गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, March 9, 2024

राग-रंग (लेखांक४२) नंद

दो मध्यम अरु शुद्ध स्वर, गावत राग आनंद । थाट कल्याण षाडव संपूर्ण, प्रथम रात्री सुखचंद ।। एखाद्या चित्रपटातील गाण्यामुळे एखाद्या रागाची माहिती व्हावी म्हणून लेख लिहावासा वाटणे हे त्या चित्रपटगीताचे,त्या संगीतकाराने केलेल्या कामाचे श्रेय आहे असे मला वाटते.'मेरा साया' या चित्रपटातील 'तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा' हे ते गाणे होय. त्यावरून नंद रागावर लिहायची तीव्र इच्छा झाली. संगीतकार होते मदन मोहन.मदन मोहन यांची बहुतेक गाणी कुठल्या ना कुठल्या रागावर आधारित असायचीच.प्रत्येक रागातील स्वरांच्या आरोहावरोहाचा एक नियम असतो.आणि या नियमांना धरूनच संगीत रचना केल्या जातात.निदान पहिली ओळ तरी त्या रागाचे रूप दाखवीत असते.पुढे संगीतकाराचा कलाविष्कार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आयाम देत रचना खुलवित जातो.पाश्चात्य संगीतात याला "improvisation" असे म्हणतात. नंद हा राग कल्याणजन्य राग आहे,यात दोन्ही मध्यमाचा प्रयोग केल्या जातो.बाकी स्वर शुद्ध आहेत.जाती षाडव संपूर्ण असून गानसमय रात्रीचा प्रथम प्रहर आहे.यालाच कुणी आनंदी, आनंदी कल्याण, नंद कल्याण असेही म्हणतात.हा राग बिहाग, गौड-सारंग ,हमीर, कामोद या रागांना अतिशय जवळचा आहे.सा ग म प नी सा,सां नी ध प...हे बिहाग अंग,अवरोहात सां ध नि प ध तीव्र म प ग...गौड सारंग अंग, ग म ध प...हमीर अंग, तीव्र म प ध तीव्र म प ग...कामोद अंग स्पष्टपणे दिसून येते.ह्या सुरावटी घेतल्यानंतर प्रत्येक वेळी 'ग म ध प रे सा' हे स्वर घ्यावेच लागतात.तेव्हा नंद राग स्पष्ट होतो. या रागाचा विस्तार मध्य आणि तार सप्तकामध्ये अधिक प्रमाणात केल्या जातो. कल्याण परिवारातील शृंखलेतील आवडता राग म्हणून याचा उल्लेख करता येईल. हा राग ऐकणारे बरेच असतील पण गाणारे मात्र कमीच दिसून येतात. या रागाच्या उत्पत्तीबद्दल अनेक प्रवाद आहेत.ते शोधणे कठीण आहे. तरी पण असे म्हणतात की,या रागाची कल्पना १९०० च्या दशकात सुचून प्रत्यक्षात आली असावी.कारण बऱ्याच कालावधीपासून मेहबूब खान (दरसपिया) द्वारा रचलेला विलंबित ख्याल 'ए बारे सैंय्या तोहे सकल बन ढूंढू' लोकप्रिय झालेला दिसून येतो. दरसपिया हे तानरसखान यांचे शिष्य व 'आफताब-ए-मोसिकी' फैयाज खान यांचे सासरे होते. त्या कालावधीमध्ये अत्रौली (जयपूर) घराण्याचे संस्थापक अल्लादिया खान आणि आग्रा घराण्याचे बुजुर्ग गायक/वादकांमध्ये संगीत शास्त्रावर चर्चा होऊन विचारांच्या आदान-प्रदानाची प्रक्रिया सुरू होती.या प्रक्रियेतूनच दरसपिया यांची रचना दोन्हीकडील उस्तादांनी आपापल्या घराण्याच्या यादीमध्ये सामील करून घेतल्यामुळे सर्वत्र पसरली.आज सर्वच घराण्यात या रागाला मान्यता आहे.आग्रेवाले उस्ताद विलायत हुसेन खान (प्राणपिया) द्वारा रचित सुरवातीची बंदिश 'अजहूँ न आए श्याम,बहुत दिन बीते' आजही लोकप्रिय आहे. 'जाने दो मुझे जाने दो' आशा भोसले. संगीत-आर.डी. बर्मन.गझल. 'धन्य तूचि कांता' नाट्यगीत,नाटक-अमृत सिद्धी.गायक-गंगाधर लोंढे. संगीत-मास्टर कृष्णराव. 'एन्ना पलिसु' enna palisu पं. भीमसेन जोशी. पुरंदरदासांच्या या रचनेची सुरवात नंद रागाने होते.पुढे विविध सुरावटी दिसतात. 'आनंद सुधा बरसे' नाट्यगीत.गायक- रामदास कामत, संगीत-पंडित जितेंद्र अभिषेकी.नाटक-मीरा मधुरा. 'पाखरा जा त्यजुनीय' नाटक-संगीत वाहिनी,मूळ गायक-पु.ल. आणि अर्चना कान्हेरे. संगीत-श्रीधर पार्सेकर. ----------------------------------------------------------------------------- 'दैनिक उद्याचा मराठवाडा', रविवार दि.१० मार्च २०२४

