. आजीवासन स्टुडिओ,मुंबई, दि.२८ जानेवारी २०२४
Wednesday, February 21, 2024
ये न ये असे गडे चांदणे...
खास व्हॅलेंटाईन डे आणि वसंत पंचमी निमित्त मी स्वरबद्ध
केलेली गझलकारा ज्योती बालिगा राव यांची सुरमई भेट...
विशेष म्हणजे गायिका प्राजक्ता सावरकर शिंदेचे पद्म श्री सुरेश वाडकरांसोबतचे हे पहिले युगल गीत आहे.आणि ती सुद्धा सुंदर गायिली.या गझलनुमा गीताचे सुंदर संगीत संयोजन मिलिंद गुणे यांनी केले असून मिक्सिंग, मास्टरिंग अजय अत्रे यांनी केले आहे.ध्वनिमुद्रण पंचम स्टुडिओ, पुणे. ऐका तर...
ये न ये असे गडे चांदणे पुन्हा पुन्हा
हो न हो कधी असे जागणे पुन्हा पुन्हा...
का जपून बोलशी ? शब्द शब्द तोलशी ?
हे असे न व्हायचे बोलणे पुन्हा पुन्हा...
माझिया मनातला चंद्र मी तुला दिला
का अनोळखी तुझे वागणे पुन्हा पुन्हा...
सांग एकदा मला ही तुझी कशी कला?
जाळणे पुन्हा पुन्हा. टाळणे पुन्हा पुन्हा...
दुःख जीवनातले काय मी न सोसले?
हे तुझे न सोसवे हासणे पुन्हा पुन्हा...
बासरी - संदीप कुलकर्णी
गिटार - राधिका अंतुरकर
#Sureshwadkar #सुरेश_वाडकर
●headphone or earphone please...
आठवणीतील शब्द स्वर (लेखांक २८)
. -हुकलेली संधी-
पन्नास पंचावन वर्षांपूर्वी एच. एम.व्ही.कंपनीची यवतमाळ जिल्ह्याची डीलरशिप दीपक देशपांडेचा मोठा भाऊ अरुण देशपांडे याच्या 'अरुण रेडिओ' कडे होती.एच. एम.व्ही च्या सर्व ध्वनिमुद्रिका अरुण रेडिओ मार्फत जिल्ह्यात वितरित व्हायच्या.दीपक आमच्या ऑर्केस्ट्रात तबला वाजवायचा.त्या कालखंडात सुगम संगीतावर योग्य प्रकारे तबला वाजवणारा यवतमाळातील एकमेव कलाकार म्हणजे दीपक. ऑर्केस्ट्राची प्रॅक्टीस संपल्यानंतर कधी-मधी रात्री दिपकच्या माध्यमातून नवीन आलेली एखादी रेकॉर्ड ऐकत बसायचो.'शिवकुमार शर्मा (संतूर), हरिप्रसाद चौरसिया (बासरी), ब्रजभूषण काबरा (गिटार) यांची 'कॉल ऑफ दि व्हॅली' ही 'लॉंग प्ले रेकॉर्ड' आली असता कितीतरी पारायणं अरुणला कळू न देता आम्ही गुपचूप केली. त्याच कालखंडात माझ्या मुंबई वाऱ्या सुरू होत्या.माझा साळा हेमंत चांदेकर (त्यावेळी लग्न व्हायचे होते,प्रेम प्रकरण सुरू होते.) याला त्याच वेळी (अंदाजे १९७०/७१) कॅनरा बँकेच्या मुंबई शाखेत नौकरी मिळाली होती. एकदा मुंबईला गेलो असता एच. एम.व्ही.च्या कार्यालयात जाऊन आम्ही (मी आणि हेमंत) यवतमाळचे डीलर 'अरुण रेडिओ' कडून आल्याची थाप मारून ध्वनिमुद्रण ऐकायची इच्छा व्यक्त केली.डीलर म्हटल्यानंतर तेथील अधिकाऱ्याने एका कर्मचाऱ्याला वरच्या मजल्यावरील स्टुडिओत घेऊन जाण्यास सांगितले.स्टुडिओमध्ये प्रसिद्ध संगीतकार हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलेल्या एका बंगाली गाण्याचे ध्वनिमुद्रण होणार होते.त्याची प्रॅक्टीस सुरू होती.आम्ही डीलर असल्याचे हेमंतदांना सांगून स्टुडिओत बसायची परवानगी घेतली.गायिका त्यांची मुलगीच होती.त्यावेळी 'ट्रॅक' पद्धत नव्हती.गायक वादक एकत्र प्रॅक्टीस करायचे.प्रॅक्टीस 'ओके' झाली की ध्वनिमुद्रण सुरू व्हायचे. तर थोड्याच वेळात ध्वनिमुद्रणाला सुरवात झाली.वादकांमधील अकॉर्डियन वादकाच्या चुकीमुळे टेक वर टेक होत होते.मी पण यवतमाळच्या ऑर्केस्ट्रात अकॉर्डियन वाजवायचो.त्यामुळे 'त्या' अकॉर्डियन प्लेअरला जमत नसलेल्या पीसचे नोटेशन माझ्या डोक्यात आले व मी ते सहज वाजवू शकलो असतो.'मी वाजवून बघू का' असे विचारायची उत्कट इच्छा झाली होती.पण रिटेक मुळे त्रस्त झालेल्या हेमांतदांच्या त्रस्त चेहऱ्याकडे पाहून विचारायची हिंमत झाली नाही.त्यांच्या समोर मी बच्चा होतो.शेवटी एकदाचे ध्वनिमुद्रण संपले व आम्ही तेथून निघून आलो.बाहेर आल्यावर बोलत बोलता हेमंतला म्हटले, अकॉर्डियनचा 'तो' पीस मी सहज वाजवू शकलो असतो'. त्यावर हेमंत म्हणाला 'तू तिथेच का बोलला नाही.मी तशी विनंती हेमंत कुमार यांना केली असती.अरे,हे जर तू केले असतेस तर कदाचित तुझ्या मुंबईतील कामाची सुरुवात झाली असती.' पण माझ्या भिडस्त स्वभावामुळे म्हणा किंवा आपल्याकडून दुसरा कलाकार अपमानित होऊ नये या विचाराने म्हणा माझी एक संधी हुकली.
