादू प्रॉडक्ट् लवकर खपते हेच खरे.

           गझलगायक, गझलकार व गझल रसिकांनी हा ग्रंथ वाचणे अगत्याचे आहे.जेणेकरून या क्षेत्रात पारंगत म्हणून पाय रोवायचा असेल तर किती आर्थिक ,मानसिक व संघर्षाला सामोरा जाणे क्रमप्राप्त आहे हे समजेल.इथे शॉर्टकट नाही हे लक्षात येईल.खोट्या नाण्यांच्या या क्षेत्रात आपले खणखणीत नाणे जाणकारालाच ओळखता येते हेही ध्यानात येईल.

--डॉ.राम पंडित,मुंबई 

४,अटलांटा, 

प्लॉट क्र.२९, सेक्टर ४०,

नेरुळ (पश्चिम) नवी मुंबई

400 706

मोबा.98197 23576

Friday, November 3, 2023

#आठवणीतील_शब्द_स्वर (लेखांक १२)

.                       
                     -तबलापटू शेखर सरोदे आणि मी-

...तेव्हा मी एक तास सरोद वादन व एक तास मीच स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचा कार्यक्रम करायचो. तबल्याच्या साथीला यवतमाळचाच, हैदराबादचे उस्ताद दाऊदखान साहेबांचा गंडाबंद शागिर्द आणि सध्याचा पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे याचा काका शेखर सरोदे हा असायचा.ऑर्केस्ट्रा बंद झाल्यावर आर्णीला नोकरी करत असतानाचा १९७६ ते १९८३ असा हा जवळ-जवळ आठ वर्षांचा कालखंड  होता.विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील #अशी_गावी_मराठी_गझल ह्या सुरेश भटांनी शीर्षक दिलेल्या व स्वतः सूत्र संचालन केलेल्या अनेक कार्यक्रमात त्याच्या तबला संगतीने रंगत यायची.शेखर पुण्यात स्थायिक झाल्यावर उत्कृष्ट तबला वादक म्हणून ओळख व्हायला लागली असताना एका कार्यक्रमातून परत येताना कार अपघातात त्याचे निधन झाले.देखणा, रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला व  मैत्रीला जपणारा अतिशय मनमिळावू,आमच्या कुटूंबातील एक भाग बनलेला जिवलग आम्हाला सोडून गेल्याने मित्र मंडळीला व यवतमाळकरांना फार मोठा धक्का बसला होता.त्याच्या अनेक आठवणी हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत.आपल्या आयुष्यात अनेक मित्र मिळतात.पण असे जिवाला चटका लावून जाणारे दोन-चारच असतात....

●छायाचित्रांमध्ये शेखर आणि मी....









 

