गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, June 10, 2023

मराठी गझल...मज सांग...

  • ज्येष्ठ गझलकारा ज्योती बालिगा यांची खालील गझल भैरवी रागात स्वरबद्ध झाली असून, यात शुद्ध गांधार, शुद्ध धैवत आणि शुद्ध निषादाचा वापर करून बंदिश रंजक व शब्दांना न्याय देणारी करण्याचा प्रयत्न केला आहे.मतला दिपचंदी तालात व शेर रूपक तालात निबद्ध असलेल्या या गझलची सुरवातच कोमल धैवतासोबत शुद्ध गांधार घेऊन होते.दुसऱ्या मिसऱ्यात एकाच स्वरांची कोमल व तीव्र रूपे एकामागे एक आल्यामुळे (माझ्या मते) ऐकायला सोपी व गायला कठीण असलेली ही रचना प्राजक्ता सावरकर शिंदेंनी अतिशय समर्थपणे पेलून अगदी सुरेल आणि हळुवारपणे गायिली आहे.    
  •  सादर आहे ..
मज सांग आज तुझ्याकडे उमलून मी येऊ कशी
भवतालच्या नजरास या चुकवून मी येऊ कशी

कुठल्या घराचा उंबरा खिळवून मजला ठेवतो
तुझिया करी उल्केपरी निखळून मी येऊ क

आली अचानक कोठुनी ही शीळ चंदेरी तुझी
माझ्या मनाच्या पायऱ्या उतरून येऊ कशी

माझ्याच श्वासांचा उभा आहे पहारा भोवती
आयुष्य हे की पिंजरा निसटून मी येऊ कशी


 

Saturday, June 3, 2023

राग मारवा...



हुरहुरणारा सांज सावळा आर्त असा मारवा...
अंतरआत्मा ढवळुन काढी स्वर गहिरा कारवा'
-सुधाकर कदम

     शास्त्रीय संगीत गाणाऱ्या/वाजविणाऱ्या कलाकारांचा हा आवडता राग आहे.पण सुगम संगीत व चित्रपट संगीतामध्ये या रागाचा वापर फार कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येते.गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेताना हुरहुर लावणार्‍या मारवा रागाची तोंड ओळख संगीत विद्यालयात झाली होती.पण खरा मारवा कळायला नंतर बराच काळ जावा लागला. मारव्याच्या स्वरातील हुरहुर ऐन तारुण्यात असताना हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेल्या अरूण दाते यांच्या आवाजातील ’स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या शंकर वैद्य यांच्या भावगीताने करून दिली.स्वरगंगेमधील ’वचन दिले तू मला’ यातील ’मला’ या शब्दावर लागलेला तार सप्तकातील कोमल रिषभ,पुढे 'ओळखले का मला' यातील षड्ज सोडून इतर स्वरांशी खेळत षड्जावर स्थिरावणार 'मला', जन्म जन्मांतरीच्या ओढीची वेगळीच अनुभूती  देऊन गेला.सोबतच ’सुमन कल्याणपुर यांनी गायिलेले मंगेश पाडगावकरांचे ’शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’ पण कानात रुंजी घालत होते.संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी अंतऱ्यामध्ये विविध सुरावटींचा वापर करून वेगळाच आयाम दिला.अमरावतीचे मित्र राजेंद्र सगणे यांचेकडे ही (78 ची तबकडी) रेकॉर्ड होती.त्यांच्या लग्नानिमित्त तीन दिवसांच्या मुक्कामात ती इतक्यांदा ऐकली की, खराब होऊ नये म्हणून घरच्यांनी आमच्यावर बंदी घातली.
     मग पुन्हा मारव्याची आळवणी नव्याने सुरू केली.या दरम्यान माझ्या गुरुजींचे गुरूजी आदरणीय छोटा गंधर्व यवतमाळला आलेत.झाडीपट्टीत त्यांचा कार्यक्रम होता.नागपुरवरून पुढे जायचे होते.जाता जाता गुरूजींकडे (यवतमाळ) मुक्कामी आलेत...(तसे ते नेहमीच यायचे) मला कळल्याबरोबर मी आर्णीहून यवतमाळला पोहोचलो.कारण मला माहित नाही पण ऋषीतुल्य छोटा गंधर्वांचा माझ्यावर खूप जीव होता.विदर्भातील बहुतेक कार्यक्रमात हार्मोनियमच्या साथीला ते मला न्यायचे.तसेच ते इकडेही मला सोबत घेऊन गेले.कार्यक्रमाच्या अगोदर तानपुरा लावून त्यांचा स्वरांशी लडिवाळ खेळ सुरू होता.छोटा गंधर्व,तानपुरा,हार्मोनियम आणि मी....अशातच माझ्या डोक्यात मारव्याचा किडा वळवळायला लागला...आणि हिया करून विषय काढलाच.त्यांनी अतिशय बाळबोध प्रकाराने "स्वत:चे घर नसून मजेत राहणारा माणूस म्हणजे मारवा",असे सांगून षड्जाचा कमीत कमी प्रयोग करून मारवा कसा गावा हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले.हे सांगत असताना मुर्छना पद्धतीने यात भूप,मालकौंस,दुर्गा या रागांच्या छटा पण अतिशय सोप्या पद्धतीने दाखविल्या.तो सर्व सोहळा अजूनही माझ्या डोक्यात अगदी ताजा आहे.
       सूर्यास्ताचे वेळी गायिल्या जाणारा हा राग आपले अपुरेपण सतत दाखवित राहतो.तरी पण मारव्याची ओढ का लागते ते कळत नाही.यात पंचम स्वर नाही.षड्ज खूपच कमी.दोन्ही स्थीर स्वरांनी दुरावा ठेवल्यामुळे तर मारवा हळवा वाटत नसेल ना? तसा विचार केला तर हीच सुरावट असूनही पुरीया व सोहोनी वेगळे वाटतात.पण मारवा मात्र हळवाच वाटतो.याचे मुख्य कारण म्हणजे षड्ज जो येतो तो खंबीरपणे न येता कोमल रिषभाच्या संगतीने येतो.कदाचित त्यामुळेच हळवा वाटत असावा.हा राग  म्हणजे ऐकवत नाही व ऐकल्याशिवाय राहावत नाही असा आहे.
     कवी लोकांनाही 'मारवा' नावाचे फार आकर्षण आहे.कुणाच्या काव्यसंग्रहाचे शीर्षक तर कुणाच्या कवितेत वेगवेगळे संदर्भ घेऊन हा शब्द वापरल्याचे अनेकदा दिसून येते.तसेच मारवा हे एका सुगंधी वनस्पतीचे पण नाव आहे.अल मारवा शहरात मक्केजवळ ही वनस्पती सापडते.
      मारवा हा स्वतःचे घर नसलेल्या माणसा सारखा आहे.कोमल रिषभ व शुद्ध धैवतात खेळणारा मारवा षड्जावर लवकर विसावत नाही.याला मराठीने जेवढा आधार दिला तेवढा हिंदी चित्रपटसृष्टीने दिला नाही,असे आजवरच्या माझ्या ऐकण्यावरून वाटते.एक 'पायलिया बावरी' हे खुमार बाराबंकवी यांनी लिहिलेले 'साज और आवाज' या चित्रपटातील नौशाद यांनी स्वरबद्ध केलेले व लता मंगेशकरांनी गायिलेले गाणे मारवा रागात आहे.बाकी मारवा रागावर आधारित असेच म्हणावे लागेल.'कान्हा रे कान्हा' चित्रपट -टॅक्सी ड्रायव्हर. 'सांज ढले गगन तले' चित्रपट-उत्सव. 'माई री मै का से कहूँ अपने जिया की' चित्रपट-दस्तक. 'मेरा परदेसी ना आया' चित्रपट-मेरे हमसफर. 'सगरे जगत का इक रखवाला' चित्रपट-नास्तिक.'सांझ भई घर आ जा रे पिया' गायिका-लता. 'साथी रे भूल न जाना मेरा प्यार' चित्रपट-कोतवाल साब. 'तुमने क्या क्या किया है हमारे लिए' चित्रपट-प्रेमगीत. '
'एरी सखी मैं अंग अंग आज रंग डार दू' वेबसिरीज 'बँडेड'च्या शेवटच्या इपिसोडमधील भजन.
उर्दू गझल...
'शाम के सांवले चेहरे को निखारा जाये' - हुसैन बक्श.
'गर्मिये हसरते नाकाम से जल जाते है' - मेहदी हसन.
'तमाम उम्र तेरा इंतजार हमने किया' -गुलाम अली.
'जब से उसने शहर को छोडा' - राजकुमार रिझवी.
'अक्सर दिल में दर्द उठा है रात के पिछले पहरों में' -हमीद अली खान
'मेरा मुझ में किछ नहीं जो कुछ है जो तेरा' -भाई बालविसिंग...(कीर्तन सेवा)
'गाईये गणपती जग वंदन' -रत्नेश दुबे
कव्वाली 'अल्ला मोहम्मद चार यार' नुसरत फतेह अली.