Friday, February 2, 2024
●दुःख माझे देव झाले●
याच काळात गझलगायक सुधाकर कदम आणि त्यांची तबल्यावर साथ करणारे शेखर सरोदे यांची भेट झाली. शब्द, छंद, सूर आणि ताल यांची घट्ट मैत्री जमली. सुधाकर कदम सालाबादप्रमाणे नवरात्रात माहूर गडावर हजेरी लावायला जाणार होते. दुर्धर आजाराने अपंगत्व आलेल्या माझ्यासारख्याला गड चढणे अशक्य होते. पण म्हणतात ना! मित्र आणि आत्मविश्वास काहीही करू शकतो. सुधाकर आणि शेखर यांनी त्यांच्या हाताची पालखी केली. मला बसवले आणि आम्ही मैत्रीचा माहूर गड सर केला. रेणुका मातेच्या चरणी पोहचलो. गड चढायला सुरुवात करतानाचे दुःख, शिखरावर पोहचता पोहचता देव झाले होते. भावना शब्दबद्ध झाल्या- ‘दुःख माझे देव झाले’. पुढे हीच गझल सुधाकर कदमांनी स्वरबद्ध केली. त्यांच्या हरेक गझल मैफिलीत ती आवर्जून गायली जायची. त्यांच्या १९८२ मध्ये आलेल्या 'भरारी' शीर्षकाच्या कॅसेट मध्ये ती समाविष्ट केली गेली. पुढे ही गझल 'लोकमत' च्या रविवार पुरवणीत १२ ऑगस्ट १९८४ ला प्रकाशित झाली. माझ्या गझलेचा प्रवास चिंतनातून लेखन, लेखनानंतर प्रकाशन, आणि त्यांचे गायन असा संथ गतीने सुरू होता. वाचल्या जाणारी गझल आता गुणगुणल्या जाऊ लागली होती.
सुधाकर कदमांचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठी गझल गायनाचे कार्यक्रम होत होते. आता नागपुरातील धनवटे रंगमंदिर गाजवावे अशी त्यांची इच्छा होती. योग जुळून आला. दिनांक १५ जून १९८४ ला धनवटे रंगमंदिरात भारदस्त आवाजाचे धनी सुधाकर कदम यांनी सूर लावला-
'दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना
आरती जी गात आहे तीच माझी वेदना'
(गझल ऐकण्यासाठी लिंक
https://youtu.be/DBcwSSSmbw0 )
आणि माझ्या ‘दुःखाचा देव’ मराठी माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात विराजमान झाला. ‘तरुण भारत’च्या ‘मध्यमा’ पुरवणीत या मैफिलीचा वृत्तांत वामन तेलंग यांनी सविस्तर लिहिला.
सुरेश भटांच्या गझलेसोबत माझीही गझल गायली जात आहे याचे समाधान होते.
□ श्रीकृष्ण राऊत
●२०२१ च्या 'नायक' दिवाळी अंकातील श्रीकृष्ण राऊतांचा लेख...
..........................................................................
