Tuesday, May 6, 2025
Sunday, May 4, 2025
संपली अजूनी कुठे ही रात सजणा...
दि.१९ एप्रिलला माझ्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित 'सरगम तुझ्याचसाठी...' या मराठी गीत-गझलच्या मैफलीतील अत्यंत सुंदर अशी गझल...
संपली अजुनी कुठे ही रात सजणा
का असा जातोस तू इतक्यात सजणा
बोलते आहे नव्या स्वप्नासवे मी
हात घे हलकेच तू हातात सजणा
पाहण्यासाठी मला झंकारताना
चांदणे खोळंबले दारात सजणा
मोहराया लागले तारुण्य माझे
दरवळाया लागला एकांत सजणा
गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे
संगीत - सुधाकर कदम
तबला - डॉ.देवेन्द्र यादव
व्हायोलिन - प्रभंजन पाठक
हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे
की बोर्ड - आशिष कदम
सूत्र संचालन - प्रशांत पेंडसे
● जोग रागाची सुरावट घेऊन आलेली अनिल कांबळे यांनी ही गझल जवळ-जवळ चाळीस वर्षांअगोदर स्वरबद्ध झाली होती.#सरगम_तुझ्याचसाठी या मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझल कार्यक्रमात माझी ज्येष्ठ कन्या भैरवी गायची. या गझलचे वैशिष्ट्य म्हणजे यात जोग रागासोबतच दुसऱ्या शेरात सारंग राग आणि पुढे मुर्छनाद्वारे विविध रागांची उधळण केलेली दिसून येते. मूळ रचनेला स्वरांद्वारे विविध प्रकारे सजवणे म्हणजे गझल गायकी...याचा प्रत्यय ही गझल ऐकताना येते.यातील आर्जव गायकीतून दाखविणे ही प्राजक्ताची हातोटी म्हणावी लागेल.
Live - pune.19/4/2025
सरगम तुझ्याचसाठी ...
सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी
गातो गझल मराठी, प्रिये तुझ्याचसाठी
व्याकुळ ही विराणी, गाते तुझी कहाणी
शिवरंजनी दिवाणी, प्रिये तुझ्याचसाठी
घन सावळा गरजतो, बेबंद तान घेतो
बरसून शांत होतो, प्रिये तुझ्याचसाठी
सोसून गायिले मी, गाऊन सोसले मी
आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी
गायक - मयूर महाजन
तबला - डॉ.देवेन्द्र यादव
व्हायोलिन - प्रभंजन पाठक
हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे
की बोर्ड - आशिष कदम
●ही गझल माझ्या आयुष्याची 'टॅग लाईन' आहे,असे मित्रवर्य प्रशांत पेंडसे यांचे म्हणणे आहे.आणि एकार्थाने ते सत्यही आहे.१९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रा,१९७२ पासून संगीत शिक्षक म्हणून नोकरी,१९८० ते १९८२ सुरेश भटांसोबत महाराष्ट्रभर भ्रमंती.१९८२ नंतर सोलो कार्यक्रम.यात पगार सोडला तर आर्थिक लाभ नगण्य.पण शारीरिक त्रास मात्र भरपूर होत गेला.कदाचित हा त्रास सोसण्यातूनच ही कविता प्रसवली असावी.येताना सुरावट पण घेऊन आली.त्यातही प्रत्येक कडव्यात तीन-तीन यमक जुळवत आली.
मी तर ही कविता गायचोच.पण माझा कनिष्ठ सहोदर प्रशांत कदम अतिशय सुंदर रीतीने गायचा.यातील "प्रिये तुझ्याचसाठी" या ओळीवरून 'ही प्रिया कोण?' अशी विचारणा व्हायची.तर, मित्रहो ही प्रिया दुसरी तिसरी कोणी नसून माझी '#मराठी' आहे.
या गझलच्या सादरीकरणा अगोदर शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी आपल्या मनोगतामधून काही महत्वाचे मुद्दे मांडले.तसेच नेटके सूत्र संचालन प्रशांत पेंडसे यांनी केले.
Live - Amrutmahotsav ceremony, pune 19/4/2025