'मावळत्या दिनकरा' -लता मंगेशक. 'हे करुणाकरा ईश्वरा कृपादान मज दे' - रामदास कामत.'रसिका मी कैसे गाऊ गीत' - अनुराधा पौडवाल.
     १९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रामध्ये अकॉर्डिअन व मेंडोलिन वादन, नंतर गझल गायनाचे कार्यक्रम,सततचा प्रवास,जागरण, वेळी-अवेळी खाणे,अतिरिक्त रियाज यामुळे १९९५ नंतर 'व्होकल कॉर्ड्स'चा त्रास सुरू झाल्यामुळे डॉक्टरांनी माझे गझल गायनाचे जाहीर कार्यक्रम बंद करण्यास सांगितले.१९९५ नंतर मी फक्त संगीत दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले.ते आजतागायत सुरू आहे.सध्या माझ्या स्वररचनांवर आधारित मराठी गीत-गझलांचा कार्यक्रम 'सरगम तुझ्याचसाठी' या शिर्षकांतर्गत पंडित जितेंद्र अभिषेकीचे शागिर्द पंडित मोहनजी दरेकर यांचा शिष्य मयूर महाजन करतो आहे.माझ्या संगीत दिगदर्शनाखाली सुरेश वाडकर,पंडित शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे,वैशाली माडे,दिनेश अर्जुना,संगीतकार यशवंत देवांची शिष्या रसिका जानोरकर,अविनाश जोशी,वैशाली पुल्लीवार,भैरवी-रेणू कदम,भाविक राठोड,उत्कर्षा शहाणे,आदित्य फडके,प्रशांत कदम,गायत्री गायकवाड गुल्हाने,प्राजक्ता सावरकर शिंदे,कल्पिता उपासनी वगैरे प्रतिथयश व नवोदित गायक/गायिका गायिले आहेत,गात आहेत.
       सुरेश भटांच्या हयातीतच त्यांची 'जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही' ही गझल मारवा रागात स्वरबद्ध झाली होती.'शब्दानुरूप बंदिश कशी असावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही गझल होय' असे ते म्हणायचे.दुसरी गझल ज्येष्ठ गझलकारा ज्योती बालिगा राव यांची 'शेवटी हे दुःख माझे लागले उमलायला' ही काही महिन्यांपूर्वी कल्पिता उपासनी या नवोदित गायिकेच्या आवाजात ध्वनिमुद्रीत केली.कल्पिता खूप छान गायिली.या दोन्ही गझलात छोटा गंधर्वांनी सांगितल्या प्रमाणे वरील रागांच्या थोड्या फार छटा आपणास दिसतील.ही त्यांची देण आहे.'जगत मी' मधील  दुसर्‍या ओळीतील ’तुटलो’ या शब्दासाठी वापरलेला कोमल मध्यम आणि त्यासोबत येणारी भूपेश्वरी व भिन्नषड्ज रागाची सुरावट आपणास ’तुटण्याची’ अनुभूती निश्चित देईल.इतकेच नव्हे तर ’जुळलोच नाही’ यासाठी वापरलेल्या कोमल धैवता सोबतची सुरावट ’न जुळण्याचा’ आभास निर्माण करते...ह्या दोन्ही गझला माझ्या 'गीत-गझलरंग' या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत.
     https://youtu.be/sVWmZQ1hNIM
     'शेवटी हे दुःख माझे लागले उमलायला'
    
     ऐका तर सुरेश भटांची आवडती स्वररचना व माझी आवडती गझल...जगत मी आलो.
https://youtu.be/OFc4d99SCyY

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

गायक - मयूर महाजन
गझल - सुरेश भट
संगीत - सुधाकर कदम
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,रविवार दि.४ जून २०२३


 

Saturday, May 20, 2023

राग बागेश्री...