Wednesday, January 31, 2024
आठवणीतील शब्द स्वर (लेखांक २५)
१९७२ मध्ये आर्णीला संगीत शिक्षक म्हणून रुजू
झाल्यावर ऑर्केस्ट्राची प्रॅक्टीस, कार्यक्रम, शाळा आणि संगीत विद्यालय हा सगळा व्याप सांभाळणे कठीण व्हायला लागले.शेवटी नाईलाजाने ऑर्केस्ट्रा सोडण्याचा निर्णय घेतला.ऑर्केस्ट्राचे प्रमुख आधारस्तंभ मी आणि शंकर बडे आम्ही दोघे होतो.शंकरचेही लग्न झाल्यामुळे तो ही पोटापाण्याच्या व्यवस्थेला लागला होता.त्यामुळे त्यालाही बोरी अरब येथील व्यवसाय ,कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करणे कठीण होत चालले होते. शेवटी दोघांनीही १९७५ चे गणेशोत्सव,दुर्गोत्सवाचे कार्यक्रम आटपून ऑर्केस्ट्रा सोडला.आम्ही दोघे नसल्यामुळे ऑर्केस्ट्रा बंद पडला हे मात्र वाईट झाले.त्यांची खंत दोघांनाही होती,पण नाईलाज होता.
ऑर्केस्ट्रा सुटल्यानंतर गायक गायिका अविनाश जोशी,रतन जोशी,प्रभा मॅथ्यू,तबला शेखर सरोदे,गिटार अविनाश गिरी,सूत्र संचालन शंकर चौधरी,सुरेश गांजरे यांना घेऊन मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचे कार्यक्रम सुरू केले.ऑर्केस्ट्राच्या स्थापने पासून स्वरबद्ध केलेल्या शालेय कविता,काही नाटकांना संगीत दिले होते,त्यातील गाणी,शंकर बडेने लिहिलेली वऱ्हाडी गाणी व गझला या व्यतिरिक्त विदर्भातील अनेक कवींच्या रचना असा बराच मोठा साठा माझ्याकडे होता.त्यामुळे ऑर्केस्ट्रा सोडला तरी माझी सांगीतिक वाटचाल सुरूच होती.हे सुरू असताना सुरेश भटांची भेट झाली व त्यांच्या गझल,कविता स्वरबद्ध करायला सुरुवात केली.१९७९ पर्यंत काही रचना स्वरबद्ध करून कार्यक्रमात घेणे सुरू केले होते.(यावर, त्यावेळी भरात असलेल्या नागपूरच्या 'दैनिक नागपूर पत्रिका' या वर्तमानपत्राच्या विशेष पुरवणीत सुरेश गांजरे यांनी एक लेख लिहिला होता,तो खाली दिला आहे.) तसेच सुरेश भट व माझ्या एकत्र मैफलीही सुरू झाल्या होत्या.या मैफिलीतील माझी सुरवात नव्यानेच स्वरबद्ध झालेल्या 'दुभंगून जाता जाता मी अभंग झालो' किंवा 'माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे' या गीताने करायचो.अशाच एका मैफिलीतील 'माझिया गीतात वेडे' चे साउंड सिस्टिमवाल्याने विविध अडथळ्यासह केलेले ध्वनिमुद्रण आपल्या समोर ठेवत आहे.गोड करून घावे.
------------------------------------------------------------------------
. मराठी गझल गायक सुधाकर कदम
-सुरेश गांजरे
मराठी गझलांना स्वरबद्ध करून आपल्या सुरेल आवाजात सादर करण्याचा एक स्तुत्य उपक्रम गायक सुधाकर कदम यांनी सुरू केला आहे. विदर्भातील अनेक शहरात त्यांनी आजवर मराठी गझलांचे अनेक कार्यक्रम पेश केले आहेत.महाराष्ट्रातील गझलकारांच्या गझला सादर करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ असल्याने रसिकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे.
'दुभंगून जाता जाता मी अभंग झालो'
या सुरेश भटांच्या गीताने ते आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतात.त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अप्रतिम गझला सादर होऊ लागतात.रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन आपल्या जिवाचे कान करून ऐकत असतात.
'मी गोड या स्वरांनी गातो जरी तराणे
गीतात हाय येती संदर्भ जीवघेणे...'
ही नीलकांत ढोलेची गझल,
'आम्ही असे दिवाणे आम्हास गाव नाही
आम्ही घरोघरी अन आम्हास नाव नाही'
ही शंकर बडेची गझल,
'फुलवू नकोस आता उसने गुलाब गाली'
ही पुण्याच्या रमण रणदिवेची गझल रसिकांची उत्स्फुर्त दाद घेते.
श्री सुधाकर कदम हे संगीत विशारद असून आर्णी येथील महंत दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून नोकरी करतात. तेथेही त्यांनी 'गांधर्व संगीत विद्यालय' स्थापन करून आपली कलोपासना सुरूच ठेवली आहे.स्वतः कदम यांना शब्दांची चांगली 'जाण' असल्याने ते शब्द व स्वर याची उत्कृष्ट सांगड घालतात.प्रत्येक शब्दाला असलेला खास रुतबा सांभाळून पेश केल्याने त्याची खुमारी काही औरच असते.
सौ.प्रभा मॅथ्यू व कु.रतन जोशीसुद्धा कदमांनी स्वरबद्ध केलेल्या गझला कार्यक्रमातून पेश करतात.तबलापटू श्री.शेखर सरोदे यांच्या बोटांची जादू अप्रतिमच असते.अत्यंत परिश्रम घेऊन श्री.कदमांनी हा संच ग्रामीण भागातून उभारला.ही कौतुकाची बाब आहे.त्यांच्या शाळेचे व्यवस्थापक श्री.राजकमलजी भारती व मुख्याध्यापक श्री.बुटले गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभते.