Saturday, October 28, 2023

राग_रंग (लेखांक ३०) बिलासखानी तोडी (

              
     दक्षिण भारतीय संगीत तज्ज्ञ म्हणतात की,भारतीय शास्त्रीय संगीताला काही मुसलमान संगीकारांनी भ्रस्ट केले.तर काही मुसलमान संगीतकरांचे म्हणणे आहे की,मुसलमान संगीत तज्ज्ञांनी  भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी सजवले,त्यास सौंदर्यपूर्ण केले.
      इतिहास पहिला तर भारतीय व्यापाऱ्यांचे अरब व्यापाऱ्यांशी शेकडो वर्षांपासून व्यापरिक संबंध होते.हजरत मुहम्मदाच्या जन्मापूर्वीचे काही अरबी ग्रंथ रामपूरच्या 'रजा पुस्तकालयात' सुरक्षित आहेत,त्यात काही विशिष्ठ गीतांची 'स्वरलिपी' पण आहे.जी सामगायन करणाऱ्या 'गात्रवीणा विधी'ने प्रभावित आहे.यावरून हे लक्षात येते की,अरब लोक इस्लामचा उदय होण्या अगोदरपासून भारतीय स्वरविधीशी परिचित होते.दक्षिण भारताशी तर अरब व्यापाऱ्यांचा संबंध फार प्राचीन आहे.इसवी सन ८६८ मध्ये जाहज नामक एका अरबी लेखकाने भारतीय संगीताची भरपूर तारीफ केली आहे.यात विशेषकरून 'एकतारा'ची (एकतंत्री वीणा) चर्चा महत्वाची समजल्या जाते.स्पेनचा इतिहासकार काजी साइद उदलूस्मीने,ज्यात रागांच्या स्वरांचे वर्णन आहे असे भारतीय ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचले असा उल्लेख इसवी सन १०१७ मध्ये केला आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', 
लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५७.) अमीर खुसरोने भारतीय संगीत जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५८.) भारतीय संगीत शिकण्यासाठी विदेशातून अनेक विद्यार्थी भारतात येत असल्याचा उल्लेख 'खिलजी कालीन भारत,या ग्रंथातील पृष्ठ क्रमांक १८० वर आहे.इसवी सन ७५३ ते ७७४ च्या मधल्या काळात अनेक भारतीय ग्रंथ अरबस्थानात नेऊन त्याचे अरबी भाषांतर करण्यात आले.त्यावेळी बगदादमध्ये खलिफा मन्सूर याचे शासन होते.खलिफा हारूनच्या (७८६ ते ८०८) काळात अनेक अरब विद्यार्थ्यांना विभिन्न विद्यांच्या अध्ययनासाठी भारतात पाठविले व भारतातील विद्वानांना बगदादला बोलविले.प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ शेख बहाउद्दीन झकेरीयाचा संगीत संप्रदाय अरबी संगीताच्या प्रभावाखाली होता.झकेरीया सुफींच्या सुहरवर्दी परंपरेचे महापुरुष होते.यांचे कार्यक्षेत्र सिंध प्रांत असल्यामुळे पंजाब आणि सिंधच्या लोकगीतांचा  या संप्रदायावर पूर्ण प्रभाव होता.खैबर खिंडीतून आलेले मुसलमान व अरबस्थानातून आलेले मुसलमान यांचा स्वभाव,चरित्र,संगीत इत्यादींमध्ये  खूप तफावत होती. भलेही दोघांचे धार्मिक संबंध असेल पण सांस्कृतिक संबंध नव्हते. अरबी संगीत आणि इराणी संगीत भिन्न आहे.अमीर खुसरोला याचे ज्ञान होते.इरानी संगीताचे चार 'उसूल' आणि 'बारा पडद्यांचा' अभ्यास असूनही त्याने भारतीय संगीतालाच श्रेष्ठ मानले आहे.चिश्ती परंपरेतील प्रसिद्ध पुरुष शेख निजामुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर खुसरोच्या ज्या रचना गायिल्या जातात, त्या सर्व भारतीय लोकधुनांवर आधारित शुद्ध भारतीय आहे.(संदर्भ - 'संगीत चिंतामणी)
       अकबराच्या दरबारात ग्वाल्हेर परंपरेचे मर्मज्ञ तसेच फारसी परंपरेचे विदेशी कलाकार पण होते.या काळची परिस्थिती संगीतामध्ये नव-नवीन प्रयोग करण्यास अतिशय अनुकूल अशी होती. असे अबुल फजल यांच्या 'आईने अकबरी' मधील उल्लेखावरून कळून येते.या काळात अनेक प्रयोग झाले.या प्रयोगातूनच तानसेनाचा 'मियां मल्हार,'दरबारी कानडा'   
(कानडा हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचा समूह आहे, ज्याला कान्हडा म्हणूनही ओळखले जाते. कानडा हे नाव कर्नाटक संगीत परंपरा आणि कन्नड देशात उद्भवले असावे असे सुचवते. या गटातील राग वेगवेगळ्या थाटांचे आहेत, परंतु विशेषतः आसावरी किंवा काफी थाटाचे आहेत.कानड्याचे एकूण १८ प्रकार मानले जातात.त्यात 
शाम कानडा,मंगल कानडा, कोलाहल कानडा, मुद्रिक कानडा, नागध्वनी कानडा, टंकी कानडा, जैजवंती कानडा, गारा कानडा, काफी कानडा, बागेश्री कानडा, सुघराई कानडा, सुहा कानडा, शहाणा कानडा, अडाना कानडा, हुसैनी कानडा,अभोगी कानडा, कौशी कानडा, नायकी कानडा हे प्रकार आहेत.यातील अनेक प्रकार आज नामशेष झाले आहेत.)  
'मियां की तोडी'(गुजरी अथवा गुर्जरी तोडी,देसी तोफा,हुसैनी तोडी,आसावरी उर्फ कोमल रिषभ आसावरी असे तोडीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत.)  
धोंधूचा 'धोंधू की मल्हार', चरजूचा 'चरजू की मल्हार' (मेघ मल्हार,रामदासी मल्हार,गौड मल्हार,सूर मल्हार,देश मल्हार,नट मल्हार,धुलिया मल्हार,मीरा की मल्हार असे मल्हारचे पण अनेक प्रकार आहेत).या प्रकारे नवीन राग संगीत जगताला मिळत गेले.ही परंपरा पुढेही सुरू राहिली.
● मी सुद्धा भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये नसलेल्या एका नव्या सुरावटीत मराठी गझल स्वरबद्ध केली.या रागाला 'सुधाकरी तोडी' असे नाव दिले आहे.थाट-भैरवी, वादी स्वर-रिषभ,संवादी स्वर-पंचम.गानसमय-दिवसाचा पहिला प्रहर.आरोह-सा कोमल रे कोमल ग प कोमल नि सां. अवरोह-सां कोमल नि प कोमल ग कोमल रे सा.आरोहावरोहात पाच स्वर असल्यामुळे शास्त्रानुसार याची जाती औडव-औडव ठरते.(याला मान्यता मिळेल की नाही मला माहित नाही.कारण मी शास्त्रीय संगीतातील पंडित, डॉक्टर,प्राध्यापक वा कुठल्या महाविद्यालयाचा संगीत विभाग प्रमुख नाही.) शब्द आहेत 'माझी गझल गुलाबो भरते हसून प्याला, माझ्या नशेत अवघा जातो बुडून प्याला'. रसिकांना ऐकण्यासाठी युट्युब लिंक:-https://youtu.be/hRVkLxUFUng?si=Vk6p5c2ZdAw_PYPT
     जहांगीरच्या काळात तानसेनाचा मुलगा बिलास खान याने 'बिलासखानी तोडी' नामक अतिशय गोड रागाची रचना केली. हा राग भैरवी थाटोत्पन्न मानतात.याला जवळचे असे भैरवी, भूपाल तोडी व कोमल रिषभ आसावरी हे तीन राग आहेत. हे तीनही राग समप्रकृतिक असले तरी चलन,स्वर लागाव,वर्ज स्वर यामुळे एकदम वेग-वेगळे आहेत.बिलासखानी तोडीचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे यातील गांधार स्वर तोडीप्रमाणेच अती कोमल लावायला हवा.यात पंचम हा न्यास स्वर आहे.पण अवरोहात याला घेतल्या जात नाही.तसेच आरोहात वर्ज असलेला निषाद कधी कधी रंजकता वाढविण्याकरिता घेतल्या जातो.हा एक अतिशय गोड आहे पण गायला मात्र कठीण आहे.हा मींडप्रधान राग आहे.याची प्रकृती शास्त्रानुसार शांत आणि गंभीर आहे.या रागात हिंदी वा मराठीत गाणी नसल्यातच जमा आहे.'लेकिन' या चित्रपटातील गुलजार यांचे शब्द व हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या 'झुठे नैना बोले सांची बतीया' ह्या आशा भोसले व पं.सत्यशील देशपांडे यांनी गायिलेल्या एका अप्रतिम गाण्यासाठी हा लेख प्रपंच केला आहे. ज्या रसिकाने हे गाणे ऐकले नसेल त्याने जरूर ऐकावे!
● युट्युबवर उपलब्ध गायक वादकांचा बिलासखानी...
उस्ताद अमीर खान, सरस्वतीबाई राणे, पंडित जसराज, कुमार गंधर्व, जयतीर्थ मेवूंडी,पं. अजय पोहनकर,पं. राजन,साजन मिश्र, पंडिता किशोरी आमोणकर, पं. प्रभाकर कारेकर, वीणा सहस्रबुद्धे, उस्ताद राशिद खान, उस्ताद शराफत हुसेन खान, पं. अजय चक्रवर्ती, आरती अंकलीकर, अश्विनी भिडे, पं. व्यंकटेश कुमार, कैवल्य कुमार गुरव, नागेश आडगावकर, यशस्वी सरपोतदार, संजीव चिमलगी, उस्ताद फतेह अली खान. मौमिता मित्रा, पिऊ मुखर्जी, वरदा गोडबोले, कौशिकी चक्रवर्ती, पं. संजीव अभ्यंकर, भाई कमलजीत सिंग, मिता पंडित, उस्ताद बिस्मिल्ला खान-शहनाई, उस्ताद अली अकबर खान-सरोद, पं. रवी शंकर, सतार-सारंगी उस्ताद विलायत खान आणि उस्ताद मुनीर खान. उस्ताद विलायत खान-सुरबहार, पं. शिवकुमार शर्मा-संतूर, पं. हरिप्रसाद चौरसिया-बासरी, पं.निखिल बॅनर्जी, पं.कुशल दास-सतार, कला रामनाथन-व्हायोलिन, अभिषेक लाहिरी-सरोद.
● मराठी 
'रामा रघुनंदना' आशा भोसले. संगीत-दत्ता डावजेकर. 
'जायचे इथून दूर काहूर मनी' गायिका-ज्योत्स्ना मोहिले. नाटक-हे बंध रेशमाचे. 
      बिलासखानी रागावर आधारित एक गीत मी नुकतेच स्वरबद्ध केले आहे.स्पॉटिफाय (spotify) युट्युब (youtube) सह इतर सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर हे गीत उपलब्ध आहे.अलबमचे शीर्षक आहे 'रे मना!