    सखी मन लागे ना'...एकदम संगीत विद्यालयातील विद्यार्थी दशेतील 'ते' दिवस आठवले.हा बागेश्रीतील मोठा ख्याल व 'कौन गत भई' छोटा ख्याल इतकेच...त्या वेळी ख्यालातील शब्दांचा अर्थ कळण्याचे दिवस नव्हते.अर्थ समजावून सांगण्याची गरज वाटणारे शिक्षकही नव्हते.आणि समजा समजावून सांगितला तरी तो कळण्याचे वय पण नव्हते. दुसऱ्या परीक्षेला बसणाऱ्या कुमार वयातील मुलाला 'सखी मन लागे ना' कसे कळणार?
    जेव्हा संगीतकार म्हणून मी काम करायला लागलो तेव्हा मला बागेश्री रागाचा आवाका कळला. मला बागेश्री राग एखाद्या एकत्र कुटुंबातील आबालवृद्धांचे लाड पुरविणाऱ्या कुटुंब प्रमुखासारखा वाटतो.पाण्याचे जसे आहे ना? 'जिस मे मिलाओ वैसा',तसे बागेश्री रागाचे आहे.कोणत्याही 'रसा'तील गाणे असो वा शास्त्रीय संगीतातील गायक/वादक असो. तो त्यांच्याशी एकरूप होणारच.ज्यांचा जसा वकूब असेल तसा बागेश्री आपल्या समोर येतो.किशोरी आमोणकरांचा बागेश्री व्याकुळ करतो.अमीर खां साहेबांचा बागेश्री गंभीर वाटतो.बडे गुलाम अली खां साहेबांचा बागेश्रीमधील तराणा खासच आहे.मध्य/द्रुत लयीतील सरगम ऐकणीय आहे.पंडित जसराजांचा बागेश्री सरगमसह केलेल्या स्वरांच्या भरावामुळे अगदी वेगळा भासतो.कौशिकीने गायिलेला बागेश्री लडिवाळ वाटतो.उस्ताद राशीद खान यांचा बागेश्री घरंदाज वाटतो. पंडित व्यंकटेश कुमारांच्या बागेश्रीत आळवणी दिसून येते.जावेद बशीरने गायिलेल्या बागेश्रीत विनवणी दिसते. कुमार गंधर्वांचा बागेश्री श्रोत्यांना झुलवत ठेवतो.अश्विनी भिडे,वीणा सहस्रबुद्धे,ऋजुल पाठक,गणपती भट,मंजुषा पाटील,पंडित राजन-साजन मिश्र,ओंकार दादरकर,विलियम डे,फरीद हसन-मोहम्मद अमन (जुगलबंदी), विघ्नेश ईश्वर (कर्नाटक),एम.डी. राजनाथन (कर्नाटक) या प्रत्येकाने गायिलेला बागेश्री वेगवेगळी अनुभूती देतो.
    
    पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीतून निघणारे बागेश्रीचे स्वर आर्त वाटतात.पंडित रविशंकर आणि उस्ताद अल्लारखां यांची धमार तालातील बागेश्रीची जुगलबंदी,उस्ताद राशीद खान (सितार), डॉ.एम.राजन (व्हायोलिन),एम.कार्तिकेयन (नागस्वरम) ,रामन बालचंद्रन (वीणा), राकेश चौरसिया (बासरी),  उस्ताद विलायत खान (सितार),अभिषेक बोरकर (सरोद),पुर्बयान चॅटर्जी (सितार) अत्यंत श्रवणीय आहे.मला वाटते बहुतेक गायक/वादकांनी कधी ना कधी बागेश्री राग गायीला/वाजविला असेलच.
    हा राग काफी थाटातून उत्पन्न झाला असून यात गांधार व निषाद स्वर कोमल व बाकी स्वर शुद्ध आहेत.वादी मध्यम,संवादी षड्ज.आरोहात रिषभ पंचम वर्ज असल्यामुळे जाती औडव-संपूर्ण आहे.रात्री गायिल्या जाणाऱ्या भावपूर्ण रागात याची गणना होते.
    ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीत गायक/वादकात हा राग प्रिय आहे.त्यापेक्षाही चित्रपट व सुगम संगीतामध्ये संगीतकारांचा आवडता आहे हे खालील उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल.पण ज्या प्रकारे नियमानुसार राग शुद्धता शास्त्रीय संगीतामधील गायक/वादक पाळतात तशी शुद्धता काही अपवाद वगळल्यास इतर गायन शैलीत पाळल्या जात नाही.
    ●हिंदी ...
    'कैसे कटे रजनी',बंगाली चित्रपट 'शुदिस्ता पाशन' गायक अमीर खान.'चाह बरबाद करेगा' चित्रपट-शाहजहान.'जाग दर्दे इश्क जाग' चित्रपट-अनारकली.'फिर वोही शाम' चित्रपट-जहाँआरा.'हम से आया न गया' चित्रपट-देख कबीर रोया. 'आजा रे परदेसी',घडी घडी मोरा दिल धडके' चित्रपट-मधुमती.'राधा ना बोले ना बोले ना बोले रे' चित्रपट-आझाद.'दूर रहकर न करो बात करीब आ जाओ' चित्रपट-अमानत.'आओ आओ नंद के लाला' चित्रपट-रंगोली.'बेदर्दी दगाबाज' चित्रपट-ब्लफ मास्टर.'माई री मैं का से कहूँ'(बागेश्री/मालगुंजी)चित्रपट-दस्तक.'सांवली सलोनी तेरी झील सी आंखे' चित्रपट-हम सब चोर है.'अब घर आ जा' चित्रपट-हासिल.'मेरा चांद मुझे आया है नजर' चित्रपट-ये है मुंबई मेरी जान.'ऐसा क्यूँ होता है' चित्रपट-इश्क विश्क.'कहना ही क्या' चित्रपट-बॉंबे.'चाहतों का सिलसिला' चित्रपट-शब्द.'भरे नैन' चित्रपट-रा.वन.'फिर छिडी रात बात फूलों की' चित्रपट-बरसात १९८२.'सीने मे जलन' चित्रपट-गमन.
    ●उर्दू गझल...
    'कैसे कैसे लोग हमारे दिल को जलाने आ जाते है','दिल की बात लबों पर लाकर अब तक हम दुख सहते है','एक नये मोड पे ले आये है हालात मुझे'-मेहदी हसन.'चमन में रंगे बहार उतरा','दर्दे दिल दर्दे आशना जने'-गुलाम अली,'तुम नहीं गम नहीं शराब नहीं','अब कोई बात भी मेरी'-जगजीत सिंह.
    ●मराठी...
    'केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर','रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले'-सुमन कल्याणपूर.'ओळखिले मी तुला','कंठातच रुतल्या ताना','जय शारदे वागेश्वरी','नाम घेता तुझे गोविंद',वनवास हा सुखाचा','तरुण आहे रात्र अजुनी'-आशा भोसले.'घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा'-लता मंगेशकर.'पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी'-पं. जितेंद्र अभिषेकी.'माझा भाव तुझे चरणी'-पं. भीमसेन जोशी.
    ●नाट्यगीते...
    'प्रेम नच जाई','आता रंग देई मना','प्रियकर वश मजला'-बाल गंधर्व.'बहुत दिन नच भेटलो सुंदरीला'-छोटा गंधर्व.'धवल लौकिका'-प्रभाकर कारेकर.'घुमत ध्वनी का हा'-शरद जांभेकर.

