#जर_तर
सुरेश भटांची भेट झाल्यानंतर हळू हळू जुन्या गझलांसह नवीन झालेल्या गझला स्वरबद्ध करण्यासाठी मला देत गेले.तोपर्यंत मी सरोद वादन व स्वरबद्ध केलेल्या उ.रा. गिरी,शंकर बडे,शिवा इंगोले,बबन सराडकर,श्रद्धा पराते,ग्रेस,नीलकांत ढोले, शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,गजेश तोंडरे, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम,गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, यांच्या मराठी-हिंदी गीत-गझलांचा संमिश्र कार्यक्रम करायचो.नंतर सुरेश भट आर्णीला माझ्याकडे आले की नवीन गझल,नव्या बंदिशी,
मैफली,खवैयेगिरी आणि मूड लागलाच तर आर्णी जवळच्याच काठोडा या छोट्याशा गावातील रमेश माहुरे पाटील या रसिक मित्राकडेगप्पा,कॅरम,मैफिल,खाणे,
आराम असा एकूण कार्यक्रम असायचा.एकदा तर पुष्पा वहिनी (श्रीमती पुष्पा सुरेश भट), चित्तरंजन सुद्धा कठोड्याला आले होते.सोबत कवी कलीम खान असायचेच.सुरेश भटांच्या सहवासाने १९८०/८१ मध्ये माहुरे घरातील तरुणाई कविता करायला लागली होती.
हवा जरासा आसरा
तुझ्या मनाचा कोपरा
सुगंध अलगद हेरतो
गुलाब तू की मोगरा
-अशोक माहूरे
ही तरुण कंपनी सुरेश भटांची सेवा तर करायचीच पण तेवढ्याच खोड्या पण करायचे.त्यांच्या गझलांचे विडंबन करून त्यांनाच ऐकवून प्रेमाच्या शिव्या खाणे हे नित्याचे.
सगळे त्यांना बावाजी म्हणायचे.रमेश पाटलांच्या वडील बंधूच्या घराला एक तळघर होते.दुपारचे जेवण झाले की बच्चा कंपनी त्यांना आराम करण्यासाठी तळघरात घेऊन जायचे.थंडगार तळघरात पलंग,खुर्च्या,टेबल,पंखा अशी व्यवस्था असायची.तेथे यांच्या गप्पा सुरु व्हायच्या.गप्पा करताना कुणी त्यांचे पाय दाबत,कुणी हात दाबत.भटांना अंग दाबून घायची सवय होती.अंग दाबण्यावरून काठोड्याचाच एक किस्सा आठवला.
दुपारची झोप झाली की पालथे पडून पाटलाकडील गड्याला पाठीवर पाय द्यायला लावून पाठ चेपून घ्यायचे.एकदा मी व कलीम नेहमीप्रमाणे रविवारी काठोड्याला गेलो असता भटांचा विषय निघाला.त्यांच्या गझलांवर चर्चा सुरू झाल्यावर ते किती मोठे कवी आहेत,त्यांच्या कविता मोठ मोठे गायक गायिका गातात वगैरे वगैरे...आमच्या ह्या गप्पा गडी ऐकत होता.तो लगेच म्हणाला 'अस्तिन मोठे,म्या त लै येळा त्यायले तुडवलं हाये' त्याच्या या वाक्यावर हास्यकल्लोळ उठला.
भटांनी एकदा आर्णीला माझ्याकडे मुक्कामी असताना 'नात' (हजरत पैगंबर साहेबांची स्तुती असलेले गीत) लिहिली.ती सर्वप्रथम मला दाखवली व म्हणाले इथल्या उर्दूच्या जाणकारांना बोलव.मी लगेच मित्र रशीद भाईचे वडील करीम चाचांकडे गेलो व त्यांना सुरेश भटांनी मराठीमध्ये नात लिहिल्याचे सांगितले व घरी येण्याचे निमंत्रण दिले.करीम चाचा म्हणजे उर्दू गझलांची चालती बोलती डिक्शनरीच.आर्णीच्या कंबलपोष बाबांच्या दर्ग्यावरील उरुसात होणाऱ्या कव्वालीचे आयोजन,तसेच कव्वाल ठरवण्याचे काम तेच करायचे.उर्दूवर कमांड असलेले करीम चाचा घरी आले.सुरेश भटांनी त्यांच्या पद्धतीने नात ऐकवली.चाचा एकदम खुश झाले व नात लिहिलेल्या कागदावर 'बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम'
( इस्लाममध्ये कोणत्याही कामाचा शुभारंभ "बिस्मिल्लाह-हिर्रहमा-निर्रहीम" b-ismi-llāhi r-raḥmāni r-raḥīmi بِسْمِ ٱللَّٰهِ ٱلرَّحْمَٰنِ ٱلرَّحِيمِ याने करतात.'बिस्मिल्लाह'चा अर्थ आहे 'शुभारंभ'!) असे उर्दूमध्ये लिहिले.कारण ती मराठी भाषेत लिहिलेली पहिली नात होती.शब्द होते....
'उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद
जगातल्या दीन दु:खीतांचा अखेरचा आसरा मुहम्मद'



No comments:
Post a Comment