हा 'गझल'चा कार्यक्रम कधी कधी अक्षरशः रात्र संपेपर्यंत चालतो.विशेषतः स्वतः कदम
'पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली'
सुरेश भट
'सखे, सांजवेळी नको दूर जाऊ'
अशा नाजूक,शृंगारिक रचना आपल्या मुलायम स्वरात खास ढंगाने सादर करून रसिकांची मने जिंकून घेतात.मधून-मधून ते उर्दू गझळसुद्धा आपल्या खास चालीमध्ये उत्कृष्टपणे सादर करतात.
'मार्गावरून माझ्या मी एकटा निघालो'
ही उ.रा.गिरी यांची गझल म्हणजे या कार्यक्रमाची भैरवी!आपल्या आवाजातील तमाम दर्द ओतून सुधाकर कदम ती पेश करतात.क्षणभरासाठी रसिकांची मने हेलावून जातात.रसिकांच्या वृत्ती गलबलून काढण्याचे सामर्थ्य त्यांच्या स्वरात असते.
सुरेल आवाजाची देण आणि कठोर परिश्रम यामुळे अल्पावधीतच श्री.कदम यांनी गझल गायनाच्या प्रांतात आपला चांगलाच जम बसविला आहे.एक नवा पायंडा ते पाडत आहेत ही कौतुकाची बाब ठरावी.श्री.सुधाकर कदम यांना त्यांच्या अंगीकृत कार्यात उदंड यश लाभो,ग्रामीण कलावंताची ही प्रतिभा आनंददायी ठरो ही अपेक्षा.
दैनिक नागपूर पत्रिका,नागपूर.
विशेष पुरवणी,दि.४/१२/१९८०
Thursday, January 25, 2024
आठवणीतील-शब्द-स्वर(लेखांक २४)
.
● जर-तर ●
सुरेश भटांची भेट झाल्यानंतर हळू हळू जुन्या गझलांसह नवीन झालेल्या गझला स्वरबद्ध करण्यासाठी मला देत गेले.तोपर्यंत मी सरोद वादन व स्वरबद्ध केलेल्या उ.रा. गिरी,शंकर बडे,शिवा इंगोले,बबन सराडकर,श्रद्धा पराते,ग्रेस,नीलकांत ढोले, शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,गजेश तोंडरे, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम,गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, यांच्या मराठी-हिंदी गीत-गझलांचा संमिश्र कार्यक्रम करायचो.नंतर सुरेश भट आर्णीला माझ्याकडे आले की नवीन गझल,नव्या बंदिशी,मैफली,खवैयेगिरी आणि मूड लागलाच तर आर्णी जवळच्याच काठोडा या छोट्याशा गावातील रमेश माहुरे पाटील या रसिक मित्राकडे गप्पा,कॅरम,मैफिल,खाणे,
आराम असा एकूण कार्यक्रम असायचा.एकदा तर पुष्पा वहिनी (श्रीमती पुष्पा सुरेश भट), चित्तरंजन सुद्धा कठोड्याला आले होते.सोबत कवी कलीम खान असायचेच.सुरेश भटांच्या सहवासाने १९८०/८१ मध्ये माहुरे घरातील तरुणाई कविता करायला लागली होती.
हवा जरासा आसरा
तुझ्या मनाचा कोपरा
सुगंध अलगद हेरतो
गुलाब तू की मोगरा
-अशोक माहूरे
माझ्या खुळया मनाला हेही पसंत होते !
डोळ्यात या तुझ्या जे फसवे वसंत होते!!
आम्हा कफल्लकांच्या प्रेमास जात कुठली ?
खोटे तुझे दिलासे पण जातीवंत होते !!
-मनोज माहुरे
ही तरुण कंपनी सुरेश भटांची सेवा तर करायचीच पण तेवढ्याच खोड्या पण करायचे.त्यांच्या गझलांचे विडंबन करून त्यांनाच ऐकवून प्रेमाच्या शिव्या खाणे हे नित्याचे.
सगळे त्यांना बावाजी म्हणायचे.रमेश पाटलांचे वडील बंधू पांडुरंग पाटील यांच्या घराला एक तळघर होते.दुपारचे जेवण झाले की बच्चा कंपनी त्यांना आराम करण्यासाठी तळघरात घेऊन जायचे.थंडगार तळघरात पलंग,खुर्च्या,
टेबल,पंखा अशी व्यवस्था असायची.तेथे यांच्या गप्पा सुरु व्हायच्या.गप्पा करताना कुणी त्यांचे पाय दाबत,कुणी हात दाबत.भटांना अंग दाबून घायची सवय होती.अंग दाबण्यावरून काठोड्याचाच एक किस्सा आठवला.