     मी नुकतेच माझे एक गीत बागेश्रीमध्ये स्वरबद्ध केले.माझा एक जिवलग मित्र कोविड काळात निघून गेला तेव्हा सुचलेली ही रचना मयूर महाजन या युवा गायकाने गायिली आहे. युट्युबच्या 'गीत-गझलरंग' या चॅनलवर आपण ही रचना ऐकू शकता.शब्द आहेत...

कशी वेदना विसरायची...सांग मला तू
कशा सावरू अश्रू धारा...सांग मला तू

आनंदाचे सोंग करावे लागत नाही
या दुःखाचे काय करावे...सांग मला तू

गुन्हा असा की अजाणता मन गुंतत गेले
कसे सोडवू या गुंत्याला...सांग मला तू

काळोखाच्या दरीत मन हे घुसमटलेले
कसा दूर अंधार करावा...सांग मला तू
   
किती अनोखे असे बंध हे शतजन्माचे
का सलतो हा रोज दुरावा...सांग मला तू
  
 "कशी वेदना..." युट्युब लिंक...
https://youtu.be/IF-nDzQssEg


 

वेदनेचा सूर...नवीन अलबम लवकरच रसिकांच्या सेवेत...


 

Sunday, May 14, 2023

दरबारी कानडा



     दरबारी कानडा हा राग नायकी,शहाणा,सुघराई, सुहा, कौशी,अभोगी,हुसेनी या कानडा प्रकारातीलच एक राग आहे.प्राचीन राजदरबारात हा प्रकार जास्ती गायिल्या गेल्यामुळे ह्याला दरबारी कानडा म्हणत असावे.प्राचीन ग्रंथात दरबारी कानडा या रागाचा उल्लेख सापडत नाही.याचा उल्लेख मध्यकालीन म्हणजे मोगल काळातील साहित्यामध्ये सापडतो.आजची प्रचलित संगीत पद्धती व प्राचीन संगीत पद्धतीमध्ये बराच फरक आहे.या फरकाचे थोडे -फार आकलन भरत मुनींचे 'नाट्यशास्त्र', मतंग मुनींचे 'बृहद्देशी', पंडित शारंगदेवांचे 'संगीत रत्नाकर' या प्राचीन ग्रंथांमधून होते.
     उत्तर भारतावर जस-जशी परकीय आक्रमणे होत गेली.तस-तसा मूळ भारतीय संगीतावरही ज्या ज्या विभागातून आक्रमणकारी येत गेले त्या त्या विभातील संगीताचा थोडा-फार परिणाम होत गेला.मात्र सगळ्यात जास्ती परिणाम  'खिलजी'च्या कालखंडात भारतात आलेल्या कवी/संगीततज्ज्ञ अमीर खुसरो (जन्म १२५३,मृत्यू १३२५) यांच्यामुळे झाला.उत्तर भारतीय संगीतामधील त्यांचे योगदान खूप महत्वाचे मानले जाते.खुसरो हे पहिले मुस्लिम कवी होते,ज्यांनी त्यांच्या काव्यात हिंदी शब्दांचा मोकळेपणे वापर केला.भारतीय भाषेसाठी 'हिंदवी' हा शब्द सर्वप्रथम त्यांनी वापरला.हिंदवी व फारसी भाषा एकत्र घेऊन केलेल्या कवितांमुळे त्यांना 'खडी बोली'च्या अविष्काराचे श्रेय दिल्या जाते.संपूर्ण आयुष्य राजाश्रयात घालविणाऱ्या खुसरोंनी साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातही भरीव योगदान दिले.भारतीय आणि इराणी रागांचे सुंदर मिश्रण करून 'ज़िल्फ़' (झिलफ),'साजगिरी' वगैरे रागांना जन्म दिला.तसेच 'कव्वाली' (सुफी भक्ती गायन शैली), 'सतार', 'तबला' ही त्यांचीच देण मानतात.आजही गायिल्या जात असलेली खुसरोची लोकप्रिय गीते खाली देत आहे.
     
१) ऐ री सखी मोरे पिया घर आए
२) परदेसी बालम धन अकेली मेरा बिदेसी घर आवना 
३) मेरे महबूब के घर रंग है री 
४) छाप तिलक सब छीन्हीं रे 
५) बहुत कठिन है डगर पनघट की
६) आ घिर आई दई मारी घटा कारी
७) ज़िहाल-ए मिस्कीं मकुन तगाफ़ुल
८) दैया री मोहे भिजोया री शाह निजम के रंग में
९) सकल बन फूल रही सरसों 
१०)तोरी सूरत के बलिहारी, निजाम
११)अम्मा मेरे बाबा को भेजो री 
१२)बहोत रही बाबुल घर दुल्हन 
१३)दुसुख़ने
१४)जब यार देखा नैन भर
१५)मोरा जोबना नवेलरा भयो है गुलाल
१६)ढकोसले या अनमेलियाँ 
१७)जो पिया आवन कह गए अजहुँ न आए 
१८)बहुत दिन बीते पिया को देखे 
१९)काहे को ब्याहे बिदेस 
२०)हजरत ख्वाजा संग खेलिए धमाल 
२१)जो मैं जानती बिसरत हैं सैय्या 

    या कालखंडानंतर मुख्यपणे विचार करावा लागतो तो ग्वाल्हेरचे राजा मानसिंह तोमर यांच्या काळाचा.१४८६ ते १५१५ हा तो काळ. राजा मानसिंह स्वतः एक साहित्यिक व संगीततज्ञ होते.त्यांनी अनेक दोहे,चौपाया, कवितांसोबत अनेक छंदांची रचना केली.'मान कौतूहल' नामक ग्रंथामध्ये तत्कालीन धृपदांचा संग्रह केला.या 'मान कौतुहल'चे फारसी भाषांतर फकीरुल्ला सैफ खाँ यांनी केले. मानसिंगांची पत्नी मृगनयनी ही सुद्धा संगीत प्रेमी व संगीताची जाणकार होती.(मी स्वतः गुजरी महालाला भेट दिली तेव्हा त्यांचा संगीत कक्ष पाहिला.)मानसिंहांच्या दरबारात त्या काळातील प्रसिद्ध साहित्यिक व संगीतकार बक्शू, महमूद लोहंग, नायक पांडे, देवचंद्र, रतनरंग, माणिक कवी, गोविंदास, नाभादास, हरिदास,कर्ण,गोपाल नायक,भगवंत,रामदास वगैरे वगैरे.'भक्तमाल' नावाचा ग्रंथही याच काळात लिहिल्या गेला. त्यांनी सावंती,लीलावती,षाडव,
मानशाही,कल्याण आदी रागांमध्ये गीत रचना केल्या.अगदी सुरवातीच्या काळात तानसेन व बैजू बावरा यांचे दरबारी गायक असल्याची नोंद आहे.यानंतर काही काळ मियाँ तानसेन  रेवा संस्थानचे दरबारी गायक होते.त्यानंतर ते अकबराचे दरबारी गायक बनले.मियाँ तानसेन संगीत सम्राट होते.त्यांनी अनेक धृपदांची निर्मिती करून त्यात रागांची विशेषता सांगितली आहे.संगीताचे पारिभाषिक शब्द जसे:-ग्राम,श्रुती,मूर्च्छना,सप्तक,स्वरअसे सांगीतिक शब्द घेऊन "सप्त सूर तीन ग्राम" अशा रचना केल्या.सतत राजदरबारात गायिल्या गेलेल्या या कानडा प्रकाराला दरबारी कानडा हे नाव पडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा राग जितका राजे-रजवाड्यांना आवडायचा तितकाच सर्वसामान्यांनासुद्धा आवडायचा,अजूनही आवडतो.