Saturday, March 2, 2024

राग-रंग (लेखांक ४१) राग हमीर.

कल्याणहिं के थाट में, दोनों मध्यम जान, ध-ग वादी-संवादि सों, राग हमीर बखान। हमीर हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातला एक राग आहे. याला हंबीर असेही म्हणतात. रागचंद्रोदय या ग्रंथात हमीरचा उल्लेख आहे. केदारश्याम आणि कामोद हे हमीरचे समप्रकृती राग आहेत.केदार, गौड़ सारंग, नंद हे राग अमूर्त श्रेणीत येतात.दिवसाच्या पाचव्या प्रहरी किंवा रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायिल्या जाणाऱ्या दोन्ही मध्यम स्वर असलेल्या राग शृंखलेतील हा एक राग आहे.कल्याण थाटोत्पन्न या रागात तीव्र मध्यम स्वराचा अल्प प्रयोग केल्या जातो.तरी पण याचा थाट मात्र कल्याण! संस्कृत विद्वान यात तीव्र मध्यम घेण्याच्या विरोधात आहेत.(पण आज तीव्र मध्यम या रागाचे एक अंग बनला आहे.) ते याला बिलावल थाटोत्पन्न मानतात.कारण हा बिलावल रागाशी मिळता -जुळता आहे.आणि मला तरी हे तर्कसंगत वाटते.याचा वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे.येथे सुद्धा राग गायन समय सिद्धांतानुसार विरोधाभास दिसून येतो.ज्या रागाचा वादी स्वर पूर्वांगात असतो तो राग समय सिद्धांतानुसार दुपारच्या बारा वाजल्यापासून मध्यरात्रीच्या बारा वाजेपर्यंत गायिल्या/वाजविल्या जायला हवा.याच प्रकारे उत्तरांगवादी राग उत्तरांगात म्हणजे मध्यरात्रीच्या बारा वाजल्यापासून दिवसा दुपारच्या बारा वाजेपर्यंत सादर व्हायला हवा.परंतू हमीर रागाचा वादी स्वर धैवत असूनही गानसमय रात्रीचा पहिला प्रहर मानल्या जातो.अशा प्रकारे सिद्धांत आणि व्यवहार परस्पर विरोधी दिसून येतो.याला अपवाद म्हणता येईल काय? 'हमीर कल्याणी' नावाचा दक्षिण भारतीय राग उत्तर भारतीय 'केदार' रागाशी मिळता जुळता आहे.त्याचा उत्तर भारतीय हमीर रागाशी काहीच संबंध नाही.दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये 'केदारम्' नावाचा वेगळा राग आहे.उत्तर हिंदुस्थानी पद्धतीमधील केदार,कामोद नी हमीर रागात बरेच साम्य आहे.केदारमध्ये मध्यम,कामोदमध्ये पंचम आणि हमीरमध्ये धैवत स्वर सगळ्यात प्रबळ आहेत.धैवत या रागाचा प्राण स्वर आहे.ज्यावर न्यास होतो. हा राग उत्तरांगप्रधान असल्यामुळे याचा विस्तार मध्य व तार सप्तकामध्ये खुलून दिसतो.याची विशेषता म्हणजे यातील धैवत निषदाला स्पर्श करून घेतल्या जातो.त्यामुळे गोडवा अधिक वाढतो.या रागातील सगळ्यात लोकप्रिय चित्रपटगीत 'मधूबन में राधिका नाचे रे' हे आहे.