रे मना, तुज काय झाले सांग ना!
का असा छळतो जीवाला सांग ना!

हारण्याचीही मजा घे एकदा
जिंकुनी तुज काय मिळते सांग ना!

हासुनी हसवायचा हा मंत्र घे
दुःख का कुरवळतो तू सांग ना!

सूर लावून गुणगुणावे गीत हे
ते नि तू का वेगळा रे सांग ना!

गीत/संगीत - सुधाकर कदम
गायक - मयूर महाजन
__________________________________________
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी.रविवार दि.२९/१०/२०२३.


 

Tuesday, October 24, 2023

हिंदी चित्रपटातील गझला...


     गझल (ग़ज़ल) हा अरबी भाषेतील स्त्रीलिंगी शब्द आहे.ज्याचा अर्थ 'प्रेयसीशी केलेला वार्तालाप' असा आहे.उर्दू आणि फारसी मधील कवितेच्या एका प्रकारास गझल म्हणतात. एका गझलेत कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त अकरा शेर असतात.सर्व शेर एकाच 'रदीफ़, आणि 'काफ़िया'त असतात.प्रत्येक शेरात स्वतंत्र भाव असून ते एक पूर्ण 'स्टेटमेंट' असते.गझलच्या पहिला शेराला 'मतला' व शेवटच्या शेराला 'मक्ता' म्हणतात.मक्त्यामध्ये शायर स्वतःचे नाव/उपनाव टाकतो.गझल संग्रहास 'दिवान' म्हणतात.