     थोडे विषयांतर झाले,पण हा इतिहास सांगणेही गरजेचे होते...कारण दरबारी राग मियाँ तानसेनाने लोकप्रिय केला असे म्हटल्या जाते म्हणून. असो! तर आपण पुन्हा येऊ या दरबारी कानडा या रागावर...
प्राचीन काळी 'कर्णाट' नामक राग प्रचलित होता.त्याचाच अपभ्रंश कानडा, कान्हडा झाला असे पंडित भावभट्ट म्हणतात.१५५० च्या राजस्थानी चित्रकलेतही याचा उल्लेख असल्याचेही कळते. तोच धागा पकडून पंडित भातखंडे यांनीही एका श्लोकात तसा उल्लेख केला आहे...
     
     "अपभ्रंशस्तु कर्णाटशब्दस्य कानडा जने /
      दरबारीति यवनैर्गीतावाद्राजसंसदि...//"

(याची उत्पत्ती कर्नाटक संगीतामधून झाल्याचाही एक प्रवाद आहे.कर्नाटकातील 'यक्षगान' राजनृत्यात राग 'कणाद' म्हटल्या जातो.त्यावरून कानडा शब्द आल्याचे सांगितल्या जाते.)

    तर असा हा दरबारी राग आसावरी थाटातून उत्पन्न झाला असून यात गांधार,धैवत,निषाद हे स्वर कोमल व बाकी स्वर शुद्ध आहेत.हा राग मध्यरात्री गायिल्या जातो.
    
    "ऋषभ: सम्मतो वादी, संवादी पंचम मत: /
     गानं सुनिश्चितं चास्य तृतीय प्रहरे निशि...//"
                                       -पंडित भातखंडे
                                    
अवरोह वक्र असून कोमल गांधार व कोमल धैवतावरील आंदोलने हे दरबारीचे खास वैशिष्ठय आहे.हा तसा 'अडाणा' व 'जौनपुरी' या रागांना जवळचा आहे.बहुतेक शास्त्रीय गायक/वादकांनी गायिलेल्या,वाजविलेल्या दरबारी कानडा या रागाची लोकप्रियता पाहून , हा कानडा प्रकाराचा राजा आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.उस्ताद अमीर खान,पंडित जसराज,पंडित भीमसेन जोशी यांनी गायिलेला दरबारी मला विशेषकरून आवडलेला आहे.गंभीर प्रकृती असलेला हा राग आपणास ऐकताना वेगळ्याच विश्वात घेऊन जातो.हा राग जितका शास्त्रीय गायक/वादकांमध्ये प्रिय आहे तितकाच चित्रपटातील संगीतकारांचा व गझल गायकांचाही प्रिय आहे.हे खालील उदाहरणांवरून लक्षात येईल.
     'हम तुम से मोहब्बत कर के सनम रोते ही रहे'...मुकेश. चित्रपट-आवारा, 'दिल जलता है तो जलने दे'...मुकेश. चित्रपट-पहली नजर, 'तोरा मन दरपन कहलाए'...आशा भोसले, चित्रपट-आशा.'ओ दुनिया के रखवाले'...रफी,चित्रपट-बैजू बावरा.'मैं निगाहे तेरे चेहरे से हटाऊ कैसे'...रफी,चित्रपट-आप की परछाईयां.'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है'...चित्रपट-शहीद.'तू प्यार का सागर है'...रफी,चित्रपट-सीमा.'कोई मतवाला आया मेरे द्वारे'...लता,चित्रपट-लव्ह इन टोकियो.'मुझे तुम से कुछ भी न चाहिए'...मुकेश,चित्रपट-कन्हैय्या.'याद में 'तेरी जाग जाग के हम'...रफी-लता,चित्रपट-मेरे मेहबूब.'टूटे हुए ख्वाबों ने'...रफी,चित्रपट-मधुमती.'उड जा भंवर माया कमल'...मन्ना डे, चित्रपट-रानी रुपमती.'झनक झनक तोरी बाजे पायलिया'...मन्ना डे, चित्रपट-मेरे हुजूर.'मोहब्बत की झुटी कहानी पे रोए'...लता,चित्रपट-मुगले आजम.'गुजरे है आज इश्क मे हम उस मकाम से'...रफी,चित्रपट-दिल दिया दर्द लिया.'तेरी दुनिया मे दिल लगता नहीं'...मुकेश,चित्रपट-बावरे नैन.'अब कहां जाए हम'...मन्ना डे, चित्रपट-उजाला.'रहा गर्दीशों मे हरदम'...रफी,चित्रपट-दो बदन.'अगर मुझसे मोहब्बत है'...लता, चित्रपट-आपकी परछाईयां.'है इसी मे प्यार की आबरु'...लता,चित्रपट-अनपढ.'बहुत प्यार करते है तुमसे सनम'...अनुराधा पौडवाल, चित्रपट-साजन.
     काही हास्यरसाची गाणी पण दरबारीमध्ये आहेत...
     'प्यार की आग मे तन बदन जल गया'...'लपक झपक तू आ रे बदरवा'...मन्ना डे, चित्रपट-जिद्दी.
     
     काही उर्दू गझला...
'मेरे हमनफस मेरे हमनवा'...बेगम अख्तर.
'कू-ब-कू फैल गयी बात शनासाई सी'...मेहदी हसन.'चोरी कहीं खुले ना नसीमे बहार की'...मुख्तर बेगम.'दिले मुझतरीब को समझाया बहोत'...फरीदा खानम.'हंगामा है क्यो बरपा'...'मैं नजर से पी रहा हूँ'...गुलाम अली.'चाहत मे किया दुनियादारी'...गुलबहार बानो.'कुछ होश भी है दस्ते जुनू देख क्या हुवा'...जगजीत सिंह.