संगीताचे लक्ष रस-परिपाक हे असल्यामुळे गीत-वाद्य-गायन यांच्यातील पारस्पारिक सांमजस्य साधले की, 'मधूबन में राधिका' सारखे गाणे तयार होते.संगीतकार -गायक-वादक एकरूप झाले की रसमय वातावरणाची वृष्टी होते.त्यात मुख्यतः व्यष्टीला नसून समष्टीला प्राधान्य असते. सगळ्यांच्या सफलतेत प्रत्येकाची सफलता असते.कोणा एकाची त्यात महत्वपूर्ण नसते.सगळ्यांचा सामूहिक प्रयत्न म्हणजे यश,सफलता होय. शास्त्रीय संगीताच्या बाबतीत आचार्य बृहस्पती यांच्या 'संगीत चिंतामणि' या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील एका समीक्षका बद्दलचा एक उतारा आहे,तो असा:- 'संगीत के उभरने के साथ शब्दार्थ पीछे छोड़ दिया जाता है, छोड़ दिया जाना चाहिए । संगीत को चाहिए कि उसे (शब्दार्थ को) खा जाए और शब्दार्थ को भी चाहिए कि वह खाया जाए ।('अनुपरागविलास', भूमिका, पृष्ठ १३) "जब आलोचकों का दृष्टिकोण यह हो जाए, तब संगीत की नैया का भगवान ही मालिक है। अमीर खुसरो या सदारंग यदि इस युग में होते, तो अवश्य ही पागल हो जाते। बंदिशों के साहित्य को भ्रष्ट करने का उत्तरदायित्व भी शब्दार्थ की ओर ध्यान न देनेवाले उस्तादों पर है। 'क्रमिक पुस्तक-मालिका' में संगृहीत, परंतु अर्थ की दृष्टि से अपूर्ण एवं भ्रष्ट बंदिशों के प्रचार का उत्तरदायित्व उस परंपरा के नेताओं पर है। इस युग में तो ऐसे व्यक्ति भी उस्ताद कहलाने लगे, जिन्होंने केवल मुखड़ा गाकर जीवन बिता दिया और नई पीढ़ी के मन में यह बात डाल गए कि न तो बंदिश की आवश्यकता है और न अर्थ की। तबले पर ठेका आरंभ कराकर 'आ, ई, ऊ, ओ' का आधार लो, बहलावे करो, तानें मारो, टीप पर खड़े न हो, गला बरावर हिलाते रहो, बस गवैए बन जाओगे। यही कारण है कि जो 'गाना' कभी बजाने और नाचने की अपेक्षा 'उत्तम' कहलाता था, उसकी 'रीढ़' ही गायब हो गई है। उसका अस्थिपंजर लुप्त हो गया है । सितार और सरोद के लोकप्रिय होने का कारण यह है कि इन्हें बजानेवाले आलाप में लय का ढोंग नहीं करते, जबकि गायक प्रायः आरंभ से ही तबले पर ठेका आरंभ करा देते हैं, उस ठेके की लय का गायक के तथाकथित विलंबित गान से कोई संबंध नहीं होता। 'तिरकिट' देखकर 'सम' आ जाना पर्याप्त समझा जाता है। 'लय' की डोर इस गाने में नहीं रहती । सितार या सरोद के 'जोड़' में ताल भले ही न हो, 'लय' रहती है, एक क्रम रहता है। ये लोग जव 'मसीतखानी' गत बजाते हैं, तब श्रोताओं के सम्मुख ठेका स्पष्ट रहता है, सितार वादक एवं सरोद-वादक तरह-तरह से बनकर आते हैं है। तबलेवाले तंत्री-वादकों के साथ बजाकर इस युग में यशस्वी और मुखड़ा पकड़ते हैं। हुए है। अच्छे तबला वादक अतिविलंबित प्रेमी गायकों को दूर से ही नमस्कार करना चाहते हैं। इस स्थिति की जिम्मेदारी भी 'उस्तादों' पर है । शब्द और अर्थ केवल गायक की संपत्ति थे। राग, ताल और लय तो बीन, सितार, सरोद और बाँसुरी में भी हैं। शब्द, अर्थ और लय की ओर जब गायकों ने ध्यान देना छोड़ दिया।