दुपारची झोप झाली की पालथे पडून पाटलाकडील गड्याला पाठीवर पाय द्यायला लावून पाठ चेपून घ्यायचे.
एकदा मी व कलीम नेहमीप्रमाणे रविवारी काठोड्याला गेलो असता भटांचा विषय निघाला.त्यांच्या गझलांवर चर्चा सुरू झाल्यावर ते किती मोठे कवी आहेत,त्यांच्या कविता मोठ मोठे गायक गायिका गातात वगैरे वगैरे...
आमच्या ह्या गप्पा गडी ऐकत होता.तो लगेच म्हणाला 'अस्तिन मोठे,म्या त लै येळा त्यायले तुडवलं हाये' त्याच्या या वाक्यावर हास्यकल्लोळ उठला.
भटांनी एकदा आर्णीला माझ्याकडे मुक्कामी असताना 'नात' (हजरत पैगंबर साहेबांची स्तुती असलेले गीत) लिहिली.ती सर्वप्रथम मला दाखवली व म्हणाले इथल्या उर्दूच्या जाणकारांना बोलव.मी लगेच मित्र रशीद भाईचे वडील करीम चाचांकडे गेलो व त्यांना सुरेश भटांनी मराठीमध्ये नात लिहिल्याचे सांगितले व घरी येण्याचे निमंत्रण दिले.करीम चाचा म्हणजे उर्दू गझलांची चालती बोलती डिक्शनरीच.आर्णीच्या कंबलपोष बाबांच्या दर्ग्यावरील उरुसात होणाऱ्या कव्वालीचे आयोजन,तसेच कव्वाल ठरवण्याचे काम तेच करायचे.
उर्दूवर कमांड असलेले करीम चाचा घरी आले.सुरेश भटांनी त्यांच्या पद्धतीने नात ऐकवली.चाचा एकदम खुश झाले व नात लिहिलेल्या कागदावर
'बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम'
( इस्लाममध्ये कोणत्याही कामाचा शुभारंभ "बिस्मिल्लाह-हिर्रहमा-निर्रहीम" b-ismi-llāhi r-raḥmāni r-raḥīmi بِسْمِ ٱللَّٰهِ ٱلرَّحْمَٰنِ ٱلرَّحِيمِ याने करतात.'बिस्मिल्लाह'चा अर्थ आहे 'शुभारंभ'!) असे उर्दूमध्ये लिहिले.कारण ती मराठी भाषेत लिहिलेली पहिली नात होती.शब्द होते....
'उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद
जगातल्या दीन दु:खीतांचा अखेरचा आसरा मुहम्मद'
(ही सुरेश भटांच्या हस्ताक्षरातील नात माझ्या ब्लॉगवर टाकली असता एका भामट्याने तेथून कॉपी करून त्यावर लेख लिहून जणू काय त्याच्याकडेच ही नात लिहिल्या गेली असा आभास निर्माण केला.माझा किंवा माझ्या ब्लॉगचा उल्लेख करण्याचे साधे सौजन्य त्या महाभागाने दाखविले नाही.म्हणून मी 'भामटा' हा शब्द वापरला.)
आर्णीमध्ये माझ्या मित्र मंडळीत सर्व जाती धर्माचे लोक होते. मी संगीत शिक्षक व गायक असल्यामुळे सगळे माझ्यावर प्रेम करायचे.करीम चाचा सोबत मस्ती पण करायचो, शिव्या खायचो.निषादचा जन्म झाला तेव्हा आम्ही दोघेही नोकरी करत होतो.त्यावेळी शेजारी पिंजारी बुढा-बुढी राहात होती.ते दोघे निषादला सांभाळायचे.नंतर तर ते आमच्या घरातील सदस्य बनले होते.एक वर्षानंतर सुलभाने नोकरी सोडली.त्यानंतरही पिंजारी कुटुंबाने माझ्या तिन्ही मुलांना आजी-आजोबासारखे प्रेम दिले, माया केली.अर्थात त्यांच्या शेवटच्या काळात आम्हीही त्यांची काळजी घेतली.
कंबलपोष बाबांच्या उरुसात पूर्वी फक्त कव्वाल्या व्हायच्या.मी तेथे कव्वाल्यासोबतच वऱ्हाडी कवी संमेलन घेणे सुरू केले.यात शंकर बंडे, मिर्झा रफी अहमद बेग,राजा धर्माधिकारी अशी दिगग्ज मंडळी असायची. नंतर भजन स्पर्धा सुध्दा सुरू झाल्या.त्या काळी जत्रा,उरूस म्हणजे लहान मुलांसोबतच हौस्या-गौश्या-नौश्यांची मजा असायची.परिसरातील खेड्यातील लोकांची आवश्यक सामानाची खरेदी चालायची. खास आकर्षण म्हणजे तंबूतील दोन मध्यांतर असलेला चित्रपट.चित्रपट बघायला जायचे म्हणजे बसण्याकरिता सोबत सतरंजी घेऊन जावे लागायचे. त्या चित्रपटाच्या जाहिराती म्हणजे वेगळंच काम होतं.आर्णीला अशीच एक बारमाही टॉकीज होती.तिथल्या भोंग्यावर आरती लागली की आता चित्रपट सुरू होणार हे गावकऱ्यांना कळायचे.यवतमाळ जिल्ह्यातील माझ्या दोनोडा या मूळ गावी सकाळी घंटी वाजली की शाळा सुरू होणार हे कळायचे.सायंकाळी घंटी वाजली की मारूतीच्या देवळात आरती सुरू होणार हे कळायचे.आर्णीत आरती सुरू झाल्यावर चित्रपट सुरू होणार हे कळायचे.आरती म्हणजे प्रत्यक्षातील आरती नव्हे.तर 'मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की' ही रेकॉर्ड!
