गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, December 17, 2022

राग #तोडी आणि मी...


        तोडी या रागात सा रे ग म ध नि असे स्वर लागतात.(अवरोहात पंचम स्वराचा वापर काही गायक करतात.)यातील रिषभ,गांधार,धैवत स्वर कोमल असून मध्यम तीव्र आहे.गानसमय सकाळचा आहे...अर्थात ही वेळ फक्त शास्त्रीय गायन,वादन करणा‌ऱ्यांसाठीच आहे.कारण या रागातील जेवढी काही चित्रपट व चित्रपटाबाहेरची गीते,भावगीते,भक्तिगीते आहेत ती सर्वकाळ गोड वाटतात,हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे.
        तोडी राग जवळ-जवळ प्रत्येक गायक-वादकाने गायिला-वाजविला असावा.पं.भीमसेन जोशींच्या तोडीतील ताना, मेघांच्या गडगडटाला आव्हान देणार्‌या होत्या.तर प्रत्येक स्वराचे महत्व जाणून त्याचा अतिसुंदर विस्तार किशोरीबाईंच्या गाण्यात दिसून येतो.पं.जसराज यांची प्रत्येक राग गाण्याची आपली एक वेगळी शैली आहे.तेथे कदाचित शास्त्र थोडे बाजूला पडत असेल.पण ज्याला ’मेलोडी’ म्हणतात ती त्यांच्या गायनात,ऐकतांना सतत जाणवते.याचा अर्थ इतर गायकांनी गायिलेला तोडी ऐकण्या सारखा नाही किंवा नसतो असे नाही.उदाहरण देतांना लोकप्रिय कलाकारांचेव नाव घ्यावे लागते,त्याला इलाज नाही.
          अशा या तोडी रागाचे मला सर्वप्रथम आठवते ते ’आशिर्वाद’ या चित्रपटातील ’एक था बचपन...’ हे गाणे.त्यानंतर ’भावभोळ्या भक्तिची ही एकतारी...’हे श्रीनिवास खळे यांनी तोडीच्या स्वरांसोबत इतर स्वरांचा ताना-बाना करून विणलेल अतिशय तलम गाणं,संगीतकाराच्या प्रतिभेची उत्तुंग झेप दाखविते.खळ्यांनीच स्वरबद्ध केलेला तुकारामाचा अभंग ’अगा करूणाकरा...’ हा अभंग ऐकतांना डोळे आपोआप झरायला लागतात.तसेच ’पिंजरा’ या चित्रपटाती. राम कदमांनी स्वरबद्ध केलेलं व सुधीर फडक्यांनी गायिलेलं ’कशी नशीबानं थट्टा आज मांडली...’हे ही गाणे तोडी रागा मध्येच आहे.’अमर प्रेम’ या चित्रपटातील ’रैना बीती जाए...’ याचा मुखडाही याच रागात आहे.'मिलकरजुदा' ही अप्रतिम गझल जगजीत-चित्रा यांनी अमर करून ठेवली आहे.
          साबरी बंधुंनी गायिलेली ’अल्ला हे अल्ला...’ ही कव्वाली त्यांच्या गायकीने रात्रीच्या वेळी सुद्धा वेगळ्या विश्वात नेवून तल्लीन करते.त्यांनी दुसर्‌या ओळीत कोमल मध्यमाचा वापर वापर करून केलेली स्वरांची बांधणी भल्या-भल्यांना बुचकळ्यात टाकते.त्यांच्या गाण्यातील आर्तता सरळ हृदयात घुसून अमिर खुस्रोच्या ’सूफी’ संगीताची ’खरी’ ओळख पटवते.मध्यमाचा असाच काहीसा प्रयोग अनूप जलोटा यांनी ’तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे’ या गझलच्या बंदिशीत केला आहे,तो पण श्रवणीय आहे.
          माझ्या मते गानसमयापेक्षाही त्या त्या रागातील स्वरांचा उपयोग संगीतकार कशा प्रकारे करतो,
गायक-गायिका कशा प्रकारे प्रस्तुती करते आणि वाद्यमेळ कसा जमतो यावर श्रोत्यांची आवड-निवड ठरत असावी.तसे नसते तर तोडी रागातील गाणी सकाळ सोडून इतर वेळी कानाला गोड लागलीच नसती.काही-काही गोष्टी परंपरेने ठरवून-ठरवून डोक्यात भरविल्या जातात त्यातलाच गानसमय हा प्रकार असावा असे मला प्रामाणिकपणे वाटते.असो...हा वादाचा मुद्दा आहे.असो!
       मी सुद्धा काही मराठी-उर्दू गझला तोडी रागात स्वरबद्ध केल्या आहेत.नुकतीच #गझल_गुलाबो या अल्बम करीता रविप्रकाश चापके यांची "जो तो दिसावयाला दिसतो सुखात आहे" ही गझल स्वरबद्ध करून ध्वनिमुद्रण केले.यातील पहिल्या ओळीची सुरवात कोमल धैवतापासून सुरू होऊन निषादावरील ठहरावासह 'भूप' रागाची अनुभूती देऊन, 'आहे' या शब्दावरील पंचम आणि पूर्ण ओळीत षड्ज नसणे हे  वैशिष्ठयपूर्ण असून हीच ओळ दुसऱ्यांदा गाऊन षड्जावर सोडण्याची प्रक्रिया सुद्धा आनंददायी आहे.तसेच शेरांमध्ये केलेला तोडी रागात नसलेल्या कोमल निषादाचा आणि कोमल मध्यमाचा प्रयोग सुद्धा अत्यंत वेगळ्या विश्वात नेणारा आहे. स्वरांचा हा चक्रव्यूह रसिकांना  नक्कीच भावेल.ऐका तर...
        
जो तो दिसावयाला दिसतो सुखात आहे
गर्दीत माणसांना एकांत खात आहे

आता तुझ्या स्मृतींची फुलपाखरे उडाली
बेरंग बाग नुसती जळते मनात आहे

ये ना तुझा नशीबा मी हात पाहते रे
माझे नशीब माझ्या ह्या मनगटात आहे

ऐकून घ्या परंतू सांगू नका कुणाला
जो जो सुखात आहे,तो तो भ्रमात आहे

गायिका-गायत्री गायकवाड गुल्हाने



 

 

No comments:





संगीत आणि साहित्य :