प्रत्येक युग में मानव नवीनता की खोज में पागल रहा है, आज भी संगीत- जगत् में ऐसे व्यक्ति हैं, जो नए मार्ग की खोज में हैं, परंतु इनमें से अधिकांश ऐसे हैं, जिनमें पर्याप्त अध्ययन की कमी है, ये प्रचलित रागों में मनमाना उत्पात करके लोगों का ध्यान अपनी ओर आकृष्ट करते हैं। इनकी 'बंदिशों' की भाषा प्रायः अशुद्ध होती है, इनके द्वारा आविष्कृत राग सचमुच बीहड़ होते हैं। आज भारतीय संगीत को पुनः गंभीर चिंतन की आवश्यकता है । " 'मधूबन में राधिका नाचे रे' अशी गाणी लोकप्रिय होण्याची कारणे वरील उताऱ्यात नक्कीच मिळते.असो! हमीर रागातील काही लोकप्रिय चिजा... 'चमेली फूली चंपा' चीज-यशवंत जोशी,कुमार गंधर्व, शुभा मुद्‌गल,उल्हास कशाळकर वगैरे वगैरे,...'जा जा रे जा रे रंगरेज्या'-कुमार गंधर्व, 'ढीठ रंगरवा कैसे घर जाऊ'-पद्मा तळवलकर, 'मैं तो लागी रे तोरे चरनवा' -उस्ताद मुबारक अली खान, ● मराठी-हिंदी चित्रपट असो वा मराठी-हिंदी सुगम संगीत असो,यातील काही रचना सोडल्या तर बहुतेक स्वररचना संपूर्णतः एका विशिष्ट रागात बांधलेल्या नसतात.त्या पक्त 'त्या' रागावर आधारित असू शकतात.एखाद्या गीतात एकापेक्षा अनेक रागांच्या छटा पण दिसू शकतात. 'छेड दिए मेरे दिल के तार' उस्ताद अमीर खान,उस्ताद अमानत अली खान, चित्रपट-रागिनी, संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५८). 'मधूबन में राधिका नाचे रे' रफी. चित्रपट-कोहिनुर, संगीत-नौशाद (१९६०). 'मैं तो तेरे हसीन खयालों में खो गया' रफी. चित्रपट-संग्राम, संगीत-चित्रगुप्त (१९६५). 'ए हौसला कैसे झुके' शफाकत अली.चित्रपट-डोर, संगीत-सलीम सुलेमान (२०२१). 'सूर की गती मैं क्या जानूं' मुकेश.(नॉन फिल्मी) संगीत-नरेश भट्टाचार्य. 'कोकिळा गा' आशा भोसले. चित्रपट-बायकोचा भाऊ, संगीत-वसंत प्रभू (या गीतात हमीर+केदार आहे.) (१९६१). 'हे जगदीश सदाशिव शंकर' नाट्यगीत. नाटक-कट्यार काळजात घुसली. 'नमन नटवरा विस्मयकारा' नांदी, नाटक-संगीत मानापमान. 'विमल अधर निकटी मोह हा पापी' नाटक विद्याहरण. (हे नाट्यगीत सुरेश हळदनकर यांनी लोकप्रिय केले.) 'हेतु तुझा फसला' मराठी नाटक संशयकल्लोळमधील गीत. ----------------------------------------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा, रविवार दि.३/3/२०२४