हळू हळू भटांच्या गझला स्वरबद्ध व्हायला लागल्या. आणि आम्ही दोघांनी मिळून कार्यक्रम करायचे ठरवले.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या गावी पहिला प्रयोग केला.त्यात एक गझल भटांनी त्यांच्या पद्धतीने सादर करायची व नंतर मी हार्मोनियम तबल्यासह ताला-सुरात एक गझल सादर करायची.हा कार्यक्रम लोकांनी आनंद घेत ऐकला.पण आम्हा दोघांनाही त्यात मजा आली नाही.कारण एकाची लिंक लागत नाही तो दुसऱ्याचा नंबर यायचा. तेव्हा दोघांनी अर्धा अर्धा कार्यक्रम करायचे ठरवले.हा प्रयोग यशस्वी झाला.
त्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर या पद्धतीने अनेक कार्यक्रम केले.१९८२ च्या पूर्वार्धापर्यंत संपूर्ण तीन तासांची मैफल होईल इतक्या गझला स्वरबद्ध झाल्यावर फक्त माझ्या गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात आयोजित करण्यात आला.महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा या तीन तासाच्या पहिल्या-वहिल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वतः सुरेश भटांनी केले.शीर्षक होते
"#अशी_गावी_मराठी_गझल"! दुसऱ्या दिवशी याच शिर्षकाचा स्वतः भटांनी निवेदन केलेला कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर निवडक रसिकांसमोर सादर करून प्रसारित करण्यात आला.त्या नंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज,राजवाडे सभागृह,मराठे यांचे संगीत विद्यालय अशी कार्यक्रमांची रांग लागली.पश्चिम महाराष्ट्रातील काही कार्यक्रमाचे सूत्र संचालन कधी डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी तर कधी पुण्यातील प्रसिद्ध संगीत समीक्षक श्रीरंग संगोराम करायचे.राजवाडे सभागृहातील कार्यक्रमाला तर नावाजलेले भावगीत गायक गजाननराव वाटवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अशा प्रकारे 'अशी गावी मराठी गझल' च्या मैफली गाजत असताना १९८२ च्या शेवटास मी स्वरबद्ध केलेल्या गझलांची कॅसेट काढावी असे भटांच्या मनात आले.तसे अलुरकरांशी बोलणेही झाले.त्या काळी पुण्याच्या अलुरकर म्युझिक कंपनीचे महाराष्ट्रभर नाव होते.सुरेश भटांनी मला तसे पत्रही पाठवले.त्यात या कॅसेटचे संगीत संयोजन आनंद मोडक करतील असाही उल्लेख होता.(ते पत्र व माझ्याकडे लिहिलेली नात खाली देत आहे.) नंतर कुठे माशी शिंकली कोण जाणे.हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही.पण लगेच एच एम व्ही कंपनीने काढलेली सुरेश वाडकरांच्या आवाजातील सुरेश भटांच्या गीत-गझलांची कॅसेट बाजारात आली.संगीतकार होते स्व.रवी दाते.
ही सुवर्णसंधी हुकल्यानंतर मी या संदर्भात शेवटपर्यंत भटांशी बोललो नाही.शेवटी वीस वर्षांनंतर दिलीप पांढरपट्टे यांच्या गझला सुरेश वाडकरांकडून गाऊन घेण्याची संधी मला मिळाली.२०१२ मध्ये युनिव्हर्सल कंपनीतर्फे "#काट्यांची_मखमल" हा अल्बम बाजारात आला.या अल्बममध्ये वैशाली माडे माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली सर्वप्रथम वाडकरांसोबत युगल गझल गायिली.त्या नंतर सुरू झालेले माझे काम आज २०२४ मध्येही त्याच जोमाने सुरू आहे.
(तसा तर २००६ मध्ये टी सिरीजने बाजारात आणलेला #अर्चना हा पंडित शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजातील भक्तीगीतांचा अल्बम पहिला आहे. पुण्यात स्थायिक झाल्यावर खरे काम तेथून सुरू झाले.)
१९८२ #मध्येच_जर_पहिला_अल्बम_बाजारात_आला_असता_तर?