     गझल ही शृंगारपूरक असल्यामुळे काव्य रसिक आणि संगीत प्रेमींच्या व सुफींच्या आवडीची होती.काझी हमीदुद्दीन नागौरीचे कव्वाल महमूदने सुलतान शमसुद्दीन अल्तमश (१२१०-१२३५) याला गझल गाऊन खुश केल्याचा उल्लेख (मुसलमान और भारतीय संगीत) आहे.ग्यासुद्दीन बलबनच्या (१२६५-१२८७) मुलाने शेख बहाउद्दीन जकरियाचा मुलगा शेख कदवा याला निमंत्रित करून त्याच्याकडून अरबी गझला गाऊन घेतल्याचा उल्लेख पण आहे.कैकुबादच्या (१२८७-१२९०) काळात गल्लो-गल्ली गझल गायक उत्पन्न झाले होते.जलालुद्दीन खिलजीच्या काळात अमीर खुसरोने त्याच्या गझलातून सुंदर गायिका व सुंदर तरुणींच्या सौंदर्याचे वर्णन करीत होते.अल्लाउद्दीन खिलजीच्या (१२९६-१३१६) काळात महमूद,मुहम्मद आणि खुदादी हे गझल गायक प्रसिद्ध होते.कुतुबुद्दीन खिलजी (१३१६-१३२०),ग्यासुद्दीन तुगलक (१३२०-१३२५), आणि मुहम्मद तुगलक (१३२५-१३५१) या काळात गझल लोकप्रिय होती.फिरोज तुगलकच्या (१३५१-१३८८) काळात गझलेकडे सन्मानपूर्वक पहिल्या जात होते.

          बहमनी सुलतान मुहम्मद शाह प्रथम याच्या दरबारात खुसरोच्या गझला गाणारे तीनशे गायक होते.ई.स. १५३५ मध्ये बैजू ने हुमायूनला फारसी गझल गाऊन रिझविले होते.अकबराचा अंगरक्षक बैराम खान रामदास या गवैय्याच्या गझल गायन शैलीवर फिदा होता.बैजू व रामदास या शास्त्रीय गायकांचे गझल गायनावरही तेवढेच प्रभुत्व होते.जहांगीरने गझल गायक शौकीला 'आनंद खां' ही उपाधी दिली होती.

          तात्पर्य हे की आज सांगीतिक दृष्टीने गझलकडे तुच्छ रीतीने पहिल्या जात असेल,पण वास्तविक रुपात गझल गाणे एवढेही सरळ नाही.संगीताच्या जाणकार बादशहांनी आणि सुफींनी गझलेचा सदैव सन्मानच केला आहे.गझलांसाठी वापरले जाणारे सर्व छंद भारतीय छंद शास्त्रांतर्गत मान्यता प्राप्त आहेत.तसेच भारतीय रागांची शुद्धता राखून गाणारे गझल गायक विशिष्ट परंपरेत होत आले आहेत. विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांचे सभा पंडित लक्ष्मीनारायण यांनी आपल्या 'संगीत सूर्योदय' या ग्रंथात 'कौल' (कव्वाली) आणि 'गझल'ची चर्चा केली आहे.'कौल'चा अर्थ कथन,कौल गाणार कव्वाल.आणि कव्वालांची गानशैली 'कव्वाली'.कव्वालांच्या गानशैलीत गायिल्या जाणाऱ्या गेय रूपातील गझला म्हणजे कव्वाली.कव्वालीमध्ये तान, पलटा, जमजमा,बोलबांट, सरगम सगळे काही असायचे.प्रसिद्ध ख्यालगायक उस्ताद तानरसखान चांगले कव्वाल होते.म्हणजेच गझल आणि कव्वालीचे आदर्श रूप नेहमीच सन्मानित राहिले आहे.ज्यांची नक्कल हस्सू खान आणि हद्दू खान यांनी केली, ते प्रसिद्ध उस्ताद बडे मुहम्मद खान 'कव्वाल बच्चे' होते. म्हणजेच ग्वाल्हेरची ख्याल गायकी कव्वाल बच्चांच्या गायनाने प्रभावित होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.तरी पण जितका प्राचीन इतिहास शास्त्रीय संगीताच्या विविध शैलींचा आहे तितका गझलचा नाही.स्वातंत्र्य मिळण्या अगोदर गझल लोकप्रिय झाली होती.बराच काळ रसिकांच्या मनोरंजनासाठी कोठयांवर तवायफ गझला गात होत्या.असे जरी असले तरी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या कालखंडात मोठ मोठे गायक गझला गात असल्यामुळे जो मान त्यांना मिळायचा तो मान पुनः मिळावा म्हणून 

आज भारतीय (शास्त्रीय) संगीतकारांनी गझल गायनावर पुनः गंभीर चिंतन करणे आवश्यक आहे,असे मला वाटते. 