     मराठीत त्या मानाने गाणी नसल्यातच जमा आहे.'दिनरात तुला मी किती स्मरू'...(भावगीत) सुमन कल्याणपूर.'तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा'...हे लताने गायिलेले व दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेले भावगीत.
आणि 'रजनीनाथ हा नभी उगवला'...छोटा गंधर्व,(छोटा गंधर्वांचा विदर्भात कार्यक्रम असला की मला हार्मोनियमच्या साथीला घ्यायचे.त्यामुळे त्यांनी चित्रपटासाठी गायिलेले 'रजनीनाथ' मला प्रत्यक्ष त्यांचे तोंडून ऐकण्याचे सौभाग्य लाभले.) 'मृगनयना रसिक मोहिनी'...वसंतराव देशपांडे.
     वरीलपैकी काही गाणी/गझला दरबारी रागात तर काही दरबारी रागावर आधारित आहेत.वरील गीत/गझलांचा सर्व ठेवा युट्युबवर उपलब्ध आहे.आवडेल ते ऐकावे.
     तरी पण उर्दू गझलमधील शकील बदायुनी यांची संगीतकार खैय्याम यांनी स्वरबद्ध केलेली 'मेरे हमनफस मेरे हमनवा' ही बेगम अख्तर यांनी गायिलेली गझल इतकी लोकप्रिय झाली की सुरावट तीच ठेवून अनेक गायक/गायकांनी आपापल्या परीने मूळ पद्धतीने व आधुनिक पद्धतीने गायिली आहे.यात फरीदा खानम,प्रतिभा सिंह बघेल,अली सेठी,किरण शुक्ला, कुमार शर्मा,आसिफ अली,सखावत खान, महिरी बोस, मुहम्मद अली खान,सारा रजा खान,संगीता बॅनर्जी,माधव अग्रवाल, विधी शर्मा,श्रुती पाठक, अली रजा हे कलाकार आहेत.बेगम अख्तर नंतर यातील मला भावलेली गायिका म्हणजे 'फरीदा खानम'!
(तीच ती...'आज जाने जी जिद ना करो' गाणारी.) फरीदा खानमचा बाजच आगळा वेगळा आहे.ऐकून बघा,नक्की आवडेल.
https://youtu.be/wFpK90fPA3A
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,रविवार दि.१४ मे २०१२३


 

Thursday, May 11, 2023

जेव्हा मला कळेना...#गझलगंधर्व


 

स्वरलयीचा गुलमोहर...राम जोशी.



     सुधाकर कदम म्हणजे सांगीतानंदात रममाण झालेले व्यक्तिमत्व. त्यांनी आर्णी येथील संगीताच्या प्रांगणात लावलेल्या संगीत विद्यालयास पंचवीस वर्षे एवढा दिर्घ कालावधी लोटला. म्हणजेच हे (१९९९) रौप्य महोत्सवी वर्ष.त्यानिमित्त त्यांचा गौरव व विविध कार्यक्रम केले जात आहेत ही गोष्ट आनंददायी आहे.

     संगीताच्या माध्यमातून केलेल्या सेवेचा हा गौरव करणे समाजपुरुषाचे कर्तव्य आहे.यानिमित्त त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचे सिंहावलोकन होत असते, त्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळते,मार्गदर्शन  होत असते.

     मी कोल्हापूरसारख्या,विदर्भापासून खूप दूर असलेल्या गावी राहणारा. पण त्यांची भेट सहवास काही काळापूरताच लाभला.पण तेवढ्या थोडक्या सहवासांनी आम्ही मनोमन एकत्र आलो व दोघात निखळ मैत्री निर्माण झाली.त्याचे असे झाले,१९८२ मध्ये कविश्रेष्ठ सुरेश भटांच्या कविता गझल सादर करण्यासाठी कदमांनी महाराष्ट्र पादाक्रांत केला.त्यावेळी त्यांचा कार्यक्रम कोल्हापूरला रसिकांच्या उपस्थितीत झाला.मला निमंत्रण होते,कार्यक्रम चांगला झाला,मी चांगलाच प्रभावित झालो.

      सुरेश भटांच्या गझलांची नवलाई,अनुरूप स्वररचना व खास पद्धतीची पेशकस. तशात तबल्याच्या साथीला हैदराबादच्या उस्ताद शेख दाऊद खान यांचे शिष्य शेखर सरोदे तर सारंगीवर उस्ताद लतीफ अहमद खान साहेब.असा हा सांगीतिक योग्य जुळून आला.पुढे पुढे जाऊन ओळख करून घेणे हा माझा स्वभाव नसल्यामुळे भेट घेतली नाही.पण हा कलाकार आणि त्यांनी गायिलेल्या गझला मात्र मनात कायमच्या घर करून राहिल्या.'सूर्य केव्हच अंधाराला यार हो,या नवा सूर्य आणू चला यार हो' हे हृदयाला भिडणारे विद्रोही काव्य,'चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही', ही हळुवार मलमली गझल यांच्या प्रेमातच पडलो.या कलाकाराची प्रत्यक्ष भेट व्हावी असे मनोमनी वाटायचे आणि तो योग जुळून आला.सुमारे एक तपानंतर शिवाजी विद्यापीठ संगीत विभागात मी मानद अध्यापक म्हणून काम करीत होतो.तेव्हा (१९८८) सुगम संगीतासाठी कदमांची चार दिवसांनी कार्यशाळा ठेवली होती.त्या चार दिवसांच्या छोट्या कालावधीत आम्ही एकत्र आलो.खूप गाणी बजावणी झाली व बऱ्याच दिवसांची मनातली इच्छा पूर्ण झाली.स्नेहाचे भावबंध निर्माण झाले.कदमांनी या वेळी घरगुती कार्यक्रमात अनेक गीते व गझला मनसोक्त ऐकविल्या.त्यांच्या स्वररचना वैशिष्ठयपूर्ण व आकर्षक असल्याने त्याबाबत लिहावे असे सारखे मनात यायचे. तो योग त्यांनी स्थापन केलेल्या संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आला हा माझ्या दृष्टीने सुयोग आहे.भाग्ययोग आहे.

      सुधाकर कदम हे व्यक्तिमत्व बहुरंगी आहे.ते शास्त्रीय संगीत गायक आहेत.संगीत शिक्षक आहेत.समाजकर्ते आहेत.लेखणीबहाद्दरही आहेत.पण त्यांचा माझा जो संबंध आला तो सुगम संगीत स्वररचनाकार व गायक म्हणून.त्यामुळे तद्विषयक त्यांच्या रसिल्या सांगीतिक व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्न.