मज गायचेच आहे (गझल)

अवांतर...____✍️____



     कवी/कवयित्री म्हणजे शब्दरूपी कोळशाच्या खाणीचे मालक/मालकीण. या खाणीतून ते काव्य रुपी हिरा बाहेर काढतात.संगीतकार या हिऱ्याला पैलू पाडून चमकदार बनवतो.आणि संगीत संयोजक आकर्षक असे स्वरांचे कोंदण तयार करून पैलू पडलेल्या काव्यरूपी हिऱ्याला अधिक आकर्षक करतो.ह्या तिघांचे समसमा योगदान असले तर एकूण काम उच्च दर्जाचे होते.एक जरी कमी पडला तर त्याचा दर्जा कमी झाल्याचे दिसून येते.हे आपण हिंदी,मराठी चित्रपट गीते,गझल,भावगीते,नाट्यगीते,भक्तिगीते ऐकताना नेहमी अनुभवतो.काही गीतांचे शब्द सुंदर असतात पण सुरावट चांगली नसते.काही सुरावटी सुंदर असतात पण शब्द इतके चांगले नसतात.तर काही वेळा हे दोन्ही चांगले असले नि संगीत संयोजन चांगले नसले तरी त्या गाण्याची प्रत कमी झालेली दिसते.
       आपलेही तसेच आहे.जन्म झाल्यावर आई,वडील आणि गुरू आपल्याला पैलू पाडण्याचे काम करतात. आपल्यातील कला-गुणांची कदर करणारा योग्य संयोजक जर भेटला तर आपलेही जीवन आनंदी बनून सुकर होते.हे सूत्र सर्व क्षेत्रातील लोकांना लागू आहे.त्यासाठी माणसातील हिऱ्याला आपण हिरा आहो हे कळायला हवे.अथवा त्याला तशी जाणीव करून द्यायला हवी.तसेच पैलू पाडत असतानाच्या वेदना सहन करण्याची शक्ती त्याच्यात हवी.तरच तो चमकदार बनतो. त्यांनतर कोंदणाचा प्रश्न येतो.आणि हाच प्रश्न आयुष्यात महत्वाचा ठरतो.
      अनेकदा खाणीतील हिऱ्याला पैलू न पाडल्या गेल्यामुळे आयुष्यभर कोळसा म्हणूनच आयुष्य काढण्याचे वाटयाला आल्याचेही दिसून येते. याला काय म्हणावे ?
● चार गाणी, चार प्रकार...ऐका... फरक कळेलच.😊
#sudhakarkadamscomposition


 

Wednesday, February 21, 2024

आठवणीतील शब्द स्वर...