Saturday, January 20, 2024
राग रंग (लेखांक ३९) गोरखकल्याण
राग गोरख कल्याण सम सम्वाद द्वितीय रात्रि ओडव षाडव मान ।
थाट खमाज मानत गुनि जन , गोरख राग बखान ।।
गोरख कल्याण हा उत्तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधील खमाज थाटोत्पन्न राग आहे. हे नाव उत्तर प्रदेशातील गोरखपुर मधील एका परिसरातील लोक-गीतामधून उत्पन्न झाल्याने पडल्याचे मानल्या जाते. नाव जरी गोरख कल्याण असले तरी यात कल्याण दिसत नसल्यामुळे काही संगीतकार, गायक, संगीततज्ज्ञ
याला फक्त गोरख म्हणणे पसंत करतात.हा एक अतीशय गोड राग आहे. उत्तर भारतीय संगीताच्या नियमानुसार रागातील आरोहावरोहात पाच स्वर आवशयक असतात.पण गोरख कल्याण हा एकमेव असा राग आहे की, ज्यातील आरोहात कोमल निषाद वक्र स्वरूपात येत असल्यामुळे खऱ्या अर्थाने सा रे म ध हे फक्त चारच स्वर लागतात.ही एक मजेशीर बाब आहे.असो!
या रागात मध्यम स्वर एकदम मजबूत आहे. वादी स्वर षड्ज असून या स्वरासोबत मध्यम स्वर हा एक विश्राम स्वर पण आहे, जो याला 'नारायणी' रागापासून वेगळा करतो. (कर्नाटक संगीतामधून आलेला नारायणी राग खमाजचाच एक प्रकार आहे. गांधार वर्ज करून खमाज गायिला की तो नारायणी होतो.दक्षिणेतील 'हरिकांभोजी' थाट खमाज थाटाप्रमाणे आहे.)/नारायणी रागाचा वादी आणि न्यास स्वर पंचम आहे. गोरख कल्याणमधील मन्द्र सप्तकातील कोमल निषाद हा विश्राम स्वर आणि रागाचे प्रमुख लक्षण दाखविणारा स्वर आहे.आरोहातील वर्जित निषाद या रागाला बागेश्री पासून वेगळा करतो किंवा ठेवतो.तसेच पंचम वर्ज असल्यासारखाच असल्यामुळे दुर्गा रागाला पण दूर ठेवतो. आरोहात कोमल निशादाचा अल्प प्रयोग सर्वत्र केल्या जातो. आणि त्यामुळे या रागाचे सौंदर्य अधिक वाढते.तसेच यात पंचम या स्वराचाही अल्प प्रयोग करून रंजकता वाढविण्याचा प्रयत्न केल्या जातो. अर्थात काही संगीतकार याच्याशी सहमत नाही.या रागाचा विस्तार तीनही सप्तकांमध्ये केल्या जातो.हा विस्तार अतिशय मनमोहक असतो.
याचा वादी स्वर षड्ज व संवादी स्वर मध्यम आहे. काही विद्वान याचा वादी स्वर मध्यम व संवादी स्वर षड्ज मानतात. पण गानसमय मात्र रात्रीचा दुसरा प्रहर मानतात.म्हणून मग वादी संवादीच्या दृष्टीने उत्तरांग प्रधान आणि गानसमयाच्या दृष्टीने पूर्वांग प्रधान व्हायला हवा.वास्तविकता ही आहे की,गोरख कल्याण पूर्वांग प्रधान राग आहे.त्यामुळे अधिकांश विद्वानांनी षड्ज,मध्यम स्वराला वादी,संवादी स्वर म्हणून मान्यता दिली आहे. रागातील वादी संवादी स्वरांचे स्थान बुद्धिबळातील राजा व वजीरा प्रमाणे असतात,हे सगळ्यांनाच ज्ञात आहे.गोरख कल्याण रागात तर यांचे विशेषच महत्व आहे.व ते सतत जाणवत असते.बाकी सगळे स्वर या दोन स्वरांभोवती अक्षरशः गोंडा घोळताना दिसतात.
आरोह- सा रे म, ध S (कोमल)नी ध सां
अवरोह- सां ध ध (कोमल)नी ध म, रे म रे सा (कोमल) ऩी S ध़ सा
पकड- (कोमल) नी ध म, रे म रेसा (कोमल) ऩी S ध़ S सा, रे म
(एके काळी मुक्त असलेली संगीत कला काही काळानंतर मंदिर, राज-दरबार, सरदार-जागीरदार भवन आणि कोठे वगैरे मधून मुक्त होऊन आकाशवणीमध्ये बंद होते की काय,अशी परिस्थिती असताना पुन्हा संगीत प्रसारक,लेखक, संशोधक,
गायक,वादक यांनी लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.शाळा,महाविद्यालयातून संगीताचे सूर घुमायला लागले.