      हा झाला गझलचा प्राचीन इतिहास.उर्दू गझल गायकीचा आधुनिक शोध घेताना आपल्याला ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर निघालेल्या  ध्वनीमुद्रिकांचा अभ्यास करावा लागेल.या इतिहासाचा धांडोळा घेताना भारतीय शास्त्रीय संगीतात  उर्दू गझल गायकीचा विकास ठुमरी सोबत झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या  गायक/गायिकांचे गझल गायन हे गायन न वाटता पठण वाटत होते असा उल्लेख अशोक दा रानडे यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते...यातून गायकी अंगाने पुढे जाणाऱ्यांमध्ये गोहरजान,शमशाद, सुंदराबाई आणि त्यावेळच्या इतर गायिका दिसतात.पण खऱ्या अर्थाने गझल गायनाची सर्व यांत्रिक पद्धतीतून मुक्तता होऊन गझल गझलसारखी गाण्याची सुरवात बेगम अख्तर व बरकतअली खान साहेब यांनी केली.

उर्दू गझल गायकी तीन प्रकारांनी आपल्या समोर येते...


१. ठुमरी प्रमाणे - बेगम अख्तर

२. गीतांप्रमाणे - सैगल,मल्लिका पुखराज

३. टप्पा अंगाने - बरकत अली खान

       गझल गायकी लोकप्रिय करण्यात या गायक/गायिकांच्या ध्वनिमुद्रीकांसोबतच चित्रपटांचाही मोठा वाटा आहे.

          गझल गायकी ही शब्द व संगीत श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे.विसाव्या शतकात भावपूर्ण सादरीकरणासोबतच दरबारी,यमन,मल्हार वगैरे  भारदस्त म्हणविल्या जाणाऱ्या रागांमध्ये बंदिशी बनवायला लागले.तसेच काव्य निवडही उत्तम व्हायला लागली.आपापल्या कुवतीप्रमाणे अविर्भाव-तिरोभाव, मूर्च्छना पद्धतीचा वापर करायला लागले.सगळ्याच गझल गायक/गायिकांचा उल्लेख या लेखात करणे अशक्य आहे.कारण प्रत्येक गायक/गायिकेचा आपला एक ढंग आहे.त्यावर लिहायचे तर प्रत्येकावर एक लेख होऊ शकतो.या लेखात अत्यंत लोकप्रिय अशा काही गझल गायकांच्या गायकीची मला दिसलेली वैशिष्ठ्ये थोडक्यात उद्धृत करण्याचा प्रयत्न करतो.

         सर्वप्रथम भारत पाकिस्तानातील जुन्या-नव्या उर्दू गझल गायक/गायिकांची नावे माहिती करून घेऊ.

●मल्लिका पुखराज,उ.अमानत अली खान,अहमद रश्दी,नूरजहां,एम.बी.जॉन,मेहदी हसन,फरीदा खानम,अहमद परवेज,इकबाल बानो,मुन्नी बेगम,हमीद अली खान,हुसैन बख्श,परवेज मेहदी,गुलाम अली,नुसरत फतेह अली, मेहनाज बेगम,नैय्यरा नूर,आबिदा परवीन, असद अमानत अली खान,शफाकत अमानत अली खान,आसिफ मेहदी,सज्जाद अली....पाकिस्तान.

●बेगम अख्तर,तलत महमूद,सैगल,मधुरानी,पंकज उधास, अनुप जलोटा, चंदन दास,जगजित/चित्रा सिंग,भुपेंद्र/मिताली सिंग,राजेंद्र/नीना मेहता, पिनाज मसानी,तलत अजीज,हरिहरन,रुपकुमार राठोड,अहमद,महंमद हुसेन,जसविंदर सिंग...भारत.

(अनवधानाने काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!)

उर्दू गझल गायकीतील सर्वच गायक/गायिकांचे त्यांच्या त्यांच्या परीने मोलाचे योगदान आहे.सगळ्यांवर लिहिणे या एका लेखात शक्य होणार नाही.त्यातल्या त्यात मला भावलेल्या काही जणांच्या गायकीवर थोडे फार भाष्य करण्याचा प्रयत्न करतो.

           माझ्या मते उर्दू गझल गायकीत रागदारीचा उत्कृष्ट उपयोग बेगम अख्तर यांनी केला आहे.त्यांची गझल गायकी ठुमरी,दादरा अंगाने जात होती.पण जव्हारदार मधाळ, मधूनच पत्ती लागणाऱ्या आवाजाने तेव्हाच्या रसिकांना वेड लावले होते.आजही त्यांनी गायिलेल्या गझला लोकप्रिय असून गायिल्या जातात.

             मेहदी हसन यांची गायकी म्हणजे शब्दांना न्याय देत कसे गावे याची पाठशाळाच.... यावर लेखाच्या शेवटी अजून लिहिले आहे.

            फरीदा खानम...शांत,संयत पण ठसठशीत गायकी असलेली गायिका.त्यांच्या "दिल जलाने की बात करते हो","ना रवा ... ","गुलों की बात करो","वो मुझ से हुए" वगैरे गझला ऐकल्यानंतर गायकीची प्रचिती येते.

               गुलाम अली म्हणजे अनवट बंदीशीचा बादशहा.गुलाम अली इतका सरगमचा वापर दुसऱ्या कुणीही केला नाही.शब्दानुरूप वेगवेगळ्या सुरावटींचा वापर आणि कार्यक्रमाचे वेळीची  देहबोली रसिकांकडून दाद घेणारी..."कहाँ आके रुकने थे रास्ते" या गझलमधील "जहां मोड था" येथील 'मोड',"दिल में इक लहर सी उठी हैं अभी" मधील 'हमींग' व 'लहर' या शदावरील वेगवेगळ्या सुरावटी त्यांच्या गझल गायकीचे वेगळेपण सिद्ध करते.त्यांच्या "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" या गझलने जगभरातील रसिकांना वेड लावलेले सगळ्यांनीच पाहिले..

