गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, June 13, 2026

●फडे मधुर खावया●

                                  (लेखांक ३३)

                            ●फडे मधुर खावया●

    मराठीसारखी मनमिळावू, सर्वधर्मसमभावाची व सोशिक भाषा या जगात दुसरी सापडणे अशक्य आहे. तिच्या सर्वसमावेशकतेमुळे किती तरी परप्रांतीय घुसखोर आपलेच घर समजून मराठीत ठिय्या देऊन बसले व स्वरात स्वर मिसळून गायला लागले आहेत. त्यामुळे मराठीनेसुध्दा 'मिले सुर मेरा तुम्हारा' असे म्हणत त्यांना आपल्या छत्रछायेखाली घेऊन 'सुर की महिमा' साऱ्या जगाला दाखवून दिली आहे. 

     प्रत्येक भाषेचा आपला एक डौल असतो, अदा असते, तरी पण त्या त्या भाषेतील शब्दांचा अपभ्रंश करून बोलणारे सगळी लय बिघडून टाकतात. डौल बिघडवतात. आपल्या मराठी मायबोलीत आलेले इतर भाषांमधील शब्द बिचारे एकजीव होऊन बसले, पण इंग्रजी मात्र अजूनही आपले वेगळेपण जपून आहे. त्यामुळे मराठी बोलतांनासुध्दा एखादा तरी इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय आम्हाला करमतच नाही. कमीत कमी 'इंप्रेशन' पाडायला तरी एखादा इंग्रजी शब्द वापरायचाच हा आमचा मराठी बाणा ! त्यामुळे ओ. सी. (ऑफिस कॉपी) चे ओशी, फाईलचे फायली, 'कम्प्लेंट'चे कंम्प्लेटा असे अनेकवचन व टेम्पररीचे टेंपरवारी, टाईल्सचे स्टाईल, ट्युबचे टूप, पिक्चरचे पिच्चर असे उच्चार होताना दिसून येतात.

     मी कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्याच हजेरीच्या वेळी इंग्रजीच्या राव नामक प्राध्यापकाने मिस्टर एस. पी. कॅडॅम असे नामकरण करून मला धर्मांतराच्या टोकावर नेऊन ठेवले. पहिल्या वर्गापासून सुधाकर पांडुरंग कदम असे पूर्ण नाव शुध्द मराठीत ऐकायची सवय असल्यामुळे त्या दिवशीच्या नामांतर सोहळ्यामुळे आम्ही बेशुध्द व्हायच्या बेताला आलो व आमची पितरे झिंगल्यासारखी होऊन भेलकांडायाला लागली. हे काही बरे नव्हे म्हणून व वर्गातील मुलीही या नावाला फिदीफिदी हसल्या म्हणून मी उभे राहून 'कॅडॅम' नव्हे 'कदम' असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण रावांना मराठी समजत नसल्यामुळे त्यांनी 'यऽऽस, यूऽऽऽ, व्हाट हॅपन्ड ? सिट डाऊन प्लिज ! आऽऽऽय से सिट डाऽऽऊन' केले. पण आमच्या टाळक्यात काहीच न शिरल्याने आम्ही उभेच. हे पाहून पुन्हा 'हेऽऽऽ यूऽऽऽ, गेटआऊट' असले काही तरी इंग्रजीत सांगितले. त्यातील 'गेटआऊट' तेवढे आम्हाला समजले. पहिल्याच दिवशी घोर अपमान होत असलेला बघून आम्हीही तावात आलो व 'यू आर राँग सर, माय नेम इज कदम, अँड यू आर कॉल्ड मी कॅडॅम, देट इज कदम कदऽऽऽम, नॉट कॅडॅम! प्लिज रिपेअर (दुरुस्त करा) माय नेम इन युवर रोल कॉल' अशी मायबोलीतील खडी इंग्रजी सुनावली. पण आमची इंग्रजी रावांना समजेना व रावांचे सांगणे आम्हाला पटेना! वर्षभर असेच चालल्यामुळे आमचे इंग्रजी कच्चे राहिले ते राहिलेच !

     आमच्या चिरंजीवांच्या दहावीच्या परीक्षे अगोदर त्याचा शाळेतील निरोप समारंभ आटोपला. त्याच दिवशी आजी अत्यवस्थ असल्याचा निरोप आला. आम्ही सर्व कुटुंबीय शेवटची भेट घ्यायला खेड्यावर पोहचलो. सगळे नातेवाईक जमा झाले होते. आम्ही सर्व जण आजीला भेटून, निरोप घेऊन खोलीच्या बाहेर आलो. तेवढ्यात गावचे पाटील तिथे आले व दरवाज्यात उभ्या असलेल्या आमच्या चिरंजीवांना म्हणाले. 'काय म्हणते रे आजी? चिरंजीव उद्‌गारले, 'सध्या आजीचा सेंड ऑफचा कार्यक्रम सुरू आहे!'

     सातव्या इयत्तेत असताना माझ्या फाळके नावाच्या वर्गबंधूला 'ळ' चा उच्चार करता येत नव्हता.तो 'ळ' ला 'ड' म्हणायचा.मुलं त्याला 'फाड'के म्हणायची.एकदा मराठीच्या तासिकेला शिक्षकांनी एकेक विद्यार्थ्याला एकेक कविता म्हणायला सांगितली.नेमकी फाळकेच्या वेळी 'फळे मधुर खावया असती नित्य मेवे जरी' ही कविता आली. फाळकेने उच्च सुरात सुरू केली 'फडे मधुर खावया....' अर्थात पुढील ओळी विद्यार्थी व शिक्षकाच्या हस्यकल्लोळात बुडून गेल्या हे सांगणे नकोच!

दै. विदर्भ मतदार,अमरावती.रविवार दि.१४/६/३०२६

No comments:





संगीत आणि साहित्य :