मोठं-मोठी संमेलने व्हायला लागली.पण गेल्या काही वर्षात शाळांतमधील संगीत विषय बंद करण्याकडे सरकार व संस्थाचालकांचा कल दिसायला लागल्यामुळे शाळेत किलबिलणारे संगीताचे स्वर हळू हळू लोप पावत चालले आहेत. पुढे चालून महाविद्यालयातील संगीत विभाग बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जे संगीत मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकते,ज्या संगीतामुळे सर्व जग एकत्र येऊ शकते त्या संगीत विषयाला सर्वत्र दुय्यम,तिय्यम स्थान दिल्या जायचे.आणि आता तर स्थानच न ठेवण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे.असो..'कालाय तस्मै महा'!)
उस्ताद सलामत अली नजाकत अली खान,गंगुबाई हंगल, पंडित भीमसेन जोशी,कुमार गंधर्व, पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद गुलाम मुस्तफा खान, उस्ताद उमीद अली खान, पंडित राजन साजन मिश्र,मालिनी राजूरकर, श्रुती सडोलीकर, विणा सहस्रबुद्धे, पंडित जगदीश प्रसाद, उस्ताद राशिद खान,परवीन सुलताना, देवकी पंडित,अरमान राशिद खान,संजीव अभ्यंकर,सम्राट पंडित (जगदीश प्रसाद पंडितचा मुलगा), पं. कैवल्यकुमार गुरव, जयतीर्थ मेउंडी, रमाकांत गायकवाड, मौमिता मित्रा, डॉ.प्रवीण गावकर, झीशान खान, रागेश्री वैरागकर, आस्था-प्रदीप चोप्रा (धृपद),ऋषी-वरुण मिश्रा, सावनी शेंडे, अनुराधा कुबेर, राजेश-रिषभ प्रसन्ना, गुलाम हसन खान, देवर्शी भट्टाचार्य, राजेंद्र कंदलगावकर, अर्चना कान्हेरे, गिरीश गोसावी, डॉ. कल्याणी देशमुख,शुजात अली खान, सुमित्रा गुहा, परितोष पोहनकर, मनाली बोस, अमित कुमार रथ, पं. तुषार दत्त, पं. देवशीष डे, मेघना घेरकर, विनय रामदासन, रोंकिनी गुप्ता.
पंडित बुधादित्य मुखर्जी (सतार), डॉ.एन. राजम (व्हायोलिन) उस्ताद शाहीद परवेज खान (सतार), पंडित रोनू मुजुमदार, राकेश चौरसिया (बासरी)-सुनील देव (सतार) जुगलबंदी, राहुल शर्मा (संतूर), पुर्बायन चटर्जी (सतार), सौमिक दत्त (सरोद), संदीप चटर्जी (संतूर), विनय भिडे (गायन)-अनिर्बन दासगुप्ता (सरोद) जुगलबंदी, पं. सुब्रतो डे (सतार), साकेत साहू (व्हायोलिन), फारुख लतीफ (सारंगी), पंडित विश्वमोहन भट (मोहनवीणा)-रोनू मुजुमदार (बासरी) जुगलबंदी, लोकेश आनंद (शहनाई), पं. रबीन घोष (व्हायोलिन), विष्णू देव (बासरी), एस.आकाश (बासरी), नारायण हिरेकोलची (व्हायोलिन), देबस्मिता भट्टाचार्य (सरोद), कमला शंकर (हवाइयन गिटार) या कलाकारांचे गायन/वादन युट्युबवर उपलब्द्ध आहे.
● या रागावर आधारित हिंदी,मराठी चित्रपट गीते ,गझला,आणि भक्तीगीते...
'दिल की कश्ती भवर में आयी है' लता. चित्रपट-पालकी, संगीत-नौशाद (१९६७).
'बा होशो हवास में दिवाना' रफी.चित्रपट-नाईट इन लंडन, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९६७).
'फिर भोर भई जागा मधूबन' देवकी पंडित. चित्रपट-साज, संगीत-उस्ताद झाकिर हुसैन (२०१०).
'फिर मुझे दीदा-ए-तर याद आया' लता. संगीत-हृदयनाथ मंगेशकर.
'किसी रंजीश को हवा दो के मै जिंदा हूँ अभी' चित्रा सिंग.
'दोस्त बन बन के मिले मुझ को मिटाने वाले' जगजीत सिंग.
कबीर भजन- अभिजीत शेनॉय.अल्बम-निनाद (२०१४).
'सलोनी सांवरी सुरत' गायिका-सुस्मिता दत्त, भजन.
'मन लोभले मन मोहने' पंडित जितेंद्र अभिषेकी. संगीत-राम फाटक.
'कंठातच रुतल्या ताना' आशा भोसले. गीत-गंगाधर महांबरे, संगीत-श्रीनिवास खळे (१९९९).
'स्वप्नात साजणा येशील का' आशा भोसले. चित्रपट-गोंधळात गोंधळ, संगीत-विश्वनाथ मोरे.
'मोगरा फुलला' लता.संगीत-हृदयनाथ मंगेशकर.
----------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, रविवार दि.१४ जानेवारी २०२४
Subscribe to:
Posts (Atom)