              जगजित सिंग म्हणजे उर्दू गझल गायकीला पडलेले सुरेल स्वप्न आहे.मेहदी हसन प्रमाणेच खर्जयुक्त जव्हारदार  मधाळ आवाज,वाद्यवृंदाचा योग्य वापर,गझलांची निवड यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांनी जगजित-चित्रा जोडीला डोक्यावर घेतले.जगजित सिंग हे उत्कृष्ट 'कंपोजर' असल्यामुळे इतर गायक/गायिकांच्या जोडयांपेक्षा ही जोडी जास्ती लोकप्रिय ठरली.गायक जर उत्कृष्ट संगीतकार असेल तर गाणे नक्कीच उठावदार होते,हे अनेक संगीतकार गायकांच्या गायनावरून लक्षात येते.ह्या साऱ्या वैशिष्ठयांमुळे आपल्या देशात जगजित सिंग इतकी लोकप्रियता  बेगम अख्तर नंतर कुणालाच मिळाली नाही.

       भारतीय चित्रपट संगीताच्या सुरवातीच्या काळापासून तर एकोणविसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत चित्रपटांच्या गाण्यात गझलांची भरमार दिसते.अगदी सुरवातीच्या काळात तर बहुतेक चित्रपटांची पटकथा उर्दूमधेच लिहिल्या गेलेली दिसते.१९५० ते १९८० पर्यंत अतिशय सुंदर गझला चित्रपटांनी दिल्या.नंतरही येत राहिल्या पण एकट-दुकट. त्यातही काही गझला एकदम सुगम संगीताप्रमाणे स्वरसाज चढवून आल्यामुळे अपल्याला ते चित्रपटातील गीत वाटले.जसे:-'संसार से भागे फिरते हो' (चित्रलेखा),'ये हवा ये रात ये चांदनी' (संगदिल),'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' (हम दोनो) वगैरे वगैरे...आणि या उलट काही गीते गझलच्या अंगाने स्वरबद्ध झाल्यामुळे त्या गझला वाटतात.उदा:- 'रंग और नूर की बारात किसे पेश करू' (चित्रपट-गझल),'गुजरे हैं आज इश्क में हम उस मकाम से' (दिल दिया दर्द लिया).

     चित्रपटांच्या निर्मितीचा वेग वाढल्यावर चित्रपटतील संगीत निर्मितीचाही जोर वाढला.त्यात पारंपरिक शास्त्रीय व सुगम संगीत (उप शास्त्रीय) शैलींचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग सुरू झाले.त्यात गझल शैलीची परंपरा प्रकर्षाने दिसून येते.सुरवातीच्या काळात हलक्या फुलक्या स्वरूपात गझला समोर आल्या.कुंदनलाल सहगल, तलत महमूद,मोहम्मद रफी यांच्या सारख्या अनेक गायकांद्वारा चित्रपटात गायिलेल्या गझला लोकप्रिय झाल्या.सांगीतिक दृष्टीने सुद्धा ह्या श्रीमंत रचना होत्या.चित्रपट गीतांमुळे संगीत घरोघरी पोहोचले व लोकप्रिय झाले हे मान्य करावेच लागेल. खोलात जाऊन विचार केला तर शास्त्रीय संगीतापेक्षा चित्रपट गीते व गझल आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे असे दिसते.याला अनेक घटक कारणीभूत आहेत.ठुमरी-दादऱ्याप्रमाणे व एक रागात गझल गाणे असे न राहता गझलच्या अर्थानुसार,स्वभावानुसार बंदिश तयार करणे, विवादी स्वरांनी सजवणे, विविध रागांचे मिश्रण करणे,तसेच काही विशिष्ठ शब्दांना वेगवेगळ्या सुरावटींनी सजवणे,ताल आणि आलापांचा योग्य स्थानावर योग्य प्रयोग अशा विविध बाबींमुळे गझल गायन अधिक प्रगल्भ होत गेले.सध्या तर ऑर्केस्ट्रेशन,ध्वनिमुद्रण याकडे विशेष करून बारकाईने पाहून वेगवेगळे प्रयोग केल्या जात आहे.

● चित्रपटातील गझला...

'हमें तो शाम-ए-ग़म में काटनी है ज़िंदगी' नूरजहां. चित्रपट-जुगनू.(१९४७)

'उठाये जा उनके सितम' लता.चित्रपट-अंदाज़.(१९४९)

'ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल' तलत महमूद.चित्रपट-आरज़ू . (१९५०)

'दुनिया बदल गयी' शमशाद बेग़म.चित्रपट-बाबुल.(१९५०)

'हम दर्द के मारों का इतना ही फ़साना है' तलत महमूद.चित्रपट-दाग़.(१९५२)

'दिल में छुपाके प्यार का तुफान ले चले' रफी.चित्रपट-आन.(१९५२)

'ये हवा ये रात ये चांदनी तेरी इक अदा पे निसार है' तलत महमूद.चित्रपट-संगदिल.(१९५२)