      सुगम संगीत हा संगीताचा एक अनुपम व मनोहारी प्रकार.नाव जरी सुगम असले तरी जाता जाता सहजी आत्मसात करावे इतके ते खचितच सुगम नसते.उलट दुर्गमच असते.शब्दप्रधान गायकीच्या ह्या प्रकाराला शब्द हे प्राणतत्व तर स्वर हे माध्यम.पहिला मान काव्याचा.(पर्यायाने कविचाही.) त्यातल्या आशय, भाव-भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे हे कार्य संगीताचे असते.गीताच्या आशयाची अभिव्यक्ती संगीतातून होणे अपेक्षित असते. किंबहुना काव्य बोलते करणे हे संगीतकाराने काम.यासाठी सुगम संगीतात काव्याचा आशय,विषय व भावना याची उत्तम जाण स्वररचनाकाराला असणे जसे आवश्यक, तितकेच महत्व काव्यानुकूल संगीत रचनेला;म्हणजे चाल लावण्याचा असते.सुधाकर कदम हा काव्याची उत्तम जाण असणारा संगीतकार असल्याने ते कवितेला अत्यंत पोषक व समर्पक असा स्वरसाज चढवून प्रत्येक कविता आपल्या संगीतरचनेने श्रीमंत करतात.स्वतः कवी असल्यामुळे 'जे न देखे कवी ते देखे रवी' या उक्तीला साजेसे स्वरचातुर्य त्यांच्याकडे आहे.

     शास्त्रीय संगीताचे व्यासंगी साधक असल्यामुळे कदमांच्या स्वररचनेचा पाया हा राग/रागिणीवर आधारित असणे स्वाभाविक आहे.त्यामुळेच त्यांच्या स्वररचना भारदस्त व दर्जेदार वाटतात.त्या चीप पॉप्युलॅरिटीच्या कॅटॅगिरीतल्या नव्हेत.स्वररचनेसाठी त्यांनी अनेक राग/रागिण्यांची मुक्तहस्त चंदनी बरसात केली आहे.शेकडो कवितांना स्वरांच्या चांदण्यात न्हाऊ घातले आहे.तथापि जागेच्या मर्यादेचे भान ठेवण्यासाठी काही निवडक गाणी व स्वररचनांचा आस्वाद घेणे रास्त ठरेल.

     यमन हा रागच असा की,कोणाही संगीतकाराने त्याच्या प्रेमात पडावे.कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत.प्रत्येक मूर्ती स्वतंत्र आहे.प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे,रंग आहे,रूप आहे,व्यक्तिमत्व आहे.

      कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात.

               सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी

                गातो गझल मराठी प्रिये तुझ्याचसाठी...

      दादऱ्यातल्या या बंदीशीची यमनमधील ही रचना.अगदी साधी.सुगम संगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथे अपेक्षित असते ते श्रवणसौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथे शुद्ध यमन शोधण्याची धडपड करू नये.कारण तो यमन कल्याणाशी क्षणात दोस्ती करतो आणि दोन्ही मध्यमांच्या आशा हळुवार लगावांची प्रचिती आली की, उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच राहत नाही ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली आहे व घेतो आहे.

                   मी असा त्या बसरीचा सूर होतो

                    नेहमी ओठांपुनी मी दूर होतो...

      या गझलची चालही अशीच आहे.ध्रुवपदातली (मतल्यातली) दुसरी ओळ (ज्याला क्रॉसलाईन म्हणतात)  तिची ठेवण व स्वरसमूहाची रचना अत्यंत मोहक आहे.त्यातील 'सूर होतो' इथं तारसप्तकातला षड्ज सूर ह्यासाठी तारषड्जाचा हळुवार पण भरीव लागाव व रूपक तालाचा एक पूर्ण जादा आवर्तन जो दीर्घ कसलं मुक्काम ठेवतो तो अतिसुंदर लागतो.संगीत रचनाकाराकडे नुसता सांगीतिक अलंकारांचा साठा असून चालत नाही तर स्वरपोशाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो.

      संगीतकार हाच खऱ्या अर्थाने रचना समर्थपणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो.हा अनुभव मास्तर कृष्णराववांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, रासम कदम, यशवंत देव यांच्यापर्यंत येतो.सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत. 'सूर होतो' इथं शब्दकला आणि स्वरमाधुर्य असा सुरेख समन्वय झालाय.

     सांज घनाच्या मिटल्या ओळी' हे अतिशय हळुवार भावना उलगडून दाखविणारे सरस काव्य, कदम यांनी बंदिशही यमनमध्येच बांधलीय. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस 'क्षितिजावरती' इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा कॅरेकटरच बदललाय,असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे 'क्षितिज' या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्याय नाही हे त्वरित पटते.पुरीयाचे होणारे दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळे सुरेख जुळून आलेय.प्रसिद्ध कवी अनिल कांबळे यांच्या 'जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू,ऐन वेळी अशी काय करतेस तू' ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे.यमनमधील अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना,खेमट्याच्या अंगाने लागणारा दादऱ्याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही आशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे.सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास 'ऐन वेळी अशी काय' ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमूहरचना म्हणावयास हरकत नाही.'सामग, सामगधप' वगैरे. अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे.

     'तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही' ही सुद्धा यमन मधीलच रचना आहे.यमन ह्या एकाच रागातल्या चारही रचना त्यांनी मला एकापाठोपाठ एक ऐकवल्या पण खासियत अशी की; त्यात तोच तोचपणा नाही.स्वररचनेची पठडी ठरीव स्वरूपाची नाही.त्यात आहे पूर्णत: वेगळेपण,हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचे वैशिष्टय मानले जाते.

      सुगम संगीतात आकर्षक मुखड्याला, ध्रुवपदाला खास महत्व आहे.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात.त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असते ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला.कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे.मुखड्याच्या चालीला अनुरुप अशी किंबहुना त्याचे सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करून अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते.तसे नसेल तर पूर्ण  चालच फसते.अनेक संगीतरचनांमध्ये हे दोष दिसतात.संगीतकाराला इथे आपली प्रज्ञा ओतावी लागते.सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणाऱ्या आहेत, म्हणूनच भावतात.कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते?,कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणे म्हणजे हळूच मधाचे बोट चाखण्यासारखे गोड मधुर असते.अर्थातच शेवटचे कडवे हे सर्वार्थाने हायलाईट असते.तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात.एकाच यमनाची ही विविध रूपे, विविध रंग, त्यांचा वेगवेगळा ढंग आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असे आमच्या भोवती टाकले की आम्ही स्वतः जाणकार असूनही फसलो. मग लक्षात आले की,ही यमनी फसवणूक होती,पण ही फसवणूक गोड होती.निर्भेळ होती,निर्मळ आनंद देणारी होती.तसे पाहू गेल्यास प्रत्येक संगीतकार अशी गोड फसवणूक करीत असतो.कारण त्याचा स्वतःचा असा एक बाज असतो.लाडका स्वरसमूह असतो आणि तो बहुसंख्य चालीत डोकावतोच किंबहुना त्यामुळेच संगीतकार कोण ते आपण ओळखत असतो, असे थोडेसे धाडसी विधान इथे नोंदवितो.या बाबी मिळूनच त्याची 'स्टाईल' बनत असते.सुधाकर कदमांची सुद्धा अशी एक खास स्टाईल आहे.पण त्यात कोण्या जानेमाने संगीतकाराची नक्कल किंवा अनुकरण नाही.त्यांचा बाज हा खुद्द त्यांचाच बाज आहे हे विशेष आणि तो अस्सलही आहे.

