गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, December 13, 2013

"अशी गावी मराठी गझल"


काही मित्र मंडळींच्या आग्रहावरून प्रसिद्ध कवी नारायण कुळकर्णी यांचे सूत्रसंचालन असलेल्या माझ्या कार्यक्रमातील सुरेश भटांची ही गझल सादर करीत आहे.ध्वनिमुद्रण १९८४ मधील असून कॅसेटवरून CD वर उतरविल्यामुळे सदोष आहे.कृपया चांगले घ्यावे,वांगले माझ्यासाठी सोडून द्यावे.
(स्थळ-धनवटे रंग मंदिर,सीताबर्डी,नागपुर.) 


Thursday, December 12, 2013

दुकानदारी...


सुंदर आश्रम
रस्ते वळणाचे
दुतर्फा फुलांचे
ताटवेही...

कारंजी,फव्वारे
मरवरी ‘फर्श’
नाजूकसा स्पर्श
पावलांना...

अध्यात्म दुकानी
भक्तरसा वेग
तल्लीन आवेग
भजनात...

झांज,ढोल वाजे
कोणी नाच नाचे
कोणी भजनाचे
ढोंग करी...

स्वतःवरी खूष
साराच जमाव
आखीव रेखीव
भक्तीमुळे...

दान पेट्या वाही
भरभरोनिया
दुप्पट कराया
मुद्दलाला...

खारीच्या वाट्याचे
नाम जपोनिया
निघती कराया
पिकनिक...

आगळी वेगळी
ट्रीप अध्यात्मिक
भजी,मिल्कशेक
शाकाहारी...

करोनिया सारे
नामाचा गजर
मेजवानीवर
ताव मारी...

दुःख हरणारे
सुपर मार्केट
सेवेसाठी थेट
भक्तांचिया...

सुधाकर कदम

Wednesday, November 27, 2013

पुरस्कार...


प्रकाशना आधी
पुरस्कार मिळे
निकष आगळे
अभिजात...

धन्य ते देणारे
धन्य ते घेणारे
सारस्वत सारे
मराठीचे...

जन्मण्याआधीच
"भारतरतन"
घेणे म्हणवून
तसले हे...

शेरोशायरीचे
जनक,ते कोण
हाच दृष्टीकोन
आड मार्गी...

आद्य गझलकार 
मराठीचा मुद्दा 
ज्ञानेश्वर सुद्धा 
असेलही...

उगीच जोडती
अन्यत्र शेपूट
करोनिया कट
आद्यत्वाचे...

वाल्मिकीला म्हणू
आद्य गजलकार 
अनुष्टुप चार 
लिहिलेत...

कशाला बनता
कळीचा नारद
फुकटचा वाद
वाढवण्या...

उभा जन्म ज्याने
जाळोनी काढला
त्याचे श्रेय त्याला
का न द्यावे...?

ज्युलियन येथे
एवढे कष्टले
छंदशास्त्र दिले
मराठीला...

सुरेश भटांनी
बारखडी दिली
मुळाक्षरे झाली
धन्य धन्य...

कितीही लपवा
सूर्य तो सूर्यच
राही कायमच
तळपत...

तसा फडतूस
आद्यत्वाचा वाद
तरी याचा ‘नाद’
गुंजणार...

अचानक कोणी
गुरू जन्मा येतो
नावही सांगतो
भयंकर...

विवाहाआधीच
बारशाचे पेढे
करुनिया पुढे
आनंदतो...

परिक्षेवाचुनी
नंबर पहिला
निकाली लागला
बुद्धीवाद...

कौतुकास पात्र
प्राजक्ताचा सडा
गुलाब, केवडा
केरामध्ये...

सुधाकर कदम
२५/११/२०१३

Sunday, November 24, 2013

अथ मालिका पुराणम्...



टीव्ही वरी चाले 
स्वप्नांचा व्यापार
तरिही अपार
लोकप्रिय...

वास्तवापासोनि 
जरि फारकत 
तरी बघतात 
सर्वजण...

प्रत्येक मालिका 
फरफटतात 
कारवाया ऊत 
येवोनिया...

मनोरंजनाच्या 
नावे, फालतुच्या
काळ्या करणीच्या
कथा दावि...


’क’च्या मालिकांनी
सुरवात झाली 
आणि बदलली
रूचि सारी...


स्थानिक लेखक 
आणि कलाकार
लावितात पार
या मालिका...

मूळ कथानक 
ताणोनि ताणोनि
करिती अळणी
दिग्दर्शक...

नाव असो काही
कथानक तेचि
वास्तविकतेचि
ऐसी-तैसी...

एका भागामध्ये
अर्ध्या जाहिराती
बाकीची भरती 
खोगिरांची...

मोठा टीआरपी 
त्यास जाहिराती
अशी सारी नीति
आजकाल...

प्रेक्षक बिचारे
मनोरंजनाचा
गल्लाभरू ’ठेचा’
पचविती...

भाषा व्याकरण
रसातळा नेई
पालखीचे भोई
मराठीच्या...

सुधाकर कदम
गुरूवार-७.९.१२




संगीत आणि साहित्य :