गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, May 4, 2025

संपली अजूनी कुठे ही रात सजणा...


 दि.१९ एप्रिलला माझ्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित 'सरगम तुझ्याचसाठी...' या मराठी गीत-गझलच्या मैफलीतील अत्यंत सुंदर अशी गझल...


संपली अजुनी कुठे ही रात सजणा

का असा जातोस तू इतक्यात सजणा


बोलते आहे नव्या स्वप्नासवे मी

हात घे हलकेच तू हातात सजणा


पाहण्यासाठी मला झंकारताना

चांदणे खोळंबले दारात सजणा


मोहराया लागले तारुण्य माझे

दरवळाया लागला एकांत सजणा


गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे

संगीत - सुधाकर कदम

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

व्हायोलिन - प्रभंजन पाठक

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

की बोर्ड - आशिष कदम

सूत्र संचालन - प्रशांत पेंडसे

● जोग रागाची सुरावट घेऊन आलेली अनिल कांबळे यांनी ही गझल जवळ-जवळ चाळीस वर्षांअगोदर स्वरबद्ध झाली होती.#सरगम_तुझ्याचसाठी या मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझल कार्यक्रमात माझी ज्येष्ठ कन्या भैरवी गायची. या गझलचे वैशिष्ट्य म्हणजे यात जोग रागासोबतच दुसऱ्या शेरात सारंग राग  आणि पुढे मुर्छनाद्वारे विविध रागांची उधळण केलेली दिसून येते. मूळ रचनेला स्वरांद्वारे विविध प्रकारे सजवणे म्हणजे गझल गायकी...याचा प्रत्यय ही गझल ऐकताना येते.यातील आर्जव गायकीतून दाखविणे ही प्राजक्ताची हातोटी म्हणावी लागेल.

Live - pune.19/4/2025

सरगम तुझ्याचसाठी ...


 

सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी

गातो गझल मराठी, प्रिये तुझ्याचसाठी


व्याकुळ ही विराणी, गाते तुझी कहाणी

शिवरंजनी दिवाणी, प्रिये तुझ्याचसाठी


घन सावळा गरजतो, बेबंद तान घेतो

बरसून शांत होतो, प्रिये तुझ्याचसाठी


सोसून गायिले मी, गाऊन सोसले मी

आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी


गायक - मयूर महाजन

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

व्हायोलिन - प्रभंजन पाठक

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

की बोर्ड - आशिष कदम

     ●ही गझल माझ्या आयुष्याची 'टॅग लाईन' आहे,असे मित्रवर्य प्रशांत पेंडसे यांचे म्हणणे आहे.आणि एकार्थाने ते सत्यही आहे.१९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रा,१९७२ पासून संगीत शिक्षक म्हणून नोकरी,१९८० ते १९८२ सुरेश भटांसोबत महाराष्ट्रभर भ्रमंती.१९८२ नंतर सोलो कार्यक्रम.यात पगार सोडला तर आर्थिक लाभ नगण्य.पण  शारीरिक त्रास मात्र भरपूर होत गेला.कदाचित हा त्रास सोसण्यातूनच ही कविता प्रसवली असावी.येताना सुरावट पण घेऊन आली.त्यातही प्रत्येक कडव्यात तीन-तीन यमक जुळवत आली.

      मी तर ही कविता गायचोच.पण माझा कनिष्ठ सहोदर प्रशांत कदम अतिशय सुंदर रीतीने गायचा.यातील "प्रिये तुझ्याचसाठी" या ओळीवरून 'ही प्रिया कोण?' अशी विचारणा व्हायची.तर, मित्रहो ही प्रिया दुसरी तिसरी कोणी नसून माझी '#मराठी' आहे.

      या गझलच्या सादरीकरणा अगोदर शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी आपल्या मनोगतामधून काही महत्वाचे मुद्दे मांडले.तसेच नेटके सूत्र संचालन प्रशांत पेंडसे यांनी केले.

Live -  Amrutmahotsav ceremony, pune 19/4/2025

Wednesday, April 16, 2025

#मैफल...ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन,अमरावती. दि.२६ डिसेंबर २०२४.


 

#गझलमित्र पुरस्कार...






 

मी जसा जगलोच नाही...सुरेश भट.


     सुरेश भटांच्या हयातीत मी त्यांची जवळ जवळ चाळीस गीते व गझला स्वरबद्ध केल्या होत्या."मी जसा जगलोच नाही" शब्दानुरूप बंदिश झाल्यामुळे त्यांची अत्यंत आवडती व हृदयस्पर्शी शब्दांमुळे माझी आवडती होती/आहे. या गझलची बंदिश मारवा रागात आहे."जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही" या पहिल्या ओळीत षड्जाचा नगण्य वापर केल्यामुळे मारवा रागाची उदासीनता, वरील ओळीचा अधिक अर्थ एकदम रसिकांच्या हृदयापर्यत पोहोचवते.दुसऱ्या ओळीतील 'तुटलो' या शब्दाकरिता आलेला मारव्यात नसलेला 'कोमल मध्यम' आणि त्यासोबत आलेल्या तत्सम सुरावटी तुटलेपणाचा आभास निर्माण करते.त्याचप्रमाणे 'जुळलोच नाही' या शब्दांकरिता तीव्र मध्यमा सोबत आलेला कोमल धैवत 'ती' हतबलता म्हणा,दुःख म्हणा अतिशय प्रखरपणे आपल्यापर्यंत पोहोचवते."वाटले मज गुण गुणावे" या ओळीकरिता यमन रागाचा चपखल वापर करून पुन्हा मूळ रागावर म्हणजे मारव्यावर येणे ही प्रक्रियासुद्धा त्यांना खूप भावली होती.म्हणूनच ही त्यांची अत्यंत आवडती स्वररचना होती.

आज दि.१५ एप्रिल, सुरेश भटांची जयंती... त्या निमित्त  ही माझी सांगीतिक श्रद्धांजली!

                        🌹🙏🌹


जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही

एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही


जन्मभर अश्रूस माझ्या शिकविले नाना बहाणे

सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही


वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिऱ्हाईत

सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही


कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो

पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही


कवी - सुरेश भट #sureshbhat 

गायकब - सुरेश वाडकर #sureshwadkar 

संगीत - सुधाकर कदम #sudhakarkadam 

संगीत संयोजन - मिलिंद गुणे #milindgune

ध्वनिमुद्रण - आजीवासन, मुंबई आणि पंचम स्टुडिओ,पुणे.

मिक्सिंग, मास्टरिंग - अजय अत्रे,#ajayatre पंचम स्टुडिओ, पुणे.





संगीत आणि साहित्य :