     'हे तुझे आशा वेळी लाजणे बरे नाही/चेहरा गुलाबाचे झाकणे बरे नाही', 'आली हासत आज पहाट...मेंदी भरल्या', 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची/तापलेल्या अधीर पाण्याची', 'सूर्य केव्हाच अंधाराला यार हो' या चारही रचना वेगवेगळ्या भाव-भावनांच्या.प्रत्येक रचना अत्यंत रसरशीत आहे.सर्वच चाली प्रामुख्याने भूप या लोकप्रिय रागात बांधल्या आहेत. पण प्रत्येक स्वररचनेत मनोहारी वैचित्र्य व काव्याला पूर्ण न्याय दिला गेलाय.पैकी 'हे तुझे अशा वेळी' ही तर मास्टरपीस रचना मानावी लागेल.माझी स्वतःची तर ही अत्यंत प्रिय रचना आहे.

     यमनप्रमाणे या चारही रचनात भूप रागाच्या अनेक सौंदर्यस्थळांचे मुक्त व डोळे भरून दर्शन घडते.मोरांनी सप्तरंगी पिसांचा रंगीबेरंगी पिसारा फुलवावा त्याप्रमाणे भूप रागाचा भरगच्च फुलोरा सुधाकर कदमांनी विलक्षणरीत्या फुलविला आहे.त्यात यमनच्या निषादचा केलेला सुखद उपयोग, शब्दांची केलेली फेक, गझलच्या अंगांनी केलेली गायकी हे सर्व सविस्तर लिहिणे म्हणजे तो स्वतंत्र लेखाचा किंवा भाषणाचा विषय आहे, म्हणून इतकाच स्पर्श पुरेसा आहे.

     यमन, भूप, या सर्वमान्य लोकप्रिय रागांचा चातुर्यपूर्ण उपयोग करून कदमांनी सुंदर सुंदर रचना दिल्या. त्यातील सौंदर्यकण, सौंदर्यस्थळे निर्देशित करण्याचा प्रयत्न केला याखेरीज इतर अनेक रागात त्यांनी अशाच विपुल रचना मासिकांना दिल्या आहेत.त्या सर्वांचा रसास्वाद इथे नोंदविणे शक्य नाही.तरी 'आज मी जे गीत गातो', 'आम्ही असे दिवाणे', किंवा भूपश्री मधील 'कुठलेच फूल आता' आणि शिखराध्याय म्हणजे 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' ही सुरेश भटांची खास गझल या सर्वच गीत व गझलांना कदम यांनी अत्यंत सुरेल चाली देऊन सुधारसपान घडविले.

      संगीत रचनाकार, स्वतः गायक असणे हे भाग्याचे लक्षण.कारण तो आपल्या हृदयात घर करून राहिलेली चाल खऱ्या अर्थी समर्थ गळ्यातून श्रोत्यांच्या हृदयात पोचवितो.त्या अर्थाने कदमांच्या रचनाच भाग्यवान म्हणाव्या लागतील.कारण सुधाकर कदम हे स्वतः मुलायम आवाजाचे , शब्दनुसार गाणी प्रभावीरीत्या सादर करणारे गायक असल्याने त्यांच्या चाली व काव्याचे सोने होते.नेमक्या वेळी नेमक्या शब्दावर जोर देणे, जरूर तिथे हळुवार शब्दस्वर उच्चार, प्रसंगी स्वरांचा जोरदार लगाव, स्वरांवरील न्यास, ठेहराव याद्वारे ते आपले गायन अत्यंत प्रभावी करतात.ताल व सुरांवर त्यांचा चांगलाच काबू आहे.तळाच्या अंगाने सुटेख गीत मांडणी करतात.

     शास्त्रीय संगीताचा अभ्यास, रियाज व आवाज कमविला असल्यामुळे गाण्यातील भरदस्तपणा सहज नजरेत भरतो. सुगम संगीत गायक/गायिका स्वतः हार्मोनियमवादक असेल तर दुधात साखर असा योग असतो.वर्ज्य, विकृत, अशा बऱ्याचशा स्वरांना काबूत ठेवण्यासाठी व इन्स्टंट स्वरबदल करण्यासाठी हार्मोनियम अत्यंत उपयुक्त असते. सुधाकर कदमांचा हार्मोनियमचा हात अत्यंत तयार व सॉफ्ट आहे.गायनाच्या रंगतीत त्यामुळे निश्चितच भर पडते.कडव्यांमधील म्युझिक पिसेसब(इंटरल्युड) ते उत्तम प्रकारे वाजवितात.त्या रचनाही मेलोडीयस असतात.

     गायन करताना स्वर आलापी,स्वरविस्तार व सरगमचा रास्त वापर या बाबी गाणे नटविण्या-सजविणाऱ्यांसाठी हव्यातच.कदमांची सरगम मांडणी बहुत खुबसुरत असते.वानगीदाखल...'गरे निरेपगरेसा निध धनि सागमग मपधधनिध मपमपग,गपगरेसारे,निरेमगरेनिसा' ही सरगम पहावी.

     असे हे सव्यसाची संगीतकार सुधाकर कदम विदर्भाचे एक भूषण आहे.नाटक आणि संगीताचे विदर्भाशी फार पूर्वीपासूनच स्नेहनाते आहे.अनेक मान्यवर कलावंत या भूमीने महाराष्ट्राला दिले.

     आर्णी येथील संगीत विद्यालयाची पंचवीस वर्षांची दीर्घकालीन वाटचाल कदमांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.अर्थातच हा प्रवास खाचखळग्यांनी, वेड्यावाकड्या वळणांनी, प्रसंगी काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ करणारा असूनसुद्धा हे सर्व अडथळे धीरोदत्तपणे पार करणाऱ्या सुधाकर कदमांच्या हातून सुंदर सुंदर चाली निर्माण व्हाव्यात.त्यांची संगीत सेवा अशीच अखंड सुरू राहावी, अशा शुभेच्छा मी माझ्या या मृदू स्वभावाच्या व माणसासाठी आसुसलेल्या मित्राला देतो.तत्पूर्वी मनातील एक खंत नमूद करतो, भले विदर्भाने या कलाकाराचे भरपूर कौतुक केले असेल पण उर्वरित महाराष्ट्रात या कलाकाराला त्याच्या योग्यतेप्रमाणे प्रोजेक्ट केले गेले नाही.प्रतिथयश गायक,गायिकांनी अभिमानाने गावी अशी त्यांची स्वररचना असूनही हे का घडले नाही हे एक कोडे आहे.


मानद प्राध्यापक

श्री शिवाजी विद्यापीठ

कोल्हापूर


(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी,रौप्यमहोत्सवी विशेषांक,

१९९९ मधून...)





संगीत आणि साहित्य :