   (लेखांक २७)
     ग्रीष्म ठेवलास तू अता, श्रावणास पांघरून जा

       मराठी गझल गायकीच्या सुरवतीच्या काळात #सुरेश_भट  आणि मी महाराष्ट्रात दौरे करत असताना अधून मधून सुरेश भटांची सासुरवाडी असलेल्या सदाशिव पेठेतील पुण्याच्या पंतांच्या गोटातील चिरेबंदी वाड्यात नवोदित गझलकरांच्या मैफली जमायचा.पुण्यातील आजचे नावाजलेले बहुतेक गझलकार त्यावेळी नवोदित होते.आणि गाणारा मात्र एकमेव मी.त्यामुळे माझ्याशी सगळ्यांचीच घसीट असायची.त्यावेळी मी रमण रणदिवे,इलाही जमादार,अनिल कांबळे, प्रदीप निफाडकर,संगीता जोशी,म.भा. चव्हाण वगैरेंच्या गझला स्वरबद्ध केल्या होत्या.कार्यक्रमात पण गात होतो.तो काळच काही वेगळा होता.सर्वजण मराठी गझलने पछाडलेले होते.माझा मुक्काम जरी सुरेश भटांच्या सासुरवाडीला असायचा तरी नाश्ता, जेवण मला बाहेर करावे लागायचे.भटांना बाहेर जेवायची हुक्की आली तर त्यांच्या सोबत एखादवेळी मी सोबत असायचो.त्यामुळे नवोदित गझकारांनी दिलेले निमंत्रण मी अगत्याने स्वीकारायचो.या काळात अनिल,प्रदीपच्या घरचा पाहुणचार मी चाखला आहे.
     माझ्या म.सा.प.च्या कार्यक्रम अगोदर ९ जून १९८२ ला '#गझल_संध्या' या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील पहिला मराठी गझल मुशायरा म.सा. प.ने घडवून आणला होता. अडीच तास चाललेल्या या मुशायऱ्यात तेव्हाचे नवोदित राजेंद्र शहा,ज्योती बालिगा,प्रदीप निफाडकर,सतीश इनामदार,इलाही जमादार,अनिल कांबळे,रमण रणदिवे हे सहभागी झाले होते. समारोप  सुरेश भटांच्या गझलांनी झाला होता. या मुशायऱ्याचे खुमासदार सूत्र संचालन मराठी आणि उर्दू शेरोशायरी पेरत डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी केले होते.
     १५ जुलै १९८२ चा पुण्याच्या महाराष्ट्र परिषदेने आयोजित केलेला #अशी_गावी_मराठी_गझल हा मराठी गझल गायनाचा संपूर्ण तीन तासाचा महाराष्ट्रातील पहिला ऐतिहासिक कार्यक्रम मी पैसे संपत आल्यामुळे अलका टॉकीजसमोरील हॉटेलमधील सकाळच्या नाश्त्यावर केला.रात्रीचे जेवण त्यावेळचे सहाय्यक पोलीस कमिशनर श्री उत्तरावर यांचेकडे घेतल्याचे आठवते.मुशायरा व गझल गायन या दोन्ही कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी जबरदस्त दाद दिली होती.माझ्या कार्यक्रमा नंतर जवळ जवळ तीन ते चार मिनिट टाळ्यांचा कडकडाट होत होता.ही माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट व कार्यक्रम अवडल्याची पावती होती.
     या काळापर्यंत वरील सगळे गझलकार एक असल्याप्रमाणे वागायचे.पण जस-जसे नाव होत गेले तस-तसे सर्वजण आपापले वेगळेपण जोपासायला लागले.२००३ मध्ये पुण्याला स्थायिक झालो तेव्हा ही बाब मला प्रकर्षाने जाणवली. म्हणून सगळयांना एकत्र आणण्यासाठी मी #गझलकट्टा  सुरू केला.काही जण सहभागी झाले.काहींना यात फारसे गम्य दिसले नाही.नवोदित मात्र यात रस घेत होते. समीर चव्हाण आणि निषाद कदम आयोजनांसाठी कष्ट घ्यायचे.मुली भैरवी आणि रेणू त्यांना सहकार्य करायच्या.समीर नोकरी निमित्त पुणे सोडून गेल्यावर सर्व (आर्थिक आणि शारीरिक) भार निषादवर येऊन पडला. समीर पुणे सोडून गेल्यानंतर काही महिने आमचा कट्टा चालला.आर्थिक आणि शारीरिक भाराच्या बाबतीत एकपात्री व्हायला लागल्यावर निषादने अंग काढून घेतले.या गझलकट्ट्याचा एक फायदा झाला तो असा की, अनेक नवोदित गझलकारांच्या गझला स्वरबद्ध झाल्या.
गझलकट्ट्याचा नियमच असा होता की,दर महिन्याला गझलकाराने नवीन गझल सादर करायची. व मी काही गझला स्वरबद्ध करून (भैरवी,रेणू,व्हायोलिनिस्ट जांभेकरांची मुलगी श्रद्धा यांच्याकडून) सादर  करायच्या.रेणू,भैरवी लग्नानंतर कानपूर,दिल्ली निघून गेल्या.माझ्या स्वररचना गाऊन घ्यायला कोणीच नसल्यामुळे शेवटी गझलकट्टा बंद झाला.
     तर सांगायचा मुद्दा हा की, पंतांच्या गोटातील वाड्यात जेव्हा एकत्र जमायचे तेव्हा सुरेश भटांच्या गझलांसह महाराष्ट्रातील इतरही नवोदित गझलकरांच्या अनेक गझला स्वरबद्ध केल्या होत्या.त्याच काळात सतीश डुंबरेची एक छोट्या बहरची गझल मी स्वरबद्ध केली होती.अनेक कार्यक्रमात सादरही केल्याचे आठवते.अशाच एका कार्यक्रमातील कॅसेटवर केलेले ध्वनिमुद्रण मला मिळाले.ते आपल्यासमोर सादर करीत आहे. ऐका, आवडल्यास तुमची.नावडल्यास माझी...

छोटी बहर

जायचेच ना निघून जा
सावलीसही धरून जा

ग्रीष्म ठेवलास तू अता
श्रावणास पांघरून जा

का अजून वाट पाहशी
वाट वेगळी करून जा

तो तुझा प्रवेश संपला
रंग तेवढे पुसून जा

ठेच खायच्या वयात तू
नीट उंबरा बघून जा

तबला-विठ्ठल क्षीरसागर #viththalkshirsagar
●headphone or earphone please...
#sudhakarkadamscomposition


 





संगीत आणि साहित्य :