'हैं सब से मधुर वो गीत' तलत महमूद.चित्रपट-पतिता.(१९५३)

'बहारें हम को ढुंढेंगी न जाने हम कहा होंगे' लता.चित्रपट-बाग़ी.(१९५३)

'इश्क़ मुझको नहीं वहशत ही सही' तलत महमूद.चित्रपट-मिर्झा ग़ालिब..(१९५४)

'फिर मुझे दीदा-ए-तर याद आया' तलत महमूद.चित्रपट-मिर्झा ग़ालिब.(१९५४)

'दिले नादां तुझे हुवा क्या है' तलत महमूद.चित्रपट-मिर्झा ग़ालिब.(१९५४)

'नुक्ता ची है ग़मे दिल' सुरैय्या.चित्रपट-मिर्झा ग़ालिब.(१९५४)

'तंग आ चुके हैं कशमकश-ए-ज़िंदगी से हम' रफी.चित्रपट-प्यासा.(१९५७)

'जाना था हमसे दूर बहाने बना लिए' लता.चित्रपट-अदालत.(१९५८)

तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा' रफी.चित्रपट-आखरी दाव.(१९५८)

'युं हसरतों के दाग़' लता. चित्रपट-अदालत.(१९५८)

'उनको ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते' लता. चित्रपट-अदालत.(१९५८)

'ना हंसो हम पे ज़माने के है ठुकराए हूए' चित्रपट-गेट वे ऑफ इंडिया.

'चौदवी का चांद हो या आफ़ताब हो' रफी.चित्रपट-चौदवी का चांद.(१९६०)

'बेकसी हद से जब गुज़र जाये' आशा भोसले.चित्रपट-कल्पना.(१९६०)

'धडकते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम' सुरेय्या.चित्रपट-शमा.(१९६१)

'कभी खुद पे कभी हालात पे रोना आया' रफी.चित्रपट-हम दोनो.(१९६१)

''तेरी ज़ुल्फों से जुदाई तो नहीं मांगी थी' रफी.जब प्यार किसी से होता है.(१९६१)

'दिल ग़म से जल रहा है जले पर धुआं न हो' सुमन कल्याणपूर.चित्रपट-शमा.(१९६१)

'है इसी में प्यार की आबरु' लता.चित्रपट-अनपढ.(१९६२)

'मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया' रफी.चित्रपट-जब प्यार किसी से होता है.(१९६२)

'अब क्या मिसाल दूं मैं तुम्हारे शबाब की' रफी.चित्रपट-आरती.(१९६२)

'ज़िंदगी आज मेरे नाम से शरमाती है' रफी. चित्रपट-सन ऑफ इंडिया.(१९६२)

'जुर्म-ए-उल्फ़त पे हमें लोग सजा देते हैं' लता.

चित्रपट-ताजमहल.(१९६३)

'जरा सुन हसीना ओ नाज़नी' रफी.चित्रपट-कौन अपना कौन पराया.(१९६३)

'ज़ुल्फ की छांव में चेहरे का उजाला लेकर' आशा,रफी. चित्रपट-फिर वो ही दिल लाया हूँ.(१९६३)

'हाले दिल यूं उन्हे सुनाया गया' लता.चित्रपट-जहांआरा.(१९६४)

'वो चुप रहे तो दिल के दाग़ जलते है' लता. जहांआरा.(१९६४)

'इश्क़ की गर्मी-ए-जज़बात किसे पेश करूं' रफी.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'दिल खुश है आज ऊनसे मुलाकात हो गयी' रफी.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'मुझे ये फुल ना दे तुझे दिलबरी की कसम' रफी,सुमन कल्याणपूर.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'अदा क़ातिल नज़र बर्क़-ए-बला' आशा भोसले.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'नग़्मा ओ शेर की सौग़ात किसे पेश करूं' रफी.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)

'संसार से भागे फिरते हो' लता.चित्रपट-चित्रलेखा.(१९६४)

'मुझे दर्दे दिल का पता न था' रफी.चित्रपट-आकाशदीप.(१९६५)

'ये ज़ुल्फ अगर खुल के बिखर जाए तो अच्छा' रफी.चित्रपट-काजल.(१९६५)

'छलके तेरी आंखों से शराब और जियादा' रफी.चित्रपट-आरज़ू.(१९६५)

'बहारों मेरा जीवन भी संवारों' लता.चित्रपट-आखरी खत.(१९६६)

 'न किसी की आंख का नूर हूँ' रफी.चित्रपट-लाल किला.(१९६६)

 'लगता नहीं है दिल मेरा' रफी.चित्रपट-लाल किला.(१९६६)

'भरी दुनिया में आखिर दिल को समझाने कहां जायें' रफी.चित्रपट-दो बदन.(१९६६)

'नसीब में जीसके जो लिखा था' रफी.चित्रपट-दो बदन.(१९६६)

'कोई सागर दिल को बहलाता नहीं' रफी. चित्रपट-दिल दिया दर्द लिया.(१९६६)

गुज़रे हैं आज इश्क़ में हम उस मक़ाम से' रफी.दिल दिया दर्द लिया.(१९६६)

'रहते थे कभी जिनके दिल में' लता.चित्रपट-ममता.(१९६६)

'दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब देंगे' लता.चित्रपट-बहू बेगम.(१९६७)

'मेरी ज़िंदगी के चिराग़ को तेरी बेरुख़ी ने बुझा दिया' लता. चित्रपट-जाल.(१९६७)

'मिले न फूल तो कांटों से दोस्ती कर ली' रफी.चित्रपट-अनोखी रात.(१९६८)

'हर तरफ के जज़बात का एलान है आंखें' रफी.चित्रपट-आंखें.(१९६८)

'वो ज़िंदगी जो थी अब तक तेरी पनाहों में' आशा भोसले.चित्रपट-नील कमल.(१९६८)

'मिलती है ज़िंदगी में मोहब्बत कभी कभी' लता.चित्रपट-आंखें.(१९६८)

'आज सोचा ती आंसू भर आये' लता.चित्रपट-हंसते ज़ख़्म.(१९७०)

'हम है मता-ए-कूचा ओ बाज़ार की तरह' लता.चित्रपट-दस्तक.(१९७०)

उनके ख़याल आये तो आते चले गए' रफी.चित्रपट-लाल पत्थर.(१९७१)

'चलते चलते युं ही कोई मिल गया था' लता.चित्रपट-पाकिज़ा.(१९७२)

'रस्मे उल्फ़त को निभाए तो निभाए कैसे' लता.चित्रपट-दिल की राहें.(१९७३)

'अपनी खुशी से अपना ही दिल तोडना पडा' लता. चित्रपट-कुंवारा बदन.(१९७३)

'हाल क्या है दिलों का न पूछो सनम' किशोर कुमार. चित्रपट-अनोखी अदा.(१९७३)

'संसार की हर शै का इतना ही फ़साना है' महेंद्र कपूर.चित्रपट-धुंद.(१९७३)

'देखा है ज़िंदगी को कुछ इतने करीब से' किशोर कुमार.चित्रपट-एक महल हो सपनो का.(१९७५)

'रुके रुके से क़दम रुक के बार बार चले' लता.चित्रपट-मौसम.(१९७६)

'दूर रहकर न करो बात क़रीब आ जाओ' रफी.चित्रपट-अमानत.(१९७७)

'आंखों में दिल गया अपना' आनंद कुमार.चित्रपट-सांच को आंच नहीं.(१९७९)

'ज़िंदगी में जब तुम्हारे ग़म नहीं थे' अनुराधा पौडवाल, भुपेंद्र सिंग.चित्रपट-दूरीयां.(१९७९)

'पत्थर से शीशा टकरा के' आनंद कुमार.चित्रपट-सावन को आने दो.(१९७९)

'सरकती जाये है नक़ाब आहिस्ता आहिस्ता' लता,किशोर कुमार. चित्रपट-दीदार-ए-यार.(१९८०)

'ज़िंदगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें' आशा भोसले. उमराव जान.(१९८१)

'इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं' आशा भोसले. उमराव जान.(१९८१)

'माना तेरी नजर में तेरा प्यार हम नहीं' सुलक्षणा पंडित.चित्रपट-आहिस्ता आहिस्ता.(१९८१)

'दिल चीज़ क्या है आप मेरी जान लिजीए' आशा भोसले. उमराव जान.(१९८१)

'चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है' गुलाम अली.चित्रपट-निकाह.(१९८२)

'दिखाई दिये यूं के बेख़ुद किया' लता.चित्रपट-बाजार.(१९८२)

'दिल के अरमां आंसुओं में बह गए' सलमा आगा..चित्रपट-निकाह.(१९८२)

'तुमको देखा तो ये ख़याल आया' जगजीत सिंग.चित्रपट-साथ साथ.(१९८२)

'तू नहीं तो ज़िंदगी में और क्या रह जायेगा' जगजीत,चित्रा. चित्रपट-अर्थ.(१९८२)

'झुकी झुकी सी नज़र बेक़रार है के नहीं' जगजीत सिंग.चित्रपट-अर्थ.(१९८२)

'दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है' लता.चित्रपट-आखिर क्यों.(१९८५)

'किसी नज़र को तेरा इंतजार आज भी है' आशा भोसले,भुपेंद्र सिंग.चित्रपट-ऐतबार.(१९८५)

'तेरे प्यार की तमन्ना, ग़म-ए-जिंदगी के साये' महेंद्र कपूर.चित्रपट-तवायफ.(१९८५)

'तुम्हारी नज़रों में हमने देखा अजब सी चाहत झलक रही है' आशा भोसले,कुमार शानू. चित्रपट-कल की आवाज.(१९९२)

'किसी ने भी तो ना देखा निगाह भर के मुझे' पंकज उधास.चित्रपट-दिल आशना है.(१९९२)

'होश वालों को खबर क्या' जगजीत सिंग.चित्रपट-सरफ़रोश.(१९९९)

-सुधाकर कदम

गझलकार ब्लॉगवरील 'सीमोल्लंघन' विशेषांकामधून साभार...

https://gazalakar23.blogspot.com/?m=0&fbclid=IwAR3JsO3WsFyOddiinFPUWA7V2WWnWmJeVNs0FFR4Eg3_C5oA_Pqr9i7gA9Y





संगीत आणि साहित्य :