गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, March 27, 2026

तरुणा

 .                   तराणा

●नागपूरच्या दैनिक 'तरुणभारत  या वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावरील 'फेटे-फटकारे' शिर्षकांतर्गत आलेला खुसखुशीत लेख...दि.२६.४.१९९६.

                                     ■

     शास्त्रीय संगीतामधील विविध गायन शैलीपैकी एका शैलीला तराणा असे म्हणतात. या प्रकारात बंदिश अशी नसून, नुसतेच 'नोम्, तोम्, तदारे, तुंदिर, दानी' वगैरे निरर्थक शब्द असतात. हा प्रकार द्रुत लयीत गायिल्या जातो, द्रुत लयीच्या चमत्कृतीमुळे व त्यातील लयकारीमुळे रसिकांना हा प्रकार अतिशय आवडतो.

     शास्त्रीय संगीतातील विविध गायनशैलीप्रमाणे गायकांचीही विविध घराणी आहेत. त्या घराण्यांच्या नावेही आहेत. किराणा, आग्रा, पतियाळा, मेवाती, ग्वालियर वगैरे वगैरे. संगीतामधील घराणेशाही अजूनही सूरू असून, त्या त्या घराण्याच्या गायकांना व शिष्यवर्गाला त्या त्या घराण्याच्या नियमानुसार तालीम घेऊन त्याच पद्धतीने गावे लागते. (एवढ्या कडेकोट व्यवस्थेनंतरही काही गायक आपले वेगळे अस्तित्त्व निर्माण करतातच.) घराणेशाहीतील दुर्गुण इतर क्षेत्रांप्रमाणे संगीत क्षेत्रातही आहेत. एका घराण्याचा गायक दुसऱ्या घराण्याला नेहमीच कमी लेखून ते घराणे या घराण्यापेक्षा कसे कमकुवत आहे, या घराण्याची तान ते कसे घेऊ शकत नाही, त्यांचा स्वरलगाव कसा ठिसूळ आहे वगैरे आग्रही मतं सगळ्यांसमोर मांडत असतात.

     संगीतामधील ही घराणेशाही पाहिली की राजकारणातली घराणी आठवल्याशिवाय राहत नाही. कारण या घरण्यामध्येही संगीतातील घराण्यांप्रमाणे आपापले वेगळे नियम, वेगळे स्थान, हेवेदावे, शह-काटशह असतात. काँग्रेस, भाजपा, शिवसेना, भारिपा, खोरिपा, बसपा, कम्युनिस्ट ही या घराण्यांची नावे होय. प्रत्येक घराण्याची खासियत ठरलेली असते व त्यांचे महफिलीत गायचे रागही ठरले असतात. त्याचप्रमाणे राजकीय घराण्यातील घरंदाज सुद्धा गायनातील घरंदाजाप्रमाणे आपला एक एक राग रियाज करून तयार ठेवतात.

     संगीतामधील घराण्यांची ओळख त्यांच्या गायन पद्धतीवरून कळते, पण राजकीय घराण्यांची ओळख मात्र पंजा, कमळ, विळा-हातोडा, हत्ती, धुनष्यबाण, इ. चिन्हावरून कळते. चिन्हांप्रमाणेच यांचे रंगही ठरलेले असतात सेना, भाजपचा भगवा, मुस्लिम लीगचा हिरवा, रिपब्लिकनचा निळा, कम्युनिस्टांचा लाल वगैरे. (या रंगांमुळे त्यांनी कितीही रंग केले तरी चालतात.) 

     घरंदाज गायकांप्रमाणे राजकारणी सुद्धा आपल्या चेल्या-चपाट्यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू पाजून त्यांच्याकडून मोर्चे, बंद, नारेबाजी, जाळपोळ, मारामाऱ्या वगैरेंचा रियाज करून घेतात.हळू हळू ते छोट्या कार्यकर्त्यांपासून तो एकट्याने मैफिल जमवण्याइतपत तयारी करतात. लोक त्यांना ओळखायला लागतात. त्यांचे चाहते तयार होतात व निवडणुकीची तुतारी वाजली की या 'संगीत संमेलनात' गायलाच हवे, असा आग्रह धरून मंचावर 'उभे' होतात. या मंचावर प्रत्येक घराण्याचा एक एक उमेदवार उभा असतो व पुढील जुगलबंदीची तयारी म्हणून दंड थोपटून रियाजाला सुरवात करतो. एकदाचे या संमेलनात नाव नोंदविल्या गेले की, मग यांची जाहीर जुगलबंदी सुरू होते. वेगवेगळ्या घराण्याचे 'खट' कलावंत यात उतरल्यामुळे मतदारांचे भरपूर मनोरंजन होते. (जुगलबंदीकरिता तोडी, झिंझोटी व अडाणा रागांचा जास्तीत जास्त वापर केला जातो.)

     राजकारणातील घराणेदारांना 'दरबारी' राग फारच आवडतो. कारण हा राग (लाळ) घोटून घोटून आळवल्याशिवाय दरबारात प्रवेशच मिळत नाही व दरबारात शिरकाव झाल्याशिवाय अनेक वर्षांच्या रियाजलाही काही अर्थ राहात नाही. एकदा दरबारात शिरकाव झाला की मग मात्र त्यांना 'मधुवंती', 'रागेश्री', 'बागेश्री', 'दुर्गा', (पर)'देसी' ह्या रागिण्या आवडायला लागून सतत त्यांचे संपर्कात राहण्याचा ते प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात 'धन'श्रीने आपल्या गळ्यात माळ घालावी म्हणून हे सर्वजण उत्तरा नक्षत्रातील दृष्याप्रमाणे तिच्या मागे मागे हिंडत राहतात.

     निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात सर्वजण आपापल्या घराण्याच्या (पक्षाच्या) जाहिरनाम्यातील 'कल्याण' थाटातील रागाच्या विलंबित ख्यालाने करतात. शब्द असतात 'तूही एक अधार मेरो (मत)दाता'  व द्रुत ख्यालाचे बोल असतात 'जाऊँ तोरे चरण कमलपर वारी'. यानंतरचा तराणा प्रकार मात्र ते यावेळी न गाता निवडून आल्यावर सतत पाच वर्षे गात राहतात. कारण तराण्यातील निरर्थक बोल कोणालाच कळत नसतात. त्यामुळे मतदात्यांनाही 'तो' काहीतरी आपल्याच फायद्याचे बोलत असेल असे वाटून (बिचारे) सतत पाच वर्षे हा तराणा जिवाचे कान करून ऐकत राहतात. सर्व प्रकारच्या (गायन) शैलीमध्ये तरबेज असलेले हे घरंदाज, वरिष्ठांची जरी आरती गात असले तरी भक्तिगीते मात्र जनतेनेच म्हणावी ही त्यांची अपेक्षा असते व अशा प्रकारे मोठ्या 'मेहनतीने' जमवलेली महफिल पाच वर्षे टिकवून (भलेही मतदारांच्या घरात रोज 'दीप' राग आळवल्या जाऊन त्यांच्या घराची राखरांगोळी होवो.) आपल्या आयुष्यात 'बहार' आणून 'राजकल्याण' राग निश्चिंतपणे आळवीत बसतात.

-सुधाकर कदम

8888858850




No comments:





संगीत आणि साहित्य :